स्वार्थी फुलांचा परमार्थ

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
2 Jul 2025 - 6:07 pm

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,

ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!

पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फुलांच्या टप टप वर्षावात भिजलेल्या‌ पहाटेची मौज कधी संपूच नये वाटतं.बकुळीच्या फुलांनी गंधाळलेली ओंजळ कधी रीती व्हावी असं वाटतच नाही.मोगऱ्याचं फुलणं क्षणाक्षणाने इवल्या पाकळ्यांचे वाढणारं टपोरं सौंदर्य केसांत दिवसभर रेंगाळून माळून घ्यावंच वाटतं.कन्हेरीचा पिवळा साज डोळे दिपून टाकणारा ,सर्वत्र संचार करतो.

अशा वेचलेल्या फुलांना सूत्रात बांधयची ,हार ,गजरे करायची कल्पना सृष्टीच्या आदिमापासून माणसाची सौंदर्य कल्पना जागृत झाल्याची पहिलीच खुण असणार!तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत पुरातन ते आजतायगत बेधुंद प्रेमवीरांचे प्रेम बंधन साकार होत आले.

माणसानेच घडवलेल्या मूर्तीला मग श्रद्धेचे प्रतिक म्हणून याचे हार श्रद्धाभावानेच एक एक फूल ईश्वर नावाने ओवले जाऊ लागले.त्या सूत्राला केशरी,हिरवट,जांभळट,लाल असा देठांचा फुलांचा रंग चढतोच पण बोटांची टोकही या रंगात बुडतात .

तयार झालेल्या मालेचा गंध त्या मूर्तीच्या सर्वांगाला भिणला की अरुपाचे स्वरुप भक्तांच्या दिठी उजळून निघत राहिले..राहत आहे.

-भक्ती
१

(ता.क.- आधी हिंदू कादंबरी ऐकताना जड जात होती.पण आता अतुल पेठे यांचे अभिवाचन, कांदबरीत असे कुठून कुठून अचानक येणारे संदर्भ एका कथेचा कोलाजच होते.हे लिहितांना त्याचा प्रभाव घडून हे लिहिलेय हे जरा जाणवतंय )

मुक्तक

प्रतिक्रिया

अनिता's picture

2 Jul 2025 - 8:53 pm | अनिता

पारिजातकाचा फोटो फारच छान...

जनातलं मनातलं आहे हे पटतंय.
फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय.
पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही.
कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

सहमत. पुस्तक अजिबात आवडले नाही.

विवेकपटाईत's picture

3 Jul 2025 - 8:54 am | विवेकपटाईत

एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

श्वेता व्यास's picture

3 Jul 2025 - 9:52 am | श्वेता व्यास

लेखातील विचार आवडले, पण कादंबरी उसनी आणून पण पूर्ण वाचली नाही गेली :)
चित्र सुंदर आहे.

Bhakti's picture

3 Jul 2025 - 10:41 am | Bhakti

सर्वांना _/\_
मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे.
पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2025 - 12:08 pm | कर्नलतपस्वी

खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन.
सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.