सुरीला दारूडा,..

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 9:46 pm

संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की
तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी
"चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.."
असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा.
घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा .
बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत.
"बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..."
हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची.. म्हणत सूर लावायचा.दारूड्याला हेच गाणं का गावं वाटतं.कोण्या बाईने त्याला नादावलं,आणि तो दारूडा झाला असेल का?? परत प्रश्न‌ पडायचा.

ज्यांनी पहिल्यांदा हे ऐकलं ते बाहेर डोकावून पाहत. पण आता त्याची सवय झाली होती, तो झिंगत गात रस्त्यावरून जायचा तेव्हा त्याच्या तालात घरातच माना डोलायच्या.वाटायचं,काय भारी आवाज जरा नशीबवान असता तर याने मैफिली जमवल्या असत्या.बेवडा नाही केवड्याच्या सुंगधासारखा दरवळला असता.

त्याचं दुसरं गाण असायचं..
" जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर"
त्यात तो" जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर "
हे अगदी बेंबीच्या देठापासून वरच्या पट्टीत गायचा.
"जैसे ज्याचे कर्म?"
बेवड्याला नक्की स्वतःचे तरी कर्म समजत आहे का? मूळात व कर्म ,त्याचे फळ उमगल? जर हो तर का तो दारु पित असावा?
पण दारूड्याला ईश्वर नक्की मान्य असणार??
पांढरपेशा मला प्रश्न पडायचे?
आता दारूडा दिसत नाही, म्हणजेच ऐकू येत नाही. कुठल्या प्रवासात गेला काय माहिती?..
-भक्ती

मुक्तक

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

1 Jul 2025 - 9:40 pm | कर्नलतपस्वी

तळीरामांचा सूर्योदय होतो.

मुक्तक आवडले.

विवेकपटाईत's picture

2 Jul 2025 - 7:27 am | विवेकपटाईत

गोष्ट आवडली. तळीराम डोळ्यांसमोर उभा राहिला.

दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला...
एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!

तळीराम -
बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं!

तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं

ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 3:28 pm | श्वेता व्यास

चांगला लेख, फक्त ते शीर्षक जेव्हा जेव्हा डोळ्याखालून जातंय तेव्हा सुनील दारुडा वाचलं जातंय माझ्याने :D

हा हा,सुनील पाहतोय/वाचतोय हं ;)
आधी मी बेवडा असं शीर्षक दिलं होतं ,हा हिंदी शब्द आहे ना पण!

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 6:37 pm | श्वेता व्यास

हा हा,
होय, आधीच सध्या हिंदी-मराठी वाद जोरदार चालू आहेत :)