नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
14 Jun 2025 - 11:55 am

नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व

१

गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट!

#मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वाहत आपल्यापर्यंत पोहचतात.

लेखक अनेक वर्षांपासून चाकोरीब‌द्ध १०-५ कार्यालयीन जीवनानतही आवर्जून सकाळी वा संध्याकाळी गोदामायेच्या प्रवाहात पोहायला जात. अगदी दादारावांच्या प्रशिक्षणात पट्‌टीचे पोहणारे झाले. एका काठापासून दुसयाकाठगपर्यंतचा पोहण्याचे काम ते लीलया करत. एकदा काही मुलं या गोष्टीचे कौतुक करताना, अचानक लेखकाला पोहताना प्राण उरत नाही, तेव्हा मुलांसमोर पोहण्याची बढाई करताना इगो जागृत झाला आणि पोहणेही सर्व कठीण झाले याची लेखक कबूलीच देतो.

अशाच अनेक जन्म, मृत्यू, समाजजीवन, विविध मानवी भावना नदीकाठी भेटलेल्या काही विशेष व्यक्तीमुळे लेखक सहज पण ठळकपणे दाखवून देतात.

सकीनाबी ही एक भिकारीन नदीकाठी अनेकदा भेटायची, पण अचानक ती नदीवर यायची बंद झाल्यावर तिची कहाणी लेखकाने तिचा शोध घेत सांगितली. तसाच भिकाजी सुरुवातीला अबोल पण लेखकाच्या संवादाने मायेची जाणीव झाल्याने बोलू लागला. तेव्हा त्याच्या आयुष्यातल्या सर्व जखमा आपल्यालाही रक्तबंबाळ करतात.मांजरीच्या द्वेषापायी त्याची बहिण, आई. आणि पोटची मुलगी... सारेच विरून जातात, हे समजते, या द्वेषापायीच तो १-१.५ वर्षाच्या र पोटच्या मुलीचा अनवधाने बळी घेतो. उरले सुरलेले नातेही तटकन तुटून जाते.भिकाजी कैदी होतो आणि आयुष्याचा अभागी फेरा भिकारी होण्यापर्यंत पोहचतो.
पुस्तकालील अजून एक रोचक गोष्ट म्हणजे नदीतील 'हर्जिन जागची वाळू'' मिळवण्यासाठीची त्याने केलेली घडपड. आताच्या काळात वाळू उपासा प्रचंड प्रमाणात असताना अशी अस्पर्शित जागा नदीत कुठे असेल का? हे नदीपात्र, खोल म्हणजे तिचे गर्भशयच! पण वाळू उपस्याने तिच्या गर्भाशयालाच इजा खोलवर करतो, हे हल्ली कोणाच्याच ध्यानी नाही, हे संवेदनशील पणे लेखक मांडतो.

कालूभैय्या, पुजारी हे लेखकासाठी त्रयस्थ असूनही त्याला पोहण्याबाबत कायम खबाबदारी घ्यायला सांगणारे, तो नदीत असेपर्यंत वा लवकर परततांना दिसला नाही की ही मंडळी काळजीत पडत.

विषारी नाग पकडणाऱ्या प्रसादने अनेक रोमांचकारी किस्से लेखकाला सांगितले.त्याने एकट्याने पहिल्यांदा नाग पकडला तेव्हाची धाकधूक!

पण कादंबरीत जी व्यक्तीरेखा गारुड घालते, ती सगुणा एक तृतीयपंथी. प्रारंभी लेखक हिच्यापासून दूरच राहत, सगुणाच्या जीवनपटावर तो तिचा 'जान' होतो. तृतीयपंथी सगुणाबरोबर माणूस म्हणून लेखक ज्या संवेदनांनी वागतो, बोलतो ते समजून घेताना, नकळत या समाजाविषयी आपलीही आपुलकी पुढे येत राहते, नव्हे ते माणूस' आपण स्वीकारतो. सगुणा तिचा तृतीयपंथी होव्याचा प्रवास, त्यांच्या चालीरीती, गूढ भाषा, मित्र-समाज गोतावळा या सर्वांविषयी कुतुहलपूर्ण माहिती लेखकाला देते.आईला भेटण्याची धडपड किती सर्वसामान्य प्रमाणे पण अशक्य कोटीची तिच्यासाठी आहे हे जाणवते.

मागे तारा भवाळकर ज्याप्रमाणे म्हणाल्या की 'भाषा, ही जैविक आहे.' त्याच आशयाप्रमाणे लेखकही पूर्वीच म्हणाले (लिहले) की नदीही जिवंत सजीव - living organism आहे. नदीच्या काठी अनेक संस्कृती, मानवी जीवन, तिच्या पाण्यात अनेक जीव जीवन साकारत राहते, ते बदलते, धडपडते, घडते.
-भक्ती
जमल्यास लाईक करा :)
https://youtu.be/_mRltmSfINc?si=QO9eUJROib_ayCOx

मुक्तकजीवनमानआस्वादसमीक्षा