बाजाराचा कल : २६ मेचा आठवडा
====================
मंडळी,
विअर्ड विक्स यांनी "बाजाराचा कल" हे सदर परत चालू करण्याबद्दल सूचना केली होती. म्हणून हे सदर परत चालू करत आहे.
मधल्या काळात युयुत्सु-नेटची दोन भावंडे जन्माला आली. त्यात एक मॉडेल KNN algorithm वापरून तयार केले आहे. त्याचा अभ्यास चालू आहे. दूसर्या मॉडेलमध्ये युयुत्सुनेट-१ मध्ये वापरलेल्या फिचर-सेटपेक्षा पूर्णपणे वेगळी फिचर वापरली आहेत. त्याचा वापर मी इण्ट्रा-डे साठी करतो. KNN आणि युयुत्सुनेट-२ जेव्हा एकच भाकीत करतात तेव्हा ते खरं ठरायची शक्यता जवळजवळ १००% असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.
या सर्वांचा वापर करताना युयुत्सु-नेटबद्दल माझे स्वत:चे आकलन आता बरेच विस्तारले आहे. असो.
१० वर्षापूर्वी मी बाजारात उतरायचे ठरवले तेव्हा एक महत्त्वाचा योगायोग घडला होता. अमेरीकेतील MIT या जगप्रसिद्ध विद्यापीठातील एक प्राध्यापक एडवर्ड थॉर्प यांचे A Man for All Markets हे आत्मचरित्र वाचनात आले. या गृहस्थांनी लास व्हेगास मधल्या कॅसिनोला हरवणारा अल्गो तयार केला होता. त्यांना कुणीतरी विचारले की If you are smart then why you are not rich!
हे वाक्य मी वाचले तेव्हा मी अंतर्बाह्य गदागदा हललो. मग सुरु झाला स्वत:चा एक शोध, जो आयुष्यात आलेल्या वादळांनी तेव्हा पूर्णपणे थांबला होता.
माणसाला प्रयत्न करताना सुरुवातीला मिळणारे यश किंवा अपयश, उत्तेजन किंवा नाउमेद करणारे सल्ले पुढच्या प्रगतीवर महत्त्वाचा प्रभाव टाकतात. "तू लढ आम्ही आहोत", असं म्हणणारे भेटायला फारच नशीब लागते. मला सुरुवातीच्या ट्रेडींगमध्ये अनपेक्षित यश मिळाले तेव्हा नाकं मुरडणारे, चुकीचे सल्ले देणारे खुपजण भेटले. मी स्वत: आयुष्याचा मोठा काळ- आपण लौकीक अर्थाने हुशार नाही- या न्यूनगंडाने पछाडलो होतो. पण ध्यान मार्गाला लागल्यावर "मी वेगळा विचार करणारा आहे, मी कल्पक आहे आणि तीच माझी खरी ताकद आहे" असा साक्षात्कार झाला.
समाज व्यक्तीच्या क्षमतेचे मूल्यमापन कधीही योग्य रितीने करू शकत नाही. समाजाने डोक्यावर घेतलेल्या व्यक्ती या त्या योग्यतेच्या अपवादानेच असतात. फार काय, व्यक्तीच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा समाज कधी ही स्वस्थ रहात नाही, तसेच प्रगती करू शकत नाही. कारण ’व्यक्ती’ हा समाजाचा घटक असमाधानाने कुढत राहीला तर ते शेवटी समाजालाच धोकादायक ठरतं.
याच सुमाराला मला माझ्या लेकीने मला "R" या भाषेची ओळख करून दिली. "R" चा किडा चावल्यावर सुरु झाला मग बाजाराचा पद्धतशीर आणि स्वत:च्या मगदूराप्रमाने अभ्यास...
इण्ट्राडे हा प्रकार करताना तोटाच झाला (पण तो पोझिशनल मध्ये भरून काढला). पण संख्याशास्त्राच्या मदतीने इण्ट्राडे केले तर आपल्या सोईचा कोपरा बाजारात शोधता येऊ शकतो असा आत्मविश्वास आला. पण तरीही एक अडचण येत राहीली ती म्हणजे स्वत:च्या मानसिक कंगोर्यांची. हे कंगोरे दुरुस्त करणे अतिशय अवघड होते. उदा० एक ट्रेड मनासारखा झाल्यावर दुसरा टाळणे (नफा आणि मुद्दल टिकवणे), हा टप्पा अतिशय अवघड वळण ठरला. तोटा मर्यादित ठेवणे, मुद्दल टिकवणे, रिव्हेंज ट्रेडींग टाळणे या अशाच अवघड पायर्या होत्या. याशिवाय पोझिशनल असो अथवा इण्ट्राडे, कोणत्याही काळात बाजारातून किती अपेक्षा ठेवायची हा महत्त्वाचा प्रश्न मी स्वत: पद्धतशीर अभ्यास करून सोडवला आहे. अजुनही एक टप्पा पार करायचा आहे - तो म्ह० मोठ्या रकमांचे ट्रेड करण्याचा...पण त्याचे मला फारसे आकर्षण नाही. पण मला खरा रस आहे तो यशाचा दर सातत्याने टिकवून ठेवण्यात!
बघूया किती जमते...
तुम्ही ट्रेडर्सच्या कळपात राहात असाल तर आतल्या बातम्या मिळाल्याने इण्ट्राडे करणे थोडेफार सोपे बनते. पण तुम्ही एकटे असताना पूर्णपणे दिनान्त विदावर (EoD Data) अवलंबून राहून, कुणीही मार्गदर्शक न घेता इण्ट्रा-डे करणे हे कमालीचे अवघड आहे, हे कुणीही मान्य करेल. आज माझ्या प्रवासात माझा कुणीही मार्गदर्शक नाही.
या प्रवासात माझा चिकटपणा टिकवून ठेवायला मला माझा चेताविज्ञान, प्राणायाम इ० चा अभ्यास मला मोलाचा ठरला. शिकणे म्ह० काय असते, त्याची प्रत्येकाची गती वेगळी का असते याची उत्तरे चेताविज्ञानाने दिली आणि नव्या कल्पना सूचण्य़ासाठी लागणारी मानसिक अवस्था ध्यान आणि प्राणायामाने विकसित करता आली.
आज मी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलो आहे आणि या टप्प्यावर मला नाउमेद करणारे, अपमान करणारे, चुकीचे सल्ले देणारे, मूर्खासारखे आह्वाने देणारे यांना माझ्या कामगिरीचा आलेख समर्पित करतो. त्यांचे मतपरिवर्तन व्हावे ही अपेक्षा मात्र अजिबात नाही.
असो. हे स्वगत आता आवरते घेतो. आता या आठवड्याचे भाकीत-
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख
तांबड्या रंगाची ’हातोडी’ बाजारात कमकुवतपणा दर्शवते. त्यामुळे पुढच्या आठवड्यातील बाजार पूर्णपणे येणार्या बातम्यावर अवलंबून राहील असे वाटते. २५०६० आणि २५३६० या दोन महत्त्वाच्या पातळ्या मला दिसत आहेत.
आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ३५%/६५%
आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ४३%/५७%
आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते पुढच्या आठवड्यात बाजार वर जाईल
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.