‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते! हा झटका दोन्ही घरांत संपूर्ण गोंधळ घालतो आणि मग सुरु होते खरी धमाल.
प्रसाद-सईचे हे रहस्य समोर येताच समीर (मकरंद) आणि ईशा (रागिणी) यांची वेगळीच खेळी सुरु होते. समीर आणि रागिणी या दोघांना रंगेहाथ पकडणायचे ठरवतात पण प्रत्येकवेळी त्यांचा हा प्रयत्न फसतो आणि प्रेक्षकांवर पोट धरून हसण्याची लाट वाहू लागते! समीरची निरागस, सुलभ भूमिका प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. त्याचप्रमाणे ईशा च्या रागिणी भूमिकेतला टाइमिंग आणि हातवारेही भन्नाट आहेत – ती जिथे पोहोचते तिथेच विनोद उधळते. समीर च्या मुलाचा पौंगडावस्थेतला प्रौढ अंदाज आणखी मसाला आहे; तो बोलला नाही तरी त्याच्या डोळ्यांतल्या चमकने रसिकांना मर्मितार्थ लगेच कळतो. मंदार मंडावकरच्या हटके अंदाज गंमतीत भर घालतो , तर वनिता खरात (धोनेबाई) चा खोडकरपणा आणि रोखठोक संवाद आल्हाददायी आहेत.
सई-प्रसादच्या जोडीतही वेगळ्या स्तराचा तिखट–गोडपणा आहे. सई आणि प्रसाद दोघांचेही अभिनय फार नैसर्गिक; जुन्या क्षणांची आठवण जागवणाऱ्या त्यांच्या गप्पा प्रेमाची सुरेख चव देतात. तर त्यांच्या मुलांपुढील प्रेमकहाणी साधी-सोपी असूनही खूप गोड आहे – जुई आणि तेजस यांची युवा केमिस्ट्री कमल आहे. एकंदरीत, हा चित्रपट भरपूर विनोद आणि थोडीशी मिठाईप्रमाणे गोड आठवण घेऊन जाणारा आहे. दिग्दर्शन, छायांकन आणि संगीताची जुळवाजुळव मनमोहक आहे; अनेक कलाकार MHJ मधले असुनही ( निर्माते नि दिग्दर्शकसुद्धा) चित्रपटावर त्याची जरासुद्धा छाप नाही .
“गुलकंद आहे संसारात मुरलेल्या प्रत्येकासाठी… एकदा चाखाल तर परत मागाल!” तशीच गोडी या सिनेमात आहे. मित्र-परिवारासोबत हा चित्रपट पाहण्याचा अनुभव खरा धमाल आहे – सिनेमाघरातून बाहेर पडल्या नंतरही तोंडावरच गुलाबी हसू टिकून राहील.
ता. क. - गुलकंद हा चित्रपट शाळा कॉलेजातील एखाद्या पुस्तकात राहिलेल्या पिंपळपानवर आधारित आहे . वर्षे उलटून गेल्यावर त्या पिंपळपानावर सुरेख जाळी पडते. त्या जाळीकडे पाहून क्षणिक मन सुखावले तरी त्या जाळीत गुंतू नये.