“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे.
हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला. पुन्हा जेव्हा बूड मुंबई पुण्यात स्थिरावले तेव्हा इंग्रजी साहित्याची आठवण झाली. मग मात्र कुठेही थांबलो नाही. किती वाचू अन काय वाचू असे झाले.
त्या धुंदीत समग्र हेमिंग्वे वाचून काढला.
सगळेच साहित्य उजवे होते पण मी कधी विसरणार नाही अश्या अनेक कथा होत्या. त्यातल्या “The Killers” आणि “The Cat In The Rain” ह्या मला अत्यंत भावलेल्या कथा. ज्याना हेमिंग्वे काय चीज आहे हे जाणण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या दोन कथा वाचाव्यात.
लेख वाचायच्या आधी ही कथा वाचावी अशी माझी विनंती आहे. ह्या दोनही कथा आंतरजालावर सहजप्राप्त आहेत तरीही मी इथे “The Killers”ची लिंक देतोय. जरूर वाचा.
https://www.yeyebook.com/en/ernest-hemingway-short-story-the-killers-eng...
कथेचा थोडक्यात गोषवारा असा आहे.
कथा समिट नावाच्या गावातल्या एका हॉटेलमध्ये घडते.
एका संध्याकाळी एका हॉटेल/काफे/रेस्तराँ मध्ये दोन व्यक्ति प्रवेश करतात. त्यांच्या बोलण्यावरून ते ह्या गावात अनोळखी आहेत ह्याची जाणीव वाचकाला होते. त्यांच्या उद्धट बोलण्यावरून भीतीची सूक्ष्म जाणीव होते. जॉर्ज हा त्या हॉटेलचा मॅनेजर आहे आणि निक अॅडम्स हा बहुतेक त्या हॉटेल मध्ये नियमित येणारा तरुण ह्या दोघाजणांच्या उपस्थितीत ही कथा घडते. बोलण्या बोलण्यातून कथा उलगडत जाते. हा हेमिग्वेचा खास टच! ते अॅंडरसन नावाच्या मुष्टीयोद्ध्याचा खून करण्याच्या उद्देशाने आले आहेत. वातावरणात भीतीचा पगडा वाढत जातो.
खुन्यांना खात्रीलायक बातमी असते की मधून मधून अॅंडरसन त्या हॉटेलात संध्याकाळच्या जेवणासाठी येत असतो. नेमका त्यांच दिवशी तो येत नाही. वाट बघून मारेकारी कंटाळून निघून जातात.
निक अॅडम्स मात्र ह्या प्रकाराने हादरून जातो. क्रूर अमानुष हिंस्र हिंसाचारचा त्याचा पहिला अनुभव असावा. अस्वस्थ झालेला निक अॅंडरसन अॅलर्ट करण्याची जबाबदारी घेतो आणि त्याच्या रहाण्याच्या जागी जातो. अॅडरसनला अर्थात आपल्या हत्त्येची सुपारी देण्यात आली आहे ह्या गोष्टीची कल्पना आहे. निक त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. की तू पोलिसांची मदत घे, किंवा ह्या गावातून पळून जा. असे केल्याने जे नशिबात आहे ते टळणार नाहीये हे अॅडरसनला चांगले माहित आहे. दैवात आहे त्याला सामोरे जाणे एव्हढेच त्याच्या हातात आहे.
शेवटी निक कंटाळून परततो आणि सगळ्याचा उबग येऊन स्वतःच ते गाव सोडून जायचे ठरवतो,
ह्या एका छोट्या कथेत हेमिग्वे पूर्णपणे साकार झाला आहे. त्याचे ठसे जागोजाग उमटले आहेत. केवळ त्या साठी म्हणून ही कथा वाचावीशी वाटते.
सरळ सोप्या शब्दात लिहिलेली कथा, एकही अनवट शब्द नाही. शब्दकोशात डोकावण्याची गरज नाही. उपमा नाहीत उत्प्रेक्षा नाहीत. विशेषणे नाहीत, अलंकारिक भाषा नाही. show, don't tell. पद्धतीची कथा. म्हणून मला भावली.