जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
16 Apr 2025 - 4:13 pm

जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते

घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला

गारव्याची शीळ निळी
दूर विजनी घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2025 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

18 Apr 2025 - 11:00 pm | चित्रगुप्त

जर्द पिवळी दुपार ...
गारव्याची निळी शीळ ...
-- एकदम चपखल.

तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
-- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

अनन्त्_यात्री's picture

20 Apr 2025 - 8:18 am | अनन्त्_यात्री

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा

"बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

अथांग आकाश's picture

20 Apr 2025 - 11:17 am | अथांग आकाश

कविता आवडली!
(जर्द पिवळी विजार) विडंबनाच्या प्रतीक्षेत :P

वामन देशमुख's picture

20 Apr 2025 - 2:50 pm | वामन देशमुख

"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!

अनन्त्_यात्री's picture

20 Apr 2025 - 5:45 pm | अनन्त्_यात्री

:)