तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे.
१. कुठे?
आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला.
२००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत.
तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो. जत्रा तशी प्रचंड मोठी भरते.
आमचे शेत तालुक्याच्या गावापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. मी शेतावर आपल्या नव्या लुनावर चाललो होतो. (काय मस्त बाइक आहे). जत्रेला आलेल्या एका शाळकरी मुलाने लिफ्ट मागितली. आमच्या शेताला जवळच्या एका वाडीवर त्याला जायचे होते. म्हणालो, "बस! मी तिथेच चाललो आहे."
त्याला विचारले "तुझे नाव काय बाळा? कितवीला आहेस?"
तो म्हणाला "एक्स. सिक्स्थ स्टँडर्ड"
मी चमकलोच. पुढचा संवाद मी चक्क इंग्रजीत सुरू केला. पोराने अगदी व्यवस्थित इंग्लिश मधे उत्तरे दिली. अगदी आपले लोक "वन ऑफ" या शब्दप्रयोगानंतर नामाचे प्लुरल करण्याऐवजी सिंगुलर नाम वापरून अर्थाचा अनर्थ जसा करतात तसेही त्याने केले नाही. "वन ऑफ दि फार्म्स" असे म्हणाला बोलता बोलता.
म्हंटलं, याच्या घरापर्यंत जायला नीट रस्ताही नाही आणि याची ही प्रगती?
तसे बघायला गेले तर आमचा भाग प्रचंड दुष्काळी आहे. पाणी नसूनही परंतु आमचं शेत जिथे आहे तिथे लोकांनी द्राक्षबागा लावल्या आहेत त्यामुळे तो भाग जरासा आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्थातच जेमतेम. त्याचा परिणाम म्हणून तिथून मुले पंधरा वर्षांपूर्वी तालुक्याच्या गावी सुरू झालेल्या कॉन्वेंट शाळेत मुलांना पाठवतात. मुलाच्या हातामध्ये सगळे जग आलेले आहे. याच गावच्या रस्त्यावर मी इ कार्टच्या चार vehicles पहिल्या. म्हणजे कंज्युमेरिझम सुद्धा इथवर चांगलाच झिरपला आहे. आणि हे म्हणजे महाराष्ट्राचे रिमोट गाव!!!
आमचे शेत एन्सेस्ट्रल आहे. २ एकर. मी जरा मॅप्स आणि शेती पाहायला सुरुवात केली. जवळच एका जागी दोन तळ्यांच्या मधे कुणीतरी पाच एकर शेती विकायला काढली आहे असे कळले. भाव सांगत होता एकरी १० लाख. निगोशियेट करून साडे सहा आणि सात वर भाव आणला. कारण जागा डेव्हलप केलेली नव्हती. खालील नकाशा पाहा.
यथावकाश व्यवहार ठरला. मी जागा घ्यायचीच असे मनावर घेतले होते. याचे कारण म्हणजे जागा जवळ जवळ हद्दीत होती. (गावाची लोकसंख्या १००० पण नसेल) दुसरे म्हणजे शेत दोन तळ्यांच्या मधे होते. आणि शेतातून एक ओढा जात होता. हे फीचर मला फारच आवडले कारण आमचे सध्याचे शेत अगदी असेच होते.
व्यवहार झाल्यावर मी प्रचंड आनंदी झालो. कारण घर कुठे बांधावे या प्रश्नाचे उत्तर सुटू लागले होते.
२. का?
का चे उत्तर मी मागच्या भागात दिले आहे. आता त्याचा जरा विस्तार करतो.
मला गोंगाट अजिबात आवडत नाही. कसलाच गोंगाट आवडत नाही. त्यामुळे मला दूर कुठेतरी खोपच्यात राहणे भाग आहे नाहीतर माझे मानसिक स्वास्थ मी हरवून बसेन.
वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर मला नोकरी करायची नाही. आनंदासाठी काम करायचे आहे. त्यासाठी आधि फायर (FIRE) व्हावे लागेल. FIRE होण्याची मुख्य अट एकच.
माझ्या कॅल्क्युलेशन नुसार सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ ते ३० पट रक्कम असेल तर भारतात फायर होता येते अर्थातच तुमच्या लाइफस्टाईल मधे एकदम टोकाचा बदल होणार नाही हे गृहीत धरले आहे. (या रकमेत राहत्या घराची रक्कम अंतर्भूत नाही. तिची किंमत एक्स्ट्रा धरावी लागेल) सध्या माझे वय ३५ असल्याने मला अजून पाचच वर्षे आहेत. आता पाच वर्षांत मी किती कमवेन हे ध्यानात घेतले असता माझा वार्षिक खर्च कमी होईल अशा ठिकाणी मला राहणे क्रमप्राप्त आहे. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल पण मला वाटते की मी जर या शेतावर राहिलो तर माझा आणि कुटुंबाचा वार्षिक खर्च ३ लाखांच्या आसपास येईल. कदाचित त्याहूनही कमी. म्हणजे फायरचे कॉर्पस कमी करता येईल.
३. कसे?
आता शेतावर रहायचे म्हणजे कॉम्प्रोमाइज प्रचंड करावे लागणार. घर रस्त्याच्या बाजूने म्हणजे ओढ्याच्या उजवीकडे बांधावे लागणार. एका चांगल्या आर्किटेक्टच्या शोधात आहे तो पूर्ण झाला की पायाभरणी वगैरे जमीन पाहून करावी असे मनात आहे. सध्या डोक्यात घराचा एक ले आउट तयार आहे तो मध्यंतरी चितारण्याचा प्रयत्न केला.
सध्या काही बेसिक गोष्टीच डोक्यात आहेत :
१. घर एकाच मजल्याचे करावे. त्यामुळे बिम्स आणि कॉलम्स नकोत. लोड बेअरिंग घर असावे. लॅटराइट जांभ्या दगडांचा वापर करावा. ५
२. घरावर स्लॅब असावे. पाऊस किंचित असल्याने उतरते स्लैब असण्याची गरज नाही. शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही.
३. घराच्या पुढील भागामधे भरपूर झाडे लावली जातील. त्याची सुरुवात आधीच झालेली आहे. घराला लागून मियावकी जंगल केले आहे. झाडांची वाढ बरीच चांगली आहे. जवळ जवळ १२० स्पीसिज (सगळे नेटिव्ह) झाडे लावली आहेत.
४. घराचा हॉल काचेचा किंवा मोकळा असे दोन्ही पर्याय ओपन आहेत त्यामुळे एका कोपऱ्यावर कॉलम टाकावा लागेल.
५. जिन्याखालचा भाग लहान खोलीत कपाटांसाठी वापरता येईल. जिन्याला वर निमूळते सोडून वरती मोठे दार करावे असा विचार आहे.
६. पार्किंग वगैरे बाहेरच झाडाखाली करायला स्पेस तयार करतो.
७. घराची आणि सामानसुमानाची किंमत ३० लाखांपर्यंत मर्यादित ठेवावी असा विचार आहे. त्यासाठी कुठे कंप्रोमाईज करता येईल ते पाहत आहे.
तर आहे हे इथवर आहे. आता पुढचा अपडेट कधी हे काहीच सांगता येत नाही. पण प्रगती तर आहे. देखेंगे.
प्रतिक्रिया
8 Feb 2025 - 2:28 am | हणमंतअण्णा शंकर...
गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.
8 Feb 2025 - 9:01 am | आग्या१९९०
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही.
ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.
8 Feb 2025 - 12:26 pm | हणमंतअण्णा शंकर...
त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.
8 Feb 2025 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घर, जागा, शेत, झाडे, शेततळे, प्लॅन आवडला.
घर पूर्ण झाल्यावर बोलवा. बसू...
-दिलीप बिरुटे
8 Feb 2025 - 12:08 pm | हणमंतअण्णा शंकर...
घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही.
२०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.
8 Feb 2025 - 10:32 am | Bhakti
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास!
तुमच्या घराला शुभेच्छा!
8 Feb 2025 - 12:13 pm | हणमंतअण्णा शंकर...
आहे भक्तीजी.
हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय.
उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे.
मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.
8 Feb 2025 - 4:54 pm | मुक्त विहारि
आणि
शेतघर, हा वेगळा विषय आहे.
वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.
8 Feb 2025 - 11:48 pm | हणमंतअण्णा शंकर...
शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी.
खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.
9 Feb 2025 - 1:02 am | मुक्त विहारि
त्यामूळे तुमचा मुद्दा पटला ...
मी सामान्य माणूस असल्याने, शेती हा व्यवसाय असावा, ह्या मताचा आहे....
9 Feb 2025 - 1:23 pm | हणमंतअण्णा शंकर...
परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच.
त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा.
एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.
8 Feb 2025 - 5:06 pm | मुक्त विहारि
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे.
https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e...
वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.
8 Feb 2025 - 8:31 pm | आग्या१९९०
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.
8 Feb 2025 - 8:47 pm | मुक्त विहारि
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते.
शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.
8 Feb 2025 - 11:53 pm | हणमंतअण्णा शंकर...
कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.
9 Feb 2025 - 1:01 am | मुक्त विहारि
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे.
AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच.
इत्यलम....
9 Feb 2025 - 3:20 pm | हणमंतअण्णा शंकर...
माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल)
त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )
8 Feb 2025 - 11:56 pm | हणमंतअण्णा शंकर...
मी त्यांचा अभ्यास केलेला आहे.
मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे.
हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.
10 Feb 2025 - 8:25 am | चित्रगुप्त
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल.
जिन्याच्या पायर्या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे.
10 Feb 2025 - 1:02 pm | मुक्त विहारि
आणि
व्हील चेअर आणि स्ट्रेचर व्यवस्थित नेता आणि आणता येईल असा उतरता जिना असावा.....
10 Feb 2025 - 1:22 pm | हणमंतअण्णा शंकर...
चित्रगुप्तजी,
सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती.
जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.
10 Feb 2025 - 1:02 pm | स्वधर्म
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.
10 Feb 2025 - 1:24 pm | हणमंतअण्णा शंकर...
माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,
10 Feb 2025 - 1:31 pm | स्वधर्म
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.
10 Feb 2025 - 2:02 pm | हणमंतअण्णा शंकर...
तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे.
हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.
10 Feb 2025 - 1:28 pm | हणमंतअण्णा शंकर...
खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे.
तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!
10 Feb 2025 - 2:52 pm | नि३सोलपुरकर
खुप खुप शुभेच्छा.
घर पूर्ण झाल्यावर बोलवा _/\_.