जॉन अब्राहम (भाग ४)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 9:10 pm

जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३)

जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला . . .

१२ एप्रिल १८६१ रोजी पहाटे बंडखोरांनी फोर्ट समटर, चार्ल्सटन, दक्षिण कॅरोलिना बंदराच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. कुतूहलाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्धातील या पहिल्या चकमकीमध्ये कोणताही बळी गेला नाही. ३४ तासांच्या भडिमारानंतर मेजर रॉबर्ट अँडरसनने आपल्या सुमारे ८५ सैनिकांच्या तुकडीसह वेढा घालणाऱ्या सुमारे ५,५०० कॉन्फेडरेट सैन्यासमोर (संघराज्यातून फुटून निघालेल्या दक्षिणी राज्यांचे सैन्य) आत्मसमर्पण केले. त्यानंतर काही आठवड्यांतच दक्षिणेकडील अजून ४ राज्ये (व्हर्जिन्या, अर्कॅन्सा, टेनेसी आणि नॉर्थ कॅरोलिना) संघराज्यातून बाहेर पडली.

जमिनीवर युद्ध सुरू असताना, राष्ट्राध्यक्ष लिंकन यांनी ७५,००० निवृत्त सैनिकांना तीन महिन्यांसाठी सेवा देण्यासाठी बोलाविले. त्यांनी फुटीर राज्यांच्या नौदल नाकेबंदीची घोषणा केली. लिंकन यांनी कोषागाराच्या सचिवांना सैन्य वाढवण्यास मदत करण्यासाठी २० लक्ष डॉलर्स आगाऊ देण्याचे निर्देश दिले. फुटीर राज्यांच्या सरकारने यापूर्वी किमान सहा महिन्यांच्या सेवेसाठी १ लक्ष सैनिकांची भरती केली आणि ही संख्या लवकरच ४ लक्षापर्यंत पर्यंत वाढविण्यात आली.

११ दक्षिणी राज्ये वेगळी झाल्यानंतर संघराज्यात २३ राज्ये शिल्लक होती. उत्तरेत अंदाजे २.१० कोटी नागरिक होते तर दक्षिणेत सुमारे ९० लक्ष नागरिक होते व त्यातील सुमारे ४० लक्ष गुलाम होते. याव्यतिरिक्त, उत्तर हे १ लक्षापेक्षा अधिक उत्पादन प्रकल्पांचे ठिकाण होते ज्यातील १८,००० उद्योग पोटोमॅक नदीच्या दक्षिणेस होते आणि ७० टक्क्यांहून अधिक रेल्वेमार्ग संघराज्यात होते. याशिवाय, उत्तरेकडील राज्यांचे संघराज्य शस्त्रास्त्र उत्पादन, उपलब्ध मनुष्यबळ आणि व्यावसायिक व आर्थिक संसाधनांमध्ये फुटीर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त सरस होते. संघराज्यात कार्यरत सरकार आणि एक लहान परंतु कार्यक्षम नियमित सैन्य आणि नौदल देखील होते.

दक्षिणेकडील सैन्यांना अंतर्गत मार्गांवर लढण्याचा फायदा होता आणि १८६० च्या आधी अमेरिकाच्या इतिहासात त्यांची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती. शिवाय, ३५०० मैल लांबीच्या दक्षिणी किनारपट्टीमुळे आर्थिक नाकेबंदीचा तोटा नव्हता. फुटीर राज्यांचे अध्यक्ष,जेफरसन डेव्हिस, यांना परदेशी मदत मिळण्याची आशा होती. इतर देश या युद्धात हस्तक्षेप करतील असेही त्यांना वाटत होते. दक्षिणी सैनिक स्वतंत्र देश मिळविण्यासाठी लढत होते.

अमेरिकेतील यादवी युद्ध (किंवा गृहयुद्ध) एप्रिल १९६५ मध्ये संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. दक्षिणी वेगळ्या अनधिकृत देशाची राजधानी रिचमाँड (व्हर्जिन्या) २ एप्रिल १९६५ मध्ये केंद्रीय सैन्याच्या नियंत्रणात आली. दक्षिणी राज्यांच्या सैन्य प्रमुख रॉबर्ट ली व त्याचे सैन्य ९ एप्रिलला केंद्रीय सैन्याच्या युसिलिस ग्रँट समोर शरण गेले. फुटिर अनधिकृत देशाचे अध्यक्ष जेफरसन डेव्हिस व त्यांचे अनेक सहकारी पळून गेले.

११ एप्रिलला अब्राहम लिंकननी व्हाईट हाऊस्च्या सज्जातून भाषण दिले (जे त्यांचे शेवटचे भाषण ठरले). ते भाषण जॉन विल्क्स बूथ हा गुलामगिरी व दक्षिणी राज्यांचा कट्टर समर्थक प्रेक्षकात उपस्थित राहून ऐकत होता. त्या भाषणात लिंकननी आपल्या पुढील योजना सांगितल्या. केंद्रीय सैन्यातील सैनिकांना निवडणुकीत मताधिकार दिला जाईल असे त्यांनी भाषणात सांगितल्यावर बूथचा संताप अनावर झाला. आपल्या शेजारी भाषण ऐकत असलेल्या लेविस पॉवेलच्या कानात तो म्हणाला की हे लिंकनचे शेवटचे भाषण असेल. केंद्रीय सैन्यात कृष्णवर्णीय सुद्धा होते. त्यांना गोर्‍यांच्या बरोबरीने मताधिकार मिळणार हे त्याला पचण्यासारखे नव्हते.

आता आपले दक्षिणी राज्यांच्या वेगळ्या देशाचे स्वप्न उद्धस्त होणार असे भाषणानंतर बूथच्या लक्षात आले.

गृहयुद्ध सुरू असताना लिंकननी घेतलेल्या काही निर्णयांमुळेही बूथ संतापलेला होता. १८६१ मध्ये आपल्या मेरीलँड राज्यात लिंकननी एखाद्याला संमतीविना डांबून ठेवणे अकायदेशीर ठरविले (अनेक कृष्णवर्णियांना गोर्‍या मालकांनी गुलाम म्हणून कामासाठी आपल्या शेतावर डांबून ठेवले होते). मेरीलँडमधील फुटिरतावादी लोकप्रतिनिधींना अटक केली. देशातील सर्व समस्या फक्त लिंकनमुळेच निर्माण झाल्या आहेत ही त्याची समजूत घट्ट होत गेली.

डिसेंबर १८६२ मध्ये अध्यक्ष जेफरसन डेव्हिस यांनी कृष्णवर्णीय सैनिकांची किंवा त्यांच्या गोऱ्या अधिका-यांची देवाणघेवाण केली जाणार नाही हा हुकूम दिला. परंतु मे १८६३ मध्ये दक्षिणी राज्यांच्या काँग्रेसने कृष्णवर्णीय सैनिकांच्या देवाणघेवाणीवर बंदी घालणारा कायदा संमत केला. १८६३ च्या जुलैच्या मध्यात मॅसॅच्युसेट्सच्या काही सैनिकांनी फोर्ट वॅगनरवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांची अदलाबदल न केल्याने हे वास्तव बनले . ३० जुलै १८६३ रोजी, राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी दक्षिणेसोबत कैद्यांची देवाणघेवाण थांबवण्यासाठी आदेश दिला. जोपर्यंत सर्व उत्तरी सैनिकांच्या त्वचेच्या रंगाची पर्वा न करता त्यांची देवाणघेवाण होत नाही तोअर्यंत कैद्यांची देवाणघेवाण होणार नाही असे या हुकुमान्वये बंधनकारक झाले. याचे श्रेय जनरल ग्रँट यांना दिले जाते.

१९ व्या शतकात अमेरिकेत गुलामगिरी प्रचलित होती. या काळामध्ये माणसांचीच खरेदी-विक्री होत होती. अमेरिकेतील गोरे काळ्या माणसांना गुलाम बनवित होते. भारतात ज्या प्रमाणे जातीभेद होते, अगदी तसेच भेद अमेरिकेत सुद्धा होते. त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला. राष्ट्रपती झाल्यानंतर १८६३ मध्ये त्यांनी गुलामगिरी अकायदेशीर घोषित केली. त्यामुळं गुलामगिरीची प्रथा सुरू ठेवू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या निर्णयामुळं संताप आला व त्यातून देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, लिंकन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. या निर्णयामुळे जॉन विल्क्स बूथला लिंकन यांचा राग आला होता. या रागातूनच त्यांने लिंकन यांची हत्या केली.

(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________

त्यापूर्वी एक तास आधी पोलिसांनी ली हार्वे ओस्वाल्ड याला केनेडींची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. ओस्वाल्ड हा निवृत्त सैनिक असल्याचे नंतर समजले. टेक्सस शाळापुस्तके संग्रहालयात तो नुकताच नोकरीस लागला होता . . .

अध्यक्ष केनेडींचे पार्थिव विमानातून वॉशिंग्टन डी सी येथे आणून काही काळ व्हाईट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. नंतर ६ अश्व जोडलेल्या एका घोडागाडीतून त्यांचे पार्थिव कॅपिटॉल हिल येथे नेण्यात आले. घोडागाडी जाताना पेनसिल्वेनिया रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तेथे सुमारे २१ तास केनेडींचे पार्थिव ठेवण्यात आले होते व सुमारे अडीच लाख नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अर्लिंग्टन नॅशनल सिमेटरी येथे आणले गेले.

२५ नोव्हेंबरला अध्यक्ष केनेडींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. १०० पेक्षा जास्त देशांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते. दूरदर्शनवर प्रत्यक्ष प्रक्षेपण सुरू होते. त्यावेळी जॅकलीन केनेडी व जॉन केनेडींचे बंधू रॉबर्ट केनेडी व एडवर्ड केनेडी उपस्थित होते.

त्या प्रसंगी केनेडींच्या ३ वर्षीय मुलाने (जॉन केनेडी कनिष्ठ) आपल्या दिवंगत पित्याला सलाम केला आणि त्यांची मुलगी पित्याच्या शवासमोर गुडघे टेकून बसली होती. त्यांनी पित्याला दिलेली मानवंदना पाहून उपस्थितांची मने हेलावली. त्या प्रसंगी अनेकांना केनेडींनी शपथविधीनंतरच्या केलेल्या भाषणातील खालील वाक्ये आठवली.

All this will not be finished in the first one hundred days, nor in the first one thousand days, nor in the life of this administration. Nor even perhaps in our lifetime on this planet. But let us begin.

आपल्या पित्याला अखेरची मानवंदना देताना केनेडींचा ३ वर्षीय मुलगा जॉन केनेडी (कनिष्ठ) व मुलगी कॅरोलिन, पत्नी जॅकलीन, केनेडींचे बंधू रॉबर्ट केनेडी आणि टेड केनेडी.
आपल्या पित्याला अखेरची मानवंदना देताना केनेडींचा ३ वर्षीय मुलगा जॉन केनेडी (कनिष्ठ) व मुलगी कॅरोलिन, पत्नी जॅकलीन, केनेडींचे बंधू रॉबर्ट केनेडी आणि टेड केनेडी.

_________________________________________________________________________

ओस्वाल्डला पकडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. सुरूवातीला आपण निष्पाप असल्याचा ओस्वाल्डने आव आणला. नंतर त्याने जॉन अ‍ॅब्ट या अमेरिकन साम्यवादी पक्षाच्या वकिलाची आपल्यासाठी मागणी केली. जॉन अ‍ॅब्ट साम्यवादी पक्षाच्या समर्थकांचे वकीलपत्र घेत असे. सिटी हॉल या आपल्या दोन दिवस व दोन रात्र ओस्वाल्डची चौकशी केल्यानंर्तर २४ नोव्हेंबर्ला सकाळी पोलिसांनी त्याला डॅलसमधील तुरूंगात हलविण्याचे ठरविले. त्याला तुरूंगात हलविताना दूरदर्शनवर जाहीर प्रक्षेपण होत होते. त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण दूरदर्शनवर दाखवित असताना दर्शकांना अचानक हातात पिस्तुल असलेला एक माणूस दिसला आणि त्याने अगदी जवळून ओस्वाल्डला गोळी मारल्याचेही दिसले. तो एका स्थानिक नाईटक्लबचा मालक जॅक रूबी होता.

गोळी लागल्यानंतर २ तासांनी ओस्वाल्ड पार्कलँड रूग्णालयात मरण पावला.

त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याने एक विचित्र कारण सांगितले. जॅकलीन केनेडींना साक्ष देण्यासाठी न्यायालयात जावे लागू नये यासाठी आपण ओस्वाल्डला मारले असे त्याने सांगितले. जॅक रूबीवर नंतर न्यायालयात खटला चालून १४ मार्च १९६४ या दिवशी निकाल देऊन त्याला दोषी ठरविले गेले व ऑक्टोबर १९६६ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. ३ जानेवारी १९६७ या दिवशी शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच रूबीचा मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर टेक्ससमधील एका न्यायालयाने त्याला दोषी ठरविलेला आधीच्या न्यायालयाचा निकाल रद्द केला.

(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________

इतिहास

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2025 - 10:41 pm | चंद्रसूर्यकुमार

अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ अमेरिकन रंगभूमीवरील एक लोकप्रिय कलाकार होता. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन फोर्ड थिएटरमध्ये 'माय अमेरिकन कझिन' हे विनोदी नाटक बघायला गेले होते. चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता. चार दिवस आधीच युध्द संपल्याने त्यांच्या मनावरील मोठा ताण नाहीसा झाला होता. १४ एप्रिलला शुक्रवार होता. त्या दिवशी रात्री म्हणजे अमेरिकन परिभाषेत 'फ्रायडे नाईटला' ते दडपण नाहीसे झाल्याने काळजीमुक्त वातावरणात ते विनोदी नाटक बघायला गेले होते. त्याकाळी ब्रिटिश लोक स्वतःला अमेरिकन्सपेक्षा श्रेष्ठ समजायचे आणि ब्रिटनमध्ये ज्यांना काही करता येत नाही असे लोक अमेरिकेला जातात असे ब्रिटिश लोक अगदी पहिल्या महायुध्दापर्यंत समजत असत. असा एक असभ्य आणि असंस्कृत अमेरिकन आपल्या विस्तारीत कुटुंबातील इस्टेटीतील वाटा आपल्याला मिळणार हे कळल्यानंतर ब्रिटनला जातो. तिथे मग तो अमेरिकन आणि ब्रिटिश लोक यांच्यातील सांस्कृतिक खटके वगैरे त्या नाटकात दाखविले होते. त्या नाटकात एक विनोदी वाक्य कथानकात आल्यावर थिएटरमध्ये नेहमी हशा पिकायचा. जॉन विल्क्स बूथला हे माहित होते. तसेच फोर्ड थिएटरचा कोपरा आणि कोपरा त्याला माहित होता. त्या वाक्यावर हशा पिकेल बरोबर तेव्हा लिंकनना गोळी घालायची हे त्याने ठरविले होते. त्यावेळेस मेरी आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन पहिल्या मजल्यावरील गॅलरीत त्यांच्यासाठीच्या विशेष कक्षात बसले होते.कक्षाचे दार बंद होते. पण दाराला जॉन विल्क्स बूथने त्या दिवशी सकाळीच एक छोटे भोक पाडून ठेवले होते. त्यामुळे तो कडी उघडून त्या कक्षात जाऊ शकणार होता. लिंकनचा अंगरक्षक एकच होता आणि तो त्या वेळेस त्या कक्षाच्या बाहेर असणे अपेक्षित होते पण तो तेव्हा जागेवर नव्हता. त्या कक्षाकडे जाणार्‍या जिन्याच्या समोर तळ मजल्याला फोर्ड थिएटरचे एक प्रवेशद्वार होते. तिथे थिएटरशी संबंधित एक माणूस होता. त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपला घोडा लावून त्या घोड्याकडे थोडा वेळ लक्ष द्या मी आलोच असे म्हणत जॉन विल्क्स बूथने ते विनोदी वाक्य कथानकात यायच्या काही वेळ आधी तिथून फोर्ड थिएटरमध्ये प्रवेश केला. बूथ हा एक लोकप्रिय आणि नावाजलेला कलाकार असल्याने त्याने फोर्ड थिएटरमध्ये जाणे यात काही विशेष वाटले नसावे. मात्र अध्यक्ष बसले आहेत तिथल्याच बाजूने त्याला का जायचे आहे हा प्रश्न त्या माणसालाही पडला नाही. अध्यक्षांची सुरक्षाव्यवस्था इतकीच होती.

बूथने कडी उघडून आत प्रवेश केला. तोपर्यंत तो मागे दबा धरून उभा होता. लिंकनना त्याची अजिबात कल्पना नव्हती. बरोबर ते विनोदी वाक्य आले आणि सभागृहात हशा पिकला आणि बरोबर त्याच वेळेस बूथने लिंकनना गोळी घातली. गोळीचा एकदम मोठा आवाज आणि धूर आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. सभागृहातील लोकांना वरील गॅलरीत लिंकन आहेत आणि तिथून गोळीचा आवाज आला म्हणजे काय झाले असेल याची कल्पना आलीच असेल. तेवढ्यात बूथने त्या गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. उंचावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली- पायाचे हाड थोडेसे फ्रॅक्चरच झाले. व्यासपीठावर उडी मारल्यावर 'Sic semper tyrannis!' म्हणजे 'अत्याचार्‍यांबरोबर असेच व्हायला पाहिजे' या अर्थाचे लॅटिन वाक्य बोलला. बूथ हा ओळखीचा चेहरा असल्याने त्याला लोकांनी लगेच ओळखले. म्हणजे लिंकनना गोळी घालणारा जॉन विल्क्स बूथ हाच आहे हे लगेचच स्पष्ट झाले.

सभागृहात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तिथून बूथ निसटला आणि मागच्या बाजूला लावलेला घोडा त्याने ताब्यात घेतला आणि घोड्यावर बसून तो निघून गेला.

तो पुढे कुठे गेला पुढील भागांमध्ये येईलच. त्यामुळे आता काही लिहित नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2025 - 9:42 am | श्रीगुरुजी

धन्यवाद! पुढील भागांमध्ये यावर लिहिणार आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jan 2025 - 4:54 pm | चंद्रसूर्यकुमार

चार वर्षांच्या यादवी युद्धाचा ताण त्यांना अगदी असह्य झाला होता.

अमेरिकन यादवी युध्दात दोन्ही बाजूंकडून मारल्या गेलेल्यांची संख्या विविध अंदाजांप्रमाणे ७ ते १० लाख इतकी होती. १८६० मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ३ कोटी १४ लाख होती. म्हणजे यादवी युध्दात कमितकमी २% पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. त्यामुळे त्याचा अध्यक्षांवर तणाव आला असेल तर अजिबात नवल नाही. खालील फोटोमध्ये त्याची कल्पना येईल. डावीकडच्या फोटोत लिंकन १८६१ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी कसे दिसायचे आणि उजवीकडच्या फोटोत त्यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस ते कसे दिसत होते हे दिसेल. अवघ्या चार वर्षात लिंकन किमान १५-२० वर्षाने अधिक म्हातारे दिसू लागले होते.

Lincoln

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2025 - 10:45 pm | चंद्रसूर्यकुमार

माय अमेरिकन कझिन या नाटकाच्या प्रयोगाला अध्यक्ष लिंकन येणार आहेत याविषयीचे तेव्हाचे पोस्टर

cousin

मुक्त विहारि's picture

20 Jan 2025 - 4:39 pm | मुक्त विहारि

लेख आणि प्रतिसाद.

दोन्ही मस्त...

सौंदाळा's picture

23 Jan 2025 - 8:55 pm | सौंदाळा

वाचतोय