आभास हा....

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
11 Jan 2025 - 12:59 am

[ इंग्रजी लेखक विल्यम एस गिल्बर्ट यांच्या
अँजेला- ॲन इन्व्हर्टेड लव स्टोरी ‌या कथेचा भावानुवाद ]

मी एक चित्रकार आहे. गेली अनेक वर्षे पक्षाघातामुळे मी अंथरुणाला खिळलेला एक रुग्ण आहे. मी खुर्चीत बसू शकतो, पण कुणाच्या तरी मदतीनेच. . तसा मी मूळचा इंग्लिश पण आज गेली सहा वर्षं, व्हेनिस कालव्या जवळच्या एका इमारतीमधील एका लहानशा खोलीत मी वास्तव्य करतो आहे, एकटाच ! नाही नाही.... कानानं अधू असलेली एक वृद्धा माझ्यासोबत इथे राहते. ती मला जेऊ घालते .माझं अंथरुण घालते . थोडक्यात माझी सेवा करते. आणि माझ्या भरण पोषणाचं काय? सांगतो ,सांगतो. मी आधी म्हटलंच आहे की मी एक चित्रकार आहे. मी फुलांची आणि फळांची चित्रं जलरंगात रंगवतो, (कारण व्हेनिसमधील ही सर्वात स्वस्त मॉडेल्स आहेत. असो!) मग ती माझ्या लंडनमध्ये राहणा-या मित्राकडे पाठवतो. तो ती अशा चित्रांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला विकतो आणि या उद्योगातून वर्षाकाठी मला तीस पौंड उत्पन्न मिळतं. त्यावर मी माझी कशीबशी गुजराण करतो. पण... तरीही मी अगदी सुखी आणि समाधानी आहे.

आज मी तुम्हाला माझी एक कहाणी सांगणार आहे. पण त्याआधी मला वाटतं की मी ज्या छोटयाशा खोलीत रहातो त्या खोलीविषयी सांगणं आवश्यक आहे... या खोलीला एकुलती एक खिडकी आहे जी कालव्याच्या पाण्यापासून पाच फूट उंचीवर आहे. आणि त्याच्यावर सहा फूट उंचीवर खोलीचं छत आहे

पण या रचनेचा एक तोटा असा ( म्हणजे इतरही अनेक आहेत) माझ्या समोरच्या इमारतीचा फक्त दहा फूट उंचीपर्यंतचा भागच मला दिसू शकतो. माझं अपंगत्व मला खिडकीतून जितकं डोकावून बघायला देऊ शकतं त्याचा विचार केला तर पंधरा फुटां पलीकडचं काही मी बघू शकत नाही . तर त्या वेळची गोष्ट सांगतो ... म्हणजे सरळसरळ जरी मी ती इमारत बघू शकत नसलो तरी कालव्याच्या पाण्यात पडणारं त्याचं प्रतिबिंब मात्र मी सहज बघू शकत होतो. ( अर्थात आजही बघू शकतो!)
तर झालं असं की ते प्रतिबिंब बघण्यात मला रस वाटू लागला. समोरच्या रहिवाशांचा सज्ज्ातील किंवा खिडकीतील वावराचा प्रतिबिंबीत चित्रपट बघण्याचा मला छंदच जडला.
हे चित्रपट पहाण्याच्या सुरवातीच्या काळात माझं लक्ष वेधलं होतं ते एका तेरा चौदा वर्षाच्या (अर्थात हे माझं अनुमान!) मुलीनं. माझ्या दृष्यचौकटीत ती रोज अनेकदा तिच्या घराच्या सज्जात ये जा करताना दिसे. जेव्हा हवामान बरे असायचे तेव्हा तिच्या सज्जात एक टेबल ठेवलेलं असायचं. त्यावर फुलांनी सजलेली काचेची फुलदाणी ठेवलेली असायची. बाजूला असायची क्रुसावर लटकलेल्या येशूची एक छोटीशी प्रतिमा. त्या दिवशी ती अगदी सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत अगदी एकाग्रतेने काहीतरी करत बसलेली असायची. मला वाटतं शिवण टिपण किंवा भरतकाम करून ती तिचा चरितार्थ चालवत असावी. एकूणच ती कष्टाळू असावी याविषयी माझी खात्री होती. दिसायला सुंदर आणि अंत्यत टापटिपीने ती रहाते असा माझा अंदाज होता. जेव्हा एखाद्या दिवशी उबदार हवामान असेल तेव्हा तिची वृद्ध,आजारी आई देखील तिच्या शेजारी बसलेली दिसत असे. तिला तिथे आणून बसवण्याचा कार्यक्रम बघताना मला मोठी गंमत वाटायची. त्यांची सेविका आधी एक खुर्ची आणि पाय ठेवण्यासाठी एक स्टूल आणून ठेवत असे. मग टेकण्यासाठी उश्या आणून खुर्चीत ठेऊन जाई. मग ती मुलगी आईला शाली मध्ये लपेटून बाहेर घेऊन येई आणि अलगद खुर्चीत बसवत असे. मग ती तिच्या कामाला सुरुवात करी. काम करता करता अनेकदा उठून ती आईजवळ जाई, तिला मिठीत घेई ,कधी चुंबन घेई, पाठीवरून हात फिरवे आणि क्षणभरातच पुन्हा आपल्या कामात बुडून जाई.

असाच काळ गेला . ती छोटीशी मुलगी मोठी होत गेली. तसं तसं तिचं प्रतिबिंब देखील मोठं होत गेलं. आता ती तरुणी झाली होती . बहुदा .. सतरा अठरा वर्षाची !

दिवसभरात स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या वेळातच मी माझी चित्रं काढू शकत होतो आणि माझ्या चित्रकारीसाठी असा वेळ फार मर्यादीत होता. त्यामुळे साहजिकच खिडकीतून बाहेर बघणं किंवा प्रतिबिंबातील चित्रपट पहाणं यासाठी माझ्याकडे मुबलक वेळ होता. तिला निरखणं, तिच्या हालचाली निरखणं यासोबत मी तिच्याभोवती माझ्या प्रेमाची स्वप्नं विणायला लागलो. ती खूप सुंदर आहे अशी ग्वाही माझं मन मला देऊ लागलं. मग मला वाटू लागलं किंबहुना त्या प्रतिबिंबात मला असं जाणवू लागलं की माझ्या प्रतिबिंबात तीही रस घेत आहे. (ज्या अर्थी मला तिचं प्रतिबिंब दिसत होतं त्या अर्थी माझंही तिला दिसत असणारंच) आणि एकदिवस मला असं वाटलं की ती माझ्या प्रतिबिंबाकडे पहात आहे. म्हणजे तिचं प्रतिबिंब माझ्या प्रतिबिंबाकडे पहात आहे! तेव्ही मी मुद्दामच माझी मान अभिवादन केल्यासारखी थोडी झुकवली आणि काय सांगू तुम्हाला ? तिच्या प्रतिबिंबानेही तसाच प्रतिसाद दिला आणि मग ती दोन्ही प्रतिबिंब एकमेकांशी परिचित झाली.

तिच्या प्रेमात पडायला मला काहीच वेळ लागला नाही. पण रोज सकाळी अभिवादनार्थ मान झुकवणं या पलीकडे काही माझी प्रगती झाली नाही. रोज सकाळी माझी वृद्ध सेविका खिड‌कीजवळच्या खुर्चीत मला नेऊन बसवत असे. संध्याकाळी, जेव्हा माझी स्वप्नसुंदरी सज्जातून उठून घरात जात असे तोपर्यंत माझा मुक्काम तिथेच असे.

असेच काही दिवस गेले. मग एक दिवस नेहमीप्रमाणे आम्ही एकमेकांना अभिवादन केलं .त्या दिवशी मात्र मी तेवढ्यावर थांबलो नाही. मी एक फूल तिच्या दिशेने जाईल या अंदाजाने कालव्याच्या पाण्यात टाकलं. त्यावर तिच्या प्रतिबिंबाने अनेकदा अभिवादन केलं आणि आईलाही याविषयी सांगितलं. यानंतर मग रोजच 'सुप्रभात' आणि 'शुभ रात्री' साठी माझं फूल कालव्याच्या पाण्यात पडू लागलं. माझी ही साधना अगदीच वाया गेली नाही. कारण एक दिवस माझ्या फुला पाठोपाठ तिचंही फूल कालव्याच्या पाण्यात पडलं. पाण्याच्या प्रवाहामुळे ती दोन्ही फुलं एकमेकांना भिडली त्यावेळी ती, हसत हसत टाळ्या वाजवू लागली. यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ माझ्या पाठोपाठ तिची फुलं पाण्यात पडू लागली. जेव्हा जेव्हा ती एकमेकांना भिडत तेव्हा ती मोठ्या आनंदाने टाळ्या पिटत असे. कधी कधी असंही होई की मधेच काही एखादी गोष्ट आल्यामुळे ती फुलं एकमेकापासून दूर जात. त्यावेळी ती हिरमुसली होत आपले हात झटकत असे. किती मोहक दिसायची ती त्या वेळी!अशा वेळी मी पण तिचे अनुकरण करायचो पण तिच्यासारखे हावभाव मला काही जमायचे नाहीत! कधी कधी गोंडोला बाजूने गेला की ती फुलं चिरडली जायची. (हा प्रकार अनेकदा व्हायचा) मग ती रडण्याचं नाटक करायची आणि मी पण! यावर ती पाण्यातल्या आकाशाकडे बोट दाखवत 'देवाची इच्छा ' अशा अर्थाचा मूकाभिनय करायची. तिच्याइतका सुंदर नाही पण मी पण मूकाभिनय करत म्हणायचो ... Better luck next time! (बेटर लक नेक्स्ट टाईम)
एक दिवस तिने येशूची प्रतिमा उंचावून चुंबली तशी मी देखील माझ्याजवळील येशूच्या चांदीच्या प्रतिमेचं चुंबन घेतलं. आम्ही दोघेही एकाच धर्माचे होतो तर‌! चला!
तर अशा प्रकारे निष्पाप, अबोल असं आमचं प्रियाराधन चालू होतं.

आणि एक दिवस माझी ही सुंदरी सज्जामधे आलेली दिसलीच नाही. एक नाही, दोन नाही. बरेच दिवस मला तिचं दर्शन झालं नाही. मी आप‌ला नेहमीप्रमाणे पाण्यात फुलं टाकत होतो. पण तिची फुलं काही पडत नव्हती. आणि अचानक एक दिवस ती प्रगट झाली. तिने काळा पोषाख परिधान केला होता आणि ती सारखी रडत होती. मी समजलो.तिची वृद्ध, आजारी आई निवर्तली होती. माझ्या समजूती प्रमाणे या जगात आई खेरीज तिला दुसरी कुणी जवळचं नव्हतं. या घटनेनंतर अनेक दिवस ना फुलं आली ना तिने काही प्रतिसाद दिला.ती आपली मूकपणे आपलं भरतकाम करत बसलेली असायची. आता तिच्या बाजूला तिच्या आईची रिकामी खुर्ची होती. मी बघत होतो की काम करता करता ती मधूनच नजर वर करून खुर्चीकडे बघे आणि बघता बघता तिचे डोळे पाण्याने भरत. कदाचित त्यामुळे तिचं मन मोकळं होत असेल.

काही दिवस असेच गेले आणि मग एक दिवस ती पूर्वीसारखी झाली. माझ्या अभिवादनाला पुन्हा प्रतिसाद देऊ लागली. माझ्यापाठोपाठ तिचं फूलही पाण्यात पडू लागलं. कधी तिचं आधी ,तर कधी माझं आधी. ती एकमेकांना भिडून प्रवाहाबरोबर वाहू लागली.

यानंतर मात्र एक दिवस असा आला की माझं मन विषण्ण झालं. माझ्यासाठी जणू तो काळा दिवस होता. मी नेहमीप्रमाणे खिडकीपाशी बसलो होतो. एवढ्यात एक गोंडोला माझ्या खिडकी जवळून जाऊ लागला. त्यामध्ये एक अतिशय देखणा, उमदा तरुण होता... त्याविषयी माझं काही म्हणणं नाही. पण तो सज्जात बसलेल्या माझ्या सुंदरीशी हसून हसून बोलत होता.त्यांची जुनी मैत्री असल्यासारखा! जवळजवळ अर्धा तास त्यांचं हे गुफ्तगू चालू होतं. आणि मला वाटतं बोलता बोलता त्यांनी एकमेकांचे हातही हातात घेतले होते. त्यांनतर तो पुढे गेला. एव्हाना माझं हृदय मात्र विदीर्ण झालं होतं .पण गंमत बघा, तो पुढे गेला असेल नसेल आणि पुढच्याच क्षणी माझ्या सुंदरीने एकाच देठाला फुटलेली दोन फुलं पाण्यात टाकली.बराच वेळ हे कशाचं रूपक असेल ते काही माझ्या ध्यानात येत नव्हतं आणि मग ते कोडं उलगडलं! म्हणजे ते दोघं बहीण भाऊ होते तर ! मी निश्चिंत झालो. खुशीने स्मितहास्य करत मी अभिवादन केलं .यावर तिने देखील हसून मान डोलावली आणि मग आमची कहाणी मागील पानावरून पुढे चालू झाली.

ज्या आजाराने मी ग्रस्त होतो त्याच्यावर वेगळे काही उपचार करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा एकदा आम्हाला एकमेकांचा विरह होणार म्हणून मी उदास झालो. तिला काहीच न सांगता मी निघून गेलो, असं तर वाटणार नाही ना तिला? तिला कसं कळवावं या विचाराने मी अस्वस्थ झालो. रात्र रात्र जागून विचार करू लागलो. झोपताना काही योजना ठरवू लागलो आणि सकाळी उठताच त्या किती निरुपयोगी आहेत हे लक्षात येऊन हताश होऊ लागलो. पण म्हणतात ना प्रेमाचं गणितच वेगळं असतं! माझं मन हलकं करणारा दिवस उजाडला. त्या दिवशीचा तो 'गोंडोला' वाला माझ्या सेविके कडे म्हणे चौकशी करत होता की या खिडकीतले इंग्लिश गृहस्थ हल्ली का बरं दिसत नाहीत?

हे ऐकताच मी खूष झालो .कारण मनोमन मला खात्री वाटली की , माझ्या सुंदरीने नक्कीच माझ्या काळजीपोटी भावाला चौकशी करायला पाठवलं होतं! त्यानंतरचे तीन आठवडे माझ्या खिडकीच्या कट्टयावर रोज सकाळी एक फूल ठेवलेलं दिसायचं. गोंडोला तून जाणाऱ्याला ते तसं ठेवणं सहज शक्य होतं.

आता मी पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा खिडकीपाशी बसू शकत होतो. माझं दर्शन होताच माझी सुंदरी उठून उभी राहिली आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागली. टाळ्या वाजवण्यामुळे हेलकावणारं तिचं ते प्रति‌बिंब बघताना मला खूप छान वाटत होतं. आज मात्र मी स्वत:हून त्या गोंडोला वाल्या तरुणाला खुणेने खिडकीजवळ बोलावलं. मला बघून त्यालाही खूप आनंद झालेला दिसला. त्याला आणि त्याच्या बहीणीला माझ्याविषयी वाटणाऱ्या प्रेम आणि काळजीसाठी मी त्या दोघांचे मनापासून आभार मानले. आमच्या संभाषणातून मला समजलं की माझ्या त्या सुंदरीचं नाव होतं ,अँजेला. संपूर्ण व्हेनिस शहरात तिची ओळख सुंदर आणि शीलवान तरुणी अशी होती. कुठल्याही पुरुषाला ती आपली बहीण म्हणून आवडली असतीच, पण त्याहीपेक्षा पत्नी म्हणवून घेणं निश्चितच आवडलं असतं!
पण हाय रे ‌दैवा! तो नशिबवान पुरुष ठरणार होता हा गोंडोला वाला! एक दोन दिवसातच ते दोघे विवाहबद्ध होणार होते....

ही बातमी ऐकताच माझी स्थिती फारच भयंकर झाली . शरीराच्या नसा- नसांतून रक्त वेगाने वाहू लागलं. हृदय फुटून बाहेर येईल असं वाटू लागलं .काही क्षण मला काही दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. आजूबाजूच्या कशाचंही भान नव्हतं.. काही वेळाने लडखडत्या जिभेने मी कसंबसं त्यांचं अभिनंदन केलं. लग्नानंतर नवदांपत्याला माझ्या घरी यायचं निमंत्रण दिलं. यावर आभार मानून त्याने माझा निरोप घेतला आणि आनंदाने शीळ घालत तो निघून गेला.

तो गेला पण त्याचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. तो सांगत होता, "माझी अँजेला तुम्हाला गेली दोन तीन वर्षे ओळखते आहे. अगदी किशोरी असल्यापासून. तुमच्याविषयी ती माझ्याशी नेहमी बोलते. हा कॅथाॅलिक इंग्लिशमन दिवसेंदिवस खिडकी जवळच्या खुर्चीत का बसून राहतो याविषयी तिला कुतूहल वाटे आणि काहीतरी शारीरीक त्रास असणार या कल्पनेने तिला वाईटही वाटे. तुमच्याशी बोलून तुमचं काही दुःख असेल तर ते हलकं करावं असं तिला नेहमी वाटे.एक दिवस तुम्ही जेव्हा पाण्यात फूल टाकलंत तेव्हा तिने मला विचारलं , "मी पण फूल टाकू का?"
मी म्हणालो," का नाही? जरूर टाक. म्हणजे तुझ्या मनातील करुणा त्यांना समजेल. तेवढंच त्यांना बरं वाटेल."

म्हणजे हे तसं प्रेम नव्हतं तर? प्रेम होतं पण दयेपोटी पाझरलेलं! माझ्या क्षेमासाठी वाटणारं! आता सारंच संपलं होतं. माझ्या मूक प्रेमाची ही अशी परिणती झाली होती.

एका देठातून फुटलेली ती दोन फुलं हे दर्शवत होती की गोंडोलावाला आणि माझी सुंदरी वाग्दत्त वधू-वर होते. आणि त्यावेळी केलेलं माझ्या आनंदाचं प्रदर्शन म्हणजे त्यांच्या या लग्न बंधनावर प्रगट केलेली खुशी होती तर!

दुसऱ्या दिवशी गोंडोलावाला इतर गोंडोला चालवणाऱ्या आपल्या मित्रांचा ताफा घेऊन येताना दिसला.त्याच्या सोबत माझी....माझी?.. सलज्ज आणि आनंदाने मोहरलेली अँजेला वधूवेषात बसलेली होती.

थोड्याच वेळात तो आणि ती माझ्या घरात शिरले. माझी नजर क्षणभर थबकली, बावचळली. अनेक वर्षं प्रतिबिंबात बघितल्यानंतर मी प्रथमच तिला असं पाय खाली आणि डोकं वर अशा स्थितीत आणि प्रत्यक्षात बघत होतो! त्या दोघांनी माझ्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि माझे आशीर्वाद मागितले. माझे डोळे पाण्याने भरले.लटपटत्या हातांनी मी माझा चांदीचा क्रुस तिच्या हातात देत आशीर्वाद दिले ....लडखडत्या शब्दांत! अँजेलाने खूप आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि धन्यवाद देऊन ते दोघे निघून गेले.

गोंडोलांचा ताफा मार्गस्थ झाला. जाताना सारेजण आनंदाने गात होते. मावळत्या सूर्याबरोबर अंधार पसरू लागला. गाण्याचे सूर हळूहळू मंद होत दूरवर गेले. त्यांचे ते आनंदाचे सूर माझ्यासाठी मात्र शोक संगीताचे सूर ठरले.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

भागो's picture

11 Jan 2025 - 6:47 am | भागो

छान कथा आहे.

नूतन's picture

11 Jan 2025 - 11:25 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

वामन देशमुख's picture

11 Jan 2025 - 7:06 am | वामन देशमुख

आवडली कथा.

नूतन's picture

11 Jan 2025 - 11:25 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

टर्मीनेटर's picture

11 Jan 2025 - 2:04 pm | टर्मीनेटर

मस्त आहे कथा!
भावानुवादही नेहमीप्रमाणेच उत्तम 👍

नूतन's picture

12 Jan 2025 - 10:05 am | नूतन
नूतन's picture

12 Jan 2025 - 10:05 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

कथा खूपच भावली. चित्रकार नायकाला समोरच्या घरातले मुलगी वर्षानुवर्षे फक्त तिच्या प्रतिबिंबातच दिसते, ही अजब कल्पना फार रुचली. मी जर त्याच्या जागी असतो तर सगळे असेच घडले असते, फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती)
चित्रकाराची वर्षभराची मिळकत तीस पौंड म्हणजे तो काळ केंव्हाचा असावा, या कुतुहलापोटी शोध घेता कथा १८९० साली प्रकाशित झाल्याचे कळले.

अवांतरः कथेच्या शेवटी उल्लेखिलेल्या 'शोकसंगीत' वरून मोझार्ट चे Requiem - (मृत्युगीत) आठवले.
(ही त्याची आयुष्यातील सगळ्यात शेवटली रचना असून ती अधूरी राहिली होती)
https://en.wikipedia.org/wiki/Requiem_(Mozart)

केवळ अद्भुत अशी ही रचना आहे. विषेशतः त्यातला Lacrimosa हा (३:२० मिनीटाचा) भाग ऐका:
https://youtu.be/k1-TrAvp_xs?si=Mf_EKgWwQTjW-3PO

नूतन's picture

12 Jan 2025 - 10:09 am | नूतन

सविस्तर प्रतिसादांबद्दल आभार

फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती)
तुमच्या शैलीत रंगवलेली चित्र बघायला आवडतील.

Requim .. विषयीच्या अवांतर माहिती बद्दल धन्यवाद. ऐकेन.

नूतन's picture

12 Jan 2025 - 10:10 am | नूतन

Requiem - (मृत्यु गीत)

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2025 - 5:09 am | श्रीरंग_जोशी

हृद्य कथेचा अनुवाद उत्तमपणे केला आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.

नूतन's picture

12 Jan 2025 - 10:11 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

लेखकाला ही कथा कशी सुचली (असावी) याबद्दल काही उल्लेख आहेत का ?

थोडेसे खोदकाम केल्यावर खालील प्रतिमा मिळाल्या:
ही कथा (१८८७ ?) ज्या 'नाताळ विशेषांकात' सर्वप्रथम प्रकाशित झाली होती, तो अंकः
.

या अंकात सदर कथेसाठी केलेली काही चित्रे आहेत का याचा बराच शोध घेतला पण काही सापडले नाही, परंतु या निमित्ताने त्या काळातली अनेक उत्तमोत्तम छापाचित्रे बघायला मिळाली. त्यातील काही नंतर इथे डकवीन.

(या भावानुवादाचे शीर्षक जरा वेगळे करता आले तर बघावे - ज्यातून या सुंदर कथेची थोडीशी झलक मिळेल असे काहीतरी, जसे "कथा एका प्रतिबिंब-सुंदरीची")
चिपळूणकर पिता-पुत्राने अनुवादित केलेल्या 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' यातील कथांची शीर्षके अशी असायची: "एक म्हातारा आंधळा कुबडा आणि त्यास ज्याने फसविले, त्या लुच्च्या नापिताची गोष्ट" --- हा प्रकार मला भारीच आवडायचा, आणि शीर्षकावरून गोष्ट कश्याबद्दल / कोणती, हेही कळायचे/लक्षात रहायचे.

नूतन's picture

13 Jan 2025 - 12:08 am | नूतन

लेखकाला ही कल्पना कशी सुचली किंवा ‌हा त्याचा किंवा दुसऱ्या कुणाचा अनुभव होता याविषयी माहिती सापडली‌ नाही.
परंतु प्रतिबिंबांमधील संवाद या कल्पनेमुळेच मला ही कथा आवडली.
प्रतिबिंब सुंदरी शीर्षकातूनही सहज अर्थबोध होईल असं ‌वाटत नाही. कथेत मनाचे खेळ किंवा कल्पनाविलास अधिक आहे. म्हणून हे शीर्षक... आभास हा..

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2025 - 7:26 am | कर्नलतपस्वी

मला वाटते सर्वांच्याच आयुष्यात येतो. प्रकार वेगवेगळा.
कुणाचे शाळेतल्या बेंचवर, कुणाचे बस,कुणाचे सामने वाली खिडकीतून.....

जिस रोज़ से देखा है उसको
हम शमां जलाना भूल गए
दिल थाम के ऐसे बैठे हैं
कहीं आना-जाना भूल गए
अब आठ पहर इन आँखों में
वो चंचल मुखड़ा रहता है
मेरे सामने वाली खिड़की...

अनुवाद एकदम सपक हं.
आवडला हे वेगळे सांगावयास नको.

नूतन's picture

15 Jan 2025 - 9:40 am | नूतन

प्रतिसादांबद्दल आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2025 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा निवड आणि अनुवादही आवडला. चित्रकाराचं दु:ख काळजाला भिडलं.

-दिलीप बिरुटे