The Internet can be a dangerous place!
काही दिवसांपूर्वी माझा संगणक दारू प्यालेल्या माणसासारखा वागायला लागला. यावर खरा इलाज असा होता कि माझ्या एका तज्ज्ञ मित्राकडे जाऊन त्याच्याकडे संगणक पटकून द्यायचा. त्याऐवजी मी माझे डोके चालवायचा प्रयत्न केला. माझ्या मनाने असे ठरवले कि माझ्या RAM मध्ये काही तरी लोच्या झालेला आहे. RAM कमी पडतो आहे. त्यामुळे साधी .docx फाईल लोड करायलाही संगणकाची दमछाक होतेय. मग शोध सुरु झाला अशा चाळणीचा कि ज्याच्या साठी अत्यंत कमी RAMची आवश्यकता लागेल. ह्या शोधात माझ्या हाती काय काय रत्ने घावली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. पण ह्या भटकंतीत मला एका नवीन अनोख्या विश्वाचा शोध लागला. हा लेख त्या विश्वाची ओळख आपल्याला करून देण्यासाठी लिहिला आहे.
आपल्या नेहमीच्या वापरातील म्हणजे क्रोम, फायरफॉक्स, ऑपेरा, एज, सफारी इत्यादी चाळणीयंत्रांच्या पल्याड एक लपलेली दुनिया आहे याची आपल्याला जाणीव नसते. त्या दुनियेचे नाव आहे खोलजाल(Deep Web), किंवा अदृश्यजाल(Hidden Web).
सर्व साधारणपणे लोक जेव्हा आंतरजालाबद्दल बोलतात तेव्हा ते खरतर जालाच्या पृष्ठाभागाबद्दल बोलत असतात. नेहमीच्या वापरातील चाळणतंत्रे आपल्याला जालाच्या केवळ पृष्ठाभागावर फिरवतात. ह्याला म्हणतात पृष्ठजाल(Surface Web). ह्या पृष्ठाभागावर देखील अक्षरशः कोट्यावधी महितीपत्रे आहेत. हिमनगाचे ज्याप्रमाणे आपल्याला केवळ टिप दिसते, उरलेला भागा पाण्याखाली अदृश्य असतो, त्याचप्रमाणे आंतरजालाचा बहुतांश भाग आपल्यासाठी अदृश्य असतो. जालाच्या ह्या अदृश्य भागाला “खोलजाल”(Deep Web) असे नाव आहे. ज्या संस्थळी परवलीच्या शब्दाशिवाय प्रवेश मिळत नाही अशा सर्व जागा खोल-जाल मध्ये गणल्या जातात. अशा जागी फक्त सदस्यांना प्रवेश मिळू शकतो. उदा. खाजगी डेटाबेसेस, बँकेची पोर्टल्स, पेशंटची रेकॉर्डस, इ-मेल एकाउंटस इत्यादि. एकदा प्रवेश मिळाल्यानंतर ही संस्थळे चाळण्यासाठी आपल्याला खास सॉफ्टवेअरची गरज नसते. खोल-जालाचा हा भाग संपूर्णतः कायदेशीर आहे. जोपर्यंत इरादा प्रामाणिक आहे तो पर्यंत आपली ओळख लपवण्याची देखील गरज नाही. हे सखोल-जाल किती “खोल” आहे? तर्क करणेही कठीण आहे. अगदी साधे उदाहरण. आपला
“आधार” चा डेटाबेस. ह्यात किमान शंबर कोटी नागरिकांची माहिती साठवून ठेवली असणार. असे जवळ जवळ प्रत्येक देशाचे डेटाबेस आहेत. किंवा आपल्या सर्वांच्या आवडीचे स्थळ “फेसबुक!” इथे केवळ सभासदच प्रवेश करू शकतात. ही माहिती आपल्या नेहमीच्या चाळणतंत्राच्या कक्षेबाहेर आहे.
ह्याच सखोल-जालाचा एक अत्यंत रहस्यमय भाग आहे गर्द-जाल (Dark Web). एक ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे कि गर्द-जाल हे बहुतांशी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांचा अड्डा आहे. आणि त्यामुळेच देशोदेशीच्या गुप्तचरांचा वावरही येथे असणार व आहेच. त्यामुळे कोण गुन्हेगार आणि कोण पोलीस हे ओळखणेही अवघड! म्हणून मी म्हणतो कि ह्या जागी प्रवेश न करणे श्रेयस्कर!
ह्या ठिकाणी वावरणारे आपली खरी ओळख लपवून वावरतात. व्यवहार करणारे दोनी पक्ष अनामिक होऊन वावरतात. आपली “ओळख” म्हणजे जालावरील आपला पत्ता IP ADRESS. ह्या पत्त्यावरून तुम्ही कुठल्या संगणकावर आहात त्याचा छडा लागू शकतो. हा पत्ता लपवण्यासाठी आपल्याला खास चाळणतंत्राचा उपयोग करावा लागतो. त्याबद्दलची माहिती पुढे येईलच. पण त्या आधी ह्या गर्द-जालावर कशा प्रकारच्या “सेवा” उपलब्ध आहेत, इथे ग्राहक काय विकत घेऊ शकतो त्याची थोडक्यात जंत्री देतो.
ड्रीमलँडमध्ये स्वप्नं रहातात तर गर्द-जालामध्ये नको नको त्या गोष्टी रहातात.. हे पहा गर्द-जालाचे “नागरिक!”
हॅकर्स= तुम्ही पैसे सोडलेत तर तुम्ही सांगाल ते हॅक करून देऊ. हा ह्यांचा बाणा.
भाडोत्री खुनी= फक्त पैसे द्या नि टार्गेट दाखवा काम होणार. पुरावा म्हणून खुनाचा विडिओ पण मिळेल. एक्स्ट्रा चार्जेस अप्लाय.
मादक पदार्थ= मागणीनुसार पुरवठा!
पोर्नोग्राफी= विशेषतः चाईल्ड पोर्नोग्राफी. जास्त लिहित नाही.
राजकारण= राजकारणी,पत्रकार, खबरी, स्टिंग ऑपरेट इ.चा वावर.
आर्थिक- चोरलेली क्रेडीट कार्ड्स.
शिवाय टेररिस्ट, क्रांतिकारक, अनार्किस्ट, जुगारी, भाडोत्री सैनिक ह्यांची दुकाने, अड्डे, गाळे ते वायले.
जे लोक तिकडे जाये करतात त्यांच्या मते आपले “अंतरजाल” म्हणजे -आपण ज्या जालात वावरतो ते- ह्या अदृश्य जालाच्या तुलनेत नगण्य आहे. महासागरात जसे थरावर थर असतात आणि पृष्ठभागाचा तळाशी काही संबंध असतोच असे नाही. तसेच आहे हे. शास्त्रज्ञ सांगतात कि समुद्राच्या तळाशी खनिजांचे साठे आहेत! सागरात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांच्या बरोबर बुडालेले सोन्याचे डब्ळून आहेत! आपल्याला पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची संपूर्ण माहिती नाही. मग खोल समुद्राच्या तळाशी असणारे कूट प्राणीमात्र आपल्या विरुद्ध काय कट कारस्थाने रचित असतील काय सांगावे?
ह्या खोल जगात ये जा करणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोक तर एफबीआय, एमआय6 (हा तेच ते 007 वाले) सीआयए, एसवीआर आरएफ, मोसाद, रॉ इत्यादि-इत्यादि चे एजंट असतात. पण एव्हढे आपटून ह्यांच्या हाताशी एखादाच मासा घावतो. कारण? इथे क्वांटमक्रिप्टो भाषेत व्यवहार चालतात. ही भाषा फक्त बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यालाच समजते. इथले चलनही क्रिप्टो आहे. क्रिप्टो कहासे आता है और कहा जाता है? उपरवालाही जाने. तुमच्या माहितीसाठी, इथे सगळे मुखवटे घालून वावरतात. त्यामुळे एक एफबीआयवाला दुसऱ्या एफबीआय वाल्यावर पाळत ठेवतो. अगदी स्वतःच्या नकळत!
तर कधी काळी ह्या गर्द-जालात सहल करण्याची इच्छा झालीच तर आपल्याला सुरक्षा कवच घेऊनच जावे लागेल. त्या सुरक्षा कवचाची माहिती पुढील भागात.
मला वाटतं कि तुम्ही नेहमीच्या आंतर जालावर ओळखीच्या जागीही जा ये करत असाल तरी सुरक्षा कवच वापरावे कारण.
The Internet can be a dangerous place.
तुम्हाला कदाचित असं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. आपल्या घरात आपल्या बायका मुलांच्या सहवासात आपण एक गोष्ट सहज विसरून जातो कि आंतरजालाच्या जंगलात आपण एकटे असतो, आपले रक्षण करण्यासाठी आपल्या जवळ काहीही शस्त्र, कवचकुंडले नसतात, सगळ्यात भयावह हे आहे कि ह्याची आपल्याला जाणीव नसते.
बकऱ्यांच्या शोधात फिरणारे हॅकर्स, आपल्याच नागरिकांवर लक्ष ठेवणारी काही सरकारी खाती, तुमच्या सवयी, आवडी निवडी, गरजा जाणून घेण्यास उत्सुख असणारे हे प्रामुख्याने तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. सर्वसाधारण लोकांना आपल्या खाजगीपणाची पायमल्ली होत आहे ह्याची जाणीव नसते.
ठीक आहे. जैसी जिसकी सोच!
प्रतिक्रिया
9 Jan 2025 - 8:21 am | श्रीगुरुजी
खूपच रोचक लेख व लेखन आहे. उत्सुकता वाढली आहे.
9 Jan 2025 - 9:33 am | विवेकपटाईत
लेख आवडला उत्सुकता वाढली.
9 Jan 2025 - 2:11 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
9 Jan 2025 - 3:42 pm | भागो
श्रीगुरुजी, पटाईतकाका, मुवि धन्यवाद.
मी इथे जी माहिती दिली आहे किंवा पुढेही देईन, ती केवळ education साठी देत आहे. कृपा करून dark webच्या वाट्याला जाऊ नका. डार्क नेटवर अत्यंत भयावह, क्रूर, पाशवी , अमानुष प्रकार चालतात. Curiosity killed the cat! हे लक्षात असू द्या.
पण सध्या आपण वर्तमानपत्रात जे सायबर क्राइम चे प्रकार वाचतो आहेत उदा. Digital Arrest. ते बघून मला असे वाटते कि आंतरजालावर आपण काळजी घेऊन वावरले पाहिजे. अगदी साधी गोष्ट म्हणजे दुकानदार आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारतात. अजिबात देऊ नका. किंवा मी काय करतो कि एक खोटा नंबर देऊन टाकतो,
जिथे गरज नाही तेथे आपली माहिती देऊ नका. आज इतकेच.
9 Jan 2025 - 6:26 pm | मुक्त विहारि
त्यामूळे, त्या भागात जायची अजिबात इच्छा नाही.
आणि
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, Your presence is sufficient proof for declaring you as a criminal. असे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊ नये.
9 Jan 2025 - 6:54 pm | भागो
माझ्या लिमिटेड माहितीनुसार डार्क वेब वर सहल करणे हा गुन्हा नाहीये. आणि Mr भागो ह्यांचा पत्ता लागणे हे नामुमकीन आहे.
9 Jan 2025 - 7:58 pm | मुक्त विहारि
आज काय तर फक्त ओळख
नंतर काय तर फक्त सदस्यत्व
नंतर काय तर एखादी वस्तू खरेदी करणे
आणि..
नंतर, सतत पडीक असणे.
मनावर ताबा नसेल तर, अशा गोष्टी पासून दूर राहणेच ऊत्तम.
-------
9 Jan 2025 - 8:21 pm | भागो
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी...
मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.
9 Jan 2025 - 8:23 pm | भागो
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी... मिसळपाव, माबो...
मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.
9 Jan 2025 - 8:39 pm | श्रीगुरुजी
ट्विटर, फेसबुक, इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगा.
9 Jan 2025 - 9:23 pm | भागो
आपली वैयक्तिक माहिती कुणालाही प्रकट करू नका,
काहीतरी Anti-virus वापरा.
विपिएन वापरा. पण त्याला पैसे पडतात.
किंवा Tor ब्राउझर वापरा. हे फुकट आहे.
सगळ्यात बेस्ट म्हणजे इंटरनेट वापरूच नका किंवा अगदी कमी वापरा.
9 Jan 2025 - 10:10 pm | मुक्त विहारि
सध्या तरी तेच करत आहे...
जितके शक्य होईल तितके, Facebook, Instagram अगदी कमी. अतिशय कमी मित्र.
What's App, फक्त जवळच्या लोकां साठी.
You Tube आणि online paper , हे पण ओळख लपवून.
9 Jan 2025 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिंक प्लीज. माहिती शैक्षणिक हेतूनेच असले तरी सर्फिंग करु म्हणतो. लिंक प्लीज.
-दिलीप बिरुटे
9 Jan 2025 - 5:35 pm | भागो
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब
आपला माझ्यावर विश्वास नाही असे दिसतेय, कसली लिंक देऊ मी?
पाण्यात उडी मारणाऱ्याने आधी पोहायला शिकयला पाहिजे, तद्वत आपणही काही काही तयारी करायला पाहिजे. त्यासाठी प्रथम नवीन ब्राउझर इंस्टाल करायला पाहिजे. माहितगार लोक सांगतात कि आपल्या नेहमीच्या ब्राउझर उपयोग नाही. पावसात फिरताना रेनकोट पाहिजे.
ओके. हे वाचा.
https://en.wikibooks.org/wiki/Guide_to_Tor_hidden_services_and_elements_...
9 Jan 2025 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण दिलेली माहिती वाचली तेवढ्यावरुन लिहिणा-या व्यक्तीवर विश्वास अविश्वासावर येऊन काही व्यक्तिगत मतं बनवावीत असे मला वाटले नाही.
बाय द वे, ते सर्व जग धोकादायक असले तरी व्हीपीएन वापरुन काही वेगळे ब्राउजर वापरुन पाहतोच आहे, अधिक काही कळले तर इकडे लिहीनच किंवा नाही. धन्स.
-दिलीप बिरुटे
9 Jan 2025 - 7:23 pm | कर्नलतपस्वी
फार दिवसांनी आलात?
घाबरवून टाकणारी का चेतावणी देणारी माहीती?.
माझ्यासारखा तंत्रज्ञान मागासवर्गीय नक्कीच आपल्या लेखनामुळे सजग होईल.
प्रॉपर्टी कर,वाहन चालान, गॅस,विज बिल, कर परतावा आणी असे काही फसव्या जाळ्यात अडकू नये म्हणून काळजी घेतो पण ....
इस शोर-ए-तलातुम में कोई किस को पुकारे
कानों में यहाँ अपनी सदा तक नहीं आती
-जलाली
शोर-ऐ-तलातूम-Noise of storm.
9 Jan 2025 - 9:19 pm | कंजूस
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला?
२. IP addressकशावर अवलंबून असतो? -
a. Email ,
b. Handset / device
c. Sim card - service provider/ home wifi?
३. एका संस्थळावर मी नोंदणी केली तेव्हा त्याचा निरोप इमेल आला की तुमची नोंदणी झाली, फोन नंबर अमुक आणि पासवर्ड अमुक. तर पासवर्ड कसा कळला त्यांना?
४. काहीतरी यूट्यूबवर शोधताना एक विडिओ सापडला होता. त्यात त्याने दाखवले की तुमच्या डिव्हाईस मध्ये कोणत्या साईट्स मागे कोणकोणत्या साईट्स गुपचूप चालू होतात आणि कायकाय माहिती गोळा करतात. मला तो विडिओ शोधला पाहिजे पुन्हा. मिळाला की लिंक देईन. मी विचार केला की यूट्यूबवर आहे म्हणजे सर्वांनाच माहीत असणार.
५. शेवटी काय तर काचेचा एक बूट विसरला जातो आणि त्यावरून सिंड्रेला शोधतात. तात्पर्य काचेचे बूट घालायचे नाहीत किंवा बूट विसरायचा नाही किंवा वेळेत बाहेर पडायचं.
9 Jan 2025 - 9:43 pm | भागो
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला?
माझ्या power supply मध्ये प्रॉब्लेम होता
२. IP addressकशावर अवलंबून असतो?
मला वाटतंय कि इंटरनेट वर अवलम्म्बून आहे. जाणकार अधिक प्रकाश टाकतील. पण IP address ही आपली खरी ओळख आहे. तुम्ही जर googal chrome वापरत असाल तर पहा खाली तुमचा पत्ता दिसेल, तो खास बरोबर नसतो. VPN आणि Tor तुम्हाला नवीन -फेक- IP देतात. तो जगातील कुठल्यातरी random देशाचा असतो.
तुम्ही वापरता ती सर्व App तुमची माहिती गोळा करत असतात. google फेसबुक सह सगळे. आणि ती वापरतात. मोस्टली जाहिरातींसाठी!
10 Jan 2025 - 12:49 am | राजेंद्र मेहेंदळे
वेळ घालवायला पुस्तके वाचा, टी व्ही बघा, फिरायला जा, गप्पा मारा ईंटरनेटवरच टाईमपास कशाला?
पण शिंचा लोचा असा आहे की सध्या टेक्नॉलॉजी शिवाय जगुच शकत नाही. गुगल पे,फोन पे, ओल,उबर्,स्विगि,झोमॅटो, बँकांची अॅप, आणि काय काय......
जालावर शक्य तिथे खोट्या नावाने वावरा, व्ही पी एन वापरता आले आणि त्यातुन ब्राउझ करता आले तर खरा आय पी अॅड्रेस् लपवता येईल. इन कॉग्निटो मोडवर ब्राउझ करा. पण जिथे एखादी गोष्ट आपल्याला फुकट वापरायला मिळते तिथे तुमची माहिती चोरली जाणार हे नक्की. उदा. गुगल्,फेसबुक्,यु ट्युब, अनेक अॅप्स, इतकेच कशाला फुकट सिम कार्ड, फास्टॅग विकणारे सुद्धा. सांगावे तेव्ह्ढे थोडेच
10 Jan 2025 - 6:12 am | भागो
राजेंद्र मेहेंदळे
आपण लिहिलेल्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे.
वाचकमित्रांनो मी इथे लिहिलेली सर्व माहिती "दोन घटका करमणूक" समजून वाचायची आणि सोडून द्यायची आहे. ह्या प्रकारांपासून दूर राहाणेच श्रेयस्कर!
10 Jan 2025 - 7:02 am | कर्नलतपस्वी
कसे बघायचे.?
आता "रामदास निघाली रेवसला",एखादाच विशाल मुकादम वाचणार. बाकी गटांगळ्या खाणार....
10 Jan 2025 - 8:44 am | वामन देशमुख
लेखमालेतील हा भाग == चांगला + महत्वाचा + माहितीपूर्ण + (- अप्रस्तुत) + पुभाप्र
त्यावरील प्रतिसाद == उत्सुक + सुयोग्य + विषयाला धरून + (-फाटे फोडणारे) + अजून हवेत
अनेकदा -
मानवी प्रवृत्ती ही तंत्रज्ञान जाणिवेवर मात करते == Curiosity killed the cat.
- असा अनुभव येतो.
सुरुवात छान केलीत, भागो. शक्यतो लवकर लवकर भाग टाकत राहावे ही अपेक्षा. मिपाखरांना लेखमालेचा निश्चितच उपयोग होईल. मीही पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
---
हे पूर्णतः पटले.
10 Jan 2025 - 11:02 am | कर्नलतपस्वी
पण आता घरोघरी नळ आलेत,आंगणात कूपनलिका आहेत. मग कशाला काळजी करता. लावा भरपूर फुलझाडं.
11 Jan 2025 - 8:59 pm | भागो
Union Home Minister Amit Shah said on Saturday that dark web, cryptocurrency, online marketplace and drones continue to be a challenge for the country and these have to be checked by strict measures.
संपूर्ण बातमी वाचा.
https://m.rediff.com/news/commentary/2025/jan/11/dark-web-cryptocurrency...
फार भयानक आहे हे सगळे.