आधीचा भाग : हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे
आज सहलीचा तिसरा दिवस. लवकरच जाग आली आणि सहज म्हणून किनाऱ्यावर फिरायला बाहेर पडलो . आमचे हॉटेल पाळोळे किनार्याच्या अगदी दक्षिण टोकाला होते . काल संध्याकाळी ओंडक्यांवरून ढकलत आणलेल्या काही होड्या अजूनही किनाऱ्यावरच उभ्या होत्या .
समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर वाहून आलेला हा स्टिंग रे/वाघळी मासा
पाळोळे बीच जेथे संपतो तेथे खडकांवरून पलीकडे जाण्यासाठी लाकडी ओंडके , फळ्यांचा जिना दिसला
त्या पार करून आम्ही बाजूच्याच एका छोट्या बीचवर दाखल झालो . येथेही हॉटेल आणि काही घरे दिसली . किनाऱ्यावर आणि समुद्रातही काही छोट्या होड्या दिसत होत्या .
एक होडीवाला जवळ आला आणि विचारू लागला , तुम्हाला समुद्र सफरीवर जायचे का? डॉल्फिन पॉईंट , मंकी पॉईंट, टर्टल रॉक , बटरफ्लाय बीच दाखवून आणतो . दर विचारला असता दहा आसनी बोट आहे, प्रत्येकी ५ ० ० /- घेईन असं सांगितलं . त्याला म्हटलं आम्ही बाजूलाच राहतो आहोत, तुझ्या बाकीच्या सीट भरल्या कि फोन कर, आम्ही येऊ . त्यावर त्याने लगेच सांगितले की सीट भरेपर्यंत वाट बघायची गरज नाही . दोन हजार द्या, तुम्हा चौघांना फिरवून आणतो . बटरफ्लाय बीच बद्दल आकर्षण होतेच . लगेच बोटीत बसलो व निघालो .
थोडेसे पुढे जाऊन अगोंदच्या दिशेने प्रवास सुरु झाला . बाजूलाच बेटासारखा एक डोंगर आला तो मंकी पॉईंट . दूरवरून माकडे दिसली नाहीतच . थोडे पुढे गेल्यावर आला डॉल्फिन पॉईंट . येथे मात्र नशीब जोरावर होते . दोन - तीन डॉल्फिन उसळी मारून जवळून गेलेले पाहायला मिळाले . आम्ही योग्य वेळी आलो होतो . सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसण्याची शक्यता जास्त असते असे समजले .
थोडे पुढे गेल्यावर आला टर्टल रॉक . अगदी कासवाचा आकार .
पलीकडच्या बाजूने हा खडक असा दिसतो .
जवळच एक उंच खडक होता. याचे नाव आठवत नाही . वर एक पक्षी बसला होता . बहुतेक गरुडच .
थोड्याच वेळात पंख पसरून त्याने भरारी घेतली.
आणि थोड्याच वेळात हा लपलेला बटरफ्लाय बीच दृष्टीपथात आला . दोन्ही बाजूने हिरवेगार डोंगर आणि मध्ये सोनेरी वाळूचा किनारा . याच्या आकारावरून याला बटरफ्लाय बीच नाव पडले असे नावाड्याने सांगितले .
हा लहानसा अर्धवर्तुळाकृती बीच आजूबाजूने खडकांनी वेढलेला आहे . अगोंद ते पाळोळे याच्या मध्यात हा किनारा असला तरी रस्त्याने येथे येणे सोईचे नाही . वाहन थेट किनाऱ्यापर्यंत पोहचू शकत नाही . पायी साधारण दोन किमीचा ट्रेक करावा लागतो आणि वेळही बराच जातो . अर्थात वेळ असल्यास जंगल वाटेने ट्रेक करून येथे येणेसुद्धा बऱ्याच जणांना आवडू शकते .
आम्ही किनाऱ्यावर दाखल झालो .
बाजूच्या खडकांवर काही लोक दिसत होते . आम्हीही तेथे चढून किनारा पाहण्याचे ठरवले . खूप सुंदर दृश्य होते ,
आता अगोंदा -पाळोळेहून येणाऱ्या अनेक बोटी दिसायला लागल्या .
निळसर / हिरवट स्वछ पाणी
आणि हा सोनेरी किनारा
बऱ्याच व्हिडिओत सांगतात कि येथे खूप फुलपाखरं आहेत म्हणून याला बटरफ्लाय बीच म्हणतात . ते खरे वाटत नाही कारण आम्हाला एकही फुलपाखरू दिसले नाहीत . याला हनिमून बीचही म्हणतात ते समजू शकते . आता येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असली तरी पूर्वी युगलांना येथे चांगलाच एकांत मिळत असणार .
थोडावेळ थांबून परत फिरलो
आमचा नावाडी
परत येताना एका खडकावरून टिपलेला पाळोळे किनारा
रूमवर येऊन ताजेतवाने झालो . नाश्ता केला
दुपारी बाराच्या सुमारास बाहेर पडलो . आज लोलये -पैंगीणचे वेताळ आणि जमल्यास अजून एखाद्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायची होती . बाहेर कमी भावात मिळू शकल्या असत्या तरीही हॉटेलतर्फेच पाचशे रु .दराने दोन स्कूटर मागवल्या .
गाडीत एक लिटर पेट्रोल भरून दिलेले होते . अंदाजाने अजून एक लिटर पेट्रोल लागणार होते . गाडी आणून देणाऱ्याने आमच्याच मोबाईलने गाडीचा सर्व बाजूने व्हिडीओ घ्यायला लावला .
लग्नानंतर आठ-दहा वर्षे दुचाकीवर बरीच भटकंती केली होती पण त्यानंतर गेल्या तीस वर्षात आज भटकंतीसाठी प्रथमच स्कुटरवर बसणार होते . एकंदरीत आजची सफर रोमांचक होणार होती .
येथे लहानसहान दुकानांमध्ये एक लिटरच्या बाटलीत भरलेले पेट्रोल मिळते . (१ १ ० /-रु . लिटर ) दोन्ही स्कुटरला एक एक बाटली पाजली आणि निघालो .
अर्धा पाऊणतास हायवेने प्रवास केल्यावर लोलयेकडे डाव्या बाजूला वळलो. दाट झाडीतून जाणारा आणि जवळजवळ निर्मनुष्य असा सुंदर रस्ता. एकदोन ठिकाणी थोडीशी विचारणा केल्यावर आर्यादुर्गा मंदिर आणि वेताळ मूर्ती शोधायला फारसा वेळ लागला नाही .
आज जी वेताळ मंदिरे पाहणार होतो त्याची प्रेरणा श्री . प्रचेतस यांचा दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात हा लेख वाचून मिळाली होती . लेखात त्यांनी मंदिरांविषयी खूप चांगली माहिती दिली आहे .
आपण मात्र फोटोंमधूनच सद्यस्थिती समजावून घेऊया .
आर्यादुर्गा मंदिराची कमान
मंदिराचे प्रवेशद्वार बंद होते . आजूबाजूस विचारणा करावी तर कोणीही नाही
मंदिरास फेरी मारली . मागील बाजूने एक दरवाजा आहे तो ढकलून पाहिला आणि तो उघडलाही . आम्ही सभामंडपात दाखल झालो .
मंदिराचा
जीर्णोद्धार २ जून २ ० १ ९ रोजी झाला
आर्या दुर्गा देवी मंदिराच्या आसपास पोफळीची दाट जंगल आहे .
कमानी पुढून जाणारी वाट वेताळ मूर्तीकडे जाते . जास्त अंतर नाही .
भव्य वेताळ मूर्ती .
सुपारीच्या वृक्षांचा आधार घेऊन पसरलेली काळीमिरी
येथे साधारण अर्धा तास देऊन आम्ही निघालो पैंगिणकडे. प्रचेतस यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यालगतच आदिपुरुष मंदिर दिसले . त्यालगतच वेताळ मंदिरही . या दोन्ही मंदिरांनी कात टाकली आहे आणि आता अधिकच मोहक दिसतात .
आदीपुरुष मंदिर
मूर्तीच्या ऐवजी त्या जागी असलेला स्तंभ
जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचा फलक
काही पायऱ्या उतरल्यावर आहे ते वेताळ मंदिर
मंदिराची कमान
वेताळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा १ मे २ ० २ ४ ला संपन्न झाली .
वेताळमूर्ती
मुखवटे
लाकडी छत
वेताळदेवाचा नैवद्य व दक्षिणा यादी
एकाच फोटोत आदिपुरुष व वेताळ देव मंदिर
पैंगीणला अजून एक मंदिर पाहीले ते म्हणजे श्री परशुराम मंदिर . गुगलने दाखविलेल्या रस्त्याने थोड्याच वेळात या मंदिरास पोहचलो .
पैंगीण येथे दोन परशुराम मंदिरे आहेत हे नंतर कळले . एक वेलवाडा येथे तर दुसरे महालवाडा येथे . महालवाडा यथील मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून तेथे परशुरामाच्या बरोबरीने नृसिंह हे दैवत आहे . (वेताळ मंदिरही महालवाड्यतच आहे असे वाचले )
आम्ही पोहचलो होतो वेलवड्यात .
येथील मंदिरात परशुरामाच्या बरोबरीने पुरुषोत्तम हे दैवत आहे . मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मूर्ती मुख्य मंदिरातून बाजूस आणून ठेवल्या आहेत . फोटो घेऊ दिला नाही जुने मंदिर आतून पाहता आले .
मागील बाजूस पुष्करणी आहे .
दुपारचे साडेतीन वाजले . आता परत जाता जाता एक-दोन समुद्र किनाऱ्यांना ओझरती भेट द्यायचे ठरले .
गाल्जीबाग समुद्रकिनारा /टर्टल नेस्टिंग बीच ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या जागेसाठी संरक्षित बीच . अतिशय स्वच्छ आणि शांत किनाऱ्यावर कुठेही शॅक्स नाहीत
येथून पुढे पाटणे बीच
किनाऱ्यावर पोहचण्या आधी दोन्ही बाजूस दुकाने असलेला बाजार रस्ता लागला . दुचाकीमुळे बरेच आतपर्यंत जाता आले . संध्याकाळची वेळ होत आल्याने किनाराही बराचसा गजबजलेला दिसला .
येथे थांबण्या ऐवजी आपल्या रिसॉर्टला जाऊन सनसेट पाहू असे ठरवून लगेच निघालो . येऊन काउंटरला स्कुटरच्या चाव्या जमा केल्या . पैसे आगाऊ दिलेलेच होते . रूमवर येऊन लगेच किनाऱ्याकडील दरवाजा उघडून बाहेर येऊन बसलो .
सूर्य अस्ताला जात होता
आज दिवसभराच्या धावपळीत दुपारचे जेवणही झाले नाही. नाही म्हणायला लोलयेच्या मंदिरात दानपेटीत पैसे टाकून तेथीलच एक नारळ उचलला होता व बाजूला ठेवलेल्या कोयत्याने फोडून देवाला प्रसादही अर्पण केला व आम्हीही खाल्ला होता
आजही जेवण कालच्यासारखे किनाऱ्यावरच. आज आम्हा दोघींसाठी 'ब्लू लगून ' आले . (मॉकटेल का कॉकटेल ते नका विचारू) चव आवडली .
सहलीचा तिसरा दिवस संपला . प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा. कोणता दिवस जास्त चांगला ते ठरवणे कठीण होतंय . सहलीतली रंगत वाढत चालली हे मात्र निश्चित .
क्रमश :
प्रतिक्रिया
20 Dec 2024 - 6:00 am | गवि
खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच गूढ. उन्हातान्हात उघड्यावर सदैव उभा असलेला तो वेताळ गावाचे रक्षण करतो. रानावनातून काटेकुटे तुडवत फिरतो अशी श्रद्धा आहे. त्याच्या बरगडीत विंचू असतो. प्रचूने त्यावर खूप सविस्तर छान लिहीले आहे आणि त्याच्या लेखामुळेच मीही तो वेताळ खास शोधून तिथे जाऊन बराच वेळ रेंगाळत पाहिला.
बाकी किनारे देखील सुंदर. तुम्ही ज्या पायऱ्या वापरून पाळोळे बीच वरून पलीकडे गेलात तोच माझ्या मते पाटणे बीच.
जाता जाता. अगोंदा याचा उच्चार अगोंद असा आहे असे सांगून पुढील भागाची प्रतीक्षा.
20 Dec 2024 - 9:15 pm | गोरगावलेकर
बदल केला आहे
20 Dec 2024 - 6:08 am | मुक्त विहारि
"प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा. कोणता दिवस जास्त चांगला ते ठरवणे कठीण होतंय..."
गोवा असेच आहे... सदैव चिरतरुण...
20 Dec 2024 - 11:24 am | झकासराव
छान सुरुय लेखमाला
आवडतंय
20 Dec 2024 - 12:11 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्तच. बटरफ्लाय बीच आणि हनीमून बीचला गेलो होतो त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोव्याचा तो भाग खूपच सुंदर आहे. आता पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.
20 Dec 2024 - 12:32 pm | टर्मीनेटर
समुद्रकिनारे, देवळे सगळंच भारी!
जिर्णोद्धारानंतर 'आदीपुरुष मंदिर' फारच सुंदर दिसत आहे 👍
20 Dec 2024 - 12:50 pm | कंजूस
आवडला हाही भाग.
20 Dec 2024 - 4:00 pm | गोरगावलेकर
कृपया धागा भटकंती विभागात आणावा
20 Dec 2024 - 5:25 pm | श्वेता२४
नेहमीप्रमाणेच हा भागही सचित्र, तपशिलवार.... भाग पटपट टाकताय त्यामुळे वाचताना मजा येते आहे.
20 Dec 2024 - 9:31 pm | कर्नलतपस्वी
बरेच काही सांगून जातात
हा ही भाग आवडला
21 Dec 2024 - 4:35 pm | अथांग आकाश
छान झालाय हा भाग! पुभाप्र!!
21 Dec 2024 - 9:37 pm | चौथा कोनाडा
व्वा ... एक नंबर,
फर्मास वर्णन आणि झक्कास प्रचि !
मजा आली भटकंती बघताना !
आता गोव्याला जातना तुमचेच धागे बघुन जातो !