आधीचा भाग : हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे
आज सहलीचा तिसरा दिवस. लवकरच जाग आली आणि सहज म्हणून किनाऱ्यावर फिरायला बाहेर पडलो . आमचे हॉटेल पाळोळे किनार्याच्या अगदी दक्षिण टोकाला होते . काल संध्याकाळी ओंडक्यांवरून ढकलत आणलेल्या काही होड्या अजूनही किनाऱ्यावरच उभ्या होत्या .
समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर वाहून आलेला हा स्टिंग रे/वाघळी मासा
पाळोळे बीच जेथे संपतो तेथे खडकांवरून पलीकडे जाण्यासाठी लाकडी ओंडके , फळ्यांचा जिना दिसला
त्या पार करून आम्ही बाजूच्याच एका छोट्या बीचवर दाखल झालो . येथेही हॉटेल आणि काही घरे दिसली . किनाऱ्यावर आणि समुद्रातही काही छोट्या होड्या दिसत होत्या .
एक होडीवाला जवळ आला आणि विचारू लागला , तुम्हाला समुद्र सफरीवर जायचे का? डॉल्फिन पॉईंट , मंकी पॉईंट, टर्टल रॉक , बटरफ्लाय बीच दाखवून आणतो . दर विचारला असता दहा आसनी बोट आहे, प्रत्येकी ५ ० ० /- घेईन असं सांगितलं . त्याला म्हटलं आम्ही बाजूलाच राहतो आहोत, तुझ्या बाकीच्या सीट भरल्या कि फोन कर, आम्ही येऊ . त्यावर त्याने लगेच सांगितले की सीट भरेपर्यंत वाट बघायची गरज नाही . दोन हजार द्या, तुम्हा चौघांना फिरवून आणतो . बटरफ्लाय बीच बद्दल आकर्षण होतेच . लगेच बोटीत बसलो व निघालो .
थोडेसे पुढे जाऊन अगोंदच्या दिशेने प्रवास सुरु झाला . बाजूलाच बेटासारखा एक डोंगर आला तो मंकी पॉईंट . दूरवरून माकडे दिसली नाहीतच . थोडे पुढे गेल्यावर आला डॉल्फिन पॉईंट . येथे मात्र नशीब जोरावर होते . दोन - तीन डॉल्फिन उसळी मारून जवळून गेलेले पाहायला मिळाले . आम्ही योग्य वेळी आलो होतो . सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसण्याची शक्यता जास्त असते असे समजले .
थोडे पुढे गेल्यावर आला टर्टल रॉक . अगदी कासवाचा आकार .
पलीकडच्या बाजूने हा खडक असा दिसतो .
जवळच एक उंच खडक होता. याचे नाव आठवत नाही . वर एक पक्षी बसला होता . बहुतेक गरुडच .
थोड्याच वेळात पंख पसरून त्याने भरारी घेतली.
आणि थोड्याच वेळात हा लपलेला बटरफ्लाय बीच दृष्टीपथात आला . दोन्ही बाजूने हिरवेगार डोंगर आणि मध्ये सोनेरी वाळूचा किनारा . याच्या आकारावरून याला बटरफ्लाय बीच नाव पडले असे नावाड्याने सांगितले .
हा लहानसा अर्धवर्तुळाकृती बीच आजूबाजूने खडकांनी वेढलेला आहे . अगोंद ते पाळोळे याच्या मध्यात हा किनारा असला तरी रस्त्याने येथे येणे सोईचे नाही . वाहन थेट किनाऱ्यापर्यंत पोहचू शकत नाही . पायी साधारण दोन किमीचा ट्रेक करावा लागतो आणि वेळही बराच जातो . अर्थात वेळ असल्यास जंगल वाटेने ट्रेक करून येथे येणेसुद्धा बऱ्याच जणांना आवडू शकते .
आम्ही किनाऱ्यावर दाखल झालो .
बाजूच्या खडकांवर काही लोक दिसत होते . आम्हीही तेथे चढून किनारा पाहण्याचे ठरवले . खूप सुंदर दृश्य होते ,
आता अगोंदा -पाळोळेहून येणाऱ्या अनेक बोटी दिसायला लागल्या .
निळसर / हिरवट स्वछ पाणी
आणि हा सोनेरी किनारा
बऱ्याच व्हिडिओत सांगतात कि येथे खूप फुलपाखरं आहेत म्हणून याला बटरफ्लाय बीच म्हणतात . ते खरे वाटत नाही कारण आम्हाला एकही फुलपाखरू दिसले नाहीत . याला हनिमून बीचही म्हणतात ते समजू शकते . आता येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असली तरी पूर्वी युगलांना येथे चांगलाच एकांत मिळत असणार .
थोडावेळ थांबून परत फिरलो
आमचा नावाडी
परत येताना एका खडकावरून टिपलेला पाळोळे किनारा
रूमवर येऊन ताजेतवाने झालो . नाश्ता केला
दुपारी बाराच्या सुमारास बाहेर पडलो . आज लोलये -पैंगीणचे वेताळ आणि जमल्यास अजून एखाद्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायची होती . बाहेर कमी भावात मिळू शकल्या असत्या तरीही हॉटेलतर्फेच पाचशे रु .दराने दोन स्कूटर मागवल्या .
गाडीत एक लिटर पेट्रोल भरून दिलेले होते . अंदाजाने अजून एक लिटर पेट्रोल लागणार होते . गाडी आणून देणाऱ्याने आमच्याच मोबाईलने गाडीचा सर्व बाजूने व्हिडीओ घ्यायला लावला .
लग्नानंतर आठ-दहा वर्षे दुचाकीवर बरीच भटकंती केली होती पण त्यानंतर गेल्या तीस वर्षात आज भटकंतीसाठी प्रथमच स्कुटरवर बसणार होते . एकंदरीत आजची सफर रोमांचक होणार होती .
येथे लहानसहान दुकानांमध्ये एक लिटरच्या बाटलीत भरलेले पेट्रोल मिळते . (१ १ ० /-रु . लिटर ) दोन्ही स्कुटरला एक एक बाटली पाजली आणि निघालो .
अर्धा पाऊणतास हायवेने प्रवास केल्यावर लोलयेकडे डाव्या बाजूला वळलो. दाट झाडीतून जाणारा आणि जवळजवळ निर्मनुष्य असा सुंदर रस्ता. एकदोन ठिकाणी थोडीशी विचारणा केल्यावर आर्यादुर्गा मंदिर आणि वेताळ मूर्ती शोधायला फारसा वेळ लागला नाही .
आज जी वेताळ मंदिरे पाहणार होतो त्याची प्रेरणा श्री . प्रचेतस यांचा दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात हा लेख वाचून मिळाली होती . लेखात त्यांनी मंदिरांविषयी खूप चांगली माहिती दिली आहे .
आपण मात्र फोटोंमधूनच सद्यस्थिती समजावून घेऊया .
आर्यादुर्गा मंदिराची कमान
मंदिराचे प्रवेशद्वार बंद होते . आजूबाजूस विचारणा करावी तर कोणीही नाही
मंदिरास फेरी मारली . मागील बाजूने एक दरवाजा आहे तो ढकलून पाहिला आणि तो उघडलाही . आम्ही सभामंडपात दाखल झालो .
मंदिराचा
जीर्णोद्धार २ जून २ ० १ ९ रोजी झाला
आर्या दुर्गा देवी मंदिराच्या आसपास पोफळीची दाट जंगल आहे .
कमानी पुढून जाणारी वाट वेताळ मूर्तीकडे जाते . जास्त अंतर नाही .
भव्य वेताळ मूर्ती .
सुपारीच्या वृक्षांचा आधार घेऊन पसरलेली काळीमिरी
येथे साधारण अर्धा तास देऊन आम्ही निघालो पैंगिणकडे. प्रचेतस यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यालगतच आदिपुरुष मंदिर दिसले . त्यालगतच वेताळ मंदिरही . या दोन्ही मंदिरांनी कात टाकली आहे आणि आता अधिकच मोहक दिसतात .
आदीपुरुष मंदिर
मूर्तीच्या ऐवजी त्या जागी असलेला स्तंभ
जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचा फलक
काही पायऱ्या उतरल्यावर आहे ते वेताळ मंदिर
मंदिराची कमान
वेताळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा १ मे २ ० २ ४ ला संपन्न झाली .
वेताळमूर्ती
मुखवटे
लाकडी छत
वेताळदेवाचा नैवद्य व दक्षिणा यादी
एकाच फोटोत आदिपुरुष व वेताळ देव मंदिर
पैंगीणला अजून एक मंदिर पाहीले ते म्हणजे श्री परशुराम मंदिर . गुगलने दाखविलेल्या रस्त्याने थोड्याच वेळात या मंदिरास पोहचलो .
पैंगीण येथे दोन परशुराम मंदिरे आहेत हे नंतर कळले . एक वेलवाडा येथे तर दुसरे महालवाडा येथे . महालवाडा यथील मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून तेथे परशुरामाच्या बरोबरीने नृसिंह हे दैवत आहे . (वेताळ मंदिरही महालवाड्यतच आहे असे वाचले )
आम्ही पोहचलो होतो वेलवड्यात .
येथील मंदिरात परशुरामाच्या बरोबरीने पुरुषोत्तम हे दैवत आहे . मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मूर्ती मुख्य मंदिरातून बाजूस आणून ठेवल्या आहेत . फोटो घेऊ दिला नाही जुने मंदिर आतून पाहता आले .
मागील बाजूस पुष्करणी आहे .
दुपारचे साडेतीन वाजले . आता परत जाता जाता एक-दोन समुद्र किनाऱ्यांना ओझरती भेट द्यायचे ठरले .
गाल्जीबाग समुद्रकिनारा /टर्टल नेस्टिंग बीच ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या जागेसाठी संरक्षित बीच . अतिशय स्वच्छ आणि शांत किनाऱ्यावर कुठेही शॅक्स नाहीत
येथून पुढे पाटणे बीच
किनाऱ्यावर पोहचण्या आधी दोन्ही बाजूस दुकाने असलेला बाजार रस्ता लागला . दुचाकीमुळे बरेच आतपर्यंत जाता आले . संध्याकाळची वेळ होत आल्याने किनाराही बराचसा गजबजलेला दिसला .
येथे थांबण्या ऐवजी आपल्या रिसॉर्टला जाऊन सनसेट पाहू असे ठरवून लगेच निघालो . येऊन काउंटरला स्कुटरच्या चाव्या जमा केल्या . पैसे आगाऊ दिलेलेच होते . रूमवर येऊन लगेच किनाऱ्याकडील दरवाजा उघडून बाहेर येऊन बसलो .
सूर्य अस्ताला जात होता
आज दिवसभराच्या धावपळीत दुपारचे जेवणही झाले नाही. नाही म्हणायला लोलयेच्या मंदिरात दानपेटीत पैसे टाकून तेथीलच एक नारळ उचलला होता व बाजूला ठेवलेल्या कोयत्याने फोडून देवाला प्रसादही अर्पण केला व आम्हीही खाल्ला होता
आजही जेवण कालच्यासारखे किनाऱ्यावरच. आज आम्हा दोघींसाठी 'ब्लू लगून ' आले . (मॉकटेल का कॉकटेल ते नका विचारू) चव आवडली .
सहलीचा तिसरा दिवस संपला . प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा. कोणता दिवस जास्त चांगला ते ठरवणे कठीण होतंय . सहलीतली रंगत वाढत चालली हे मात्र निश्चित .
क्रमश :
पुढील भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो
प्रतिक्रिया
20 Dec 2024 - 6:00 am | गवि
खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच गूढ. उन्हातान्हात उघड्यावर सदैव उभा असलेला तो वेताळ गावाचे रक्षण करतो. रानावनातून काटेकुटे तुडवत फिरतो अशी श्रद्धा आहे. त्याच्या बरगडीत विंचू असतो. प्रचूने त्यावर खूप सविस्तर छान लिहीले आहे आणि त्याच्या लेखामुळेच मीही तो वेताळ खास शोधून तिथे जाऊन बराच वेळ रेंगाळत पाहिला.
बाकी किनारे देखील सुंदर. तुम्ही ज्या पायऱ्या वापरून पाळोळे बीच वरून पलीकडे गेलात तोच माझ्या मते पाटणे बीच.
जाता जाता. अगोंदा याचा उच्चार अगोंद असा आहे असे सांगून पुढील भागाची प्रतीक्षा.
20 Dec 2024 - 9:15 pm | गोरगावलेकर
बदल केला आहे
20 Dec 2024 - 6:08 am | मुक्त विहारि
"प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा. कोणता दिवस जास्त चांगला ते ठरवणे कठीण होतंय..."
गोवा असेच आहे... सदैव चिरतरुण...
20 Dec 2024 - 11:24 am | झकासराव
छान सुरुय लेखमाला
आवडतंय
20 Dec 2024 - 12:11 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्तच. बटरफ्लाय बीच आणि हनीमून बीचला गेलो होतो त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोव्याचा तो भाग खूपच सुंदर आहे. आता पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.
20 Dec 2024 - 12:32 pm | टर्मीनेटर
समुद्रकिनारे, देवळे सगळंच भारी!
जिर्णोद्धारानंतर 'आदीपुरुष मंदिर' फारच सुंदर दिसत आहे 👍
20 Dec 2024 - 12:50 pm | कंजूस
आवडला हाही भाग.
20 Dec 2024 - 4:00 pm | गोरगावलेकर
कृपया धागा भटकंती विभागात आणावा
20 Dec 2024 - 5:25 pm | श्वेता२४
नेहमीप्रमाणेच हा भागही सचित्र, तपशिलवार.... भाग पटपट टाकताय त्यामुळे वाचताना मजा येते आहे.
20 Dec 2024 - 9:31 pm | कर्नलतपस्वी
बरेच काही सांगून जातात
हा ही भाग आवडला
21 Dec 2024 - 4:35 pm | अथांग आकाश
छान झालाय हा भाग! पुभाप्र!!
21 Dec 2024 - 9:37 pm | चौथा कोनाडा
व्वा ... एक नंबर,
फर्मास वर्णन आणि झक्कास प्रचि !
मजा आली भटकंती बघताना !
आता गोव्याला जातना तुमचेच धागे बघुन जातो !
23 Dec 2024 - 3:44 pm | प्रचेतस
हा भागही खूप आवडला, पाळोळे किनारा तर खूप आवडीचा आहे, पण हल्ली खूप गर्दी असते.
तुम्ही आवर्जून लोलये आणि पैंगिणच्या वेताळ मंदिरात जाऊन आले हे बघून खूप छान वाटले. लोलये वेताळ आहे तसाच आहे, पैंगिण मंदिरात मात्र खूपच बदल झाला, वेताळ मूर्ती बदलण्याची काय जरूर पडली कुणास ठाऊक, शिवाय जुना काष्ठमंडप आता गेलेला दिसतो. काष्ठमंडप हे गोवे कोकणातल्या मंदिरांचं खरं वैभव.
23 Dec 2024 - 10:38 pm | चंद्रसूर्यकुमार
गेल्या काही वर्षात गोव्यात येणार्या पर्यटकांचा आकडा कमी झाला आहे आणि तो वाढायची काहीही चिन्हे नाहीत तर तो कमीच होत आहे अशी चिन्हे आहेत. गोव्यासारख्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारीत असल्याने पर्यटकांचा कमी होणारा आकडा राज्यापुढील अडचणी वाढवेल अशी चिन्हे आहेत.
एक तर गोव्यात (खरं तर भारतातच) परदेशापेक्षा हॉटेल कैच्याकै महाग आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे यावर्षी जरा किंमती कमी झालेल्या दिसत आहेत. आज बुक केले तर २७ ते २८ डिसेंबर या एका दिवसासाठी पंचतारांकीत हॉटेल्स दररोज २० ते २५ हजारात मिळत आहेत असे दिसते. पूर्वी तो आकडा ३० हजार+ पण मी बघितला होता. थायलंडमध्ये फुकेत किंवा व्हिएटनाममध्ये हॅनोईमध्ये त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात त्याच दिवसात हॉटेल्स उपलब्ध आहेत. अनेकदा ब्रिटिश पर्यटक एखाद महिना राहायच्या उद्देशाने येतात. रशियन पर्यटक तर ४ महिने राहायच्या उद्देशाने येतात. जर थायलंड, व्हिएटनाम अशा ठिकाणी अर्ध्या किंमतीत हॉटेल्स मिळत असतील तर त्यांचे भरपूर पैसे तिथे गेल्यावर वाचतील.
तसेच गोव्यात नुसते समुद्रकिनारे आहेत. तिकडे त्या नेहमीच्या बोट राईड्स, पॅरॅशूट राईड्स इत्यादी गोष्टीच आहेत. फुकेतमध्ये समुद्रकिनारे तर आहेतच. पण त्याव्यतिरिक्त तिथे करण्यासारखे बरेच काही आहे. तीच गोष्ट व्हिएटनामची. मग परदेशी पर्यटकांच्या दृष्टीने फुकेत किंवा व्हिएटनाम ही अधिक चांगली पर्यटनस्थळे आहेत. इंडोनेशियात बालीमध्येही समुद्रकिनारे आहेतच. त्याव्यतिरिक्त डोंगर आहेत आणि इतरही अनेक अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत.
गोव्यातील टॅक्सीमाफियांविषयी लिहावे तितके थोडे आहे. त्याविषयी सोशल मिडियावर अगदी भरभरून लिहिले गेले आहे. त्यांच्या दबावामुळे गोव्यात उबर-ओलाही येऊ शकलेली नाही. गोवा माईल्स म्हणून स्थानिक अॅप आहे. पण टॅक्सी माफियांच्या स्टॅन्डजवळ ते लोक येऊ शकत नाहीत इतकी त्यांची दहशत आहे. १२ वर्षांपूर्वी एकदा वारकाहून मडगावला जाताना हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांचे दर ऐकून म्हटले की त्यांच्याकडून टॅक्सी नको, थोडे बाहेर गेल्यावर काहीतरी मिळेल. तशी एक रीक्षा एखाद किलोमीटर चालल्यावर मिळाली. परत येताना त्या रीक्षावाल्याने हॉटेलपासून असेच एक किलोमीटर दूर सोडले कारण तो हॉटेलजवळ गेला असता तर बाहेरच्या टॅक्सीवाल्यांनी त्याला मारहाण करायलाही कमी केले नसते ही भिती त्याला होती. हातात सामान नसेल आणि एखाद किलोमीटर चालणे शक्य होत असेल तर ठीक आहे पण नाहीतर अवजड बॅगा घेऊन लांब चालत जाणे तसे कठीणच. मग परत त्याच टॅक्सी माफियांवर अवलंबून राहावे लागते. राज्य सरकार याविषयी काहीही करताना दिसत नाही.
राज्य सरकार दरवर्षी शॅक उभारायला अनामत रक्कम आणि इतर चार्जेस वाढवत आहे. शॅक्स रात्री ११ पर्यंत चालू ठेवता येतील असे कागदोपत्री नियम आहेत. आम्ही जातो तिथे दक्षिण गोव्यात समुद्रकिनार्यावर विशेष नाईट लाईफ नसते तरी रात्री ११ ही शॅक बंद करायची वेळ अगदीच अव्यवहार्य आहे. उत्तर गोव्यात कलंगूट, बागा, कोंदोळी अशा ठिकाणी भरपूर नाईट लाईफ असते तिथे रात्री ११ वाजता शॅक बंद करणे कसे काय चालणार आहे? प्रत्यक्षात तो नियम पाळला गेला तर शॅकवाल्यांचे भरपूर नुकसान होणार. पण मुळात असा नियम सरकारी अधिकार्यांना चिरीमिरी मिळवायची सोय म्हणून केला आहे की काय समजत नाही.
परदेशी पर्यटकांसाठी भारताचा पर्यटक व्हिसाला अर्ज करणे हे पण डोकेदुखीचे आहे. उलट थायलंडसारखा देश पर्यटकांना आकर्षित करायला अनेक देशांच्या नागरीकांना व्हिसा-फ्री प्रवेश देत आहे.
या सगळ्या कारणाने गोव्यातील पर्यटनावर परिणाम होत आहे याविषयी अनेक युट्यूब व्हिडिओ गेल्या काही दिवसात बघायला मिळाले. मी गोव्याशी संबंधित अनेक फेसबुक ग्रुप्सचा सदस्य आहे. त्यात बरेचसे ब्रिटिश लोक आहेत. ते पण या सगळ्याविषयी तक्रार करताना दिसतात. या परिस्थितीत सुधारणा होईल ही अपेक्षा.
(कट्टर गोवाप्रेमी) चंसूकु
24 Dec 2024 - 10:29 am | मुक्त विहारि
स्वतः च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत.
24 Dec 2024 - 11:04 am | गवि
दर वर्षी किमान एकदा तरी गोव्यात जात असल्याने हे सर्व नजरेत स्पष्ट भरते आहेच. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांचे अमर्याद चढत गेलेले अवास्तव दर. साध्या बेसिक हॉटेलात देखील रूम सीझनमध्ये दहा ते वीस हजार. ऑफ सीझनला पण सहा आठ हजार. कोणत्याही बीच शॅक किंवा गोवन रेस्टॉरंटमध्ये कोणताही पदार्थ किमान साडेतीनशे ते कमाल कितीही. कवालासारख्या ठिकाणी केवळ संगीत ऐकण्यासाठी जाणे आणि त्या निमित्ताने ड्रिंक्स, जेवण (मुख्यतः फिंगर फूड) हा पूर्वी साधा आणि रास्त किंमत असलेला कार्यक्रम आता प्रति माणशी तीन ते पाच हजारात जातो, अगदी किमान आणि स्वस्त बाजूचा मेन्यू मागवून देखील. हे एक उदाहरण. अगदी छप्री टाईप शॅक्स पण केवळ समुद्र किनाऱ्यावर आहेत म्हणून कोणतेही ड्रिंक चारशे ते पाचशे आणि अन्न पाचशे ते हजार प्रति प्लेट असेच विकत आहेत.
प्युर व्हेज उडपी हॉटेल्स, नवतारा, नवरत्न वगैरे हीच सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकाला उरली आहेत. तिथे जेवणे म्हणजे केवळ सोय इतकेच.
टॅक्सी लूट ही क्रिमिनल लेव्हलची आहे. पॉइंट टू पॉइंट मोजून जाणे येणे आणि अव्वाच्या सव्वा दर यामुळे स्वत:ची कार नेण्याला पर्याय नाही. किंवा मग फिरणे अति मर्यादित होते. त्यातल्या त्यात सेल्फ ड्राईव्ह हा एक ऑप्शन अजून बरा पडतोय.
एकूण हळुहळू सामान्य पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला तर नवल नाही. परदेशी ओघ आटला आहे आणि भारतीय स्थानिक पर्यटकांकडून तीच डॉलर लेव्हल किंमत वसूल करणे असे स्वप्न असेल तर ते मोडणारच एक दिवस.
या उलट याच काळात मी थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी पर्यटन केले. मनसोक्त स्वतःच्या प्लॅन नुसार बुकिंग आणि ग्रॅब टॅक्सी वापरून हवे तसे फिरता आले. आणि उत्कृष्ट लक्झरी हॉटेल्सचे दर दीड हजार भारतीय रुपये इथपासून सुरू होते आणि अति भारी हॉटेल पण चार पाच हजारात मिळत होते. टॅक्सी इमानदारीत रास्त आणि आधीच ठरलेले भाडे घेऊन गप गुमान सगळीकडे मिळत होती. अतिशय सुखद आणि स्वस्त अनुभव. सीझन मधली गोवा ट्रिप विएतनाम ट्रिप पेक्षा जास्त खर्चिक ठरू लागली आहे. (विमान प्रवास वगळता).
25 Dec 2024 - 10:11 am | कंजूस
भांगरभूय किंवा गोवंश न्यूज पेपर डिजिटल ओनलाइन आहेत
ते वाचले तर गोव्याचं पर्यटन धोरण, अडचणी, पळवाटा , नियम हे सर्व कळतं. अधिकृत हॉटेल लायसनधारक विरुध्द विनापरवाना गुपचूप धंधा करणारे यांचेही काम कसे चालते तेही आले होते. किनाऱ्यावर काय पदार्थ नेता येणार, क्रूझमध्ये काय करता येईल वगैरेसाठी नियम बनवले ते पर्यटकांस नको आहेत. शेजारच्या कर्नाटकातील तरुण पोट्टे बीचवर येऊन काय उद्योग करतात कुठे राहतात यावरही लेख आले आहेत. त्यांच्या त्रासाला ही पर्यटक आणि स्थानिक कंटाळले. ( फोटोग्राफी करत फिरणे वगैरे, बाजूच्या आड रस्त्यांवर वाहनं लावून तिथेच स्वयंपाक करणे वगैरे)
25 Dec 2024 - 10:12 am | कंजूस
दुरुस्ती *गोवन न्यूज पेपर*
24 Dec 2024 - 12:48 pm | कंजूस
Wittyspace channel ( https://youtube.com/@wittyspace?si=Z33t_wlAV0gAaQ5s ) श्वेता राठोड हिने हल्लीच व्हिएटनाम थाइलँडचे विडिओ टाकले आहेत. शाकाहारी असून एकटीच एक महिना व्हिएटनाम येथे राहिली होती. सर्व डिटेल दिले आहेत. रस्ता ओलांडणे आणि शाकाहारी आहार मिळवणे या दोन अडचणी आहेत. बाकी इतरांना सोपंच ठरेल.
24 Dec 2024 - 3:37 pm | गवि
तिने मलेशिया पण कव्हर केले आहे थोडे.
या सोलो आणि बॅकपॅकर लोकांचे व्हिडिओ असतात तर रोचक (पॅसेंजर परमवीर, श्वेता, अनेक नोमॅड आदि नावे लावणारे लोक). पण त्यांची आहार, निवास आणि प्रवास इत्यादि योजना आणि निवडलेले पर्याय हे अनेकदा सोलो जाणाऱ्यालाच योग्य ठरतील असे असतात. खूप जास्त फिरायचे असल्याने स्वस्तात स्वस्त हॉस्टेल, डॉर्मीटरी, कॉमन शेअरिंग, बेड अँड ब्रेकफास्ट असे ऑप्शन्स. उभ्या उभ्या स्ट्रीट फूड)
हे सर्व गमतीशीर असले तरी जवळपास फक्त एका प्रकारचा प्रवास (फिट, सडाफटिंग, बॅचलर, एकटा घुमक्कड) त्यात कव्हर होतो. कुटुंब घेऊन विविध वयाचे लोक किंवा ग्रुप यांच्यासाठी इतर vlog शोधावे लागतील. अशा वेळी फक्त कमी बजेट हे एकमेव ध्येय नसते.
24 Dec 2024 - 6:32 pm | कंजूस
कमीतकमी किती जाता येईल हे कळते.
१) सरदार पुतळा आणि परिसर - किती आणि काय पाहता येईल तरीही आपल्या कामाचे काय हे पाहावे लागते वेगवेगळ्या लोकांकडून
२) अवडंबर माजवलेल्या जागा बऱ्याच किती लायकीच्या आहेत.
३) काही ठिकाणी वयस्कर पर्यटक जाऊ शकत नाहीत तिथे हे तरुण लोक पटापट जाऊन येतात आणि तो भागही समजतो. ( Dr. Bro यांचा दूधसागर ) थोडक्यात यांचेही ब्लॉग काही सांगून जातात.
४) काही जागांचा तरुण लोक मजेशिरपणे आनंद लुटतात तसा वयस्कर लोक घेऊ शकत नाहीत. जागा तीच पण आनंद आणि उत्साह वेगळा असतो. इंदोर सराफा बाजार खाऊ गल्ली ( मैथिली ठाकूर आणि भाऊ, visa2explore, अभिनव साप्रा)
५) आपण काही ठिकाणी योग्य वयात गेलो नाही तर ती वेळ पुन्हा येत नाही. मग आपल्या वयाप्रमाणेच पर्यटन करावे लागते. जगातल्या सर्व जागा काही पाहता येणार नाहीत. तरीही थोडक्यात आनंद हवा असेल तर एकटे किंवा आपल्याच कुटुंबातील तीन चार जणानेच जायला हवे. मित्र परिवार गर्दी नकोच.
24 Dec 2024 - 9:57 pm | चौथा कोनाडा
अगदी रास्त सुचवणी !
24 Dec 2024 - 10:26 pm | गवि
उत्तम प्रतिसाद कंकाका..
24 Dec 2024 - 7:49 pm | रात्रीचे चांदणे
हॉटेलच्या आणि टॅक्सी च्या वाढलेल्या किमती बरोबरच अजून एका गोष्टी मुळे गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होत असेल तो म्हणजे गोव्याच्या लोकांचा मजुरडेपणा. ज्या ज्यावेळेस गोव्याला जाण झालं त्या त्या वेळेस ह्याचा अनुभव आला. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असेल तर योग्यच केल आहे. आर्थिक नुकसान झालं तर कदाचित सुधरतीलही.
24 Dec 2024 - 10:44 pm | मुक्त विहारि
सामान्य नागरिक उत्तम वागतात.
पण, सगळे व्यावसायिक, आला बकरा करा खिमा , ह्याच न्यायाने वागतात.
26 Dec 2024 - 12:03 pm | सुबोध खरे
१९८९ पासून गोव्यात जात आलो आहे त्यापैकी १९९९ ते २००४ पर्यंत गोव्यातच वास्तव्य होते. त्यामुळे गोव्याचा काना कोपरा पाहिला आहे.
गोव्यातील वाहतूकदार यांचे सरकार वर भरपूर वजन आहे. एकतर गोव्याची लोकसांख्या कमी आहे आणि घरटी एकदोन तरी वाहतूक आणि पर्यटन संबंधित व्यवसायाशी निगडित असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी तेथील लोकप्रतिनिधी काहीही करू धजावत नाहीत त्यामुळे सरकार तेथे काहीही करू इच्छित नाही. यास्तव सामान्य माणसाने त्याकडे पाठ फिरवली तर आश्चर्य वाटत नाही. जर पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने बाजाराच्या रेट्यानेच गोष्टी ( सुधारल्या तर) सुधारतील
उलट आपल्या सारख्या माणसांनी तळकोकण (सिंधुदुर्ग जिल्हा) पर्यटन केल्यास तेथील पर्यटनास हातभार लागतोच याशिवाय या भागात इतके जास्त पर्यटक नाही त्याशिवाय स्वस्त दारू सोडली तर गोव्यात जे काही मिळते ते सर्वच्या सर्व सिंधुदुर्गात स्वस्त मिळतेच याशिवाय फसवले गेल्याची भावना येत नाही.
तळकोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात असंख्य सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत.
दोन वर्षांपूर्वी आम्ही चार चुलत भाऊ बायकांसहित मालवण देवगड तारकर्ली असा प्रवास केला. जनशताब्दीच्या व्हिस्टाडोमने प्रवास केला आणि कुडाळ ते कुडाळ अशी १२ सीटर गाडी केली होती. गोव्याच्या २/३ पैशात उत्तम ट्रिप झाली. आणि कुठेही फसवले गेल्याची भावना आली नाही.
26 Dec 2024 - 12:45 pm | चंद्रसूर्यकुमार
कोकणात सुंदर समुद्रकिनारे आहेत हे नक्की. मात्र कोकणात गोव्यासारखा पर्यटन व्यवसाय विकसित झालेला नाही. दरवर्षी लाखांनी पर्यटक येऊ शकतील इतकी हॉटेल्स आणि इतर सोयी कोकणात आहेत का? गोव्यात अगदी होम स्टे किंवा लॉजसारख्या ठिकाणांपासून व्लादिमीर पुतीन उतरले होते त्या लीला पर्यंत हॉटेलांची मोठी रेंज आहे. कोकणात लीलासारखे हॉटेल तर सोडाच तीन तारांकित हॉटेल तरी आहे की नाही शंकाच वाटते. 'येथे राहायची आणि अस्सल मालवणी जेवणाची सोय होईल' अशा पाट्या मालवणात घराघराबाहेर असतात म्हणे. त्यातून लाखांनी पर्यटकांची उतरायची सोय करता येऊ शकेल इतकी स्केल त्यात आहे का?
कोकणात समुद्रकिनार्यावर शॅक आहेत का? समुद्रकिनार्यावर शॅकमध्ये बसून उकडीचे मोदक आणि सोलकढी घ्यावी अशी कितीही इच्छा असली तरी ते शक्य होणार आहे का? त्याविषयीचे महाराष्ट्र सरकारचे नियम कसे आहेत याची कल्पना नाही. कोकणात पर्यटन वाढवायचे असेल आणि गोव्याला प्रतिस्पर्धी म्हणून कोकणला पुढे आणायचे असेल तर तिथे दारूची पण सोय करावी लागेल- शेवटी दारू पिणे हा बर्याच पर्यटकांचा गोव्याला जायचा उद्देश असतो हे नाकारता येणारच नाही. ते कोकणात करता येईल का? स्थानिक लोक त्याला तयार होतील का? तसेच अनेक कोकणात समुद्रकिनार्यांजवळ देवस्थाने आहेत. उदाहरणार्थ हरिहरेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर वगैरे. अशा ठिकाणी दारू चालायचीही नाही. मी दारूडा आहे किंवा दारू प्यायला मला आवडते अशातला भाग नाही पण गोव्याला जाणार्या पर्यटकांसाठी 'पिणे' हे एक मोठे आकर्षण असते हे नाकारता येणार नाहीच. ते जर पूर्ण करता आले नाही तर कोकणात पर्यटनाचा विकास व्हायला मर्यादा येणारच.
गोव्यातील गावांपासून समुद्रकिनारे तसे दूर आहेत. माझ्या अतिशय आवडत्या बाणावलीच्या समुद्रकिनार्यापासून बाणावली गाव दीड-दोन किलोमीटर वर तरी असेल. त्यामुळे समुद्रकिनार्यावर पर्यटक दारू प्यायले किंवा मोठ्यानी गाणी लाऊन नाचले तरी त्याचा उपद्रव गावातील स्थानिक लोकांना होत नाही. कोकणात तसे आहे का?मी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, मालगुंड असे थोडेसेच समुद्रकिनारे बघितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर एकही समुद्रकिनारा बघितलेला नाही त्यामुळे विशेष कल्पना नाही. जर समुद्रकिनारा गावाजवळच असेल तर या गोष्टींचा उपद्रव स्थानिक लोकांना व्हायची शक्यता असते आणि त्यातून मग विरोध व्हायची शक्यताही वाढते.
कोणत्याही समुद्रकिनार्यावर गोर्या स्त्रियांना बिकिनीमध्ये सूर्यस्नान करायला आवडते. तशा बिकिनी परिधान करून गोर्या आलेल्या कोकणातील लोकांना चालणार आहेत का? गोव्यात तर नुसत्या गोर्याच नव्हे तर भारतीय स्त्रिया-मुलीही बर्यापैकी अंगप्रदर्शन करत असतात- भले त्या बिकिनी घालत नसूदेत पण भारतीय स्त्रिया-मुलींनीही लो कट टॉप घालणे ही अजिबात दुर्मिळ गोष्ट नाही. तसे समजा कोकणात झाले तर ते तिथल्या लोकांना चालणार आहे का?
26 Dec 2024 - 1:09 pm | कंजूस
कोकणात पर्यटक हे महाराष्ट्रातील देवदर्शनाला आले तर चालतात.
मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला.
26 Dec 2024 - 1:40 pm | गवि
काहीही नवीन बदलास विरोध हा कोंकणचा आजवरचा स्वभाव विशेष आहे. गोव्यात देखील मूळ मानसिकता तशीच आहे. तसा तर कोणताही नैसर्गिक दृष्ट्या वरदान लाभलेला (privileged) प्रदेश याला अपवाद नसावा. बाहेरून आलेले लोक चार दिवस पर्यटक म्हणून ठीक आहेत.
पण त्यांनी इथे स्थायिक होत उद्योगधंदे सुरू करून शिरकाव करून बसू नये अशी सर्वत्रच स्थानिकांची इच्छा असते. इथली आमची मूळ संस्कृती, राहणी, जीवनपद्धती टिकावी आणि तत्सम इतर मुद्दे यांमुळे मोठे बदल करणे कठीणच असत आले आहे.
26 Dec 2024 - 2:07 pm | टर्मीनेटर
चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व प्रश्नांचे उत्तर 'नाही' असेच आहे/असेल!
ह्या विषयावर सांगोपांग चर्चा होऊ शकेल, पण वेळे अभावी तुर्तास "A picture is worth a thousand words" ह्या म्हणीला अनुसरुन देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर लावलेल्या एका फलकाचा काढलेला फोटो खाली देतो, त्यवरचा मजकुर वाचल्यावर तुम्ही उपस्थीत केलेल्या काही मुद्द्यांना पुष्टी मिळेल!
कोकण, तळकोकण खरोखर खुप सुंदर आहे. माझी त्यावरची लेखमालिका काही कारणाने अपुर्ण राहीली त्यामुळे तिथल्या अनेक प्रेक्षणीय स्थळे, समुद्र किनारे, मंदिरांबद्दल लिहायचे बाकी राहुन गेले आहे! पण हरकत नाही, आता विषय निघालाच आहे तर ह्या धाग्यावर अजुन एका प्रतिसादात काही फोटोज डकवतो...
26 Dec 2024 - 2:38 pm | गवि
26 Dec 2024 - 2:39 pm | चंद्रसूर्यकुमार
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. पण सगळ्याच समुद्रकिनार्याजवळ देवस्थाने आहेत का?समजा असली तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने दारू उपलब्ध झाली नाही तर कोकणात पर्यटनाच्या विकासावर मर्यादा येणारच.
गोर्या सूर्यस्नानासाठी बिकिनी परीधान करून समुद्रावर पहुडतात ही सत्य परिस्थिती आहे तरीही गोरे लोक बहुतांश नियमांचे पालन करतात. अगदी इटली आणि स्पेनमध्येही समुद्रकिनारे सोडून इतर ठिकाणी बिकिनी घालून फिरायला बंदी आहे तर त्याचे ते पालन करतात. तसे नियम आपल्याकडे केले तर गोरे त्याचे पालन करणार नाहीत असे मानायचे काहीही कारण नाही. पण तसे नियम नसतील तर आपल्याला काहीही करायचे स्वातंत्र्य आहे असे त्यांना वाटते. फ्लॉरीडात अगदी विद्यापीठांच्या हिरवळीवर अशा सूर्यस्नान करणार्या गोर्या पडलेल्या अनेकदा दिसतात. व्हॅन्कुअरमध्ये तर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या कॅम्पसपासून अगदी काही अंतरावर- म्हणजे शंभर सव्वाशे पायर्या उतरून एक Wreck beach म्हणून येतो तो तर clothing optional beach आहे. कोणतेही निर्बंध नसतील तर गोरे काहीही करतात पण निर्बंध टाकले तर त्याचे पालन करतात. तसे आपल्याकडे करता येणार नाही असे मानायचे काही कारण नाही.
मात्र पर्यटक आकर्षित होतील असे काहीतरी तिथे ठेवायला हवे हे नक्कीच. एक तर दारू नाहीतर दुसरे काही. प्रत्येक ठिकाणी अमुक चालणार नाही तमुक चालणार नाही असा दृष्टीकोन ठेवल्यास मग पर्यटन वाढणार नाही हा परिणाम होणारच.
26 Dec 2024 - 6:45 pm | टर्मीनेटर
तुमच्या शंका रास्त आहेत. तळकोकणातल्याही अनेक समुद्र्किनाऱ्यांवर देवस्थाने आहेत. त्यामुळे सहाजिकच दारूच्या बाबतीत त्याठीकाणी बंधने येतात, अर्थात ती पाळायची की नाही हे ज्याने त्याने ठरवावे पण निदान मराठी माणसांसाठी तरी तिथली परिस्थिती तुम्हाला वाटते तेवढी निराशाजनक नाही एवढे नक्की!
मी एक काम करतो, माझ्या अपुर्ण राहिलेल्या मालिकेचे दोनेक भाग कॅप्शन सहीत फोटोज आणि काही अगदी छोटे छोटे व्हिडिओज टाकुन 'तळकोकणाचे चित्र दर्शन' अशा स्वरुपात आधी प्रकाशित करतो, ते पटकन होईल, आणि त्यातल्या वर्णनाच्या 'गाळलेल्या जागा' नंतर फुरसतमध्ये भरत बसतो... त्यानिमित्ताने ती मालिका तरी पुर्ण होईल 😎
कंकाकांनी ह्या विषयावरील चर्चेवर आधीच हरकत नोंदवुन झालेली आहेच, इतर धाग्यांचे काश्मिर होते तसे गोरगावलेकर ताईंच्या दक्षिण गोव्यावरील ह्या सुंदर धाग्याचे उगाच 'तळकोकण' नको व्हायला 😀 माझ्या त्या तळकोकणाच्या धाग्यांची पार 'गाझा पट्टी' किंवा 'सिरिया' झाला तरी हरकत नाही 😂
26 Dec 2024 - 7:48 pm | चंद्रसूर्यकुमार
जरूर. वाट बघत आहे.
26 Dec 2024 - 6:57 pm | सुबोध खरे
छे छे,
गोव्याच्या पर्यटनाची सिंधुदुर्गच्या पर्यटनाशी सध्या तरी तुलना करता येणार नाही.
गोव्याची नको ईतकी गर्दी टाळण्यासाठी पण तितकाच सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ही अतिशय उत्तम प्रवासी जागा आहे.
गोव्या तील हॉटेल्स पेक्षा येथील हॉटेल्स आणि इतर सेवा स्वस्त आहेत. त्यामुळे दारू पिणार्यांना सुद्धा अंतिमतः सिंधुदुर्ग स्वस्त पडेल,
गोव्यापेक्षा सुंदर असे तोंडवळी तळाशील किंवा तारकर्ली देवबाग चे नितांत सुदर समुद्र किनारे आहेत.
मी संपूर्ण गोव्याचे समुद्रकिनारे पाहिलेले आहेत. त्यातील सर्वोत्तम समुद्रकिनार्याना नक्की टक्कर देऊ शकतील असे हे किनारे आहेत.
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन गोव्याच्या अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
अर्थात येथे पंचतारांकित सुविधा नगण्य किंवा अभावानेच मिळतील पण स्वस्त आणि मस्त अशा सुविधा नक्की आहेत. आम्ही स्क्युबा डायव्हिंग केले ते केवळ १००० रुपये माणशी होते. आणि आमच्या बरोबर आलेल्या एका प्रवाशाने आद्ल्या दिवशीच गोव्यात त्याच साठी रुपये ५००० मोजले होते आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे देवबागच्या पाणी जास्त स्वच्छ आणि नितळ होते. वॉटर स्पोर्ट्स सुद्धा सिंधुदुर्गात कितीतरी स्वस्त आहे. आणि येथे सुरक्षेची सर्व व्यवस्था चोख होती.
गोव्यासारखी येथली माणसे इंग्रजीत बोलू शकत नसली तरी "येवा, कोकण आपलाच असा" हे त्यांच्या साध्या वागण्यात आम्हाला तरी नक्की जाणवले.
कालच आम्ही आमच्या गावच्या घरी श्री क्षेत्र परशुराम येथे गेलो असता तेथील हॉटेलातील कर्मचारी वर्ग सुद्धा अत्यन्त अदबशीरपणे वागताना दिसला.
परदेशी प्रवाशांना भावणाऱ्या गोष्टी येथे नसतील परंतु आपल्यासारख्या लोकांना ( नवीन वर्षाच्या आसपासचा काळ सोडून गेल्यास) नक्कीच सुखद अनुभव येतील.
गोव्यातील वाहतूकदार आणि त्यांची मक्तेदारी आणि दंडेली हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि याबाबतीत सिंधुदुर्ग गोव्याच्या कितीतरी पटीने पुढे आहे.
मी गोव्यात १९८९ पासून जवळ जवळ दर वर्षी जात आलो आहे. आणि सिंधुदुर्गात सुद्धा पाच सहा फेऱ्या झाल्या आहेत त्यामुळे मी त्याची तुलना नक्की करू शकतो.
26 Dec 2024 - 7:44 pm | चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद.
हो पण कोकणात जर तितक्या प्रमाणावर हॉटेल आणि अशा सोयी उपलब्ध नसतील तर एका मर्यादेपुढे पर्यटन वाढू शकणार नाही हे पण खरेच. समजा बायको आणि मुलीला बरोबर घेऊन जायचे असेल तर राहायला चांगली सोय हवी. मी एकटा कुठेही राहू शकेन पण त्यांना घेऊन गेल्यास उतरायला ठिकाणही चांगले हवे. तसे कोकणात सगळीकडे आहे का हा प्रश्न पडतो.
उत्तर गोव्यात कलंगुटला खरं तर जाऊ नये असे वाटावे इतकी गर्दी मी तिथे १५ मार्चनंतर म्हणजे ऑफ सिझनला पण बघितली आहे. तिथे हॉटेलात उतरलो नव्हतो. आम्ही उतरलो होतो दक्षिण गोव्यात कोलव्याला. त्या हॉटेलचे एक दिवस उत्तर गोवा आणि एक दिवस दक्षिण गोवा असे पॅकेज होते त्यातून कलंगूट बघितले होते. ती गर्दी बघितल्यावरच ठरविले की कलंगुटला अजिबात जायचे नाही. पण आम्ही नेहमी जातो तो दक्षिण गोव्याचा भाग- विशेषत: वारका, बाणावली, कॅवेलोसिम आणि थोडे वर बेतालबातिम, उतोर्डा वगैरे विशेष गर्दीचे नसतात. त्यामुळे तिथे जायला आवडते. राहायला जास्त चांगली हॉटेलही त्या भागात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीला गेलो आहे पण कोणत्याही समुद्रकिनार्याला नाही. आंबोली नक्कीच खूप आवडले. तिकडे जाऊन आता बरीच वर्षे झाली आहेत- जवळपास १५. तेव्हा दररोज ७०० रूपयात एम.टी.डी.सी मध्ये ठिकठाक खोली मिळाली होती. इतक्या स्वस्तात गोव्यात तेव्हाही कोणतीही हॉटेलमधील खोली मिळणे अशक्य होते हे नक्की. तेव्हा कोकणात जायला नक्कीच आवडेल पण राहायला चांगली हॉटेल आहेत की नाही हा प्रश्न नेहमी पडतो.
ती परिस्थिती बदलली तर नक्कीच आवडेल.
26 Dec 2024 - 4:33 pm | कंजूस
चर्चा करून काय होणार?
त्यांना नको आहे तर तिकडे जायचे नाही. गेलोच तर नको असलेल्या गोष्टी करायच्या नाहीत. निसर्ग पाहायचा आणि परत फिरायचे. महाग वाटले तर दुसरीकडे जायचे. पर्यटन वाढवून पैसे मिळवायची त्यांना इच्छा नाही. ओके.
----------------
बाकी ट्रेनने (१२१३३)रात्री जाणे म्हणजे ठाण्याला डोळे मिटायचे. उघडले की मडगाव. त्यामुळे सोपे वाटते. तसं कोकणचं होत नाही.
26 Dec 2024 - 6:17 pm | टर्मीनेटर
काही होईल की काही नाही होणार ते महत्वाचे नाही 😀 पण त्यांना समुद्रकिनारे खूप आवडत असल्याचे त्यांनी अनेकदा लिहिले आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या सागरप्रेमी व्यक्तीने लिहिलेल्या प्रतिसादातील
वरील ओळी वाचल्या आणि स्थानिकांची मानसिकता व 'गोवा' आणि 'तळकोकण' मधल्या पर्यटन आणि खानपान विषयक सेवा- सुविधांची तुलना होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती असल्याने त्यांनी मांडलेले मुद्दे व उपस्थित केलेले प्रश्न रास्त वाटले त्यामुळे थेट
"मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला"
असे जाहीर करण्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती तेवढीही निराशाजनक नाही हे चर्चेद्वारे स्पष्ट करून त्यांच्या मनात जर काही पूर्वग्रह असल्यास ते दूर होऊन त्यांनीही तळकोकणातल्या अफाट निसर्गसौंदर्याचा मनोसोक्त आनंद घ्यावा असे मनापासून वाटले म्हणून... बाकी काही नाही!26 Dec 2024 - 7:06 pm | सुबोध खरे
आपण कोकण कन्या एक्सप्रेस २०१११ ने प्रवास करा २३ .४५ ठाणे ते ०६.४२ कणकवली, ०७. ०० सिंधुदुर्ग, ०७. ११ कुडाळ आणि ०७.३० सावंतवाडी रोड असे तळकोकणात सर्वत्र जाता येईल.
कोकण कन्या एक्सप्रेस च्या वेळेला त्यात्या स्थानकावर एस टी ची लाल परी उभी असेल. आणि आपल्याला टॅक्सी च्या माजोरडेपणाचा अनुभव न येता कोकणातील बहुसंख्य पर्यटन स्थळांना जात येईल. गाडी एक तास पर्यंत उशीर होणार असेल तर एस टी ला तेथे थांबण्याचे हुकूमही आहेत.
26 Dec 2024 - 7:38 pm | गवि
वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा उल्लेख आला आहे. गोव्यात जरी भारतीय मद्य स्वस्त पडत असले तरी ते इतकेही स्वस्त नसते की त्यापायी गोवा गाठावा. स्वस्त दारूपेक्षाही तिथले तुलनेत अधिक मोकळे आणि सर्वत्र दारू पिण्याचे असलेले वातावरण, जागोजागी तशा सोयी, एकूण मद्यपान एन्जॉय करण्याची सदैव सेलिब्रेशन चालू असावे तशी वृत्ती, रंगीबेरंगी कपडे आणि तशीच बहुरंगी संस्कृती यांचे पर्यटकांना जास्त आकर्षण आहे. तो माहोल मद्यपान आणि मत्स्याहार करणाऱ्यांना आकर्षित करतो.
कोंकण हे त्यामानाने निसर्गदृष्ट्या तितकेच सुंदर असले तरी ते हॉलिडे एन्जॉय करण्याचे वातावरण, पब्लिक तिथे नाही.
26 Dec 2024 - 7:53 pm | चंद्रसूर्यकुमार
+१. मी कॉलेजात शेवटच्या वर्षाला असताना आमच्या बरोबरचे बरेच जण गोव्याला दारू प्यायला गेले होते. दारूबरोबरच बिकिनीमधील गोर्या बघणे हा पण एक त्यांचा उद्देश होता. त्या वयात अशा बिकिनीतल्या गोर्यांचे आकर्षण वाटणे यात अस्वाभाविक किंवा अनैसर्गिक काहीच नाही. खरं तर त्या वयात तसे आकर्षण वाटले नाही तरच काहीतरी गफलत आहे असे म्हणेन. ते आकर्षण मलाही होतेच. पण मी दारूवाला नसल्याने त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो :)
26 Dec 2024 - 8:48 pm | मुक्त विहारि
सहमत आहे....
ज्याचा त्याचा पर्यटन दृष्टीकोन...
समुद्र किनारी बसून, शांतपणे बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, "गुहागर" हे माझे आवडते ठिकाण.
आणि
हॉटेल मध्ये बसून, समुद्राचे दर्शन घेता घेता, बियरचा आस्वाद घ्यायचा असेल तर, रत्नागिरीला काळया समुद्रा जवळ, एक हॉटेल आहे. तिथे मासे पण उत्तम मिळतात.
साड्या खरेदी करायच्या असतील तर मात्र गोवा हे उत्तम ठिकाण आहे.
नवरात्री मध्ये, काही देवस्थानात साड्यांचा लिलाव होतो. नशीब उत्तम असेल तर, २५% किमतीत , उत्तम साड्या मिळतात.
(साड्या खरेदी केल्या की, बायको बियर प्यायला आडकाठी नाही...हा अजून एक फायदा....)
26 Dec 2024 - 8:08 pm | गवि
क्लिंटन, कोंकणात रत्नागिरीत किंवा गणपतीपुळ्यात राहून आसपास बऱ्यापैकी ठिकाणे बघता येतात. काही बीचेस काही समुद्रापासून थोडी दूरची असे मिश्रण.
सिंधुदुर्गात वेंगुर्ला मुक्काम करून मोचेमाड बीच, रेडी, तेरेखोल असे गोव्याच्या सीमेपर्यंत फिरून परत मुक्कामी येता येते.
गोव्यात जसा माहोल असतो तसा इथे नसला तरी शांत असते. बाहेर उकाडा असला तरी मनाला गार वाटते. हिवाळ्यात गेल्यास तर फारच उत्तम. दोन्हीची तुलना होऊ शकत नाही.
26 Dec 2024 - 8:57 pm | चंद्रसूर्यकुमार
हो. गणपतीपुळ्याला उतरून गुहागरला आमचे कुलदैवत वाडेश्वर आणि देवी दुर्गादेवी, हेदवी, वेळणेश्वर, डेरवण हे सगळे भाग बघितले आहेत. मालगुंड तर गणपतीपुळ्याशेजारीच आहे. तिकडचे कवी केशवसुत स्मारक आणि प्राचीन कोकण पण बघितले. एक तर बरीचशी देवस्थाने बघणे हा त्या भेटीचा उद्देश होता. मी आस्तिक असलो तरी देवस्थानांना भेटी द्यायची मला आवड नाही. त्यामुळे त्या भेटीत माझ्यासाठी फार आकर्षक असे काही नव्हते. पुढे तळकोकणात आंबोली मात्र खूप आवडले. आणि रत्नागिरीच्या खाली राजापूर, खारेपाटण आणि तो सगळा रस्ता मस्तच आहे.
का कोणास ठाऊक गोव्याविषयी जसे आकर्षण वाटते तसे कोकणाविषयी वाटत नाही. गोव्याला दहावेळा जाऊनही परत परत जावेसे वाटते. I just can't have enough of Goa. तसे कोकणात परत परत जावेसे वाटत नाही.
27 Dec 2024 - 12:44 pm | सौंदाळा
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला तशी गर्दी असते.
पण वेंगुर्ला, सागरेश्वर, मोचेमाड, आरवली, शिरोडा, रेडी इकडे गर्दी कमी आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत.
वेंगुर्ला, शिरोडा, रेडी (यशवंतगडाजवळील किनारा) येथे समुद्राला लागून हॉटेल (थ्री, फाईव्ह स्टार मात्र नाहीत) मद्यपान, मस्त्याहारासाठी चांगले आहेत.
@गवि, टर्मिनेटर: गोव्यात मत्स्याहार कोणत्याही हॉटेलमधे (छोट्या, मोठ्या, तारांकीत) माशांचे कितीतरी प्रकार उपलब्ध असतात. नेहमीचे सुरमई, पापलेट, कोलंबी, सौंदाळा, बांगडा सोडून तांबोशी (रेड स्नायपर), व्हाईट स्नायपर, चोणक (जिताडा), धोडगा, पेडवे, मा़कूळ ( स्क्विड), शेवंड (लॉबस्टर), लेप, मोरी (बेबी शार्क), शेणाणे (मोठे शिंपले) वगैरे. तेवढे कोकणात सर्रास नसतात. क्वचित काही ठीकाणी मिळतात. काही वेळा तर मी आणयला सांगितले होते (होम स्टे मधे) पण बाजारात मिळाले नाही हे उत्तर.
एकदा देवगड मधे एका छोट्या हॉटेल मधे विचारले तेच उत्तर. तेवढ्यात दोन लोकल (कामगार, मजूर) वाटणारे लोक आले, नेहमीचे असावेत. आल्या आल्या त्यांनी मच्छी कढी भात अशी ओर्डर दिली आणि त्यांना अंगठ्या येवढे असणारे मासे आमटी आणि भरपूर भात आणून दिला. मी वेटरला म्हणालो मला हीच मच्छी कढी पाहिजे तर तो म्हणे साहेब हे तुमच्यासाठी नाही तुम्ही खा की मस्त सुरमई, पापलेट. पण मी हट्टाने त्याला तेच आणायला लावले. ती बोट पेडव्यांची कढी आणि भात अजून चव जीभेवर आहे.
27 Dec 2024 - 1:54 pm | टर्मीनेटर
+१०००
मी माझी अर्धवट राहिलेली मालिका पुर्ण करायला घेतली आहे. एक भाग (देवबाग, तारकर्ली, वालावल) ऑलमोस्ट पुर्ण होत आलाय तो करतो थोड्याच वेळात प्रकाशित, आणि पुढचा भाग (तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा) पण टाकतो ३१ डिसेंबर किंवा त्यापुर्वीच!
मालवण, मोचेमाड, आरवली हे आधी बघुन झाले होते त्यामुळे ह्या सहलीत त्यांचा समावेश केला नाहिये...
27 Dec 2024 - 2:09 pm | सौंदाळा
आतुरतेने वाट बघतोय
युवर टाईम स्टार्ट्स नाउ :)
27 Dec 2024 - 3:49 pm | टर्मीनेटर
'प्रकाशित' बटन दबा दिया हैं 😀
27 Dec 2024 - 1:00 pm | गोरगावलेकर
खर्चाच्या बाबतीत सांगायचं तर एकटं दुकटं जाण्यापेक्षा कमीतकमी एका गाडीचे पर्यटक असले तर स्थानिक भटकंतीचा खर्च बराच कमी होतो . रेल्वे प्रवासासाठी अनेक पर्याय आहेत. आपल्या आवडीप्रमाणे किंवा बजेटप्रमाणे त्यातील एखादा पर्याय निवडणे आपल्याच हातात असते . हॉटेलचेही असेच आहे . मोक्याच्या ठिकाणी रूम हवी असल्यास जास्त भाडे द्यावे लागेल हे निश्चितच . आपण कोणत्या वेळी जातो हेही तितकेच महत्वाचे . पाळोळेला आम्ही जी रूम घेतली तीच रूम लेकीने गेल्या वर्षी पण वेगळ्या सिझनला अर्ध्या किमतीत घेतली होती .
प्रत्येकाचे अनुभव वेगळे . प्रतिसादांमधून खूप नवीन माहिती मिळते आहे . चर्चा सुरु राहावी .
27 Dec 2024 - 5:55 pm | Bhakti
खुप सुंदर फोटो आणि माहिती.
30 Dec 2024 - 9:04 am | गोरगावलेकर
लेखाचा अंतिम भाग ४ आला आहे . लेखाच्या शेवटी लिंक देत आहे .