फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली.
नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली. तशीच गोऱ्या माणसाचे ओझे (White man’s burden)सुद्धा सोबत आले. जगभर साम्राज्यविस्तार करताना, जग किती मागास आहे आणि आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्याच्या विचाराने सुरुवातीला युरोप आणि नंतर अमेरिकासुद्धा जगभरात नवीन मूल्यांची पेरणी करण्यात पुढे होते.
या सर्व नवीन मूल्यांच्या आणि नवीन मांडणीच्या परिणामस्वरूप असे झाले की जुन्या काळातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टी बदलत गेल्या. पूर्वीच्या काळी जसे एखाद्या प्रदेशावर आक्रमण होई आणि सलग लोकांची कत्तल होई, ते बदलून जाऊन लोकांना मारण्यापेक्षा त्यांच्यावर राज्य करून आपल्या फायद्यासाठी त्यांच्या शारीरिक आणि क्रयशक्तीचा वापर करून घेण्याची पद्धत वाढली.
पुढे युद्ध करण्याची पद्धत बदलत गेली. केवळ शारीरिक शक्तीवर विसंबून न राहता गुप्तवार्ता संकलनाला (Intelligence Collectionला) फार महत्त्व येत गेले. आधुनिक युद्धतंत्र बदलत गेले. जगाने दोन महायुद्धे पाहिली आहेत. या युद्धात विजयासाठी केवळ सैन्यशक्तीवर विसंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान, शस्त्र, वैद्यकीय मदत आणि गुप्तवार्ता (Intelligence) अशा सगळ्याच बाबींचे महत्त्व अधोरेखित झाले. विशेषत: गुप्तवार्ता संकलन किती महत्त्वाचे आहे, हे जगातील जवळपास सर्वच देशांना पटले. याच गुप्तवार्ता क्षेत्रातील एका विशेष कार्याबद्दल आपण आज सोप्या भाषेत बोलणार आहोत, गुप्तवार्ता क्षेत्रातील एक संकल्पना समजून घेणार आहोत, ती म्हणजे 'फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन' अर्थात दुभंग विस्तार!
जगातील प्रत्येक मानव समूहात काही विषयावर सहमती असते, तसेच काही विषय वादाचे असतात. आपल्या शत्रुराष्ट्रांत, शत्रुप्रदेशात, शत्रूच्या गोटात (लोकांत) अस्तित्वात असलेला विरोधाभास अथवा सुप्त संघर्ष मोठा करत त्यांचे स्वरूप एवढे मोठे करावे की त्या भागात मोठी दुफळी माजावी; सरकार कोसळावे, एका प्रदेशाचे दोन तुकडे व्हावेत, त्याचबरोबर या सर्वांकरिता आपला एकही सैनिक कामास येऊ नये, तर त्याच भागातील लोकांचे दोन किंवा अधिक भागात विभाजन होऊन आपले ईप्सित ध्येय साधले जावे. या प्रकारच्या कार्याला 'फॉल्ट लाइन एक्स्पलॉयटेशन' असे म्हणतात. मराठीत याला 'दुभंग विस्तार' असे म्हणू शकतो.
खरे तर फॉल्ट लाइन ही भूगोल विषयातील संकल्पना आहे. जगात भूभागांच्या अनेक प्लेट्स आहेत आणि त्या एकमेकांवर घासल्या जात असतात. जेथे असे घर्षण होते, तेथे भूकंप होणे किंवा मोठी दरी निर्माण होणे आदी बदल होतात. हेच बदल सामाजिक पातळीवर होतात किंवा घडवून आणले जातात, म्हणून या प्रकाराला हेच नाव वापरले जाते. अर्थात निसर्गात हे नैसर्गिकरीत्या होते आणि येथे हा दुभंग सहेतुक मोठा केला जातो, म्हणून याला 'एक्स्प्लॉइट' असे म्हटले जाते. पुढील काही उदाहरणांवरून आपण हे समजून घेऊ या.
दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड देशाने आपल्या ज्या काही वसाहती सोडाव्या लागतील, तेथे विभाजनाची पार्श्वभूमी तयार केली होती. मध्य आशियात इस्रायल देशाची निर्मितीसुद्धा अशाच प्रकारे केली गेली. इस्रायलची मागणी होती, मात्र ती प्रत्यक्षात यायला बाहेरची मदत अवश्यक होती आणि ती तशी करण्यात आली होती.
भारतात हिंदू-मुस्लीम समाजात असलेला दुरावा एवढा मोठा करण्यात आला की भारताचे विभाजन करण्यात आले. अतिशय शांततेत मुस्लिमांसाठी वेगळा देश ही मागणी १८५७नंतर प्रबळ करण्यात आली. शेवटी पाकिस्ताननिर्मितीत त्याची परिणती झाली.
सन १९७१मध्ये बांगला देशनिर्मिती, ८०च्या दशकात सुरू झालेले पंजाबमधील खलिस्तान आंदोलन, गेल्या काही वर्षांत आफ्रिकेतील आणि आखाती देशातील जॅस्मिन क्रांती म्हणून जगात गाजलेली आंदोलने, यमन देशातील हुती आंदोलन, पाकिस्तानमधील बलुचिस्तान, इराक आणि तुर्कस्थानमधील कुर्दिस्थान चळवळ, अलीकडे - म्हणजे ऑगस्ट २०२४मध्ये झालेला बांगला देशांतील तथाकथित विद्यार्थी आंदोलनाने झालेला सत्तापालट आणि तीस वर्षांनी परत एकदा कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका यांच्या मदतीने उभे झालेले खालिस्तान आंदोलन.
वरील घटना बारकाईने बघता हे लक्षात येते की या सर्व घटना आणि दुभंग पूर्वी अस्तित्वात होते, मात्र अचानक झालेला भडका हा पूर्वनियोजित असतो. त्यासाठी 'आराखडा ते प्रत्यक्ष कृती'पर्यंत सर्व बाबी ह्या ठरवून व विचारपूर्वक केलेल्या असतात. हे सर्व काही जे घडतेय, ते अगदी नैसर्गिक - इंग्लिशमध्ये ज्याला 'ऑरगॅनिक' म्हणतात तसे वाटावे असे दिसले पाहिजे, याची काळजी घेतली जाते. मात्र तरीही काही योगायोग असे असतात, जे टाळता येत नाहीत आणि स्पष्टीकरणसुद्धा देता येत नाही.
हा दुभंग एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने आणि बेमालूमपणे मोठा केला जातो की अनेकदा त्या आंदोलनाच्या नेत्याला / संघटनेलासुद्धा हे ठाऊक नसते की आपण जे करतोय - म्हणजे जे आंदोलन करतोय, त्या आंदोलनाचे मूळ प्रणेते कोण आहेत आणि अंतिम लाभार्थी कोण असेल ? अनेकदा देशांतील सरकार बदलण्यासाठी अशी आंदोलने उभी केली जातात आणि त्यात सहभागी असलेल्या सर्वांना आपली भूमिका नैतिक, रास्त आणि न्याय्य वाटावी अशी मांडणी केली जाते. हे वाचताना जर तुम्हाला कुठले आंदोलन आठवले, तर कॅमेंटमध्ये नक्की सांगा.
जगातील सर्वच महासत्तांनी या अशा फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशनचा - म्हणजे दुभंग विस्ताराचा वापर केलेला दिसून येतो. प्रादेशिक सत्ता संतुलन साधण्यासाठी (भारत-पाकिस्तान, इस्रायल–पॅलेस्टाइन), नैसर्गिक संसाधने ताब्यात ठेवण्यासाठी (पेट्रोल साठे असलेले आखाती, पूर्व युरोपीय आणि दक्षिण अमेरिकी देश), धर्मप्रसाराकरिता, विचारधारा (उत्तर कोरिया–दक्षिण कोरिया) अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात लक्षात येणारी उदाहरणे आहेत.
हा विचार लक्षात ठेवून आणि या प्रकाराची जाणीव मनात ठेवून यापुढे जगभरात आणि देशपातळीवर किंवा राज्यपातळीवर झालेली आणि यापुढे होणारी आंदोलने बघितली आणि त्याचा बारकाईने विचार केला, तर तुम्हाला एखादे आंदोलन एकटे, सुटे आणि स्वबळावर मोठे होते आहे किंवा त्याला कुणाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बळ मिळते आहे, याचा अंदाज घेता येईल. असे करणारे गट कुठले, त्यांच्या विचारधारा घेऊन जगणारे विचारवंत आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारे यांतील फरक हळूहळू स्पष्ट होत जाईल आणि आपल्या समाजात होणाऱ्या घटना अधिक डोळसपणे बघता येतील, अशी अपेक्षा आहे.
शुभेच्छा!
प्रतिक्रिया
16 Sep 2024 - 2:30 pm | नठ्यारा
चतुरानंद,
लेख चांगला आहे. एखाद दोन उदाहरणे दिली असतीत तर बरं पडलं असतं. उदा. : लिबियात गडाफीविरोधी आंदोलन रचून त्याला दूर केलं. पण त्यामुळे लिबियातील समस्या सुटल्या नाहीत. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Factional_violence_in_Libya_(2011%E2%80%932014)
किंबहुना प्रत्येक तथाकथित क्रांतीनंतर नागरी युद्धास सुरुवात झाली आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
ता.क. : इस्रायलची निर्मिती मध्यपूर्वेत झाली आहे. ते मध्य आशिया चुकून पडलेलं दिसतंय.
16 Sep 2024 - 3:01 pm | कर्नलतपस्वी
ब्रिटिश लोकांनी पाडलेली फुट त्यांना राज्य करण्यास मदतगार झाली. आज देशात जी वेगवेगळी अंदोलने चालू आहेत त्यामागे असाच काहीसा विचार असू शकतो का ?
16 Sep 2024 - 7:37 pm | विजुभाऊ
इस्लामी जगात असा दुभंग केंव्हा होईल?
कट्टरपंथी वहाबी विचारसरणीत असा दुभंग आला तर बरे होईल.
निदान धर्मांध कट्टर नेते जावून नवी मोकळी विचारसरणी असलेले नेते उदयास येतील त्यातून
10 Oct 2024 - 12:41 pm | रामचंद्र
मुस्लिमपूर्व आणि इंग्रजपूर्व भारतीय इतिहासातील याची काही उदाहरणे सांगता येतील का?