हृदयाची गोष्ट...

भम्पक's picture
भम्पक in जनातलं, मनातलं
11 Sep 2024 - 10:59 am

अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका.
आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे. पण जशी ती कल्पना सुचली तशी दिवस रात्र तिने मला अगदी अक्षरशः झपाटून टाकले . म्हणजे असं आहे बघा, तसे काही विशिष्ठ कारणही नव्हते ना त्याच्याशी काही भावना गुंतलेल्या होत्या. उलटपक्षी मी त्या म्हाताऱ्याला जीवच लावायचो.बिचार्याने कधी माझा दुस्वास केला नाही कि माझा अपमानहि केला नाही. त्याच्या संपत्ती बद्दल मला कवडीचेही आकर्षण नव्हते. मला वाटते त्याचा तो डोळा...हो हो डोळाच. त्याचा तो गिधाडा च्या डोळ्याप्रमाणे दिसणारा तो एक घाणेरडा डोळा .. लपलपता पापुद्रा असलेला तोच डोळा ..निळा अन निस्तेज. जेव्हा कधी त्या डोळ्याची दृष्टी माझ्यावर पडे मी एकदम जागच्या जागी थिजून जाई. अक्षरशः मला किळस येत असे . असेच एकदा मग ठरवले कि या म्हाताऱ्याची वासलात लावायची जेणेकरून मला त्या घाणेरड्या डोळ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
आता कुठं सगळं कसं स्वच्छ झालं बघा. तुम्ही मला वेड्यात काढाल पण वेड्यांना कुठशी काही माहित असते ? कश्या हुशारीने अन काळजीपूर्वक अन विशेष म्हणजे अगदी निर्विकार पणे मी जे काही केलं ते तुम्ही बघायलाच हवं. मी नित्यनियमाने कामावर जात होतो. अन खरेच सांगतो या आठवड्यात मी त्या म्हाताऱ्यावर जे अलोट प्रेम केलं ते मी यापूर्वी म्हणजे त्याला ठार मारण्यापूर्वी कधीही केले नव्हतं. नित्यनियमाने प्रत्येक रात्री...म्हणजे मध्यरात्रीच मी हलकेच त्याच्या बेडरूमच्या दाराची कडी उघडून , माझे डोके आत जाईल इतका तो उघडायचो. अगदीच हळुवारपणे..मग हातातला पूर्ण काळा कंदील आत सरकवायचो ..अगदीच काळा . म्हणजे प्रकाशाची एकही रेघ बाहेर येता कामा नये. मग मागून मी झर्रकन आत घुसत असे. तुम्ही असता ना हसलाच असता माझी लबाडी पाहून ...मग अगदी म्हणजे अगदी हळू हळू मी हालचाल करीत , जेणेकरून म्हाताऱ्याची झोपमोड होऊ नये , असा एका ठिकाणी जेथून म्हाताऱ्याची हालचाल मला स्पष्ट दिसेल , उभा राहत असे. हे सर्व करायला माझा तासभर तरी जाई . एखादा बावळट अशी हुशारी दाखवू शकेल ? मग एकदा का मी त्या जागी तयार झालो की , लगेच कंदिलाची वात अगदी काळजीपूर्वक ..हो हो अगदी काळजीपूर्वक कमी करीत असे , इतकी कि फक्त प्रकाशाचा एक किरण त्या म्हाताऱ्याच्या त्या गचाळ डोळ्याचा वेध घेईल. असे माझे आठवडाभर म्हणजे बघा सलग सात रात्री चालू होते .मध्यरात्री यायचे म्हणजे अगदी हळुवार, कंदिलाच्या फिरकीचीही करकर होऊ नये याची काळजी घेत मी तासभर त्या म्हतार्याच्या खोलीत घालवायचो. पण दुर्दैवाने मला तो हिडीस डोळा कायम बंद दिसायचा त्यामुळे माझा हेतू साध्य होत नव्हता. म्हाताऱ्याने नाही तर त्याच्या त्या सैतानी डोळ्याने मला बेजार केलं होत. जसा दिवस उजाडे, मग मी साळसूद होऊन त्या म्हाताऱ्याची प्रेमाने चौकशी करीत असे. रात्री झोप वगैरे व्यवस्थित झाली कि नाही याची अत्यंत मित्रत्वाने विचारणा करीत असे.बिचार्याला झोपेतही वाटलं नसेल कि मी रोज रात्री ..मध्यरात्री त्याच्यावर पाळत ठेऊन आहे.
आठव्या रात्री नेहेमीपेक्षा अधिक सावधगिरीने , म्हणजे बघा एकवेळ घड्याळाचा मिनिट काटा जॊरात चालेल ,त्यापेक्षा हळुवार पणे मी दरवाजा उघडत होतो.ह्या रात्री ,कुणास ठाऊक मी एवढा रोमांचित कधीही झालेला नव्हतो बहुदा मला माझ्या सुप्त शक्तीचा साक्षात्कार झाला असावा त्यामुळे स्वतःला मी काबूत ठेवायचा अथक प्रयत्न करीत होतो.हळू हळू दार लोटत असतांना , माझ्याबद्दल अन माझ्या त्याच्याबद्दल असलेल्या विचारांची त्या बिचार्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल ,या विचाराने मला थोडे हसू आले. बापरे...त्याचवेळी कूस बदलतांना म्हातारा अचानक थोडा बिचकल्याचा भास
झाला.आता तुम्ही विचार कराल कि मागे फिरलो असेल .नाही ...मुळीच नाही . त्याची ती भयाण अंधारी अन गडद काळी खोली अन त्यात चोर चिलटांच्या भयाने ते अत्यंत काळजीपूर्वक बंद केलेले दरवाजे ,त्यामुळे त्याला जराही शंका आलेली नसणार. त्यामुळे मी अत्यंत काळजीपूर्वक दार लोटत होतो.
मी डोके आत घेतले अन कंदिलाची फिरकी फिरवतांना थोडीशी गफलत झाली ...माझ्या हाताचा अंगठा फिरकीवरून जरासा घसरला ,,,म्हातारा दचकून उठला अन किंचाळला ..."कोण आहे ?"
मी स्तब्ध उभा ...काहीही न बोलता ..पूर्ण तासभर तरी मी उभा न हालचाल करता ...एकदम पुतळ्यागत .पण मला म्हातारा परत झोपल्याचे जाणवले नाही..तोही बहुदा तसाच टक्क जागाच अन अनुभवतोय अगदी अगदी माझ्यासारखाच ,अनेक रात्रींपासून...भयाण मृत्यू ची चाहूल ...!!
त्याचवेळी मला एक हलकासा विव्हळण्याचा आवाज आला ,नक्कीच मरणाची चाहूल लागल्यावर जी भीती वाटते ,तिचाच होता. तो वेदना किंवा दुःख यापैकी नव्हताच , मरण भयाने आत्म्याच्या विलाप तो...
हा आवाज मी ओळखतो.चांगलाच ओळखतो ..सगळं जग झोपलेले असतांना कित्येक रात्री ...मध्यरात्री माझ्या स्वतःच्या छातीतून खोलवरून आलेला एक प्रबळ ,भयंकर ...जो नेहेमीच मला हादरवून सोडी . मी म्हटले ना मी ओळखतो त्याला..नक्कीच ओळखतो. मला कळते आहे म्हाताऱ्याला आता काय वाटते आहे , मला किंवा येतेय त्याची ,तरीसुद्धा मला किंचितसे हसूही येतेय..मला माहितेय कि तो जेव्हा पहिल्यांदा कुशीवर वळला अन त्याने आवाज ऐकला तेव्हापासून तो जागा आहे ...भीतीने त्यावर गरुड केलंय. तो स्वतःचीच समजूत घालीत असेल कि बहुदा वाऱ्याचा हा आवाज किंवा एखादा उंदीर नाहीतर किरकिरणारा रातकिडा असू शकेल.पण त्याला कळून चुकलंय...सगळं व्यर्थ आहे ...व्यर्थच..कारण मृत्यू घटिका समीप आलीये हे कळलं आहे त्याला..भले दिसून नका देऊ पण अस्तित्व जाणवते ..नक्कीच जाणवते..मृत्यूची काळी गडद सावलीने सावजावर निष्ठुर पणे आपले जाळे टाकायला चालू केलेय...माझ्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच त्याला झालीये जरी मी दिसलो नसलो तरी.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी कंदिलाची एक छोटीशी अगदी छोटीशी फट खोलली , जरी मला माहितीये कि म्हातारा पुन्हा झोपलेला नाहीये ..तुम्ही कल्पना करू शकत नाही कि मी अत्यंत लपून अन धैर्याने हे काम करतोय...
अन जशी ती फट उघडली ..एक हलकिशी कोळ्याच्या धाग्यासारखी एक फिकट प्रकाशाची रेघ नेमकी त्या किळसवाण्या डोळ्यावरचा पडली...
शीट...तो उघडा होता ...हो तो हिडीस डोळा त्यावेळी चांगलाच सताड उघडा होता...माझ्या मस्तकात संतापाची तिडीक उठली..तोच तोच सर्वांपेक्षा वेगळा असा...निळे बुब्बुळ अन वर तेलकट पापुद्रा असलेला घाणेरडा डोळा...माझ्या शरीरात भीतीची थंडगार लहर पसरली. एव्हढे होऊन सुद्धा मी कंदिलाचा प्रकाश त्याच्या डोळ्यावरचा रोखून धरलेला होता, त्याक्षणी मला त्याचा चेहरा किंवा तो स्वतः ..कुणीही दिसत नव्हते.
तुम्हाला मी आधीच बोललो नव्हतो का कि तुम्ही नेहेमीच वेडेपणा आणि संवेदनांची तीव्रता समजण्यात चूक करतात ..कशी ते आता सांगतो.माझ्या कानात एक आवाज ऐकू येतोय ...जरासा क्षीण ..दबका परंतु जलद असा ...जसे एखादे घड्याळ कपड्यात गुंडाळून ठेवले तर जसा आवाज येईल तसा...मी ओळखलाय हा आवाज..त्या म्हाताऱ्याच्या हृदयाची धडधड हि ...पण त्यामुळे माझ्या रागाचा पारा आणखीनच वाढतोय...ज्याप्रमाणे रणवाद्यांचा दणदणाटाने एखाद्या शूर सैनिकाचा युद्धज्वर वाढतो...
तरीही मी एकदम निश्चित अन शांत आहे.माझ्याही छातीचा भात आता वेगाने खालीवर होतो आहे..तरीही मी प्रकाश त्या डोळ्यावर स्थिर ठेवलेला आहे.. माझ्याहि हृदयात भयंकर धडधड वाढलीये..अन ती क्षणोक्षणी अविरत वाढतेच आहे अन तिचा आवाजही प्रचंड वाढला आहे...म्हाताऱ्याचीही भीती आता बहुदा अत्युच्च पदावर पोहोचलीये..कारण पदोपदी ती वाढतेये..तुमच्या निदर्शनात एक गोष्ट आली का ? मी तुम्हाला आधी सांगितलेले कि मी अत्यंत अस्वस्थ आहे , तर मी आहेच .. या वेळेस, रात्रीच्या भीषण शांततेत त्या जुनाट घरात त्या गोंगाटाने मी भयग्रस्त झालोय..काही वेळ मी शांत उभा राहायचा प्रयत्न केला परंतु त्या मोठमोठ्याने धडधडणाऱ्या ठोक्यांनी मला वाटते कि हृदय आता फुटेल..आता नवीनच भीती मला भेडसावायला लागलीये कि हा आवाज शेजाऱ्यांनि ऐकला तर...? म्हाताऱ्याची वेळ आता आली ,मोठ्याने किंचाळत मी प्रथम तो कंदील वाढवला अन म्हाताऱ्याच्या दिशेने झेप घेतली. म्हाताऱ्याने भीतीने एक किंकाळी फोडली ....फक्त एकच..क्षणार्धात त्याला मी फरशीवर ओढले आणि ती अत्यंत जडशीळ गादी त्याच्यावर टाकली. आतापर्यंतच्या माझ्या कृतीने मी चांगलाच उत्साही होतो. म्हाताऱ्याच्या हृदयाची धडधडही आता क्षीण झाली होती म्हणजे जवळपास थांबलीच होती. मी निश्चिंत होतो कि हा आवाज आता काही बाहेर जाणे शक्य नाही. थोड्या वेळात म्हातारा हि मेला. मी गादी बाजूला केली , त्याच्या शरीराचे निरीक्षण केले.हो तो अगदी दगड झालेला होता अगदी थंडगार दगड..मी मग बराच वेळ त्याच्या निश्चल छातीवर हात ठेवून अंदाज घेतला ,धडधड पूर्णपणे थांबलेली होती. म्हातारा मेला होता , आता त्याचा तो घाणेरडा डोळा मला कधीही त्रास देणार नव्हता.
जर अजूनही तुम्ही मला बावळट समजत असाल तर ज्या पद्धतीने अन ज्या कुशलतेने मी त्याच्या शरीराची विल्हेवाट लावली ते तर तुम्हाला सांगितलेच पाहिजे..रात्र भरभर संपत चालली होती त्यामुळे मीही माझी कामे पटपट उरकायला लागलो, पण एकदम शांततेत..सर्वप्रथम मी धडाचे सगळे अवयव वेगळे केले..म्हणजे हात,डोके अन पाय व्यवस्थित कापले.
मग त्या खोलीतल्या फरशीच्या ३ फळ्या काढल्या आणि हे सर्व अवयव धडासहित मी व्यवस्थित दोन तुळ्यांमध्ये ठेवले. त्यानंतर ज्या हुशारीने अन समंजसपणे मी सगळी आवराआवर केली अन सर्व गोष्टी जश्या अन तश्या लावून ठेवल्या कि कोणालाही तसूभरही संशय न यावा...अगदी म्हाताऱ्याला सुद्धा ..ना कसलीही खूण ना रक्ताचे डाग ..कसलाही मागमूस मी मागे ठेवला नाही अगदी कसलाही...याची सर्व जबाबदारी एका टब ने घेतली...हा हा हा
हि सर्व मेहनत घेत असतांना ४ वाजले. तरी अजूनही चांगलाच अंधार होता.जसे घड्याळाचे ठोके पडले नेमके त्याच वेळी कोणीतरी बाहेरचा दरवाजा ठोठावला. मी खाली गेलो , दार उघडले अन स्मित हास्याने आलेल्या तिघांचे स्वागत केले ..मला कसली भीती ? आपण पोलीस अधिकारी असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले..रात्रीच्या वेळेस शेजारी कोणीतरी एक भीषण किंकाळी ऐकल्याने पोलिसात तक्रार केली होती अन त्याच संदर्भात हि मंडळी आलेली होती.
मी स्मित हास्य केले ..मी कशाला घाबरू ? मी त्या पोलिसांचे स्वागत केले अन त्यांना सांगितले कि ती किंकाळी माझीच होती...रात्री मी स्वप्नात घाबरून मारली होती. अन म्हातारा ही बाहेर देशी गेलेला होता. त्यानंतर मी त्या सर्वांना पूर्ण घरात फिरवले..त्या खोलीतही नेले.म्हाताऱ्याची संपत्ती दाखवली जी बिलकुल सुरक्षित होती. त्यांना अजून काही शोधायचे असेल तर मी मदत करतो असे सांगितले. तेव्हा मी आत्मविश्वासाने एवढा भरलेली होतो कि मी त्याच खोलीत खुर्च्या टाकून त्यांना जरा आराम करण्यासाठी बसवले अन खुद्द एका खुर्चीत जिच्या नेमक्या खाली मी म्हाताऱ्याला गाडले होते ,तिच्यात बसलो.
अधिकारी समाधानी दिसत होते.मी अत्यंत प्रभावी पद्धतीने त्यांचे मन जिंकले होते. अत्यंत दिलखूलास पणे अन आनंदाने मी त्यांना उत्तरे देत होतो. त्यांनी मग ढोबळ गप्पा चालू केल्या. पण थोड्याच वेळात मला त्यांनी आता इथून निघून जावे वाटू लागले ,मी स्वतःला अगदी दुबळा वाटू लागलो.माझे डोके आता दुखायला चालू झाले अन कानातही विचित्र आवाज यायला सुरु झाले. पण तरीही ती मंडळी मात्र निवांत गप्पा मारतच होती अन निघायचे नावसुद्धा काढीना. आता कानातले आवाज किंवा कंपन्न म्हणा हवे तर अजूनच वाढायला लागले. हळूहळू हा आवाज इतका वाढला कि यातून सुटका व्हाव्ही म्हणून मी मोठ्याने बोलायला लागलो..पण बापरे आवाज आता टिपेला पोहोचला होता. पण नंतर माझ्या लक्षात आले कि हा आवाज माझ्या कानातला नव्हता...
निःसंशय मी आता पार थकलो होतो.पण माझे बोलणे मात्र एकदम जलद चालले होते परंतु एकदम उच्चरवात..आवाज वाढतोच आहे...आता मी तरी काय करणार? बारीकसा ,थोडा क्षीण परंतु जलद असा आवाज....नेमका तोच कापडात गुंडाळलेल्या घड्याळाच्या टिकटिक चा ..मी श्वास घ्यायला आ वासला., पण अधिकाऱ्यांनी मात्र ऐकले नाही. मी आता अत्यंत मोठ्याने अन अगतिकतेने बोलत होतो पण गोंगाट आता हळूहळू वाढतच चालला होता. मी आता उगीचच क्षुल्लक गोष्टींसाठी मोठ्या आवाजात अन मोठमोठ्याने हातवारे करीत भांडत होतो. आवाज वाढतच चालला होता. हि लोक का जात नाहीये...? मी आता त्यांना संशय येऊ नये म्हणून जोरजोरात ढांगा टाकीत खोलीतच येरझाऱ्या मारायला सुरुवात केली. दाणदाण पाय आपटायला सुरुवात केली .आवाज वाढतच चालला होता. अरे परमेश्वरा...आता मी काय करू? माझ्या तोंडाला फेस यायला लागला, मी उगीचच शिव्या हासडायला लागलो ..तोंड फाटेपर्यंत मी मोठ्याने ओरडायला लागलो.अन बसलेल्या खुर्चीला मोठमोठ्याने मागेपुढे करायला लागलो.त्यामुळे अक्षरशः खालच्या फर्शीला चरे पडायला लागले.आता आजूबाजूचा गोंधळ अधिकच तीव्र व्हायला लागला , अगदी तीव्र ..तरीही हि मूर्ख माणसे निवांतपणे गप्पा मारतायत...अन वरून खिदळतायेत...त्यांना काहीही ऐकू येत नाहीये का ? सर्वशक्तिमान परमेश्वरा ....नाही नाही ते ऐकताहेत ..त्यांना संशय आलेला आहे ..त्यांना सर्व माहिती आहे. माझ्या वाटणाऱ्या भीतीची ते खिल्ली उडवताहेत..जेव्हा हे मी बघितलं ,मी विचार केला कि या यातनांपेक्षा काहीतरी नक्कीच चांगले असणार. या अपमानापेक्षा ,या उपहासापेक्षा नक्कीच काहीतरी सहनीय असणार ..आता मी ते छद्मी हसू नाही सहन करू शकत..मला मी नक्कीच जिवाच्या आकांताने किंचाळणार किंवा मरणार असे वाटू लागले..आणि आता ...पुन्हा ...लक्षपूर्वक ऐका ....अजून मोठा...मोठा ...खूप मोठा ....मोठा ....मोठा ....
"नतद्रष्टांनो" .. मी किंचाळलो ..." आता माझ्याच्याने हे गुपित लपवणे निव्वळ अशक्य आहे ...मी माझ्या केलेल्या कृतीची कबुली देत आहे..त्या फळ्या काढा इथं ..इथंच त्याचे ते धडधडणारे घाणेरडे हृदय आहे....!!!"

" The Tell - Tale Heart " या एडगर अॅलन पो च्या लघु कथेचा स्वैर अनुवाद......

कथा