कायगाव टोका -प्रवरासंगम

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
12 Aug 2024 - 12:19 pm

A
भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः।
सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥

संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली।
तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥

मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।
शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥

मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः।
तालमात्रमथोत्प्लुत्य न्यपतत् स भृशातुरः॥ १६॥

अरण्यकांड सर्ग ४४, वाल्मिकी रामायण

रामाने रागाने पुन्हा बाण उचलला
ते सूर्याच्या किरणांसारखे चमकत होते आणि शत्रूंना चिरडत होते 13. 13.

त्याने ते मजबूत धनुष्याने निश्चित केले आणि जोराने खेचले
मोठ्याने श्वास घेणाऱ्या सापाप्रमाणे त्याने त्या हरणाकडे पाहिले १४॥

त्यांनी ब्रह्मदेवाने बनवलेले ज्वलंत अस्त्र सोडले
सर्वोत्तम बाणांनी हरणाच्या शरीराला छेद दिला 15. 15.

गडगडाटाने मारिचाच्या हृदयालाच छेद दिला.
अत्यंत व्यथित होऊन त्याने ताडाच्या झाडावरून उडी मारली आणि खाली पडला 16.
****
मायावी हरणाने म्हणजे मारीची याने गोदावरीच्या कडे कडेने प्रभूराम यांना झुंजवत या कायगाव टोके या ठिकाणा पर्यंत आणले. त्याचवेळेस प्रभुराम यांच्या लक्षात आले की हा नक्कीच कोणीतरी मायावी आहे. तेव्हा त्यांनी बाण मारून त्याचा वध केला. त्या बाणाचे टोक येथेच जमिनीत रुतले होते. म्हणून गावाचे नाव तीर्थ क्षेत्र टोका, असे पडले. या ठिकाणी गोदावरी नदीला धनुष्याचा आकार असल्याने तिला बाणगंगा असेही म्हणतात.

रामाने कार्य सिद्ध होऊन स्थापन केलेले शिवाचे सिद्धेश्वर मंदिर, मारीच नावाच्या राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते त्याचा देह म्हणजे काया जेथे पडली ते कायगाव, रामेश्वर व मारीच राक्षसाला ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली ते मुक्तेश्वर असे विविध संदर्भ अनेक ग्रंथांत कायगाव टोके या गावाचे आढळतात.

प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या मिळतात. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावुन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते.
आ
प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम नेवासापासून जवळ असलेल्या टोका या गावी झाला आहे. या गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले जाते. हा भाग म्हणजे रामायणातील दण्डकरण्याचा भाग आहे, असे आजही त्याचे महत्व आहे.

या संगमाच्या बाजुलाच भगवान शंकराचे मंदिर आहे. बाजूलाच सिद्धेश्वर, घोटेश्वर, रामेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर, बाण गंगा अशी मंदिरे आहेत.
पेशवेकालीन सन १७०० नंतरची ही मंदिरे हेमांडपंथी आणि नागरशैलीचा वापर करत बांधली आहे.नगरच्या टाकळी ढोकेश्वरच्या पळशीचे मंदिरही जमीनदारी मिळालेल्या पेशवे सरदाराने बांधले होते तसेच कोण्या सरदारांच्या मदतीने (धन) ही मंदिरे बांधली असावीत.
नगर- संभाजी नगर रस्त्याच्या देवगड पुढेच डावीकडे नदीवरचा पुल सुरू होण्यापूर्वी एक रस्ता या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो.पहिल्यांदा घटेश्वर मंदिर यांचे दर्शन होते.मग पुढे गेल्यावर रेखीव शिल्पांच्या सौंदर्याने नटलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.मंदिर प्रवरासंगमाच्या काठावर पूर्वाभिमुख पण प्रवेशद्वार पश्चिमेसही आहे.पूर्वेच्या प्रवेशद्वारवर मोठा सज्जा म्हणजेच नगारखाना? आहे.
हे मंदिर तीन देवतांच्या मंदिरात विभागले आहे.

१.सिद्धेश्वर

मधोमध भव्य मुख्य शंकराचे सिद्धेश्वरचे मंदिर आहे.शिववाहन नंदी मंडपात घुंगरूमाळ चढवलेली आकर्षक नंदीची भव्य मूर्ती आहे.
इ
मंदिर मंडपामध्ये खांबांवर भारवाहक यक्ष आहेतच.गर्भगृहातील शंभूची पिंड अत्यंत सुखदायक आहे.(योगायोगाने आम्हांला पुजाऱ्यांनी आरतीची संधी दिल्याने तिथले वातावरण माझ्यासाठी आणखीच आनंददायी झाले.)तिथेच कुठल्यातरी देवीची २ फूट उंच ही मूर्ती आहे,ती कोणती समजली नाही.

मंदिराच्या बाहेरील बाजूला रेखीव शिल्पांची रेलचेल आहे .आता मिपा उघडून प्रचेतस यांचे लेख वाचत मूर्ती ओळखण्याची माझी परेड सुरु झाली ;).
https://www.misalpav.com/node/23854

यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे.
ई
पुढे ताक घुसळणाऱ्या गोपी, कालिया मर्दन, अर्जुन आणि भीम गर्वहरण, शिवपार्वती नंदी ही छोटी शिल्पे आपल्याच उंचीसमोर कोरलेली आहेत.समोरच्या भिंतीवर विष्णू दशावतार कोरलेले आहेत.हा दशावतार पट निश्चितच आतापर्यंत पाहिलेल्या पटांपैकी खूप सरस आहे.कारण यातल्या प्रत्येक अवताराच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत.राम अवतारात रावणाचे शिल्प अधिक संशोधन करण्यासारखे आहे,त्याने हातात अनेक आयुधे धारण केलीआहेत.तसेच मत्स्य आणि कूर्म अवताराचे आहे.कली अवतार मी पहिल्यांदाच नीट पाहिला.आता दुसऱ्या भिंतीवर विविध वाद्ये टाळ,पखवाज,वीणा वाजवणाऱ्या सुंदरी आहेत.तर एक शिल्पात सुंदरीने धनुष्य धरले आहे?.
उ

ए
क
एक आयताकृती मोठे शिल्प म्हणजे द्रौपदी स्वयंवरपट ,अर्जुन धनुष्य घेत वर असलेल्या माशाचा वेध घेत आहे.जवळच बाकी पांडव,द्रुपद आहे.
ख
२.विष्णू मंदिर
डाव्या बाजूला सुंदर अशा विष्णूवाहन गरूड देवाची २-३ फूट गुडघ्यांवर बसलेली गरूड मुर्ती आहे.पण वरती कृष्ण गोपी शिल्प आणि रासलीलेचे गोलाकार नृत्य शिल्प आकर्षक आहे.
छोटेखानी या मंदिरावर चहू बाजूंनी अष्ट दिक्पाल यांची शिल्पे आहेत.
घ

छ
आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वाहने अनुक्रमे ऐरावत, छाग (मेंढा), महिष, पुरुष, मकर, हरीण, दशाश्वथ (अथवा अश्व अथवा शश) व वृषभ ही होत. आयुधे अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड, नागपाश, ध्वज, गदा आणि त्रिशूल ही होत.
छ

३.देवी मंदिर
उजव्या बाजूला देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सप्तमातृकांची शिल्पे आहेत.आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेया पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री वराह अवतारापासून वाराही तर देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली. आणि काही ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी), देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात.
या मंदिरात नारसिंही मातृदेवताही आहे हे विशेष!
मंदिराच्या एका बाजूला सुंदर महिरपी असलेल्या असंख्य खांबांच्या रांगांची एक पडली आहे.अगदी राजस्थानीशैलीच्या महालांसारखी..
ज

आता मंदिराच्या समोरच तो प्रसन्न दोन जीवनदायिनी प्रवरा -गोदावरी संगमांचा शांत वाहणारा प्रवाह मनाचा ठाव घेत राहतो.
तूनळी संदर्भ
https://youtu.be/K1QToBq9-9E?si=fscewFL25qWzv-H8
-भक्ती

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

काल मिपा दुपारपर्यंत सुरळीत चालु असल्याने,प्रचेतस यांचा लेख वाचून मंदिर नीट पाहता आले,नाहीतर बरेच संदर्भ सुटले असते.

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2024 - 2:57 pm | कर्नलतपस्वी

"प्रचेतस विद्यापीठ ",

सहमत आहे. प्रचेतस यांच्या लेखामधून शिल्प, मंदिरे आणी वास्तूकला यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. असाच अनुभव मला पावागढ आणी कायावरोहण येथील लकुलीश मंदिर बघताना आला.

अतिशय बारकाईने मंदिर आणी परिसराचे निरीक्षण व तसेच सक्षम लिखाण. लेख खुपच आवडला.

औरंगाबाद सासूरवाडी व मोहनीराज कुलदैवत असल्याने या भागात वारंवार चकरा होतात. पुढच्या वेळेस नक्कीच भेट देईन.

मनापासून आभार.

ताजा कलम- मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2024 - 3:05 pm | कर्नलतपस्वी

चित्र-१-मुख्य दरवाजा वरती सुंदर नगारखाना दिसत आहे. असे नगारखाने महाराष्ट्रातच दिसतात असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2024 - 7:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ओळख. छायाचित्रेही सुंदर आली आहेत. लिहिते राहा.

प्रवरेच्या नदीकाठील या मंदिरातली शिल्प अतिशय सुंदर आहेत. पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो. आता अनेक पर्यटक श्रद्धाळु या मंदिरास भेट देतात. श्रावणात तर तुडुंब गर्दी असते.

-दिलीप बिरुटे

पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो.

इथे नौकाविहार पर्यटन विकास व्हायला पाहिजे ‌.पुढे देवगडला गेलो.तिथे नौकाविहार करता येतो.पण मागच्या भेटीचा अनुभव पाहता इतका सेफ वाटला नव्हता.
बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली 😅

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2024 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली

अरे देवा, दोन्ही पुस्तके आणि रोप सांभाळून ठेवा. आपण पुन्हा कट्टा करू डिसेंबरात.

वल्लीने निरोप सकाळचा सायंकाळी दिला. माझी कोणा मिपाकरांशी भेट होऊ नये असे त्यास कायम वाटत असते. अनेक मिपाकरांच्या भेटी त्याच्यामुळे टळल्या आहेत. स्वत:मात्र थेट भेटायला येतो. :(

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Aug 2024 - 9:44 am | प्रचेतस

मीही आहुपेला गेलो होतो भो, रेंज नव्हती. बाकी तुम्ही कधी येताय पुण्यात भेटायला.

आंद्रे वडापाव's picture

13 Aug 2024 - 8:17 am | आंद्रे वडापाव

मस्त लेख व फोटोज....

ह्या किंवा अश्या ' हिडन जेम्स ' प्रकारच्या स्थळांना आपली भेट व्हावी... आणि असे चांगले लेख मिपावर यावे..

कंजूस's picture

13 Aug 2024 - 9:07 am | कंजूस

सुंदर भेट श्रावणात.

मंदिर विष्णू महादेव गद्रे सावकार यांनी उत्तर पेशवाईत बांधले आहे, तसा तारीख असलेला शिलालेख तिथे मंदिरात आहे.

> यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे.

माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.

Bhakti's picture

13 Aug 2024 - 8:43 pm | Bhakti

चांगली माहिती!

प्रचेतस's picture

14 Aug 2024 - 9:42 am | प्रचेतस

माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.

नाही,ते शिल्प म्हणजे ही ह्या मंदिराची प्रतिकृतीच असून हत्तीवर बसलेले पेशवेच आहेत असा तर्क मी ही माझ्या लेखात केला होताच, फक्त ते पेशवे माधवरावच आहेत की नाही हे मी नक्की सांगू शकत नाही. माटेंचे म्हणणे मात्र बरोबरच असावे.

लेख वाचून आमच्या शास्त्री काकांचा फोन आला.कायगाव टोके हे त्यांचे बालपणीचे गाव होतं.त्यांच मूळ आडनाव 'टोकेकर' पण त्यांचे गावात मोठे विद्वान त्यामुळे त्यांना तत्कालीन राणीने?(आता त्यांनाही आठवत नाही) त्यांना 'शास्त्री' उपाधी दिली आणि मेहकर (नीट नाव समजले नाही) गावात जहागिरदारी दिली.सिद्धेश्वराला लांब असल्याने कमी जाणं व्हायचं,तिथली मोठी घंटा ही लहानपणीची ओळख आठवते.नदीच्या थडीपाशी वांगी पिकवली जातं,ज्याची चव या प्रवरेच्या गोड पाण्यामुळे अप्रतिम लागत असे.१९५६ साली नदीला खूप मोठा पूर आला होता.पूर ओसरावा म्हणून पट्टीचा पोहणारा पोहत जात नदीतल्या मारूतीला मीठ व्हावयाचा.बराच काळ काकांची शेती मोठा वाडा इथे होता.पैठणचे जायकवाडी धरण झाल्यानंतर सर्व शेतीवाडी पाण्यात गेली.(पाण्याचा फुगवटा इतका ३० किमी आहे?).नंतर आईच्या निधनानंतर ती १० एकर जमीन विकली ..आता इथलं नातं संपल पण कायगाव टोक्याच्या सगळ्या रम्य आठवणी सर्वात जास्त सुंदर होत्या असं काका म्हणाले 😇

अथांग आकाश's picture

13 Aug 2024 - 10:05 pm | अथांग आकाश

लेख आवडला!

लेख एकदम आवडला. ह्या मंदिरात ३/४ वेळा जाऊन आलोय तरीही तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा हे मंदिर अनुभवता आले. नागर शैलीतले हे मंदिर सुंदरच आहे.
लेखात दिलेल्या रामायणतल्या संस्कृत श्लोकांचा अर्थ मात्र थोडा चुकलाय.

तेव्हा तेथे कुपित झालेल्या राघवांनी भात्यातून सूर्यकिरणांप्रमाणे ज्वलंत असा शत्रूंचा संहार कराणारा बाण आपल्या सुदृढ धनुष्यावर ठेवून आणि त्या धनुष्यास जोराने ताणून त्या मृगाला लक्ष्य बनवून फुस्कारलेल्या सापासमान भासणारा दिप्तीसमान ज्वलंत असा बाण जो ब्रह्माने दिला होता तो सोडला. त्या उत्तम तेजस्वी बाणाने त्या त्या मृगरुपी मारिचाचे शरीर भेदून त्याच्या हृदयासही विदिर्ण केले. त्या बाणाच्या आघाताने तो तालवृक्ष जसा उसळी मारुन पडतो तद्वत तो मारीच उसळी मारुन पडला आणि मृत्यु येताना पाहून तो किंकाळ्या मारु लागला.

Bhakti's picture

14 Aug 2024 - 10:41 am | Bhakti

धन्यवाद
_/\_

गवि's picture

14 Aug 2024 - 10:59 am | गवि

@ वल्ली..

पुराण काळात उपम्याच्या प्लेटच्या प्लेट भरून वाहत असत काय रे काव्यात?

याच्यासमान ते, त्याच्यासमान हे... प्रत्येक वस्तू आणि कृतीचे वर्णन उपमा दिल्याशिवाय लोकांना कळत नसे की काय?

साधा "चहा ओतू का?" विचारताना पण असेच विचारत असतील का?

वर्षा ऋतुतील गढूळलेल्या ओढ्याच्या जलासमान वर्णाचे हे उकळता लाव्हाच जणू असे उष्ण कषाय पेय मी या अर्ध्या फोडलेल्या नरिकेल फळाच्या करवंटीसम आकारच जणू अशा पात्रात ओतून तुम्हाला समर्पित करू का?

Bhakti's picture

14 Aug 2024 - 11:35 am | Bhakti

हा हा
पुलंनंतर गविशेठच असं मार्मिक निरीक्षण करू शकतात 😂

असंका's picture

14 Aug 2024 - 3:38 pm | असंका

गुगल ट्रान्स्लेट चा दोष.त्यांचा नाही. ;)

(कृ.ह.घ्या.)

टर्मीनेटर's picture

14 Aug 2024 - 3:49 pm | टर्मीनेटर

त्याबद्दल मौन पाळायचे हो 😀
वरती कर्नल साहेबांनी लिहिलंय

मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.

तरी एवढं चालायचंच…
बाकी मला लेखातली एकमेव गोष्ट खटकली ती म्हणजे शेवटच्या वाक्यातला ‘तूनळी’ हा गलीच्छ उल्लेख!

असंका's picture

14 Aug 2024 - 4:27 pm | असंका

टोटली ॲग्रीड. माय बॅड. :(

टर्मीनेटर's picture

14 Aug 2024 - 3:24 pm | टर्मीनेटर

एकदम मस्त लेख 👍

असंका's picture

14 Aug 2024 - 3:39 pm | असंका

सुरेख!!
धन्यवाद!!

गोरगावलेकर's picture

14 Aug 2024 - 4:54 pm | गोरगावलेकर

फोटो , माहिती नेहमीप्रमाणेच सुरेख

श्वेता२४'s picture

14 Aug 2024 - 7:42 pm | श्वेता२४

मंदिराचे फोटो विशेष आवडले व त्यात तुम्ही सविस्तर वर्णन करून लिहीले आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजली. लेख अतिशय आवडला.