परबची अजब कहाणी---२

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
18 Jul 2024 - 8:39 pm

परबची अजब कहाणी---२
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
फ्रेनी एक मानसोपचार तज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेस मध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती.
फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता.
“फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची...
“कोण? परब? हो हो मी पेपरमध्ये वाचलं आहे.” फ्रेनी त्यांना मधेच आडवत बोलली,
“फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे.”
“ओके! बोल दिक्रा.”
बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजाऊन सांगितली. त्यांनी शेवट असा केला.
“परब मला जे सांगतोय कि त्याने फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत काम करणाऱ्या गजानन सदावर्तेचा खून केला आहे. ह्या प्रकरणाची मी माझ्या पद्धतीने डिस्क्रीट चौकशी केली. फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेतच असं नाही तर कुठल्याही शाखेत गजानन सदावर्ते नावाचा कोणीही इसम कधीही नोकरीला नव्हता. तर मग परबने मला थाप मारली? तो खरच खरं सांगतोय कि खरच खोटं बोलतोय? फ्रेनी, सारिका खून प्रकरणात त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. कोणीही वकील त्याला फाशीच्या फंद्या तून वाचवू शकणार नाही. म्हणून “परब हा मनोरुग्ण आहे” असा स्टँड मी घेणार आहे. का कुणास ठाऊक पण ह्यावर माझा स्वतःचाच विश्वास नाहीये. तो खरच मनोरुग्ण आहे कि त्याने सोंग काढले आहे? तेव्हा फ्रेनी तू प्लीज त्याच्याशी बोल आणि माझी संभ्रमावस्था दूर कर.”
“लुक्स इंटरेस्टिंग. ओके. डन. मी बोलेन त्याच्याशी. तू आमची मिटिंग अरेंज कर.”

फ्रेनी जोशी आणि परब ह्यांच्या भेटीचा वृत्तांत. फ्रेनीने काढलेल्या नोट्स वरून.
“हलो फ्रेनी, कशा आहात? मी? मी मजेत.” फ्रेनीला थोडं आश्चर्य वाटले.
“परब, तू असं बोलतोय कि जणू आपली ओळख आहे.”
“नाही तसं नाही. पण तुमचा लौकिक मी जाणून आहे,”
“छान. परब, बाबासाहेबांनी मला...”
“ते मला समजलच. त्यांना वाटतंय कि मी वेडा आहे पण त्यांची खात्री नाहीये.”
“एक मिनिट, बेटा. आमच्या डिक्शनरीत “वेडा”असा शब्द नाही. मनोरुग्ण. माझ्या मते आपण सगळे कमी जास्त प्रमाणात मनोरुग्ण आहोत. पण ते जाऊ दे. तू तुझी स्टोरी सांग. तुझ्या म्हणण्या प्रमाणे तू आधीच दोन खून केले आहेस, आणि सारिकाचा खून म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिसरा. बरोबर?”
परबच्या चेहेऱ्यावर विषण्ण हसू होते.
“फ्रेनी, मी किती खून केले असतील? तीन? चार? कदाचित जास्तच पण कमी नाहीत. खून करणे हा माझा छंद झाला होता. मी खून का करत होतो? मी कशाचा तरी शोध घेत होतो. माझ्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा. मी केलेले खून हे त्या तत्त्वज्ञानाची कन्फर्मेटरी टेस्ट होती. मात्र सारिकाच्या केसमधे ती फेल झाली.”
“मला नीट सविस्तर सांग. पहिल्यापासून.”
“ओके, अॅज यू विश. सुरवातीपासून सविस्तर सांगतो.”

परब सांगत होता.
ती संध्याकाळ मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. मी आजू बाजूच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत, गाणी ऐकत मजेत गाडी चालवत होतो. माझ्या समोर मुला मुलींचा एक ग्रूप सायक्लिंग करत हसत खिदळत चालला होता. मधेच माझ्या समोर येऊन रस्ता आडवत होते. माझा जणू मुद्दाम पंगा घेत होते. माझ्या कडे बघून फिदी फिदी हसत होते. तो ग्रूप बहुतेक सहलीला निघाला असावा. मी जोरात हॉर्न देत गाडी पुढे काढण्याच्या प्रयत्नात होतो. शेवटी जेव्हा त्यांनी पास दिला त्यावेळी मी वेग वाढवून पुढे जाणार तेव्हढ्यात एक पोरगी माझ्या समोर आली. आता ही कुठून आली असा विचार करायच्या आधीच माझ्या गाडीने तिच्या सायकलला धडक मारली. हे सगळे क्षणार्धात घडले. एक अस्फुट किंकाळी. कलिंगडावरून गाडी जावी तसा काहीतरी फील मला आला. बापरे, हे काय झाले? मी एका मुलीला चिरडले होते. तत्क्षणी भीतीने माझा ताबा घेतला. पोटात खड्डा पडला. गाडीचा ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून बाजूचा नालीत हेलपांडत गेली. मी कसाबसा गाडीच्या बाहेर पडलो आणि धावत सुटलो, पाठीमागे वळून पहायचे धैर्य नव्हते. ऊर फुटेस्तोवर धावत होतो. शेवटी एकदाचा जवळच्या पोलीस ठाण्यात पोचलो. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कुणी तरी शिपायाने पाण्याचा ग्लास पुढे केला. माझे सगळे बंध सुटले. मला अजून आठवतंय, मी ओक्साबोक्शी रडत होतो.
“गेली. बिचारी पार ठार झाली असणार.”
“शांत व्हा. घाबरू नका. तुम्ही पोलीस ठाण्यात आहात. इथे तुमच्या केसालाही कुणी हात लावू शकणार नाही. काय झालय ते सविस्तर सांगा.” बोलणारा बहुतेक इन्स्पेक्टर होता. थोडा धीर धरून मी सांगितले, “इन्स्पेक्टर, म... म... माझ्या हातून भीषण अपघात झाला आहे. मी एका तेरा चौदा वर्षांच्या मुलीला धडक देऊन उडवले आहे.”
पोलिसांनी ताबडतोप जीप काढली, मला घेऊन ते अपघाताच्या जागी गेले. बाजूच्या नालीत माझी गाडी पडली होती. तेव्हढी एक गोष्ट सोडून अपघाताची एकही खूण तिथे नव्हती. माझी अपेक्षा होती कि तिथे त्या मुलीची चेंदामेंदा झालेली बॉडी असणार आणि बाजूला तिची सायकल. त्या दृश्यासाठी मी माझे मन घट्ट केले होते. पण इथे तसे काहीही नव्हते. हा माझ्या साठी प्रचंड धक्का होता. नेमके काय झाले होते? कुठे गेली होती ती मुलगी? आणि त्या मुलांची गँग?
तो अपघात? ते स्वप्न होते कि आता मी स्वप्न पहात आहे? मी भ्रमिष्ट झालो आहे काय?
इन्स्पेक्टरने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एका हवालदाराची अपघाताच्या जागी ड्युटी लावून त्याने मला जीपमध्ये बसवले.
आम्ही पोलीस चौकीत परत आलो. तेथून पुढे माझी वरात तालुक्याच्या गावी निघाली. सरकारी इस्पितळात माझी सर्वांगीण तपासणी झाली. त्यात “ड्रंक ड्रायविंग” चीही परिक्षा झाली. मी ठणठणीत होतो आणि माझ्या रक्तात अल्कोहोलचा टिपूसही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी वेड्यांच्या इस्पितळातून डॉक्टर आला. त्याने मला खोदून खोदून प्रश्न विचारले. माझ्या आई बाबांविषयी माहिती विचारली. मी ती सांगितली. त्यावर तो म्हणाला, “हम्म, एकूण आनुवंशिक प्रकरण दिसतेय.” नंतर एक विचित्र चित्रं असलेली एक वही त्याने मला दिली. (नंतर मला माहित पडले कि ह्यालाच इंकब्लॉट टेस्ट म्हणतात.)

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Jul 2024 - 8:01 am | कर्नलतपस्वी

एक वेगळेच वळण घेतेय, वाचतोय.

पु. भा. प्र.

भागो's picture

27 Jul 2024 - 5:00 pm | भागो