परबची अजब कहाणी---१

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
18 Jul 2024 - 8:27 am

परबची अजब कहाणी---१
बाबासाहेब सरपोतदार.
बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठमोठ्या खुन्यांना त्यांनी फाशी पासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहित असेलच. ह्याने आपले सर्विस रिवाल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुनाची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुनाला खुबीने असे वळण दिले कि त्या खुन्याला त्यांनी हीरो बनवून टाकले. मग काय त्यावर नाटके लिहिली गेली. हिट सिनेमे झाले. असो.
तर हा परब. अगदी किडा मुंगीलाही धक्का न लावणारा साधा सरळ माणूस. तो का बरे खून करेल. ह्या परबवर एका अनामिक तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे. ही केस बाबासाहेबांकडे आली आहे. आरोपी विरुद्ध सज्जड पुरावा आहे. बाबासाहेबांनी आव्हान म्हणून ही केस स्वीकारली आहे. बाबासाहेबांनी परबची पोलीस लॉकपमधे भेट घेतली. त्याचा हा वृत्तांत.

मी परब. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा मला मांडीवर बसवून त्यांच्या कॉप्युटरवर काम करत असत. कधी कधी तासन तास त्यांचा हात चालत असे तर कधी कधी तासन तास शून्यात नजर लावून नुसतेच बघत बसत. क्वचित कधी टेबलावर मूठ आपटून शिव्या देत.
“काय झालं बाबा?”
“हा कॉप्युटर! हे पहा मिस्टर कॉप्युटर लास्ट ट्राय. आता जर हे कोड कंपाईल नाही झालं तर ना तुला भंगार मध्ये टाकून देईन.”
तशी वेळ नाही आली. बाबांचा तो कॉप्युटर अजून माझ्याकडे पडून आहे. जपून ठेवला आहे. बाबांची आठवण म्हणून. बाबा गेल्यावर मी त्याला कधीच चालू केला नाही. माझी खात्री आहे कि तो आता “डेड” झाला आहे.
बाबांचा कॉप्युटर बाबांशी बोलत असावा. तो माझ्याशी कधी बोलला नाही. मीही त्याच्याशी कधी बोललो नाही.
बाबा गेले तेव्हा त्यांचा मोठा भाऊ आला होता. काकाच्या डोळ्यात आसवाचा एक थेंब पण नाही आला. हे कसे होते? तेव्हा मला समजलं नाही. आता समजतंय. पिकलेली माणसे रडत नाहीत. हसत नाहीत.
They just push through.
काका आपल्या हाताच्या ताळव्यांकडे बघत मला म्हणाला. “भाऊ थोडा क्रॅक होता. थोडा म्हणजे बराच. आमच्या म्हणजे आपल्या घरात तो सगळ्यात हुशार. त्याचे टीचर म्हणायचे हा अलौकिक पुरुष आहे... असेल. पण काय उपयोग त्याचा? घरात माणसाशी सोडून सगळ्यांशी तो बोलायचा. सगळ्यांशी म्हणजे टेबल खुर्ची पंखा फोटो, सगळ्यांशी म्हणजे कुणाशीही.”
काका थोडा थांबला. तो पहिल्यांदाच माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होता.
“आम्ही भाउला सगळीकडे दाखवला. डॉक्टर वैद्य मांत्रिक पण सगळ्यांनी हात टेकले. मुंबईला मोठ्या डॉक्टरकडे दाखवला. ते म्हणाले कि बरा होईल असे खात्रीपुरक सांगता नाही येत. खूप दिवस लागतील.”
“तिथेच त्याची आणि कॉप्युटरची गाठ भेट झाली.”
मला म्हणाला, “दादा, मला एक कॉप्युटर घेऊन दे.”
बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने जांभई दाबून धरली. परबच्या नजरेतून ती निसटणे शक्यच नव्हते.
“सर, तुम्ही कंटाळला आहात. हो ना.”
मुलाखतीच्या सुरवातीला परब गोंधळल्या सारखा दिसत होता. पण आता तो आत्मविश्वासाने बोलत होता.
“हे पहा परब, आपण हा फापटपसारा सोडून मूळ मुद्द्याकडे जाऊ या का? म्हणजे तू त्या इसमाचा खून का केलास? त्याला काही खास कारण होते? तो तुला ब्लॅकमेल करत होता का? सीरिअल किलर्सच्या अश्या काही केसेसची नोंद आहे. काहीही करून तुला फाशीच्या फंद्यातून सोडवणे हे माझे उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी मला आधी सर्वकाही समजलं पाहिजे.”
“सर, फाशीला मी भीत नाही. भीत असतो तर ह्या आधी मी दोन लोकांना “मुक्ति” दिली ती दिली नसती. भले तुम्ही त्याला खून म्हणत असणार.”
“ओह माय गॉड! दोन खून? आणि कुणालाही संशय आला नाही?”
“तीच तर खरी गंमत आहे.”
गंमत? गंमत! ह्याला खून म्हणजे गंमत वाटतेय.
बाबासाहेबांना क्षणभर वाटले कि केस अगदी साधी आहे. कोर्टात सिद्ध करायचे कि परब ठार वेडा आहे, त्याची अस्तित्वावरची पकड सुटली आहे. तो काय करतो आहे याची त्याला जाणीव नाहीये. ह्याला शिक्षेची नाही, मानसोपचारांची गरज आहे.
“परब, अशी जबानी तू कोर्टात देशील?”
“का नाही? पण त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण त्या दोनी बळींचे रेकॉर्डही तुम्हाला मिळणार नाही. माझा पहिला बळी होता गजानन सदावर्ते. तो “फनजॉब” बँकेच्या “खारमहाल” शाखेत मॅनेजर होता. हे जर मी कोर्टात सांगितलं तर? कोर्ट सहज सिद्ध करू शकेल कि फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत गजानन सदावर्ते नावाचा...”
“ओके समजलं. परब माझं डोकं काम करत नाहीये. मला विचार करायला वेळ पाहिजे. आपण उद्या पुन्हा भेटू आणि बोलूया का?”
“काही हरकत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित समजून घ्या कि मी वेडा नाहीये. तुम्हाला मी केलेल्या दुसऱ्या खुनाबद्दल ऐकायचे नाही?”
“उद्या.”
पहिली मुलाखात इथेच संपली. कोडं सुटायच्या ऐवजी अजून गहन होत होतं. बाबासाहेब विचार करत होते. परबने सारिकाचा खून केला होता. पुरावा भक्कम होता. तो आणि सारिका हातात हात गुंफून सारिकेच्या फ्लॅटमध्ये गेले आणि नंतर परबने गोळी झाडून सारिकेचा खून केला. परबच्या म्हणण्या प्रमाणे त्याने आधीच दोन खून केले होते. पण ह्या दोन खुनांचा माग लागू शकणार नव्हता. सरकारी वकील कोर्टात ठणकाऊन सांगेल कि ही बाबासाहेबांची आरोपीला वाचवण्याची फुसकी चाल आहे. कोर्ट मग सरकारी डॉक्टरांकडून परबच्या मानसिक स्थिती बद्दल अहवाल मागवेल. त्यात परब फसला तर. बाबासाहेबांच्या करिअरवर ही केस...
त्यांना हे कदापि सहन होण्यासारखे नव्हते.
इथे फ्रेनीची एन्ट्री होतेय.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

कथा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Jul 2024 - 5:56 pm | चित्रगुप्त

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

कर्नलतपस्वी's picture

18 Jul 2024 - 8:34 pm | कर्नलतपस्वी

पिकलेली माणसे रडत नाहीत. हसत नाहीत.

वाक्य आवडलं आणी पटलं सुद्धा.

भागो's picture

27 Jul 2024 - 5:02 pm | भागो