"प्रेतात्म्यांची जत्रा" पुढे चालू.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 6:13 pm

अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली.
हार्वेने चित्रपट पूर्ण तर केला. हार्वेसाठी हा तसा सोप्पा भाग होता. पण आता वितरकाला पकडायचे होते. अश्या “बी-ग्रेड” सिनेमा वितरणाची जबाबदारी कोण घेणार? अखेर तोही मिळाला. हर्ट्झ-लायन नावाच्या कंपनीने ही जबाबदारी अंगावर घेतली. हा सिनेमा चालेल ह्याची त्याना खात्री नसावी. म्हणून त्यांनी हार्वेला न्यूड सीन्स टाकायची विनंती केली. हार्वेने असे काही करायचे नाकारले.
चित्रपटाचे सर्व हक्क वितरण कंपनीकडे गेले. त्या बदल्यात डायरेक्टर आणि लेखक ह्याना काय मिळाले. आधी त्यांना कवडीही मिळाली नाही. पण सिनेमाच्या नफ्याचा काही हिस्सा त्यांना मिळणार होता असा करार होता. डायरेक्टर हार्वेची हौस पुरी झाली होती. तो समाधानाने आपल्या जुन्या कंपनीत परतला.
तेव्हाच्या ड्राईव-इन थिएटरमध्ये एका तिकिटात दोन चित्रपट दाखवायची पद्धत होती. त्या प्रमाणे “कार्निवाल ऑफ सोल्स” हा चित्रपट “डेविल्स मेसेंजर” नावाच्या चित्रपटाच्या जोडीने दाखवला जाऊ लागला. “कार्निवाल ऑफ सोल्स” चित्रपटाची लांबी थोडी जास्त होती म्हणून हर्ट्झ-लायन वितरकांनी हार्वेशी सल्ला मसलत न करताच सिनेमात वाटेल तशी काटछाट केली. हे समजताच हार्वेने तक्रार केली. पण तो काही करू शकला नाही, कारण चित्रपटाचे सर्व हक्क हर्ट्झ-लायनकडे होते. नंतर त्याने आपल्या हक्काच्या पैशाची मागणी केली. हर्ट्झ-लायन ने त्याला एक चेक पाठवून दिला. पण हर्ट्झ-लायनच्या खात्यात पैसे नसल्याने तो चेक बाउंस झाला.
सुदैवाने १९६४ साली हर्ट्झ-लायनचे दिवाळे वाजले. थोड्या कोर्ट कचेरी नंतर हार्वेला “कार्निवाल ऑफ सोल्स”चे हक्क परत मिळाले. त्यानंतर हा सिनेमा अमेरिकेत टीवी वर दाखवायला सुरवात झाली. अजूनही ह्याला बी-ग्रेडचा शिक्का होता. त्यामुळे रात्री उशिरा दाखवला जात होता. पण ह्या सिनेमाने रसिकांच्या मनाची पकड घेतली. ह्या चित्रपटाची मोहिनी अशी होती की एकदा बघितला कि प्रेक्षक कायमचा फॅन होतो.
जाणकार रसिक असे म्हणतात की जॉर्ज ए रोमेरोचा “नाईट ऑफ द लिविंग डेड”. डेव्हिड लिंचच्या “लॉस्ट हायवे” मधला “मिस्टरी मॅन”, नाईट श्यामलनचा “द सिक्स्थ सेन्स” ह्या सिनेमांवर “कार्निवाल ऑफ सोल्स”ची छाप आहे.
हा सिनेमा प्रेक्षकांना का एव्हढा आवडला असावा?
एक तर सिनेमाचा विषय, सुपरनॅचरल एलेमेंटला सामान्य लोकांमध्ये आणून ठेवणे. अगदी कमी शब्दात भीती अधोरेखित करणे, उत्कृष्ट छायाचित्रण, साधे सरळ संवाद आणि नायिकेच्या भूमिकेत Candace Hilligossचा जबरदस्त अभिनय.
ह्या आधी “ट्वायलाईट झोन” मालिकेत “हिच हायकर” नावाचा एपिसोड झाला होता. गाडी चालवताना एका तरुणीला एक माणूस सारखा दिसत असतो. गाडीचा वेग कितीही कमी जास्त केला तरी तो सारखा नजरेसमोर येत रहातो. खर तर ती तरुणी प्रवासाला निघायच्या आधीच मृत झालेली असते. आणि म्हणूनच डेथ तिचा पाठलाग करत असतो. प्रेक्षकांना जाणीव होते कि काहीतरी विपरीत घडले आहे किंवा घडणार आहे. “कार्निवाल ऑफ सोल्स” मध्ये तो चेहरा सारखा येत रहातो आणि आपल्या मनातही हेच विचार येत रहातात.
मेरीही जीवघेण्या अपघातातून वाचून जिवंत बाहेर आलेली आहे. (खरच वाचली आहे का ती?)
पण मृत्यूला ते मान्य नाही. तो तिला पुन्हा आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मेरीचा एक पाय ह्या जगात आहे तर दुसरा पाय नेदरवर्ल्ड(netherworld) मध्ये आहे? हे या सिनेमात चांगल्या तऱ्हेने साकार केले आहे.
एकदम लहरी उमटतात आणि नायिका दुसऱ्या जगात प्रवेश करते. तिला लोक काय बोलत आहेत हे ऐकू येत नाही. तर ती कुणाला दिसत नाहीये वा तिचे बोलणे इतरांना ऐकू जात नाही. तिचा ह्या जगाशी संपर्क तुटला आहे. ही थरकाप उडवणारी दृश्ये आहेत.
ह्या चित्रपटाच्या यशात पाईप ऑर्गनच्या संगीताचा मोठा हिस्सा आहे. तिच्या कार मधल्या रेडीओ मध्ये कुठल्याही स्टेशन वर ऑर्गनच्या संगीताचे सूर वाजत रहातात. हे संगीत तिला काही सांगायचा प्रयत्न करत आहे. एकदा तर त्या संगीताच्या धुंदीत ती प्रेतयात्रेत वाजवायची धून चर्चमध्ये वाजवते. आणि परिमाण स्वरूप नोकरी गमावते.
ती अपघातात वाचली आहे.पण तिचा आत्मा वाचला आहेका? Actually she has lost her soul. तिला धर्म, पुरुष, सेक्स मध्ये काही रुची उरली नाहीये.
शरीर आहे पण आत्मा नाहीये, त्यामुळे तिला कशातही आत्मीयता वाटत नाही. हे अनेक प्रसंगातून आणि संभाषणातून ध्वनित केले गेले आहे.
जाता अजून एक. बरेच काही लिहीनेबल आहे. फक्त एकच.
एका समीक्षाकाराच्या मते हे मेरीला पडलेले दुःस्वप्न आहे. तिची कार जेव्हा रेलिंग तोडून नदीत पडते त्या एक दोन सेकंदात हा एक तासाचा चित्रपट घडतो.
तिला मरायचे नाही. जगायचे आहे. तिचा हा मृत्यूशी केलेला संघर्ष आहे.
शेवटी ती हरते आणि मृतात्म्यांच्या जगात परत जाते. बरोबरच आहे म्हणा. मृत्यू समोर कोण जिंकला आहे?
चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये आपण बघतो कि ती गाडी नदीतून बाहेर काढली जाते.
त्या तिन्ही मैत्रिणी मृतावस्थेत दिसतात.
(समाप्त)
( ह्या लेखाचा पहिला भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52331)

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

8 Jul 2024 - 6:56 pm | कर्नलतपस्वी

आपलं लेखाची मनाची पकड घेतली. वेळेनुसार, सवडीने चित्र पट बघून पुन्हा प्रतिसादेन.