पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
22 Jun 2024 - 4:21 pm

माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत. सोनेरी मुलामा दिलेली अंतर्गत सजावट ही त्याची खासियत होती).पण मला ही कल्पना  फारशी रुचली नाही. कारण "फ्रॅस्कॅटी " मध्ये मी इतके वेळा गेलो होतो की  तिथली वीट न वीट माझ्या ओळखीची झालेली होती. तिथे निव्वळ गंमत म्हणून खेळताना मी अनेकदा " पाच फ्रॅंक" हरलो आणि जिंकलो होतो, अगदी त्यातली गंमत नाहीशी होईपर्यंत! ( पाच फ्रॅंक हे त्या काळात २५ ग्रॅम वजनाचे शुद्ध चांदीचं नाणं होतं.). आणि खरं म्हणजे अशा लब्धप्रतिष्ठित ,दिखाऊ जुगारखान्यात जायचा मला उबग आला होता.

' माफ कर मित्रा, ' मी म्हणालो,' त्यापेक्षा आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे‌ खरेखुरे ,गरीब लोक जुगार खेळत असतील.जिथे गरीबीमुळे असेल पण चढाओढीने,जरा बदमाशी करत आणि मुख्य म्हणजे फ्रॅस्कॅटी सारखे उगाच दिखाऊ खेळत नसतील! अशा ठिकाणी जाऊ जिथे येणाऱ्या माणसाने फाटका कोट घातला आहे की त्याच्या अंगावर कोटच नाही किंवा कसंही आलं तरी जिथे काही फरक पडत नाही अशा ठिकाणी जाऊ.'

'ठीक, ठीक,' मित्र म्हणाला, ' तर मग पॅले रोयाल पासून फार दूर जायची गरज नाही. तुला हवी तशी, बदमाशांचा अड्डा असलेली जागा ‌इथे जवळच आहे. तुला हवी तशी, हं,म्हणजे मी तसं ऐकलं आहे '

काही मिनिटांतच आम्ही एका इमारतीपाशी आलो. चढून वर गेलो आणि आमच्या हॅट आणि काठ्या बाहेर दारवानापाशी ठेवून  जुगारखान्याच्या मुख्य खोलीत दाखल झालो. तिथे फारशी काही माणसं नव्हती. पण इमारतीत शिरताना जी कोणी माणसं दिसली ती मात्र विभिन्न वर्गातली होती आणि त्या त्या वर्गाची  छाप  त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली दिसत होती. आम्ही खरं तर मवाली ,भामट्या लोकांना शोधायला आलो होतो पण ही माणसं अगदीच फालतू होती.  मवाली लोकांची खरं तर एक गमतीशीर बाजू पण असते.पण इथे मात्र सगळी शोकांतिकाच होती. 

खोलीत भीषण शांतता होती. कृश,खप्पड,लांब केस राखलेला एक तरूण, आपल्या खोल गेलेल्या डोळ्यांनी, उलटलेल्या प्रत्येक पानाकडे,नजर एकवटून पहात होता.पण तोंडातून एकही शब्द काढत नव्हता. दुसरा एक थुलथुलीत, गुबगुबीत चेहऱ्याचा माणूस, त्याच्या जवळच्या छोट्या कागदी गठ्ठ्यावर न चुकता, किती वेळा ' काळे ' जिंकले आणि किती वेळा ' लाल ' जिंकले यांची नोंद करत होता...तो देखील काही बोलत नव्हता. त्याच्या बाजूला एक गलिच्छ, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याचा आणि गिधाडासारखी अधाशी नजर असलेला एक वृद्ध इसम होता. त्याच्या अंगावर रफू केलेला, लांब ओव्हरकोट‌ होता. आपली शेवटची "सू" ( कमी मूल्य असलेलं त्या काळचं फ्रेंच नाणं) देखील तो हरला होता. खेळातून  अर्थातच आता बाद झाल्यामुळे हताशपणे बघत बसला होता. तोही अगदी गप्पच होता. खोलीतील वातावरणामुळे की काय पण " क्रूपीअर " म्हणजे द्यूतचालकाचा आवाजही आश्चर्य कारक रीत्या पडेल आणि घोगरा झाला होता. काहीतरी टवाळी करायला मिळेल ह्या उद्देशाने खरंतर मी इथे आलो होतो पण समोरचं दृष्य बघून माझा अगदीच विरस झाला. माझा मेंदू बधीर होत आहे असं मला वाटू लागलं आणि या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधू लागलो. दुर्दैवाने,मी यावर उपाय म्हणून टेबलापाशी गेलो आणि खेळायलाच लागलो. दुर्दैवात भर म्हणून मी 'गेम' जिंकलो.. विश्वास बसणार नाही अशा रीतीने,अशा वेगाने मी जिंकत  गेलो की तिथे नेहमी खेळणाऱ्या लोकांनी माझ्या भोवती गर्दी केली.  बोली लावताना मी लावत असलेली  रक्कम ते अद्भुत आणि लोभी नजरेने बघत होते .हा अनोळखी इंग्लिश गृहस्थ 'बॅंक' (जुगार खेळायला सुरु करण्यापूर्वी खेळाडूंनी जमा केलेली रक्कम ) लुटणार की काय असं एकमेकांत कुजबुजत होते.
मी खेळत होतो त्या गेमचं नाव होतं..रू-ज ए नो- आ

युरोप मधल्या बहुतेक शहरात मी हा खेळ खेळलो आहे. पण जुगाऱ्यांसाठी ' परिस' असणारा ' संभाव्यतेचा सिध्दांत ' शिकण्याची मी कधी फिकीर केली नाही ‌कि तशी माझी इच्छाही नव्हती. आणि खरं सांगायचं तर  'जुगारी' शब्द ज्या अर्थाने वापरतात त्या अर्थाने मी कधीच जुगारी नव्हतो. खेळण्याच्या आवडीवर चढलेला गंज काढण्यासाठी मी खेळत असे, निव्वळ मनोरंजनाच्या‌ हेतूने. पैसे मिळवणं हा त्या मागचा हेतू कधीच नव्हता.कारण पैशाची निकड म्हणजे काय असतं हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे आपल्या खिशातल्या पैशापेक्षा जास्त कसे मिळवायचे किंवा कमी कसे हरायचे ,याचा मी कधी अभ्यास केला नव्हता. माझ्या सुदैवाने आजवर तशी वेळ आली नव्हती. थोडक्यात काय तर, फुरसतीच्या वेळात मी जसा बॉलरूम किंवा आॉपेरा हाऊस मध्ये जायचो तसाच मी जुगार अड्ड्यावर जायचो.

पण आजची गोष्टच वेगळी होती. आयुष्यात इतक्या उत्कटतेने मी प्रथमच खेळत होतो. माझ्या यशाने मी आधी अचंबित, आनंदित झालो. हळुहळु मला अक्षरशः  नशा चढू लागली. अविश्वसनीय वाटलं तरी हे सत्य होतं की मी काहीतरी साधकबाधक विचार करून खेळलो तो डाव मी हरलो. मी सगळं माझ्या नशिबावर सोडून दिले असतं तर मी सगळी ' बॅंक ' नक्कीच लुटली असती! सुरवातीला ‌माझ्या रूप रंगाकडे बघून तिथे खेळणाऱ्या लोकांनी बिनधास्तपणे पैसे लावले.पण मी ज्या वेगाने ‌रक्कम जिंकत गेलो ते बघून एक एक जण पाय काढता झाला. सगळेच श्वास रोखून माझा खेळ बघू लागले.

मी माझी रक्कम वाढवत होतो आणि तरीही जिंकत होतो. खोलीमधली उत्कंठा शिगेला पोहोचली होती. टेबलावरचं ते सोनं  जेव्हा जेव्हा मी खोऱ्याने ओढत होतो तेव्हा विविध भाषांतले आश्चर्योद्गार आणि  देवाची आठवण काढणारे शब्दच केवळ शांतता भंग करत होते. ...या प्रकाराने खुद्द द्यूतचालकही अस्वस्थ झाला.माझ्या या विजयाने विस्मयचकित होऊन त्याने आपल्या हातातील ' रेक' ( पैसे ओढण्याचं लहान खोरं ) जमिनीवर फेकून दिला. या सगळ्यांमध्ये भानावर असलेला एकमेव मनुष्य होता तो म्हणजे ‌माझा मित्र! तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कानात इंग्लिश मध्ये म्हणाला ,
" दोस्ता,मिळवलं आहेस तेवढयावर समाधान मान आणि आता कृपया इथून निघूया आपण."  मी मान्य करतो की त्याने मला अनेकदा धोक्याचे इशारे दिले, कळकळीने विनवलं. पण मी ऐकत नाही म्हणताना तो नाईलाजाने निघून गेला. त्या रात्री  या सगळ्या प्रकाराची मला  अशी काही नशा चढली होती की मला समजावणं त्याच्या हाताबाहेर गेलं होतं.

तो बाहेर पडला आणि कुणीतरी कर्कश आवाजात ओरडलं," मला परवानगी द्या सर, तुम्ही हरलेली दोन' नेपोलियन" ( A former gold coin of. France, equal to 20 francs and bearing a portrait of Napoleon I or II) मी तुम्हाला परत मिळवून देतो. वा! काय नशिब आहे तुमचं! मी चांगला मुरब्बी खेळाडू आहे पण माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात तुमच्यासारखं जबरदस्त नशिब मी आजवर बघितलं नव्हतं..देवाशपथ सांगतो! Sacre mille bombes! बिनधास्त पुढे जा आणि ' बॅंक ' फोडाच आज!

मी मागे वळून बघितलं तर एक उंच, घरंदाज दिसणारा गृहस्थ माझ्याकडे बघत स्मितहास्य करीत होता. सैनिकी पद्‌धतीचा , पिळीच्या नक्षीची रेशमी कु‌लाकुसर असलेला कोट त्याने परिधान केला होता. बोलताना तो आपली मान डोलावत होता .मी जर भानावर असतो तर त्याला जुन्या काळातला एखादा सैनिकी अधिकारी समजलो असतो!त्याचे आरक्त डोळे विस्फारलेले होते,  मिश्या ओंगळ आणि नाक वाकडं होतं. त्याचे हात अत्यंत घाणेरडे , कुरूप होते - फ्रान्समधला असूनही! आणि त्याचा तो आवाज! तो तर त्या खोलीतील आवाजाची पातळी बघता फारच भेदक होता. पण त्याच्या ह्या  सगळ्या वैशिष्ट्यांचा माझ्यावर यत्किंचीतही परिणाम झाला नाही.  माझ्या त्या  उन्मादित अवस्थेत, विजयाच्या  बेफिकीरीत , मला पाठिंबा देणाऱ्या अगदी कोणाशीही  ,त्या क्षणी ,मैत्री  करायला मी उत्सुक होतो .  या गृहस्थांना आपण 'ओल्ड सोल्जर ' म्हणू .  तर या 'ओल्ड सोल्जरने'  देऊ केलेल्या तपकिरीच्या दोन चिमटी मी स्वीकारल्या. त्याच्या पाठीवर मैत्रीची थाप मारली. 'ग्रॅंड आर्मी' चा तो कसा गौरवशाली, जिवंत दाखला आहे एवढंच नाही तर तो किती  सज्जन गृहस्थ आहे अशी त्याची प्रशंसा देखील  केली. 'आगे बढो !   ओल्ड सोल्जर  ओरडला. आपल्या हाताची बोटं कडकडा मोडत अतिशय आनंदी होत म्हणाला, 'पुढे खेळ दोस्ता आणि जिंकून घे! बॅंक लूटून घे आज, देव तुझ्यावर कृपा करो! भले बहाद्दर! लूटून टाक बँक!

आणि मी खेळतच गेलो . अशा रीतीने खेळत गेलो की पुढच्या पंधरा वीस मिनिटांतच द्युतचालकाने जाहीर केलं ...लोकहो, आजचा खेळ संपला! ...बॅंकेतील एकूण एक नोटा, सोनं-नाण्याचा ढीग माझ्यासमोर होता.त्या दिवशी जुगारखान्याचा सर्वच्या सर्व खजिना  रिता झाला होता आणि माझ्या खिशात जाण्याची जणू आतुरतेने वाट बघत होता.

त्या धनाच्या राशीमध्ये मी हात खुपसला.
'अहो ,तुमचीच आहे ही सारी संपत्ती! खिशात्‌‌ला रुमाल काढा आणि ही सारी मिळकत त्यात बांधा,' ओल्ड सोल्जर  म्हणाला.
' ग्रॅंड आर्मी'त आम्ही आमचं जेवण असंच बांधायचो. तुमची  ही मिळकत इतकी वजनदार आहे की ते पेलणारे खिसे असलेली  विजार अजूनपर्यंत कुणी  शिवली नाहीये.  घ्या! घ्या ! खोऱ्याने ओढून घ्या ते सगळं ! सगळ्या नोटा, नाणी....काय नशिब आहे तुमचं‌! थांबा, थांबा   एक नेपोलियन पडलं बघा खाली ! आहा! हे  नेपोलियन पण ना,  तेवढ्यात व्रात्यपणा करतं आहे! कुठे गेलं बरं? हं, सापडलं! हे घ्या आणि तुमच्या परवानगीने रुमालाला दोन्ही बाजूंनी अशी ही दुहेरी गाठ बांधतो बरं .. आता तुमचे सगळे पैसे अगदी सुरक्षित राहतील. या गाठोड्याला स्पर्श तर करा! आनंद घ्या या मिळकतीचा! फार फार नशिबवान आहात तुम्ही! बघा ना कसा तोफेच्या गोळ्यासारखा घट्ट गोल तयार झाला आहे. वाह !वाह!ऑस्टरलिट्झ च्या युद्धात असे तोफगोळे उडवले असते तर किती मौज झाली असती! पण आता काय! माझ्या सारखा  कालबाह्य  ,हातबॉंब टाकणारा, हा फ्रेंच सैनिक  फक्त इतकंच करू शकतो ..विचारा काय? ..तर.. माझ्या या  इंग्लिश मित्राच्या सन्मानार्थ 'शॅम्पेन' पिऊन हा विजय साजरा करण्यासाठी कळकळीची विनंती करु शकतो! घ्या !एकमेकांचा निरोप घेण्याआधी,फेसाळलेल्या सोनेरी द्रव्याच्या  साक्षीने भाग्यदेवतेच्या नावानं चांगभलं!
'फारच छान ! ग्रेनेडिअर ,धन्यवाद! तुमच्या या आपुलकी साठी  धन्यवाद!  होऊन जाऊ द्या!शॅंम्पेन बाय ऑल मीन्स!या इंग्लिश मित्रातर्फे थ्री चिअर्स! एक तुमच्यासाठी, एक माझ्यासाठी आणि एक भाग्यदेवतेसाठी ! हुर्रे !
शाब्बास इंग्लिश मित्रा! आपल्या नसांतून फ्रेंच रक्त खेळवणाऱ्या माझ्या उत्साही, मित्रा शाबास!

अरेच्चा ! ही बाटली तर रिकामी झाली. काही हरकत नाही.' वाईन ले वीन ! वाईन चिरायु होवो ! ' हा ओल्ड सोल्जर दुसरी बाटली आणि सोबत अर्धा पाऊंड 'बॉनबॉन' देखील मागवत आहे!
नाही, नाही दोस्ता! अरे माझ्या ग्रेनेडिअर मित्रा ,आधीची बाटली तुझ्यातर्फे होती पण आताची मात्र माझ्या तर्फे! होऊन जाऊ दे ,फ्रेंच आर्मीला सलाम !सम्राट नेपोलियनला सलाम! माझ्या या नव्या दोस्ताला सलाम! द्यूतचालकाला सलाम! त्याच्या प्रामाणिक पत्नीला आणि मुलीला... जर असतील तर... सलाम! आणि सर्वच स्त्रियांना सलाम! जगातल्या प्रत्येकाला सलाम! चिअर्स!

शॅम्पेन‌ची दुसरी बाटली संपली आणि मला वाटू लागलं की मी प्रवाही आगच पितो आहे...माझा मेंदू पेटल्यासारखा झाला होता. यापूर्वी मी कितीही प्यायलो असलो तरी असा अनुभव मला कधीच आला नव्हता. मी खूप उत्तेजित झालो होतो म्हणून तर असं झालं नसेल? का माझ्या  पचनसंस्थेत काही बिघाड झाला होता?  का  ही शॅंम्पेन फार जास्त कड़क होती?
अत्यंत उन्मादित् अवस्थेत मी ओरडलो, " फ्रेंच सैन्यातल्या ओल्ड सोल्जर मित्रा, मी पेटलो आहे! तुला कसं वाटतं आहे?  , अरे ऑस्टरलिट्झच्या  शूर वीरा तू पेटवलं आहेस मला! आणि ही आग विझवण्यासाठी होऊन जाऊ दे आणखी एक बाटली!
'ओल्ड सोल्जर'ने  आपली मान नकारार्थी डोलावली.आपले गरगरीत डोळे ,खोबणीतून बाहेर येतील की काय असं वाटेपर्यंत, गरागरा फिरवले.आपलं ते घाणेरडं बोट आपल्या वाकड्या नाकापाशी ठेवत तो  उद्‌गारला, "कॉफी! " आणि दुसऱ्या क्षणी आतल्या खोलीत पळाला.

त्या विक्षिप्त म्हाताऱ्याने उच्चारलेल्या 'कॉफी ' या शब्दाने तिथल्या इतर  उपस्थितांवर काहीतरी जादू केल्यासारखे ते एका क्षणात उठले आणि तिथून बाहेर पडले.‌माझ्यावर चढलेल्या अंमलाचा गैरफायदा घेऊन मला लुटण्यासाठी ते इतका वेळ तिथे थांबले असावेत .पण माझ्या या नव्या मित्राने कॉफी प्यायचा प्रस्ताव ठेवल्यामुळे मी मद्यधुंद होण्याची शक्यता नाही हे लक्षात येताच, माझी मिळकत लुटण्याच्या त्यांच्या आशेवर पाणी पडलं असावं! काही असेल, पण आता तिथे कोणीच उरलं नव्हतं. ओल्ड सोल्जर परत आला आणि टेबलावर माझ्या समोर बसला. त्या खोलीत आता फक्त आम्ही दोघेच होतो. खोलीचा दरवाजा बाहेरच्या छोट्या दिवाणखान्यात उघडत होता. द्यूतचालक तिथे एकटाच बसून जेवत होता. इथली शांतता आता अधिकच गहिरी झाली होती.

ओल्ड सोल्जरचं वागणंही अचानक बदललं होतं. त्याच्या नजरेतून काहीतरी अरिष्ट सूचित होत होतं. त्याच्या आताच्या बोलण्यात कुठेही अलंकारिकता नव्हती.देवाच्या आणाभाका,तो जोश.. काही काही नव्हतं.
' मी काय म्हणतो,सर,' अत्यंत गूढ आणि गोपनीय स्वरात तो बोलू लागला,' या ओल्ड सोल्जरचा सल्ला ऐका. मी या घराच्या मालकिणीला आताच भेटून आलो आहे. फार सुंदर आणि अत्यंत पाकप्रवीण आहे बरं का ती! तर आपल्यासाठी खास अशी कडक कॉफी करण्याची विनंती करुन आलो आहे तिला. घरी जाण्यापूर्वी हा..हा मद्याचा अंमल तुम्ही काढून टाकायला हवा..मित्रा, काढून टाकायला हवा! हे एवढं धन ,अशा रात्री घरी घेऊन जायचं तर तुमचा तुमच्यावर ताबा हवा. आज तुम्ही किती मोठी रक्कम जिंकला आहात हे खूप जणांनी बघितलं आहे. अर्थात ही सगळी माणसं सज्जन, सुसंस्कृत आहेत पण शेवटी ती माणसं आहेत आणि ‌मित्रा माणसाचा काय भरवसा? आणखी काही सांगण्याची गरज आहे का? आता तुम्ही असं करा... तुम्हाला जरा बरं वाटलं की कॅब्रिओलेट ( घडीचे झाकण असलेली एका घोड्याची दुचाकी गाडी) मागवा... गाडीच्या खिडक्या नीट  बंद करून घ्या आणि गाडीवाल्याला म्हणावं गाडी नीट उजेड असलेल्या आणि हमरस्त्यावरूनच घे!‌ म्हणजे मग तुम्ही आणि तुमचे हे पैसे सुखरूप घरी पोहोचतील. माझं ऐका आणि तसं वागा म्हणजे मग उद्या या आपुलकीच्या सल्ल्यासाठी या ओल्ड सोल्जरचे आभार मानाल '

ओल्ड सोल्जरचं भारावलेल्या स्वरातील भाषण संपलं आणि कॉफीने भरलेले दोन कप हजर झाले. माझ्या या मित्राने आदरयुक्त झुकत एक कप माझ्या हातात दिला.माझा घसा सुकला होता त्यामुळे  एका घोटातच मी ती कॉफी संपवली.  पुढच्या काही क्षणातच मला गरगरायला लागलं आणि पहिल्यापेक्षा कैक पटींनी जास्त, कसलातरी अंमल चढू लागला.ती खोली माझ्याभोवती भयंकर रीत्या गोल गोल फिरु लागली. ओल्ड सोल्जर इंजिनाच्या दट्ट्या प्रमाणे खालीवर होताना दिसू लागला. कानात कुठलंतरी कर्कश संगीत वाजल्याचा भास होऊ लागला. काहीतरी विचित्र,असहाय, वेड्यासारखं वाटू लागलं. मी खुर्चीतून उठलो आणि टेबलाचा आधार घेत कसाबसा तोल सांभाळत उभा राहिलो. मला इतकं बरं वाटेनासं झालं की या अवस्थेत आपण घरी  कसं पोचणार हेच मला कळेनासं झालं.

दोस्ता, ओल्ड सोल्जर बोलत होता...त्याचा आवाज पण त्याच्यासारखाच खाली वर होताना वाटत होता.. अरे मित्रा, या अशा अवस्थेत घरी जाणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. अशा अवस्थेत कुणालाही तुझे पैसे लुटणं ही फारच सहज गोष्ट आहे. त्यासाठी तुझा खून पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मी तरी आज इथेच झोपणार आहे.तू पण इथेच झोपतोस का? इथे झोपण्याचीही   व्यवस्था करतात. त्यांना दोन आरामशीर पलंग तयार करायला‌ सांगतो. रात्रभर झोप घे . मद्याचा अंमल सकाळ पर्यंत उतरेल..मग दिवसाढवळ्या तुझी संपत्ती सुरक्षितपणे घरी घेऊन जा!

माझ्या डोक्यात त्यावेळी दोनच गोष्टी होत्या..एक म्हणजे काही झालं तरी रुमालाच्या गाठोड्यावरची आपली पकड सुटू द्यायची नाही आणि दुसरं म्हणजे याक्षणी मी कुठेतरी आडवा पडणं आणि शांतपणे झोपणं अत्यावश्यक आहे. म्हणून मी लगेचच पलंगाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. एक हात आधारासाठी ओल्ड सोल्जरच्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हातात रुमालाचं गाठोडं प्रयत्नपूर्वक घट्ट धरलं. द्यूतचालकाच्या मागे जात आम्ही जिना चढलो‌ आणि जिथे मी झोपणार होतो त्या शयनगृहाशी  दाखल झालो. ओल्ड सोल्जरने माझा हात प्रेमाने दाबला आणि सकाळी नाश्ता करायला भेटू असं म्हणत‌ त्याने रात्रीपुरता  माझा निरोप घेतला आणि द्यूतचालकाबरोबर तो निघून गेला.

मी खोलीत आलो. पाण्याच्या जगमधलं थोडं पाणी प्यायलो. तिथल्या वॉश स्टॅंडमधे ( जुन्या काळातील वॉश बेसिन जिथे भांड्यातून  पाणी घेऊन हात धुवत) हात धुतले. तोंडावर पाण्याचे सपकारे मारले आणि खुर्चीत येऊन बसलो. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता मला जरा बरं वाटत होतं. जुगाराच्या खोलीतल्या कोंदट वातावरणापेक्षा इथल्या थंड हवेत श्वास घेणं सुखकर वाटत होतं. तिथल्या गॅस लाईटच्या ( त्या काळात वापरले जाणारे , गॅसवर जळणारे दिवे. आरोग्य दृष्ट्या ते हानिकारक असत) भगभगीत उजेडामुळे चुरचुरणाऱ्या डोळ्यांना इथल्या मंद प्रकाशात आराम मिळाला होता. शयनगृहाच्या एका कोपऱ्यात मंदपणे जळणाऱ्या मेणबत्तीमुळे खोलीतील वातावरणात कमालीचा थंडावा जाणवत होता. माझं गरगरणं थोडं कमी झालं आणि मी हळूहळू भानावर येत असल्याची जाणीव मला झाली. त्यासरशी माझ्या मनात पहिला विचार आला की जुगार खान्यात रात्री झोपणं हा एक धोका आहेच पण‌ रात्रीच्या या सामसूम वेळी पॅरिसच्या रस्त्यातून,एवढी मोठी ‌रक्कम घेऊन एकट्याने जाणं हे त्याहूनही अधिक धोकादायक आहे .माझ्या आजवरच्या प्रवासात मी याहीपेक्षा वाईट ठिकाणी राहिलो होतो.मग मी मनाशी विचार केला आणि कडी लावली . दरवाज्यासमोर तिथलंच एक अवजड टेबल ठेवून अडसर निर्माण केला आणि सकाळ उजाडेपर्यंत इथे थांबायचा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला.

मग मी माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करु लागलो. मी पलंगाखाली डोकावून पाहिलं,कपाट उघडून बघितलं,खिडकी घट्ट बंद करून घेतली.सगळ नीट आहे याची खात्री झाल्यावर मी माझा कोट वगैरे काढून ठेवला. शेकोटीपाशी असलेला लहानसा दिवा‌ बंद केला आणि पलंगावर आडवा झालो.माझं रुमालाचं गाठोडं अर्थातच माझ्या उशाला घेऊन!

पण थोड्या वेळातच माझ्या लक्षात आलं की मला झोप येत नाहीये एवढंच नाही तर मी डोळे सुद्धा मिटू शकत नाहीये. डोळे सताड उघडे ठेवून मी पडलो होतो. माझ्या शरीरातील नस न नस  थरथरत होती,अंगात ताप भरला होता. माझ्या संवेदना अतिशय तीव्र झाल्या होत्या..मी या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होतो. पलंगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मी झोपलो.पण व्यर्थ! मी पांघरूणाच्या वर झोपलो, खाली झोपलो. पाय पलंगाबाहेर काढून झोपलो.पाय पोटाशी घेऊन जुडगुली करून झोपलो. मी उशी उलटी पालटी केली. पाठीवर झोपलो,पोटावर झोपलो.उठून बसलो. पण हे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. ही रात्र अशीच तळमळत काढावी ‌लागणार या विचाराने मी थोडा वैतागलो.

काय करायचं तरी काय? वाचण्यासाठी माझ्याकडे एखादं पुस्तक देखील नव्हतं. पण मन दुसरीकडे कुठे तरी वळवलं नाही तर मात्र डोक्यात काही बाही भयानक विचार येऊन वेड लागेल असं वाटू लागलं. थोडक्यात काय मनातल्या भितीवर मात करण्यासाठी काही केलं नाही तर रात्र घालवणं कठीण होतं.

मी बसता झालो आणि खोलीचं निरिक्षण करायला सुरुवात केली. खिडकीतून येणाऱ्या सुंदर चंद्रप्रकाशाने खोली भरून गेली होती. मग मी खोलीतील भिंती निरखू लागलो.भिंती बघता बघता मला अचानक ' ल माइस्त्रे 'लेखकाच्या ' व्हॉयेज आटूर द मा चेम्बर' ( अ जर्नी अराउंड माय रूम.. एखाद्याच्या खोलीत फेरफटका मारण्याचा आनंद या विषयावर)या एका सुंदर पुस्तकाची आठवण झाली. या फ्रेंच लेखकाने लिहिलेल्या गोष्टींचं मी अनुकरण करायचं ठरवलं ज्या योगे ही भयंकर रात्र मी नीट घालवू शकेन असं मला वाटलं. मग मी मनातल्या मनात तिथल्या प्रत्येक वस्तूची नोंद करू लागलो. त्यांचं बारकाईने निरीक्षण करू लागलो. ती कुठल्या पद्धतीची आहे अशा प्रकारच्या तपशिलांचा विचार करु लागलो.पण मनाच्या त्या अवस्थेत हे सगळं करणं मला क्लेशदायक वाटू लागलं आणि 'ल माइस्त्रे ' ची पद्धत वापरणं मी बंद केलं. मी नुसताच खोलीभर नजर फिरवत राहिलो.

सगळ्यात आधी पाहिला ,तो मी झोपलो होतो तो पलंग. पॅरिस मध्ये येऊन देखील काय बघितलं तर हा ब्रिटिश पद्धतीचा चार खांबांचा छपरी  पलंग! त्याचं छत चीटाच्या कापडाचं होतं. चारी बाजूंना झालरी लटकत होत्या. दोन खांबांच्या मधे ,हातानं ओढून उघडमीट करायचे जाडसर पडदे होते. आत आलो तेव्हा काही मी हे सगळं बघितलं नव्हतं! मग संगमरवरी लादी बसवलेल्या टेबलावर ' वॉश स्टॅंड' होता. मी घाईघाईत पाण्याचे सपकारे मारले तेव्हा आजुबाजुला सांडलेलं पाणी अजूनही थेंब थेंब ठिबकत होतं. मग होत्या दोन लहान खुर्च्या,ज्यावर माझे कपडे पडले होते. पलीकडे एक 'एल्बो चेअर ' अर्थात गुळगुळीत हातांची खुर्ची होती जी ड्रिल च्या कापडाने ‌मढवली होती.माझा गरम गळपट्टा आणि शर्टची कॉलर त्यावर पडली होती. बाजूला एक खणांचं कपाट होतं . त्याच्या दोन खणांच्या पितळी कड्या निखळून पडल्या होत्या. सजावट म्हणून ठेवलेली ,अत्यंत उठवळ दिसणारी चिनी मातीची एक दौत त्यावर होती.मग नक्षीदार महिरप असलेल्या आरशाचं एक प्रसाधनाचं टेबल होतं. तो आरसा लहान पण बहिर्गोल होता. आणि खिडकी...ती तर खूपच मोठी होती.

मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात भिंतीवर लावलेलं एक चित्र नजरेस पडलं.ते चित्र होतं एका माणसाचं.त्यानी डोक्यावर ‌स्पॅनिश पद्धतीची हॅट घातली होती जिच्या टोकाला पिसांच्या तुऱ्याने सजवलं होतं. कृष्णवर्णी, क्रूर चेहऱ्याचा हा इसम वरच्या दिशेने बघत होता.वर बघताना त्याने  आपला एक हात डोळ्यांवर सावलीसाठी ‌धरावा तसा धरला होता. कदाचित आपल्याला  फाशी देणार असलेल्या ‌ एखाद्या वधस्तंभाकडे पहावं तसे भाव त्याच्या डोळ्यांत होते. तसंही एकूण ‌रुप बघता तो त्याच लायकीचा वाटत होता.बेडच्या वरच्या बाजूला असणारं ते चित्र माझ्या मनावर दडपण आणत होतं. पुन्हा नजर वर करून बघावं असं मला वाटेना पण तरीही मी वर बघितलं. मी त्याच्या टोपीतली पिसं मोजली. जरा बरं वाटलं!  पाच पिसं होती... तीन पांढरी, दोन हिरवी! त्याची ती टोपी ' गुइदो फॉक्स' ( १६०५ च्या गनपावडर प्लॉट मधील स्पॅनिश सैनिक)ने आणलेल्या फॅशन प्रमाणे शंकूच्या आकाराची होती. हा माणूस वर का बरं बघत असावा? आकाशातल्या ताऱ्यांकडे निश्चितच बघत‌ नसणार! कारण हा मवाली,गुंड नक्कीच कुणी ‌खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असण्याचा संभव नव्हता. तेव्हा त्याला सुळी चढविण्यासाठी ठेवलेल्या वधस्तंभाकडेच तो बघत असणार! तो फाशी देणारा डोंब त्याची ही टोपी घेऊन टाकेल का? मी पुन्हा पिसं मोजली...तीन पांढरी, दोन हिरवी!  डोक्याला खाद्य देणाऱ्या या प्रकारात मी जरा गुंतलो होतो तरी माझे विचार भलतीकडेच भरकटू लागले होते. खोलीतल्या चंद्रप्रकाशामुळे मला 'वेल्श व्हॅली 'तील रात्रसहलीची आठवण झाली. अनेक वर्षात मला याची कधीच आठवण झाली ‌नव्हती. या अशा संशयास्पद, धोकादायक जागी अशी रम्य आठवण येणं खरं तर अगदीच अशक्य गोष्ट होती. जे माझ्या स्मृतीतून जवळ जवळ पुसलं गेलं होतं ते अचानक आठवलं आणि कशामुळे,तर खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे! आपल्या मर्त्य आयुष्यात काही गोष्टी अमर‌ असतात हेच खरं!  मी अजूनही त्या सहलीचाच विचार करत होतो. एक तरुणी त्या रात्री ' लॉर्ड बायरन ' च्या ' चाइल्ड हेरॉल्ड ' काव्याच्या पंक्ती म्हणत चालली होती. माझ्या स्मृतीरंजनाचा धागा अचानक तुटला आणि मी वास्तवात आलो. पुन्हा एकदा खोलीत नजर टाकली आणि का कोण जाणे ‌, त्या चित्राकडे टक लावून बघू लागलो.
आणि हे काय ?

अरे देवा! ती टोपी खाली आली होती! छे! टोपी तर तिथे नव्हतीच! कुठे गेली ती शंक्वाकृती टोपी? तो पिसांचा तुरा...तीन पांढरी,दोन हिरवी? टोपी,तुरा दिसेनासं झालं होतं. कुठल्यातरी धूसर गोष्टीने त्याचं कपाळ, डोळे,तो आडवा हात ,झाकलं जात होतं.
आणि पलंग देखील हलतोय की काय? मी चमकून वर बघितलं. मला वेड लागलं होतं का? का स्वप्न बघत होतो? कि पुन्हा कसल्या अंमलाखाली होतो? का पलंगाचं छत खरंच खाली येत होतं? अगदी अलगद, जराही आवाज न येता, भयंकर रीत्या.. त्याच्या संपूर्ण लांबी रुंदी त..थेट माझ्यावर कोसळण्यासाठी... माझ्या झोपलेल्या अवस्थेत!

क्षणभर माझं रक्तंच गोठलं. मी गलितगात्र झालो. मी एकीकडे वर बघत होतो..छत खरंच खाली येत आहे का ते बघू लागलो आणि दुसरीकडे ‌माझा एक डोळा ‌चित्रावर रोखलेला होता. पुढचा क्षण माझ्यासाठी पुरेसा होता. पलंगाची झालर ‌चित्रातील माणसाच्या कमरेच्या रेषेत आली होती.तरीही मी श्वास रोखून चित्राकडे बघतच होतो.

मी खरं तर स्वभावतः भित्रा आहे.पण आजवर कुठल्याही कठीण प्रसंगी मी स्वतःवरचा ताबा ढळू दिला नाही. पण जेव्हा ते छत खरंच खाली येत आहे आणि ते माझ्या अंगावर आदळणार,याची ‌मला खात्री पटली तेव्हा मी असहाय, भितीने अर्धमेला झालो.ती भयंकर यंत्रणा माझा जीव घेण्यासाठी खाली खाली येत होती.

मी अवाक होऊन, श्वास रोखून स्तब्ध बसून होतो.मेणबत्ती  जळून संपली पण चंद्राचा प्रकाश खोलीत पसरला होता.छत त्याच गतीने आवाज न होता खाली खाली येत होतं. तरीही भयाने मला इतकं जडत्व आलं होतं की मी तिथून हलू शकत नव्हतो. छत आता इतकं खाली आलं की माझ्या नाकाला झालरीचा स्पर्श झाला आणि त्या क्षणी स्वतःला वाचवण्याची अंतःप्रेरणा जागृत झाली आणि मी आडवा होऊन लोळण घेत जमिनीवर पडलो. पडता पडता ती खुनी झालर माझ्या खांद्याला स्पर्शून गेली.

माझा श्वास रुद्ध झाला होता, थंड घाम चेहऱ्यावरून ओघळत होता. मी गुडघ्यावर बसून (पलंगाच्या) छताकडे पाहू लागलो आणि अक्षरशः थक्क झालो.त्या क्षणी कुणाची चाहूल लागली असती किंवा सुटकेचा अन्य काही मार्ग एखाद्या वेळी समोर आला असता तरी कदाचित मी तिकडे बघितलं नसतं.कारण माझा सारा जीव माझ्या डोळ्यात एकवटला होता.

हळूहळू करत ते छत ,ती झालर इतकी खाली आली की छत आणि पलंग यात करंगळी इतकीही जागा उरली नव्हती. बाजूला उभं राहिल्यामुळे मला समजलं की वरवर पाहता चीटाचं दिसणारं ते हलकं फुलकं छत प्रत्यक्षात एक जाडजूड, वजनदार गादी होती,जी पडदे आणि झालरी यांच्या मागे लपवली होती. पलंगाचे चारही खांब आता उघडे पडले होते. पलंगाच्या छताला मध्यभागी एक प्रचंड  मोठा लाकडी स्क्रू होता. उघड होतं की खोलीच्या छतातूनच तो खाली आला होता. एखादी वस्त चेचण्यासाठी सामान्यतः जशी दाबयंत्र असतात,तसंच काहीसं ते होतं. पण या सगळ्या प्रकारात यंत्रातून किंवा वरच्या मजल्यावरून यत्किंचीतही आवाज येत नव्हता. एकोणिसाव्या शतकात, फ्रान्सच्या सुसंस्कृत राजधानीत  श्वास गुदमरुन हत्या करण्याची अशी काही काही गुप्त यंत्रणा असेल, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझी अवस्था अजूनही वाईट होती.मला श्वास घेणं जड जात होतं. मी हलू शकत नव्हतो. पण हळूहळू माझी विचारशक्ती भानावर आली. हा कट मला मारण्यासाठी रचला गेला होता हे माझ्या लक्षात आलं. फार भयंकर होतं हे सगळं!

माझ्या कॉफीत अंमली पदार्थ मिसळले गेले होते आणि ते ही मोठ्या प्रमाणात! बेहोशीत मला मारण्याची योजना होती. अंगातल्या तापामुळे मी अस्वस्थ झालो आणि म्हणूनच ‌मी रात्रभर जागा राहिलो! आणि मी.. त्या दोघा नालायक, दुष्ट लोकांवर मी विश्वास ठेवला आणि अशा प्रकारे मरण्यासाठी स्वतःला त्यांच्या हवाली केलं! कोण जाणे,जुगारात  माझ्यासारखं जिंकलेल्या किती जणांना इथे झोपावं लागलं असेल? आणि मग किती जण बेपत्ता झाले असतील? नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारा आला.

एवढ्यात छताची पुन्हा हालचाल झाली.पलंगावर मला वाटतं ते दहा एक मिनिटं स्थिरावलं असेल. मग ते पुन्हा त्याच गतीने वर जाऊ लागलं.ज्या क्रूरकर्म्यांनी हे कृत्य केलं होतं त्यांच्या दृष्टीने त्याचा हेतू एवढ्या वेळात साध्य झाल्याविषयी त्यांची खात्री असणार ! साहजिकच ते छत जसं खाली आलं तसंच वर गेलं आणि पूर्ववत स्थितीला आलं.  कुणालाही कसलीही शंका येणार नाही असं!  वर गेल्यावर पलंगाचं छत खोलीच्या छताला टेकलं आणि ते भोक ,तो स्क्रू सगळं दिसेनासं झालं. एखाद्या संशयी, चिकित्सक माणसाला देखील त्या पलंगाविषयी काही शंका आली नसती.

बऱ्याच वेळानंतर मी हालचाल करु शकलो ...मी उठून उभा राहिलो..माझे कपडे अंगावर चढवले आणि इथून बाहेर कसं पडायचं याचा विचार करू लागलो. मला मारण्याची योजना फसली आहे असा कणभर जरी कुणाला सुगावा लागला असता तरी मग माझा खून अटळ होता. एवढ्या वेळात मी काही आवाज तर केला नव्हता? मी आठवून बघितलं. मी दरवाजाला कान लावला. पण बाहेर कसलाही आवाज , कुणाचाही वावर नव्हता.  दार उघडताना होणारा किंवा दाराला लावलेलं कपाट सरकवताना आवाज येणं अनिवार्य होतं.त्यामुळे दार उघडून बाहेर जाणं हा निव्वळ वेडेपणा होता. म्हणजे आता सुटकेची एकच शक्यता होती आणि ती म्हणजे .. खिडकी. मी हलकेच चालत खिडकीपाशी आलो. माझी खोली पहिल्या मजल्यावर,मॅझनिन माळ्याच्या वरच्या बाजूला होती आणि रस्त्याच्या मागच्या बाजूला होती .मी खिडकी उघडू लागलो, तिथून निसटण्याची शक्यता पण अतिशय कठीण होती. कारण अशा ' मृत्यूच्या सापळाघरा 'भोवती योजना कर्त्यांचा दक्ष पहारा असतो. खिडकी उघडताना तिचं जरा जरी कुरकुरणं ऐकू आलं तरी मग माझा खेळ खल्लास! त्यामुळे ती खिडकी उघडायला मला चक्क पाच मिनिटं लागली..ती पाच मिनिटं ‌मला पाच तासांसारखी वाटली. एखाद्या घरफोड्याच्या कौशल्याने , जराही आवाज न करता मी ‌ती खिडकी उघडण्यात यशस्वी झालो. मी खाली डोकावून पाहिलं पण खिडकीतून रस्त्यावर उडी मारणं म्हणजे मृत्यूचं दुसरं रूप होतं. मी इकडे तिकडे बघितलं तर पाण्याचा एक पाईप खिडकी जवळून जात होता. तो पाईप बघितला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. पलंगाचं छत खाली येताना पाहिल्यापासून या क्षणापर्यंत माझा श्वास कोंडला होता. आता पाईप हा सुटकेचा मार्ग आहे यावर कुणाचं दुमत असू शकतं...पण मला तसं वाटलं नाही कारण शाळेत असताना मी
' जिमनॅस्टिकचं' प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्या नंतर मी एक धाडसी आणि बऱ्यापैकी कुशल गिर्यारोहक होतो. अशा संकटकाळी माझे हात आणि पाय मला साथ देतील याबद्दल मला विश्वास होता. मी घाईघाईने एक पाय खिडकीवर टाकला देखील... तेवढ्यात लक्षात आलं की रुमालाचं गाठोडं पलंगावरच राहिलं आहे. मी ते तिथेच टाकलं देखील असतं पण जुगारखान्यातल्या त्या नालायक, दुष्ट,क्रूर माणसांना धडा शिकविण्याची तीव्र इच्छा झाली. म्हणून मी परत गेलो आणि ते जड गाठोडं उचललं . माझ्या गळपट्ट्याने पाठीवर घट्ट बांधलं.
इतक्यात खोलीबाहेर कुणीतरी असावं असं मला वाटलं. परत एकदा भितीची थंड लहर शरीरभर पसरली. मी अंदाज घेतला पण सर्वत्र भयाण शांतता होती. आवाज येत होता तो वाऱ्याच्या झोताचा! दुसऱ्या क्षणी मी खिडकीच्या कठड्यावर पाय ठेवला आणि पाण्याच्या पाईपाला धरून सरसरत खाली आलो.

जमिनीला पाय लावताच धूम ठोकली आणि थेट स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन थडकलो. माझ्या मोडक्या तोडक्या फ्रेंच मध्ये, धापा टाकत,माझी हकिकत सांगितली. सुरवातीला या  दारुड्या ‌इंग्लिश इसमाने कुणाला तरी लुटलं असावं असा इन्स्पेक्टर साहेबांचा समज झाला होता.पण मी जसं जसं पुढे सांगत गेलो तसं त्यांनी टेबलावरची कागदपत्रं खणात भरली आणि आपली टोपी डोक्यावर चढवून उठून उभे राहिले. माझं डोकं उघडं बघून ‌तिथलीच एक टोपी माझ्या डोक्यावर ठेवली. इतर शिपायांना आदेश दिले. दरवाजे कुलपं फोडण्याची सामग्री घ्यायला सांगितली. एखाद्या परिचिताचा धरावा तसा माझा हात धरला आणि आम्ही निघालो.

जुगारखान्याशी पोचताच इमारतीच्या पुढे मागे शिपाई तैनात केले गेले आणि मुख्य दरवाजावर जोरजोरात ठोठवायला सुरवात केली. एका खिडकीतून थोडासा उजेड आला.पोलीसांनी मला लपायला सांगितलं आणि पुन्हा दारावर थपडा मारायला सुरुवात केली... बाहेर पोलीस आहेत,दार उघडा.. दार उघडा...यानंतर मात्र कड्या उघडल्याचा आवाज आला आणि अर्धवट कपड्यातला, चेहरा पांढरा फटक पडलेला एक 'वेटर' बाहेर आला. मग खालील संवाद रंगला.

इन्स्पेक्टर ने दरडावून म्हटलं, 'काल इथे वस्तीला असलेल्या ' इंग्लिश ' गृहस्थांना आम्हाला भेटायचं आहे.'
'ते तर इथून कधीच गेले.'
'खोटं बोलू नको. तू म्हणतोस तो त्यांचा मित्र. ते इथेच राहिले होते. चल दाखव त्यांची खोली '
' देवा शपथ सांगतो, ते इथे नाहीत!'
' नाही, मिस्टर गार्कन ( फ्रेंच उपहारगृहातील वेटर ला गार्कन म्हणतात)  ते इथे होते. ते इथे झोपले सुद्धा...पण तुमचे पलंग आरामदायक नव्हते म्हणून तक्रार करायला आले होते ते आमच्याकडे...ते आत्ता माझ्या बरोबर आहेत.. आणि मला आता  ढेकूण पिसवांनी भरलेल्या त्या पलंगाची तपासणी करायची आहे.'
' मि. रेनॉडीन' (शिपायाचं नाव) ,धरा त्याची कॉलर आणि चला वर..'

पोलीसांनी तिथल्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं, सगळ्यात आधी ओल्ड सोल्जरला! वर गेल्यावर ‌मी‌ झोपलो होतो तो पलंग त्यांना दाखवला. सकृतदर्शनी संशय घेण्याजोगे काहीच नव्हतं. मेणबत्त्या मागवल्या गेल्या.खोलीची झडती घेतली. जमिनीवर ठिकठिकाणी पाय आपटून चाचपणी केली.आणि एका ठिकाणी संशयास्पद वाटल्याने तिथे उचकटून बघितलं तर काय!
त्या खोलीची  जमीन आणि खालच्या वरच्या खोलीचं छत भेदून खालपर्यंत जाणारी एक गुप्त पोकळी होती. त्या पोकळीतून खूप जास्त प्रमाणात वंगण लावून गुळगुळीत केलेली, खालीवर होऊ शकणारी,एक लोखंडी नळी  होती. त्याच्या वरच्या टोकाला लाकडी स्क्रू होता.तो पण वंगणाने माखलेला होता.त्याला जोडलेल्या तरफा, फेल्ट कापडाने आच्छादल्या होत्या. नरकातील यंत्रणेच्या तोडीची अशी वरची दाब देणारी यंत्रणा मोठ्या खुबीने त्याला जोडली होती. थोड्याशा प्रयत्नांनी ती यंत्रणा कशी काम करते हे इन्स्पेक्टर साहेबांनी बघितलं.  त्यावेळी मात्र थोडा आवाज येत होता. यावर इन्स्पेक्टर साहेब हसून मला म्हणाले,' अहो,माझी माणसं पहिल्यांदाच वापरताहेत ना हे! पण तुम्ही ज्यांचे पैसे जिंकलेत त्यांना याचा सराव असणार!'

पुढच्या कारवाईसाठी जुगारखाना इतर पोलीसांच्या ताब्यात देऊन आम्ही दोघे पोलीस ठाण्यात परत आलो .तिथे आल्यावर माझी जबानी नोंदविण्यात आली आणि माझा पासपोर्ट आणण्यासाठी आम्ही मी रहात असलेल्या हॉटेलमध्ये आलो. पासपोर्ट देता देता मी विचारलं,'  यापूर्वी खरंच कधी असं कुणाला चिरडलं होतं का?'
इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,' सांगणं कठीण आहे. कारण जुगारखान्यातल्या ह्या भयंकर यंत्रणेचा सुगावा आजवर पोलिसांना देखील लागला नव्हता. पण एक सांगतो, आजवर पाण्यात बुडून मेलेल्या अनेक माणसांची बेवारशी प्रेतं शवागारात पडलेली मी पाहिली आहेत. जुगारात हरुन कफल्लक झाल्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशा चिठ्ठ्या त्यांच्या खिशातल्या पाकीटात सापडल्या आहेत. आता किती जण त्या जुगार खान्यात आले?तुमच्यासारखे किती जण जिंकले? कितीजण त्या पलंगावर झोपले? चिरडले गेले? आणि त्या चिठ्ठ्यांसह नदीत फेकले गेले? सांगणं कठीण आहे! त्या  दुर्दैवातून वाचलेले तुमच्यासारखे कमीच असतील! ठीक आहे मि. फॉकनर , उद्या सकाळी दहा वाजता एकदा येऊन जा पोलीस ठाण्यात ,तो पर्यंत गुड बाय!

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा माझी जबानी घेतली. जुगारखान्याची पुन्हा एकदा कसून झडती घेतली. दोषी आढळलेल्यांची कोठडीत रवानगी झाली.संशयिताची उलट तपासणी करून , ताकीद देऊन सोडण्यात आलं. ओल्ड सोल्जर..जो या साऱ्याचा मुख्य सूत्रधार होता.. त्याच्यावर खटला भरला. त्यातून अशी माहिती मिळाली की काही वर्षांपूर्वी असभ्य वर्तन , चोरीमारी सारख्या गुन्ह्यांसाठी त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं होतं. द्युतचालक आणि आम्हाला कॉफी देणारी बाई पण यात सामील होती. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. संशयास्पद  ठिकाण म्हणून त्या जुगारखान्यावर नजर ठेवण्यात आली.

पुढचा आठवडाभर मी मात्र ' पॅरिसचा हिरो' ठरलो. काही हौशी नाटककारांनी त्यावर नाटक सादर करण्याची आणि रंगमंचावर तो मृत्यूचा सापळा साकारण्याची इच्छा प्रकट केली.पण जनहितास्तव त्यांना परवानगी नाकारली गेली.

माझ्या या भयंकर साहसाचा एक चांगला परिणाम मात्र झाला. "रु-ज ए नो-आ " खेळ यानंतर मी कधी गंमत म्हणून सुध्दा खेळलो नाही! कारण टेबलावरचं हिरवं कापड, पत्त्यांचा जोड आणि पैशाचा ढीग  आणि भीषण काळरात्री  खाली खाली येत,श्वास गुदमरून जीव घेणारं पलंगाचं छत ही दोन्ही दृश्यं यापुढे  माझ्या आयुष्यात कायमच हातात हात घालून येणार होती!
                                समाप्त

( विल्की कॉलीन्सच्या "अ टेरिबली स्ट्रेंज बेड " या कथेचा भावानुवाद)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

हे सुरुवातीला लिहायचं ना !

कर्नलतपस्वी's picture

22 Jun 2024 - 7:27 pm | कर्नलतपस्वी

अनुवाद करण्याची हातोटी मस्त जमलीय. एका बैठकीत वाचला. मला कुठे कुठे अनुवाद रुक्ष आणी स्ट्रक्चरड वाटला. थोडा स्वैर अनुवाद आणी शब्दयोजना अनुवाद प्रभावी बनेल.

या आगोदरचे आपले अनुवाद वाचले आहेत.

नूतन's picture

22 Jun 2024 - 11:30 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमच्या सूचना जरूर लक्षात ठेवीन .

टर्मीनेटर's picture

22 Jun 2024 - 7:33 pm | टर्मीनेटर

मस्त कथा आहे, आणि तुम्ही तिचा भावानुवादही छानच केला आहे!
मोठी असली तरी ती एकाच भागात दिल्याने एकसंधपणे वाचायला मजा आली 👍

नूतन's picture

22 Jun 2024 - 11:33 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एका भागात द्यावी का नाही याबद्दल साशंकता होती. पण तुमचा अभिप्राय वाचून बरं वाटलं.

चित्रगुप्त's picture

23 Jun 2024 - 1:45 am | चित्रगुप्त

चित्र १.
.

चित्र २.
.

चित्र ३.
.

चित्र ४.
.

चित्र ५.
.

चित्र ६.
.

चित्र ७.
.

चित्रे कितपत समर्पक आहे, हे ठाऊक नाही, पण एक प्रयत्न करून बघितला आहे. काही सूचना असल्यास अवश्य सांगा. अनेक आभार.

नूतन's picture

23 Jun 2024 - 9:31 am | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सुंदर चित्रं.
चित्र १,२,३,६,७ समर्पक वाटली.
चित्र ४ व ५ मधील फोटोतले बारकावे जरा वेगळे दिसत आहेत.
पण सचित्र कथेसाठी अगदी योग्य आहेत. अभिनंदननीय प्रयत्न.

चित्रगुप्त's picture

23 Jun 2024 - 1:52 am | चित्रगुप्त

.

नूतन's picture

23 Jun 2024 - 9:24 am | नूतन

समर्पक चित्र

तिकडच्या कथा या बहुतेक भूतकथा किंवा भयकथा असतात. तोचतोचपणा येतो. मराठीत भाषांतर बरंच जमलं आहे.

चित्रे झकास आहेत.

नूतन's picture

23 Jun 2024 - 9:34 am | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

23 Jun 2024 - 5:38 am | कर्नलतपस्वी

चित्रगुप्त यांना अल्लाउद्दीन चा जिन्न सापडलाय. इकडे कथा ,कवीता पाडल्या की लगेच तीकडे आभासी चित्र तयार.

चित्रे खासच आहेत.