पाट्या

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
10 Jun 2024 - 11:17 am

पाट्या!

जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात.

त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीत जेव्हा जोडशब्द लिहायला आणि वाचायला शिकत होतो तेव्हा बाजारात गेलो की मी त्या पाट्या वाचायचो. ते सगळं परत एकदा अनुभवतो आहे.

त्यामुळे काही भन्नाट पाट्या आठवल्या आणि त्यांची गंमत सुद्धा. सुपर मार्केट, मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग ह्यामुळे आता दुकानात जाणं होत नाही. पूर्वी बाजारात जाणं हा एक event असायचा. आता मॉल मध्ये जाणं असतो तसा.

बऱ्याच दुकानांमध्ये पाट्या असायच्या बहुदा एक वाक्याच्या.काही उदाहरणं म्हणजे कपड्यांच्या दुकानात असणारी हमखास पाटी फैशन की इस दौर मे गारंटी की इच्छा ना करे! आता मालक आणि गिऱ्हाईक दोघंही मराठी असताना ही पाटी हिंदीत का असायची हे त्या मालकाला पण सांगता यायचं नाही. त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. कुठं कुठं फ्याशन असं पण लिहिलेलं असे. माझ्या लहानपणी लेकरानी कोणते कपडे घालावेत हे १०० पैकी १०५ वेळेला आयाच ठरवायच्या. लेकरांना फक्त size समजण्यासाठी घेऊन जायचे. त्यातही स्वस्त, टिकाऊ आणि वाढत्या मापाचे ह्या तीन अपेक्षा पूर्ण करणारे कपडे लगेच निवडले जात. वाढत्या मापाचे असल्यामुळे जवळपास सगळी लेकरं ढगळ शर्ट, आतून फुगा ठेवल्या सारख्या चड्ड्या, एकाच वेळी दिड किंवा २ मुली मावतील असे फ्रॉक ह्याच अवतारात असायचे. ह्या कारणामुळे त्या पाटीला कोणीही ढुंकून वाचत नसे. उलट दुकानदाराला धमकावून, दरडावून हे कपडे ३ वर्षे तरी वापरता येतील ह्याची कबुली घेतली जात असे.

उधारी बंद, एकच भाव अशा काही निर्थरक पाट्या बऱ्याच दुकानात असत. त्यांचा नेमका कोणाला उपयोग असे हे आजही माहिती नाही. कारण त्याच पाट्या खाली बसून उधारीची वही लिहिता लिहिता मालक घासाघीस करत असत. काही काही दुकानदार थोडे जास्त Sarcastic असत त्यामुळे ग्राहक हा राजा असतो आणि राजा कधीही उधार मागत नाही असं लिहायचे.

हॉटेलात पण काही पाट्या असायच्या. आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मेन्यू कार्ड हे फारच दुर्मिळ असल्यामुळे एक मोठा बोर्ड आणि त्यावर पदार्थांची यादी हे अगदी घट्ट नातं होतं. त्या यादीत कितीही पदार्थ असले तरी जे पदार्थ तयार असतील तेच मिळतील हे महत्वाचं वाक्य असायचं. त्यामुळे ती पाटीही काही उपयोगाची नसायची. आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची. बाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई अशी पण पाटी असायची. आमच्या कॉलेजच्या जवळ असणारा जो हॉटेल मधला अड्डा होता तिथे ही पाटी होती. तिथे बसून आम्ही घरून आणलेले डबे खायचो.

डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा पाट्या असायच्या. त्यात MR लोकांना कधीही आत सोडता येणार नाही, शांतता राखा, ह्या नेहमीच्या पाट्या असायच्या. उधारी बंद ही पाटी सुद्धा मी काही दवाखान्यात पाहिली आहे.

मी पाट्या वाचण्यासाठी अधून मधून इकडल्या जुन्या मार्केट मध्ये जात असतो. तिथे अजूनतरी काही पाट्या शिल्लक आहेत पण मला नीटशा वाचता येत नाहीत. पण मला खात्री आहे की त्या तशाच पाट्या असणार. शेवटी जग कितीही बदललं तरी काही गोष्टी कुठेतरी दडून बसतात आणि शिल्लक राहतात, हे नक्की!

विनोद

प्रतिक्रिया

सुरिया's picture

10 Jun 2024 - 12:02 pm | सुरिया

आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.

ही पाटी लेबर इन्स्पेक्टर लोकांसाठी असते, म्हणजे त्याचा अर्थ इथे कोणी पगारी नोकर नाहीत, जे आहेत ते रोजंदारीवर काम करतात. कारण जास्त कामगार पगारी असले की वेगळे नियम, पगार आकाउंट, मस्टर, सुट्ट्या अशा बर्‍याच गोष्टी म्यानेज कराव्या लागु नये म्हणून ही पाटी लावले जाते. (भले कित्येक वर्षे तीच वेटर आणि आचारी मंडळी वर्‍शानुवर्षे दिसत असली तरीही)

आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची.

ही पाटी अन्न औशध प्रशासन (एफ्डीए) साठी असते. त्यांचे पण इन्स्पेक्टर पाहणी करतात उपहारगृहांची.
.
बाकी लेख फारच जुनाट आणि भाबडा आहे हे वेगळे सांगणे नलगे.

लेख जुनाट नाही त्यातला काळ जुना नक्कीच आहे. तसा उल्लेख सुद्धा केला आहे. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याविषयी मनात असलेले प्रश्न विचारले आहेत. मला वाटतं माझ्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाला हे प्रश्न पडत असावेत. त्यामुळे कदाचित विद्वानांना हे प्रश्न भाबडे वाटतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! बऱ्याच वर्षांचं कुतूहल होतं.

किसन शिंदे's picture

17 Jun 2024 - 2:56 pm | किसन शिंदे

"इथे १८ वर्षांखालील बालकामगार काम करीत नाही" ही सुद्धा एक पाटी असते बर्याचश्या हॉटेल्समध्ये.

अशा पाट्यांमुळेच भारताचे वेगळेपण जपलं आहे.

भुवनेश्वरला खानावळीच्या नावाच्या पाटीवर कांदा लसूण नसलेले पदार्थ मिळण्याबद्दल लिहिलेलं असतं.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2024 - 12:21 pm | चौथा कोनाडा

नॉस्टेलिजिया आवडला !

किसन शिंदे's picture

17 Jun 2024 - 2:58 pm | किसन शिंदे

रच्याकने, इंदुरला राजवाड्याजवळ प्रशांत नाष्टा कॉर्नरमध्ये "आपण महाराष्ट्रीयन असाल तर मराठीतून बोला" अशी पाटी वाचली गल्ल्यावर.