१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे बोन्साय मनात भरलंच! आणि खरं सांगते ,या झाडाने आम्हाला अपार आनंद दिला.
आमचं ॲडेनिअम त्याच्या वैशिष्ट्यांना जागलं. एकाच वेळी ६-७ फुलांच्या गुच्छात वर्षभर फुलत राहिलं, अजूनही फुलतं आहे.महिना महिना परदेशी गेलो तेंव्हा नेहमीप्रमाणे धांदलीत , झिरपणाऱ्या पाण्याच्या बाटल्या -बिटल्या काही ठेवल्या नाहीत.पण प्रत्येक वेळी परतलो तेव्हा हा पठ्ठ्या सात आठ फुलं फुलवून आमच्या स्वागताला सज्ज असायचा! खरंच!
काही दिवसांपूर्वी झाडाला दोन शेंगा आल्या. घरात लग्न काढलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा बिच्चारा ॲडेनिअम दुर्लक्षित झाला होता. घरातली धामधूम संपली आणि जरा निवांत झालो. एका सकाळी उठून बघतो तर बाल्कनीत मुलायम, रेशमी म्हाताऱ्या उडत होत्या. मी तर लहान मुलांसारखी टाळ्या वाजवत अहोंना मोठ्या मोठ्याने हाकाटू लागले. या म्हाताऱ्या आल्या कुठून?कोडंच पडलं! कारण बाल्कनी तर जाळीबंद ! म्हणजे बाहेरून नक्की नाहीत. अचानक लक्षात आलं ...शेंगा फुटल्या आहेत आणि त्यातूनच ह्या तलम खजिन्याची उधळण झाली आहे. खूप गम्मत वाटली, खूप आनंद झाला! सगळ्या म्हाताऱ्या गोळा करून ठेवल्या, जपून ठेवण्यासाठी! शाळकरी असताना शेवरीच्या म्हाताऱ्या अशाच वेड्यासारखा गोळा करून स्वहस्ते एक छोट्टीशी उशी केली होती,ते सर्रकन आठवलं.
असो! आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या आमच्या ह्या ॲडेनिअमकडून , कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहून कसं फुलत रहायचं, हेच शिकायला हवं! निदान तसा प्रयत्न करायला तरी काय हरकत आहे? नाही का?
( फोटो चढवणं खूपच कठीण झालं.त्यामुळे फोटो , व्हिडिओ देऊ शकले नाही. क्षमस्व. कुणाला पहायची इच्छा असेल त्यांच्यासाठी फेसबुक पोस्टचा दुवा देत आहे.
https://www.facebook.com/share/p/TAf5KxaH5EQUc4XX/?mibextid=oFDknk)
प्रतिक्रिया
26 May 2024 - 12:30 pm | भागो
सहृदय शब्दांकन केले आहे.
26 May 2024 - 7:17 pm | नूतन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
26 May 2024 - 1:31 pm | Bhakti
ॲडेनिअमलापण म्हातारी येते,हे माहिती नव्हतं.
26 May 2024 - 7:17 pm | नूतन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
26 May 2024 - 3:16 pm | कर्नलतपस्वी
निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट ,अतीशय मनमोहक. माझेही अवडते प्लांट आहे.
जवळपास पंधरा वर्ष कामटी,लखनौ, दिल्ली पुणे असे इमाने इतबारे फिरले. मुलीकडे अमेरिकेला जाताना सारी झाडे पार्किंग मधे ठेवली व चौकीदाराला काळजी घ्यायला सांगीतली. परत आल्यावर आज वर नेऊ ऊद्या नेऊ करताना कुणीतरी चोरी केले. सोसायटीच्या ग्रुपवर खुप शिव्या दिल्या काही उपयोग झाला नाही.
म्हणा झाडही तसेच होते. कोणालाही मोह पडावा असे. कदाचित मी सुद्धा चोरी केले असते.
कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहून कसं फुलत रहायचं, हेच शिकायला हवं!
अगदी,अगदी.... सहमत.
लेख आवडला.
26 May 2024 - 7:16 pm | नूतन
निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट
हे माहित नव्हतं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
27 May 2024 - 8:26 pm | कर्नलतपस्वी
त्याच्या बागेतील जवळपास चाळीस एक कदाचीत जास्त असतील अशी वेगवेगळ्या रंगसंगतीतली डबल आणी सिंगल पाकळ्यांची झाडावर असलेल्या फुलांचे फोटो टाकलेत. एका पेक्षा एक सरस.
दिडशे रुपयाला एक प्लांट विकतो.
29 May 2024 - 10:32 pm | चौथा कोनाडा
खुप छान !
31 May 2024 - 9:32 am | नूतन
धन्यवाद