माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न.
मला वाटतं निसर्गाचं सामर्थ्य अफाट आहे.
मी निसर्गाच्या आपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देत नाही, तर उलट - त्याच्या ठीक करण्याच्या,बरं करण्याच्या शक्ती, बद्दल म्हणत आहे.
सूर्यप्रकाशात भिजणं आणि ताज्या, शुद्ध हवेत श्वास घेणं यापेक्षा मनाला आणि शरिराला आरामदायक, सुखदायक करणारं दुसरं काहीही नाही. निसर्गाचं संगीत - पक्षांचा गाण्यांचा आवाज, पानांचं सळसळणं, वाऱ्याची कुजबुज, धबधब्याची खनखनता
कोसळणाऱ्या पावसाच्या टपटपणारा आवाज
- एखाद्याच्या अस्तित्वात सामिल होतो आणि जीवनाच्या आवश्यक गोष्टींकडे परत खेचून आणतो.
आजच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत,दृत गतीच्या जगात, या निसर्ग-प्रेरित मनाच्या चौकटीत प्रवेश करणं ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे.
कामाचा ताण, भ्रमणध्वनी(mobile phone), ई-मेल, कुटुंब सांभाळणं आणि अंगावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं, ह्यामुळे एखादी व्यक्ती सहजपणे त्यात गुरफटली जात असते.
कधी कधी अगदी नैराश्यही येतं.किंबहुना,शांतता आणि सुसंवादाकडे परत जाणं आणि नैसर्गिक जगामध्ये गुंतून स्वतःला पुन्हा भागिदार करणं महत्वाचं आहे.
शरीर, मन यांचं एकत्रीकरण हा निसर्गाच्या संपर्कात येण्याचा थेट परिणाम आहे, आणि हा अनुभव आपल्याला जीवनाच्या मुळतेकडे परत आणतो आणि खरोखर महत्वाचं काय आहे याची आठवण करून देतो.
मी माझ्या आयुष्यात अनेक सुंदर ठिकाणं पाहिली आहेत.पाहून मला आनंदित केलं गेलं आणि माझा अनुभव समृद्ध झाला.
मी घरापासून लांब असताना यापैकी अनेक दृश्यं पाहिली आहेत.पण कधी कधी फक्त इंद्रधनुष्य, रंगीबेरंगी सूर्यास्त, पानांच्या निरनिराळ्या रंगाच्या छटा, फुलावर उतरणारं फुलपाखरू. दंव आच्छादीत पानावर
चमकणारा सूर्य, ह्या गोष्टी पाहून निसर्गाचं कौतुक करण्यासाठी एकाग्र होऊन पहाण्यात, आनंदाचा अनुभव घेण्यात मजा अनुभवली आहे.
मला वाटतं की, डोंगरावरून ओथंबणाऱ्या धबधब्याकडे टक लावून पाहणं, किंवा अथांग
सागराकडे आवाक होऊन पाहाणं हे जीवनासाठी नैसर्गिक उपचार आहेत.
निसर्ग त्याच्या विश्वासार्हतेने स्थिर गतीने चालतो आणि माणसाने आपल्याला त्यच्याकडून काहीतरी शिकण्याचा फायदा मिळवला पाहिजे.माणसाने निसर्गाचा आनंद लुटण्याची प्रत्येक संधी अवगत केली पाहिजे.आणि बाहेरील परिसराची निसर्गरम्य शांतता अनुभवून आयुष्य मजेत उपभोगलं पाहिजे. असं मला वाटतं.