रिसेप्शन

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
31 Mar 2024 - 1:27 am

रिसेप्शन
मी ऑफिसातून घरी परत आलो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो.
“भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.”
मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते.
“हे वाघमारे म्हणजे...”
“आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला. “आमच्यात अशी आडनावे नसतात.”
“माझेही वाघमारे नावाचे कोणी नातेवाईक नाहीत.”
असं तुझे माझे बऱ्याच वेळ झाल्यावर आमच्या दोघांचे एकमत झाले कि ह्या वाघमाऱ्यांचा आणि आपला काही संबंध नाही. म्हणजे लग्नाला जायची काही गरज नव्हती.
ज्या दिवशी चि. सौ. कां. सुनंदा वाघमारेचा विवाह संपन्न होणार होता त्या दिवशी सकाळी सकाळी दिनकररावांचा फोन! तुम्ही विचाराल कि आता हे दिनकरराव कोण? खर सांगतो, मलाही माहित नाही.
“अरे भागो, ओळखलस का? मी दिनू.”
“आयला दिन्या लेका. किती दिवसांनी फोन करतो आहेस. आज बरी आठवण झाली. बोल.”
“अरे वाघमारेच्या सुनंदाचे लग्न आहे. लक्षात आहे ना. तू डायरेक्ट कार्यालयावरच ये. काय?”
त्याला हो करून फोन बंद केला.
“कुणाचा फोन होता?”
“कोणी मिस्टरी दिनू होता.”
“अरे जरा नीट बोल ना. यू मीन मिस्टर दिनू. दिनकरराव म्हणजे माझे लांबचे नातेवाईक आहेत. मी नव्हती का तुला लग्नात ओळख करून दिली होती?”
“लग्नात? कुणाच्या लग्नात?”
“कुणाच्या काय? एव्हढ्यात विसरलास? आपल्या लग्नात.”
“आपले लग्न” किती वर्षांपूर्वी झाले? हेही आता मी विसरलो आहे.
“हा हा आठवलं. ओ तो दिनू होय. खरच ग खरच.”
“काय म्हणत होते?”
“वाघमारेच्या लग्नात येणार ना असं विचारत होता.”
बायको विचारात पडली.
“भागो, मला वाटतं आपण लग्नाला जायला पाहिजे. काय माहित वाघमारे आपले दूरचे नात्यातले असतील. तिथं गेलो कि आपल्याला आठवेल. असं समाजापासून फटकून वागणेही बरोबर नाही. आपली सुलूही आता लग्नाची झाली आहे.”
सुलू म्हणजे माझी मुलगी. सध्या बंगळूरला ट्रेनिंग करते आहे. बीई कांप्यूटर केले आहे. सुस्वरूप आहे. कोणी चांगला मुलगा नजरेत असेल तर सांगा प्लीज.
संध्याकाळी मी टीवी बघत बसलो होतो. संध्याकाळचे पाच वाजले असावेत.
“भागो आटप. आपल्याला जायचय ना.”
मला वाटत होत कि बायको विसरली असेल, पण नाही. आठवणीची पक्की आहे. शिवाय आमच्या सुलूच्या लग्नाचाही सवाल होताच. समाजापासून फटकून कसं चालेल?
सुलू बघता बघता लग्नाची झाली.
माझ्या डोळ्यासमोर भयानक दृश्य आले.
सुलू आणि तिचा नवरा सजधजके सोफ्यावर बसले आहेत. मी अस्वस्थपणे येरझारा मारत आहे. बायको उदास, केटरिंगवाले टेबल सजवून उभे आहेत. सिताफळरबडीचा बेत आहे. पण आख्ख्या कार्यालयात एकही गेस्ट आलेला नाही. त्या नट्टाफट्टा करून सेंट मारून एकमेकांची सटल उणीदुणी काढणाऱ्या ललना!
“ही साडी कुठून आणलीस ग.”
“अग आमच्या इकडे किनई एक जण साड्या घेउन्येतो. आम्ही किनई त्याच्या कडूनच घेतो.”
“ही टेंपल बॉर्डर भारी दिसतेय. अंगभर आहे का?”
“ही जर पण खरी दिसतेय.”
स्त्रियांचा शब्दकोश अलग असतो. “खरी” ह्या शब्दालाही खरा आणि खोटा असे दोन अर्थ असतात.
पुरुषही काही कमी नसतात बरका.
“होहो, मॉडेल कॉलनीत घेतला आहे. थ्री बेडरूम... हो थोडा कॉस्टली आहे, पण काय असतं ना कि...”
“सुझुकीच्या खूप कंप्लेंट आहेत म्हणे. म्हणून मग एमजीच घेतली...”
“युरोप झालं, अमेरिका तर दोनदा झाली. ह्या वर्षी म जपानला जाऊन आलो...”
.
.
.
असं बरच काही.
अन ती शिवणापाणी खेळणारी मुलं.
कोणी कोणी म्हणून आलं नव्हतं.
सुलू कंटाळून गेली होती.
“बाबा, आम्ही देवालातरी जाऊन येतो. बसून बसून कंटाळा आला आहे.”
“अग असं नको करू. लोक येतील त्यांना काय वाटेल?”
“कोणीही येणार नाहीयेत. तुम्ही वाघामारेंचे लग्न अटेंड केले नाहीत ना...”
“तरी मी ह्याना सांगत होते...“
नाही नाही असं व्हायला नाही पाहिजे.
टीव्ही वर वाद विवाद रंगात आला होता.
“एकनाथनं असं करायला नको होतं...”
हिंदुत्व, समाजवाद, रेवडी, अडाणी-अंबानी, चुनावीबांडू, लीब्रांडू अशी शब्दांची फेका फेक चालू होती. ही मज्जा सोडून लग्नाला जायचे अगदी जिवावर आले होते. पण काय करणार? इलाज नव्हता. सुलूचं लग्न व्हायचं होतं ना.
कुठलेही आढेवेढे न घेता, वळणे आणि शॉर्टकट न घेता चला कार्यालयात.
“या या. अस इकडून या. बसा आरामात. मंडळी येताहेत. चहा सरबत काही? त्या तिकडे व्यवस्था केली आहे. नंतर मग स्नॅक्स आहेतच. सावकाश होऊ द्या.”
आम्हाला बसवून ते सद्गृहस्थ निघून गेले.
“मला वाटत हे सुनंदाचे मामा असावेत.”
मी एकदा सुनंदाकडे निरखून बघितले. चेहऱ्यावर जबरदस्त क्रीम थापले होते. म्हणजे गवंडी जसे...
उसके चेहरेकी चिकनाहटसे नजर फिसल रही थी. त्यामुळे सुनंदा ओळखीची असती तरी ओळखता आली नसती.
“मेकअप किती सुरेख केला आहे नाही? विचारायला पाहिजे.”
नवरा मुलगा बिचारा बापुडा दीनवाणा बसला होता.
“नवरामुलगा किती शांत आणि तेजस्वी दिसतो आहे.”
“कुणी ओळखीचे दिसतंय का?”
“अजून तरी कोणी नाही.”
एका सहा सात वर्षांच्या मुलाला घेऊन एक जण आमच्या दिशेने येत होता.
“बेटा, हे काका.”
“हाय काका!”
“अरे तसं नाही. मी काय सांगितलेंय?”
मुलाने वाकून पायाला स्पर्श केला..
“नमस्कार करतोय काका.”
“आयुष्मान भव.” मी गहिवरून आशीर्वाद दिला.
“काका आयुष्मान नाही वरूण म्हणा.”
“वरू, मस्करी नाही. मस्करी नाही करायची.”
“केव्हढा मोठा झाला आहे. मी बघितला तेव्हा हा इवलासा होता. अगदी तुमच्या वळणावर गेला आहे.”
“सगळे म्हणतात कि त्याच्या आईच्या वळणावर गेला आहे. ती तिकडे मैत्रिणींच्या गराड्यात फसली आहे. मी विचार केला कि तेव्हढ्यात आपल्याशी दोन शब्द बोलावेत. बाकी तब्येत वगैरे?”
“तब्येत एकदम फसक्लास. डॉक्टर म्हणतात थोडी बीपीची काळजी घ्या. मीठ कमी करा.”
“कोण? अॅलोपाथीवाला असणार. तुम्ही कोल्हापूरला आलात कि मी... आलो आलो. बायको बोलावते आहे. मग भेटू. तब्येतीची काळजी घ्या. बीपी शरीर... अग आलो की.”
“बाय अंकल.”
मी त्याच्या बायकोचे आभार मानले.
असे कित्येक ओळख काढून भेटून गेले. त्यांच्या पैकी एकालाही मी ओळखत नव्हतो. माहौल असा होता कि पोटूस बायडेन जरी येऊन माझ्याशी दोन गप्पा मारून गेला असता तरी मला आश्चर्य वाटले नसते.
“बस झालं. भागो आपण सुनंदाला भेटून घरी परतूया.”
आता खरी कसोटी होती. मी मनोमन ठरवले कि प्ले बाय इअर.
प्ले बाय इअर म्हणजे To do by guessing, intuition, or trial and error; to react to events as they occur. हाऊ ट्रू!
आम्ही दोघं जोडीने स्टेजवर गेलो.
“हॅलो सुनंदा. ओळखलस का?”
“हे काय काका. असं कसं बोलता? ओळख कशी विसरेन बरं? अरु, मी सांगत होते ना ते हे काका. मी लहान होते ना तेव्हा माझ्यासाठी गोळ्या चॉकलेट आणायचे. काकू कशा आहात?” त्या दोघी एकमेकांशी भिडल्यावर मी नवऱ्या मुलाकडे मोर्चा वळवला.
“आमची सुनंदा गोड मुलगी आहे. यू आर लकी.”
“हो हो अगदी अगदी. तुम्ही कुठे असता?”
“मी इथे डायरेक्टर ऑफ शुगरच्या ऑफिसमध्ये असतो. असिस्टंट डायरेक्टर आहे. सेन्ट्रल बिल्डींग.”
“ओ हो म्हणजे ते आपले फलटणचे...”
“हो. ते डायरेक्टर आहेत.”
एक फोटो सेशन झाले.
जाताना सुनंदाच्या आई बाबांचा निरोप घेतला. आवंढा गिळून ते म्हणाले,
“थॅंक्यू, तुम्ही याल अशी अपेक्षा नव्हती. पण वेळ काढून आलात. बरं वाटलं.”
“अहो तुमच्याकडच्या कार्याला जायलाच पाहिजे. आणि त्या निमित्ताने नातेवाईकांच्या भेटी गाठी होतात. बाकी समारंभ चांगला झाला. मुलीचे लग्न म्हणजे... एक कर्तव्य... बरं येतो.”
अजूनही मला अनेक प्रश्न पडले आहेत.
ही सुनंदा कोण?
तो आयुष्मान सॉरी वरुण आणि त्याचे बाबा ते कोण?
तो उपरा म्हातारा जो निव्वळ जेवण्यासाठी आला होता. तो कुणाच्याच बाजूचा नव्हता. तो कोण?
माझ्या बायकोची ती जिवाभावाची मैत्रीण जिला माझी बायको आयुष्यात कधी भेटली नव्हती ती कोण?
समाजात रहायचे असेल तर हे सगळं करावं लागतं.

कथा

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 7:10 pm | अहिरावण

छान छान !

मिपावर रहायचे असेल तर हे सगळं करावं लागतं. असं म्हणण्याची पद्धत आहे.

भागो's picture

31 Mar 2024 - 11:20 pm | भागो

थॅंक्यू सर.
पण मालकांनी ठरवलं कि माझा आयडी उडवायचा ठरवलच तर आपण काय करणार?
अजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥
Virtuous men go about collecting knowledge and wealth as if they will live for ever. When it comes to following Dharma, they never procrastinate. They perform their duties as if death is holding them by their hair.

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2024 - 6:36 am | कर्नलतपस्वी

संदिप खरे यांची कवीता आठवते,

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीतून कागद काढून सहीस पाठवतो

हे असे रोज,

भागो's picture

2 Apr 2024 - 8:06 am | भागो

अगदी अगदी पटलं.

विवेकपटाईत's picture

1 Apr 2024 - 6:39 pm | विवेकपटाईत

दिल्लीकरांना असले प्रश्न पडत नाही. लग्नात केल्यावर त्यांचे लक्ष पहिले खाद्य पदार्थांकडे असते. किमान पंधरा-वीस वेगवेगळे स्नेक खाण्यासाठी असतातच. पाणीपुरी आलू टिक्की दही भल्ले चाऊ मीन पनीर टिक्का गोबी मंचुरियन फ्रूट चाट इत्यादी. सूप कोल्ड्रिंक इत्यादी ही. हे झाले रात्री साडे सात ते ९ वाजे पर्यंत. नंतर एक ते दीड तास जेवण. जेवणात ही दहा ते बारा पदार्थ कमीत कमी राहतात. आईस क्रीम कॉफी गुलाबजाम रबडी जलेबी इत्यादी स्वीट. वेळ मिळाला की व्यवहार करून टाकावा. ओळख नसली तरी काही फरक पडत नाही.

एखाद धागा उडविला तरी निराश होण्याचे कारण नाही.दुसरा टाकता येतो.
.

ओळख नसली तरी काही फरक पडत नाही. >>> ह्यावर मी एक मजेशीर कथा वाचली होती. एक गरीब म्हातारा सीझनमध्ये हेच धंदे करत असे. एकदा मात्र तो चांगलाच गोत्यात येतो. अत्यंत मजेशीर कथा होती.

ह्या लेखामागची भूमिका एव्हढीच होती कि समाजाचे आपल्यावर केव्हढे बंधन असते हे अधोरेखी करणे. आता तर फेसबुक इत्यादी प्रकाराने ते अजून घट्ट होत चालले आहे. "लाईक"चा व्यवस्थित लेखा जोखा ठेवला जातो. कुणी किती दिले त्याची परतफेड आठवून केली जाते.
ह्याचाच अत्यंत बोरिंग प्रकार म्हणजे "अल्बम." सहलीचे, लग्नाचे, डोहाळे जेवणाचे,( बेबी शॉवर?) वाढदिवसाचे इत्यादी. आपण बघत रहातो, मधेच विचारतो "हे कोण रे?" मित्र त्याचीच वाट बघत असतो. मग एक नवीन अध्याय सुरु होतो. गुळगुळीत वाक्यांची देवाण घेवाण चालू होते. सगळा प्रकार स्वतंत्र विनोदी धाग्याचा विषय आहे.
काका, आभार. पण माझा अजून एकही धागा उडवला गेलेला नाही.