द्वेष्टे -भाग 2

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
18 Feb 2024 - 12:00 pm

त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता.

जर काही अभद्र घडले असेल तर.... तर मी जिवंत राहू शकणार नाहीं...तो स्वताशी म्हणाला.डॉक्टरांना घेऊन तो आत दिवाणखान्यात शिरला .अस्वस्थपणे तो आपले हात चोळत होता. तिथे असलेली शांतता पाहून तो म्हणाला, 'इथे काही गडबड गोंधळ दिसत नाही त्याअर्थी अजूनपर्यंत तरी सारे ठीक दिसते आहे.'

दिवाणखान्यात कसलेहीआवाज किंवा कुणाचीही चाहूल नव्हती. प्रकाशाने उजळलेले ते घर गाढ झोपी गेल्यासारखं दिसत होतं. इतका वेळ एकमेकांसोबत अंधारात असणारे डॉक्टर किरिलोव आणि ॲबोजीन एकमेकांना नीट बघू शकत होते .डॉक्टर उंच, पाठीत थोडे वाकलेले, गबाळा पोषाख केलले होते. त्यांचा चेहरा निर्विकार होता.त्यावर एक प्रकारचा कडवटपणा भरला होता.त्यांचे ओठ जाड होते आणि नाक गरुडाच्या चोचीसारखं बाकदार होतं. केस विस्कटलेले होते. कपाळ ओढलेले होतं आणि त्यांच्या दाढीचे केस पांढरे होऊ लागले होते. या साऱ्या गोष्टी त्यांचं गबाळं व्यक्तिमत्व आणि चमत्कारिकपणा दाखवत होत्या .त्यांनी आजवर सोसलेल्या शारिरीक आणि मानसिक दुःखाचं हे सारं द्योतक होतं. पण त्यांच्या चेह-यावरील कठोरपणा बघता कुणाला खरं वाटलं नसतं की या व्यक्तीच्या घरी काही घडलं असेल.

याऊलट ॲबोजिन अगदीच वेगळा होता. शरीराने धट्टाकट्टा, भुऱ्या केसांचा, रुंद चेह-याचा पण नाजुक नाकडोळ्यांचा.तोअगदी अद्ययावत पोषाखात होता.गाडीम‌धे असताना त्याचा तो तंग कोट, मानेवर सिंहाच्या आयाळीसारखे रुळणारे ते लांब केस हे तो कुलीन घराण्यातील असल्याची साक्ष देत होते. चालताना त्याची नजर समोर होती आणि छाती ताठ होती. बोलताना तो मध्यम आवाजात बोलत होता आणि त्याच्या स्कार्फ काढण्यात किंवा मानेवरील केस नीट करण्याच्या हालचालीत किंचीत बायकी अंदाज होता. जिन्याकडून वर बघताना त्याच्या झालेला म्लान चेहरा आणि त्यावरील भिती असून देखील त्याचा रुबाब कमी होत नव्हता.

जिना चढता चढता तो पुटपुटला, 'इथे कुणीच दिसत नाही . कुणाचाच आवाज येत नाही. काही गडबड नाही, गोंधळ नाही, ईश्वरा, सारं काही ठीक असू दे!'

तो डॉक्टरना घेऊन आतल्या भव्य दिवाणखान्यात गेला.तिथे एक मोठा पियानो चमकदार पांढ-या आवरणाने झाकलेला होता. तिथून ते एका लहान पण सुंदर अशा सजवलेल्या खोलीत आले .ती खोली अतिशय उबदार होती आणि मंद असा प्रकाश खोलीभर पसरला होता.

'जरा इथे थांबा हं, डॉक्टर,' ॲबोजीन म्हणाला, 'मी पुढच्याच सेकंदाला येतो. मी फक्त जाऊन बघतो आणि सांगतो.....'

किरोलोव एकटाच उरला. दिवाणखान्यातलं ऐश्वर्य, सुखद प्रकाश आणि अनोळखी जागा या कशाचाही किरीलोववर परिणाम झाला नाही. आपले कार्बोलिक अँसिडने जळलेले हात बघत तो एका खुर्चीवर बसला. त्याच्या समोर एक लाल रंगाची दिव्याची शेड होती.एक सेलो वाद्याची पेटी दिसत होती. उजवीकडे भिंतीवर टांगलेले घड्याळ टिक टिक करत होतं बाजूला पेंढा भरलेले कोल्हयाचं मुंडकं टांगलेले होतं.
कोल्हयाचं तोंड त्याला ॲबोजीन सारखंच भासलं.

मात्र सगळीकडे स्तब्ध होतं.. काही वेळाने दूरून कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. एकदा ओह! म्हणून दार आपटल्याचा आवाज आला आणि पुन्हा सारं स्तब्ध झालं. पाच मिनिटं गेली. किरोलोवने आपले हात बघणं बंद केलं होतं.त्याने नजर उचलली आणि ॲबोजीन ज्या दारातून अदृष्य झाला होता तिकडे तो बघू लागला.

ॲबोजीन उंबरठ्‌यावर उभा घेता, पण आत गेलेल्या ॲबोजीनपेक्षा हा निराळा होता. चेहरा, शरीराच्या हालचाली सारं काही भयाने, यातनांमुळे व्हावं तसं विकृत दिसत होतं. त्याचे नाक, ओठ, मिश्यांची विचित्र हालचाल होत होती. पण डोळे मात्र वेदनेने हसत होते.

ॲबोजीन थोडा वाकुन, लांब ढांगा टाकत खोलीत आला. त्याने हाताची मूठ घट्ट आवळली होती .

'फसवलं! ' तो शब्दावर जोर देत ओरडला.' तिने मला फसवलं! ती गेली! ती गेली! आजारी पडण्याचं नाटक करुन मला डॉक्टर आणण्यासाठी पाठवलं ते...ते... ते केवळ त्या मूर्ख पॅपचिन्स्कीबरोबर पळून जाण्यासाठी! हे काय झालं?" ॲबोजीन आपली गोरी मूठ डॉक्टरच्या चेह-यासमोर नाचवत म्हणाला,
' ती पळून गेली! मला फसवून गेली ! पण हा खोटेपणा कशासाठी? देवा! देवा! ही घाणेरडी खेळी कशासाठी ? हा नीचपणा कशासाठी? माझा काय दोष होता?

त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .तो वळला आणि खोलीत येरझारा घालू लागला. त्याची अरुंद पायांची पँट आणि तोकड्या जाकिटात फिरणारी आकृती चिडलेल्या सिंहासारखी दिसत होती. डॉक्टरच्या निर्विकार चेह-यावर कुतूहल उमटले आणि उठून उभा रहात त्यानी ॲबोजीनला विचारलं,' वेल, पेशंट कुठे आहे?'

'पेशंट? पेशंट?' विकृत हसत ॲबोजीन म्हणाला. तो अजूनही थरथरत होता. .

'ती..ती पेशंट नाही, हरामखोर आहे. नीच आहे. भ्याड आहे .एखाद्या सैतानाने देखील असा खेळ खेळला नसता. तिने मला त्या मूर्ख, विदुषकासोबत पळून जाता यावं म्हणून...... त्यापेक्षा ती मेली असती तर बरं झाल असतं. मला तर सहनच होत नाही आहे हे!'

डॉक्टर ताठ उभे राहिले. त्यांचे डोळे अश्रुंनी भरले. त्यांची दाढी हनुवटीवर थरथरू लागली. त्यांचा जबडा डाव्या उजव्या बाजूला होऊ लागला

हे सगळं काय आहे?' तो वैतागून म्हणाले.

'तिकडे माझा मुलगा मृत झाला आहे. दुःखाने यातना भोगत माझी पत्नी घरात एकटी आहे...माझ्या पायावर मी कसाबसा उभा आहे.गेल्या तीन रात्री माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही ....आणि मला या बीभत्स खेळात रंगमंचावरची एक वस्तू म्हणून उभं केलं गेलं आहे! हे काय चालले आहे मला समजू
शकेल का?'

ॲबोजीनने आपली मूठ उघडली आणि त्यातून एक चुरगळलेली चिट्ठी जमिनीवर टाकली. एरवादा किडा चिरडावा तशी चिरडली.

'मला समजत नाही, समजत नाही... 'तो दातओठ खात मूठ उगारत म्हणाला. त्याच्या मर्मावर आघात केल्याचे भाव त्याच्या चेह-यावर उमटले होते.' मला कसं लक्षात आलं नाही की तो रोज आम्हाला भेटायला का यायचा? आणि एरवी कधी न आणणारा आजच नेमका तो घोडागाडी का घेऊन आला? हे माझ्या लक्षात कसं आलं नाही? '

'हा काय प्रकार आहे? छे! छे! हे काय चाललं आहे? डॉक्टर पुटपुटले. ' या सगळ्याचा अर्थ काय? ही निव्वळ थट्टा आहे.माणसाच्या यातनांची कुणीतरी केलेली भयानक थट्टा आहे. अशक्य.. निव्वळ अशक्य ....माझ्या आजवरच्या आयुष्यात मी असं कधी पाहिलंच नाही.'

आपली कोणीतरी क्रूर चेष्टा केल्याचं आश्चर्य वाटलेल्या डॉक्टरने आपले खांदे उडवले, आणि हातवारे केले . काय बोलावं ,काय करावं हे न समजल्याने ते पुन्हा खुर्चीत कोसळले.

'आता तिचं माझ्यावर प्रेम उरलं नाही. दुसऱ्या कुणावर तरी ती प्रेम करते. ठीक आहे. पण हा असला गलिच्छ डाव कशासाठी?'
ॲबोजीनचा गळा भरून आला होता.
'का? का? अग काय घोडं मारलं होतं मी तुझं? डॉक्टर, ऐका ना...' तो किरिलोवपाशी येत म्हणाला .' तुम्ही माझ्या ह्या दुदैॅवाचे अनैच्छिक साक्षीदार आहातआणि मला सत्य तुमच्या पासून दडवायचं नाही. देवाशपथ सांगतो मी या बाईवर मनापासून प्रेम केलं . तिच्या प्रेमाचा गुलाम होतो म्हणा ना! तिच्या साठी मी सर्वस्वाचा त्याग केला. मी माझं कुटुंब सोडलं, माझी नोकरी सोडली, माझं संगीत सोडलं. माझ्या आई किंवा बहिणीच्या ज्या गोष्टी मी माफ केल्या नसत्या त्या गोष्टी तिला माफ केल्या. आयुष्यात चुकूनही कधी मी तिला रागावलो नाही, तिच्यावर चिडलो नाही .मग तरीदेखील हा खोटेपणा का? प्रेम नको करूस पण ही घृणास्पद फसवणूक का ?'

अश्रूभरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या शरीराने ॲबोजीन आपली व्यथा डॉक्टरांना सांगत होता. डॉक्टरांचे हात आपल्या हृदयाशी धरून तो उत्कटतेने बोलत होता .आपलं खाजगी आयुष्य त्याने डॉक्टरांसमोर उघड केलं होतं. तासभर तो बोलत होता आणि व आपले मन त्याने मोकळं केलं होतं.

आता तुम्ही सांगा,ॲबोजीनची कहाणी जर सहानुभूतीपूर्वक डॉक्टरनी ऐकली असती, आणि नेहमी घडते तसे घडलं असतं तर ॲबोजीनच्या दुःखाशी निःसंदिग्धपणे ते समरस झाले असते की नाही? पण प्रत्यक्षात घडलं उलटंच! जेका ॲबोजीन बोलत होता त्यावेळी डॉक्टरांची चर्या पूर्ण बदलली होती. विरक्तपणा आणि आश्चर्याची जागा आता कडवट संतापाने घेतली होती. त्यांचा चेहरा अधिक कठोर झाला होता ,उग्र झाला होता.

अँबोजीनने जेव्हा आपल्या पत्नीचा फोटो डॉक्टरांसमोर धरला आणि विचारू लागला... 'हया सुंदर पण ननसारखा कोरा चेहरा असलेल्या स्त्रीकडून अशी अपेक्षा कुणी करेल का?'

त्यावर डॉक्टर अचानक आपलं डोकं नाचवत आणि आपल्या प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाले, 'हे सगळं तुम्ही मला कशाला सांगता आहात? हे ऐकण्यात मला काहीच रस नाही आणि मला तशी इच्छाही नाही.' रागाने त्यांनी आपली मूठ टेबलावर आपटली .'तुमच्या या फालतू ,असभ्य, खाजगी गोष्टी ऐकण्याची माझी इच्छा नाही. खड्‌डयात गेल्या त्या गोष्टी! यापुढे एक शब्दही उच्चारु नका! माझा अजून पुरेसा अपमान झाला नाही, असं वाटतंय का तुम्हाला? का हा अपमान करून घेण्यासाठी मी लाचार आहे? काय?

ॲबोजीन किरीलोवपासून दूर झाला आणि
आश्चर्याने त्याच्याकडे एकटक पाहू लागला.

'तुम्ही मला इथे कशासाठी घेऊन आला होतात?' डॉक्टर पुढे रागाने थरथरत बोलू लागले ,'अपेक्षा ठेऊन लग्न करता. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की रागावता, तमाशे करता? या सगळ्यात मी कुठे येतो? या प्रेमप्रकर‌णात माझा काय संबंध ? तुमचे विचार, तुमचं वागणं, तुमची नाटकं चालू देत. मी जातो...

डॉक्टरने सेलो वाद्याच्या पेटीकडे बघत म्हटलं....'तुमची ती डबल बास ,ट्राॅम्बन (वाद्यं),तुमचं ते बेगडी आयुष्य तुम्हाला लखलाभ होवो.पण माझ्यासारख्या साध्या माणसाचा असा तमाशा करू नका! जर आदराने वागू शकत नसलात तर निदान त्याच्या नादी तरी लागू नका. '

'काय म्हणायचं काय आहे तुम्हाला डॉक्टर ?'

'याचा अर्थ की तुमचं वर्तन हे नीचपणाचं आहे आणि तुम्ही एका सज्जन माणसाशी घृणास्पद रीत्या वागत आहात! मी एक डॉक्टर आहे. आणि तुम्ही एका डॉक्टर किंवा कुठल्याही प्रकारचं काम कर‌णा-या माणसांना तुम्ही मजूर किंवा पैसे फेकून विकत घेऊ शकणारे समजता. तुमच्या पायातील वहाण समजता! ते राहू दे. पण एखाद्या माणसाला तुमची मालमत्ता समजण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

'तुमची हिम्मत कशी झाली हे बोलण्याची?' ॲबोजीनने विचारलं. डाॅक्टरांच्या चेह-यावर पुन्हा एकदा रागीट भाव दिसू लागले. ' मी इतक्या दुःखात असताना हे असलं मला कसं ऐकवू शकता? दुस-याच्या दुःखाचा तमाशा करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?'

' वेड लागलं आहे तुम्हाला ' ॲबोजीन ओरडला. 'तुम्ही अत्यंत क्षुद्र आहात .मी इतका दुःखात बुडलो आहे आणि ....आणि.....'

'दुःखी ...' डॉक्टर तुच्छतेने हसत म्हणाले. ' हा शब्ददेखील उच्चारु नका. तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. उधळ्या लोकांना बिल भरायला पैसे नसतात तेव्हा तेही दुःखी होतात.
कोंबडं कापतात तेव्हा तेही दुखी होतं. दीडदमडीची माणसं तुम्ही!

' तुम्ही तोंड सांभाळून बोला, सर' ॲबोजीन कर्कशपणे ओरडला .' या असं बोलणा-यांना फटकावून काढतात. समजलं का?'

ॲबोजीनने आपल्या खिशात हात घातला आणि दोन नोटा काढून नाचवत टेबलावर ठेवल्या. तो म्हणाला ....ही तुमची फी... नाकपुड्या थरथरवत तो म्हणाला.

'थुंकतो तुमच्या पैशावर ' डॉक्टर म्हणाले आणि टेबलावरच्या नोटा त्यांनी लोटून दिल्या. 'माझ्या अपमानाची भरपाई तुम्ही पैशाने नाही करु शकत!"

ॲबोजीन आणि डॉक्टर एकमेकांचा गैरवाजवी अपमान करत एकमेकांसमोर उभे होते. त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अगदी आवेशात बोलतानाही कधी ते इतकं वाईट, कठोर बोलले नव्हते.आपापल्या दुःखाचा अहंकार दोघांच्याही ठिकाणी ठळकपणे दिसत होता .

असंतुष्ट माणसं ही नेहमीच स्वार्थी, विकृत आणि अन्यायी असतात आणि दुस-याला समजून घेण्यासाठी असमर्थ असतात. दुःख ,असंतुष्टता लोकांना जवळ आणत नाही तर एकमेकांपासून दूर करतं.असं वाटतं की दुःखामुळे माणसं एकत्र येतील पण प्रत्यक्षात मात्र,समाधानी माणसांपेक्षा,त्यांच्याकडूनच अधिक अन्याय होतो, क्रूरपणाची वर्तणूक घडते.

"मला घरी पोचवायची व्यवस्था करा' धुसफुसत डॉक्टर ओरडले.

ॲबोजीनने जोरजोराने घंटी वाजवली पण कुणीच आलं नाही .त्याने पुन्हा एकदा घंटी वाजवली आणि रागाने घंटी जमिनीवर आदळली. ती कार्पेटवर गडगडली आणि मृत्यूसमयीची घरघर ऐकू यावी तसा आवाज करत स्थिरावली.काही क्षणांनी नोकर आला.

'हरामखोर, कुठे बुडी मारुन बसला होतास?' त्याचा मालक मुठी आवळत म्हणाला. 'कुठे उलथला होतास? त्या गाडीवानाला गाडी आणायला सांग आणि या गृहस्थांना घरी पोचवायला सांग.आणि हो माझी ब्रूहम (चारचाकी बंदिस्त घोडागाडी / Brougham) तयार करा ...जरा थांब....' त्याने जायला निघालेल्या नोकराला थांबवलं. ' उद्यापर्यंत इथे एकही गद्दार मला दिसता कामा नये. सामान बांधा आपापलं. मी नवीन माणसे नेमीन... नालायक, हलकट....

ॲबोजीनचं बोलणं होईपर्यंत डॉक्टर गप्प उभे होते. ॲबोजीनच्या चेह-यावर पुन्हा एकदा सौम्य भाव परतले होते. तो दिवाणखान्यात येरझारा घालू लागला. तो काहीतरी योजना आखत होता हे स्पष्टच दिसत होतं, त्याचा राग
शांत झाला नव्हता पण त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्याच्या द्वेष्टयासमोर तो न दाखवण्याची काळजी तो घेत होता. टेबलाच्या कडेला हात धरून डॉक्टर उभे होते. एखादी शोकमग्न ,दुखी व्यक्ती दुस-याच्या चेहयावरचं समाधान, तृप्ती बघुन ज्या उपेक्षित, तुच्छ नजरेने बघेल ,त्याच नजरेने ते ॲबोजीनकडे पहात होते.

काही वेळानंतर, घोडागाडीत बसून डॉक्टर आपल्या घराकडे निघाले. त्यांच्या नजरेत अजून‌ही तुच्छता भरलेली होती. वाटेत अंधार होता, तासभरापूर्वीपेक्षाही अधिक दाट!
तांबूस अर्धचंद्र टेकडीपलीकडे गेला होता आणि ढगांमागे चांदण्याही झाकल्या गेल्या होत्या.

रस्ताभर ॲबोजीनचा निषेध त्यांच्या मनात साचला होता. सारा वेळ त्यांच्या डोक्यात, ना त्यांच्या पत्नीचा ना त्यांच्या मृत अँन्ड्रीचा विचार होता तर केवळ ॲबोजीनचाच विचार होता.त्यांचे विचार अत्यंत क्रूर, माणुसकीला न शोभणारे होते .मनातल्या मनात त्यांनी ॲबोजीन, त्याची पत्नी, पॅपचिन्स्की आणि ॲबोजीनसारख्या उच्चवर्णीय लोकांना मृत्यूदंडाची सजा ठोठावली.रस्ताभर ते त्याचा तिरस्कार करत राहिले. त्याच्या विषयी तयार झालेले त्यांचं मत आता कायमचं दृढ झालं होतं .

काळ सरेल आणि किरोलोवचा शोकदेखील कमी होईल पण अयोग्य आणि माणुसकीला न शोभणारं असं ते एकमेकांविषयी दृढ झालेलं मत कधीच बदलणार नाही......दोन चांगले जीव एकमेकांचे द्वेष्टे झाले होते ....अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत!

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Feb 2024 - 12:07 pm | मुक्त विहारि

छान आहे

नूतन's picture

20 Feb 2024 - 12:24 am | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

नावातकायआहे's picture

19 Feb 2024 - 2:47 pm | नावातकायआहे

पुभाप्र

नूतन's picture

20 Feb 2024 - 12:25 am | नूतन

हाच शेवटचा भाग आहे

सुधीर कांदळकर's picture

19 Feb 2024 - 8:14 pm | सुधीर कांदळकर

मूळ कथानक जबरदस्त आहे. वातावरणनिर्मिती करणारे सकस वर्णन छान जमले आहे. वेगवान, ओघवत्या भाषेतला अनुवाद प्रत्ययकारी वाटला. काहीतरी अप्रतिम वाचल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद.

नूतन's picture

20 Feb 2024 - 12:26 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार.

स्मिताके's picture

19 Feb 2024 - 9:36 pm | स्मिताके

विदारक भावनांचा खेळ किती समर्पक शब्दांत मांडला आहे. छान भाषांतर. ही कथा यापूर्वी वाचली नव्हती. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!

नूतन's picture

20 Feb 2024 - 12:26 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

नूतन's picture

20 Feb 2024 - 12:27 am | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार

अहिरावण's picture

23 Feb 2024 - 12:34 pm | अहिरावण

सुंदर

नूतन's picture

23 Feb 2024 - 5:31 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

टर्मीनेटर's picture

26 Feb 2024 - 2:49 pm | टर्मीनेटर

मस्त! अनुवादित कथा आवडली 👍

अवांतर:
मला कथेतल्या "चेखाॅव, किरीलोव, ग्नोशेव्ह" वगैरे सारखी आणि अन्यही रशियन 'आडनावे' आवडतात 😀

नाव + आडनाव कसे भारदस्त हवे, 'धुरंधर भाटवडेकर' (चित्रपट - रंग बिरंगी) वगैरे सारखे 😀

अँडरसन, पीटरसन, 'अमुक'सन, 'तमुक'सन, 'अमुक'स्मिथ, 'तमुक'स्मिथ सारख्या बुळचट/पुळचट आडनावांपेक्षा आपली भारतीय आणि रशियन आडनावे मला नेहमीच भारदस्त वाटतात 😂

नूतन's picture

27 Feb 2024 - 9:49 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अवांतर+१

श्वेता व्यास's picture

28 Feb 2024 - 12:15 pm | श्वेता व्यास

अनुवाद आणि कथा दोन्ही आवडले.
मानवी भावनांचं सुरेख वर्णन आलं आहे. सामान्य माणूस असण्याच्या मर्यादा कुठे उघड पडतात याचं उत्तम चित्रण कथेमध्ये आहे.

स्वधर्म's picture

28 Feb 2024 - 7:21 pm | स्वधर्म

खरे तर चेकॉव्ह यांचे काही वाचले नव्हते, पण कथा अनुवादित असूनही त्याला एवढा मोठा लेखक का मानले जाते हे समजते.

नूतन's picture

29 Feb 2024 - 11:14 am | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद