क्रॉसओव्हर आणि परत माघारी
नोकरीसाठी वणवण पायपीट करणाऱ्या चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता.
नोकरीसाठी दिसेल त्या ठिकाणी अर्ज टाकण्याचा त्याने सपाटा लावला होता. एमएस्सी फिजिक्स करून देखील त्याला म्हणाव्या तश्या नोकरीचे इंटरव्यू कॉल देखील येत नव्हते. नोकरी मिळायची तर गोष्टच निराळी, त्याने कुठे कुठे अर्ज नाही केले? काही दिवस त्याने कुरिअर बॉयची नोकरी केली, काही दिवस मॉलमध्ये सामान हलवून शेल्फवर लावायची हमाली केली. काही दिवस कॉल सेंटर मध्ये नोकरी करत परदेशी लोकांच्या शिव्या खाल्ल्या. ज्या वेगाने त्याने नोकऱ्या धरल्या त्याच वेगाने सोडल्या. कारणंही तशीच होती.
एकदा मॉलमध्ये बिस्किटांचे पुडे रॅकवर लावताना त्याला कॉलेजमधली सोनाली भेटली. “अय्या तुम्हाला पण ही बिस्किटं आवडतात? मला पण! आपल्या आवडी निवडी कित्ती मिळत्या जुळत्या आहेत नै. तू काय करतोस सध्या? ”
“मी ना? मी फलाणा ढिकाना कंपनीत अमुक तमुक आहे.” मी कशी बशी वेळ मारून नेली. दुसरे काय सांगणार? एकदा वाटले की तिला सांगावे, मी इथे ”डिस्प्ले मॅनेजर” आहे म्हणून. “आणि तू काय करते आहेस?”
“मी ना मी किनई कायाकल्प क्लिनिक मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे.”
म्हणजे ही बहुतेक रिसेप्शनिस्ट असणार. आज इथे आमच्याकडे ”डिस्प्ले मॅनेजर” च्या पोस्टसाठी इंटरव्यू होते. त्यासाठीतर ही आली नसेल ना? मी तत्काळ ती नोकरी सोडून दिली. मॉलमध्ये, कुरिअरवाल्यांकडे काय किंवा कॉल सेंटर मध्ये काय नोकऱ्या केव्हाही मिळतात. आता पहा माझ्या ओळखीचा एक सिनिअर आहे. त्याने पैसे भरून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्याचा बाप व्यवहारी होता. इंजिनिअरिंगला काही लाख टाकण्यापेक्षा तेव्द्याच पैशाचे बँकेकडून कर्ज घेऊन चहा, भजी, वडापावचा स्टॉल टाकणे ज्यास्त फायदेशीर आहे असं त्याचं प्रामाणिक मत होते. त्याने मुलाला निक्षून सांगितले, “हे तुझ्याचानं आणि माझ्याचानं होण्यासारखे नाही. तुला अभ्यास झेपणार नाही आणि मला खर्च झेपणार नाही. तेव्हा हा नाद सोड.” मुलगा बापापेक्षा जास्त जिद्दी. “तुमच्याकडे पैशासाठी तोंड वेंगाडणार नाही. मग तर झालं?” त्याला दरवर्षी एटीकेटी का काय ते मिळत गेली. कॉलेज बंद झाले की तो कॉल सेंटरला जाऊन नोकरी करायचा, थोडे पैसे जमवायचा. एटीकेटी सरली की पुन्हा कॉलेज सुरु. असं करत करत तो सहा वर्षांत बीई झाला. त्याच कॉल सेंटर मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी सुरु केली. ते कॉल सेंटर म्हणजे जणू काय त्याचं दुसरं घर होतं.
तर नोकरीसाठी वणवण पायपीट करणारया चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. त्याला त्याच्याच कॉलेजमध्ये फिजिक्स डिपार्टर्मेंटमध्ये डेमोचा इंटरव्यू कॉल होता. ही नोकरी त्यालाच मिळणार ह्याची त्याला खात्री होती. सरांशी-म्हणजे एचओडींशी- त्याचं बोलणं झालेलं होत. सारं काही सेट झालं होत. इंटरव्यू केवळ नाममात्र, सोपस्कार म्हणून.
चिंटूचे तीर्थरूप त्याला नेहमी ऐकवत असत, ते आज ही बाहेर पडायच्या वेळेला बोलले, “चिंट्या लेका, तुझ्या कुंडलीत ग्रह असे फिट्ट जागा पकडून बसले आहेत की. त्यातून आज आहे अमावस्या. वर शुक्रवार- तुझा घातवार. बघ ट्रायल घेऊन बघ काय होत ते.” चिंटू तीर्थरूपांचे असे बोल मनावर घेणाऱ्यापैकी नव्हता. कारण हे डायलॉग रोजचेच झाले होते.
“बाबा, बघा आज मी नेमणुकीचे पत्र घेऊनच घरी येणार!”
“अस्स? अरे वा!” बाबा त्याची चेष्टा करत उद्गारले, “हा पहा आमचा शूरवीर चिंतो अप्पाजी चालला ग्रहगोलांशी कुस्ती खेळायला. आकाशस्थ देवदेवतांनो ढोल, नगारे, पडघम, शंखभेरी, श्रृंगें, टिमकी, तुताऱ्या, दुंदुभी, काहाळ, धामामा, पुंगी, टाळ, मृदंग, मोहरी सगळी वाद्ये वाजवा आणि पुष्पवृष्टी करून आमच्या चिंटूला आशीर्वाद द्या.”
चिंटू ह्या कुचेष्टेकडे दुर्लक्ष करीत कॉलेजकडे निघाला. कॉलेजला पोचला तर काय सगळीकडे ओसाड. चिटपाखरू पण नाही. धडधडत्या अंतःकरणाने पुढे गेला. तो बाहेर काळी पाटी!
“कळवण्यास अतीव खेद आहे की आपल्या सर्वांचे आवडते, लोकप्रिय प्राध्यापक मा. डॉक्टर फिकीरनॉट आज सकाळी आठ वाजून चार मिनिटे आणि साडेबत्तीस सेकंदांनी ईश्वर चरणी विलीन झाले. देव मृतात्म्यास शांति देवो. शोकसभा संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता ए-६ क्लासरूम मध्ये.”
हुकमावरून.
कुठला इंटरव्यू आणि कसल काय. अश्याप्रकारे चिंटूच्या तीर्थरूपांची बत्तीशी खरी ठरली. चिंटूने स्वतःला ढकलत ढकलत घराची वाट पकडली. चिंटू चालू लागला.
रेल्वेचा क्रॉसओवर ब्रिज ओलांडला की पलीकडे त्याला घराकडे जाणारी बस मिळणार होती.पुलावर नेहमीप्रमाणे खेचाकेच गर्दी होती. तिकडे जाणाऱ्या आणि तिकडून इकडे येणाऱ्या लोकांची गर्दी. लोक इतक्या घाईत की आयुष्य जणू काय त्या क्रॉसओव्हरवर अवलंबून होते. पलीकडे गेले की तेथे सुखाची सुपर फ़ास्ट एक्सप्रेस गाडी उभी असणार. घाई करायला पाहिजे नाही तर ती चुकायची! सगळ्या लोकांप्रमाणे चिंटूदेखील क्रॉसओव्हरच्या शोधात होता. पण हा पूल निश्चितच क्रॉसओव्हर नव्हता.
आज मात्र चिंटूला पलीकडे जायची घाई नव्हती. एक बस तर चुकली होतीच. अजून एक चुकेल! काय फरक पडतो? नशिबात असेल तर ती पण चुकणार नाही. घरी जायला हजार बश्या आहेत. घरातून बाहेर पडायला एकपण नाही. नशिबांत काय असेल ते होईल. पुलावर चालता चालता पूल कोसळला तर? दुसऱ्या बाजूच्या निसरड्या घसरड्या लोखंडी जिन्याच्या पायरीवरून पाय घसरला तर?
आयुष्याचे ओझे उचलत चिंटू जिना चढून वर आला. वर पुलावर नेहमीसारखीच माणसांची खेचाखेच गर्दी होती. लोकांनी तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल लावले होते. काहीजण जमिनीवरच पथारी पसुरून माल विकत होते. एक म्हातारी मिरच्यांचा वाटा लावून गिऱ्हाईकांची अधाशीपणाने वाट पहात होती. दुसरीकडे काळी टोपीवाला जोशी पोपट घेऊन बसला होता. समोर एक पाटी होती,
"देशबंधुंनो विचार करा, टॅॅरटपेक्षा पॅॅरट खरा."
त्याच्यासमोर कोणी दीनवाणा बापुडा होऊन आपले रडगाणे गात होता. जोश्याने पोपटाच्या पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाला मोकळे केले. पोपटाने तिरकी मान करून समोरच्याला एकदा नीट बघून घेतले, त्याच्या आयुष्याची कहाणी वाचली आणि एक पाकीट उचलून जोश्याच्या समोर टाकले. घे लेका तुझे भविष्य! जोश्याने बाजरीचे चार दाणे पोपटासमोर फेकले. पोपटाने त्यांच्याकडे तुच्छतापूर्वक दुर्लक्ष केले आणि तो ‘पोपटांच्या जीवनाचे सार’ ह्या विषयावर गहन विचारमंथनात गढून गेला.
“लई माज चढला आहे रे तुला. फुकटचे गिळायला मिळतय ना.”
( चिंटूला क्षणभर वाटले कि आपले तीर्थरुपच बोलतायेत.)
जोश्याने पाकीट उघडून उकिडवा बसलेल्या समोरच्याला दिले.
“तुझ्या भविष्याचा तूच वाचनकार! बेटा वाच तुझे भविष्य तूच वाच.”
समोरच्याने निराशेने मान हलवली, “वाचता येत असतं तर आज मी कुठल्यातरी सोसायटीच्या गेटावर वाचमन नसतो झालो? तुम्हीच वाचा आणि मला सांगा.”
पाकीट उघडून जोश्याने छापील भविष्य वाचून दाखवायला सुरुवात केली.
पल्याड डोक्याला लाल पटका बांधलेला वैदू घोरपडीचा काढा आणि शिलाजित विकत होता. शिलाजित हासिल करायला किती जोखीम उचलावी लागते ते दाखवणारा चित्र फलक पुलाच्या कठड्यावर टांगलेला होता. त्या चित्रांत एक वैदू सिंह, अस्वल, मगर, अजगर ह्यांच्याशी लढत गिर्यारोहण करत पर्वतावरून शिलाजित आणणार असतो.
इकडून जाताना कधी चिंटूला आपले भविष्य बघायची हुक्की येत असे. पण आज त्याची गरज नव्हती. त्याचे भविष्य आता भूतकाळात जमा झाले होते. त्याला पुलावरच्या कोलाहलाची, गोंगाटाची आणि कलकलाटाची टोकदार जाणीव झाली. गर्दीत कुणीतरी त्याला धक्का दिला आणि सॉरी म्हणायच्या ऐवजी उलट शिवी देऊन पुढे गेला. चिंटूने खिसे तपासले. पाकीट पैसे शाबूत असल्याची खात्री करून घेतली.(पाकिटात फक्त दहा रुपयेच होते म्हणा.) त्याने अर्धा पूल मागे टाकला होता.
पुलाच्या बाजूला थोडी बघे लोकांची गर्दी होती. गंमत म्हणून चिंटूने डोकावले. हा सेल्समन पुलावर नवीनच होता. एका घडीच्या टेबलावर छोट्या बाटल्या पडल्या होत्या. एक सँपल हातांत घेऊन तो जोरजोरांत लेक्चरबाजी करत होता. “मेहेरबान कद्रदान! दस रुपयोमे आपकी जिंदगी बनावो! दस रुपयोमे आपका लंगडा नसीब भागने लगेगा. क्या दस रुपये आपके जिंदगीसे भारी है? क्या आपके हरेक काममे बाधा आ रही है? क्या आपके जिंदगीमे बदलाव लाना चाहते है?”
“ऑफ कोर्स!” चिंटू स्वतःशीच बडबडला. दहा रुपयात जर नशीब बदलत असेल तर काय हरकत आहे? जर हा माणूस फ्राड असला तर? असु दे. लोक कोटी कोटींचा गफला करून गायब होतात. तिकडे पुलाच्या खालच्या बाजूला पन्नास रुपयात टेरीकॉटचा शर्ट विकणारे, पाचशे रुपयात मोबाईल विकणारे, जमिनीवर हातरुमाल पसरून तीन पत्ते फिरवणारे “बोलो एक्का किधर गया राणी किधर है” अजूनही असेच कितीतरी. तो सगळा पूल आणि आजूबाजूचा परिसर ह्यासाठीच तर प्रसिद्ध होता. पलीकडे चित्रपटगृह होते. तिथं काय चालत होतं? तिकिटाचे दोनशे रुपये वसूल करून लोकांना खोटी स्वप्ने विकायचा धंदा. तो मात्र मोठा सज्जनपणाचा.
जिंदगीमे बदलाव लाने के लिये चिंटू गर्दीत घुसला. चिंटूसाठी आजचा दिवस निराळाच होता. बदनसीबका मारा क्या कुछ नही करेगा. एक डाव ह्या बाटलीचा. होऊन जाऊ दे. गेले दहा रुपये तर गेले.
‘जीवन बदलू’ बाटली विकणारा एकदम हिरो स्टाईल होता. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची पद्धत चिंटूला मोहिनी घालणारी होती. त्याने एक बाटली उचलली. बाटलीचा स्पर्श होताक्षणी त्याच्या शरीरातून अनामिक लहर निघून गेली. बाटलीला नुसता स्पर्श केला तर उत्साह दाटून आला. मग आतले रंगीत पाणी प्यालो तर काय होईल?
“घेऊन टाका साहेब. माझ्या मित्राने एक बाटली घेतली तर तर त्याची लाखाची लाटरी लागली. मला पण एक घ्यायची आहे पण खिशात फक्त सात रुपये.” चिंटूच्या शेजारचा कोणी बडबडत होता. चिंटू विचारात पडला. घ्यावी कि न घ्यावी. त्याने बाटली पुन्हा खाली ठेवली.
मागून कुणीतरी चिंटूला धक्का दिली, “काय साहेब घेऊन टाका की.” तिसरा एक धटिंगण पुढे झाला, “ऐसा नही चलेगा. आपने चमडेका हात लगाया है. अब तो आपको लेनाच पडेगा.” हा त्या सेल्समनचा हंडीबाग असणार. चिंटू भांबावला. आपण पुरते फसलो ह्याची दुःखद जाणीव झाली. ही चक्क बळजबरी झाली. इतक्यात पुलाच्या एका टोकाकडून लोक पळत आले. “भागो. पोलीस पोलीस. म्यु्नसिपाल्टीवाले आये है. धंदा बंद करो. और भागो.”
पथारीवाल्यांची दाणादाण उडाली. सामान सुमान गोळा करून चादरीत, बॅग मध्ये भरून सटर फटर विकणाऱ्यांची पळापळ झाली. काही मिनिटातच पूल रिकामा झाला. गर्दी पांगली. लोक बऱ्या वाईट कॉमेंट्स टाकत चालू लागले.
“अरे ये पूरा नाटकबाजी है. अंदरसे सब मिले है.”
चिंटूच्या हातात ती रंगीबेरंगी बाटली तशीच राहिली. “आयला, मजाच आहे. दहा रुपये खिशात राहिले वर ‘नसीब बदलने वाली’ ती बाटली फुकट!” चिंटू खुश झाला. आता पूल उतरून खाली जावे आणि उडप्याकडे जाऊन चहा प्यावा.
अर्थात पूल उतरेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. त्या सेल्समनच्या कुण्या पित्त्याने पकडले तर? नाही चिंटूचे नशीब बलवत्तर होते. रंगी बेरंगी बाटली खिशांत टाकून चिंटू झपाट्याने पुढे चालू लागला. बाटलीपरी बाटली मिळाली वर दहा रुपये खिशातल्या खिशांत राहिले. आता स्वस्थ हॉटेलांत जाऊन चहा प्यावा. हॉटेलात तशी गर्दी होती पण चिंटूला जागा मिळाली.. अजूनही त्याला भीती वाटत होती. समजा त्या विक्रेत्याचा कोणी हंडीबाग आजूबाजूला असला तर? नसती आफत यायची. मनाची खात्री झाल्यावर चहाचा घुटका घेत त्याने हळूच खिशातून बाटली बाहेर काढली. चपट्या सहा इंची पव्वाच्या बाटलीच्या सारखीच ती बाटली होती. नाही म्हटले तरी खालीबाटलीवाल्याने पन्नास एक पैशांत ती बाटली विकत घेतली असती. ह्या बाटलीतल रंगी बेरंगी पाणी आपल्या जीवनात क्रांती घडवणार? आपल्याला नोकरी मिळवून देणार? काहीच्या काही मजा आहे खर. म्हणतात ना... दुनिया झुकती है१ झुकानेवाला चाहिये.
“मी इथे बसू? नाही म्हणजे तुमचं कोणी इथे बसलं नसेल तर.” ह्या वाक्याने चिंटू तंद्रीतून बाहेर आला. चिंटूच्या परवानगीची वाट न बघता तो समोरच्या जागेवर स्थानापन्न झाला सुद्धा. चिंटू थोडा आक्रसून बसला. समोर बसलेला असेल तीस–बत्तीसचा. वयापेक्षा जरा जास्त दिसत होता.
“अरेच्चा तुम्ही पण घेतली का?” चिंटूच्या हातातल्या बाटलीकडे त्याचे लक्ष होते. आपल्या खिशातून बाटली काढत तो म्हणाला, “ही पहा मी पण एक घेतली. ह्याने काय फायदा होईल? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटते? मी आपली अशीच घेतली. म्हटलं फायदा झाला तर झाला, नाही तर नाही. काय फरक पडतो?”
“हो ना. काय फरक पडतो? दहा रुपयांचा तर प्रश्न आहे. आजकाल दहा रुपयात काय मिळते.” चिंटूने त्याच्या होत हो मिसळले.
“माझे नाव काशीराम भोईटे. मी भय कथा, विचित्र कथा, थक्कथा अश्या गोष्टी लिहितो. तुम्ही कधी माझे नाव ऐकले आहे? नसणर, कारण मी तुमच्यासारख्या जेंटलमन लोकांसाठी नाही लिहित. माझ्या गोष्टी वाचणारे लोक तिकडे कामगार वस्तीत रहातात. ‘भुंगा’ नावाचे एक साप्ताहिक आहे. त्यांत दर रविवारी माझी एक गोष्ट असते. जरूर वाचा.” त्याने इकडे तिकडे खिसे चाचपले आणि आपल्या कापडी पिशवीतून एक मासिक बाहेर काढले, “अरे व्वा. मिळाला. तुमी पण राव काय लक्की आहात. हा पहा “पुणेरी माणसे” चा ताजा अंक. ह्यांत माझी “लाव जगाला भिंगरी” नावाची गोष्ट आली आहे. एवढे बोलून काशीने मासिक पुढे केले. नाईलाजास्तव चिंटूने अंक उचलला. “तुम्ही काय करता?”
“मी? मी चिंटू. गेल्या जून मध्ये ग्रॅजुएट झालो. नोकरी शोधतो आहे.”
“छान, मिळून जाईल हो. नाव तुमचे चिंतू असेल पण नोकरीची चिंता करू नका. ह्या ह्या ह्या.”
“भोईटे साहेब, आपली ओळख झाली. बर वाटलं. पुन्हा भेटू”
“का नाही? अवश्य भेटू. तेव्हढी ती “लाव जगाला भिंगरी” गोष्ट मात्र जरूर वाचा.”
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 4:39 pm | कर्नलतपस्वी
कथानक मनावर पकड घेत आहे. असा उमेदवारीचा काळ बहुतेक निम्न मध्यमवर्गीय मुलांच्या पत्रिकेत लिहीलेला असतो. क्राॅस ओव्हर पुला वरचे वर्णन वाचून दिल्ली कॅन्ट रेल्वे स्थानकाची आठवण आली.
'टॅरट पेक्षा पॅरट भारी', मार्केटिंग स्ट्रॅटेजी आवडली.
डिस्प्ले मॅनेजर, पब्लिक रिलेशन ऑफिसर गोंडस नावे, यावरून आठवले आमचा मेस कुक गावाकडच्यांना काय करतोस विचारल्यास चपाती क्लार्क म्हणून सांगायचा. चपाती तोडांतल्या तोडांत,"नरो वाः कुंजरो वाः", सारखं.
12 Nov 2023 - 10:38 pm | भागो
आभार,
पुलावरचे वर्णन दादर स्टेशन वरील तेल्वेच्या पुलाला धरून केले आहे. तेथून माझे रोज येणेजाणे असायचे.
पुण्याच्या एका गुऱ्हांळाच्या बाहेर पाटी होती
"देशबंधूंनो विचार करा- चहापेक्षा रस बरा." त्यावरून tarot parrot केले आहे. पण tarot चा उच्चार taro असा आहे. तेव्हढीच गंमत !