तुम्ही अमेरिकेत कुठल्याही रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल. बहुतेक रस्ते हे दुतर्फा असतील आणि मध्यभागी एक बहुतांशी पांढर्या रंगाची ओळ असेल जी लेन डिव्हाईड करते.
अनेक प्रकारच्या ओळी इथे शक्य आहेत पण आम्ही ४ प्रकार पाहु.
१. पांढरी अतूट रेखा
पांढरी रेखा नेहमी एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या लेन्स ना आखते. पण ती अतूट असली तर त्याचा अर्थ होतो कि तुम्हाला लेन बदलण्यास मनाई आहे. लेन बदलणे किंवा दुसरी लेन वापरून पुढील वाहनास "टेक ओव्हर" करण्यास मनाई आहे. टेक ओव्हर किंवा ओव्हरटेक ह्याला अमेरिकेत "पासिंग" म्हटले जाते.
वळणे, पूल अश्या विविध ठिकाणी तुम्हाला हि ओळ सापडेल.
२. पांढरी तुटक रेषा
रेषा तुटक आहे ह्याचा अर्थ तुम्ही लेन बदलू शकता.
भारतांत सुद्धा हाच नियम आहे आणि हल्ली हा नियम समजावून सांगणारा विडिओ व्हाट्सअँप वर वायरल झाला होता. थोडक्यांत लोक कित्येक दशके गाडी चालवत असले तरी ह्या नियमाची माहिती अनेकांना नव्हती.
३. पिवळी अतूट रेषा
रेषा पिवळी ह्याचा अर्थ विरुद्ध दिशेने जाण्यासाठी असलेली लेन आहे असा अर्थ होतो. लेन विरुद्ध दिशेची असली तरी तुम्ही विविध कारणासाठी ती वापरू शकता (तुटक असेल तरच).
- ओव्हरटेक करण्यासाठी
- डावीकडे वळण्यासाठी. (अमेरिकेत तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला चालवता त्यामुळे विरुद्ध दिशेची लेन नेहमी डावी कडे असते.
म्हणजेच इथे लेन बदलणे धोकादायक असते कारण चूक झाल्यास हेड ऑन कॉलिजन होऊ शकते. बहुतेक अमेरिकन रस्त्यावर ह्याचा अर्थ मृत्यू किंवा गंभीर दुखापत असा होतो.
पिवळी रेषा अतूट आहे ह्याचा अर्थ तुम्ही ती विरुद्ध दिशेची लेन अजिबात वापरू शकत नाही असा होतो. तुम्हाला जर ओव्हरटेक करायचे असेल किंवा डावीकडे वळायचे असेल तर तुम्हाला रेषा अतूट होई पर्यंत गाडी चालवावी लागेल.
४. पिवळी तुटक रेषा.
वर पहा.
--
अर्थांत इथे आणखीन नियम आहेत. अनेक वेळा ह्या रेखा "डबल" असतात. आणि ह्या डबल रेखा मधील एक अतूट आणि एक तुटक असू शकते. ह्याचा अर्थ ज्याच्या बाजूला तुटक आहे तो लेन बदलू शकतो पण ज्याच्या बाजूला अतूट आहे तो बदलू शकत नाही.
कॅलिफोर्निया आणि इतर काही राज्यांत सेंटर टर्न लेन हि संकल्पना सुद्धा आहे. इथे दोन लेन्स च्या मध्ये एक तिसरी लेन असते जी पिवळ्या रेखाणी आखलेली असते. ह्यांत तुम्ही सुमारे ४०० फूट पेक्षा जास्त अंतर चालवू शकत नाही, हि लेन फक्त विरुद्ध दिशेला टर्न घेण्यासाठी वापरायची असते.
--
आता हे सर्व झाले सामान्य ज्ञान ! बहुतेक अमेरिकन लोकांना हे सर्व ठाऊक असते. ह्याच प्रकारचे नियम भारतांत सुद्धा आहेत पण ठाऊक फक्त काहींनाच असतात आणि पालन आणखीन कमी होते.
पण ह्या सर्वांत एक विलक्षण गोष्ट आहे जी अगदी अमेरिकन मंडळींना सुद्धा ठाऊक नसते.
रस्त्याच्या मध्ये जी रेखा असते, त्यावर कधी कधी रेडियम वाले मार्कर असतात ज्यांना रेज्ड पेव्हमेंट मार्कर असे म्हणतात. हे साधारण ८ प्रकारचे आहेत. जिथे बर्फ पडतो तिथे विशेष स्नो प्लॉ सेफ (स्नो प्लॉ म्हणजे रस्त्यावरून बर्फ काढून फेकणारे मशीन) मार्कर्स असतात. रात्रीच्या वेळी ह्या मार्कर्स वरून प्रकाश परिवर्तित होऊन तुम्हाला लेन नक्की कुठे संपते हे समजते. बहुतांशी हे पिवळ्या रंगाचे असतात आणि अगदी बरोबर मध्ये लावले जातात.
पण जर तुम्ही साधारण रस्त्यावरून जास्त असाल (इंटरस्टेट किंवा फ्रीवे सोडून इतर राहवाशी आणि व्यावसायिक भागांतील रस्ते) तर तुम्हाला आढळेल कि कधी कधी अचानक मध्येच निळ्या रंगाचा मार्कर लावलेला असतो. आणि इतकेच नाही तर हा मार्कर कधीच अगदी मध्यभागी असत नाही तर थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूला असतो.
ह्या मार्कर चे प्रयोजन काय ? मुद्दाम आपल्या अमेरिकेतील मित्राना विचारून पहा.
अमेरिकेत साधारण रस्त्यावंर तुम्हाला "फायर हायड्रंट" सापडेल. ह्याचे दोन प्रमुख उपयोग आहेत. एक म्हणजे कुठेही आग लागली तर आगीचा बंब इथून पाणी घेऊ शकतो. आणि दुसरा उपयोग म्हणजे हॉलिवूड चित्रपटात गाडीची चेज असते तेंव्हा एखादी गाडी हमखास ह्याला उडवून सगळीकडे पाणी पसरवते, थोडक्यांत आमच्या चित्रपटात जी भूमिका केळेवाल्या हातगाडीची असते तीच भूमिका हॉलिवूड मध्ये फायर हायड्रंट ची असते.
आता तुम्ही फायरमन आहेत आणि तो बंब चालवत आहात. तुम्हाला मग तुमची गाडी ह्याच्या शेजारी पार्क करावी लागते. पण तुम्ही हा हायड्रंट शोधाल कसा ? गाडी चालवता चालवता आजूबाजूला पाहणे धोकादायक आहे. त्याशिवाय फायर हायड्रंट च्या बाजूला गाडी पार्क करणे बेकायदेशीर असले तरी काही ठोंबे ह्याचे पालन करतीलच असे नाही. त्यामुळे कुणी गाडी पार्क केल्यास तुम्हाला तो दिसणार सुद्धा नाही. कधी कधी बघ्यांची गर्दी, अपघात इत्यादी मुळे तो हायड्रंट दिसत नाही.
त्यासाठी हा निळा मार्कर असतो. हा उजवीला आहे कि डावीला आहे ते पाहून तुम्ही फायर हायड्रंट कुठे आहे हे समजू शकता. ह्याचा उपयोग फक्त अग्निबम्ब साठी असल्याने हे बहुतेक लोकांना ठाऊक नसते.
प्रतिक्रिया
17 Aug 2023 - 11:57 pm | चित्रगुप्त
वा. लेखमाला सुरू केलीत हे खूपच छान झाले. आता मुलाबरोबर गाडीतून जात असताना मुद्दाम बघत जाईन. पुढल्या एकाद्या भागात रस्त्यांची नावे कशी ठरवली जातात, उदा. कोर्ट, अवेन्यू, लेन, बुल्वार, रोड, स्ट्रीट इत्यादि बरेच प्रकार असतात त्यांचे वेगवेगळे अर्थ काय असतात हे दर्शवणारी आकृती दिल्यास फार उपयोगी होइल. पु.भा.प्र.
18 Aug 2023 - 4:30 am | निमी
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
18 Aug 2023 - 4:33 am | निमी
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
18 Aug 2023 - 12:14 am | चित्रगुप्त
आत्ता सहज गूगलाळवताना खालील चित्र दिसले. असेही काही असते हे बघून मौज वाटली. या सगळ्या प्रकारचे रस्ते एकाच आकृतीत देणारे चित्र मिळाले तर एकदम स्पष्ट कल्पना येईल.
18 Aug 2023 - 4:29 am | निमी
अशी माहिती भारीच मिळाली ओ...
18 Aug 2023 - 4:54 am | निमी
साहना, आपल्या विविध लेखन मधून आपले सखोल ज्ञान तर दिसतेच पण त्याचबरोबर ते उत्तम पद्धतीने आपण देत आहात याचे विशेष कौतुक..पुलेप्र...काही शब्द अनेक महिन्यांनी पुन्हा वाचताना मजा वाटली..उदाहरणार्थ ठोंब्या!!
18 Aug 2023 - 8:23 am | भुजंग पाटील
हो, कारण निळे रिफ्लेक्टर्स अगदी अलीकडेच (२००५ पासून) वापरात आले आहेत.
सेंटर टर्न लेन ला सुसाईड लेन पण म्हणतात.
18 Aug 2023 - 12:15 pm | कर्नलतपस्वी
एकच अपघात बघायला मिळाला. एक वेगळाच अनुभव होता.
18 Aug 2023 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
मालिका उत्तम होणार. पुभाप्र
दुसरा फोटो भारतातील दक्षिणेकडील वाटतो आहे. त्याच्यावरचे वाक्य तुम्हाला रेषा अतूट तूटक होई पर्यंत गाडी चालवावी लागेल. असे आहे का?