'अज्ञात पानिपत'

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
2 Jun 2023 - 1:30 pm

मर्वेन टेकनोलॉजीज् यांच्याद्वारे प्रकाशित 'अज्ञात पानिपत' या माझ्या आगामी मराठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली आहे. या पुस्तकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या पुस्तकाचे स्वरूप काय, ते कोणाला उपयुक्त ठरेल याविषयी थोडक्यात पुस्तक-परिचय इथे करून देतो आहे.

मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत. यात केवळ पानिपत-युद्धाचा इतिहासच नाही तर युधशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, नकाशे इत्यादी वापरून इतिहासाचे विश्लेषणही केलेले आहे.

आज पानिपतवर लिहिले जाणारे ग्रंथ, कथा-कादंबऱ्या, चित्रपट, यूट्यूबवरील व्हिडिओ, सोशल मीडियावर झडणाऱ्या चर्चा, लोकांचे प्रश्न इत्यादी पाहिले असता मला असे जाणवले की, ही सर्व अजूनही चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या, कालबाह्य झालेल्या ग्रंथांवरच आधारित आहेत. मागील पन्नास वर्षात उजेडात आलेली नवी माहिती, संशोधनशास्त्राने केलेली प्रगती अजूनही मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेली नाही. आपण आजही पन्नास वर्षांपूर्वीच निकालात निघालेले वाद आज नव्या हिरीरीने लढतो आहोत. दरम्यान, शत्रुपक्षाकडील म्हणजे अफगाण बाजूकडील आणि इराणमधील इतिहास मागील वीस वर्षात नवीन प्रसिद्ध झालेला आहे. त्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाला दुजोरा देणारे आणि मराठ्यांच्या पानिपत-गाथेतील काही गूढांवर प्रकाश टाकणारे असे माहितीचे प्रकाशकण आहेत. पानिपतवर प्रदीर्घकाळ संशोधन करणारे आणि पानिपतचा रंगभूमीवरील पराक्रम आपल्या सुरस वाणीतून महाराष्ट्रभर पोचवणारे श्री. निनाद बेडेकर आणि श्री पांडुरंग बलकवडे यांच्या संशोधनातील नवीन गोष्टी, उदाहरणार्थ पानिपतचा जमाखर्च, यांचे पुरेसे विश्लेषण झालेले नाही. बुगटी मराठे तसेच रोड मराठे यांच्याविषयी महाराष्ट्रात प्रचंड कुतुहूल आहे, त्यांच्या इतिहासाची शास्त्रीय मांडणी करून विश्लेषण करणारा ग्रंथ मला मिळाला नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

कुणालाही पानिपत युद्धावर अभ्यास करायचा असेल, आपले बलदंड पूर्वज तिथे कसे लढले हे जाणून घायचे असेल तर पुढील शंभर वर्षेतरी माझा हा ग्रंथ त्यांना वाचणे आयश्यक ठरेल असे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे.

यातील ठळक असे नवीन मुद्दे पुढीलप्रमाणे :
- भारताची पहिली फाळणी १७५७ सालीच का व कशी झाली?
- साबाजी शिंदे पाटील यांचा अज्ञात पराक्रम
- दत्ताजी शिंद्यांना वीरमरण आले ती जागा नक्की कोणती? शत्रूपक्षाकडील नवीन माहिती
- दिल्लीतील जामा मशिदीच्या छतावर मराठ्यांनी तोफा आणि बंदुका का चढवल्या?
- पानिपत मोहिमेवर नक्की किती खर्च झाला?
- सदाशिवरावभाऊंनी दिल्लीच्या मुक्कामात कोणती भीष्मप्रतिज्ञा केली?
- ...तर कोहिनूर हिरा पुण्यात आज पुण्यात असता का?

३५० च्या पुढील पानांमध्ये पानिपत-युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अश्या खालील हस्तलिखितांच्या मूळ प्रती आणि लिप्यंतर मराठी अनुवादासह दिलेले आहेत. ती साधने पुढीलप्रमाणे :

काशीराजाची बखर
१४ जानेवारी, १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काशीराज शिवदेव हा अवधचा नवाब शुजाउद्दौला याच्या हुजुरात होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नवाबांची त्याच्यावर नेहेमी कृपा असे. काशीराज आणि त्याचे धनी शुजाउद्दौला मराठ्यांच्या विरुद्ध असलेल्या सैन्यात असल्यामुळे १४ जानेवारी रोजी सुरक्षित राहू शकले, या कारणामुळे युद्धाच्या शेवटी घडलेल्या घडामोडी आणि नंतरच्या दिवसातील रणभूमीवरील हकीगत आपल्याला काशीराजाकडून कळते, जी पराभूत मराठी सैन्याकडून मिळणे शक्य नव्हते. काशीराज शिवदेव हा मूळचा औरंगाबाद (संभाजीनगर) येथील ब्राह्मण होता. दख्खनचा रहिवासी असल्याने त्याला मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्याबद्दल उत्तम माहिती होती.

अहमदशहाचा इतिहास : महमूद अल हुसैनी
या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे अहमदशाह अब्दालीने आपल्या दरबारामध्ये एक अधिकृत इतिहासकार नेमला, “जो भावी पिढ्यांसाठी अब्दालीच्या सर्व कृत्यांचे संस्मरणीय वर्णन देईल, जेणेकरून अब्दालीचे नाव जगाच्या इतिहासाच्या पटलावर युगानुयुगे राहू शकेल.” हा समकालीन इतिहास विस्तीर्ण म्हणजे १३०० पानांचा आहे. हुसैनी हा अनेक महत्त्वाच्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्या प्रसंगांत सहभागी होता. लेखकाच्या दरबारातील हुद्द्यामुळे त्याला सर्व अधिकृत दस्तऐवज पाहाण्याची परवानगी असून दप्तरांमध्ये मुक्त प्रवेश होता. आपल्या हकीगतीत हुसैनी प्रसंगांच्या अचूक तारखा आणि सरदारांची भरपूर नावे देतो. या वैशिष्ट्यांमुळे अहमदशाहच्या काळातील अफगाणिस्तानच्या इतिहासावरील इतर सर्व साधनांपेक्षा महमूद अल-हुसैनीच्या इतिहासाला वेगळे महत्त्व आहे.

पानिपतचा अहवाल : लेखनिक बक्षुल्ला
या हकीगतीचा मूळ लेखक तरुण वयात शुजाच्या नोकरीत असून पानिपत रणभूमीवर प्रत्यक्ष हजार होता. हा मजकूर कोणा पाश्चात्य आश्रयदात्यासाठी लिहिलेला आहे, कारण येथे सर्व भौगोलिक संकल्पना मुळातून फार्सीतच समजावून सांगितल्या आहेत. शत्रू मोठा दाखविला की, आपला विजयसुद्धा मोठा होतो हे लेखकानेच या हकीगतीत सांगितले आहे. इतर फारसी हकीगतींत बहुधा एकेरी उल्लेख करीत किंवा त्याहूनही वाईट म्हणजे मराठ्यांना शिव्या देतच पुढची हकीगत लिहिलेली असते. येथे लेखक मराठ्यांच्या सेनानींची नावे आदराने घेतो (उदा. भाऊसाहेब), त्यावरून लेखकाला मराठ्यांबाबत आदर होता असे दिसते.

इब्रतनामा : इब्राहीम अली खान
इंग्लंडचे राजे (सुलतान-ए इंग्लिस्तान) यांचे भारतातील गव्हर्नर जनरल (सिपाहसालार) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्यासाठी पूर्वीचा मोगल राज्यातील, पण आत्ता इंग्रजांचा अधिकारी अलीइब्राहिमखान याने मराठ्यांचा एक इतिहास (अहवाल) लिहून १७८६ साली तो कलकत्त्याला पाठविला. असा तर्क करता येतो की, ज्या वेळी कॉर्नवॉलिसची भारतात १७८६ साली नेमणूक झाली, त्याचवेळी भारतातील तत्कालीन प्रमुख सत्ता, म्हणजे मराठे यांच्याबद्दल त्याला माहिती असणे आवश्यक असल्याने, किंवा त्याला पानिपतच्या लढाईबद्दल कुतुहुल असल्याने त्याने तो कालखंड पाहिलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांना ती हकीगत लिहून देण्यास सांगितले असावे. त्यानुसार अलीइब्राहिमखानाने सांगितलेली हकीगत रीतीप्रमाणे बक्षुल्ला नावाच्या लेखनिकाने १७८६ साली फारसीत लिहून कलकत्त्याला पाठविली. मराठ्यांच्या रजपूत उगमापासून छत्रपती शिवाजी महाराज ते १७८६ सालापर्यंतचा इतिहास, विशेषतः पानिपतची लढाई पाश्चात्य श्रोत्याला समजावून सांगणाऱ्या पहिल्या इतिहासांपैकी हा एक असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. अलीइब्राहिमखानाच्या इतिहासाला ‘इब्रतनामा’ असे नंतरच्या प्रतीत म्हटले आहे

पानिपतचा पश्तो पोवाडा
पश्तो शाहनाम्याला मी मराठीत अहमदशहाचा पोवाडा असे सर्वाना समजेल असे शीर्षक दिले आहे. मूळ कविता मसनवी पद्धतीची असून दोन ओळींमध्ये शेवटचे अक्षर सारखेच ठेवून यमक जुळविलेले आहे. पश्तो शाहनाम्याचे मूळ हस्तलिखित इंग्लंडमध्ये ब्रिटिश लायब्ररीत असून या काव्याची ती एकमेव प्रत आज अस्तित्त्वात आहे. हा शाहनामा म्हणजे अहमदशहा अब्दालीच्या आयुष्यावर रचलेले पश्तो भाषेतील एक महाकाव्य आहे. कवीने ते काव्य रचताना अहमदशहाच्या राज्यारोहणापासून ते १७६२ सालच्या घटनांचा वापर केलेला आहे. अहमदशहाने आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीवर महाकाव्य लिहिण्याची आज्ञा केल्याने आपण हे काव्य लिहिले असे मर्घुझी आपल्याला सांगतो. या महाकाव्यात आलेली एक घटना इतर कोठेही आलेली नाही, ती म्हणजे मराठे आणि शीख यांचा सैन्याने एकत्र अब्दालीचा सरदार खानजानखान याला काझी सराई, अमीनाबाद येथे गाठून लुटले. अश्या दुर्मिळ माहितीने हे महाकाव्य सजविलेले आहे. पानिपत युद्धाची पार्श्वभूमी तीन प्रकरणांत आलेली असून एका प्रकरणात सुमारे साठ पानांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचे वर्णन आलेले आहे.

नोंदणी इथे करा :

Amazon
https://www.amazon.in/dp/819562104X

Sahyadri Books
https://sahyadribooks.com/adnyat-panipat/

इतिहास

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Jun 2023 - 1:41 pm | चंद्रसूर्यकुमार

मी पहिला- नुसत्या पुस्तकाला शुभेच्छा देणाराच नव्हे तर पुस्तक प्री-ऑर्डर करणारा सुध्दा. आताच पुस्तक प्री-ऑर्डर केले आहे. १६ जूनपर्यंत मिळेल असे अ‍ॅमॅझॉन म्हणत आहे.

पुस्तक वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

धन्यवाद, दाद मिळावी तर अशी !!!

कुमार१'s picture

2 Jun 2023 - 1:57 pm | कुमार१

शुभेच्छा !

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 2:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

रोचक आणि उत्कंठावर्धक परीचय!! नक्की ऑर्डर करणार

मनो's picture

2 Jun 2023 - 4:02 pm | मनो

धन्यवाद!

छान. किंडल पध्दतीचे इ-पुस्तक येणार आहे का?

नाही, सध्या तरी फक्त छापील स्वरूपात.

Bhakti's picture

2 Jun 2023 - 6:00 pm | Bhakti

खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!

मनो's picture

2 Jun 2023 - 7:19 pm | मनो

धन्यवाद भक्तिताई!

सध्या तरी, काही आर्थिक कारणांमुळे, पुस्तक खरेदी बंद केली आहे...

आर्थिक ग्रहण सुटले की पुस्तक नक्कीच खरेदी करीन...

होय, किंमत जास्त आहे. तुमची आर्थिक प्रगती लवकर होवो या शुभेच्छा.

प्रचेतस's picture

2 Jun 2023 - 6:22 pm | प्रचेतस

मनःपूर्वक अभिनंदन.
लवकरच पुस्तक ऑर्डर करत आहे.

धन्यवाद वल्लीशेठ. रविवारी ११ जून, संध्याकाळी भांडारकर संस्थेत श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशनाचे ठरते आहे, त्यावेळी मोकळे असाल तर जरूर या, भेटूया. आमंत्रण पुढील आठवड्यात सर्वांना पाठवितो. जमणार नसेल तर नंतर कट्टा करू!

प्रचेतस's picture

2 Jun 2023 - 7:05 pm | प्रचेतस

अरे वा, सुट्टी तर आहेच, शक्यतो येईनच.

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2023 - 8:02 pm | अप्पा जोगळेकर

ऑर्डर केले. शुभेच्छा

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2023 - 8:50 pm | कर्नलतपस्वी

व अभिनंदन.

चित्रगुप्त's picture

2 Jun 2023 - 10:06 pm | चित्रगुप्त

मनो, पुस्तकाची खूप काळापासून वाट बघत होतो. इंदौरच्या एका मित्राच्या पत्त्यावर मिळण्यासाठी आत्ताच ऑर्डरिले आहे. सध्या पुढील काही महिने अमेरिकेत असल्याने इथे उपलब्ध होत असेल तर एक प्रत इथल्यासाठीही घेईन म्हणतो. कसे मागवायचे ते कळवा.

एकाद्या विषयाचा निदिघ्यास घेऊन सांगोपांग अभ्यास- संशोधन करणे, त्यासाठी वर्षानुवर्षे वेळ काढणे, कष्ट उपसणे, प्रवास, प्रत्यक्ष लेखन, संपादन, चित्रे-नकाशे इत्यादिकांची जुळवणी ... या सगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह आणि चिकाटी सध्याच्या काळात फार कमी लोकांमधे असेल. तुम्ही नोकरी, प्रपंच वगैरे सगळे सांभाळून हे करत आहात ही खूपच कौतुकाची आणि मोलाची बाब आहे. पुढील सर्व उद्यमासाठी अनेक शुभेच्छा.

धन्यवाद काका, ०२ जुलै रोजी अमेरिकेत परत येतो आहे. सोबत काही प्रती घेऊन येईन, त्यांपैकी एक तुम्हाला जरूर पाठवेन.

कंजूस's picture

3 Jun 2023 - 5:43 am | कंजूस

कुणालाही पानिपत युद्धावर अभ्यास करायचा असेल, आपले बलदंड पूर्वज तिथे कसे लढले हे जाणून घायचे असेल तर पुढील शंभर वर्षेतरी माझा हा ग्रंथ त्यांना वाचणे आयश्यक ठरेल असे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे.

तसेच पुस्तकाची ओळखही आवडली. मी पुस्तके विकत घेण्याचं टाळतो परंतू नक्कीच वाचेन.
इतिहासाची नवनवीन साधने मिळवून हे पानीपत युद्धावर लिहिलेले पुस्तक मराठ्यांच्या इतिहासावर चांगले भाष्य करेल.

तर कोह- इ- नूर पुण्यात असता . .‌.‌.‌
यावरून William Dalrymple चे पुस्तक The History of the World's Most Infamous Diamond - Koh I Noor आठवले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2023 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! अभिनंदन आणि शुभेच्छा..!

-दिलीप बिरुटे

धन्यवाद सर, पुण्यात येणार असाल तर प्रकाशन समारंभाला जरूर या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2023 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काशीराज शिवदेव हा मूळचा औरंगाबाद (संभाजीनगर) येथील ब्राह्मण होता. दख्खनचा रहिवासी असल्याने त्याला मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्याबद्दल उत्तम माहिती होती.

ओह ही माहिती नवीन आहे, धन्स.

-दिलीप बिरुटे
(औरंगाबादकर-संभाजीनगरकर)

आत्ताच अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलंय. १५ जूनला डिलिव्हरी मिळेल असा संदेश मिळालाय.

मनो's picture

3 Jun 2023 - 9:29 pm | मनो

धन्यवाद!

अथांग आकाश's picture

6 Jun 2023 - 12:24 pm | अथांग आकाश

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
0

मनो's picture

7 Jun 2023 - 7:20 am | मनो

धन्यवाद

नमस्ते सर, आपण दिलेल्या लिंक वरून पुस्तक ऑर्डर केले आहे. वाचण्यासाठी उत्सुक आहे. पण एक अभिप्राय वा अनुभव देखील व्यक्त करावासा वाटतो.
सह्याद्री बुक्स संदर्भात - बुकिंग केल्यावर केवळ एक SMS आला पण जी माझी शंका त्यांना ई-मेल द्वारे पाठविली होती त्याला ना उत्तर आले ना वेबसाईट वर दिलेलल्या फोन नंबर वर कैक वेळा कॉल करुन देखील कधी त्यांनी प्रतिसाद दिला. मी बेंगलोर ला असल्यामुळे पुस्तकाच्या delivery बद्दल काही प्रश्न होते.
अशा सुस्त व dull वर्तनामुळे ग्राहक/वाचक निश्चितच दुरावतात.
असो आपल्या पुस्तकाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

धर्मराजमुटके's picture

15 Jun 2023 - 9:51 am | धर्मराजमुटके

मनो उत्तर देतील तेव्हा देतील मात्र पुस्तक प्रकाशनाशी संबंधित लोक अजुनही १८५७ मधे जगत आहेत. त्यांच्याकडून त्वरीत ईमेल चे उत्तर वगैरे कॉर्पोरेट कल्चर च्या अपेक्षा ठेवू नका. सुखी व्हाल. :)

आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. मी स्वतः प्रकशकांशी बोलून त्यांच्या नजरेस ही बाब आणून देतो. तुमची शंका मला ९७८३३ ६७६३८ या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करून किंवा मेसेज करून जरूर विचारा, मी सह्याद्री बुक्स यांच्या मलकांशी बोलून तुमची समस्या सोडवून देतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jun 2023 - 11:41 am | चंद्रसूर्यकुमार

काल पुस्तक मिळाले.
Panipat

पुस्तक वाचायला सुरवात केली आहे. अगदी पहिल्या पानापासून शेकडो-हजारो संदर्भ तपासून त्यातून तेव्हा काय झाले असेल याविषयी केलेला अचाट अभ्यास वाक्यावाक्यातून दिसत आहे. माझ्याच्याने हे पुस्तक वाचून समजावून घ्यायलाच दोन-चार वर्षे लागतील असे वाटत आहे :) कधी लिहिलेत इतके सगळे?

केदार-मिसळपाव's picture

15 Jun 2023 - 2:01 pm | केदार-मिसळपाव

पुस्तक जर्मनीत पाठवणार का? मला हवे आहे.

जर्मनीचे पाठविण्याचे चार्जेस एका पुस्तकाचे साधारण २,५०० रुपये पर्यन्त सांगत आहेत. त्यांच्याशी बोलून काही कमी होत असेल तर कळवतो. भारतात येणार असाल तर मात्र पटकन देऊ शकतो.

भारतात कोणत्या दुकानात हे पुस्तक विकत मिळेल?

थेट माझ्याकडून घ्यायचे असेल तर मला ९७८३३ ६७६३८ या मोबाईल क्रमांकावर पत्ता पाठवा आणि मी दिलेल्या UPI आयडीवर Rs ९०० पाठवा. अन्यथा amazon किंवा सह्याद्री books या वेबसाईट, भारत इतिहास संशोधक मंडळ किंवा पुण्यातील प्रमुख पुस्तक दुकानांत मिळेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Jun 2023 - 10:23 pm | अमरेंद्र बाहुबली

पुस्तक मिळाले. धन्यवाद मनोसाहेब.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Jun 2023 - 10:23 pm | अमरेंद्र बाहुबली

पुस्तक मिळाले. धन्यवाद मनोसाहेब.

प्रकाशन समारंभ रेकॉर्डिंग
Description मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांच्या डायरेक्ट लिंक आहेत.

https://youtu.be/DVkY7Xq0y8M

diggi12's picture

19 Jun 2023 - 5:35 pm | diggi12

पुस्तक मिळाले
मनो आणि मन हे आयडी एकच आहेत की वेगवेगळे आहेत

मनो's picture

19 Jun 2023 - 10:02 pm | मनो

वेगवेगळे आहेत