माझी राधा ११ ( समाप्त)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 May 2023 - 2:07 pm

मी त्या हसण्यात विरघळले. तुला रागवायचे होते तेच विसरले. कोण आहेस रे तू माझा?
मग तू विचारलेस. इतके प्रेम करतेस माझ्यावर.......!
तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून हलले. काय बोलावे ते समजेना मला. डोळ्यात टचकन पाणीच आले.तुझ्या त्या शब्दांनी कुठेतरी आत खोलवर काही तरी छेडले होते.

मागील दुवा माझी राधा ११ - https://www.misalpav.com/node/51312
तू माझ्या चेहेर्याकडे पहात होतास. तुला तिथे काय दिसले माहीत नाहीस. पण त्या नंतर तू बराच वेळ काहीच बोलला नाहीस. तुझ्या प्रश्नाला मी काय उत्तर दिले ते मला आठवत नाही. पण तू पुन्हा कधीच हा प्रश्न विचारला नाहीस.
मी तुझा हात धरून जवळजवळ ओढतच नंदवाड्याकडे घेऊन आले. तुला पाहून यशोदामाई एकदम पुढे आल्या. त्यांची ठेव मी त्यांच्या हातात दिली. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्यात मी वाहुन जाईन की काय असेच वाटले मला. तुझ्याही डोळ्यात त्या वेळेस पाणी आले होते. तुला असे रडताना मी कधीच पाहिले नव्हते. पण त्या अश्रुंच्या खार्या पाण्याने आपल्या तिघात काहितरी बंध तयार झाला होता. मी यशोदा माईना हात जोडत तेथून निघून आले. वाटेत आणि घरी आल्यानंतरही माझ्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हता.

यमुनेतीरावर मी तशीही रोजच यायचे . आता अधीक असोशीने येवू लागले. येताना तुझ्यासाठी काही घेवून येवू लागले. कधी लाडू , कधी पायस. कधी गोडे दही. तुला मझ्या हातचे पदार्थ एवढे आवडायचे, तू ते खात असताना पहाताना मी तृप्त व्हायची.
माझ्या सोबत असताना तुझे मित्रांकडे दुर्लक्ष्य व्हायचे. ते कधीतरी तुला तसे सांगायचेही. आपल्या गप्पा मारण्याबद्दल , माझ्या रोज यमुनेवर येण्याबद्दल गावातले लोकही काहीबाही बोलायला लागले होते. मला कधीच त्याची पर्वा नव्हती. घरातही त्याबद्दल वाद व्हायचे. एकदातर शेजारच्या रेवतीमावशीनी आपल्या दोघांना एकत्र गप्पा मारताना कुंजवनात पाहिले म्हणुन घरी सांगितले. त्यांच्या समोरच सासूबाईनी मला त्याचा जाब विचारला. मी काय उत्तर दिले माहीत नाही त्यांच्या पारा चढला. त्यांनी मला दारामागे असलेल्या केरसुणीने दोनचार झापटे मारले. आणि मग त्या स्वतःच रडत बसल्या. त्यानी माझे पती अनयना ही काही सांगितले.
अनयना खूप दु:ख झाले.
तुझ्या खोड्यानी त्रस्त गोकुळवासीयानी एकदा पंचायत बोलावली. काय तर तू म्हणे स्नानाला गेलेल्या गोपिकांची वस्त्रे लपवलीस म्हणून. आता यात गैर काय झाले तेच मला समजले नाही. पोहायला गेलेल्या मित्रांचे कपडे लपवुन ठेवायचे यात कसला आला अपराध. त्यांची थट्टा करणे हाच खेळच असतो की एक. मी तसे ठणकावून सांगितले सगळे पंचायती समोर.
पंचायतीने अनयनाच दोष दिला. अनय खूप दु:खी झाले. तुम्ही दोघांत कोणाची बाजू घ्यायची हेच मला समजत नव्हते. अनय माझे पती होते. आणि तू? माझ्या सखा.
तुला माझा सखा म्हणायला माझी जीभ आता अडत नव्हती. जे एकमेकांच्या विचारात सतत बरोबर असतात ते सखेच असतात की. एकमेकांची सुखदु:खे जाणतात ते एकमेकांचे सखेच असतात.ना. ए सांग ना.......
मी तुला हे एकदा विचारलेही होते. तू नुसताच हसलास. असे काही विचारले की तू फक्त गालातल्या गालात हसतोस आणि मग कमरेची बासरी काढून त्यावर सुरांची एक लकेर छेडतोस. हे मला माहीत झाले. मला काही समजायचेच नाही. मग तूच एकदा म्हणालास राधे जे शब्दांत मांडणे शक्य नसते ते सूर सांगू शकतात. माझ्या बासरीचे सूर अनहद आहेत. ते ऐक. तू काय म्हणलास ते समजले नाही तरी उमजले असे म्हणेन. कारण तू बासरीवर वाजवलेल्या सुरांच्या लकेरीतला प्रत्येक स्वर माझ्या रोमारोमात भिनायचा. पाण्यावर अलगद तरंगावे तसे सगळे शरीर कसल्याशा आनंदात हलके होऊन तरंगू लागायचे.
गोकुळात वसंतोत्सव होणार होता. अवघे गोकुळ त्यासाठी सजले होते. वसंतोत्सवात माझे पती अनय ना खूप मोठा मान होता. माझ्या सासर्यांपासून ही प्रथा चालत आली होती. वसंतोत्सव ही मोठी पर्वणीच. नव्या ऋतूचे स्वागत करायचे. निसर्गात नव्या पालवीच्या रंगांची उधळण असते.नगारे चौघडे वाजवत गाणी म्हणत लोक एकमेकांवर अंगावर गुलाल उधळतात. मुले पिचकारीने केशरी हिरवा निळा पिवळा लाल असे रंग उडवून कोणाच्या अंगावर इंद्रधनु उमटवत असतात.
मैत्रीणींच्या घोळक्यात मी कोणावर तरी रंग उडवत होते आणि तु अचानक समोर आलास. माझा रंग मैत्रीणीऐवजी तुझ्या अंगावर उडाला.
तू असा समोर आल्याने मी चमकलेच. काय करावे ते मला कळेचना. मी तश्शीच उभी राहिले. मग तूच पुढे झाला आणि माझ्याच हातातला रंग घेऊन माझ्या गालाला फासलास. भरगर्दीत तू काही असे धाडस करशील याची मला कल्पनाच नव्हती. तुझे ते तसे वागणे मला आवडले नाही असे तरी कसे म्हणू. मला तुझा विरोधही करत आला नाही.
त्या प्रसंगा नंतर मी खूप बदलले असे लोक म्हणून लागले. माझे कशातच लक्ष्य नसते, मी नटणे मुरडणे ही सोडुन दिले आहे. मैत्रीणीमधे ही फारशी रमत नाही. असे बरेच काहीबाही. पण खरे सांगू मला सगळीकडे तूच दिसायचास. मी कृष्णमयी झाले होते म्हण ना.
कोणीकोणी तर मला वेड लागलंय. शेजारच्या रेवतीमावशी तर मला कसलीतरी बाधा झाली आहे असेही म्हणू लागल्या आणि त्यावर उतारा म्हणून कसलासा अंगाराही आणून दिला.. मला कोण्या ऋषीमुनींकडे घेऊन जायचे असेही म्हणत होत्या.
पण मला कशाचीच तमा नव्हती. कोण काय म्हणतंय याची पर्वाही नव्हती.
दिवसरात्र मनात फक्त तुझाच विचार असायचा.

मथुरेतल्या युवक दिन की कसल्याशा समारभासाठी तुला आमंत्रण होते. आणि तुला न्यायला अमात्य अकृर येणार होते. तुला न्यायला इतकी मोठी व्यक्ती येणार म्हणून मला खूप आनंद झाला. तिथल्या स्पर्धेत तू विजयी होऊन आल्यावर तुझे स्वागत सर्वप्रथम मी कसे करणार होते हे मी ठरवूनही टाकले होते.
पण मग कोणीतरी म्हणाले की तेथून तू कदाचित परत येणारच नाहीस म्हणून. ऐकून एकदम धक्काच बसला. पण मग मला चिडवायला म्हणून कोणी म्हणाले असतील असे वाटून अगोदर मी त्याकडे दुर्लक्ष्य केले. पण सगळेच हे बोलू लागले तसे मी तुला विचारले देखील . ते तुलाही नीट माहीत नव्हते. कदाचित मला सांगण्यासाठी म्हणून तू तसे म्हणाला असशील. पण तू माझ्याशी असा खोटे कशाला बोलशील. तुला खरेच माहीत नसेल.
मग तो दिवस आला. सगळं गोकूळ तुला निरोप द्यायला वेशीपाशी जमलं होतं. तू इथून जाउ नकोस असे मला तुला सांगायचे होते. पण तू पराक्रम दाखवण्यासाठी निघाला होतास. वीराला असं अडवायचं नसते . मी तुझ्या समोर आले असते तर तुला निरोप देऊ शकले नसते. तू माझ्यापासून , या राधेपासून दूर जाणार ही कल्पनाही करवत नव्हती. तू आणि बलरामदादा अमात्य अक्रुरांच्या सोबत चालत बाहेर येत होता. नंदबाबा ,यशोदामाय अक्रुरांशी बोलत होते. तुला वाटेत लागेल म्हणून शिदोरी देत होते. बाकीचे मित्र तुला काहितरी सांगत होते पण तुझे त्याकडे लक्ष्यच नव्हते. तुझी नजर भिरभिरत होती. मलाच शोधत होती ती. मी तुला दिसणार नाही अशी एका खांबाआड उभी होते. खरंतर तुला आवडणारं मोरपीस मला तुला द्यायचं होतं, माझी आठवण म्हणून. पण समोर यायचं धैर्य नव्हते माझ्यात. रथात बसायच्या अगोदर तू मला शोधलंसच. तुझी माझी नजरानजर झाली. मग माझ्याच्याने रहावलं नाही. सगळे बंध तोडून ;माझे पती अनय सोबत होते त्यांचीही पर्वा न करता मी धावत सुटले तुझ्याकडे. मधल्या सगळ्या गर्दीला ओलांडून तुझ्या पर्यंत पोहोचले. माझ्या हातातले मोरपीस तुला हातात दिले. आणि तुझ्या कमरेच्या शेल्यामधे खोसलेली बासरी काढून घेतली. का ते माहीत माहीत नाही. त्या बासरीच्या रुपाने तू माझ्या जवळ रहाशील म्हणुन असेल.
तू इथून मथुरेला गेलास आणि इथलं सगळं चैतन्यच घेऊन गेलास. ते स्वतः होऊनच तुझ्या मागोमाग आले असेल. गोकुळाची रया गेली. खरेतर सगळे तसेच होते. गोकुळातल्या गायी , गोपाळ , गवळणी , नंदबाबा , यशोदमाय , सगळे इथेच होते. नव्हतास फक्त तू. प्राण निघून गेल्यावर देह निष्चेष्ठ व्हावा तशी गत झाली आमची. कुठल्याच कामात मन लागेना. तू कधीतरी परत येशील या आशेवर दिवस काढत होतो आम्ही.
तू मथुरेला गेलास आणि तिथलाच होऊन राहिलास. मथुरेच्या राज्यकारभारात मग्न झालास. तुझ्या बद्दलच्या बातम्या समजायच्या. तुझ्या पराक्रमाच्या बातम्यानी मन आनंदी व्हायचे. तू ज्या वाटेने गेलास तिथे रोज सकाळी जाणे आणि वाटेकडे डोळे लावणे हा परिपाठच झाला. कोणी मथुरेहून आले की त्याला तू दिसला असशील असे वाटायचे. मथुरेच्या दिशेने येणारे वारे आले की वाटायचे या हवेत तुझा श्वास मिसळलेला असेल. मग मी दीर्घ श्वास घ्यायचे.तुझे असणं आख्ख्या अंगभर व्हायचे.
मी मग कधी यमुनेतीरावर जायचे. तर कधी डोहाजवळच्या त्या कदम्बाच्या झाडाजवळ जाऊन बसायचे या इथे तू बासरी वाजवत बसायचास. मी त्या कदम्बाला स्पर्ष करायचे.त्यानही माझ्या इतकीच; किंबहुना माझ्यापेक्षा जास्त; तुझी बासरी ऐकली होती. कदंबाखाली बसून डोळे मिटले की आजही ती बासरीची धून ऐकू येते मला. मग वाटते की तू इथेच आहेस. तेवढेच मनाचे समाधान. डोळे उघडावेसेच वाटत नाहीत.
कधी निधीवनातल्या त्या औदुंबराच्या झाडाखाली जायचे. इथे आपण गप्पा मरत बसायचो. इथेच तू मला विचारले. होतेस . कोण आहेस ग तू माझी? मला तो प्रश्न आजही ऐकू येतो. त्या वेळेस उत्तर सुचले नव्हते. तसे ते आत्ताही सुचत नाही. तुझा दुसरा प्रश्न " इतके प्रेम करतेस माझ्यावर?" याचेही उत्तर तेंव्हा सुचले नव्हते. रागच आला होता त्या प्रश्नाचा.आपल्या दोघांमधील भावनेला प्रेम असे म्हणालास. याचाही मला राग आला होता.आश्चर्यही वाटले होते. प्रेम होते आहे हे खरे पण त्या प्रेमाला कसले प्रेम म्हणायचे? मित्रांमधील प्रेम मित्रभाव म्हणतात, बहीणभावांमधील प्रेम बंधुभाव, माता आणि बालकामधले प्रेम वात्सल्य , दोन प्रेमीकांमधले प्रेम?प्रियाराधन. शिष्याचे गुरूबद्दलचे प्रेम , ईश्वर आणि त्याचा भक्त यांच्यातही प्रेमच असते ना. प्रेम हे प्रेम असते रे. त्याचे आपण प्रकार कशाला पाडायचे? दूध हे दूध असते. वासरासठी असलेले वेगळे आणि बालकाला द्यायचे ते वेगळे असे काही वेगळे नसते.तसेच प्रेमाचे. आपल्या दोघांत नक्की कोणत्या प्रकारचे प्रेम होते याचा मी कधीच विचार केला नाही. डोळे मिटून बासरी वाजवताना तू ईश्वराची मूर्ती वाटतोस. बासरीचे सूरही तो अलौकीक अनुभव देतात, तू ईश्वर वाटतोस. मी भक्त असते. थट्टामस्करी करताना तू बंधु असतोस मी तुझी धाकटी बहीण असते.मी आणलेले लोणी चाटूनपुसून खाताना तू अश्राप बालक असतोस मी आई असते. या निसर्गाबद्दल बोलत असतोस ना तेंव्हा चित्रकार असतोस. मी रसिक असते. लगोरी खेळताना तू मित्र असतोस. रासक्रीडा खेळताना तू सखा होतोस.मी सखी असते.यमुनेच्या प्रवाहातून पलीकडे माझी काळजी घेत हात धरून नेतोस तेंव्हा पालक असतोस मी अजाण बालक असते. एखादी समस्या सोडवताना गुरू असतोस. मी शिष्य असते माझ्यासाठी तू एकाच वेळेस सगळे काही असतोस. त्या प्रेमभावनेवर मला कोणतीही मुद्रा उमटवून घ्यायची नाही. त्याला कसलेच नाव द्यायचे नाहिय्ये मला. ते अनहद राहूदे.
“किती प्रेम करतेस?” या प्रश्नाचा त्यावेळेस मला राग आला .
समजा मला राग आला नसता तर काय उत्तर दिले असते मी याचा विचार करते. खरेच माणसाने माणसावर प्रेम करणे हे मोजता येते का? प्रेम हे द्यायचे असते. गाय कधी वासराला म्हणेल की मी आज तुला चरवीभरून दूध दिले म्हणून.
माझे हे विचार कोणाला वेड्यासारखे वाटतील.पण त्याची मी पर्वा करत नाही.लोक माझ्याबद्दल अगोदरच काहीबाही बोलत होते . आता तर त्यानी मला पूर्ण वेडी ठरवले. मला माझंच भान नसायचे.भान असावे ही इच्छा ही नाही. काय करायचं आहे भान ठेवून. तुझ्या विचारात असले की भान रहात नाही आसपासच्या जगाचं. कारण त्यावेळेस तू माझ्यासोबत असतोस. आणि भान येते तेंव्हा तू माझ्या सोबत नाहीस याची जाणीव होते.
तू इथून गेलास असे अगोदर वाटले पण तु इथेच आहेस की. माझ्या विचारांत भरून आहेस. गोकुळाच्या रज:कणात तू आहेस. यमुनेच्या डोहाजवळ तू आहेस. कदम्बाच्या झाडाखाली तू आहेस. निधीवनातल्या वेळूच्या झाडातून वारा वाहू लागला की तो बासरीच्या नादात बोलत असतो. ते स्वर तुझेच तर असतात. तू इथेच आहेस.
मग कशाला कुठे जायचं?
गोकुळ ते मथुरा फारतर तीस चाळीस योजनांचे अंतर. कधीतरी वाटायचे की आपणच मथुरेला जाऊन तुला भेटूया. पण काय म्हणून भेटायचे. तू राज्यकारभारात मग्न असणार. तिथे माझ्या सारख्या खेडवळ गवळणीला कोण विचारतेय. अर्थात तुझे नाव सांगितल्यावर मिळेल प्रवेश. पण मग समजा मी निघाले मथुरेला आणि तु देखील त्या वेळेस इकडेच येणार असशील तर आपली चुकामूक होईल. ते नकोच. म्हणून मी इथेच गोकुळाच्या वेशीवर तुझी वाट पहात उभी रहाते.
तुझ्या बद्दलच्या तुझ्या पराक्रमाच्या एकेक वार्ता मिळत असतात. तू चाणूर आणि मुष्टीकांचा पराभव केलास. कंसमहाराजांचा वध केलास.. तु मोठा होत गेलास. मी लहानच राहिले साधीशी. माझा कान्हाही माझ्या साठी तेवढाच साधा राहूदे.
कधी कधी वाटायचे की राज्यकारभाराच्या गराड्यात तू मला विसरला तर नसशील. कशाला विसरशील? असे विसरते का कोणी आपल्या लहानपणच्या सखीला. यशोदामाई आणि नंदबाबांना विसरला नसशील तर मलाही नाही विसरणार. मला खात्री आहे.
राणी रुक्मीणींशी तुझे लग्न झाले मला कित्ती म्हणून आनंद झाला सांगू. लग्नात तुझे सजलेले नवरदेवाचे ते देखणे रुपडे किती छान दिसले असेल. मी ते मनोमन पाहिले.
मथुरेला असताना तू कधीतरी येशील अशी आशा होती. पण तू द्वारकेला गेल्याचे समजले . तिथे तू राजा. तुझा भव्य प्रासाद , तिथले वैभव या सगळ्यांबद्दल ऐकले.
आपल्यातले अंतर वाढले. द्वारका ते गोकूळ या भौगोलीक अंतराबद्दल नाही म्हणायचे मला.तू समजा आता मला भेटलास तर काय म्हणून भेटशील ? द्वारकाधीश ? छे तो माझा कान्हा नाही. कुरुक्षेत्रावरचा संहार घडवणारा कृष्ण तो माझा कान्हा नाही. त्याच्या बोटांवर संहार करणारे सुदर्शन चक्र नाचते. कान्ह्याच्या बोटांवर बासरी . हस्तिनापूरमधे पांडवांसाठी शिष्ठाई करणारा कृष्ण ? त्याचे हसणे धूर्त होते तो माझा कान्हा नाही. कान्ह्याचं हसणं निरागस होतं अगदी तान्ह्या बाळाचं असतं तसं.
माझा कान्हा खूप साधा होता. मला कुठल्या राजाला भेटायचं नाहिय्ये. कारण राजाला भेटणारे सगळे त्याच्याकडे काहीनाकाही मागण्या घेऊन जातात. माझं काहीच मागणं नाहिय्ये. मला कसलेच वैभव नको आहे. काय करू मी त्याचे.
मला हवं आहे ते देशील? मला माझा तो कान्हा हवा आहे. देशील?
तो तुझ्याकडे नसणार आहे. तो कान्हा माझ्या कडे आहे.माझ्या रोमारोमात आहे आठवणीत आहे , श्वासात आहे. मी जपून ठेवलाय त्याला. तो मला त्याच्या माझ्या मधे कधीच अंतर पडू देणार नाही.
मला खात्री आहे या जगात कधीही तुझे नाव कोणी घेईल त्याला माझी आठवण तुझ्या अगोदर होईल . कृष्णाअगोदर राधा येईल . तो म्हणेल राधाकृष्ण.
आणि हो त्याला मग तुझ्यासोबतचे माझे रूप आठवेल. रूप आठवेल ते शस्त्राऐवजी हातात बासरी असलेललं कान्ह्याचं.
तुझ्याकडे मागायचेच असेल तर एक मागते. मला पुन्हा ते शब्द ऐकायचे आहेत. निधीवनात बोलताना म्हणाला होतास ते. एकदा तुला म्हणताना ऐकायचंय. माझी राधा.
म्हणशील? माझी राधा.
माझी राधा .... माझी राधा......माझी राधा.
मला माझेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येतात. ही रात्र संपतच नाहीय्ये.
मी स्वतःशीच पुटपुटत रहाते " राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण"
कुठून तरी बासरीचे सूर ऐकू येतात. ते म्हणत असतात " माझी राधा माझी राधा माझी राधा ".
( समाप्त)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

24 May 2023 - 7:25 am | श्रीगणेशा

लेखमालिका आवडली!
राधा व कृष्ण, दोघांचेही विचार, खूप विचार करून लिहिले आहेत, सहज सोप्या, ओघवत्या भाषेत!

बहोत खूब... मस्त लिहिलंय विजुभाऊ

कर्नलतपस्वी's picture

25 May 2023 - 11:42 am | कर्नलतपस्वी

महाभारतातील प्रत्येक व्यकीरेखा स्वतंत्र पणे आपले मनोगत कसे व्यक्त करेल या बद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटते.

राधेचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुप छान रेखाटले आहेत.

अश्वत्थामा किंवा युगंधर च्या धर्तीवर याचे पुस्तकात रूपांतर करा.

लेख माला आवडली.

विजुभाऊ's picture

25 May 2023 - 6:47 pm | विजुभाऊ

कल्पना चांगली आहे.
प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे.
पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे.
एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत.
कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली , द

विजुभाऊ's picture

25 May 2023 - 6:47 pm | विजुभाऊ

कल्पना चांगली आहे.
प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे.
पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे.
एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत.
कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली ,