मागील दुवा माझी राधा ९ - https://www.misalpav.com/node/50296
मी जागीच आहे.मध्यरात्र उलटून गेली आहे. चंद्र क्षितीजावर मावळतोय. आता पूर्ण अंधार होईल. गडद अंधार. मग शुक्राची चांदणी झळाळून उठेल. दुसरा छोटा चंद्रच जणू. आणखी. सभोवतालचे तारा मंडळ जोरजोरात लुकलुकायला लागेल. पण अर्ध्या प्रहरासाठीच. मग उजाडायला लागेल. पूर्वेकडे आभा येईल. चंद्राच्या उजेडाअभावी लखलखीत वाटणारे तारे हळू हळू फिकुटायला लागतील. पक्षी जागे होतील. दूर कुठेतरी गाईंच्या हंबरण्याचा आवाज येईल. आत्तापर्यंत असणारी नीरव शांतता सम्पेल.
गाईंचे हंबरण्यापाठोपाठ तुझ्या मुरलीचे स्वर पुन्हा कानावर पडतील अशी एक आशा उगीचंच वाटते. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी ती आशा अजून तशीच ताजी आहे. अमात्य अकृरांसोबत तू मथुरेला गेलास ,त्या दिवसापासून ती तशीच आहे.
त्या दिवशीचा घटनाक्रम मी रोज मनात पहात असते. एखादी चित्रांची माळ असावी तसा. त्यातले तुझे नुघून जातानाचे चित्र मला पुसून टाकायचे आहे.
अकृराचा रथ इथून गेला. त्या रथाच्या चाकामुळे धुळीत पडलेल्या चाकोर्या मी दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा पाहून आले. त्या रस्त्यावरून त्या नंतर कोणीच गेले नव्हते. कोणाला जायचेही नव्हते. मीच कशाला पण कानल , मित्रविंदा , प्रयंवदा , सुलक्षणा , सुदर्शना ,सगळ्याच जणी तिथे आल्या होत्या . एकमेकींकडे पाहुन ओळखीचे हसलोही नाही. एकमेकांना अपरिचीत असल्यासारखे वाटत होतो. बोलत कोणीच नव्हते.सगळ्यांच्या मनात ती एकच भावना होती. प्रत्येकीला तू येशील असे वाटत होते.
तू गेलेल्या वाटेकडे आम्ही डोळे लावून पहात होतो. सत्यवतीची सासू शोधायला आली तेंव्हा आम्हाला वेळेचे भान आले. नाईलाजाने सगळ्या तेथून निघालो. मला तर घरीदेखील जावेसे वाटत नव्हते. काळ वेळ कुठलेच भान नको होते. मी घरी कशी आले ते देखील कळाले नाही. त्या नंतर कितीतरी दिवस हाच रोजचा क्रम झाला होता.
तू पहिल्यांदा दिसलास तो क्षण आठवतो. नदीवर पाणी भरायला आले होते मी. समोरच्या तीरावर गुराखी मुले खेळत होती.
अगदी त्यांच्यासारखाच दिसत होतास. काय ते नक्की सांगता येणार नाही पण काहितरी वेगळं जाणवत होते. कदाचित ती मुले तुला त्यांचा नेता मानत असतील म्हणून असेल. नदीवरून पाणी भरून घेऊन परत जाताना केतकी ने सांगीतले की तू यशोदा माईचा मुलगा आहेस म्हणून.
मग एकदा अशीच पाणी भरायला आले होते. कुठूनतरी दुरून बासरीचे सूर ऐकू आले. खूपच मोहवून टाकणारे होते. मी त्यांचा मागोवा घेत कदंबाच्या झाडापर्यंत गेले.
झाडाच्या पायथ्याला तू बसला होतास डोळे मिटून बासरी वाजवत होतास. सभोवतालच्या सगळ्याच जाणीवांपासून वेगळा होऊन वाजवत होतास. तुझ्या भोवती तुझे सवंगडी ,त्यांच्या गायी सगळे पुतळ्यासारखे निशब्द होऊन ऐकत होते. डोळ्याची पापणीही हलत नव्हती कोणाच्या. मला घरी जायची घाई होती तरीही . मी तुझे ते बासरी वाजवणे ऐकत राहिले , माझे पाऊलच उचलत नव्हते. कनिका माझा हात धरून खेचायला लागली तेंव्हा कुठे मी भानावर आले.
घरी जाताना ती काहीतरी सांगत होती. पण माझ्या कानात ते बासरीचे सूर रुंजी घालत होते. त्या पुढे दुसरे काही ऐकूच येत नव्हते. संपूर्ण दिवसभर मला तेच कानात गुंजत राहिले
दुसर्या दिवशीही मला तेच सूर ऐकू आले. आता मला माहीत होते की सूर कोठून येतात ते. शोधायला वेळ लागला नाही. माझ्या सोबतच्या सगळ्या गोपीना सुडून मी कदंबाच्या झाडाकडे आले.कालचेच दृष्य. तुझ्या भोवतीने सगळे गोपाळ, त्यांच्या बाजूला त्यांच्या आणि कदंबाच्या झाडाला टेकून तू बासरी वाजवत बसला होतास. तू इतका तल्लीन होऊन वाजवत होतास. तुझ्या चेहेर्यावर ते सूर उमटत होते. अगदी स्पष्ट .
मी एक टक तुझ्या कडे पहात राहिले. काहीतरी जादू होती. ती जादू तुझ्यात होती की त्या सुराम्मधे माहीत नाही. पण काहीतरी होते हे नक्की. माझी नजर तुझ्यावरून हलत नव्हती. पापण्या मिटल्या तर जणु तू अदृष्य होशील म्हणून मी तशीच पहात राहिले. तू बासरी वाजवायचा थांबलास. आम्हाला मात्र भानावर यायला जरा वेळच लागला. भानावर आले हो भानावर आले असेच म्हणायला हवे. आपण कोठे आहोत काय करायला आलो आहोत हे सगळे विसरूनच गेले होते मी. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वहात होते. काय वाटले ते नक्की सांगता येणार नाही. मी भोळी अडाणी खेडवळ मुलगी. मला ते शब्दांत मांडता नाही येणार. पण आज जे अनुभवलं ते नक्कीच ह्या पृथ्वीतलावरचे नव्हते. काहितरी स्वर्गीय होते.
मग तु त्या गोपाळांच्या बरोबर काहीतरी खेळू लागलास. त्या खेळणार्या मुलांमधे तू इतका मिसळून गेलास की मघा बासरी वाजवणारा तो तूच होतास हे सांगूनही खरे वाटले नसते कोणाला.
घरी गेले तेंव्हा सासूबाई वाट पहात होत्या. इतका वेळ झाला तरी मी नदीवरून परत आले नाही याची त्यांना चिंता वाटत होती. उशीर का झाला याचे कारण मला सांगताच नाही आले. तुझे बासरी वाजवणे ऐकत थांबले होते असे सांगितले असते तरी ते त्यांना पटले नसते. मग मी उगाचच पाय मुरगळाला त्यामुळे उशीर झाला. असले काहीतरी सांगून वेळ मारून नेली.
पण ते त्याना फारसे पटले नसावे.
त्या दिवशी झोपताना डोळे मिटले की समोर तूच दिसत होतास.मिटलेल्या पापण्यांसमोर दिसणारे चित्र थांबवता आले असते तर किती बरे झाले असते ना. माझ्या मिटलेल्या पापण्यांसमोरून मी तुला जाऊनच दिले नसते.
मग त्या नंतर मला तो छंदच लागला म्हण ना. या पूर्वी कधी अळंटळं करणारी मी आता यमुनेवर पाण्यासाठी यायला इतकी उत्सूक का असते हे सासूबाईना कळतच नव्हते.
बासरी हे वाद्यच तसे आहे. वेड लावते. आणि ते ही तुझासारखा बासरी वाजवणारा असेल तर काय ........
मी हे एकदा तुला सांगितलेही होते. तू गालातल्या गालात हसलास.आणि म्हणालास ही वेळूची काठी. यातून तुमचा श्वास बोलत असतो. मला काही समजले नाही. तू बोलत असताना मी तुझ्याकडेच पहात असायचे. तू तुझ्याच नादात असायचास. पण तू बोलत असताना तुझ्या चेहेर्यावरचे भाव पहाताना काही वेगळाच वाटायचास. क्षणात एखादे
खोडकर लहान मूल वाटायचास तर पुढच्याच क्षणी एखाद्या तत्ववेत्त्यासारखा.
नदीच्या डोहातल्या विखारी कालीया नागाला तू कसे मारलेस हे मीच तुला सांगितले. खूप मोठा धोका होता त्यात. पण आपण काही वेगळे केले आहे हे तुझ्या गावीही नव्हते. तू तिकडे गेला आहेस हे समजले आणि मी धावत आले. मी काय पण गोकुळातल्या सगळ्याच जणी तेथे आलो होतो. आम्हा कोणाचाच तू समोर येईपर्यंत काही बोलायचाही धीर होत नव्हता. तुला समोर पाहिले आणि मग सगळ्याच जणीचा जीव भांड्यात पडला. तुझ्या साठी ते अगदी सहज होते. खूप वाटत होते की तुझ्या पाठीत एक धपाटा घालावा आणि सांगावे " जीव टांगणीला लागतो रे तुझ्या काळजीने. करू नकोस पुन्हा असे.". पण सगळ्या लोकांसमोर ते इतक्या हक्काने सांगायचे कसे. म्हणुन गप्प राहिले.
इंद्रपूजा करण्याऐवजी गोवर्धनाची पूजा करूया असे जेंव्हा म्हणालास तेंव्हा सुरवातीला ते मला पटले नाही. पण तू ज्या पद्धतीने लोकांची समजूत घातलीस . लोकाना आपल्या बाजूने करून घेतलेस. मलाच काय पण सगळ्या गोकुळाला आपलेसे करून घेतलेस.
मी हळू हळू तुझ्या प्रेमात पडले होते. तुझ्या शिवाय मला काहीच दिसत नव्हते. सुचत नव्हते. सकाळ झाल्यावर कधी एकदा तुला भेटतेय असे व्हायचे. एखाद्याचे पिसे लागते म्हणतात ना ततसे. घरातल्या कामातही मला तूच दिसायचास. गाईच्या धारा काढताना तूच समोर असायचास. दुधाची धार चरवीत पडताना तू हसतोआहेस असे वाटायचे. काठोकाठ भरलेल्या चरवीतल्या दुधावरचा फेस पाहून मला तुझ्या मला तुझे कुरळे केस आठवायचे.
चरवी दुधाने भरली तरी ते माझ्या ध्यानात यायचे नाही.
दही घुसळताना वर आलेले लोणी गोळा करताना ते तुझ्या गालाला लागलंय असेच वाटायचे.
माझ्या सासूबाईना आणि नवर्याला अनयला माझ्यातला बदल दिसत असेल नाही! ते माझ्या गावीही नसायचे.
सासूबाई विचारायच्या की हल्ली मी हाताला आळता का लावत नाही. वेणीफणी नीट का करत नाहीस म्हणून.
" हल्ली तुपाला कणी निघत नाही. बाजारात भाव कमी मिळतो असे अनय काही तरी सांगायचे पण ते मला समजायचेच नाही. मी तुझ्याच विचारात असायचे.
तुझ्या खोड्या , तुझे बासरी वाजवणे , तुझे हसणे , तुझे बोलणे हेच सगळे माझा आख्खा दिवस भरून असायचे.
तुझ्या खोड्या मला आवडायच्या. पण बाकी गवळणी त्यामुळे त्रस्त व्हायच्या. त्यानी सगळ्यानी एकदा यशोदामाई कडे तक्रार देखील केली. यशोदामाई तुला रागे भरली यशोदा माईवर रागाऊन तू नंदवाड्यातून बाहेर पडलास. नेहमी सोबत असणारी बासरी ही न घेता. कुठेतरी गेला असशील येशील परत म्हणून त्यांनी लक्ष्य दिले नाही. पण बराच वेळ तू घरी आलाच नाहीस.मग सगळे शोधाशोध करू लागले. कोणालाच तू सापडला नाहीस. दुपार उलटून गेली तसा यशोदामाईचा धीर सुटला. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा बांध फुटला. माझी ही अवस्था काही वेगळी नव्हती.मग मीच ठरवले तुला शोधून काढेनच. सगल्यानी सगळीकडे पाहीले. तू कुथे असशील याचा अंदाज घेतला. एक जागा माहीत होती. वृंदावनातलं नीधीबन. ती जागा तुला फार आवडायची. तेथून यमुना वळण घेताना दिसायची. म्हणून. तू तेथेच असशील हा माझा अंदाज खरा होता. तिथल्या औदुंबराच्या फांदीवर तू झोपलेला होतास. झोपेतही तूझ्या गालावरचे रागाचे फुगे लपत नव्हते. इतका रागावला होतास. मी हळूच एक मिरपीस घेतले आणि तुझ्या तळपायावर फिरवले. तु जागा झालास. तुला जागा झालेला पाहून मनात भावनांचे कल्लोळ उठले. मी तुझ्याशी बोलत होते. काय बोलत होते ते त्यावेळीही समजत नव्हते. लहान मुलाच्या गालाला हनुवटीला हात लावून घालावी तशी मी तुझी समजूत घालत होते. तू एकटक माझ्याकडे पहात होतास. तुझी माझी नजरानजर झाली . तू नजरेनेच बोललास " पुन्हा नाही वागणार मी असा" मला समजले ते. मला काय म्हणायचे होते ते तुला माझ्या डोळ्यातून समजले असावे. जीव कासावीस होतो रे..... तू असा दिसेनासा झालास की. खरेच पुन्हा नको करू असे. माझी शपथ. तू गोड हसलास. मी त्या हसण्यात विरघळले. तुला रागवायचे होते तेच विसरले. कोण आहेस रे तू माझा?
मग तू विचारलेस. इतके प्रेम करतेस माझ्यावर.......!
तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून हलले. काय बोलावे ते समजेना मला. डोळ्यात टचकन पाणीच आले.तुझ्या त्या शब्दांनी कुठेतरी आत खोलवर काही तरी छेडले होते.
( क्रमशः )
प्रतिक्रिया
22 May 2023 - 5:22 pm | श्रीगणेशा
राधेचं मनोगतही आवडलं. पुभाप्र.
या लेखमालिकेला आता "माझा कृष्ण" शीर्षक योग्य होईल का? सहजच वाटलं!
23 May 2023 - 2:10 pm | विजुभाऊ
पुढील दुवा https://www.misalpav.com/node/51316