एखादे सफरचंद किंवा एखादा लाल भोपळा आतून खराब तर नाही ना असा जर प्रश्न पडला तर काय करता येईल? चक्क ते सफरचंद किंवा तो भोपळा कापून त्याच्या आंत "डोकावता" येईल. पण जर "पृथ्वीच्या पोटात कांही गडबड तर चालू झालेली नाही ना" असा जर प्रश्न पडला तर? तर काय करता येईल? पृथ्वीचा आकार लक्षांत घेता (सुमारे १२,००० कि. मी. व्यासाचा एक गोल) सफरचंद किंवा भोपळा यांच्यासारखा पृथ्वीचा पृष्ठभाग कापून "थोडेसे" तरी पृथ्वीच्याआंत "डोकावता" येईल?
अति प्रचंड वस्तूंचा अभ्यास करताना किंवा त्यांच्याबद्दलच्या गोष्टी समजावून घेताना काही वेळा त्यांच्या छोट्या आकाराच्या प्रतिकृतींचा (किंवा त्यांच्याबद्दलच्या गणिती "model"चा) विचार करणे जास्त सुलभ ठरते. पृथ्वीच्या पोटातल्या खळबळीतून तयार होणाऱ्या उलथापालथीबद्दलचे शास्त्र इतर बऱ्याच शास्त्रांच्या मानाने नवोदित आहे. मागील १००-१५० वर्षांत हे शास्त्र जरी विकसित होत गेले असले तरी अजूनही पृथ्वीच्या पोटातल्या अनेक गोष्टींच्या हालचालींचा अभ्यास इतर अनेक शास्त्रांच्या मानाने प्राथमिक अवस्थेतच आहे.
ही मालिका अशा "रौद्रगर्भा वसुंधरे"च्या पोटातल्या खळबळीतून तयार होणाऱ्या ज्वालामुखी, भूकंप आणि अशाच घडामोडी आणि या सगळ्यातून जन्म पावणाऱ्या अनेक कोटी वर्षांच्या कालावधीत झालेल्या उलथापालथीबद्दल आहे. समजण्यास सोपे व्हावे म्हणून या उलथापालथीचा विचार करतांना, निदान सुरवातीला तरी अनेक छोट्या आकाराच्या प्रतिकृतींचा किंवा आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आधार घेतला आहे.
आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी भडभुंज्यांनी भल्या सकाळपासून धावपळ करत कुठेतरी आणि कशीतरी लावलेली जमेल तेवढी मोठी कढई आणि चूल (आता गॅस); बाजाराची गर्दी पुरेशी वाढल्यावर भडभुंजांचे सुरू झालेले चरचरीत तळण; झुंबड वाढली की मग कसलेला आचारी घामाघूम होत एकाच भल्यामोठ्या कढईत कधी उकळत्या तेलात भजी सोडतो, कधी झारा तेलात हलवत नव्या घाण्याची सुरवात करतो तर कधी तयार झालेली भजी झाऱ्यात तेल निथळवत झारा तोलत तोलत मोठमोठया जाळीच्या घमेल्यात ओतत रहातो; त्याच्या सभोवती घाईतली गिऱ्हाइके, पैसे गोळा करणारा मालक आणि माल देणारी पोरं; या सगळ्यांच्या घाई गर्दीत कधी तरी झारा थोडासा जोरात फिरतो किंवा आजूबाजूच्या गर्दीतल्या कुणाचा तरी धक्का लागतो, कढईतील तेल हेंदकळते आणि बाहेर उसळते किंवा कधी तयार होत आलेल्या घाण्यातली गरम भजी कढईत एकमेकांशी धक्काबुक्की करत बाहेर उडी घेतात, कधी उकळत्या तेलाचे थेम्ब कुणाच्या तरी अंगावर येतात तर कधी कढई कलंडल्यामुळे गरम तेल चुलीत सांडते आणि आगीचा लोळ निघतो. कधी कुणाच्या जीवावर बेतते तर कधी एखाद्याच्या हात पाय भाजण्यावरच वेळा निभावते. कधी कधी सगळे दुकानच आगीच्या भक्षस्थानी पडते.
अशा तऱ्हेच्या घटना अनेकांनी प्रत्यक्ष पाहिल्या असतील. आता कल्पना करा, जर त्या कढईचा, उकळत्या तेलाचा आणि त्यातल्या तयार होणाऱ्या भज्यांचा आकार एकदम लाखो पटीने वाढवला आणि तेलाचे तपमान १,००० ते ३,५०० अंश सेंटीग्रेड केले तर काय होईल. अशा कढईतून उसळणारे एकेक भजे एखाद्या टेकडी एव्हढे आणि तेलाचा एकेक थेम्ब एखाद्या तोफगोळ्यासारखा असतील. म्हणजे अशा कढईतून उसळलेल्या तेलाच्या कांही थेंबांच्या किंवा भज्यांच्या माऱ्यामुळे एकसमयावच्छेदेकरून अनेक माणसे, घरे, जनावरे आणि वाहने भस्मसात होऊ शकतील आणि अशी कढई कलंडून जर आग भडकली तर एखाद्या दुकानांऎवजी गांवेच्या गावे उध्वस्त होऊन जातील.
स्वैपाकघरांत प्रेशर कुकरमध्यें खदखदत शिजणारा भात रोज पाहताना त्या बंद भांड्यात तयार होणाऱ्या वाफेच्या शक्तीची पूर्ण कल्पना येत नाही. असा भात जर अनावधानाने शिजतच राहिला तर प्रथम कुकरची शिटी वाजते. तरीही दुर्लक्ष झाल्यास झडपेतून वाफेचे फूत्कार येऊ लागतात. असेच जर चालत राहिले तर शेवटी अनावर वाढत्या दाबामुळे प्रेशर कुकरचा "बॉम्ब स्फोट" जेव्हा होतो तेव्हा शिजलेला भात सगळ्या स्वयंपाक घरात छतावर, जमिनीवर, भिंतीवर उडतो आणि जो कोणी जवळपास सापडेल तो जबर भाजतो. असा काही प्रकार झाल्यावरच आपल्याला खदखदत हळूहळू तयार होत असलेल्या वाफेच्या वाढत्या दाबाची आणि उद्रेकशक्तीची कल्पना येते.
अशी "वाफ" जर १,००० ते ३,५०० अंश सेंटीग्रेड या तपमानाची असेल तर काय होईल? असा कुकर जर लाखो पटींनी मोठा झाला तर या स्फोटाची विध्वंसक शक्ती किती मोठी असेल?
पृथ्वीच्या पोटात चाललेल्या गडबडीतून उद्भवणाऱ्या ज्वालामुखी, भूकंप आणि त्सुनामी अशा घटना सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून समजावून घेतांना उकळत्या तेलाच्या कढया आणि स्फोट होणाऱ्या प्रेशर कुकरसारख्या अशा सारख्या रोजच्या उदाहरणांमुळे काय चालले असेल याची कल्पना येणे कदाचित सोपे होते.
सुमारे ४५० - ५०० कोटी वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूलिकण यापासून आपल्या वसुंधरेच्या निर्मितीची सुरवात झाली. अजूनही या गोलाच्या एकूण वस्तुमानाच्या फक्त १% पेक्षा कमी भाग जमीन, डोंगर, नद्या, वाळवंटें आणि समुद्र अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या बाह्य कवचाच्या रूपांत गार झाला आहे. आपल्याला जास्त चांगले माहीत असणारे हे बाह्य कवचाचे भाग आपल्या भूगोलाला साधारणतः सफरचंदाच्या सालीसारखे आच्छादतात. ही "साल" सगळीकडे सारख्याच जाडीची नसून काही ठिकाणी सुमारे ८० किलोमीटर जाड तर कांही ठिकाणी ती जेमतेम भूगर्भातल्या तप्त रसांना बाहेर उसळण्यापासून थांबवण्याइतपतच म्हणजे एखाद्या किलोमीटर इतकीच जाड आहे. परंतु या "सफरचंदाचा" एखादा कापलेला तुकडा - जर बघता आलाच तर - "साली"खालचा द्रव सारखा उफाळत,ढवळत असलेला असा दिसेल.
भारतांत अंदमान सोडल्यास कुठेच ज्वालामुखी नसल्याने आणि काही अपवाद सोडल्यास भूकंप देखील मर्यादितच अनुभवले जात असल्यामुळे या लेखमालिकेतील ज्वालामुखी, भूकंप आणि त्सुनामी (या वरकरणी एकमेकांपासून वेगळ्या पण एकमेकांशी बऱ्याच संलग्न ) अशा भूगर्भाशी संबंधित घटनांची माहिती किमान वाचनीय ठरावी.
मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले. इंडोनेशियातील बऱ्याच लांबलचक वास्तव्यामुळे २००४ साली अचे, सुमात्रा येथे -आणि इतरत्र देखील, पण कमी प्रमाणात - झालेल्या त्सुनामीचे परिणामही बऱ्याच जवळून पहाता, समजता आणि वाचता आले. या सगळ्यातून निर्माण झालेल्या कुतुहलामुळे या सगळ्याच आगळ्या सृष्टीबद्दल बरेच जे वाचले आणि माहिती मिळवली त्याचे सार या लेखमालेत आहे.
इथून पुढील भागांत इंग्रजीतल्या बऱ्याच तांत्रिक संज्ञा इंग्रजीतूनच वापरल्या आहेत कारण त्यांच्याकरता योग्य मराठी संज्ञा शोधण्याकरता खटाटोप करायला लागला असता आणि जरी तो केला असता तरी अशा संज्ञा रोजच्या वापरातील नसल्यामुळे अंमळ निर्बोध वाटल्या असत्या. जिथे सोप्या आणि वापरातल्या मराठी संज्ञा (जसे "भूगर्भ") मिळतील तिथी त्याही वापरल्या आहेत.
या मालिकेद्वारे "ज्वालामुखी, भूकंप आणि त्सुनामी " या गहन विषयाचे शक्य तेव्हढ्या सोप्या भाषेत वर्णन करणे हा माझा मर्यादित उद्देश आहे. हे लिखाण भूगर्भ शास्त्राचे अधिकृत पुस्तक नाही आणि मी या शास्त्रातील तज्ञ असल्याचा माझा मुळीच दावा नाही.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 May 2023 - 12:22 pm | कुमार१
लेखमालेचे स्वागत!
11 May 2023 - 3:19 pm | शेखरमोघे
धन्यवाद!
11 May 2023 - 12:28 pm | चांदणे संदीप
पुभाप्र.
सं - दी - प
11 May 2023 - 3:19 pm | शेखरमोघे
धन्यवाद!
11 May 2023 - 12:53 pm | कर्नलतपस्वी
पु भा प्र
11 May 2023 - 3:20 pm | शेखरमोघे
धन्यवाद!
11 May 2023 - 1:11 pm | अथांग आकाश
छान सुरवात! पुभाप्र!!
11 May 2023 - 3:24 pm | शेखरमोघे
धन्यवाद!
आपल्या प्रतिसादातील चित्र एकदम बोलके आहे!!
11 May 2023 - 3:53 pm | तुषार काळभोर
ओळख आवडली.
पुढील विस्तृत भागांच्या प्रतिक्षेत.
12 May 2023 - 4:22 pm | शेखरमोघे
धन्यवाद!
पुढील भाग लिहून तयार होता पण चित्र डकवण्याबद्दल धडपड चालू होती. श्री राजेन्द्र मेहेन्दळे यान्च्या मदतीने ते आज जमवले.
11 May 2023 - 4:38 pm | अनन्त अवधुत
सुरुवात छान झाले आहे.
विषय आवडीचा आहे. वाचत राहीन. पु. भा. प्र.
12 May 2023 - 4:22 pm | शेखरमोघे
धन्यवाद
11 May 2023 - 4:57 pm | अनिंद्य
ही मालिका पूर्ण वाचणार !
पु भा प्र
12 May 2023 - 7:58 am | प्रचेतस
रोचक सुरुवात
12 May 2023 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
चला येऊंद्या पुढचे भाग पटापट!!
12 May 2023 - 12:39 pm | टर्मीनेटर
प्रास्तविक वाचुनच मालिका माहितीपुर्ण होणार ह्याचा अंदाज आला आहे!
हे आवडले 👍
प्रत्येक ठिकाणी मराठीच्या (अनाठयी) अट्टाहासापायी तांत्रिक संज्ञांचे अगम्य मराठीकरण केलेले लेखन वाचायला मला आवडत नाही 😀
12 May 2023 - 4:28 pm | शेखरमोघे
योग्य आणि उपयुक्त मराठी संज्ञा शोधण्याकरता खटाटोप करणार आहेच, फक्त जर त्या निर्बोध वाटल्या तर इन्ग्रजीचा आधार घेणे जरूर वाटते.
12 Jun 2023 - 8:32 am | वामन देशमुख
लेख आवडला.
लेखमालेची कल्पना आवडली.
---
शंका: एखाद्या ज्वालामुखीमधून पृथ्वीच्या गर्भातील सर्वच लाव्हारस बाहेर का येत नाही?
15 Jun 2023 - 12:15 am | शेखरमोघे
आपल्या "एखाद्या ज्वालामुखीमधून पृथ्वीच्या गर्भातील सर्वच लाव्हारस बाहेर का येत नाही" या प्रश्नाचे उत्तर मालिकेतल्या नन्तरच्या भागातल्या विवेचनात (जिथे ज्वालामुखी आणी त्यान्चे उद्रेक यावर बरीच माहिती असेल) येईलच पण एक (काल्पनिक) प्रयोग खाली देत आहे त्यावरून प्राथमिक का होईना पण "काय होत असावे" याचा जास्त चान्गला अन्दाज यावा.
१. पाण्याच्या किन्वा इतर द्रव पदार्थाच्या पारदर्शक प्लास्टिकच्या वापरलेल्या २ रिकाम्या बाटल्या घ्या.
२. दोन्ही बाटल्याना साधारण सारख्या तर्हेची सर्व पृष्ठ भागावर पसरतील अशी भोके पाडा.
३. एका बाटलीत पाणी ओता आणि किती पटकन ती बाटली रिकामी होत रहाते ते पहा - मुख्य कारण बाटलीतील पाण्याला बाहेर जाण्याच्या वाटेत काहीच अडथळे नाहीत. कदाचित बाटली कधीच भरणार नाही.
४. एका पातेल्यात बाजारातील्/घरात केलेली, सुका मेवा, वेलची युक्त बासुन्दी घ्या आणि ती दुसर्या बाटलीत ओतून ती किती पटकन बाटलीतल्या भोकातून बाहेर पडू शकते ते पहा. बासुन्दी जितकी दाट आणि सुका मेवा, वेलची युक्त असेल तितकी बाटलीतल्या भोकाना आतूनच प्रतिबन्धक आवरण तयार झाल्याने बासुन्दी (किन्वा त्यातील जास्त पातळ द्रव) बाटलीतून बाहेर पडण्याची शक्यता/गती कमी. (बासुन्दी उगीचच फुकट जाऊ नये म्हणून प्रयोग फक्त काल्पनिक असावा).
एकूणच "लाव्हारसाचे (किम्बहुना पृथ्वीच्या गर्भातील द्रवभागाचे) पृथ्वीतून बाहेर पडणे" ही प्रक्रिया बाटलीतून पाणी बाहेर पडणे (एकदम झटकन) यासारखी असण्यापेक्षा बाटलीतून बासुन्दी बाहेर पडणे (किन्वा बाहेर पडू पहाणे पण पडू न शकणे) या सारखीअसेल. बाटलीतून पडणार्या बासुन्दीमधील द्रवाला जसे बाटलीवरच्या भोकान्तून बाहेर पडता येण्या आधी भोकाच्या आतील अनेक अडथळे पार करावे लागतील तसे पाण्याला नसल्यामुळे पाणी पूर्णपणे आणि पटकन बाहेर पडू शकेल.
आता आपली नेहेमीच्या पहाण्यातली, वरच्या काल्पनिक प्रयोगातेल प्लास्टिकची बाटली (तिचा पृष्ठभाग, वस्तुमान, तपमान इ. इ.) आणि जिचा आपण अभ्यास करणार आहोत ती वसुन्धरा (तिचा पृष्ठभाग, वस्तुमान, तपमान इ. इ.) यातील प्रचन्ड फरक/वैविध्य तसेच पाणी, बासुन्दी आणि लाव्हा यातील प्रचन्ड फरक/वैविध्य -खास करून स्निग्धता आणि घनता (viscosity and density) लक्षात घेता "पृथ्वीच्या गर्भातील लाव्हारस बाहेर येणे" ही प्रक्रिया किती गुन्तागुन्तीची असू शकेल याचे कल्पना यावी.
15 Jun 2023 - 12:16 am | शेखरमोघे