मराठी : वाचन घडते कसे ?

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
10 May 2023 - 6:51 am
गाभा: 

यंदाच्या महाराष्ट्र दिन (१ मे ) अर्थात मराठी भाषा दिनानिमित्ताने एक कल्पना मनात आली. त्यातून प्रसवलेला हा धागा त्या दिवशीच प्रसिद्ध करण्याचा मानस होता परंतु इथल्या तांत्रिक समस्येमुळे ते जमले नाही. आता ती कल्पना सर्वांसमोर मांडतो.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा हा एक प्रयत्न. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?

४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?

३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक

३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.

५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या वेळेस देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !

सूचना : फक्त मराठी भाषेतील वाचनाबद्दलच लिहावे.
*************************************************************************************************

प्रतिक्रिया

इतकं कोण टाइप करणार म्हणून धागा वाचून सोडून देणार होतो, पण लेखकाचे नाव पाहून धागा पुन्हा उघडला :-)

दैनिके : हे राम... :इथे डोके बडविणारी स्माईली: ... शिवीगाळ, राजकीय चिखलफेक, हिंदी आणि इंग्रजीमिश्रित मराठी, आणि जाहीरातींचा भडीमार यामुळे कोणतेही दैनिक वाचत नाही. अनेक वर्षांची सवय मुद्दाम मोडली. महत्त्वाच्या गोष्टी मूळ इंग्रजी बातम्यांतून समजतात, आणि उरलेल्या लोक व्हॉट्सऍप फॉरवर्डमधून पाठवतात, तेवढे पुरेसे होते.

नियतकालिके : क्वचित, जर त्यातील चांगल्या लेखाचा संदर्भ कुणी पाठविला तरच. फक्त आंतरजाल.

मराठी संस्थळे : मिसळपाव, ऐसी अक्षरे, मायबोली इत्यादी. जवळपास रोजच वाचन, वर्षातून एकदा लेखन. जगभरातील संस्थळे उघडी असताना किती दिवस मराठी-एके-मराठी करणार, त्यामुळे जे चांगले सापडते ते वाचतो, मराठी असो किंवा नसो.

पुस्तके: रोज वाचतो. बहुतांशी PDF, किंडल इत्यादी, थोडी छापील. श्रवणापेक्षा वाचन आवडते कारण कंटाळवाणा भाग पटकन सोडून देता येतो. गाडी चालविताना क्वचित श्रवण बरे पडते. पुस्तके विकत आणि मोफत दोन्ही प्रकारे घेतो. होय, छापील पुस्तके जरूर राहावीत आणि ती राहातील!

आजकाल दर्जेदार असे फार थोडे वाचनास सापडते. उदाहरणच द्यायचे तर रामदासकाकांच्या तोडीच्या कथा आज कुठे वाचणार? आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, शिरुभाऊ पेंडसे, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, वि. स. वाळिंबे, गोपाल नीळकंठ दांडेकर, जयंत नारळीकर, द पां खांबेटे, नारायण धारप, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर यांच्या तोडीचे किती मराठी लेखक आज लिहिते आहेत? काही अपवाद जसे श्रीकांत बोजेवार इत्यादी वगळता बाकी सर्व अंधारच आहे. धेडगुजरी अनुवादित पुस्तके, 'झटपट श्रीमंत व्हा' टाइप मॅनेजमेंट गाईड यांनीच पुस्तकांची दुकाने आज भरलेली दिसतात!

कुमार१'s picture

10 May 2023 - 8:14 am | कुमार१

सुंदर सुरुवात !
....

ज्यांना प्रश्नावली नको वाटत असेल त्यांनी स्वतःच्या भाषेत लिहिले तरी चालेल.

मराठी भाषिकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न/प्रयोग आवडला 👍
प्रश्नावलीला माझी उत्तरे खालील प्रमाणे...
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
लहानपणापासून ते गेल्या काही वर्षांपर्यंत छापील लोकसत्ता वाचायचो, आता अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी दैनिकांच्या आंतरजालीय आवृत्त्या वाचण्याचा चांगला पर्याय उपलब्ध असल्याने त्याच वाचतो.

२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
फक्त ठळक बातम्या आणि ज्या विषयांत रस आहे त्यावरील विश्लेषणात्मक लेख!

३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
व्यंगचित्रे.

४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
अनेक प्रस्थापित/पडेल सिने किंवा टीव्ही अभिनेते, अभिनेत्री किंवा अन्य सेलिब्रेटी आणि उद्योजकांच्या परिवारातील सदस्यांचे पेड/फ्री प्रमोशन करण्यासाठी
पहा अमक्या-तमकीचा काळ्या साडीतला/बिकीनीतला हॉट अंदाज... अमुक तमुक अभिनेत्री/सेलिब्रेटींने परिधान केलेल्या पेंडंट/पर्स पासून अंतर्वस्त्रांपर्यंत कशाचीही किंमत जाणून घ्या, आकडा ऐकून धक्का बसेल... या आणि अशा अनेक फालतू गोष्टींची माहिती देणारी सदरे.

५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
नक्कीच चालू राहावीत... नाहीतर घरगुती वापरापासून ते व्यावसायिक वापरापर्यंत असंख्य ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कागदाची मोठ्या प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण होण्यासाठी रद्दी कुठून निर्माण होईल 😀

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
सध्यातरी कोणतीच वाचत नाही.

२. त्यातील आवडणारी सदरे
निरंक.

३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
निरंक.

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
सध्यातरी मिपा आणि मराठी Quora ह्या दोनच संस्थळांवर तसा नियमित वावर असतो. आणि अधून मधून कोणी एखाद्या लेखाची लिंक पाठवल्यास मायबोलीवर फेरी होते पण फार क्वचित प्रसंगी!

२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
दैनंदिन कामकाजातून आणि प्रवासात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिपावर आणि मराठी Quora वर वाचन करतो.

३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
ललित, भटकंती पाककृती आणि अभ्यासपूर्ण ऐतिहासिक लेखन.

४. नावडणारे विभाग / प्रकार
(जगातल्या तमाम कवी-कवयत्रींची क्षमा मागून उत्तर देतो) कविता आणि राजकीय चर्चा.

५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
पूर्वी (सदस्यत्व घेण्या आधीपासून) मिपाचा फक्त वाचक होतो, मग वाचता वाचता लिहायलाही इथेच शिकलो. आता अधूनमधून मिपावर (मोठ्या मनाचे मिपाकर सांभाळून घेतात म्हणून) थोडेफार लेखन करतो. मराठी Quora वर दोन-तीन वर्षांपूर्वी थोडेफार लेखन केलेले असल्याने जवळपास रोजच विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वाचकांनी/प्रश्नकर्त्यांनी केलेल्या विनंत्यांची नोटिफिकेशन्स येत असतात पण त्यासाठी आता वेळ नाही देता येत ह्याची खंत वाटते.

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
आता पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही.

२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
पूर्वी छापील आता अपवादाने एखादे वाचलेच तर ई-बुक (किंडल गेल्या तीन-चार वर्षांपासून धूळ खात पडलंय 😀)

३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
पु.ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, शंकर पाटील आणि वपुंची कथाकथने तेवढी वाचन श्रवण ह्या प्रकारासाठी आवडतात आणि ती देखील त्यांच्याच आवाजात, बाकी पुस्तक श्रवण प्रकारात रस नाही!

४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
पूर्वी वाचनालय जिंदाबाद! आता क्वचित प्रसंगी एखादे विकत घेतले तर ई-बुक.

५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
रहस्य कथा/कादंबऱ्या आणि संशोधन करून लिहिलेली ऐतिहासिक पुस्तके/कादंबऱ्या, निवडक आत्मचरित्रे आणि मनोरंजक कथा, विनोदी कथा, वैज्ञानिक कथा आणि अशा प्रकारच्या लघु-कथांचे कथा संग्रह हे आवडीचे पुस्तक प्रकार.
सामाजिक विषयावरील कथा, कादंबऱ्या/पुस्तके वाचायला फारसे नाही आवडत.

६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
हो, राहावीत! का ह्याचे विशिष्ट कारण नाही सांगता येणार, पण छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे मनापासून वाटते.

सर टोबी's picture

10 May 2023 - 1:47 pm | सर टोबी

दैनिक: सकाळ वाचतो. पाणी आणि वीज पुरवठा अशा आपल्या दैनंदिन आयष्यात उपयोगी असणाऱ्या गोष्टींची माहिती असते म्हणून वाचतो. आजकाल उपसंपादक नाहीत कि भाषेचा दर्जा घसरलाय कि आपणच चुकीची मराठी शिकलोय असा प्रश्न पडावा इतकी भिषण अवस्था आहे बातम्या आणि लेखात वापरल्या मराठीची.

एकूणच समाजात भोळसट वृत्ती खूपच बोकाळलीय. त्यामुळे बस डे, यीन मंत्रिमंडळ, कोणे तो माठ असे काही विनोदी उपक्रम सकाळ चालवीत असतो. असे उपक्रम सकाळ विशेष परदेशी पाहुण्यांना दाखवीत असते. शरद पवारांचा वैचारिक गोंधळ (आपण पुरोगामी कि सनातनी) हा पाहुण्या स्तंभ लेखकांची जी निवड करण्यात आली आहे त्यात डोकावते.

नियत कालिकं: पूर्वी इंडिया टुडे आवर्जून वाचायचो. जोडीला त्यांच्याच प्रकाशनाचे बॉम्बे हे साप्ताहिकही वाचायचो. झालंच तर त्यांचे विशेष संग्रही असावे असे अंक देखील मी विकत घेऊन वाचत असे. आज काल अरुण पुरींनी मोदी सहस्रनामाचा घोष लावल्यामुळे त्याची जालावर उपलब्ध असणारी आवृत्ती फुकट देखील वाचत नाही.

पुस्तकं: सामाजिक आशय हा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे अनिल अवचट हे आज पर्यंतचे सर्वात आवडते लेखक. पूर्वी द मा मिरासदार यांचा निरागस विनोद खूप आवडीचा होता. आता पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला असता खूपच बालिश पातळीवरचं ते लिखाण होतं असं जाणवलं. जोडीला मिळेल तेथे संघाची भलामण करणारी त्यांची वाक्यं डोक्यात जातात.

सध्या इतकंच. नंतर काही उर्मी आली तर लिहीनच.

चौथा कोनाडा's picture

10 May 2023 - 2:07 pm | चौथा कोनाडा

त्यामुळे बस डे, यीन मंत्रिमंडळ, कोणे तो माठ असे काही विनोदी उपक्रम सकाळ चालवीत असतो.

तो बस डे हा भलताच विनोदी उपक्रम वाटायचा. एकाच दिवशी म्हणे स्वतःचे खासगी वाहन न वापरता म्हणे फक्त पीएमपीच वापरायची म्हणे. म्हंजे एकाच दिवशी बसमध्ये खच्चून गर्दी करायची म्हणे, त्या साठी जास्त बस सोडणार म्हणे (इ त र दिवशी अशी कार्यक्षम सेवा पुरवायला यांना काय रोग जडतो म्हणे ?) काही उत्सवी (अर्थात शेळीब्रेटी) लोकं बसने प्रवास करत असल्याचे फोटो छापायचे .... सगळाच विनोदी सकाळ प्रकार !

😀

😀

😀

कर्नलतपस्वी's picture

10 May 2023 - 2:01 pm | कर्नलतपस्वी

आपला हाच लेख मायबोलीवर वाचला.

वाचन आणी आयुष्य एक सारखेच वाटते कारण. दोघांनाही वय असते. वयापरत्वे यात बदल होत जातो.

कुमार,चांदोबा,गुलबकावली,सिंदबादच्या सफरी,तेनालीराम,पंचतंत्र,अकबर बिरबल सारखी जीव की प्राण वाटणारी पुस्तके आयुष्याच्या एका टप्प्यावर पोरकट,बालीश वाटू लागली. शामची आई चे साने गुरुजींची भेट याच वयात झाली.

याच वयात दैनिके जसे केसरी,त भा इ. वडिलधारी वाचायची पण यांचा आणी माझा दररोजचा संबध नसे पण रविवारच्या पेपर मधले बाल वाङमय मात्र जरूर वाचले जात असे.

दुधाचे दात पडू लागले तेव्हा बाबूराव अर्नाळकर,नारायण धारप,खांबेटे सारखे लेखक आवडायला लागले. दक्षता सारखी मासिके व काही निवडक दिवाळी अंक.

आता मात्र दैनिके दररोज वाचनात येवू लागली पण ती सुद्धा फक्त शेवटची दोन पाने ज्या मधे खेळाच्या बातम्या व सिनेमाच्या जाहिराती असत. आवडत्या खेळाडूंची कात्रणे मित्रांबरोबर शेअर करण्यात धन्यता वाटे.

दप्तर गेले पुस्तके हातात आली दिवसभरातील एकाच गुरुजींची जागा अनेक सरांनी घेतली व वेगवेगळे विषय शिकवू लागले. ओठावर हलकेच मिसरूड फुटू लागले तेंव्हा अत्रे,नां स इनामदार, गोनीदा,पुरंदरे,सावंत,पु. ल.,मिरासदार, साठे,शंकर पाटलां बरोबर (चोरून) चंद्रकांत काकोडकर सुद्धा ओळखीचे झाले. रोमिओ सारखी मासिके आता मित्रांबरोबर शेअर होऊ लागली.

शिक्षणाला ब्रेक लागला,नोकरी धरावी लागली व इथून पुढे मराठी वाचन खुपच कमी झाले.

गुलशन नंदा,राणू बरोबर मुन्शी प्रेमचंद, श्रीलाल शुक्ल इत्यादी हिन्दी वाचन सुरू झाले. स्पर्धा परिक्षे साठी इंग्रजी मासिके, पुस्तके वाचनात आली.

सेवानिवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी वाचन सुरू आहे.

दैनिक - अजीबात नाही.
पुस्तके- जी हाताला लागतील ती. सध्या जी ए कुलकर्णींचे पिगळावेळ व कजळमाया वाचत आहे.
स्वतःचा संग्रह आहे. आता फक्त मराठी पुस्तकांची भर पडतेय.

पुस्तके नेहमी प्रकाशीत व्हावी. इ- पुस्तक वाचतो पण मजा नाही.

कुमार१'s picture

10 May 2023 - 2:16 pm | कुमार१
छापील पुस्तके नेहमी प्रकाशीत व्हावी. इ- पुस्तक वाचतो पण मजा नाही.

+११
पुस्तकांचे छापील व इलेक्ट्रॉनिक असे दोन्ही प्रकार कायमस्वरूपी असावेत; प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. वाचक त्याच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकेल
अलीकडे (विशेषतः काही अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये) असे जाणवले की छापील पुस्तक कमीत कमी पानांत बसण्यासाठी प्रकाशक या पुस्तकातील अक्षरांचा आकार खूप छोटा करू लागलेले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी हे तापदायक आहे.

वय, चष्म्याचा नंबर आणि डोळ्यांची स्थिती असे अनेक मुद्दे विचारात घेतले, तर ई-बुक मध्ये अक्षरांचा आकार हवा तेवढा करता येणे हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

कुमार१'s picture

10 May 2023 - 2:09 pm | कुमार१

वरील दोन्ही सविस्तर प्रतिसाद आवडले.
...
१.

असंख्य ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कागदाची मोठ्या प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण होण्यासाठी रद्दी कुठून निर्माण होईल

>> रोचक मुद्दा.
यावरून एका लेखकाने केलेला विनोद आठवला. ते म्हणायचे,
लेखक नवोदित असो वा मान्यवर- या सर्वांमध्ये एक समानता जरूर आहे. ती म्हणजे हे सर्वजण मिळून नियमित रद्दीनिर्मिती करीत असतात!

२.
भीषण अवस्था आहे बातम्या आणि लेखात वापरल्या मराठीची.

खरं आहे. फक्त जालावरील अंकांपेक्षा छापील दैनिके अजून बरीच बरी आहेत.

ऐतिहासिक कादंबरी फारसे नाही
आत्मचचरित्र कधी कधी
गूढकथा कधी कधी
रहस्यकथा नाही
सर्वात जास्त आवडता प्रकार म्हणजे व्यक्ती व्यक्तीतील संबंधीच्या कथा / कादंबऱ्या

छापील पुस्तके वाचणे नक्कीच आवडते , इलेकट्रोनिक पद्धतीने वाचणे जिकिरीचे वाटते

शंकर पाटील , दमा, माडगूळकर, वपु, दळवी, जी ए , खानोलकर , प्रकाश नारायण संत , श ना नवरे , पेंडसे ,द. मा. मिरासदार, इत्यादी आवडतात
मिपाकरांना विनंती , जर या पठडीतील कोणी आजकालचे लेखक असतील तर नक्की सुचवावे

प्रचेतस's picture

10 May 2023 - 4:16 pm | प्रचेतस

दैनिके

छापील. सकाळ आणि मटा, स्थानिक बातम्यांसाठी दोन्ही उत्तम. त्यातही मटा जास्त बरा. डिजीटल अंकापेक्षा छापील पेपर खरेच छान आहे. मटाची रविवारची संवाद पुरवणी आवडते. सकाळची सप्तरंग मात्र साधारण आहे द्वारकानाथ संझगिरींचे लेख सोडून. श्रीराम पवारांचे करंट अंडरकरंट सदर तर डोक्यात जाते. लोकसत्ता क्वचित ऑनलाईन वाचतो. महेश सरलष्करांचे लाल किल्ला हे सदर विशेष आवडीचे.

अन्य नियतकालिके

पूर्वी लोकप्रभा ऑनलाईन वाचायचो,आता तेही बंद पडलेय.

मराठी संस्थळे

कट्टर मिपाकर असल्याने इतर माबो, ऐसी इत्यादी संस्थळावर जात नाही, क्वचित कुणी एखाद्या चांगल्या लेखाचा दुवा दिला तरच जातो. मिपावर राजकीय धाग्यांवर क्वचितच जातो, भटकंती, कथा, विडंबनं वगैरे आवडतात. अधूनमधून काही लेखनही करतो.

पुस्तके

किंडल आहे मात्र त्यावर वाचत नाही. छापील पुस्तकेच आवडतात, त्यातही कोर्‍या पुस्तकांचा गंध घ्यायला खास आवडते. सुहास शिरवळवकर, गोनीदा, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, भैरप्पा, शिवराम कारंथ, डॅन ब्राऊन, सिडने शेल्डन, रॉबिन कूक, फ्रेडरिक फॉरसिथ, जेफ्री आर्चर, अ‍ॅलीस्टर मॅक्लीन हे आवडीचे लेखक. नव्या दमाच्या लेखकांमध्ये हृषिकेश गुप्ते.
शालेय आणि कॉलेजजीवनात वाचनालयावर भर होता, प्रचंड पुस्तके वाचली, नंतर मात्र स्वतः विकत घेणे सुरु केलेय. सुमारे पाचशे पुस्तके घरात असावीत, तपशीलवार याद करायचे केव्हापासूनचे ठरवत आहे. पण आता करावी म्हणतो. छापील पुस्तके मात्र राहिलीच पाहिजेत असे मत आहे.

कुमार१'s picture

10 May 2023 - 5:53 pm | कुमार१

आताच हे वाचले:

आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर यांनी स्टोरीटेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे यांच्या कथांचे ‘ऑडीओ बुक्स’ रेकॉर्ड करून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

श्रीगणेशा's picture

10 May 2023 - 6:35 pm | श्रीगणेशा

कुमार सर,
कल्पना छान आहे, असा कानोसा घेण्याची.
खरं तर, वाचन लिखाणाबद्दल जागृत असणाऱ्यांनी, हे प्रश्न स्वतःला नक्की विचारावेत.

----

दैनिके
दररोज नाही, पण आठवड्यातून एकदा-दोनदा तरी
लोकमत ई-पेपर वाचतो. ई-पेपर प्रकार छापील दैनिकाशी मिळता जुळता असल्याने, तेवढंच समाधान वाटतं. महाराष्ट्राच्या बाहेर राहत असल्याने दैनिके मिळणं अवघड किंवा अशक्य.

विज्ञान व तंत्रज्ञान, राजकीय विश्लेषणात्मक लेख, संपादकीय, व्यंगचित्रे ही सदरे आवडतात.

छापील दैनिके कायमस्वरूपी राहावीत. जो निवांतपणा छापील दैनिक वाचण्यात आहे, तो ई-पेपर मधे नाही, कारण तिथे एकाग्रता टिकून राहणं अवघड.

अन्य नियतकालिके
दैनिकांच्या जोडीला इतर कोणतीही नियतकालिके वाचत नाही.

मराठी संस्थळे
मिपावर हे एकच संस्थळ असेल जिथे मी खूप वर्षांपासून वाचतोय, तेही अधून मधून. थोडंफार लिहिण्याचाही प्रयत्न करतोय. मायबोलीवर क्वचितच चक्कर होते.

कथा, कविता, आठवणी, पुस्तक- चित्रपट समीक्षा, आणि कधी कधी भटकंती लेखही आवडतात.
राजकीय चर्चा (धूळफेक म्हणता येईल) आवडत नाही.

अधून मधून लिहायचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळात फक्त पुस्तक किंवा चित्रपट परीक्षण लिहिणं शक्य झालं आहे. स्वतंत्र, विचार करून लिहिणं खूप अवघड, ते ठरवून होत नाही, आपोआपच सुचतं, कधी तरी.

पुस्तके
ठरवून नाही पण वर्षातून काही महिने, एखादी दोन पुस्तकं वाचणं शक्य होतं. एखाद्या विषयावर एक पुस्तक वाचलं, आवडलं, की त्याच्या आजूबाजूची पुस्तके वाचायला आवडतात.

छापील पुस्तकं वाचायला आवडतात. इलेक्ट्रॉनिक शक्यतो वाचत नाही, कारण एकाग्रता शक्य होत नाही.

श्रवणापेक्षा पुस्तक वाचन जास्त आवडतं कारण त्यात हवं तिथे, हवं तितकं थांबता येतं, समजावून घेता येतं. श्रवण करतानाही हे शक्य आहे, पण वाचन करण्याइतकं सोपं निश्चितच नाही.

पुस्तकं विकत घेऊन वाचायला आवडतात. अर्थातच वाचून झाल्यावर शक्य असेल तर मित्र नातेवाईक यांना वाचण्यासाठी देता येतात. गंमत अशी की, मला मात्र असं पुस्तक अजून कोणाकडूनही मिळालं नाही, किंवा मला घ्यावंसं वाटलं नाही, आणि माझ्याकडून नेलेलं पुस्तक अजून कोणीही परत केलं नाही.

खूप काही वाचलं नाही, त्यामुळे वाचलेल्या पुस्तकांचं किंवा भविष्यात वाचता येईल अशा विषयांचं आवडत्या/नावडत्या प्रकारात वर्गीकरण करण्याएवढी यादी नक्कीच मोठी नाही. पण अच्युत गोडबोले यांचं "मनात" हे मानसशास्त्राची थोडक्यात ओळख, इतिहास सांगणारं पुस्तक वाचल्यानंतर, त्या विषयात गोडी निर्माण झाली आहे. त्याच विषयातील काही संदर्भ पुस्तके वाचन संथ गतीने सुरू आहे. पुस्तकं वाचून जर आपल्या स्वतःच्या, आजूबाजूच्या माणसांच्या आयुष्यावर प्रकाश टाकता आला, तर वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त समाधान मिळत असावं. कदाचित, वाचनातून हेच अभिप्रेत असायला हवं.

भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी नक्कीच राहावीत.

----

कुमार१'s picture

10 May 2023 - 6:54 pm | कुमार१
मला मात्र असं पुस्तक अजून कोणाकडूनही मिळालं नाही, किंवा मला घ्यावंसं वाटलं नाही, आणि माझ्याकडून नेलेलं पुस्तक अजून कोणीही परत केलं नाही.

हे भलतेच आवडले आहे !!

यावरून मार्क ट्वेन यांचा विनोद आठवला:

" कोणालाही पुस्तक उसने देऊ नका कारण ते कधी परत येत नसते. तुम्हाला सांगतो, माझे स्वतःचे ग्रंथालय अशाच पुस्तकांमुळे उभारणे शक्य झाले आहे !"

Bhakti's picture

11 May 2023 - 11:03 am | Bhakti

छान उपक्रम!

दैनिके

इ दैनिके अजिबात वाचत नाही.पण विशेष शैक्षणिक क्षेत्रातील , वैज्ञानिक माहिती व घटना ई-दैनिकातून विदा,फोटो मिळाल्यास वाचते.

नियतकालिके
विवेक,साधना विदा मिळाल्यास,लेख लिहितांना संदर्भासाठी वाचते.

संस्थळे

मिपा जरा जास्त वाचते.सर्वच सदर आवडीने वाचते.मिपा,माबो विकिपीडिया सारखं वापरते , म्हणजे एखाद्या विषयावर माहिती पाहिजे असल्यास शरद ऋतू मायबोली किंवा शरद ऋतू मिपा असे गुगल करते.ऐसीवर पण चक्कर होतं असते.
इतर ब्लॉगपण वाचते पण नियमित नाही.

लिहिते मिपावरच :)

याहून आठवलं mompresso मराठीवर मी कोवीड काळात खुप छान लिखाण केलं होतं,एक लाईव्ह मुलाखतही माझी झाली होती.त्यामुळे आज तिकडे चक्कर टाकली तर ते app बंद होणार आहे हे समजलं :(
ठीक आहे परत सुरू झालं ही स्त्री हृदय लेख तिकडे लिहित जाईन.

पुस्तके

२०२० पासून परत वाचायला सुरुवात केली आहे.
इथे परिचय देतच असते(ऐसी अक्षरे...मेळवीन).
इलेक्ट्रॉनिक पुस्तकं अजून वाचली नाहीत.
छापील पुस्तकच आवडतात कारण थेट मनाशी संपर्क होतो.नाहीतर दिवसभर मोबाईल,laptop कामामुळे ,इतरांशी बोलण्यासाठी संपर्कासाठी वापरला जातो,त्याचच saturation अधिक होतं.
पुस्तकांमध्ये सध्या दुर्गाबाई भागवत यांच गारूड मनावर चढलय :) तोच आनंद चिरकाल घेतेय.

कुमार१'s picture

11 May 2023 - 12:24 pm | कुमार१
mompresso मराठीवर

हे नव्याने समजले आणि ते बंद होणार असेही तुम्ही म्हणताय. असो !
वाचनलेखन शुभेच्छा.

कुमार१'s picture

12 May 2023 - 8:33 am | कुमार१

1.
दैनिके
१ . रोज: छापील सकाळ.
आंतरजालीय : लोकसत्ता, मटा, लोकमत.

२. बातम्या नजर टाकतो व आवडती सदरे वाचतो.

३. आवडणारी सदरे : संपादकीय पानावरील निवडक लेख, नाममुद्रा (सकाळ), माणसं (मटा), विचारमंच (लोकसत्ता), रेल्वे घडामोडी (लोकमत) आणि या सर्वांच्या रविवार पुरवण्यांमधले निवडक लेख.

४. अजिबात न आवडणारी सदरे : ज्योतिष, नटनट्यांची फाजील कौतुके, सौंदर्यप्रसाधने आणि इनोदी प्रकारची.

५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते, पण कमीतकमी पृष्ठसंख्येची असावीत (कोविड19 च्या टाळेबंदीत होती तेवढी). पृष्ठसंख्येच्या बाबतीत छापील वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि वाचकांची आवड यांचे समीकरण जुळणार नाही याची कल्पना आहे, तरीही हे वै.म.

घरी जे एकमेव छापील मराठी दैनिक येते ते अजून तरी चालू ठेवलेले आहे. पहिल्या संपूर्ण पानावर असलेली जाहिरात आणि वृत्तपत्र हातात घेऊन उघडताक्षणी त्यातून खाली सांडणारा गुळगुळीत कागदावरचा व्यापारी कचरा बघितला की खरंतर तिडीक येते. तरीसुद्धा, विधायक बातम्या/माहिती पटकन नजरेत भरणे आणि त्यातले शब्दकोडे पेनाने सोडवता येणे या दोन गोष्टींसाठी ते चालू ठेवेन असे दिसते. आयुष्याच्या एका टप्प्यावर रद्दी साठवणे आणि त्याची विल्हेवाट लावणे याचा जेव्हा कंटाळा येईल तेव्हा वेगळा विचार करता येईल, अर्थात कौटुंबिक मत बघावे लागेल.

अन्य नियतकालिके
१,२. आंतरजालावरील अक्षरनामा हे वेबपोर्टल; त्यातील ग्रंथनामा व कला-संस्कृती ही सदरे आवडतात.

३. दैनिकांच्या जोडीने काही प्रमाणात वरील वाचनाची आवश्यकता वाटते. छापील दिवाळी अंक आता वाचत नाही. मला आवडणारी मासिके(अंतर्नाद, अमृत) बंद पडली आहेत. साप्ताहिकांची गरज वाटत नाही.

पुढे चालू ..

कुमार१'s picture

12 May 2023 - 8:36 am | कुमार१

मराठी संस्थळे
१. माबो व मिपा या संस्थळावर वावर असतो.
२. इथले वाचन दररोज करतो.

३. आवडणारे विभाग : ललित लेख, आरोग्य, संगीत व अन्य माहितीपर लेख व भाषाविषयक. सविस्तर
वर्णनापेक्षा संकलन स्वरूप अधिक आवडते.

४. नावडणारे विभाग : राजकीय गुऱ्हाळ/दळण व धार्मिक. जे आवडत नाही त्या विभागावर टिचकी मारायची नाही हे धोरण.
सरसकट "नवे लेखन" हे पान न बघता आवडणाऱ्या लेखन प्रकारानुसारच पान उघडतो.

वरील ३ व ४ या दोघांच्या दरम्यान जे अनेक विषय/प्रकार आहेत ते कधीतरी पाहायला चालून जातात.

५. वाचक आहे आणि नियमित लेखनसुद्धा करतो.

पुस्तके
१. वर्षातून ३ छापील पुस्तके विकत घेतो आणि वर्षभर त्यांचे पुनर्वाचन करीत राहतो. वाचनालय या संस्थेशी असलेला पन्नास वर्षांचा संबंध 2019 मध्ये संपवला. स्व-संग्रहातील छापील पुस्तके एकूण दहाच्या वर जाणार नाहीत याची काळजी घेतो. दर दोन-तीन वर्षांनी काही पुस्तके काढून टाकतो.. पुस्तक अनेक वर्षे घरी राहिल्यास त्यात साठणारी धूळ हा माझा मोठा शत्रू.

३. पुस्तक श्रवणाचा अनुभव नाही. जोपर्यंत डोळ्यांची काही तक्रार नाही तोपर्यंत वाचनच आवडेल. पुस्तक श्रवणात एकाग्रता कितपत होईल याबद्दल शंका वाटते. (पुस्तक वाचावे, गाणे ऐकावे आणि चित्रपट पहावा).

५. आता फक्त लेखसंग्रहच वाचतो.

रोज रात्री साडेनऊ वाजता इ-वाचनाची सर्व प्रकारची साधने बंद करून टाकतो. हा स्वतःवर घातलेला कठोर निर्बंध. त्यानंतर संग्रहातले (अनेक वेळा वाचलेले असले तरीही) एखादे छापील पुस्तक उघडतो आणि त्यातले एखादे प्रकरण वाचतो. हे लवकर व चांगली झोप येण्यासाठी फारच उपयुक्त ठरले आहे !

पुस्तकांचे छापील व इलेक्ट्रॉनिक असे दोन्ही प्रकार कायमस्वरूपी असावेत; प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. वाचक त्याच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकेल.
.....

श्रीगणेशा's picture

12 May 2023 - 8:49 am | श्रीगणेशा

पुस्तक वाचावे, गाणे ऐकावे आणि चित्रपट पहावा

खूप छान!

रोज रात्री साडेनऊ वाजता इ-वाचनाची सर्व प्रकारची साधने बंद करून टाकतो. हा स्वतःवर घातलेला कठोर निर्बंध.

निर्बंध आवडला! अनुकरण करण्याचा प्रयत्न करेन नक्की.

त्यानंतर संग्रहातले (अनेक वेळा वाचलेले असले तरीही) एखादे छापील पुस्तक उघडतो आणि त्यातले एखादे प्रकरण वाचतो. हे लवकर व चांगली झोप येण्यासाठी फारच उपयुक्त ठरले आहे !

हाही एक छान शिरस्ता!

कुमार१'s picture

13 May 2023 - 10:10 am | कुमार१

"वाचन : छापील की डिजिटल" या विषयावरील एक अभ्यासपूर्ण लेख:

लेख अनुवादित असल्यामुळे वाचायला जरा क्लिष्ट वाटतो पण त्यातले मुद्दे चांगले आहेत.
सारांश असा आहे:

माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांवर वाचन आणि साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम, म्हणजे पुस्तकं हळूहळू लक्षपूर्वक वाचणं, हे दोन्ही गरजेचं आहे.

13 May 2023 - 11:04 am | श्रीगणेशा

साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम...

कधी कधी आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यासाठी शब्द गवसत नाहीत.
इथे ते चपखल शब्द गवसले आहेत -- साहित्यिक अनुभव व बोधात्मक विकास!

खूप छान!

Nitin Palkar's picture

15 May 2023 - 8:49 pm | Nitin Palkar

वाचन:

आपल्या वाचनाचा धांडोळा घ्यावा असा विचार अनेकदा मनात आला पण शरीरस्थ महरिपूमुळे त्याला मूर्त स्वरूप काही आले नाही.
या लेखाच्या निमित्ताने प्रयत्न करून बघतो.
आई वडील दोघांनाही वाचनाची आवड होती. त्यामुळे घरात दैनिके, नियतकालिके आणि पुस्तके सहज उपलब्ध असत. सहावीत असताना, देवरुख सारख्या गावी त्या काळी (१९६६/६७ साली) वाचनालयाच्या बाल विभागात आईने माझे नाव घातले. मातृमंदिर संस्थेच्या त्या वाचनालयात कुमारवयीन वाचकांसाठी खूप चांगली चांगली आणि भरपूर पुस्तके होती. ना. धों. ताम्हणकरांचा गोट्या, टारझनचे भाषांतरीत सर्व भाग, इंद्रजाल कॉमिक्सचे अंक, कुमार, फुलबाग ही मासिके तिथे वाचल्याचे आठवते.
त्या दरम्यानच स्वराज्य, गावकरी ही साप्ताहिके, कला आणि क्रीडा यांना वाहिलेले, इसाक मुजावर संपादीत 'रसरंग' हे पाक्षिक, 'अमृत','नवनीत' ही मासिके वाचू लागलो. ही सर्व दर्जेदार नियतकालिके नाशिकहुन प्रसिद्ध होत.
साप्ताहिक जत्रा, किर्लोस्कर प्रेसचे सा. मनोहर, ग. वा. बेहरेंचा सोबत, लोकप्रभा, चित्रलेखा, मासिकांपैकी आवर्जून वाचली जाणारी, हंस, नवल, मोहिनी, धनंजय, मेनका, मराठी क्रीडा समालोचक बाळ पंडीत संपादीत 'क्रीडांगण', आंतर्नाद.
नंतरच्या काळात रहस्य कथांची आवड लागली होती. बाबुराव अर्नाळकरांचे झुंजार, धनंजय आणि काळापहाड हे नायक, एस. एम. काशिकरांचे धूमकेतू, नाईटकिंग आणि बहुरूपी हे नायक, राजा पारगावकरांचा अजगर, नारायण धारपांच्या समर्थ आणि इतर कथा, गुरुनाथ नाईकांचे गोलंदाज, कॅप्टन दीप हे सर्व वाचत होतो. गुरुनाथ नाईक हे गोव्याचे लेखक, साधारण १९७१/७२ च्या सुमारास त्यांची 'फॅन मेल' एवढी होती की 'पर्वरी' या त्यांच्या गावात खास पोस्ट ऑफिस उघडावे लागले होते.
कॉलेजात गेल्यावर थोडं इंग्रजी वाचू लागलो. चंद्रकांत काकोडकरांच्या काही 'राजाराम राजे' कथा अर्ल स्टॅन्ले गार्डनरच्या पेरी मेसन वरून सही सही उचलल्यात हे लक्षात येऊन मजा वाटली होती.
मराठी मधील सर्व प्रसिद्ध लेखकांचे हाती लागेल ते सर्व काही वाचत होतो.
पु लं, रत्नाकर मतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु. भा. भावे, जयवंत दळवी, यशवंत रांजणकर, नारायण धारप, काकोडकर, गोनिदा, बाबासाहेब पुरंदरे नंतरच्या काळात अनिल अवचट.
असो. वाचन पुराण बरंच झालं.
प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करतो.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ता ही दैनिके लहानपणापासून घरी येत ती अद्यापही येतात, अलीकडे सूनबाईंसाठी इकॉनॉमिक टाइम्स वाढला आहे. मध्यंतरी काही काळ लोकसत्ता ऐवजी महाराष्ट्र टाईम्स सुरु केला होता पण दोनच महिन्यात परत लो स सुरु केला (लोकसत्ता खूप चांगला असतो असे काही नाही).
टेलीग्राम वर गुड मॉर्निंग नावाचे चॅनेल आहे तिथे रोज सुमारे तीनशे देशी, आंतरदेशीय दैनिके मिळतात, त्यातील काही टपलवतो.

२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील? बातम्या, क्रीडा, शास्त्रीय माहिती, अनुभव.

३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ? क्रीडा विषयक, शास्त्रीय माहिती, मनो विश्लेषणात्मक लेख, आरोग्य विषयक.

४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ? राजकारण्यांच्या आणि नट नट्यांच्या मुलाखती.

५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
नाही, असे काही खास वाटत नाही (कारण मी स्वतः मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप या सर्वांवर वाचतो).

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ.)
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
याचे उत्तर वर आले आहे. दिवाळी अंक दर वर्षी सहा/सात विकत घेतो अन्य वाचनालयातून आणतो.
२. त्यातील आवडणारी सदरे:
शब्द कोडी, अंक कोडी, लो स मधील चतुरंग आणि लोकरंग पुरवणी.
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
मिसळपाव, मायबोली, ऐसी अक्षरे, इ साहित्य, काही ब्लॉग्ज.

२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
अधूनमधून, क्वचित अक्षरनामा.

३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
प्रवास वर्णन, आत्मवृत्त, शास्त्रीय.

४. नावडणारे विभाग / प्रकार
नावडतं काही विशेष नाही.
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
फक्त वाचक

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
साधारणपणे एखादं पुस्तक नेहमी वाचत असतो.

२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
दोन्ही, अलीकडे इलेक्ट्रॉनिक अधिक

३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
अलीकडे श्रवणीय पुस्तके अधिक उपलब्ध असल्याने दोन्ही आवडतात.
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
वाचनालय, विकत दोन्ही

५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
पास
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
विशेष गरज वाटत नाही.

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.
नंतर कधी तरी…..

कुमार१'s picture

16 May 2023 - 7:04 am | कुमार१

खूप छान धांडोळा घेतला आहे तुम्ही. तुम्हाला इ -वाचन अधिक प्रिय दिसते आहे हे समजले.

गुरुनाथ नाईक हे गोव्याचे लेखक, साधारण १९७१/७२ च्या सुमारास त्यांची 'फॅन मेल' एवढी होती की 'पर्वरी' या त्यांच्या गावात खास पोस्ट ऑफिस उघडावे लागले होते.

>>> हे मात्र भन्नाटच ! भलतेच आवडले

Nitin Palkar's picture

15 May 2023 - 8:51 pm | Nitin Palkar

मनोज28's picture

29 May 2023 - 8:11 pm | मनोज28

हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. आज पर्यन्त खूप काही शिस्तीने वाचले असे नाही तरीही पूर्वी सतत वाचत होतो.

वाचनालयात जावून , पुस्तक प्रदर्शनात जावून पुस्तकांचा धांडोळा घेणे हा आवडता छंद होता. जमतील तशी पुस्तके खरेदी करून संग्रह केला आहे. जी.ए. कुलकर्णी, श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, जयवंत दळवी आणि पु.ल. यांचे जवळपास सगळे प्रकाशित साहित्य वाचले असेल असे वाटते.

मराठी कविता हाही जिव्हाळ्याचा विषय आहे. बोरकर, कुसुमाग्रज , ग्रेस , इंदिरा संत आणि विंदा आवडते कवी. आवडलेल्या कविता वहीत लिहिणे हा एक विरंगुळा होता.

दैनिके : लोकसत्ता आणि म.टा. पूर्वी नियमित वाचत होतो. आता मात्र वाचवत नाही आणि सोडवत नाही अश्या सीमारेषेवर आहे. लवकरच सुटका होईल.

नियतकालिके : किशोर , कुमार, एकच षटकार ,सोबत , लोकप्रभा , विवेक , ललित , आंतर्नाद, ही सातत्यपूर्ण वाचली गेलेली नियतकालिके. सध्या मात्र पूर्ण विराम.

आंतरजाल वाचन : तात्याला ओळखत होतो म्हणून , मिसळपाव चा सुरवतीपासून वाचक , प्रतिसाद देण्याइतका लिहीत होतो. तात्या , रामदास , गणपा , पैसा , गवी , श्रीगुरूजी , शूची , प्रचतेस , बिपिन कार्यकर्ते , आदिती , टारझन, इत्यादी दर्जेदार लेखक त्यावेळी / त्याकाळी मिपावर लिहिते होते. काही वर्षापूर्वी वर्षांनंतर खाते बंद झाले , मग फक्त वाचक बनून कधीतरी येत होतो. (एक दोन कट्टे सहभाग झाला होता.)

तुमच्या ह्या धाग्यामुळे आज जवळजवळ 5 वर्षानी परत नवे नाव घेवून आलो आहे.

( हा पहिलाच प्रतिसाद आहे. चूक भूल ध्यावी घ्यावी)

कुमार१'s picture

29 May 2023 - 9:25 pm | कुमार१

पुनरागमनाबद्दल अभिनंदन आणि स्वागत ! येत चला.

दैनिके : लोकसत्ता आणि म.टा. पूर्वी नियमित वाचत होतो. आता मात्र वाचवत नाही आणि सोडवत नाही अश्या सीमारेषेवर आहे.

अगदी अगदी !
म्हणूनच मी सुद्धा जे एकमेव छापील दैनिक घरी चालू ठेवले आहे ते बहुतेक अजून दहा वर्षे तरी चालू ठेवीन असे दिसते.
काही फायदे जाणवतात.

हा पहिलाच प्रतिसाद आहे.

चांगला आहे. आवडला
🙂