ध्वनिचित्र

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 May 2023 - 7:28 am

झुळझुळत्या निळसर वळणावर
झुकून, जळाशी झुळुक झोंबते
ऐल पैल तीरांवर अवचित
स्तब्ध लव्हाळी लहरून उठते

त्या वळणाच्या पुढे जरासा
कभिन्न काळा कातळ निश्चळ
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ

निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या
आठवणीने मन मोहरते

मुक्तक

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

4 May 2023 - 8:55 am | श्रीगणेशा

रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ

खूप छान!

एखादी ओलेती पण गुंफली असती तर किनारा बाग बाग झाला असता.

बाकी शब्द चित्र मस्त.

Bhakti's picture

4 May 2023 - 10:46 am | Bhakti

सुंदर!
पण बाभळी ऐवजी दुसरं झाड पाहिजे होतं.

चांदणे संदीप's picture

4 May 2023 - 12:40 pm | चांदणे संदीप

कुणी बाभूळ घ्या, कुणी बकुळ घ्या! हाकानाका! :)

संं - दी - प

वाह कविराज मीटरमध्ये पण चपखल शोभत आहे.
रचक्याने दारात दहा वर्षांनी बकुळ फुलला आहे सध्या.