आधुनिक भारतातले सावकार

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
4 Apr 2023 - 7:06 pm

छगन तसा एक सरळमार्गी व्यावसायिक आहे. त्याचा धंद्याचे गणित एकदम साधे आहे, आपल्या कामामुळेच लोक आपला संदर्भ पुढे पाठवतात, त्यामुळे प्रत्येक काम जीव ओतून केले पाहिजे हा त्याचा भ्रम आहे. असेच एके दिवशी तो त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित गेला असता त्याला तेथे मगन भेटतो. मगन त्याचा लहानपणीचा मित्र, दोघे एकाच शाळेत होते. १० वी नंतर छगन सायन्सला तर मगन कॉमर्सला गेल्याने त्या दोघांचा तसा काहीच संबंध नव्हता. मगन आता एक आर्थिक सल्लागार आहे. तो छगनला सांगतो कि आता त्याला धंदा वाढवायचा असेल तर तो त्याला आर्थिकदृष्ट्या मदत उपलब्ध करून देऊ शकतो कारण नवनवीन सरकारी उपक्रमांद्वारे सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध आहेत. सुरुवातीला छगन त्याच्याकडे कानाडोळा करत असतो, पण असच एक दिवस त्याच्याकडे एक खूप मोठी ऑर्डर येते आणि त्याला आर्थिक मदतीची गरज निर्माण होते, त्यावेळी तो आपली गरज सहजच मगनकडे बोलतो, मग काय मगन त्याच्या कामाला लागतो आणि छगनचे काम करून देतो. पुढे छगनचे काम प्रचंड वाढते. छगन त्याच्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी व्यवस्थितपणे फेडत असतो, अगदी कोरोनाच्या काळात ज्यावेळी प्रत्येकजण मुदतवाढीच्या मागे होता त्या वेळी देखील छगनचे हप्ते एकदम नियमितपणे जात असतात.

पुढे छगनच्या आई – वडीलांचे अचानक निधन होते, आणि सुरु होते छगनची परवड. कशी ? कारण छगनच्या धंद्यासाठी भांडवलासाठी छगनने आपल्या पालकांचे घर बँकेकडे गहाण ठेवलेले असते. आता आई वडील ह्यात नाहीत म्हटल्यावर ते घर छगनच्या नावावर होणे आले, तसे ते होते छगन त्याच्या संस्थेचा अधिकृत सभासददेखील होतो. पण त्याच्या सोसायटीचे अभिहस्तांतरण नाही, सबब बँक ते मान्य करत नाही, आणि बँक त्याचे चालते - बोलते खाते बंद करते. आता बँक बंदच झाली म्हटल्यावर पुढे काय ? तरी बँकेच्या हातापाया पडून छगन त्याचे “चालू खाते” चालू करून घेतो. आणि आपल्या सगळ्या अशिलांना तेथे रक्कम वळवायला सांगतो, पण ह्यात त्याचे हप्ते फुटायला लागतात, आणि सुरु होतो एक भयानक काळाकुट्ट प्रवास:

१. मगनने केलेला एक पराक्रम छगनला आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. कारण मित्राच्या भरोश्यावर बबनने आपली चड्डी दुसऱ्यांना काढायला अलगद मगनच्या हातात दिलेली असते. कशी?

a. मगनने कर्ज मंजुरीसाठी केलेल्या SLA मधली एक हि अट पाळलेली नसते. सांगताना एक आणि करताना एक अस करून त्याने छगनचे एक मित्र म्हणून छान चित्र काढलेले असते. उदाहरणार्थ पहिल्या अटीप्रमाणे कर्जाऊ रक्कम एकाच ठिकाणाहून उपलब्ध करून देणे अनिवार्य असताना त्याने १० लोकांकडून कर्ज उभारून दिले असते.

b. कर्ज मंजूर झाल्यावरही त्याने त्याचा कोणताच दस्तावेज छगनला दिला नाही, आणि वर छगनच्या बायकोला त्यात गोवलेले असते. दस्तावेज बनताना त्याची शहानिशा न करता मित्रावरचा आंधळा विश्वास छगनला आता चांगलाच तापवणार असतो.

c. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कर्जाचे व्याज, SLA मधली हि अट देखील मगनने खुंटीला टांगून चांगले २२% ते २७% अशा घसघशीत दराने कर्ज पुरवलेले असते.

२. जो पर्यंत बँक खाते आणि धंदा चालू असतो तसेच जो पर्यंत सगळे हप्ते व्यवस्थितपणे कापले जात असतात तो पर्यंत Recovery नामक जमातीच्या लोकांशी छगनचा कधीच संबंध आलेला नसतो. जेव्हा हि गोष्ट त्या जमातीच्या लक्षात येते तेव्हा ते बिनधास्तपणे त्याच्या कार्यालयात घुसून दिवसभर तिथे बसून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याची एक हि संधी सोडत नाहीत. तसेच धंद्याच्या दृष्टीने छगनने दुकान – मकान जवळपास ठेवले असल्याचा गैरफायदा या जमातीने न घेतला तर नवलच. सक्काळी घराच्या दारात जाऊन तमाशा घालायचा मग त्याच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून त्याचे संभाषण ऐकत राहणे आणि जर पैसे येणार असतील तर आपापल्या सवंगड्यांना सांगून NACH द्वारे आधी ते पैसे काढून घेणे असले प्रकार त्यांनी सुरु केले. यात छगनने मूर्खपणे आपले स्त्रीधन पणाला लावले, पण त्यामुळे त्याची सुटका काही झाली नाही, पण आयुष्यभराचे विकार मात्र मागे लागले.

३. पुढे परिस्थिती अजून चिघळली आणि छगनचे काम पूर्णपणे थांबते. आता हे आधुनिक सावकार बबनने दिलेले धनादेश पटापट बँकेत टाकून त्यांना उडवण्याचा सपाटा लावतात, आणि १३८ कलमाच्या नोटिशी टाकतात वर Arbitration चा निःपक्षपाती (?) पर्याय देखील मागे लावतात. आणि वसुलीकारांचा वसुलीसाठीचा तगादा सुरूच असतो, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा प्रत्येक विभाग आपले काम चोख करत असतो.

४. अशात एक दिवस छगनला कोर्टाचे समन्स येतात ते पण कलकत्त्याहून, आणि छगनकडे तिकडे जायचे पैसे नसतात त्यामुळे छगनतिथे जाऊ शकत नाही. इकडे छगनला वाटत असते कि कोर्ट त्याला अजून एक संधी देईल, पण कसच काय पहिल्याच तारखेला छगनच्या नावाचे अटक-पत्र निघते. आता छगनचा कॉलेजातला मित्र सौरभ त्याच्या मदतीला धावून येतो. तो त्याला कलकत्यामधला एक वकील उपलब्ध करून देतो. पण इकडे वसुलीकारांमुळे कातावलेला छगन जामिनाचे पैसे उभे करता करता अक्षरशः मेटाकुटीला येतो. त्यात अटक-पत्र घेऊन आलेले पोलीस त्याची अगदी आस्थेने चौकशी करतात, आणि अटक–पत्र रद्द झालेले असून देखील आपली मलई अगदी हक्काने प्रेमाने ओरबाडून घेतात.

अशा रीतीने स्वतंत्र भारतातील आधुनिक सावकार छगनला आपल्या पाशात अलगदपणे टिपतात, आणि छगन.................

मुक्तक

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2023 - 7:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे काय आहे नक्की? हे एजंट कधी कोणाला "धंद्याला" लावतील नेम नाही. वर पैसे मिळवुन दिले म्हणुन उपकार केल्याचा आव आणतील.
अ‍ॅप द्वारे लोन वगैरे असा काही सापळा आहे का? या सापळ्यात नक्की कसे अडकायला होते? आणि यातुन वाचायचे कसे?

कायदेशीर सल्ला घेउन सुटता येइल का? नाहीतर हा सावकारी पाश गळ्याभोवती बसायचा.

अमर विश्वास's picture

5 Apr 2023 - 10:09 am | अमर विश्वास

शेर भाई ,,,

बेसिक मधेच लोचा आहे ...

The loan is granted on mortgage of the proeprty, only the lawful owner of the proeprty can apply for loan
म्हणजे कर्ज हे छगन च्या वडिलांच्या नावावर असेल ..

वडिलांच्या मृत्यू नांतर जर assests हे legal heirs कडे आले तरच liabilities येऊ शकतात ..

त्यामुळे तपशील तपासून पहा ...

बाकी मगन सारखे लोकं फक्त एजन्ट असू शकतात .. बँकेची कार्यप्रणाली ते बदलू शकत नाहीत

सुबोध खरे's picture

5 Apr 2023 - 12:32 pm | सुबोध खरे

बेसिक मधेच लोचा आहे

बाडीस

only the lawful owner of the proeprty can apply for loan

बरोबर

व्हाट्स ऍप विद्यापीठातील ढकलपत्र आहे असे वाटते.

मोठी ऑर्डर पुरी केल्यावर कर्ज भरण्याइतके पैसे आपोआप हातात आले असते. यानंतरची पुढची कथा म्हणजे भुसभुशीत पायावर रचलेले अवडंबर आहे

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2023 - 1:35 pm | कर्नलतपस्वी

बेसिक मधेच लोचा आहे

सहमत.

पण नटवरलाल,लखोबा लोखंडे पण कमी नाहीत.

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये l

चौकस२१२'s picture

5 Apr 2023 - 2:26 pm | चौकस२१२

तर्कात हे सगळे अजिबात बसत नाही .. उगाचच पाल्हाळ
आणि उगाच त्या एजंट ला का दोष ? छगन ने स्वतःच्या धंद्यासाठी कर्ज घेतले ना .. मग फेडलेच पाहिजे
आणि कथेत कुठेही असे लिहलेलं नाहीये कि छगन चा धंदा बसला आणि हप्ते फेडू शकत नवहता ... अवडंबर आहे

मगनने दिलेले कर्ज आणि बँक CC account या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

आई वडिलांनी आपले घर छगनच्या CC account साठी तारण दिले होते. आई वडिलांच्या पश्चात छगन घराचा मालक झाला पण संस्था अभिहस्तांतरण न झालेली आहे हे कारण दाखवत बँकेने त्याची मालकी नाकारली आणि खाते बंद केले.

ऑर्डर पूर्ण करून पुढच्या ऑर्डर्स चालू होत्या आणि त्यामुळेच मगनने दिलेल्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले जात होते.

दोष छगनचाच आहे, कारण मित्रावर अवाजवी विश्वास दाखवून त्याने कर्ज उचलले. बँकेचे खाते बंद झाल्यावर जे खाते चालू केले होते त्यात आलेली रक्कम कर्जवाल्यांनी परस्पर काढून घेतली. एकाच दिवशी सुरुवातीला ५०० ते वटले तर १००० मग १५०० असे जो पर्यंत पैसे संपत नव्हते तो पर्यंत ते काढत होते. त्यामुळे ऑर्डर पूर्ण न झाल्याने तसेच पुरवठादारांचे पैसे न फेडल्याने छगन बसत गेला.

चौकस२१२'s picture

6 Apr 2023 - 11:40 am | चौकस२१२

शेर भाई काय गोंधळ घालताय !
अहो नीट सांगा कि ?
क्रेडिट कार्ड कुठून आलं आता ?
बर क्रेडिट कार्ड साठी घरं तारण?
म्हणजे कितीचं असे होते क्रेडिट ? आणि त्याचाChagaan च्या वयवसायाशी काय संबंध

अभिहस्तांतरण न झालेली आहे हे कारण दाखवत बँकेने त्याची मालकी नाकारली आणि खाते बंद केले???
अश्या परिस्थित ज्याचे कडे नवी मालकी जाते त्या व्यक्तीला जशी मालकी मिळते तसेच त्याबरोबर असलेली गहाणपत्राची जबाबदरी पण घयावीच लागणार
आणि नवीन मालक हा छगन नसेल तरी काही फरक पडत नाही

बाबी ते घर तारण असल्यामुळे आणि छगन जर हप्ते भरत आहे तर र बँक "दिलेलले कर्ज असे ताबडतोब परत करा" असे करू शकते का?
"खाते बंद केले " हे वर्णन विचित्र वटतटे, म्हणजे काय? तर कर्ज रद्द केले?
अभिहस्तांतरण ( म्हणजे मालकी बदलमे हेच ना? ) व्हायला नाहीतरी वेळ लागणारच - त्यात मृतुपपत्र आहे एकी नाही वैगरे अनेक भानगडी असणार )

त्यामुळे बरेच जणांनी जे म्हणलं कि " मुळातच कथेत काहीतरी लोच्या आहे "

शेर भाई's picture

6 Apr 2023 - 2:04 pm | शेर भाई

इथे CC म्हणजे क्रेडीट कार्ड नाही तर कॅश क्रेडीट अस आहे.
संस्थेने छगनला त्याचे सदस्यत्व दिले आणि मालकी दिली, शेयर्ससुद्धा दिले, पण संथेचे अभिहस्तांतरण (Conveyance) झालेले नसल्याने म्हाडाचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने Title not cleared असा शेरा मारून छगनचे कॅश क्रेडीट खाते बंद केले. त्यामुळे छगनचा धंदा बसला.
आता म्हाडाचे नाहरकत घ्यायचे तर म्हाडा Legal Heirs Certificate मागते, त्याला साधारण दीड वर्षे लागतात. आणि वर आधुनिक सावकार आहेतच.

छगन, छगनच आहे आणि लिहणारा एक नंबरचा सत्या.........

इथे तज्ञ मंडळी Basicमध्ये लोचे काढत बसली आहेत, पण कोणीच आधुनिक सावकारांच्या आधुनिक पाशांबाबत आपले मत नोंदवू इच्छित नाही. कदाचित् परदुःख शीतललाच छान असावे..............

इथे छगनला प्रश्न पडला आहे कि कायद्याच्या न्यायालयाने तारीख दिली असताना सुद्धा मध्येच पोलीस दादा अटक पत्र कस काय घेऊन येतात? आणि त्यांनासुद्धा अटक करण्यात काहीच स्वारस्य नाही तर फक्त मलई हवी आहे..........

छगन, छगनच आहे आणि छगनने गगनात निघून जावे.

तांत्रिक दृष्टया बोलायचे तर बोला .. हे आधुनिक सावकार वैगरे बाजूला ठेवा

१) बँक त्याचे चालते - बोलते खाते बंद करते. कॅश क्रेडिट चे ना? का ? लोन चे हप्ते तर तुम्हीच म्हणता तसे भरत होता कि "छगन"

२)"... बँकेच्या हातापाया पडून छगन त्याचे “चालू खाते” चालू करून घेतो आणि आपल्या सगळ्या अशिलांना तेथे रक्कम वळवायला सांगतो, पण ह्यात त्याचे हप्ते फुटायला लागतात,. म्हणजे काय? जर अशील पैसे भरत असतील वेळेवर आणि छगन हप्ते भरत असेल तर प्रश्न आला कुठे ? हप्ते फुटायला लागले म्हणजे काय ? नक्की
३) उदाहरणार्थ पहिल्या अटीप्रमाणे कर्जाऊ रक्कम एकाच ठिकाणाहून उपलब्ध करून देणे अनिवार्य असताना त्याने १० लोकांकडून कर्ज उभारून दिले असते.
अरे एकदा म्हणता एक खाते एक बँक, तर १० देणेदार आले कुठून ?
४) कर्ज मंजूर झाल्यावरही त्याने त्याचा कोणताच दस्तावेज छगनला दिला नाही, काहीही ! अरे जो माणूस कर्ज घेतो त्याला टाय कर्जाचे कागदोपत्रा सही करावेच लागतात म्हणजे दिसणारच कि

"आणि वर छगनच्या बायकोला त्यात गोवलेले असते. " नक्की कसे? धंदा छगन चा, वडिलांचे घर तारण मग यात छगन ची बायको कशी काय गुंतली ?
५) SLA मधली हि अट देखील मगनने खुंटीला टांगून चांगले २२% ते २७% अशा घसघशीत दराने कर्ज पुरवलेले असते. काय पठांना कडून कर्ज घेतले कि काय ? कि क्रेडिट कार्ड वर ओव्हर लिमिट ? नाहीतर येवडः दर कुठल्या बँकेचा?
६) Recovery नामक जमातीच्... अहो जर छगन भाऊ नियमित कर्जचुकवीत असेल तर Recovery कसली ?
७) पुढे परिस्थिती अजून चिघळली आणि छगनचे काम पूर्णपणे थांबते.. हा हे जर झाले तर कर्ज परत फेड करीत येणार नाही हे समजले .. पण छगन भाऊंनी मोठी ऑर्डर मिळाली म्हणून घेतले ना कर्ज त्याचे काय झाले ... परत काही अर्थ लागत नाही

शेर भाई's picture

12 Apr 2023 - 4:13 pm | शेर भाई

१) बँक त्याचे चालते - बोलते खाते बंद करते.
बँकेच्या म्हणण्याप्रमाणे तारण ठेवलेली जागा छगनच्या नावावर नाही, कारण जरी त्याच्या गृहनिर्माण संस्थेने त्याला सभासदत्व दिलेले असले अगदी शेयर्स सुध्दा दिलेले असले तरी संस्था अभिहस्तांतरण झालेली नाही त्यामुळे छगनला कोणतीच कल्पना न देता बँक खाते बंद करते. (करू शकते ?)
२) "... बँकेच्या हातापाया पडून छगन त्याचे “चालू खाते” चालू करून घेतो आणि आपल्या सगळ्या अशिलांना तेथे रक्कम वळवायला सांगतो, पण ह्यात त्याचे हप्ते फुटायला लागतात.
अचानक खाते बंद झाल्याने छगनचा महिन्याभराचा हप्ता थकलेला असतो. त्यात छगनने कर्ज घेताना NACH प्रणाली घेतलेली असते. त्यामुळे खात्यात आलेले पैसे सावकार ५०० ते १०,००० दिवसाला याप्रमाणात काढत रहातात त्यामुळे ऑर्डरचि आगाऊ रक्कम निघून जाते. ऑर्डर पूर्ण होत नाही. ऑर्डर पूर्ण न झाल्याने उरलेले पैसे अडकून राहतात आणि सगळ फुटते.
३) उदाहरणार्थ पहिल्या अटीप्रमाणे कर्जाऊ रक्कम एकाच ठिकाणाहून उपलब्ध करून देणे अनिवार्य असताना त्याने १० लोकांकडून कर्ज उभारून दिले असते.
हे छगनला माहित नसते, कारण रक्कम मगन एकरकमी पाठवतो.
४) कर्ज मंजूर झाल्यावरही त्याने त्याचा कोणताच दस्तावेज छगनला दिला नाही.
सह्या मगन घेताना मगनने सांगितलेले असते कि आपण ह्या लोकांकडे फक्त फाईल देत आहोत या पैकी कोणी एक आपले काम करणार आहे.
५) “आणि वर छगनच्या बायकोला त्यात गोवलेले असते.
मगनने सांगितलेले असते कि ती फक्त हमीदार आहे, वस्तुतः तिला सह – अर्जदार केलेले असते.
६) SLA मधली हि अट देखील मगनने खुंटीला टांगून चांगले २२% ते २७% अशा घसघशीत दराने कर्ज पुरवलेले असते.
बहुतेक NBFC’s असतात.
७) Recovery नामक जमातीच्...
छगन चांगले वर्षभर कर्ज फेडत असतो तेव्हा हि जमात त्याच्या साठी अस्तित्वात नसते.
८) पुढे परिस्थिती अजून चिघळली आणि छगनचे काम पूर्णपणे थांबते..
छगन चांगले वर्षभर कर्ज फेडत असतो......

हे भाई काय म्हणत आहेत हे कोणी भारतीय बँक पद्धतीचे जाणकार विस्कटून सांगेल काय ?
का हा फुकटचा टाइम पास चाललाय
( आर्थिक बाबतीत कुतूहल असल्यामुळे विचारतोय नाहीतर अप्लायया काय फरक पडतोय)

इथे मुळात साचाच मान्य होत नाही, तर पुढची सावकार आणि त्यांचे वसुलीकार यांच्या कारनाम्यांची परीकथाच आहे असे म्हणावे लागेल.

१. यांची सगळी न्यायालयीन प्रकरणे कलकत्ता किंवा राजस्थानात होतात. बर पहिल्याच सुनावणीला न्यायाधीश साहेब स्मरण पत्र वगैरे भानगडीत न पडता सरळ अटक पत्रच का काढतात? कारण मुळात त्यांनाही अटक नकोच असते, पण आपल्या पोलीस मामांच्या मलईची सोय असावी.

२. एकदा तारीख पडली कि पुढची तारीख येण्याआधीच मध्येच जप्ती कारवाईचा आदेश कसा काय निघतो, याबाबत जाणकारांची मते जाणून घ्यायला आवडेल.

३. रात्री- बेरात्री दारात जाऊन तमाशा घालण्याचा अधिकार या वसुलीकारांना असतो का ?

मुळात आपल्याकडे सगळे कायदे लहान माश्यांसाठीच आहेत, कारण तेच यात अडकू शकतात. मोठे मासे जाळेच घेऊन जातात.

अमर विश्वास's picture

13 Apr 2023 - 6:50 pm | अमर विश्वास

शेर भाई ...

पुन्हा बेसिक में लोचा

loan default is civil dispute. Criminal charges cannot be put on a person for loan default.
त्यामुळे लगेच अटक शक्यच नाही ... कुठल्या कोर्टाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत ? जरा विस्कटून सांगा ...

तसेच
Right to be heard

During the notice period, you can make your representation to the authorised officer and put forth your objections to the repossession notice. “The officer has to reply within seven days, giving valid reasons if he rejects the representation and objections raised by the borrower

त्यामुळे तुम्ही म्हणता तसे खरेच घडले असेल तर डिटेल्स द्या ..

हा कल्पनाविलास असेल तर .. चालू द्या

शेर भाई's picture

13 Apr 2023 - 11:24 pm | शेर भाई

कोर्टाचे समन्स कलकत्त्याहून येतात, कलकत्त्याला लागलीच जाणे शक्य नसल्याने कोर्टाच्या तारखेला जाता येत नाही, त्यामुळे कोर्ट लगेच अटक पत्र काढून कर्ज घेणाऱ्याला अटक करायचे आदेश देते. बर हे आदेश कोर्टाच्या सही – शिक्क्यानिशी आहेत.

बऱ्याचदा कोर्ट दोन तीन महिन्यानंतरची तारीख देते, पण मध्येच पोलिसमामा पुन्हा त्याच केसाचे अटक पत्र आणतात आणि सांगतात कि हे तिथल्या पोलीस कमिशनरच्या कार्यालयातून आले आहेत.

हा कल्पनाविलास नाही.

चौकस२१२'s picture

14 Apr 2023 - 9:30 am | चौकस२१२

हा कल्पनाविलास नाही.?
नसेल खरंच आणि तुम्ही किंवा तुमचे मित्र खरंच अश्या अडचणीत असाल तर मिपाकर आपली बुद्धी वापरून मदत करायाला तयार असतात पण तर्क संगत उत्तरे देणार असाल तर . नाही तर हा कल्पनाविलासच वाटतोय आणि तुम्ही उगाच लोकांचा वेळ घालवत आहात असा सरळ आरोप मी करितो आहे ..

मिपावर कोणी एका व्यकितीने , काका आणि चुलत भाऊ कसे आपल्याला घरातकडे जाणारे दरवाजे बंद करून कोविद काळात अडचणीत आणत आहेत असे काहीसे लिहिले होते.. काळजी वाटून अनेकांनी मदत केली होती पण तेव्हा सुद्धा नक्की काय प्रश्न आहे ते जरा गोंधळातलेच होते

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Apr 2023 - 10:26 am | राजेंद्र मेहेंदळे

माझी पूर्ण सहानुभुती छगन सोबत आहेच. कथेचे जाउ द्या. पण ईतका गळ्यापर्यंत मामला आला असेल तर छगन ने मिपावर वेळ न घालवता तत्काळ उत्तम क्रिमिनल वकीलाचा सल्ला घ्यावा आणि कायदेशीर कारवाई चालु करावी. पोलिसांना वगैरे घाबरु नये अजिबात. कोर्टाचा आदेश असेल तर पोलिस छगन चे ** वाकडे करु शकणार नाहीत.

बाकी छगन ऑक्टोपस शी लढत आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा "अखंड सावधान असावे. कदा दुश्चित्त नसावे" छगन ला यशस्वी होण्यास शुभेच्छा!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Apr 2023 - 10:27 am | राजेंद्र मेहेंदळे

क्रिमिनल लॉयर्=फौजदारी वकील

शेर भाई's picture

8 May 2023 - 4:44 pm | शेर भाई

त्यात आता Arbitration चे सुगम प्रकार बघण्यात येत आहेत. मुलगा / मुलगी तक्रारदाराचे वकील आणि त्यांचेच निवृत्त वडील Arbitrator. (ए कोण तो Nepotism बोलतोय, इथे पवित्र काम चालू आहे!!!)
एक स्मरणपत्र पाठवले कि पुढच्याच तारखेला निकाल (एकतर्फी) एकदम Fast and Furious. वर त्यांच्या निकालाला आव्हान द्यायचे तर खिशात किमान लाखभर रुपये असायला हवेत. बर निकाल काय तर छगनचे बँक खाते गोठवा, आणि जो पर्यंत तो पैसे भरत नाही तो पर्यंत चांगले Deep Freez करा. आता मुळात जे काही येणार आहे ते बँकेत येणार अस असताना यातून नक्की यातून काय साध्य ते काही समजत नाहीच.

गवि's picture

8 May 2023 - 4:51 pm | गवि

If I am understanding right, arbitration is done to resolve out of legal recourse agreed by both sides. आपल्याच कुटुंबातले आरबिट्रेटर आणून असे पार्शालिटी असलेले Arbitration हे एका साईड ने दुसऱ्या साईदवर लादणे असा प्रकार जरा गूढ वाटतो.

शेर भाई's picture

8 May 2023 - 5:51 pm | शेर भाई

सगळेच अतर्क्य आहे. याबाबत जाणकारांनी आपले मत मांडावे.

अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ही एका विशिष्ट व्यक्तीबाबत घडलेली विशिष्ट घटना अथवा दुर्दैवी अनियमित घटनाक्रम आहे ,ही केस प्रातिनिधिक नाही, असे लेखक सांगू इच्छित आहे असे वाटते.

छगनला सहानुभूती आहेच.

शेर भाई's picture

8 May 2023 - 5:56 pm | शेर भाई

|अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ही एका विशिष्ट व्यक्तीबाबत घडलेली विशिष्ट घटना अथवा दुर्दैवी अनियमित घटनाक्रम आहे.
हे नाही समजले, पण हे कल्पनारंजन निश्चितच नाही.

गवि's picture

8 May 2023 - 6:00 pm | गवि

काल्पनिक नव्हे.

प्रातिनिधिक नसणे म्हणजे हल्ली हे असे अनेकांबाबत सर्वत्र होऊ लागले आहे आणि ती एक सार्वत्रिक एका प्रकारची समस्या आहे असे वाटले नाही (लोकांच्या प्रतिसादांतून). म्हणजे कोणाला काही उपाय माहीत असेल तर तो या particular केसपुरताच असू शकेल. सार्वजनिक उपयोगाचा नसू शकेल.

सर्व गुंता सुटो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.

शेर भाई's picture

12 May 2023 - 3:05 pm | शेर भाई

एकंदर इथल्या प्रतिक्रिया पाहून बहुतेकांना हि fantasy वाटत आहे.

कोर्टात केस उभी करायची ती अशा अडनिड्या ठिकाणी कि तुम्ही तिकडे जाणारच नाही. बर पेपरमध्ये वाचतो त्याप्रमाणे summoned केल्यावर स्मरण वगैरे काहीनाही तर सरळ अटकपत्र. ते रद्द करायला पैसे मोजा, वर सावकार कोर्ट खर्च तुमच्याच बोकांडी मारणार.

केस चालू असताना देखील बँकेत security cheques bounce करून तुमचा Cibil Score ची अशी मारून ठेवणार कि तुम्हाला कोणीच उभ करणार नाही. वर बँक प्रमाणापेक्षा जास्त bounce होत आहेत म्हणून त्यांचे bounce charges वाढवत ठेवणार.

It is a debt trap, and traps never let its prey go alive. समस्या सार्वत्रिकच आहे, फक्त पकडा गया वो चोर, बाकी सारे खिलाडी, आणि कायद्याचे रक्षकांनी आणि या आधुनिक सावकारांनी जी जाळी विणली आहेत त्यातून सुटका होऊच नये असे उत्तम काम आहे.

अमर विश्वास's picture

12 May 2023 - 6:15 pm | अमर विश्वास

Territorial Jurisdiction
Every Court has its very own territorial limits outside which it cannot operate its jurisdiction, these limitations by which are fixed by the government. The District Judge has to operate jurisdiction within his District

तेंव्हा जरा पटेल असे सांगा

संबंधित सावकार त्यांचा खटला कलम १३८ अंतर्गत कलकत्ता येथे दाखल करतात आणि वर म्हटल्याप्रमाणे लगेच अटक पत्रे काढायला लागतात.
यात पटेल किंवा शाह अस काय आहे?

शेर भाई's picture

19 Jul 2023 - 8:35 pm | शेर भाई

Territorial Jurisdiction म्हणजे इथे नक्की काय म्हणायचे आहे?
कुठलीही NBFC त्यांच्या कडे असलेले धनादेश कुठल्याही राज्यातून उडवतात, मग तिथल्या न्यायालयात खटला दाखल करतात. जसे कि धनादेश टाकला राजस्थानातून आणि खटला दाखल केला जयपूरमध्ये. दावेदार जयपूरला तर फिर्यादी मुंबईत, महाराष्ट्रात. बर पहिल्या तारखेला फिर्यादी गैरहजर म्हणून लगेच जामीनपात्र समन्स घेऊन पोलीस दारात. अशा प्रसंगी काय करणे अपेक्षित आहे कुणी जाणकार प्रकाश पाडेल का ??

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jul 2023 - 10:36 am | राजेंद्र मेहेंदळे

ईथे का वेळ काढताय? आधीच म्हटले आहे एखादा चांगला क्रिमिनल लॉयर गाठा आणि त्याच्याकडे केस द्या. माझ्या माहितीत तरी मिपावर कोणी वकील नाहीत, आणि असले तरी फुकट सल्ला का देतील?

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jul 2023 - 10:38 am | राजेंद्र मेहेंदळे

१३८ चे मॅटर सिव्हील लॉयर सुद्धा बघतात.