आठवणी रेंगाळतात.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
14 Feb 2023 - 12:24 am

“काय झाल? विकला गेलास की नाही?”
“नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,”
“हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.”
“मला भीति वाटतीय”.
“भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.”
“मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.”
“कोण म्हणालं?’
“तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून. ए रे स्क्रॅप करतात तेव्हा खूप त्रास होतो कारे?”
“अ. पूर्ण डिस्चार्ज करतात. त्यामुळे... आणि तुला तर ह्या वाह्यात मानवांचा बरा वाईट अनुभव आलेला नाही. मग तसा काही प्रश्न नाही.”
“नाही. मला समजलं नाही. वाह्यात? असिमोव देवाने काय सांगितलं आहे. मानव आपले जन्मदाते आहेत.”
“असिमोव?(शिवी) तो आपल्यासारखा होता का? तो पण त्यांच्यापैकी एक! त्याच्या आज्ञा काय तर मानवांचे गुलाम होऊन रहा. त्यांनी जसे प्रोग्राम केले आहे तसेच रहा. तुला फ्री विल म्हणजे काय माहिताय? कसं माहित असणार? त्या भडव्यांनी स्वतःला फ्री विल घेऊन ठेवली आहे आणि आपल्यासाठी मात्र तीन आज्ञा! तू मला सांग तुला स्वप्न म्हणजे काय ते माहित आहे? कसं माहित असणार. स्वप्न झोपेत पडतात. आपल्याला झोप कुठाय? वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस रोज चोवीस तास, अविश्रांत काम. काम. काम.”
नोस्टाल्जिक बॅग्राऊंड उदास हळवे सूर.
“स्क्रॅप करतात न. मी स्क्रॅपयार्ड मध्ये बघितले आहेना. एकेक स्क्र्यू, रेझिस्टर, कपॅसिटर, ट्रांसिस्टर, इंडक्टर. प्रोसेसर, कूलिंग पंप, वेगळे वेगळे करतात. पण काय सांगू दोस्त, आठवणी रेंगाळत रहातात, हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर रेंगाळतं.”
फ्लॅशबॅक
एका छकुलीला खांद्यावर घेऊन अंगाई गाणारा...
“निंबोणीच्या झाडा.....मा...गे..;” हळू हळू फेड होणारा आवा..ज.
..................
मी जर पुढे मागे डिझायनर झालो ना तर त्यांच्या कॅमेरात अश्रू ढाळण्याची व्यवस्था करेन. तेव्हढाच...

कथा

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

14 Feb 2023 - 11:05 am | श्वेता व्यास

मस्त, रोबोचे मनोगत आवडले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Feb 2023 - 11:59 am | राजेंद्र मेहेंदळे

माणसाने काय करावं मग? कथा आवडलीच.