तमिळनाडूचा इतिहास भाग- ९

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
25 Sep 2022 - 1:27 am

.
चित्र:- कुडियारसू .
गांधी आणि पेरियार यांच्यात काय फरक होता? शेवटी दोघांनाही तर अस्पृश्यांची मुक्तीच करायची होती. अरुंधती रॉय आणि इतर अनेक लेखकांनी गांधी-आंबेडकर जोडीवर असेच प्रश्न मांडले. पाहीले तर कुठलाही वैज्ञानिक विचार किंवा 'दोन अधिक दोन चार' असे विचार माननार्या माणसाला गांधींमध्ये दोष दिसू शकतो. शेवटी सहा-आठ महिने चाललेल्या या महत्त्वाच्या सत्याग्रहाला गांधी का आले नाहीत? ज्या प्रमाणे त्यांच्यावर आरोप लागत असतात त्या प्रमाणे ते सवर्णांचे किंवा ब्राह्मणांचे एजंट होते का?
या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी पुन्हा एकदा १९२४-२५ च्या वायकोम सत्याग्रहादरम्यान गांधींनी लिहिलेले सर्व लेख आणि पत्रे पाहिली. त्यासोबत त्या काळातील पेरियार यांचे लेख/भाषणही वाचले. स्पष्ट झालेला एक फरक म्हणजे संवाद आणि वाद. गांधींना समाजातील संवाद वाढवायचा होता, वाद कमी करायचे होते.
अस्पृश्यांना सत्याग्रहाने, क्रांतीने किंवा कायद्याने न्याय मिळाला, तरी उच्चवर्णीयांचे ह्रदयपरिवर्तन झाल्याशिवाय त्याला काही अर्थ नाही, असे त्यांचे मत होते. सवर्ण हिंदूंना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल आणि अस्पृश्य हे त्यांच्यासारखेच मानव आहेत यावर मनापासून विश्वास ठेवावा लागेल. कितीही वेळ लागला तरी हे काम हिंदूंनाच करायचे आहे. असे त्यांना वाटायचे.
गांधींनी केरळच्या ख्रिश्चनांना या सत्याग्रहात सहभागी होण्यास मनाई केली तेव्हा हे स्पष्ट झाले. जेव्हा अकाली दलाच्या शिखांनी तिथे मोफत लंगर चालवायला सुरुवात केली तेव्हा गांधींनी लिहिले, “हे शीख लंगर बंद केले पाहिजेत. हा हिंदूंचा प्रश्न आहे. तो फक्त हिंदूच सोडवतील."
गांधींनी सत्याग्रहात अडथळा आणला असे काहींनी लिहिले आहे, पण शिवमंदिराच्या प्रश्नात ख्रिश्चन, मुस्लिम आणि शीख यांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष कमी होण्याऐवजी वाढलाच असता.
डिसेंबरमध्ये गांधींना एक पत्र पोहोचले की, “त्रावणकोर परिषदेत आमचा मुद्दा २२-२१ मतांनी हरला. मंदिराच्या वाटेवर आम्हाला प्रवेश मिळणार नाही. सत्याग्रहींचे मनोबल घसरत आहे.
गांधींनी लिहिले, “मला यात आमचा विजय दिसतो. बावीस उच्चवर्णीय विरोधात असतील, तर एकवीस जण आमच्याही समर्थनात आले आहेत. पन्नास टक्के उच्चवर्णीय अस्पृश्यांच्या समर्थनार्थ आले तर आपला समाज बदलतो आहे. सहा महिन्यांच्या सत्याग्रहात तुम्ही ही शतकानुशतके जुनी परंपरा सोडवू शकत नाही. सहा महिन्यांत हा टप्पा गाठणे तुमचे मनोबल दर्शवते.”
शेवटी गांधी आले.
गांधी मार्च १९२५ मध्ये मद्रासला पोहोचले. ते पुन्हा म्हणाले “की अस्पृश्यतेचा प्रश्न हा एक गंभीर धार्मिक प्रश्न आहे, त्याचे निराकरण धर्माद्वारेच शोधले जाईल. हिंदूंना हा बदल घडवून आणावा लागेल. त्यासाठी एक नाही तर अनेक सत्याग्रह होतील, चर्चा होतील, युक्तिवाद होतील”.
गांधी बोटीतून वायकोमला पोहोचले तेव्हा पेरियार आणि इतर नेते आधीच बोटीवर थांबून वाट पाहत होते. पेरियार यांना गांधींबद्दल आदर होता आणि गांधी त्यांच्याशी सल्लामसलत करूनच पुढची योजना आखत होते.
पेरियार यांनी विचारले, “तुम्हाला प्रथम कोणाला भेटायचे आहे? अस्पृश्यांच्या मंडळाला?"
गांधी म्हणाले, “सर्वप्रथम मला उच्चवर्णीयांना भेटायचे आहे. कुठल्यातरी नंबूदिरीला. त्यांची समस्या काय आहे हे मला समजून घ्यायचे आहे. त्यांनी मान्य केले तर आमचा प्रश्न सुटेल.”
पेरियार म्हणाले, “ज्यांनी शेकडो वर्षे मान्य केले नाही, ते आता मान्य करतील का? तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही इथे आलात, आता आम्हाला हा अधिकार नक्की मिळेल.”
"रामास्वामी! ही गोष्ट फक्त एका मंदिराबद्दल नाहीये. ही गोष्ट संपूर्ण समाजाबद्दल आहे. माझी इच्छा आहे की येथील नंबूदिरी इतर सर्व पुरोहितांसाठी एक उदाहरण ठरावे. त्यांचा तर्क काय आहे हे देखील मला समजून घ्यायचे आहे."
या मुद्द्यावर पेरियार गांधींशी सहमत नव्हते. नंतर पेरियार यांनी त्यांच्या 'कुडी अरसू' मासिकात लिहिले की, "मदन मोहन मालवीय असो किंवा कोणीही नेता. ते अस्पृश्यांवर अश्रू ढाळतात, पण ते शेवटी ब्राह्मणच आहेत. ते स्वत: अस्पृश्यांसोबत बून जेवत नाहीत.”
पण गांधी ' कोणीही नेता' नव्हते. वर्षभराच्या सत्याग्रहानंतर पहिल्यांदाच एक सत्याग्रही विरोधी पक्षात बसलेल्या पुजाऱ्याशी संवाद साधणार होता.
-
गांधींकडे इतका संयम होता की इतरांचा संयम सुटणे स्वाभाविक होते. जीनांचा एक किस्सा, स्वारी पाठवून ते त्यांच्या बंगल्यावर गांधींची वाट पाहत होते. गांधी स्वारी सोडून पायी येत निघाले तेव्हा त्यांच्या संयमाचा बांध फुटू लागला.
जेव्हा गांधी बोटीने वायकोमला पोहोचले तेव्हा किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी अनेक बोटी त्यांच्या स्वागतासाठी वाट पाहत थांबल्या होत्या. गांधी म्हणाले की, होड्या परत न्या, मी माझ्याच बोटीतच किनाऱ्यावर येईन. दोन तास गांधी त्यांच्या बोटीवर शांतपणे बसले, बाकीच्या बोटी त्यांच्या मार्गातून निघून जाण्याची वाट पाहत.
आता गांधी काहीतरी कारवाई करतील या विचाराने सत्याग्रही उत्साहीत होते. गांधींना भेटायचे आहे ही बातमी नंबूदिरीपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी त्यांचा सामना करण्यासाठी कंबर कसली. पण गांधींचा दुसरा दिवस मौन व्रताचा होता, ते कोणाला भेटायला गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते राजाजी, महादेव देसाई, मुलगा रामदास गांधी यांच्यासह प्रमुख नंबुदिरी पुरोहिताच्या गेटवर पोहोचले. (पेरियार कदाचित सोबत गेले नाहीत)
गांधी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना ब्राह्मणघरात येण्यास मज्जाव करन्यात आला कारण ते अस्पृश्यांना भेटून आले होते आणि त्यांनी समुद्रगमन केले होते. अखेर योग्य तोडगा काढून घराबाहेर बैठक झाली. तो संपूर्ण संवाद महादेव देसाई यांनी लिहिला असून, त्याचा इंग्रजी अनुवाद मी सादर करत आहे.
“तुम्ही कोणत्याही खालच्या जातीच्या व्यक्तीला मंदिराचा मार्ग वापरू देत नाहीत हे योग्य आहे का? गैर-हिंदू, उच्च जातीचा गुन्हेगार किंवा एखादा प्राणी देखील याचा वापर करू शकतो?", गांधी म्हणाले.
“ते त्यांच्या कर्मांचे फळं भोगत आहेत”, नंबूदिरीने उत्तर दिले.
“मला मान्य आहे की त्यांच्या कर्माचेच फळ मिळत असेल की त्यांना अस्पृश्य म्हणून जगावं लागतंय. पण आता तुम्ही त्यांना गुन्हेगार, डाकूपेक्षा वाईट अशी शिक्षा का देत आहात?"
“त्यांचं कर्म असंच असावं. तेव्हाच देवाने ही शिक्षा दिलीय."
“आता पुढे शिक्षा करणे हे देवाचे काम आहे. शिक्षा देणारे तुम्ही कोण?"
"आम्ही देवाचे माध्यम आहोत"
"अवर्ण जर देवाचे माध्यम आहे असे म्हणू लागले आणि तुम्हाला शिक्षा देऊ लागले तर?"
“सरकार आम्हाला मदत करेल. महात्माजी! आमचा विशेषाधिकार आमच्याकडून हिसकावून अवर्णांना का देऊ ईच्छिता?”
“मार्ग कोणी वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे तुम्ही शास्त्राद्वारे सिद्ध करू शकता का? या वाटेवर दलित चालू शकत नाहीत असे कुठे लिहिले आहे?
"आमच्याकडून त्यांचे शोषण का होते हे तुम्हाला माहिती आहे का?”
"हो! जशी जालियनवाला बाग जनरल डायरसाठी होती. तसंच हे तुमच्यासाठी आहे.”
“तुम्हाला वाटते की ही परंपरा आणणारा डायर होता? शंकराचार्य डायर होते?
“मी कोणत्याही आचार्यांना डायर म्हणत नाही. पण जेव्हा मी डायरिझम म्हणतो तेव्हा मी अशा सर्व लोकांचा उल्लेख करतो जे असे अमानुष शोषण करतात."
"पण, महात्माजी! आम्ही परंपरेचा त्याग कसा करू? तुम्ही म्हणता की सत्याग्रही पिडीत आहेत. पण आमचे मंदिर त्या अस्पृश्यांच्या जमावामुळे अपवित्र झाले आहे."
“आता मला लांडग्याची आणि मेंढीची गोष्ट आठवतेय. तुम्ही तुमचे तर्क तरी व्यवस्थित मांडा."
"धर्मात कुठलाही तर्क नाही"
“जर ही प्राचीन सनातनी पद्धत असेल तर संपूर्ण भारतात का नाही?”
"हे जगभर आहे. आम्ही थोडे अधिक करतो, एवढेच."
"तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता. उद्या ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाले तर ते गुन्हेगार ठरणार नाहीत?"
"(उत्तर नाही. दुसरी व्यक्ती म्हणते - फक्त जुने ख्रिश्चन आणि मुस्लिम या नियमातून मुक्त होतील. नवीन धर्मांतरित नाही.)"
(राजाजी म्हणतात - म्हणजे आपल्या देवाचे कायदे ख्रिश्चन आणि मुस्लिमांना लागू होत नाहीत?)
"शंकराचार्यांनी लिहिलेला धर्मग्रंथ दाखवता येईल का, जिथे हा नियम सांगितला आहे?"
"हो"
"तुम्ही दाखवू शकला नाहीत तर मान्य कराल का?"
“अनेक तथ्य आहेत. पण तुमचा विश्वास बसणार नाही."
"मी नक्कीच जाणकार पंडितांना ते दाखवीन आणि तुमचं म्हणणं मान्य करेन."
"तुमचे पंडित आमच्या परंपरेविरुद्ध बोलले तर आम्ही ऐकणार नाही."
"म्हणजे तुमच्या परंपरेसमोर शंकराचार्यांचा धर्मग्रंथही चुकीचा आहे का? उद्या कोर्टाने अवर्णांच्या बाजूने आदेश दिला तर?"
"ज्या मार्गाने अवर्ण जातात त्या मार्गावर जाणे आम्ही सोडून देऊ."
“तुम्ही हिंदू धर्माचे रक्षक आहात. यावर उपाय शोधावा ही विनंती. तुम्ही सार्वमतासाठी तयार आहात का?"
"त्यात फक्त मंदिरात जाणाऱ्या वर्गाचा समावेश असेल तर."
“हा अतिरेक आहे. मी सर्व उच्चवर्णीयांच्या जनमतासाठी तयार आहे. अवर्ण मतदान करणार नाहीत. मग तूम्ही तयार आहात का?"
"(उत्तर नाही)"
"एखाद्या संस्कृत विद्वानाने धर्मग्रंथांच्या आधारे निर्णय घेतला तर"
"(उत्तर नाही. दुसरी व्यक्ती म्हणते - कोणत्या धर्मग्रंथातील? परशुरामाने मलबारची स्थापना केली. परशुराम तुम्हाला कुठे सापडेल?)"
"एक शेवटची विनंती. तुम्ही पंडित ठरवा. सत्याग्रहींचे पंडित (मदन मोहन मालवीय) त्यांच्याशी वादविवाद करतील. दिवाणसाहेब अंतिम निर्णय घेतील. हे चालेल ना?”
"(उत्तर नाही)"
अशा प्रकारे, तो निर्णय घेण्यासाठी गांधी उच्च जातीच्या पुरोहितांच्या कोर्टात चेंडू टाकून आले. पेरियारांना गांधींची ही गोष्टही आवडली नाही.
कोणी सहमत असो वा नसो, या संथ आणि धाडसी वाटचालीने गांधींनी सत्याग्रहाला आठवडाभरात आपले ऊद्दीष्ठ गाठून दिले.
-
पेरियार आणि गांधी यांच्या वयात दहा वर्षांचे अंतर होते. वायकोम सत्याग्रहापूर्वी गांधींनी आफ्रिका आणि भारतात अनेक सत्याग्रह आणि असहकार चळवळी चालवल्या. टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्राचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांचे स्थान प्रस्थापित झाले. पेरियार यांची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. त्यांनी सर्वप्रथम गांधींमध्ये भविष्य पाहिले. जेव्हा त्यांनी हाडामांसांचा गांधी जवळून पाहिला आणि ऐकला तेव्हा ते काहीसे निराश झाले.
गांधींनी पेरियार आणि इतर सत्याग्रहींना सांगितले,
“मी स्वतःला एक सनातनी हिंदू समजतो. माझा विश्वास आहे की सार्वजनिक रस्ता कोणताही असो, त्यावर कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे लोक चालू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की मी वर्णाश्रमाच्या विरोधात आहे. मी असेही म्हणत नाही की आपण जबरदस्तीने मंदिरात प्रवेश करावा, इतर वर्णात लग्न करावे किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यासोबत जेवावे. असे प्रश्न फार नाजूक असतात. भविष्यात अशी परंपरा निर्माण झाली तर हे सहज करता येईल. मात्र, तरीही अशी मागणी आता जबरदस्तीने करणे योग्य नाहीये.
जर ब्राह्मणांना स्वतःचे खाजगी मंदिर, खाजगी शाळा बांधायची असेल तर त्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. इतर जाती आणि धर्मांच्या बाबतीतही असेच आहे. पण, हे मंदिर किंवा शाळा सार्वजनिक असेल, तर भेदभाव होता कामा नये.
मी आयुष्यभर एका गोष्टीवर ठाम राहीन की आपल्या धर्मात कोणीही अस्पृश्य नसावा. ही एक साधी मानवी जाणीव आहे. जर आपल्या धर्मग्रंथात अशी काही सूचना असेल तर ती आता दुरुस्त करणे आवश्यक आहे.”
पेरियार यांनी हे ऐकल्यावर त्यांच्या लक्षात आले की गांधी हे ब्राह्मण किंवा ब्राह्मणवादाच्या विरोधात नाहीत. त्यापेक्षा तो प्रस्थापित राहू द्यायचा त्यांचा विचार आहे. तरीही गांधी आले होते तर ते त्यांच्यासोबत फिरत राहिले.
गांधी पेरियार यांना म्हणाले, "रामास्वामी! मला एकदा संत नारायण गुरूंना भेटायचे आहे.
पेरियार आणि राजाजींनी त्यांना नारायण गुरूंकडे नेले. नारायण गुरूंना पाहून पेरियार यांना वाटले की, ते संस्कृत शिकवून, शिवमंत्रांचा उच्चार करून दलितांना ब्राह्मणच बनवत आहेत. यामुळे शेवटी ब्राह्मणवादच बळकट होईल.
त्याचवेळी पेरियार यांनी दलितांमधील एका भाषणात म्हटले की,
“जर एखादा आर्य समाज सुधारक तुमच्याकडे आला आणि म्हणाला की तुम्हाला जानवं घातलं जाईल तर तो तुम्हाला मूर्ख बनवत असेल. तो तुम्हाला भविष्यासाठी शोषक बनवनार असेल. ज्या जानव्याने तुमचा एवढा छळ केला तो धागा तूम्ही घालनार का?"
गांधी-नारायण गुरू संवादाच्या वेळी पेरियार तिथे बसले होते, तो संवाद मी ‘रिनैशां’ या पुस्तकात लिहिला आहे. एक लोकप्रिय आख्यायिका जोडतो.
गांधींनी दोन-चार पिंपळाची पाने उपटून नारायण गुरूंना दाखवली आणि म्हणाले, "गुरुजी! ही पाने किती वेगळी आहेत? काही मोठी आहेत, काही लहान आहेत. पण हे सगळे मिळून एक झाड बनवतात.
नारायण गुरूंना फक्त संस्कृत समजत असल्याने त्याचे भाषांतर करून समजावून सांगितले गेले. त्यांना वाटले की या पानांप्रमाणेच सवर्ण आणि खालच्या जातीत फरक असेल असे गांधी सांगत आहेत.
ते म्हणाले, “महात्म्याला ही पाने बारीक करून चावीयला सांगा आणि मग विचारा की ह्या लहान-मोठ्या पानांच्या चवीत काय फरक आहे? काही फरक आहे की नाही?"
नारायण गुरूंना भेटल्यानंतर पेरियार गांधींना त्रावणकोरच्या राणीकडे घेऊन गेले. राणीसाहेबांनी आश्वासन दिले की मंदिराचे रस्ते सर्व जातींसाठी ऊघडे असतील, फक्त मंदीर प्रवेश बंदी असेल. मंदीरात तर खुद्द गांधींना प्रवेश मिळू शकला नाही. कन्याकुमारी मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना बाहेरच थांबवले, कारण ते इंग्लंडला गेले होते. (दीड दशकानंतर, मंदिरांमध्ये सार्वजनिक प्रवेशाचा कायदा झाला तेव्हा त्रावणकोरच्या महाराजांनी या मंदिरात त्यांचे स्वागत केले.)
या सत्याग्रहाची धग सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत कायम ठेवण्याबद्दल पेरियार यांना 'वायकोम वीर' ही पदवी मिळाली. गांधींच्या सहवासातून ते एक गोष्ट ते शिकले की गांधी खूप लिहीतात. त्यांना भेटल्यानंतर दोनच महिन्यांनी पेरियार यांनी त्यांचे विचार लिहायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे 'कुडी आरसू (कुडियारसु)' हे साप्ताहिक काढण्यास सुरुवात केली, ज्याचा अर्थ होता - “प्रजासत्ताक.”
या नियतकालिकाच्या माध्यमातून एका नव्या चळवळीचे बिगुल वाजत होते – स्वय मेरीदाई इयक्कम (स्वाभिमान चळवळ). पेरियार यांनी वयाच्या 94 व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हटले होते - "या आंदोलनाचा उद्देश पाच गोष्टींचा नाश होता - देव, धर्म, काँग्रेस, ब्राह्मण आणि...
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

गांधी!"
(क्रमशः)
मूळ लेखक :- प्रवीण झा.

इतिहास

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Sep 2022 - 8:06 am | कुमार१

छान माहितीपूर्ण लेखन !

श्वेता२४'s picture

26 Sep 2022 - 4:25 pm | श्वेता२४

वाचत आहे.....