दावत-ए-बिर्याणी

पर्णिका's picture
पर्णिका in जनातलं, मनातलं
13 Sep 2022 - 3:07 am

पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते. या दोन समांतर कथा एकमेकांत खूप सुंदररित्या गुंफल्या आहेत.

मानवी स्वभाव, कौटुंबिक नातेसंबंध, कालानुरूप बदललेल्या/ बदलत असलेल्या गोष्टी यांचे सुंदर चित्रण हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पण मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे लखनऊ शहराचे, तेथील खाद्यसंस्कृतीचे सुंदर दर्शन पूर्ण चित्रपटभर दिसते. ७०च्या दशकातील लखनऊ, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि सद्यस्थिती यांची आपल्याही नकळत तुलना होत राहते. पांचाली तिच्या आजीची ही स्पेशल रेसिपी मिळवू शकते का ? तिच्या आजोबांची ती खास बिर्याणी खाण्याची इच्छा पूर्ण होते का ? या संपूर्ण शोध प्रवासात पांचालीला अजून काय गवसते ? या प्रश्नांची उकल करणारा हा चित्रपट अगदीच खास नोटवर संपतो.

कलाकारांबद्दल लिहायचे झाल्यास, Sauraseni Maitra आणि Jayant Kripalani या दोघांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. मला ही मुव्ही बघतांना दूरदर्शनवरील जुन्या मालिकांची (९०च्या दशकांतील)आठवण येत होती.
साधारण ९० मिनिटांची ही शॉर्ट फिल्म एकदा तरी बघावी अशी आहे. Daawat-e-Biryani हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.

हा चित्रपट तसा जुना म्हणजे २०१९ साली आलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांनी कदाचित आधीच हा चित्रपट बघितला असेल. इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील. असेच काही हटके चित्रपट असतील तर त्यांविषयीही वाचायला आवडेल.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Sep 2022 - 10:02 am | विजुभाऊ

https://youtu.be/MC9iRsoHS04

हा देखील एक हटके सिनेमा.
नायकाला हॉटेल व्यवसायाबद्दल काहीच प्रेम नसते. त्याच्या नशिबी वडीलाम्कडून एक छोटेसे रेस्टौरन्ट येते. नसीरौद्दीन शाह चे काम छान आहे. मनस्वी कलाकार आपल्या कलेला कसा फुलवतो हे पहायला आवडते.
थोडा स्लो वाटेल पण छान आहे.

पर्णिका's picture

15 Sep 2022 - 3:14 am | पर्णिका

हो एकदम फील गुड मुव्ही आहे ही ! Aasif Mandvi आवडतो मला... मस्त काम केले आहे त्याने.

सर टोबी's picture

13 Sep 2022 - 10:42 pm | सर टोबी

मिताली पालकर, अभय देओल, आणि विजय राजचा एक सुंदर सिनेमा. गाड्या चोरून विकण्याची टोळी चालवणाऱ्या गुंडाचा आवडता बकरा चोरून गाडीच्या बदल्यात बकरा परत करण्याचं साधं कथानक. अंडर वर्ल्डचं चक्रावून टाकणारं चित्रण आणि सगळ्याच कलाकारांचा सुंदर अभिनय यासाठी पाहावाच असा चित्रपट.

चॉपस्टिकस बघितला नाही अजून ... पण कन्सेप्ट छान वाटतेय.
मिथिला पालकर आवडतेच.
अभय देओल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, इम्रान हाश्मी यांचे चित्रपट सहसा निराश करत नाहीत.

अजून काही मला आवडलेले चित्रपट :
The Hundred-Foot Journey - फ्रान्समधील निसर्गरम्य, छोट्याशा गावांतील ही गोष्ट. स्थलांतरित भारतीय कुटुंबाने नव्याने सुरु केलेले रेस्तराँ आणि त्याच रस्त्यावर असलेले नावाजलेले रेस्तराँ यांच्यातील संघर्ष, स्पर्धा मस्त घेतली आहे. उत्तम कलाकार, उत्कृष्ट कथा.
Julie & Julia - Meryl Streep ची फॅन असल्याने आवडलाच.
आणि अर्थातच Ratatouille - काय लिहू ? निव्वळ अप्रतिम...

सुचिता१'s picture

15 Sep 2022 - 1:02 pm | सुचिता१

कोणत्या प्लॅटफॉर्म वर बघता येईल हा चित्रपट?