श्री गणेश लेखमाला २०२२ - शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
8 Sep 2022 - 9:17 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष

कही की ईट कही का रोडा| भानुमतीने कुणबा जोडा|

हा लेख नसून संकलन आहे. यात माझे काहीच कर्तृत्व नाही. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या कवयित्रीच्या कविता पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न!

सेवानिवृत्ती झाली. वेळच वेळ. एका मित्राने विचारले,
"तुला काय बाबा, काम ना धाम.. कसा वेळ घालवतोस? त्यापेक्षा एखादी पार्ट टाइम नोकरी का नाही पकडत?"

मी मित्राला म्हणालो,
"टाइमपास म्हणून मी मुद्दाम स्कूटी उलट्या रस्त्याने चालवतो, मग मला पोलीस पकडतात. कागदपत्रं मागतात, मी त्यांच्याशी हुज्जत घालतो. भाजी मंडईत भाजीवाल्याबरोबर उगाच घासाघीस करतो, वेळ मस्त जातो."

मित्राला वाटले, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. घाईघाईत "ओ के" म्हणाला आणि पळाला. मला फिरकी घ्यायला मजा येते. अर्थात कधी कधी माझीही कुणीतरी घेतेच.

मला संदीप खरे यांची कविता आठवली. यातला 'तो' मी आहे.

'मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो,
घुमतो, शीळ वाजवतो.'

सेवानिवृत्तीआगोदरच मी ठरवले होते - इथून पुढील आयुष्य स्वानंदासाठी, स्वतःसाठी.

'आयुष्याची आता
झाली उजवण
येतो तो क्षण अमृताचा'
- कवी बाकीबाब

जगरहाटी कुणाला चुकलीयं? तशी मलाही नाही. जास्त त्रास करून घेत नाही.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो
- संदीप खरे

सेवानिवृत्तीनंतर खुप काही करता येते. वेळच पुरत नाही. अनेक गोष्टी तीव्रतेने कराव्याशा वाटल्या, पण नाही जमल्या, त्यापैकी वाचन ही एक गोष्ट. जरूरी नाही सर्व काही लक्षात राहावे, स्वानंदासाठी वाचायचे. बरेच दिवसांनी मराठी साहित्य बघायला मिळत होते. आंतरजालावरून पुस्तके उतरवून घेतो, आप्तेष्ट, मित्र यांच्याकडून मागून आणतो, कानात कुडंले घालून सुगम संगीत, भावगीत, नाट्यसंगीत याबरोबरच वाचन चालू आणि ब्रह्मानंदी टाळी लागते. आताशा शब्दांचे अर्थ कळावयास लागले, हृदयाला भिडू लागलेत, अगदी सुरेश भटांच्या कवितेसारखे -

'आता उनाड शब्द वळावयास लागले !
..सारे लबाड अर्थ कळावयास लागले|'

असेच एक दिवस भावगीत ऐकत होतो. बाबूजींचा स्वर्गीय आवाज, 'तोच चंद्रमा नभात'.तसे हे गाणे यापूर्वी कित्येक वेळा ऐकले होते. वाटले, बघू या तरी कुणी लिहिलेय. गूगलले - 'आठवणीतली गाणी' या साइटवर माहिती मिळाली, (खूपच छान संकलन आहे, आभार.) बरोबरच सुधीर मोघे यांनी लिहिलेले मनोगत वाचले. अजरामर, आवडत्या गाण्याचा इतिहास कळला. नवव्या शतकातील शीला भट्टरिका यांच्या ’काव्यप्रकाश’ या ग्रंथातील संस्कृत रचना शोधून वाचली. कवयित्री शांता शेळक्यांनी मूळ भावनांना धक्का न लावता या श्लोकाचा स्वैर अनुवाद केला आहे. अनुवाद, भाषांतर नाही. मुळ श्लोकात प्रौढत्वाकडे वाटचाल करत असलेल्या स्त्रीची व्यथा चित्रित केली आहे, त्याऐवजी कवयित्रीने त्याच अवस्थेतील पुरुषाचे मनोभाव प्रकट केले आहेत. एक आगळाच प्रयोग! वाटले, कदाचित मूळ रचनाकार जर आज असती, तर तिलाही आपल्या रचनेत बदल करावासा वाटला असता. इथेच कवयित्रीच्या प्रतिभेला मी नमस्कार केला.

तो श्लोक असा आहे -

य: कौमारहर: स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपास्ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ
रेवा रोधसि वेतसी तरुतले चेत: समुत्कण्ठते॥

'तोच चंद्रमा' पूर्ण गीत खाली दिले आहे.

'तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी'

शब्दांनी वेड लावले. तज्ज्ञ, अधिकारी साहित्यिक याचे रसग्रहण कसे करतील किंवा केले असेल माहीत नाही, पण अंतर्मुख होऊन शब्दार्थ समजून घेताना मला जाणवले की ही भावना तर प्रत्येक प्रौढ पुरुषाची, कधी 'तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे' म्हणून आर्जवणारी प्रेमिका आता आईच्या भूमिकेत जबाबदाऱ्या निभावताना सांसारिक जीवनातील भौतिक सुखांपासुन दूर आध्यात्मिक आनंद घेत पुढे आली आहे, पण पुरुष मात्र अजून त्याच वळणावर उभा आहे. तो म्हणतोय,

'मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का?'

पण तिला काही फरक पडत नाही. ती आत्मानंदात मग्न आहे. पुरुषसुलभ भावना कवयित्रीने किती सुदंर मांडल्या आहेत! समजलेला भावार्थ कवयित्रीला अभिप्रेत होता असे मला मुळीच म्हणायचे नाही.

अगोदरच कवी बोरकरांच्या कवितांनी भारावलो होतो, त्यात या कवितेची भर पडली व कविता या साहित्यप्रकाराने मला वेड लावले. आंतरजालावर बरेच साहित्य मिळाले. मन भरले नाही. दत्तू घाटे ते दासू वैद्य, मोरोपंत ते संदीप खरे.. जे जे सापडले, ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत वाटचाल चालू आहे.

कवयित्री शांता शेळके हे मराठी साहित्याला पडलेले सुंदर स्वप्न, त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. पंधरा-सोळाव्या वर्षापासून त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली. 'वर्षा' हा पहिलाच कवितासंग्रह वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी १९४७मध्ये प्रकाशित झाला. संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वतःच्याच कवितेप्रमाणेच व्यतीत केले.

शब्द

शब्दांसवे मी जन्मले,
शब्दांतुनी मी वाढले
हा शाप, हे वरदान,
हा दैवे दिलेला वारसा

आयुष्यभर शब्दांशी खेळत त्यांनी मराठी साहित्यात स्वत:चा एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांची साहित्यसंपदा खूप मोठी. एखाद्या कुशल क्रिकेटपटूसारखी त्यांनी चौफेर बॅटिंग केली. कविता, लावणी, पत्रकारिता, ललित लेखन, भावगीत, अंगाई गीत, बालगीत, नाट्यगीत, बालकथा, आत्मकथन, व्यक्तिचित्रे, कथा, अनुवाद असे बहुआयामी लेखन आजही वेड लावते.

शब्द हे शस्त्र आहे म्हणणारे पुष्कळ सापडतील, पण शब्दांची फुले करून मुक्तपणे उधळत निघून जाणारे खूप कमी. उधळलेल्या शब्दफुलांचा गंध चिरंजीव करणारे त्याहूनही कमी. शांताबाईच्या साहित्याचा गंध ऐंशी वर्षांनंतरही रसिकांच्या मनात ताजा आहे, दरवळत आहे.

आमचे गाव खेड, राजगुरूनगर हे शांताबाईचे आजोळ. त्यांच्या 'धुळपाटी' या पुस्तकामधली काही पाने हाती लागली. या पुस्तकात 'आठवणी आजोळच्या'मध्ये त्यांनी गावाच्या वास्तव्यातील आठवणी लिहिल्या आहेत. त्या म्हणतात, 'पुण्याने शिक्षण दिले, मुंबईने नोकरी, पण खेडने खऱ्या अर्थानं वात्सल्य दिले. त्यामुळे खेडला माझ्या भावविश्वात एक वेगळेच स्थान आहे.' आनंद झाला.

एक आठवण -
त्यांच्या वाड्याजवळच 'गारीगार'ची (आइसक्रीमची) फॅक्टरी होती. आम्ही तिथे गारीगार घ्यायला जायचो. त्या वेळेस दोन, तीन व पाच पैशात मिळणार्‍या गारीगारचा आनंद आणि आजचा त्यांच्या कवितेतून मिळणारा आनंद एकसारखाच. आमच्या गावचे त्यांनी केलेले वर्णन वाचून मीही साठ-पासष्ट वर्षे मागे गेलो. काळाबरोबर गावही बदलले, पण पाऊलखुणा अजूनही आहेत. पुढे पाठ्यपुस्तकांच्या पाऊलवाटेवर कवयित्री शांता शेळके हे नाव माहीत झाले. त्या वेळेस एवढी जाणही नव्हती आणि कुवतही. आता अनुभवाचे गाठोडे बरोबर आहे, समजदाणीसुद्धा मोठी झाली आहे.

वर्षा, तोच चंद्रमा नभात, चौघी जणी, मेघदूत, धूळपाटी, गोंदण, अनोळख, प्रवीण दवणे यांचे 'कवितेतल्या शांताबाई' रसग्रहण याच वर्षांत प्रकाशित झालेले पुस्तक.. मिळतील तेवढी सर्व पुस्तके पुण्यातल्या प्रसिद्ध 'अक्षरधारा'मधून घेऊन आलो व इतर कवितासंग्रहांकरता नोंदणी केली, लवकरच मिळतील अशी आशा आहे.

पंडित जितेंद्र अभिषेक माझे सर्वात आवडते गायक. वय वर्षे पंधरा-सोळा असताना पंडितजींना खूप जवळून बघण्याचा, ऐकण्याचा योग आला. 'हे बंध रेशमाचे'मधील सर्व नाट्यपदे शांताबाईनींच लिहिली आहेत. पंडितजीचे संगीत व बकुळ पंडितांचा आवाज.

'पंथ जात धर्म किंवा नाते ज्या न ठावे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमांचे|'

'सजणा का धरला परदेस'

'विकल मन आज झुरत असहाय'

'काटा रुते कुणाला'

पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले एक चित्रपटगीत आजही प्रत्येक बापाच्या व मुलीच्या डोळ्यात पाणी उभे करते.

'दाटून कंठ येतो ओठात येई गाणे
जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने'

१९७९मध्ये 'अष्टविनायक' या चित्रपटासाठी लिहिलेले अवघ्या १४ ओळींचे गीत, बाप-बेटीचा जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंतचा भावनात्मक प्रवास डोळ्यासमोर उभा करते. शांताबाईनीच लिहिले आहे असे जेव्हा कळले, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिभेला नमन केले आणी असे किती वेळा झाले, मोजता येणार नाही.

एक दिवस पं. अभिषेकींनी दिलेली मुलाखत ऐकत होतो. ते म्हणाले, "बोरकराची कविता मला फार आवडते, कारण कवितेत शब्द आणि सूर हातात हात गुंफून येतात, मग संगीतकाराला जास्त काम उरत नाही." कुठेतरी खोलवर घुसले व बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. कवितांनी गारूड केले. हीच गोष्ट शांताबाईंच्या कवितांना लागू पडते.

माधव ज्युलियन हे त्यांचे आवडते कवी. 'वर्षा' हा पहिलाच कवितासंग्रह वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी १९४७मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी कै. माधव ज्युलियन यांना आदरपूर्वक अर्पण केला. शांताबाई म्हणतात, "विशिष्ट अनुभूतींची स्मारके म्हणून आणि विशिष्ट आकांक्षाची चित्रे म्हणून मला माझ्या कविता आवडतात." पु.ल. देशपांडे म्हणतात, "कविता आणि कवीचे वैयक्तिक आयुष्य याची कधी सांगड घालण्याचा प्रयत्न करू नये."

शांताबाईच्या कविता वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे नवोदित कवयित्रीप्रमाणेच त्यांची सुरुवातीची अभिव्यक्ती स्वतःभोवती फिरत होती, हे 'मी' या त्यांच्या पहिल्याच कवितेत दिसून येते.

मी

'मेघांची पटलें भेदुनि गगनोदरी संचार करी तो गरुड नसे मी परी
बहरली जिथें हिरवळींत कोमल फुलें मी फूलपाखरू झुले तिथें चिमकुलें!'

'लखलखून उजळी घन तिमिराला ढग एक परी जो दिसतो गगनांगणी चमकते तयांतुन इवली मी चांदणी!'

माझ्या कविते...

प्रिय सखये! तव संगतीत मी
रंगविले अवघे जीवन
स्निग्ध जिव्हाळ्याचा लाभांश
पाझर फुटले पाषाणातून शब्द

मातीचे झाड

मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

हे प्रिय रसिका !

हे प्रिय रसिका ! दुर्बल मी तर तूच जाणुनी घे मम अंतर

हृदय कधी मधुभाव उसळती गीतसागरा येते भरती
ओठावर परि लहरी अडती
बाहिर फुटतो अस्फुटसा स्वर,

उत्कंठेनें दाटुन ये उर
व्यक्त कराया मन हो आतुर
शब्द गवसती परी न सत्वर
कशीं रचू मग कवने सुंदर?

सहजखूण

सहज फुलू द्यावे फूल,
सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा
करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ—फूल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता
हाती काहीच उरत नाही.

मनीषा

सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जें असाध्य, तेथे मन धावे|

भेदुनिया गगनाला लखलखते जी चपला
तेज तिचे वाटे की हृदयी कवळावे|

पर्वत जो उंच उभा चुंबितसे नील नभा शिरी
त्याच्या की सलील वाटे विहरावे

आज सरे मम एकाकीपण|

आज सरे मम एकाकीपण
तेजोमय हो अवघें जीवन!
उजळित, फुलवित चराचराला हृदयीं अजि रविराज उदेला

श्रान्त, विकल या मम जीवाला
तेज तयाचें दे संजीवन|

कलंदराचे गीत

घ्याव्यात नवनव्या जीवनांत अनुभूती
संस्कार न त्यांचे उमटू द्यावे चित्ती
ही कमलपत्रसम अलिप्त,निर्मम वृत्ती
घेतली असे मी बाणुनिया अंगांत म्हणुनीच सुखाने गातों नित संगीत

मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ ही अज्ञातातुन चालत आलों वाट|

मालन...

नसे यायचे तसे कुणीही कुणी
न धाडिला सांगावाही तरी
उभी खिडकीशी मालन कठड्यावर टेकून कोपरे ओंजळीत मुख घेउन अपुले
बघत राहते वाट सारखी
गणगोताची माहेरीच्या गणगोताची —

गोदंण या कवितासंग्रहातली 'मालन' ही खूपच मोठी कविता आहे. एक अप्रतीम व्यक्तिचित्र रेखाटले आहे. माहेर नसलेली मुलगी असावी बहुतेक. हृदयाला स्पर्श करून जाते.

माझ्या कविते, माझा गाव, पाऊस, सहजखूण, आजोबा, लिब, पैठणी, मालन, हिरवळ, कलंदराचे गीत, मनीषा यासारख्या अनेक कविता साध्या, सरळ, सोप्या शब्दात विवीध विषयांवर त्या लिहीत गेल्या. यादी पुष्कळ मोठी होईल.

वर्षा (१९४७), तोच चंद्रमा नभात (१९७३), गोदंण (१९७५), अनोळख (१९८५), पूर्वसंध्या (१९९६) हे काही कवितासंग्रह वाचनात आले. तोच चंद्रमा नभात हा त्यांचा आवडता संग्रह त्यांनी हृदयनाथ मंगेशकर यांना स्नेहादरपूर्वक अर्पण केला आहे. त्यामध्ये वेळोवेळी चित्रपट, नाटक, ध्वनिमुद्रिका आणी आकाशवाणीसाठी लिहिलेली गीते संकलित केली आहेत. जवळपास एकशे वीस असतील, पण एकही काळाच्या विस्मृतीत गेलेले नाही.
शांताबाई म्हणतात, "कविता आणि गीत यांच्यामागची प्रेरणा वेगळी असते. जेवढ्या सशक्त कविता, तेवढेच इतर गीतप्रकार."

अभिजात कवयित्रीत गीतकाराच्या क्षमतेची, प्रतिभेची बीजे कशी रुजली, हे त्यांनीच 'धूळपाटी' या त्यांच्या आत्मपर लेखनाच्या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात, "गीतलेखनाला उपकारक ठरणाऱ्या अनेक गोष्टींंचा फार लहानपणापासूनच माझ्यावर संस्कार होत गेला. कळत-नकळत त्यातले बरेच काही आत कुठेतरी साठत गेले असावे, पुढे गीत लिहिताना ते माझ्या कामी आले असावे."

गीतप्रकारात त्यांची काही नाट्यगीते वर दिलेलीच आहेत. काही इतर गीतप्रकारांबद्दल बोलू या. तशी सर्वच गाणी सुमधुर म्हणून सर्वमान्य आहेत. वानगीदाखल काही खाली नमूद करत आहे. बोल वाचताच गाणे तुमच्या मनात रुंजी घालायला सुरुवात करेलच.

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का हा तेथे असेल रावा?

जाईन विचारीत रानफुला
भेटेल तिथे गं सजण मला

जिवलगा राहिले रे
हे दूर घर माझे

कोळीगीत

मी डोलकर
राजा सारंगा
वादळवारा सुटलं गो

प्रेमगीत

शारद सुंदर चंदेरी राती
येणार साजण माझा
शालू हिरवा पाच नि मरवा वेणी तिपेडी घाला
काय बाई सांगू
कशी चाल तुरू तुरू
मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना

बालगीत

पप्पा सांगा कुणाचे
पाऊस आला वारा आला
नंबर फिफ्टी फोर

लावणी

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी'.. १९६४मध्ये 'मराठा तितुका मेळवावा' चित्रपटासाठी लिहिलेली लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे.

भक्तिगीत

गणराज रंगी नाचतो
जय शारदे वागेश्वरी

दिल्लीमध्ये असताना भाचीने 'ऋतू हिरवा' ही कॅसेट् भेट म्हणून दिली.

श्रीगंगानगरच्या (राजस्थान) वास्तव्यातील एकाकीपणात आणि बावन्न-त्रेपन्न डिग्री असह्य उष्णतेत 'ऋतू हिरवा ऋतू बरवा', 'जय शारदे वागेश्वरी' यासारखी त्यांची गाणी खडतर जीवन सुसह्य करत होती.

वेळ थोडा राहिलेला, सूर सारे संपले
या असीमाला तरीही पाहिजे ना मापले?'

जन्मजात वाग्वविलासिनीचे वरदान लाभलेल्या कवयित्रीबद्दल कितीही लिहिले, तरी कमीच.

कवयित्री म्हणते,

'असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे'

कवयित्रीवर सरस्वतीचा वरदहस्त होता, आपल्यावरसुद्धा तिची कृपा आसावी हीच प्रार्थना करतो व इथेच थांबतो.

तुझिया कृपेचे चांदणे
नित वर्षू दे अमुच्या शिरी'

जन्मशताब्दीनिमित्त शांताबाईंना शतशः प्रणाम.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2022 - 12:46 pm | कर्नलतपस्वी

शांताबाई हुजूरपागा या प्रतिष्ठित शाळेत शिकत असताना त्यांना इतर विद्यार्थिनीच्या मानाने त्या स्वतःला खुपच अडाणी, गावंढळ, ओबडधोबड असल्या सारख्या वाटायच्या.तेव्हां त्यांची भाषाही तितकीशी शुद्ध नव्हती. नऊवार साडी, गरिबाऊ वळणाची त्यामुळे हुजुरपागेच्या मुलायम, मखमली वातावरणात त्या दबकून राहात असत. इंग्रजी चौथीत असताना क्रमिक पाठ्यपुस्तकात हॅन्स अॅण्डरसनची "द अग्ली डकलिंग" ही कथा वाचून त्याना वाटले ही तर हुबेहुब माझीच मनःस्थिती आहे.

ही कथा डॅनिश साहित्यिक हॅन्स अॅण्डरसन यांनी लिहीलेल्या परिकथेतील एक कथा ११-११-१८४३ मधे प्रकाशीत झाली होती. पुढे यावरून गाणे,कार्टून फिल्म्स बनल्या. आजही तितकीच लोकप्रिय आहे.

थोडे विषयांतर, कुतूहल म्हणून ही कथा शोधली आणी वाचली. त्वरीत आठवण झाली ती मराठी सिनेमा, 'सुखाचे सोबती' मधील एका अजरामर गाण्याची. गीतकार गदिमा,१९५७-५८ मधे लिहीलेले गीत.

"एका तळ्यात होती,बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू त्यात एक"

शांताबाईचे साहीत्य वाचताना, खरोखरच त्या राजहंस आहेत हे पटते.

विजुभाऊ's picture

8 Sep 2022 - 5:15 pm | विजुभाऊ

कर्नल साहेब. अगदी मनातले लिहीलेत.
शांता शेळके यांची चित्रपटगीते असे एक पुस्तक एकदा हाती आले होते.
त्यातली व्हरायटी पाहून अवाक झालो होतो.

Bhakti's picture

8 Sep 2022 - 11:25 pm | Bhakti

भाषेचे सर्वात सुंदर रूप म्हणजे कविता,शांता शेळके म्हणजे मराठी कवितेची सरस्वती_/\_

प्रचेतस's picture

9 Sep 2022 - 9:19 am | प्रचेतस

लेख आवडला कर्नलसाहेब.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2022 - 1:38 pm | तुषार काळभोर

शांताबाईंची चित्रपटगीतेसुद्धा खूप सुंदर आहेत. आणि शब्द असे की त्या शाळेत असताना "त्या स्वतःला खुपच अडाणी, गावंढळ, ओबडधोबड" समजत हे वाचून आश्चर्य वाटले.
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी..... चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे
किलबिल किलबिल पक्षी बोलती
जय शारदे वागेश्वरी
जीवलगा, राहिले रे दूर घर माझे

किती सुंदर गाणी! सगळीच!

कर्नलतपस्वी's picture

9 Sep 2022 - 6:20 pm | कर्नलतपस्वी

विजुभौ,प्रचेतस सर,तुषार,भक्ती प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.

भक्ती आपल्या मताशी १००% सहमत. कविता साहित्यातील सर्वात सुदंर अविष्कार आहे. गझलसम्राट सुरेश भट म्हणतात पन्नास साठ ओळीतला भाव दोन चार ओळीच्या कवीतेद्वारा सहज पोचवता येतो

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 3:04 pm | श्वेता व्यास

खूप छान लिहिलं आहे शांता शेळकेंबद्दल. एखादी कविता किंवा चित्रपटगीत शब्द खूप आवडले म्हणून गीतकार शोधायला जावं आणि अरेच्च्या, हे पण शांताबाईंनी लिहिलंय असं लहानपणी खूप वेळा व्हायचं.
त्यानिमित्ताने एक प्रसंग आठवला - शाळेत असताना त्यांची पैठणी कविता अभ्यासक्रमात होती. मराठीच्या तोंडी परीक्षेला बहुतेकांनी "ओळखलंत का सर मला" हि पाठांतराला सोपी कविता निवडली होती. बाई पहिल्या २ ओळी ऐकून बास म्हणायच्या, पुढचा हजेरी क्रमांक घ्यायच्या. क्वचित काहींनी वेगळ्या कविता घेतल्या होत्या, त्या बाई २-३ कडवी म्हणून मग बास म्हणाल्या. माझा क्रमांक आला तर मी 'पैठणी' कविता पाठ केलेली होती. बाईंनीसुद्धा पूर्ण ५ कडव्यांची कविता आवडीने ऐकली आणि माझं म्हणून झाल्यावर वर्गाने टाळ्यांचा कडकडाट केला. साधेच प्रसंग पण सुंदर आठवण म्हणून मनात राहतात.
असामान्य प्रतिभा इतकंच म्हणू शकतो त्यांच्याबद्दल.

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 3:24 pm | कर्नलतपस्वी

"पैठणी" ही कवीता खुप लोकांना विषेशता स्त्रीयांना जवळची वाटते. शांताबाईच्या " गोंदण" या कवितासंग्रहात प्रकाशीत झाली आहे. शांताबाईचे आजोळ आमचे गाव. त्यांच्या आजोबांचा वाडा मी बघीतला,त्यांनी वापरलेला "फडताळ" हा शब्द , त्या काळात सामान ठेवण्यासाठी भिंतीत बनवलेल्या कपाटांना फडताळ म्हणत असे. आजीच्या मायेची उब व मिळालेले प्रेम याचा तो परीपाक आहे असे मला वाटते.

आमच्या गावातले सिदेश्वर मंदिर त्यां विषेश प्रिय होते. गावाचं वर्णन त्यांनी असे केले आहे.

'गावामध्ये गाव खेड वस्तीला चांगला वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला
खेड गाव बाई कोण्या हौशाचं राऊळ मारुतीशेजारी आहे शनीचं देऊळ'

श्वेता प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

रामचंद्र's picture

22 Sep 2022 - 7:00 pm | रामचंद्र

शान्ताबाईंचे कविता लेखन, ललितलेखन तर अप्रतिम आहेच पण त्यांची आस्वादक समीक्षाही तितकीच वाचनीय आहे. ना.घ. देशपांडे, गदिमा इ. च्या काव्यलेखनातलं सौंदर्य त्यांनी जे उलगडून दाखवलं आहे त्याला तोड नाही.

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2022 - 1:17 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर लेख कर्नलसाहेब !
❤️
शांता शेळके यांच्या कविता, गद्य पद्य म्हणजे मराठी साहित्यातले सुंदर लेणे आहे. आणि त्या लेण्यांची सुंदर सफर आपण घडवून आणलीत !
धन्यवाद !

कानडाऊ योगेशु's picture

23 Sep 2022 - 2:25 pm | कानडाऊ योगेशु

शांताबाईंची एक आठवण बहुदा पं.ह्रदयनाथ मंगेशकरांनी सांगितली होती सारेगम ह्या कार्यक्रमात.
उंबरठा चित्रपटात सुरेश भटांचे सुन्या सुन्या मैफिलित माझ्या हे गीत जब्बार पटेलांनी घेतले होते. भटांनी ते गीत फार आधी लिहिले होते व त्यातील भावना ह्या त्रयस्थ भूमिकेतुन लिहिलेल्या होत्या. गीतात एक कडवे होते.
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरशात आहे.
पण उंबरठा मधली नायिका ही लग्न झालेली असल्याने कुणीतरी हा श्बद पटेलांना खटकत होता व सुरेश भटां सारख्या एका योग्य शब्दांसाठी चोखंदळ असणार्या शब्दप्रभूलाही त्या जागी योग्य शब्द सुचत नव्हता. तेव्हा शांताबाई तिथे आल्या होत्या.पटेलांनी त्यांना परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी हसुन तिथे चपखल बसणार्या योग्य शब्द सुचवला.
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसु आरशात आहे
असा. पटेलांनीही मग त्यानुसार चित्रपटात गिरिश कर्नाडला आरशात स्मितहास करताना दाखवले.
ह्यावर भटांनी शांते ह्या एका बदलाने तु माझे पूर्ण गीत तुझ्या नावावर केले अशी कौतुकाची दाद दिली होती.

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 3:30 pm | कर्नलतपस्वी

वागीश्वरी शारदेचा वरदहस्त लाभला होता त्यांना.
अप्रतीम,एवढे असून त्यांचे साधेपण मन भारावून टाकते.

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 3:37 pm | कर्नलतपस्वी

श्वेता,रामचंद्र, चौको,कानडाऊ योगेशू प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

शांताबाईनी काही काळ,काही कारणास्तव डाॅक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने गीत लेखन केले त्याचा उल्लेख मुख्य लेखात करण्याचे राहून गेले.

१९६० मधे अवघाची संसार या चित्रपटातील दोन अजरामर गीते वानगीदाखल,

१ "जे वेड मजला लागले , तुजलाही ते लागेल का
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का

२ रूपास भाळलो मी भुलला तुझ्या गुणांला
मज वेड लावले तू सांगू नको कुणाला

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 5:57 pm | प्राची अश्विनी

वाह! रसग्रहण खरंच आवडलं.
तोच चंद्रमा... ऐकताना नेहमीच अंतर्मुख व्हायला होतं.

MipaPremiYogesh's picture

23 Sep 2022 - 10:34 pm | MipaPremiYogesh

वाह खूप मस्त लिहिले आहे.. शांता बाईंच्या शब्द प्रतिभेला नमन . पूर्वी सह्याद्री वर त्यांचा कार्यक्रम असायचा मस्त गप्पा वगैरे..खूप गोड कार्यक्रम असायचा

माझ्या लहानपणी दूरदर्शनवर रानजाई नावाचा कार्यक्रम लागायचा. त्यात शांताबाई आणि डाॅ. सरोजिनी बाबर यांचा सहभाग होता. तेंव्हा शांताबाईंना प्रथमच पाहिले होते. त्यांची पैठणी कविता अभ्यासक्रमात होती. त्या कवितेतील ''अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले " ही ओळ खासच!! त्यांच्यासारख्या साहित्य मेरुमणीची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार!!

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2022 - 10:09 am | कर्नलतपस्वी

@प्राची,अभीरूप,मिपाप्रेमीयोगेश प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

रानजाई हा गप्पांचा कार्यक्रम सुट्टीवर आल्यावर एक दोनदा बघितला होता.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2022 - 11:22 am | प्रकाश घाटपांडे

वा! कर्नल साहेब
उत्तम मेजवानी दिलीत. आपली रसग्रहण वृत्ती इतरांनाही आनंदीत करते.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2022 - 2:51 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे व प्रकाश घाटपांडे याचे मनापासून आभार.