श्री गणेश लेखमाला २०२२ - शहाणे करून सोडावे....

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in लेखमाला
5 Sep 2022 - 9:13 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२शहाणे करून सोडावे....

शिक्षकी पेशा असल्यामुळे खरं तर 'शहाणे करून सोडावे सकल जन' या वाक्याचा माझ्याकडे अधिकृत परवाना आहे, असं म्हणायला हरकत नाही. आक्षेपार्ह नेमकं कधी होतं, तर हे 'पंतोजी' माझ्यात श्रीमंत दामोदर पंतांसारखे नको तेव्हा, नको तिथे प्रवेश करतात तेव्हा! कॉलेजमधून बाहेर पडले, तरीही मग रस्त्यात, ट्रेनमध्ये, कुठेही! घर तर अगदी हक्काचं दुसरं ठिकाण! भले बिनपगारी! लेकीपासून सुरुवात होऊन मग पुढे नवरा, आईबाबा, सासूसासरे अशी जसजशी hierarchy वाढत गेली, तसतशी बहुधा माझी भीड चेपत गेली असावी. लेकीचा विचार करून आता वाईट वाटतंय. शाळेतून घरी आल्यावर 'आगीतून फुफाट्यात' अशीच तिची गत होत असणार. तूर्तास गत्यंतर नसल्यामुळे लेक स्वीकारून मोकळी झालीये, Once a teacher, always a teacher!

त्यात भरीस भर म्हणून हे असं खरडायला लागले, तेव्हापासून अगदी अपॉइंटमेंट घेऊन 'ताईंचा सल्ला' घेण्यासाठीही फोन येऊ लागले. मग काय, मूठभर मांस न चढलं, तर नवल! त्यामुळे पूर्वाश्रमीची ही 'हाडांची' शिक्षिका आता मात्र खऱ्या अर्थाने 'हाडाची शिक्षिका' झाली! हे स्वतःच स्वतःवर असं शिक्कामोर्तब करून घेण्याचं कारण म्हणजे नुकताच घडलेला एक प्रसंग!

तर झालं असं... नुकतीच या शैक्षणिक वर्षाची पहिली परीक्षा कॉलेजमध्ये पार पडली. दोन वर्षं ऑनलाइन परीक्षेमुळे सुस्तावलेली मुलं आता हायपरअ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये एक्झामिनेशन हॉलमध्ये माझ्या समोर होती. ही मुलं विज्ञान शाखेतील नसल्यामुळे माझ्यासाठी ती आणि त्यांच्यासाठी मी अनोळखी! त्यामुळे मऊ लागल्यास कोपराने खणण्याच्या पूर्ण तयारीत! अशा वेळी सुपरवायझर म्हणून जरा ढील पडली, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीच म्हणून समजा! त्यामुळे तो धोका मी कधीच पत्करत नाही. त्या दृष्टीने इतक्या वर्षांच्या निरीक्षणातून माझी एक विशेष सूचना असते, ती म्हणजे 'कुणीही कुणाकडे पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर यांसारख्या वस्तू मागायच्या नाहीत आणि मागितल्या तरी कुणी द्यायच्या नाहीत. कुणी देताना दिसलं, तर ती वस्तूच जप्त केली जाईल.' या फतव्यामागची कारणं दोन - एक म्हणजे परीक्षेसाठी येताना या वस्तू सोबत घेऊन येण्याची सवय लागावी (जी त्यांना कधीच लागणार नसते, याची मला ९९% खातरी असते) आणि दुसरं कारण म्हणजे या वस्तूंचं आदानप्रदान पहिल्या रांगेच्या पहिल्या बाकावरून तिसऱ्या रांगेमधल्या शेवटच्या बाकापर्यंतही होतं आणि परतीच्या प्रवासात पुन्हा त्या टोकावरून अनेक थांबे घेत ती वस्तू मूळ जागी येते. एका बाजूला हे होत असताना मग त्याआड नेत्रपल्लवी-करपल्लवीद्वारे भलतीच देवाणघेवाण होऊ लागण्याची शक्यता बळावते. तो धोका टाळण्यासाठी मी हा खुष्कीचा मार्ग निवडलेला असतो. असो!

पुढे उत्तरपत्रिका वाटप, प्रश्नपत्रिका वाटप, सह्या आदी सोपस्कार क्रमाने पार पाडून झाले आणि सर्व मुलं पेपर लिहिण्यात गर्क झाली. अर्धा-पाऊण तास उलटला. सगळं कसं शिस्तीत चालू होतं! मीही थोडी स्थिरावले होते आता ... तेवढ्यात एका मुलाच्या पेनाने शेवटचे आचके देण्यास सुरुवात केली. तरीही त्याने खिंड लढवण्याचे बरेच प्रयत्न करून पाहिले, परंतु थोड्याच वेळात त्याच्या पेनाने मान टाकली. आपल्या सैन्याचा सेनापती मरून पडला असताना शत्रूकडे पाहावं, तशा असाहाय्य नजरेने त्याने माझ्याजवळ पाहिलं. "काय?” मी संभावितपणे विचारलं. "पेन.. मागू?" तो चाचरत म्हणाला. आता माझ्यातली शिक्षिका जागी. "परीक्षेला येताना किमान दोन पेन जवळ असायला हवेत, हे याआधी माहिती नव्हतं? कुणीही कुणाकडे काहीही मागायचं नाही, हे तर मी आधीच सांगितलं आहे. बघ आता कसं काय करायचं ते तुझं तूच!" (मघाशी ९९% खातरी देताना १% जो मी राखून ठेवला होता, तो याच मुलासाठी असावा बहुधा!) थोड्या वेळासाठी का असेना, त्याला ती अस्वस्थता अनुभवू द्यावी, जी लक्षात राहून पुढच्या वेळी तो आठवणीने योग्य तयारीनिशी परीक्षेला येईल, ही माझ्या मनातली आशा पल्लवित झाली होती.

"मॅडम, सूचना आहे," म्हणत शिपायाने तोवर कक्षात प्रवेश केला. ती वाचून त्यावर माझी सही घेऊन तो गेला. इकडे तोवर 'नजर हटी, दुर्घटना घटी'! त्या मुलाच्या हातात दुसरं पेन! अर्थात शस्त्र असूनही त्याची निष्प्रभ अवस्था! लिहावं कसं या विवंचनेत, कारण माझी त्यावर ससाण्यासारखी नजर! शेवटी मनाचा हिय्या करून त्याने लिहायला सुरुवात केली. हाच तो क्षण, ज्यासाठी मी दबा धरून बसले होते. "कुणी दिलं पेन?" त्याच्या जवळ जात मी विचारलं. ज्या मुलाने पेन दिलं होतं, त्याच्या दिशेने त्याने बोट दाखवलं. माझा मोर्चा आता तिकडे! "मी काय सूचना दिली होती? समजली नव्हती?"

स्वयंशिस्त' या मूल्यानंतर आता 'आज्ञाधारकपणा' हे मूल्य ऐरणीवर आलं होतं. त्याची किंमत म्हणून मी आता या दुसऱ्या मुलाचं पेन जप्त केलं. वर्गातली इतर मुलंही या सर्व रंजक नाट्याचा प्रेक्षक म्हणून आनंद घेत होतीच. पाचच मिनिटांत त्याला पेन परत देण्यासाठी त्याच्या जागेजवळ जात म्हटलं, “एक गोष्ट तुझ्यालक्षात आली का?" "..." "तू याचा खूप चांगला मित्र आहेस. मॅडम काय म्हणतील याची पर्वा न करता, भीती न बाळगता तू त्याला पेन दिलंस. पण त्याने मात्र मी 'कुणी दिलं पेन' हे विचारताच लगेचच तुझ्याकडे बोट दाखवलं." “तुम्हाला घाबरला असेल.." या वेळी त्याचं उत्तर. “अरे, तू खरंच त्याचा चांगला मित्र आहेस आणि एक चांगला माणूसही... कारण तू अजूनही त्याची बाजू घेतोयस, पण तो बघ. तूच दिलेल्या पेनाने लिहितोय बिनधास्त! तुझं पेन जप्त होताच थांबला नाही तो किंवा तू दिलेलं पेन तुला परत देऊन 'घे, लिही तू' असं सांगावंसं वाटलं नाही रे त्याला!.. माणसं अशी ओळखायची असतात."

एकाच वेळी लिहिणाऱ्या मुलाच्या डोळ्यात खजील झाल्याचे आणि पेन देणाऱ्या मुलाच्या डोळ्यात नव्या साक्षात्काराचे भाव मला दिसत होते आणि बाकी नजरा आज वेगळंच काहीतरी शिकायला मिळाल्याच्या भावनेने उजळून गेल्या होत्या. कोण म्हणतं, आज शिक्षक 'दीन' आहे? तो कधीही, कुठेही 'केवळ शिक्षकच' असतो.

©® दीपाली ठाकूर

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2022 - 9:20 am | ज्ञानोबाचे पैजार

आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून लिहिलेला लेख आवडला, अशाच छोट्या साध्या गोष्टीतून नवी पिढी घडत असते.

शिक्षकांच्या मुलांचे मात्र काही खरे नाही त्यांच्या नशिबी २४ तास शाळाच असते. :) आणि आई बाबा दोघेही शिक्षक असतील तर?....

पैजारबुवा,

कंजूस's picture

5 Sep 2022 - 12:58 pm | कंजूस

शाळा च शाळा नाही घंटा.

Bhakti's picture

5 Sep 2022 - 11:21 am | Bhakti

खरा शिक्षक तोच जो आपल्याला आपल्याबद्दल विचार करायला शिकवतो- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन _/\_

अनिंद्य's picture

5 Sep 2022 - 11:22 am | अनिंद्य

छान छोटेखानी लेख. आजच्या दिवशी वाचला हे योग्यच झाले.

तुम्ही पेन देणाऱ्या मुलाचे योग्य ते कौतुक केले, याबद्दल आमचे सर्वच शिक्षक अतिकृपण होते :-)

प्रदीप's picture

5 Sep 2022 - 12:40 pm | प्रदीप

अजून इथे असेच लिहीत रहा.

सर टोबी's picture

5 Sep 2022 - 5:11 pm | सर टोबी

घरी आई शिक्षिका आणि थोरला भाऊ स्कॉलर. त्याच्या तुलनेत माझी शैक्षणिक प्रगती सामान्य म्हणावी अशी. त्यामुळे खूप मार खाल्ला आणि नातेवाईक आणि परिचितांकडून अवहेलना सहन केली. परिणामी शिक्षेबद्दल कमालीची घृणा. शिक्षा करून कोणी शहाणं होत असतं तर हे जग आत्तापर्यंत रामराज्य झालं असतं.

बऱ्याच वेळा आपण आदर्शवत वागणुकीने बरेच काही शिकवू शकतो असा वैयक्तिक अनुभव आहे. मुलाचे मित्र तुझे वडील एकदम चिल्ड आऊट असतात असे सांगतात. तेव्हा आपल्या वागण्याची दिशा बरोबर आहे याची खात्री पटते.

थोडा दुसरा दृष्टिकोन समजावा म्हणून प्रतिसाद देतोय.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर गणेश लेखमालेत आलेला अनुरूप लेख. अर्थातच आवडला. आपण सातत्याने लिहिते राहावे.
आजच्या शिक्षक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

5 Sep 2022 - 7:38 pm | मुक्त विहारि

लेखन शैली पण उत्तम आहे

अजून लिहा ...

सनईचौघडा's picture

6 Sep 2022 - 6:47 am | सनईचौघडा

नाही आवडला. जर खर्च असं घडलं असेलच तर एक ज्यादा pen विसरला म्हणून त्याला उतरपत्रिका लिहू द्यायची नाही यात कसलं आलंय इतरांना साक्षात्कार? तुम्ही आयुष्यात कधी कुठलीच गोष्ट विसरला नाहीत काय?
उदा बँकेत पेन, रेल्वे पास संपणे पण आपल्याला माहिती नसणे.

तुम्हांला ति दोघं परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद जास्त व्हायला हवा.
आणि उलट एकमेकां साहाय्य करू... हे शिकवायला हवं.

लेख आवडला.
पेन देणाऱ्या मुलाला आयुष्यभर पुरेल आणि (कदाचित) त्याचे आयुष्यही घडवेल हा अनुभव.

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2022 - 8:42 am | श्रीगुरुजी

छान लेख! मी आता शिक्षकी पेशात असल्याने लेख भावला.

तुषार काळभोर's picture

9 Sep 2022 - 10:02 am | तुषार काळभोर

समजा हे काल्पनिक लेखन असतं, तर कदाचित शिक्षिकेने जे केलं ते 'आदर्शवत' वाटलं असतं.
पण हे वास्तविक घडलेलं असल्यानं, शिक्षिकेची कृती किती योग्य वा अयोग्य... मला माहिती नाही. मी बाहेरून ते जज करणं चुकीचं होईल.

निनाद's picture

9 Sep 2022 - 10:17 am | निनाद

मस्त आहे लिखाण. खुसखुशीत आणि रंजक!

स्वराजित's picture

15 Sep 2022 - 2:34 pm | स्वराजित

लेख नाही आवडला.
शिस्त हवी पण बडगा नसावा.

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 3:18 pm | श्वेता व्यास

लेख आवडला. पुस्तकी शिक्षणापेक्षा खऱ्या आयुष्याचं शिक्षण नकळतपणे देऊन जातो तो खरा शिक्षक.