श्री गणेश लेखमाला २०२२ - गणेशोत्सव.. घरापासून दूर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
4 Sep 2022 - 9:07 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}
.field-items img {margin-top:16px;margin-bottom:16px;}

श्री गणेश लेखमाला २०२२गणेशोत्सव, घरापासून दूर

(भारतीय सेनेत कार्यरत असताना विविध धार्मिक सणांचे आयोजन कसे केले जात असे, त्याची माझ्या अनुभवावर आधारित थोडक्यात माहिती या लेखाद्वारे मांडली आहे, कृपया यावर कुठल्याही प्रकारची टीकाटिप्पणी, प्रश्न अपेक्षित नाही व उत्तराची अपेक्षाही करू नये. हे माझे अनुभव आहेत. बादरायण संबंध प्रस्थापित करून राईचा पर्वत बनवू नये, ही विनंती.)

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी
-बाकीबाब

भारतीय सेना, देशाचा गौरव. विविध प्रांत, भाषा, धर्म, जाती यांमधून निवडून आलेली मुले जेव्हा प्रशिक्षित होऊन मातृभूमीच्या रक्षणाची शपथ घेतात, तेव्हा सर्वांची एकच इच्छा आसते आणि ती म्हणजे

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून
तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भावफुलांची भरुनी ओंजळ
प्राणज्योतीने ओवाळीन मी
देवांचा राजा

मानवी मन नाजूक, तकलादू, त्याचबरोबर कठोर. त्याला सांभाळणे आणि प्रसंगी प्राण देण्यासाठी तयार करणे ही किती कठीण गोष्ट आहे. इतर नोकरी-पेशाच्या तुलनेत सेनेत मानव संसाधन व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे ठरते. पोटार्थी आलेला युवक शिस्तबद्ध सैनिक माया, ममता आणि नाती बाजूला ठेवून तळहातावर शिर घेऊन देशरक्षणासाठी सदैव तत्पर असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

"Soldiers do or die,
they never ask why".

The well known proverb believe to be originated from the poem 'The Charge of the Light Brigade', written by Alfred Lord Tennyson.

"Theirs not to make reply,
Theirs not to reason why,
Theirs but to do and die".

The poet wrote above lines praising the unflinching bravery and sense of duty of the soldiers who gave their lives on October 25, 1854, during the Crimean War. 670 soldiers fought against 25000 Russian soldiers.

नाम, नमक, निशान, युद्ध आक्रोश (War cry) याबरोबरच पारंपरिक, धार्मिक सणवारांचे आयोजनसुद्धा सशक्त मनाचा सैनिक घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. देशसेवा हाच भारतीय सेनेचा धर्म असला, तरी प्रत्येक सैनिकाचे जन्मापासूनचे धर्म वेगळे. पारंपरिक सण, धार्मिक रितीरिवाज लहानपणापासून मनावर बिंबलेले असतात. वैयक्तिक पातळीवर ते त्याला महत्त्वाचे असतात. या दोन्हीचा समन्वय साधून सर्वधर्मसमभाव पाळला जातो.

गणेशोत्सव, दसरा, गुरुपौर्णिमा, वसंतपंचमी, पोंगल, दुर्गापूजा, ईद, नाताळ, बिहू, होळी हे सर्व सण उत्साहात साजरे होतात. भाषा, जाती, धर्म याचा कुठलाही विचार मनात न आणता सर्व जण सर्व उत्सवांत आनंदाने सामील होतात.

गुरू का लंगर, दुर्गापूजेची खिचडी व खजूर-टोमॅटोची चटणी, पोंगलचे केळीच्या पानावरचे जेवण, रस्सम, सांबार, अप्पडम, अवियल, पायसम, नाताळमध्ये जिजंर वाइन आणि प्लम केक, होळीच्या गुजिया (खव्याच्या करंज्या) अशा अनेक विशेष पदार्थांची ओळख इथेच इतर प्रांतीयाना होते. सैन्य म्हणजे एक कुटुंब, विविध संस्कृतीचे, धर्मांचे, भाषांचे लोक इथे गुण्यागोविंदाने एकत्र राहातात. अनेकतेमध्ये एकता याचे खरेखुरे रूप मला दिसले. आपलेपणाच्या भावनेत जोडलेली नाती शेवटपर्यंत घट्ट राहतात. संवादाचे बंधन नाही. आजही कित्येक अधिकारी, सैनिक साथीदार माझ्या संपर्कात आहेत. घरातील लग्नकार्य असो अथवा अडीअडचणी, हक्काने सहभागी होतात, करून घेतात.

सैन्यात धर्मशिक्षक (पंडित, ग्रंथी, मौलवी, फादर) धर्माचे अधिष्ठान सांभाळतात. ज्युनियर कमिशन्ड अधिकारी (JCO) / धर्मशिक्षक (Religious Teacher) या पदावर त्यांची नियुक्ती होते. युनिटमधील धर्मस्थळांची देखभाल, पूजाअर्चना करणे. रविवारी सत्संगामध्ये (मंदिर परेड) सैनिकांचे मनोबल वाढवणे, युनिटमध्ये कुणाचा मृत्यू झाला तर शेवटचे क्रियाकर्म करणे, शिवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्री पूजा, शस्त्रपूजा पारंपरिक पद्धतीने आयोजित करणे इत्यादी कामे धर्मशिक्षक करतात. धर्मशिक्षकांना सैन्य प्रशिक्षण मर्यादित स्वरूपात दिले जाते. युद्ध, युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांचा जोश, मनोबल वाढवण्यासाठी पंडितजी पलटणीबरोबरच असतात. त्यांना युनिटमध्ये सर्व जण योग्य सन्मान देतात. बहुतांश युनिटमध्ये मंदिर असतेच. स्टेशन स्तरावरसुद्धा मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च असते.

सैन्यात पारंपरिक पद्धतीने सण साजरे होतात. यामुळे भावनात्मक नाती, एकात्मता आणि सांघिक भावना वाढते. पदोन्नती, प्रशिक्षण, बहीण-भावाचे लग्न, आई-वडिलांचे आजारपण अशा एक ना अनेक कारणास्तव सैनिक सणानिमित्त सुट्टी घेऊ शकत नाही. त्याची मन:स्थिती माहेरी न जायला मिळालेल्या मुलीसारखी होते.

गदिमांनी या मन:स्थितीचे बघा किती चपखल वर्णन केले आहे -

" फांद्यावरी बांधियले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले "

हा लेख गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लिहीत आहे, तेव्हा सैन्यात गणेशोत्सव कसा साजरा करतात याकरिता वरील माहिती पूर्वरंग, प्रस्तावना आहे.

महाराष्ट्र हा लढवय्या, शूर, मर्द मावळ्यांचा प्रदेश. १७६८मध्ये पहिल्यांदाच इंग्रज व्यापाऱ्यांनी स्थानिक लोकांना फ्रेच व्यापाऱ्यांकडून आपल्या वसाहतीच्या रक्षणार्थ भरती केले व त्याला 'सेकंड बाॅम्बे सिपाही' असे नाव दिले. कालमानानुसार यात बदल होत गेले. 'मराठा लाइट इन्फन्ट्री' हे त्याचेच आजचे स्वरूप आहे. या रेजिमेंटचा इतिहास खूप मोठा आहे.

'गणपती' म्हटले की मराठी मन भक्तिमय होते, तर "जय शिवाजी जय भवानी" म्हटले की अंगात वीरश्री संचारते. मराठी माणूस कुठेही असला, तरी गणेशोत्सव साजरा करतोच, तसेच मराठी सैनिकसुद्धा.

अग्रपूजेचा मान असलेली देवता, सर्व हिंदूधर्मीय आसेतुहिमाचल हिचे पूजन करतात. सैन्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा महाराष्ट्रात असते तशीच, फक्त इथे पाच दिवसांची मर्यादा. पूर्वतयारीमध्ये मूर्तिस्थापनेसाठी मंडप, स्टेज, मखर, रांगोळ्या, पताका, दिव्याच्या माळा यांनीं सजावट होते. बाकी सैन्यातील पूर्वनिर्धारित ड्रिलप्रमाणे बसण्याची सोय, चप्पल ठेवण्यास, हात धुण्यासाठी पाणी, टाॅवेल वगैरेची व्यवस्था केली जाते. उत्सव जरी असला, तरी शिस्तीत कुचराई चालत नाही.

पहिल्या दिवशी गणेशाच्या मृण्मयी मूर्तीची षोडशोपचारे प्राणप्रतिष्ठा करतात. "सुखकर्ता दुःखहर्ता"बरोबरच "शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको" आरती, मंत्रपुष्पांजली सर्व जण जरूर म्हणतात. दररोज आरती, रांगोळी, मोदक बनवणे, चित्रकला अशा विविध स्पर्धां, करमणुकीचे कार्यक्रम - शक्य असेल तर सिनेमा, कलापथक असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. चौथ्या दिवशी नवविवाहित जोडप्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा जरूर होते. संपूर्ण युनिटला 'भंडारा, महाभोज' आयोजित केला जातो. पाचव्या दिवशी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत थाटामाटात विसर्जित केले जाते.

जेवढी मराठी मुले असतील, तेवढे सर्व जण गणेश चतुर्थीच्या आगोदर महिनाभर हलगी व लेझीम खेळायची प्रॅक्टिस करतात. त्यांचा उत्साह बघून इतर सैनिकसुद्धा शिकायचा प्रयत्न करतात. मराठा पलटणीमध्ये तर तुतारी, शिंग, ढोल, ताशा, हलगी, झांज, लेझीम अशा साग्रसंगीत गजरात बाप्पाचे आगमन आणि विसर्जन होते. गुलाल, पगड्या, फेटे असे सर्व बघितल्यावर छोटा महाराष्ट्रच अवतरल्याचा भास होतो. अर्थातच मराठी सैनिकांचे संख्याबळ महत्त्वाचे, अन्यथा प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न असतो.

फॅमिली क्वार्टर्समध्ये मराठी गृहिणीकडून इतर प्रांतीय गृहिणी मोदक व इतर महाराष्ट्रीय पदार्थ जरूर शिकून घेतात. ज्या ज्या ठिकाणी मी राहिलो, त्या त्या युनिटमध्ये उत्सवाचे आयोजन जरूर केले. मोदक, खोबऱ्याची खिरापत, हरभऱ्याची डाळ हे पदार्थ आवर्जून बनायचे.
1
2
3
4
5
6
7
काही विशेष आठवणी,

लखनऊ

प्रशिक्षण संस्थेत जवळपास बारा वर्षे उत्सव आयोजित करण्यात सहभाग होता. मराठी रिक्रूट (Recruit) पुष्कळ आणि साधनांची उपलब्धता, त्यामुळे उत्सवांचे आयोजन भव्यदिव्य असायचे. अधिकारी म्हणून विशेष जबाबदारी.

शंभर-सव्वाशे सळसळती तरुणाई हलगी-दिमडी-झांजेच्या टिपेवर लेझिमीचे शिस्तबद्ध डाव आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत हजरतगंजच्या मुख्य रस्त्यावर एका लयीत थिरकायचे, तेव्हा गंजवासी भान विसरून बघत राहायचे. लेझीम पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असायचे. पाच-सहा तास मिरवणूक चालायची. गोमती नदीवर विसर्जन व्हायचे. त्याची झिंग मराठी सैनिकांत ठासून ऊर्जा भरायची. तीनशेहून आधिक मराठी कुटुंबे लखनऊमध्ये स्थायिक आहेत. 'महाराष्ट्र समाज' नावाची संस्था कार्यरत आहे. मराठी सणवार, चालीरिती, गणेशोत्सव, कोजागिरी, हळदीकुंकू इत्यादी पारंपरिक उत्सव उत्साहाने साजरे करतात. पुण्यामुंबईतल्या नाट्यसंस्था, मान्यवर, कलाकार यांना जरूर बोलावतात. स्थानिक मराठी हौशी कलाकार नाटक बसवतात. अशाच एका गणेशोत्सवात श्री. व.पु. काळे यांना भेटण्याचा योग आला. प्रा. लक्ष्मण देशपांडे याचे 'वऱ्हाड' पाहायला मिळाले. अन्य मोठ्या शहरांतसुद्धा मराठी माणूस संघटित आहे. दिल्लीत पाच महाराष्ट्र मंडळे आहेत. जयपूर, अजमेर, उदयपूर.. आणखी कितीतरी शहरांत महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची राहण्याची उत्तम सोय आहे.

जोधपूर

प्रशिक्षणानंतर जोधपूर, राजस्थानमध्ये पहिलीच बदली झाली. वरिष्ठ मराठी सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला. दहा-बारा मराठी लोक. गणेशोत्सव साजरा करायचा सर्वांनी मिळून ठरवले.

स्थानिक जनसंपर्क कार्यालयातून 'निला आकाश' हा सिनेमा व राजस्थानी कल्चरल ग्रूप असे दोन फ्री कार्यक्रम मिळाले. मराठा रेजिमेंटने बाप्पाच्या स्वागताला आणि विसर्जनाला लेझीम पार्टी देण्याचे कबूल केले. उत्सव जोरात साजरा झाला. सर्वच जण खूप खूश झाले. लेझीम बहुतेक असैनिक लोकांना नवीन होता.

राजस्थानात नद्यांची संख्या कमीच. राजेमहाराजांनी कृत्रिम तळी बांधली आहेत. प्रश्न आला विसर्जन कुठे करायचे? जवळच आठ किलोमीटरवर कालियाना लेक आहे, तिथे विसर्जनासाठी गेलो. खूप सुंदर जागा आहे.

अलवर, राजस्थान

छोटेच युनिट होते. पाच-सातच मराठी मुले, सर्व जण तरुण आणि पुणे-सातारा-कोल्हापुरातली. दांडगा उत्साह. संख्याबळ कमी, पण उत्साह दांडगा. सर्व तयारी झाली. अलवरलासुद्धा नदी नाही, म्हणून 'सिलीशेड'मधील कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन केले.

जालंधर, पंजाब

ब्लू स्टार ऑपरेशनच्या जखमा अजून ओल्याच होत्या. वातावरण निवळत होते. मागील दोन वर्षांपासून सतत तणावाखाली वावरत आसल्यामुळे सकारात्मक बदलाची गरज होती. गणेशोत्सव साजरा करावा की नाही? द्विधा मन:स्थिती, परंतु धार्मिक उत्सवामुळे तणावग्रस्त वातावरणात बदल होईल, म्हणून मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचा वरिष्ठांनी निर्णय घेतला. थोडेसेच मराठी, कर्नाटकमधले सैनिक होते, पण वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा होता.

श्रींची मूर्ती पुण्यावरून मागवली. लेझीम, हलगी आगोदर उपलब्ध होती. प्रॅक्टिस सुरू झाली. जनसंपर्क कार्यालयाने 'साहिब बीबी और गुलाम' चित्रपट दाखवण्याचे कबूल केले, पण त्यांच्याकडे पडदा नव्हता. मग काय! फौजी जुगाड कामाला आला. दवाखान्याच्या पांढर्‍या चादरी एकमेकांना जोडून सत्तर एमएम चित्रपट दाखवता येईल एवढा मोठा पडदा तयार केला. मस्तच कार्यक्रम झाला.

पुणे

मोठे युनिट, भरपूर मराठी मुले. एक सिव्हिलियन कलाकार, बहुतेक दगडूशेठ मित्रमंडळाचे असावेत. एक भव्य मूर्ती आमच्या युनिटला भेट म्हणून दिली होती. (त्याचा फोटो खाली दिला आहे.) दर वर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर येऊन रंगकाम करून जायचे. पैसे विचारल्यावर "पुढच्या वर्षी बघू" आसे उत्तर द्यायचे. २००९मध्ये ते निजधामास गेले. शेवटपर्यंत श्रींची सेवा केली.
8
दुसरी आठवण अशी - विसर्जनाच्या दिवशी मुळा-मुठेच्या संगमावर दोन तास हलगी-लेझीमचा डाव रंगला होता. पुण्यात ढोल-ताशाचे जास्त प्रचलन, हलगी-लेझीमचे शिस्तबद्ध आणि लयबद्ध डाव बघून प्रेक्षक एवढे मंत्रमुग्ध झाले की वाहयूक कोंडी होते का काय, आशी शंका येऊ लागली, म्हणून खेळ आटोपता घेतला.

बरेच दिवस झालेत.. आता फक्त आठवणी राहिल्यात. श्रीगणेश लेखमालेमुळे त्या उचंबळून आल्या, आठवतील तशा तोडक्यामोडक्या शब्दात आपल्यापुढे मांडल्या.

|| गणपतीबाप्पा मोरया ||

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Sep 2022 - 9:40 am | कुमार१

आठवणी आवडल्या.

चांदणे संदीप's picture

4 Sep 2022 - 10:59 am | चांदणे संदीप

माझे वडील सैन्यात असतानाचे त्यांचे पठाणकोट येथील गणेशोत्सवाचे फोटो आहेत. वर्ष १९८५. त्या वेळच्या तिथल्या सर्व मराठी बांधवांचे कौतुक वाटते की किती उत्साह व भक्तीभावाने त्यांनी त्या वर्षीचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला. तुमच्या लेखाने परत ते फोटो काढून बघायची इच्छा झाली.

सं - दी - प

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Sep 2022 - 11:23 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख. नवीन माहिती समजली.
👌

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 11:54 am | मुक्त विहारि

आठवणी आवडल्या ...

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 12:22 pm | प्रचेतस

सैन्यातील गणेशोत्सवाच्या आठवणी खूप आवडल्या.

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 1:12 pm | धर्मराजमुटके

छान आठवणी ! इथे अप्रस्तूत असेल पण तरीही दोन शंका विचारुन घेतो. शक्य असल्यास उत्तर द्यावे.
१. सैन्यात १००% शाकाहारी आणि दारु न पिणारे लोक असतात काय ?
२. शिखांना जशी पगडी घालण्यास आणि कृपाण बाळगण्याची परवानगी असते तसे इतर धर्मियांना (उदा. हिंदूं ना) गंध-तिलक , गळ्यात तुळशीमाळ वगैरे घालण्याची परवानगी मिळते काय ?

कर्नलतपस्वी's picture

4 Sep 2022 - 2:04 pm | कर्नलतपस्वी

सैन्यात १००% शाकाहारी आणि दारु न पिणारे लोक असतात काय ?

@धर्मराज-या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. मी स्वतः शाकाहारी आहे. मद्यपानाचा अस्वाद घेतला आहे पण फार थोडावेळ.

काही सैनीक नवरात्र, रामनवमीचे नऊ दिवसांचे उपवास सुद्धा ठेवतात.

आमचे एक वरीष्ठ संजाब व शेंडी ठेवत असत ,ते कर्करोग शल्यचिकित्सक आहेत.

एक मित्र कन्नडिगा ब्राह्मण यांना युनिट मधे पंडित घाबरायचे,वेद पुराण चा खुप खोलवर अभ्यास केलेले,अंतिम संस्कार सुद्धा करायचे.

रमजान व ईद पाळणाऱ्या करता विशेष व्यवस्था असते.
धर्म पालन करताना कर्तव्या कडे दुर्लक्ष करता येत नाही.

आता दारू व मांसाहार कमी झालाय.

शिखांना जशी पगडी घालण्यास आणि कृपाण बाळगण्याची परवानगी असते तसे इतर धर्मियांना (उदा. हिंदूं ना) गंध-तिलक , गळ्यात तुळशीमाळ वगैरे कघालण्याची परवानगी मिळते काय ?

शिख धर्मानुसार पाच 'क' कार ,कडा,केस,कच्छा,कंघा व किरपाण हे सदैव अंगावर घालण्याचे आदेश आहेत.
तसे तुळशीमाळ,गंध याबद्दल असे काही धर्मादेश नसल्याने त्यासाठी परवानगी नाही.

कुमारएक,प्रचेतस,संदिप चांदणे,अबसेंट माईण्डेड, मुवी, धर्मराज सर्वांचे मनापासून आभार.

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 3:36 pm | धर्मराजमुटके

विस्तृत प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !

प्रमोद देर्देकर's picture

4 Sep 2022 - 3:45 pm | प्रमोद देर्देकर

लेख आवडला.
सैन्यातील गणेशोत्सवासारखेच इतर सण पण साजरे करतात का?

म्हणजे ईद, नाताळ वगैरे.

कर्नलतपस्वी's picture

4 Sep 2022 - 4:10 pm | कर्नलतपस्वी

सैन्यातील गणेशोत्सवासारखेच इतर सण पण साजरे करतात का?

@प्रमोद जी धन्यवाद.
सैन्यात पारंपारिक सण समारंभ प्रत्येक धर्म व आस्था लक्षात ठेवून साजरे करतात. सण साजरे करण्यात करता संख्याबळ महत्वपूर्ण इद ,नाताळ दुर्गापुजा सारखे सण छावणी स्तरावर सर्व युनिट मीळून करतात.
गणेशोत्सव, पोंगल,बिहू,गुरूपुरब होळी सारखे सण युनिट स्तरावर साजरे करतात

सैन्यातील गणेशोत्सवाच्या आठवणी सुंदर शब्दांकित केल्या आहेत.

नचिकेत जवखेडकर's picture

5 Sep 2022 - 6:55 am | नचिकेत जवखेडकर

अरे वा! सुंदर आठवणी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2022 - 8:42 am | ज्ञानोबाचे पैजार

सैन्यात देशभर अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होते हे वाचून फार मस्त वाटले.
लेझीम खेळायला फार मजा येते आणि बघायला सुध्दा,
आजकाल पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पण लेझीम क्वचितच पहायला मिळते, नव्या पिढीला ढोल-ताशा बडवण्यातच आनंद मिळतो.
गणपती बाप्पा मोरया
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 9:00 am | जेम्स वांड

१. सैन्यात १००% शाकाहारी आणि दारु न पिणारे लोक असतात काय ?

माणदेश ह्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी विभागात माझं गाव आहे, गावातील पोरे आहेत मिलिटरी मध्ये, सातारा जिल्हा असल्यामुळे बहुसंख्य भर्ती ही "प्यूअर" पलटणीची असते, घरातली १० माणसे (चुलत, सख्खी चुलत, भावकी मिळून) आहेत मराठा लाईट इनफंट्रीला, सगळे माळकरी, जेवण शाकाहारी, दारू कॅन्टीन मधून घेऊन पण येत नाहीत, आणली तरी इतर गावातील मित्रांना किंवा कोणाला हवी असेल त्याला देऊन टाकतात.

धर्मराजमुटके's picture

6 Sep 2022 - 9:28 am | धर्मराजमुटके

धन्यवाद !
माणदेश म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर "माणदेशी माणसं" ही व्यंकटेश माडगुळकरांची व्यक्तीचित्रण मालिका येते. फार सुंदर व्यक्तीचित्रणे आहेत.
एकाच घरात गदिमा आणि व्यंकटेश सारखी रत्ने जन्माला येणे म्हणजे योगायोगच म्हणावा लागेल.

जेम्स वांड's picture

6 Sep 2022 - 10:17 am | जेम्स वांड

माडगुळ्याची ही भावंडे महाराष्ट्राचे दैवत आहेत की राव.

गदिमा थोरच, पद्यात

आयुष्य अरभाट पाहून जगून कागदावर मांडण्यात व्यंकटेश माडगूळकर ह्यांचा कोणी हात धरणार नाही, व्यासंग तमाशाचा असो किंवा काझिरंगा जंगलात फिरायचा, घरी बसून मनन असो वा मध्यरात्री मध्यप्रदेशातील एखाद आडवळणी जागी रेल्वेतून उतरून पायपीट करणे असो, समृद्ध अनुभव आहेत व्य दी माडगूळकरांचे

अनिंद्य's picture

5 Sep 2022 - 11:29 am | अनिंद्य

छान आठवणी. मराठी मनाला गणेशोत्सव हळवं करतो खरा, खास करून महाराष्ट्राबाहेर असतांना.

घरात-गोतावळ्यात सैन्याधिकारी आहेत, त्यामुळे सैन्यातील ह्या सर्वधर्मीय 'सॉलिडॅरिटी'बद्दल कल्पना आहे. आणि हो, सैन्यदलात शाकाहारी आणि मद्य निषिद्ध जीवनशैली असलेली भरपूर मंडळी आहेत.

लेख व फोटोज् छान !! फक्त 2/3र्या फोटोत गणपती बाप्पांना घेणार्याने टोपी कशी काय घातली नाही?

शेखरमोघे's picture

6 Sep 2022 - 8:53 am | शेखरमोघे

छान आठवणी, सुरेख पद्धतीने लिहिलेल्या!! "हलगी-दिमडी-झांजेच्या टिपेवर लेझिमीचे शिस्तबद्ध डाव" असे बसवून घेणे हे देखील मोठेच काम!!

MipaPremiYogesh's picture

6 Sep 2022 - 10:05 am | MipaPremiYogesh

खूप सुंदर आठवणी

मस्त आहे लेख. (काव्यपंक्ती तुलनेने कमी असल्याने) जास्ती आवडला 👍
|| गणपतीबाप्पा मोरया ||

तुषार काळभोर's picture

7 Sep 2022 - 6:38 am | तुषार काळभोर

फोटो पाहून मन तीस वर्षांपूर्वीच्या काळात गेले.
लेझिम खेळताना आणि त्या आधीचा फोटो ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धातील आहे का?
घरापासून दूर असताना उत्सवानिमित्ताने मिळणारा आनंद वर्षभराचा उत्साह देऊन जातो.
इतर प्रांतातील सणही साजरे होत असतील ना? त्यांच्याविषयी वाचायला आवडेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Sep 2022 - 1:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान आठवणी आहेत गणेशोत्सवाच्या!! सैन्याभोवती/ सैनिकांभोवती एक अदृश्य भिंत असते त्यामुळे हा तसा सामान्य माणसाच्या माहितीपलीकडचा भाग आहे. पण तिथेही (विशेष करुन महाराष्ट्राबाहेर) गणेशोत्सव साजरा होतो हे वाचुन छान वाटले.

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 9:44 am | विवेकपटाईत

लेख आवडला. पूर्वी चाळीस वर्ष आधी दिल्लीत फक्त मराठी लोक गणेशोत्सव साजरा कराचे. पण आज हा सर्व दिल्लीकरांचा सण झालेला आहे. चौकात, गल्ली-बोळयांत हजारो गणपति बसतात. हजारो ठिकाणी भंडारा होतो. काही वर्षांपूर्वी गणपति विसर्जनाच्या दिवशी मेरठहून दिल्लीला परत येत होतो. संध्याकाळचे चार वाजले असतील. वाटेत गंगनगर जवळ एक विशाल गणपति विसर्जनाची मिरवणूक दिसली होती. किमान शंभरहून जास्त गणपती त्यात होते. गंगनहर जवळ मेळावा दिसत होता. गणेशोत्सव हा आज राष्ट्रीय उत्सव झाला आहे.

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 1:36 pm | श्वेता व्यास

खूप छान आठवणी आहेत तुमच्या.
सैन्यात धर्मशिक्षक (पंडित, ग्रंथी, मौलवी, फादर) धर्माचे अधिष्ठान सांभाळतात. हे माहिती नव्हतं, तुमच्या आठवणींच्या निमित्ताने समजलं.

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2022 - 9:31 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद श्वेता.