श्रीगणेश लेखमाला २०२२ - पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू

Bhakti's picture
Bhakti in लेखमाला
3 Sep 2022 - 10:34 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.field-items img {margin-bottom:16px;margin-left: auto;margin-right: auto;}

श्री गणेश लेखमाला २०२२पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू

ऋषी पराशर यांच्या नावावरून पारनेर हे नाव या तालुक्याला लाभले, असे मानण्यात येते. पारनेर तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील दोन नगरकोट - जामगावचा व पळशीचा नगरकोट याची थोडक्यात माहिती इथे देत आहे. नगरकोट म्हणजे चहुबाजूंच्या तटबंदीच्या आत वसलेले नगर अथवा गाव.

जामगाव नगरकोट – महादजी शिंदे यांचा वाडा

पेशव्यांचे शूर सेनापती आणि इंग्रजांकडून ‘द ग्रेट मराठा’ अशी उपाधी मिळालेले महादजी शिंदे (१७३०-१७९४) यांनी जामगाव येथे हा नगरकोट निर्माण केला. ८०-८५ एकरात एका टेकडीवर दगडी तटबंदी आणि चार वेशींमध्ये याचे बांधकाम आहे.
मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. त्याच्यासमोरच किल्ल्याबाहेर मारुतीरायाची भव्य मूर्ती आहे. या दरवाज्यातूनच पुढे परकोट (वाडा)कडे जाताना वाटेत अनेक जुनी मंदिरे, बांधकामे दिसतात.

जामगाव वाडा प्रवेशद्वार
जामगाव वाडा प्रवेशद्वार
वाड्यासमोरील मारुतीराया
वाड्यासमोरील मारूतीराया
जामगाव येथील जुनी मंदिरे
जामगाव येथील जुनी मंदिरे
वाड्यात प्रवेशासाठी पुन्हा दोन दरवाजे आहेत. त्यातील सध्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर समोरच चंद्राकृती विहीर नजरेत भरते. विहिरीची खोली १५० फूट असून पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था आहे.
शिंदे यांचे वारस जिवाजीराव शिंदे यांनी रयत संस्थेस हा वाडा बक्षीस दिला आहे, त्यामुळे सध्या येथे शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय सुरू असते.
वाड्यात शिरताच सल्लामसलतीचा एक छोटेखानी दरबार दिसतो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर सुंदर कोरीव नक्षी पाहायला मिळते. कोपर्‍यात एक खोली आहे, जेथे महादजी शिंदे यांची तसबीर आहे. समोर वाड्याचा मोठा चौक आहे.

महादजी शिंदे यांची तसबीर
महादजी शिंदे यांची तसबीर
जामगाव वाड्याचा चौक
जामगाव वाड्याचा चौक
सोप्यातून असलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाता येते. वरील मजल्यावर आकर्षक नक्षी असलेल्या खिडक्यांचे झरोके आहेत. बांधकामातच बनवलेल्या कुंड्याही छान आहेत. शेवटच्या मजल्यावरून सभोवतालचा आकर्षक परिसर नजरेत भरतो.

जामगाव वाडा खिडकीची नक्षी
जामगाव वाडा खिडकीची नक्षी
जामगाव वाडा बांधकामातील कुंडी
जामगाव वाडा बांधकामातील कुंडी

वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या २०० मीटर पुढे पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. हेमाडपंथी व इतर दगडी बांधकाम असलेली गणपती व इतर देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्ती विशेष घडवल्या आहेत.

रामेश्वर मंदिर शिखर
रामेश्वर मंदिर शिखर
मंदिरांच्या दाराखाली विविध कीर्तिमुख आहेत. चाफ्याच्या झाडाखाली निवांत दोन क्षण अद्भुत आनंद वाटला.

रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (१)
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख १
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (२)
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख 2
मंदिर परिसरातील चाफ्याचे झाड
मंदिर परिसरातील चाफ्याचे झाड

पळशी नगरकोट - पळशी वाडा आणि विठ्ठल राही रखुमाबाई पुरातन मंदिर

पळशी हे गावदेखील दगडी तटबंदी असलेल्या नगरकोटात वसलेले आहे. याला प्रवेशासाठी चार वेशी (दोन छोट्या व दोन मोठ्या) असून सुस्थितीत आहेत.
किल्ल्याच्या आत तीन जुने वाडे आहेत, त्यातील एक वाडा चांगल्या स्थितीत आहे आणि एक वाडा - पळशीकरांचा वाडा काष्ठशिल्पासाठी परिचित आहे. होळकरांचे दिवाण असलेल्या कांबळे-कुलकर्णी यांनी वाड्याची निर्मिती केली, असे समजले. मूळ मालक सध्या इंदूरला वास्तव्यास आहेत. एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते.

प्रवेश करतानाच लाकडी कोरीव काम असलेल्या दरवाजा दिसतो. वाड्यात आत गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत. अंबारीसह हत्ती, मर्कट, ड्रॅगनसम शिल्प, लाकडी कोरीव मनुष्य मूर्ती, फुलांच्या परड्या अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी आनंद देतात. समोरच्या चौकात जुने भुयारी मार्ग बुजवण्यासाठी दगडी परात, जाते बसवलेले आहेत.
कोपर्‍यातच जुने पारंपरिक मंदिर आहे. मंदिराचे दार आणि पुढील आतील कोरीव छत त्या काळातील लाकडी फॉल्स सीलिंगच म्हणावे लागेल. दुसर्‍या मजल्यावर राण्यांच्या महाल, रंगमहालसदृश महाल होता. तो आता ढासळला आहे.
पळशी वाड्यातील काष्ठशिल्पे व कोरीव कामे
1
2
3
4
5
6
7
दगडी परात
दगडी परात

अशा प्रकारे अप्रतिम काष्ठशिल्प पाहून पुढे जवळचेच 'प्रतिपंढरपूर' समजले जाणारे राही राखुमाबाईसह असणारे मंदिर पाहायला गेलो.
उंचच उंच प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे, ज्यावर जाण्यासाठी आतील बाजूने जिन्याची सोय आहे. मंदिराचे शिखर दोन भागांत आहे. समोरील मंडपाचे घुमटाकार आणि गर्भगृहाचे उंच शिखर आहे.
पळशी विठ्ठल मंदिर
पळशी विठ्ठल मंदिर
पळशी विठ्ठल मंदिर 2
पळशी विठ्ठल मंदिर 3

मंदिरामध्ये गोपाळ विठ्ठलरूपातील मूर्ती आहे, कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी धेनू, गोवत्सल आहेत. मूर्तीच्या बाजूला दशावतार रेखलेले आहेत. विठ्ठलाच्या एका बाजूला रुक्मिणीची आणि एका बाजूला राहीची अशा मूर्ती आहेत. चौथाराच्या खालील बाजूस वाद्ये वाजवणारे लोक घडवले आहेत.

विठ्ठल राही रखुमाई
वाद्य वाजविणारे वादक

मंदिराच्या आतील भिंतीवर राधा-बासरीधारक कृष्ण, राम-सीता-लक्ष्मण, गणेश-ऋद्धिसिद्धी, ६४ योगिनी अशा अनेक सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोराच्या अनेक छटा, युद्धातील दृश्ये, व्याल, गजयुद्ध कोरीव काम आहे. महिषासुरमर्दिनीची व इतरही २ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर सुंदर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
पळशी मंदिरातील काही दगडी शिल्पे
1
२
३
४
५
६
७
८
९

मंदिरामागे पाण्याचा प्रवाह आहे. त्यापलीकडे शंकराचे आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला आधुनिक रंगरंगोटी केली आहे तीही उठून दिसत आहे.
पळशी शंकर मंदिर
पळशी शंकर मंदिर
पळशीचा गणपती
पळशी-गणपती

पावसाळ्याचे दिवस, श्रावणाची हिरवाई, पाण्याच्या प्रवाहाचा मनमधुर खळखळाट... हे दृश्य नेत्रांत मनसोक्त सामावून एक सुंदर दिवस भटकंती घडली.

- भक्ती

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 Sep 2022 - 10:40 am | कुमार१

भटकंती सुंदरच !
आवडलेच.

कंजूस's picture

3 Sep 2022 - 10:58 am | कंजूस

फोटोही सुंदर.
धन्यवाद.

गोरगावलेकर's picture

3 Sep 2022 - 12:33 pm | गोरगावलेकर

लाकडी कलाकुसर , दगडी शिल्प सर्वच सुंदर

पर्णिका's picture

9 Sep 2022 - 2:20 am | पर्णिका

+१
सुरेख लेख... फोटोही फारच सुंदर !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Sep 2022 - 12:50 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे लेख.
👌

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2022 - 1:44 pm | कर्नलतपस्वी

जवळपास इतकी सुंदर ठिकाण आहेत माहीतच नाही. आमच्या गावाजवळील हे तालुक्याचे ठिकाण.

शब्दांकन व छायाचित्रे दोन्ही सुंदर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2022 - 1:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळे फोटो आवडले
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

3 Sep 2022 - 4:13 pm | तुषार काळभोर

१.पळशी वाड्यातील काष्ठशिल्पे व कोरीव कामे: पहिलाच फोटो प्रचंड सुंदर आहे. अतिशय कोरीव कलाकुसर.

२. पळशी मंदिरातील काही दगडी शिल्पे : सहावा फोटो : आदरणीय वल्लीदांचं स्मरण करून ते शिल्प सप्त-मातृका व गणेश यांचे आहे, असं मला वाटतंय... :)

प्रचेतस's picture

3 Sep 2022 - 6:22 pm | प्रचेतस

:)

डाव्या बाजूच्या कोपऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता आहेत, उजव्या बाजूच्या कोपऱ्यात रिद्धी, सिद्धी आणि गणेश आहेत तर मधल्या पॅनलवर वेणूगोपाळ कृष्ण (मोरपंखी मुकुट), नांगरधारी बलराम आणि खिल्लारे आणि आजूबाजूला गोप गोपिका किंवा रुक्मिणी वगैरे दिसताहेत.

तुषार काळभोर's picture

4 Sep 2022 - 12:46 am | तुषार काळभोर

म्हणूनच प्रत्यक्ष तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

3 Sep 2022 - 5:27 pm | चौथा कोनाडा

सुंदर भटकंती !

लेख आणि प्रचि आवडले.

या लेखा मुळे ही दोन्ही स्थाने बादलीयादीत टाकत आहे !

दगडावरील असो कि लाकडावरील, कोरीवकाम हा प्रकारच प्रचंड आवडतो त्यामुळे दोन्हीवरील सुंदर कोरीवकामे दाखवणारा हा लेख अर्थातच फार आवडला आहे 👍
एका अनवट ठिकाणच्या वास्तू आणि शिल्पांचा छान परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे 🙏

अवांतर: मध्यंतरी युट्युबवर आधुनिक शिल्पकलेचे व्हिडीओज पाहिल्यावर प्रभावित होऊन आपणही एखाद्या लहानश्या दगडाचे रूपांतर सुंदरशा शिल्पात करावे अशा उर्मीतून अ‍ॅमेझॉन वरून एक हॅन्ड ग्राइंडर मागवला. पण एक mm भर जरी दगड तासला तरी घरभर उडणाऱ्या धुळीमुळे संतापलेल्या घरच्या मंडळींनी तीव्र विरोध करून मला तो प्रयोग गुंडाळायला भाग पाडले 😀 दगडापेक्षा लाकडावर कोरीवकाम करणे कमी भुस्सा/कचरा निर्माण करणारे असावे त्यामुळे आता एखादे काष्ठशिल्प घडवण्याचा विचार करतोय!

एखाद्या लहानश्या दगडाचे रूपांतर सुंदरशा शिल्पात करावे अशा उर्मीतून अ‍ॅमेझॉन वरून एक हॅन्ड ग्राइंडर मागवला.

गतजन्मीचा ध्यास म्हणावा काय हा :) भारीच!

दगडापेक्षा लाकडावर कोरीवकाम करणे कमी भुस्सा/कचरा निर्माण करणारे असावे त्यामुळे आता एखादे काष्ठशिल्प घडवण्याचा विचार करतोय!

होऊ द्या यशस्वी प्रयोग!

प्रचेतस's picture

3 Sep 2022 - 7:01 pm | प्रचेतस

हा सर्व परिसरच छान आणि प्राचीन, मध्ययुगीन वास्तुंनी समृद्ध आहे. टाकळी ढोकेश्वरला दोन वेळा गेलो असतानाही वेळेअभावी इकडे जाता आले नाही, आता मात्र हमखास इकडे यावेच लागेल असे वाटतेय.

नक्की मिपाकर या ठिकाणी नक्कीच जा!
पळशीचे मंदिर बांधण्यासाठी सुरत लुटीतील काही द्रव्य देणगी मिळाले अशी ऐकीव माहिती आहे.सत्यता माहिती नाही.
सर्व प्रतिसादकर्ते मिपाकरांचे धन्यवाद!

काष्ठशिल्पातील शेवटचे दार व काळ्या रंगाचे नक्षीदार लाकुड आहे ते आतुन पोकळ आहे, त्याकाळातील सजावटीसाठीचे लाकडी POP.

फोटो माहिती दोन्ही उत्तम !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasara

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 8:43 am | जेम्स वांड

जागांची ओळख मजबूत आवडली,

नगर जिल्ह्याला पुरातन ते आधुनिक इतिहासाचे जबरी अधिष्ठान आहे. सिंधू संस्कृतीच्या फॉलो थ्रू संस्कृतीतल्या दायमाबाद, तालुका श्रीरामपूर ते अहमदनगर किल्ला जिथं नेहरूंनी "डिस्कवरी ऑफ इंडिया" सारखा महाग्रंथ पूर्ण केला अहमदनगर खूप समृद्ध आहे इतिहासात.

पारनेर इतकाच विचार करता तुम्ही दिलेल्या दोन साईट अन् सोबत पांडुरंग माहदेव उर्फ सेनापती बापट ह्यांची जन्मभूमी पारनेर हे आठवतेच. सेनापती बापट, मिर्झा अब्बास आणि हेमचंद्र दास हे "बॉम्ब बनविण्याची विद्या लंडन मधून शिकून" ती भारतातील क्रांतिकारी बंधूंना आणून देणाऱ्या तीन महत्वाचे क्रांतिकारक सुपुत्रांपैकी एक.

लेख उत्तमच आहे हे वेगळे सांगणे नलगे.

हा होळकरांचे दिवाण अन्याबा पळशीकर यांचा वाडा आहे का? होळकरांचे मुख्य दिवाण गंगोबातात्या चंद्रचूड. या दोघांची नावे सर्वत्र येतात, इतर नावे कधी ऐकली नाहीत.

प्रचेतस's picture

4 Sep 2022 - 10:04 am | प्रचेतस

बहुधा रामजी यादव पळशीकर, यांचे पूर्वीचे आडनाव कांबळे होते.

Bhakti's picture

4 Sep 2022 - 5:52 pm | Bhakti

+१

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 7:25 am | कर्नलतपस्वी

गंगोबा तात्या चंद्रचूड खेड तालुका कनेरसर येथील. त्यांचा पेशव्यांवर राग म्हणून आपल्या वाड्याचा दर्शनी भाग शनिवार वाड्यासारखा बांधला. वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत व वारसदार तेथे रहातात.
नेवासा,नगर जिल्ह्य़ातील पुरातन गाव येथील मोहनीराज मंदिराचा जीर्णोद्धार यांनीच केला. सुदंर वास्तूशिल्प आहे.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 12:58 pm | मुक्त विहारि

फोटो छान आले आहेत ...

जेम्सदादा उत्तम नवीन माहिती!
मदनबाण|मुवि प्रतिसादासाठी धन्यवाद.

नचिकेत जवखेडकर's picture

5 Sep 2022 - 6:47 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान लेख आणि छायाचित्रे. एका वेगळ्याच जागेची ओळख करून दिलीत

लाकडी कोरीवकाम उच्च दर्जाचे आहे. वास्तुंचे मात्र योग्य जतन झाले तरच पुढच्या पिढीपर्यंत राहतील. ते तसे होवो ही प्रार्थना !

फोटो छान आल्याचे सर्वांनी म्हटले आहे पण मला तो चाफ्याच्या झाडाचाच फोटो सर्वाधिक आवडला आहे.

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 1:53 pm | तर्कवादी

परिचय आवडला
शिंदेवाड्यात महाविद्यालय चालते त्यामुळे वाडा फक्त सुटीच्या दिवशी बघता येईल असे काही आहे का ?

मी दोन तीनदा रविवारीच गेले आहे.इतर दिवशीही केवळ शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय येथे चालते, तेव्हा वर्दळ कमी असावी हा अंदाज.

चित्रे आणि माहिती आवडली.
धन्यवाद!!

चित्रे आणि माहिती आवडली.
धन्यवाद!!

वाह एकदम वेगळ्याच जागेची भटकंती आणि माहिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2022 - 7:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो छान आहेत, माहितीबद्दलही आभार. लिहिते राहावे. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

18 Sep 2022 - 12:17 pm | पाषाणभेद

लाकडी कोरीव काम किती मन लाऊन केले असेल?
फोटो अन लेखन दोन्ही छान आहेत.

नागनिका's picture

18 Sep 2022 - 3:18 pm | नागनिका

सर्व शिल्पे खूपच सुंदर..!
'दगडाचा भुगा जितका पडेल तितके मानधन जास्त' असा प्रकार होता तेंव्हा

श्वेता व्यास's picture

22 Sep 2022 - 1:40 pm | श्वेता व्यास

खूप छान माहिती आणि फोटो. पारनेरला आईचे एक मामा नोकरीनिमित्त राहायचे तेव्हा लहानपणी भेट दिली आहे, यातली काही ठिकाणे पाहिली आहेत पण इतका तपशील आठवत नव्हता.