ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल?
अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून.
उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते.
मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता. सगळं काही सुरळीत चालू होते, परंतु पुढे वरच्या वर्गात ह्या मातृभाषेच्या व्याकरणाने मला " दे माय धरणी ठाय " करून सोडले.
माझ्या निबंधाच्या वहीत वाक्यावाक्यात र्हस्व दीर्घच्या चुका लाल शाईने दुरुस्त केलेल्या असायच्या, जी पूर्ण निबंध बाईंनीच लाल शाईने लिहिला असावा इतक्या चुका असायच्या. त्यामुळे मराठी विषयाचा मी धसकाच घेतला. कर्ता,कर्म, क्रियापद , अमुक ओळखा तमूक ओळखा. संस्कृत मधून एखादा शब्द आला असेल तर त्याला वेगळा नियम. इतके सगळे डोक्यात ठेवून शुद्ध मराठी लिहिण्यापेक्षा कुठलेही नोटेशन समोर न ठेवता बँजो वाजवणे सोपे आहे असे वाटू लागले ( स्वरज्ञान असल्याने ).
मराठी भाषा हा विषय सोडल्यास बाकीच्या विषयात मराठीची अडचण आली नाही. गणितात एकदा रामाच्या वयावरून अहमदचे वय काढायला सांगितले असताना उत्तरात लिहिताना चुकून महंमदचे वय लिहीले. उत्तर बरोबर असल्याने अहमद महंमद चूक चालून गेली. कदाचित त्याचसाठी प्रश्न विचारताना राम आणि अहमद अशी नावे टाकली असावीत.
माझा होरा खरा ठरला , मी ज्या संधीची वाट बघत होतो ती मिळणार होती. बाईंनी पूर्ण वर्गावरून नजर फिरवून माझ्यावर स्थिरावली , मला उत्तर देण्यासाठी उभे केले. मराठी व्याकरण चुकांचा महामेरू नक्कीच काहीतरी तारे तोडणार ह्याची बाई आणि पूर्ण वर्गाला खात्री होती. वर्गात अगोदरच खसखस पिकली होती.
तुम्ही दिलेले वाक्यच चुकीचे आहे बाई. मी ठामपणे सांगितले. वर्गात पिनड्रॉप सायलेन्स!
काय चुकलेय वाक्यात? बाई.
" मधुला डास चावला " हे वाक्य चुकीचे आहे. विज्ञानाच्या धड्यात नर डास हा चावत नाही फक्त डासाची मादी चावते असे सांगितले आहे. हे वाक्य " मधुला डासाची मादी चावली " असे हवे होते.
जिथे एखाद्या जीवाचे बाह्य रचनेवरून लिंग ओळखता येत नसेल तर त्याचा उल्लेख सामान्य नामाने केला जातो. बाईंनी आपली हुशारी वापरून मला गप्प केले. विज्ञानाचा आधार घेऊन चूक दाखवायला गेलो परंतु व्याकरणाचे नियम नीट माहीत नसल्याने गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
काहीतरी गडबड आहे , डास चावली असे म्हणायला काय हरकत असेल. उगाच बिचाऱ्या शाकाहारी नर डासाला बदनाम केले जातेय असे वाटत असताना ," कोकिळा कुहुकूहू गाते " ह्यात ..... बाईंचा नवीन प्रश्न कानावर पडला. आता व्याकरण गेले खड्ड्यात, हे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. जाणून बुजून नरांचे खच्चिकरण केले जातेय ह्याची खात्री पटली. कोकीळ पक्षाची नर आणि मादी रंगावरून सहज ओळखता येत असताना हा खोटेपणा केलाय हे सहज जाणवते.
प्रत्यक्षात कोकीळ नर सुरात गातो. मादीचा आवाज बिघडलेल्या हॉर्न सारखा असतो. तरीही एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला कोकिळेच्या गळ्याची उपमा दिली जाते, गायकांना नाही. ह्याचा अर्थ नरांच्या चांगल्या गोष्टी माद्यांना चिकटावयच्या आणि माद्यांच्या वाईट नरांना चिकटवून त्यांना बदनाम करायचे. जाऊदे वाङमय म्हणून सहन करणे आपल्या हाती आहे असे समजून विसरून गेलो.
असंच एकदा तलावपाळीवर आम्ही मित्र मैत्रिणी गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात समोरून सुचिता रस्ता ओलांडून येताना दिसली. गॉयटर झाल्यासारखे डोळे मोठे करून तिची यॉर्कर नजर माझ्याकडे. जवळ येऊन जोरात हाsssड करून ओरडली. माझ्या पायाखाली बसलेले मरतुकडे कुत्रे तिच्या आवाजाने घाबरून उठून पळाले. मी म्हटले कशाला बिचाऱ्याला हाकलले ?
बिच्चारा? एकजात हरामखोर असतात सगळे कुत्रे. काल रात्री माझ्या वडिलांना रस्त्यावरचा कुत्रा चावला. संतापाने ती फणफणत बोलली.
मी म्हटले कुत्राच कशावरून? कुत्री कशावरून चावली नसेल?
कुत्राच असणार, कुत्रेच पिसळतात माजलेत xx. संतापून ती म्हणाली.
कुत्र्याला नाही कुत्रीलाच " माज " असतो. तिचे सामान्यज्ञान माहीत असल्याने मी तिला डिवचले.
म्हणजे? तिने विचारले.
तुला नाही समजणार. मी
काहीही गाढवासारखे नको बोलू. ती म्हणाली.
तू " गाढवीनी " सारखी नको बोलू असे मी तिला म्हटले आणि सगळे " ठ्ठो " करून हसले.
ती कावरी बावरी होऊन हात उडवत " गाढवीनी "सारखे म्हणजे ? अशी पुटपुटत इकडेतिकडे बघत राहीली.
प्रतिक्रिया
18 Aug 2022 - 5:34 pm | वामन देशमुख
अच्छा, म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचंय होय!
बर्र...
18 Aug 2022 - 6:00 pm | तर्कवादी
लेख आणि शीर्षक दोन्हीही झक्कास .. अजून येवू देवू द्या :)
18 Aug 2022 - 6:21 pm | nutanm
वेगळ्या विषयावरचा ठीक लेख, हसू आले थोडेसेच.
18 Aug 2022 - 7:38 pm | विजुभाऊ
मराठीने असाही पुरुषांवर अन्याय केला आहे.
सगळी चांगले नामे स्त्रीलिंगी आहेत. तर वाईट पुल्लिंगी आहेत.
उदा ती माया , ती ममता , ती दया , ती सुंदरता , ती भावना ,
मात्र तो राग , तो आक्रोश , तो वेडाचार ,
18 Aug 2022 - 8:12 pm | सुखी
भारिये... वेगळ्याच अपेक्षा ठेऊन उघडला होता लेख
18 Aug 2022 - 9:17 pm | अनुस्वार
विनोद आणि विरंगुळा चपखल साधलाय. तुम्हाला आणखी वाचायला आवडेल.
शुभेच्छा.
19 Aug 2022 - 8:52 am | ज्ञानोबाचे पैजार
बाबासाहेब अंबेडकरांनी म्हटले होते "गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणिव करुन द्या म्हणजे ते पेटून उठतील"
या लेखाने नेमके तेच कार्य साध्य केले
समजायला लागण्याच्या आधी पासूनच असा सरसकट अन्याय होत असल्याने तो अन्याय वाटेनासा झाला होता, पण या लेखा मुळे आमचे डोळे खाडकन उघडले गेले आहेत. आता बंड करुन उठण्याशिवाय पर्याय नाही.
पैजारबुवा,
19 Aug 2022 - 10:17 am | सौंदाळा
शीर्षक वाचून जरा भीतीच वाटली. पण लेख मस्तच, एकदम खुसखुशीत.
विजूभाऊंचा प्रतिसाद पण चपखल
20 Aug 2022 - 6:03 pm | तुषार काळभोर
मस्त लिहिलंय!
आदरणीय विजूभौ आणि आदरणीय बुवांच्या प्रतिसादाशी सहमत.
मिपावर एकेकाळी "पाशवी शक्ती" असा एक शब्दप्रयोग प्रचलित होता, त्याची आठवण आली!
21 Aug 2022 - 4:06 am | जेम्स वांड
नर बळी आवडला म्हणवत नाही पण सहवेदना जाणवली, पैजार बुवांचा प्रतिसाद मिपावर त्यांना ओळखणाऱ्या लोकांसाठी महा लोल category होता हे वेगळे सांगणे नको, बुवा लेकाचा चाबरा दिसतोय, आपलं जमतंय बाबा बुवा सोबत.
21 Aug 2022 - 1:25 pm | आनन्दा
वेगळ्याच नराचा बळी दिलाय तुम्ही.
असो, हा बळी पण आवडला आहे