विठू माउली

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
1 Jul 2022 - 8:42 pm

रखुमाई विठ्ठलावर होती थोडी नाराज
ठरवले तिने फार बोलायचे नाही आज

ठरले होते आधी ते वेळ मला देणार
मग जाऊन भक्तांना दर्शन ते देणार

भक्त आपले सारखे काही ना काही मागतात
विचार न करता हे देऊन सगळे टाकतात

आधीच मला ठेवली यांनी स्वतःपासून दूर
आषाढीला येईल आता भक्तांचा मोठा पूर

लांबूनच मी यांच्यावर लक्ष ठेवून असते
कोण येतंय कोण जातंय सगळं बघत बसते

हे सुद्धा दिवसभर उभे राहून दमतात
मिटल्या डोळ्यांनी सुद्धा जग सगळं पाहतात

कधी एकदा हात खाली घेईन असं त्यांना होत
पण भक्तांकडेच मन यांचं सारखं ओढ घेत

आषाढीच्या आधी जरा विसावू त्यांना म्हटलं
दोन घटका चार शब्द बोलावं जरा वाटलं

पण आता यांना भलतीच काळजी लागली
कोण करणार पूजा यावर पैज लोकांची लागली

का होतो स्वार्थी माणूस काहीच कसं कळेना
देव जरी असलो तरी चिंता काही सुटेना

क्षणभर विश्रांती घेऊ असं आमचं ठरलं
पण वारकर्यांच्या प्रेमाने मन यांचं भरलं

मला म्हणाले रखुमाई काळजी का करी
माझा वारकरी येतो नेहमीच माझ्या दारी

त्याचा आहे माझ्यावर विश्वास केव्हढा ठाम
माझ्यासाठी येतो इथवर सोडून त्याच काम

खरा वारकरी असतो तो काही न मागता जातो
दर्शनाने फक्त माझ्या आनंद त्याला मिळतो

त्याच्यासाठी मी बाकीच्यांना सहन करतो
त्याच्याचमुळे तुझा विठू राऊळात रमतो

माझं दर्शन होताच तो होईल सुखी
त्याच्यासाठी राग तुझा सोडून दे सखी

धनश्रीनिवास

कविता

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

1 Jul 2022 - 10:04 pm | कर्नलतपस्वी

गृहस्थांच काही खर नाही
दोन डोळे बायकोचे cctv वाटतात
नाका समोर चालायला
देवाला सुद्धा भाग पाडतात

चांगली कल्पना. आवडली कविता. :-)