पाच सहा वर्षे झाली असतील. सातार्याहून मुंबै ला यायचे होते.
सातारा मुंबई थेट बस होती . रात्री साडे दहा ची वेळ असेल.
दहा वाजताच बसस्टँडवर जाऊन पोहोचलो. बसच्या स्टँडच्या शेडमधे तुरळकच उतारू होते.
अचानक तेथे एक बाई आली. वय वर्षे तीशीच्या आतच असेल.केस विस्कटलेले ,साडी अंगावर कोट. थंडी फारशी नव्हती तरीही तीने अंगावर ब्लेझर कोट घातला होता
तीच्या कडे काही सामानही दिसत नव्हते.
तीच्याकडे कोणाचे लक्ष्यही नव्हते.
अचानक काहितरी गलबला ऐकू आला म्हणून चमकून पाहिले. तर ती बाइ मोठमोठ्याने कोणावर तरी भांडत ओरडत होती.
काय समजलास काय रे स्वतःला. ह्या इथे दादागिरी नाय खपवून घेणार. मोठा असशील तर घरी. माजुरीपणा दाखवायचा तर तो घरच्या लोकाम्वर दाखव.
मला कशाला दाखवतोस. आम्हाला तू असा फसवू शकणार नाहीस. काय समजलास रे. क्ष्क्ष*&*$#$ *&*& हे सुक्कळीच्या.
ती ज्या दिशेला पाहून भांडत होती त्या बाजूला असलेले प्रवासी तेथून दूर निघून गेले.
आम्ही स्टँडच्या पोरी अशातशा नाय. एकदा दाखवायचे ठरवले तर तुला चांगलाच दाखवू. पार नडवू. परत तोंड दाखवणार नाहीस.
आमी स्टँडच्या पोरी कुनाला ऐकणार्यातल्या नाय.
..........
.......................
..............................
या नंतरही ती बाई बडबडत राहिली. कधितरी हातातला कोट जमिनीवर फेकत राहिली. कधी काठीने शेडच्या खांबावर मारत राहिली. पण उतारुंपैकी सगळेच तीला टाळत होते. कोणीतरी तीला काहि खायला दिले. तीने ते घेतले. पण नंतर म्हणाली. मला खायला देताय होय. मला? मी भिकारी नाय. चांगल्या घरची आहे. मी
.......... तू येच पुन्हा तुला बघतेच आता.कसा येतोस आन कसा जातोस ते.
एकूण अवतारावरून ती बाई एखाद्या चांगल्या घरातली वाटत होती. सुशिक्षीतही असावी. ती डिप्रेशन मधे पण असावी. पण तीच्या घरचे दारचे कोणी नसावे.
पण तीच्या बोलण्यात एकाचवेळेस विस्कळीतपणा राग आणि अभिमान अशा काहिश्या भावना होत्या.
तीच्या आम्ही " स्टँडच्या पोरी " या शब्दावरून काहिशी विचित्र जाणीव झाली. एरव्ही सामान्य माणूस आपण अमूक गावचे आहोत, अमक्या तमक्या संघटनेचेआहोत. असे अभिमानाने सांगायचे तर आम्ही सातारचे लोक, सदाशिवपेठी लोक असे सांगतात.
या बाईने केलेल्या " आम्ही स्टँडच्या पोरी" या उल्लेखाचे जरा वेगळेपण वाटले.
त्या बाईची काही फसवणूक झाली असेल, तीला तिथे कोणी आणले असेल, आपण जर स्टँडमधे आहोत हे तीला समजत असेल तर तेथून घरी जावे हे देखील समजत असेल तरीही ती तिथेच कशी थाम्बली?
हे सगळेच कुतूहल वाटते. कसे असतात ना लोक. या लोकांना भूत भविष्य काहीच नसते. एखाद्या वस्तूसारखे जगायचे , मधेच कधितरी माणूसपण आठवले की जगावर त्रागा करायचा. यातून या लोकांची सूटका कशी आणि कधी होईल कोण जाणे. या बाबत आपण काहीच करू शकत नाही याची हतबलता मात्र जाणवते.
इतक्या वर्षांनंतरही " आम्ही स्टँडच्या पोरी " हे तीचे शब्द मनातून पुसले जात नाहीत.
प्रतिक्रिया
3 Jun 2022 - 1:02 pm | गवि
फेरीवाली विक्रेती किंवा काही अन्य कारणाने तिथेच आश्रयास असलेली कोणी असेल.
प्रसंग वेगळ्या प्रकारचा आहे. त्याची नोंद घेणारे तुमचे मन संवेदनशील आहे.
3 Jun 2022 - 2:28 pm | विजुभाऊ
हे लोक कसे येतात, कुठे रहतात त्यांचा आगापीछा काय असतो ते कधीच समजत नाही
3 Jun 2022 - 11:03 pm | सौन्दर्य
अस्थिर मन, जगावर राग, तोंडात अर्वाच्य भाषा वगैरे असली की ह्यांच्या वाटेला फारसे कोणी जात नाही. ती जरी स्त्री असली तरी दुसरी स्त्री तिच्या मदतीला जाईल ह्याची शक्यता खूपच कमी असते. पुरुष मदत करायला गेले तर वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो. जर एखाद्या समाजसेवी संघटनेने अथवा व्यक्तीने त्यांची दखल घेतली तर त्यांचे पुढील जीवन सुकर जाऊ शकते.
विजुभाऊ, तुम्हाला हे लिहावेसे वाटले म्हणजेच तुम्ही तिच्या भावना टिपल्या आहेत, पण मदतीला जाण्यासाठी मन कदाचित कचरत असेल, जे स्वाभाविकच आहे.
4 Jun 2022 - 11:40 am | प्रसाद गोडबोले
सातारा आणि स्टँडच्या पोरी हे वाचुन जरा काहीतरी वेगळे असे असे वाटले होते .
सातार्यात स्टँड परीसरात "तर्जनीनासिकान्याय" प्रकरण जोरात चालायचे पुर्वी . तिथे आता भव्य मॉल झाल्यापासुन हा प्रकार कमी झाला आहे .
एकुणच तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तीही तसीच असावी असे वाटत आहे. पण चालायचेच . दुनियेत अशा लोकांची कमी नाही . आपण आपले संवेदनशील मन घेऊन घ्या दुनियेत नाही वावरु शकत , तुम्ही माणुसकी म्हणुन मदत करायला जाल अन वेळप्रसंगी ही असली माणसे तुम्हालाच घोडा लावायला कमी करणार नाहीत .
जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे . आपण काहीही शष्प हलवु शकत नाही ह्या दुनियेत .
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
4 Jun 2022 - 1:21 pm | विजुभाऊ
खरे आहे तुम्ही म्हणताय ते.
पण त्या बाईचे " आम्ही स्टँडच्या पोरी" हे वाक्य जसे काही त्या कुणी शिवाजी उदय मंडळातल्या पोरी आहेत , त्यांच्यावर काही संस्कार आहेत अशा अर्थाने वापरत होती. त्या शब्दाचे वेगळेपण वाटले.