शबिना:
मी शबिना, माझ्या पोस्ट ग्रॅडच्या शेवटच्या वर्षात प्रेमात पडले मी आनंदच्या. आमच्या कॉलेजच गॅदरिंग बघायला आला होता, आमची ओळख वाढली आणि त्यानी लग्नाचं विचारल्यावर मी होकार देऊन टाकला. तो जोशी, मी तांबोळी! आमच्या पुढचा रस्ता काही फार सहज सोपा नसणार हे ठाऊक असून देखिल आम्ही सगळं निभवायच ठरवलं. माझ्या सासरी, आमचं लग्न म्हणजे एक मोठा धक्काच होता. त्यांच्या घरी माझ्या हातच पाणी देखील चालेल की नाही असं त्यांच्या वागण्या बोलण्यातून वाटत रहायचं. लग्नाआधीच्या दोन वर्षात फार वेळा नाही गेले मी त्यांच्याकडे, पण मनापासून कधी स्वागत नाही झालं माझं हेही तितकंच खरं. ते राहायचे शहराच्या मध्यवर्ती भागात. शहराच्या जुन्या भागातला तो टिपिकल वाडा, त्यातल्या त्या बसक्या अंधार्या खोल्या आणि त्यांना वेटाळून जाणारे छोटे जिने! अम्मी अब्बा नेहमी वर्णन करतात त्या त्यांच्या जुन्या घरासारखच अगदी. माझ्या अंधुक आठवणीत त्यात भरीला कोंबड्याची फडफड आणि बकऱ्यांचे बेंबटणे सुद्धा आहे.
आम्ही लग्नानंतर जरी वेगळे राहात असलो तरी महिन्यातून एखाद्या रविवारी चक्कर असतेच आमची सासरी. तास दोन तास बसतो आम्ही, काहीतरी गप्पा मारतो. मी स्वैपाकघरात गेलेलं त्यांना फारसं आवडत नाही. सासूबाई चहा आणि काहीतरी खायला घेऊन येतात. मग त्या खाण्याबरोबर थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा. टाटा स्काय किंवा मोबाइलचे पैसे भरण्यासारखी काहीतरी छोटी मोठी कामं असतातच त्यांनी काढून ठेवलेली आनंदकडे, तो ती करतो आणि निघतो आम्ही. इतक्या वर्षात सहा वेळा कुशन कवर्स आणि दोनदा भिंतींचा रंग बदलला आहे आणि त्यांच्याकडे येणाऱ्या मासिकांची संख्या कमी होत चालली आहे, हे माझं निरीक्षण!
मागच्या रविवारी आनंदच्या मामा-मामीच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला गेलो होतो. एरवी मी अशा ठिकाणी जात नाही. मी काही अॅंटी सोशल नाहीये, पण लोकांच्या नजरा, त्यांच्या भोचक चौकशा, टिंगलीत केलेले उल्लेख या सगळ्याचा आता कंटाळा येतो. असं वाटत राहत की, यापेक्षा ‘स्वयं’ च्या मुलांना गोष्टी सांगायला गेलो असतो तर बरं झालं असतं! अर्थात अजितमामा आणि हेमामामीची गोष्ट मात्र वेगळी, त्यांनी आमच्या लग्नात बरीच मदत केली होती, त्यांचा खूप आधार होता आम्हाला त्या दिवसात. त्यामुळे कार्यक्रमाला जायच पण थोडा वेळ थांबून लगेच निघायचं असं ठरवून आम्ही हॉलवर गेलो. अपेक्षेप्रमाणे सगळे भेटले, मामा मामी छान दिसत होते. आम्ही गेल्याने त्यांना बरं वाटलं. त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही निघणार होतो तेवढ्यात आनंदला हेमंतनी हात केला. हा माझा मावसदीर एका मोठ्या कंपनीत आहे आणि त्याची बायको आर्किटेक्ट. “हाय शिल्पा, कशी आहेस?”-“ हाय शबिना, मी मस्त. तू काय म्हणतेस? कसं चाललय कॉलेज?”-“ छान. सध्या एक दिवसाआड शिकवायला जावं लागतं, सिनिअरला.” शिल्पाच्या नजरेत माझ्या बद्दलची असूया उगाचच चमकून गेली. वास्तविक तिचा बिझनेस छान चालला आहे, बऱ्याच ठिकाणी कामं चालू असतात तिची! आमचं बोलणं चालू होतं,तेवढ्यात एकदम शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या तिच्या लेकीनी, मधुरानी, आमच्या बोलण्यात नाक खुपसल,“ए, काकी, त्या दिवशी आई तुझ्या मैत्रिणींना बघून घाबरली, माहितेय ?” ते ऐकल्यावर शिल्पा चमकली आणि गडबडून जाऊन तिनी,“ मधुरा, असं बोलतात?” असं म्हणून डोळे मोठे करत मधुराला हळूच चापट दिली. “काही नाही ग, त्या दिवशी तू बोहरी आळीत नाही का भेटलीस, ते मी तिला सांगत होते. काहीतरी बोलते ही बया, घाबरायच काय..” “ओह्.” आमच्या बोलण्याची गाडी कुठे जाणार हे ओळखून आनंदनी मग विषय बदलला. पाचेक मिनिटं त्यांच्याशी बोलून आम्ही तिथून काढत पाय घेतला.
ही माझी आर्किटेक्ट जाऊ तिच्या साइट्सना लागणार सगळं समान बोहरी आळीतून घेते. त्या दिवशी मी, झरीना, नफिजा आणि मुमताज बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो. भरपूर गप्पा झाल्यावर साहजिकच आम्ही आमच्या आवडत्या कुल्फी पॉइंटला थांबलो होतो. तर समोरून शिल्पा येताना मुमताजला दिसली. तिनी मला हळूच कोपरखळी मारली. मी पटकन शिल्पाला हाय केलं. तिला पहिल्यांदा कळेच ना की या बुरखा घातलेल्या बायकांमधून तिला कोण हाक मारतेय ते! मला बघून तिचा जीव भांड्यात पडला. तशीही मला बुरखा घालायची सवय नाहीये म्हणा, पण मी सुद्धा जर बुरख्यात असते तर मात्र शिल्पाची काही खैर नव्हती! अर्थात, त्या ठिकाणी तिनी मला ओळख दाखवली हेच खूप झालं. नंतर तिनी घरी जाऊन आमच्या भेटीच यथासांग वर्णन केलंच असणार. त्याबद्दल बोलत होती तिची लेक! आमच नवीन नवीन लग्न झालं होतं तेंव्हाची गोष्ट. एकदा मला शिल्पा म्हणते, “कोणी ओळखीचं आहे का ग तुझं तिथे? नाही म्हणजे चांगला डिसकाउंट मिळेल म्हणून म्हणलं. आता तूच आहेस म्हणून मी हक्कानी म्हणलं ग, एरवी त्या भागातून जायची देखील भीती वाटते मला. कधी एकदा त्यांच्या भागातून बाहेर पडते असं होतं..” एवढं बोलून ती एकदम थांबली. बहुदा तिच्या लक्षात आलं असाव की, ‘त्यांच्यातलीच’ एकजण आता आपली जाऊ आहे. तिची मधुरा पण अशीच. मेंदी काढायला, शीर-खूर्मा खायला हवा, पण त्यासाठी माझ्या घरी चल म्हणलं तर कशी म्हणते, “नक्को, आजीला आवडत नाही. मला डोक्यावरून पाणी घ्यायला लागतं मग घरी गेल्यावर!”
पहिल्या पहिल्यांदा अस काही ऐकून धक्का बसायचा मला, राग यायचा. वाटायचं की, अरे आम्ही म्हणजे काय राक्षस-भूत आहोत की टेररिस्ट, आमच्या मोहल्ल्यातून जाताना भीती वाटायला? स्टुपिड! हळूहळू अशा वाक्यांची सवय झाली, तरीही असं काही झालं की मला खूप वाईट वाटायचं. मग आम्ही दोघं खूप लांब चक्कर मारायला जायचो आणि खूप बोलायचो यावर. “तुला सांगतो, लहानपणापासून आम्हाला ज्या काही भीती घातल्या जातात, त्यातली ही एक! शुक्रवारी त्यांच्या गल्ल्यातून एकटा जाऊन दाखवशील तर खरा, अशा पैजा लागायच्या मित्रांमध्ये! आणि गंमत म्हणजे ईदच्या दिवशी संध्याकाळी तिकडे जाऊन चिकन टिक्का आणि कबाब खायला मात्र हेच सगळ्यात पुढे! तेंव्हा मात्र सगळे जण भाई भाई.”-“हम्म. खरं म्हणजे, जो पर्यन्त यातला राजकीय अॅंगल बदलत नाही, तोपर्यंत हे असंच राहणार.” या वाक्यावर मात्र आमच्या दोघांच एकमत असायचं.
आत्तासुद्धा हॉल मधून बाहेर पडताना याच भावना डोक्यात घोळत होत्या. त्याच संदर्भात पुढे बोलावं असं मी त्याला म्हणलं, “पण एक आहे हं, मैथिलीच्या लग्नापासून सगळ्यांच वागणं बरंच बदलल आहे! जे काही दोन चार दिवस आम्ही सगळ्या जावा-नणंदा एकत्र होतो, तेंव्हा बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला, मलापण आणि त्यांनापण. संगीत, मेंदी धमाल आली खरंच मला खूप.”-“हो, आत्या पण खूष आहे तेव्हापासून तुझ्यावर. तिच्या हातावरची तू काढलेली मेंदी लग्नात सगळ्यांना दाखवत होती.”-“नंतर मैथिली मला म्हणली, की आम्ही उगाचच घाबरायचो तुझ्याशी बोलायला. बिर्यानीची रेसिपी विचारत होती परवा! तिला म्हणलं की घरी आलीस तर करूनच दाखवते, सांगता नाही येणार असं फोनवर.”-“अरे वा, मग काय म्हणली? कधी येणारे?”-“काय माहीत?”-“तुमची मैत्री होणार की काय म्हणजे?”-“होप सो!” आणि आमचं बोलणं तेवढयावरच राहिलं मग.
आनंद:
माझी आणि शबिनाची ओळख तिच्या कॉलेजच्या गॅदरिंग मधली. माझा ट्रेकिंगचा मित्र आफताब हा रफीची गाणी फार सुंदर म्हणायचा. त्यानी एकदा त्यांच्या गॅदरिंगला मला बोलावलं होतं, तिथली आमची ओळख. आफताबच्या एकाच कार्यक्रमासाठी म्हणून गेलेला मी, सगळे दिवस हजर राहिलो. मी शबिनसाठी तिथे येतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि त्यांनी मला तिच्या नावावरून चिडवायला सुरुवात केली. तिच्या हावभावातून तीपण माझ्या प्रेमात पडली होती हे स्पष्ट कळत होतं. तिच्या पोस्ट ग्रॅजुएशननंतर दोन वर्षानी आम्ही लग्न केलं. या दोन वर्षात अनेक गोष्टी आम्ही एकमेकांना स्पष्ट करत गेलो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लग्नानंतर आम्ही वेगळे राहायचं ठरवलं. आमच्या लग्नाला आई बाबांनी जरी फार विरोध केला नाही तरीदेखील आमच्या घरात आणि बिल्डिंग मध्ये सुद्धा शबिनाचा वावर असणं त्यांना पटलं नसतं. मुळात त्यांनी शबिनला कधी मनापासून आपलच नाही म्हणलं तर काय. पण असं असलं तरी महिन्यातून एकदा मात्र आम्ही दोघांच्याही माहेरी जातो. दुसरं म्हणजे देवा-धर्माच्या गोष्टी करायच्या तर दोन्ही पद्धतींनी, नाहीतर अजिबात नाही. तसंही तिच्या माहेरी धार्मिक गोष्टींचं अवडंबर नव्हत, त्यामुळे तिला तशीच सवय होती, मोकळेपणानी वागायची. मलातर पहिल्यापासूनच कर्मकांडाचे वावडे. त्यामुळे आई बाबांनी माझ्याकडून तरी त्याबाबतीत अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. कपड्यांबद्दल आई एकदा असंच म्हणली होती, “काय रे हे सदान् कदा जीन्स घालत असता दोघे जण? तिच्याकडे एखादा तरी पंजाबी ड्रेस नाहीये का?”-“बुरखा घालून आणतो तिला पुढच्या वेळेला.”-“ नको, हात जोडते, तेवढं करू नकोस!”,असं म्हणत आई चिडून आत निघून गेली होती. सारखं यांच्या मनासारख वागल पाहिजे यांना! जाऊ दे. खरं म्हणजे शबिना हिजाबसुद्धा क्वचित घालते. त्यामुळे ती मुसलमान आहे हे सांगितल्याशिवाय कळत नाही अजिबात. तिला याबाबतीत अनेकदा तिच्या नातेवाईकांकडून आधीसुद्धा बरंच ऐकावं लागलं आहे. पण ती ठाम आहे. तिचं मत मलादेखिल पटतं, धार्मिक गोष्टी पाळण न पाळण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात बाकीच्यांनी नाक खुपसू नये. लग्नानंतर आम्ही वेगळे राहायला लागलो त्यावरून सुद्धा अनेक जण टोमणे `मारायचेच. “चलायचच, जाऊ दे न,” असं म्हणून सोडून दिलेल्या अनेक गोष्टीं पैकी हे सगळे टोमणे!.
तर त्या दिवशीची गोष्ट. तिच्या अम्मीनी बिर्यानी आणि मटण कबाब केले होते. त्यांच्या हातचे कबाब एकदम लाजबाब, एखाद्या सेलेब्रिटी शेफ च्या तोंडात मारतील असे. अम्मीच्या घराखाली गाडी लावून जिना चढून गेलो. बंद दाराआडूनसुद्धा बिर्यानीचा वास व्हरांड्यात दरवळत होता. –“अरे, एव्हढा वास येऊनसुद्धा तुझ्या मारिया आंटीचा दरवाजा बंद कसा काय बुवा?” मी शबिनाला चिडवल. “बरंय न वाटेकरी नाहीये कोणी आज ते. अम्मीच्या हातच काहीतरी खावंस वाटतंय पोटभर. असं वाटतंय की अनेक महीने झाले अम्मीकडे येऊन..” “अरेच्चा, अजून बारा तास पण नाही झाले आणि तुला लगेच डोहाळे पण लागले? सुपरफास्ट हा..” यावर तिनी डोळे मोठे केले आणि मला जोरात चिमटा काढला. “चूप मी नाही, तूच होतास सुपरफास्ट!” मी काहीतरी बोलणार तेव्हढ्यात सलीमनी दार उघडल. “हाय जिजू, हाय दीदी,” आणि मग एकदम खालच्या आवाजात म्हणाला, “देख और कौन है अंदर..”
तर तिथे अमिरा आणि करीम, माझी मेव्हणी - मेव्हणा पण होते जेवायला. हे दोघं अगदी जुन्या विचारांचे. त्यांना आमचं लग्न फारसं मान्य नव्हतं. अमिरानी तिच्या धाकट्या दिरासाठी शबिनाला हेरून ठेवलं होतं, पण..! त्यामुळे तिचा माझ्यावर विशेष राग! इतकी वर्ष झाली तरी देखील! त्यामुळे आम्ही भेटलो तरी फारसं बोलणं होत नाही आमच्यात. “अरे, व्हॉट अ सर्प्राइज! कुठे गायब आहात दोघं? अजिबात भेटत नाही करीमभाई! क्या चल रहा है?” असं म्हणत मी करीमला हात उंचाउन हाय केलं. त्यावर त्यानी मला “आदाब” करत म्हणलं, “ऐसा कुछ नही आनंद. बस साराबेटी जरासी बिमार थी पिछले महीने, तो कही बाहर नही गये. तूम कहो, तुम्हारा क्या हाल है?”-“चालूए रुटीनच. नवीन काही नाही रे.”-“काय झालं होतं साराला? आता कशी आहे ती?”-“जा बघ आत झोपली आहे. या रे, आनंद, शबिना. सलीम, बेटा त्यांना पाणी दे.”- “ हॅलो अब्बा, आज तुमची ड्यूटि लागलेली दिसते आतमध्ये! नमस्ते अम्मी. कशा आहात?”-असं म्हणत मी सोफ्यावर बैठक मारली. “सलीम, तुझ्या अॅडमिशनचे पेढे दे आधी.” अम्मीनी त्याला सांगितलं. “अरे, आले पण अॅडमिटस् एवढ्यात? कुठे मिळाली अॅडमिशन?”-“कॅलिफोर्निया कॉलेज ऑफ आर्ट्स. स्कॉलरशिप पण मिळाली!”-“अरे वा,वा. अभिनंदन! फक्त पेढ्यावर काम भागणार नाही हा, पार्टी पाहिजे मोठी..”-“नक्की नक्की! नेक्स्ट वीक-एंडला काय करताय? जायचं का?” खोलीतून बाहेर आलेल्या शबिनाला पेढा देत सलीमनी विचारलं. “कॉंगरॅट्स सॅमी. मस्त बातमी दिलीस. अगदी मनासारखं झालं न तुझ्या?” शबिनानी त्याला जवळ घेत म्हणलं.-“मग, सलीम, आता दोन तीन वर्ष तरी तुला तुझ्या दीदीकडे बिर्यानी पोचवायला यावं लागणार नाही बघ, काय?” मी त्याला हसत म्हणलं. “हो.न. आम्हाला इथे यावं लागतं खायचं असेल तर, पण शबिनाकडे मात्र घरपोच डिलीवरी!”- अमिरानी लगेच टोमणा मारला.
तिच्या या नाराजीच्या सुरामुळे सलीमनी तिला आणखी चिडवल,“आहेच मग आमचं प्रेम तेवढं जास्त!”-“दीदी, जाऊ दे न!. बाय द वे दीदी, तुझा ड्रेस छान दिसतोय. एवढा छान लखनवी कुठे मिळाला?”-“काय माहीत. तुझ्या जिजाजीनी आणला आहे.”-“अरे वा. बघ आनंद, नाहीतर तू.” -“तसंच काही कारण असेल तर देईल की तो पण, काय?” करीम माझ्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाला. “तसंच म्हणजे,.... म्हणजे, दीदी तू पुनः??” मी शबिनाकडे पहिलं तर तिच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हत. तिच्यात आणि अम्मी मध्ये काहीतरी नेत्रपल्लवी झाली आणि अम्मीचा सुस्कारा सगळ्यांना ऐकू आला. “अमूदीदी, खरंच? पण तुला पहिल्या वेळेला त्रास झाला होता न खूप?”-“हा,तो इस बार भी होगा ऐसा कूछ नही.”-“पण सारा-रफिक किती छोटे आहेत अजून!” शबिनाला अजून खरं वाटत नव्हतं. ही जुळी भावंड शबिनाची लाडकी, भेटले की नेहमी चिकटून असतात दोघेही तिला. नवीन बाळामुळे यांच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार?- तिच्या मनातला प्रश्न ओळखून अमिरा पटकन म्हणाली,“ इनको देखनेके लिए और भी लोंग तो है ना घरमे! तुम्हारे जैसा थोडा है, सिर्फ मिया-बिबी? वैसे, तुम्हारा कब का प्लान है?”-“ अजून नाही ठरवल काही”, शबिना पुटपुटली. “अच्छा है, वैसे भी तुम लोगो के लाइफ स्टाइल मे कैसे अॅडजस्ट होगा ये सब! आनंदसे शादी करके तुम एकदम फॉरवर्ड जो हो गई हो! ना बच्चे ना किसिकी सुनना, ना नमाज ना हिजाब!”-“दीदी, कुठली गोष्ट कुठे नेऊन ठेवतेस! तुझ्यात आणि आनंदच्या नातेवाईकांत फार काही फरक नाहीये. आणि नाही मी काही करत तर त्याच्याशी तुला काय करायचंय ? हा माझा स्वतःचा आणि फारफार तर आनंदचा प्रश्न आहे. मी हिजाब घालीन नाहीतर नाही घालणार. यात आमच्या लग्नाचा काय संबंध?”- “लोकं आम्हाला बोलतात, शबिना. इम्रानशी लग्न केलं असतस तर..” करीमच वाक्य अर्धवट तोडत मी जोरात म्हणलं, “झाली असती तीपण आत्तापर्यंत दोन चार मुलांची आई, काय?”-“ ए,..बस बस. अमू, बेटा सबका अपना अपना तरिका होता है जीनेका.” अब्बा माझं वाक्य तोडत एकदम म्हणाले. “तुलासुद्धा म्हणलं होतं एम.एस.सी. कर म्हणून. पण तुला लग्न करून संसारात पडायच होतं. त्यावर आम्ही काहीतरी म्हणलं का? तो क्यो उसे बार बार टोकती हो? कमीत कमी दोघांवर तरी थांबायच! आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती.” अम्मीच्या या वाक्यावर एकदम अमिरा गोरिमोरी झाली. “अम्मी, तूम भी..”असं काहीसं पुटपुटत ती मागे वळली. सलीम एकदम शहाण्यासारखा पुढे झाला आणि बिरयानीच्या पातेल्याच झाकण उघडायला लागला. अब्बू त्याच्या हातावर चापटी देत म्हणाले, “चला आता बसूया जेवायलाच. तो रायत्याचा बोल घे बरं अम्मीकडून. वाढ सगळ्यांना”- मग ते जेवण तसच पार पडलं.
घरी परतताना साहजिकच शबिनचा मूड फारसा छान नव्हता. तिला चुचकारत मी म्हणलं, “एव्हढं मनावर घेऊ नकोस सगळ्यांचं वागणं-बोलणं. जगावेगळ काही करायला गेलं की सगळेच अंगावर येतात. त्यांचा धर्मच आहे तो.”-“आणि आपला धर्म काय? नुसतं ऐकून घेणे? वाद न घालणे? की त्यांच्या भाषेत ‘असले उद्योग’ करायला घाबरणे? वैताग आला आज मला अगदी.”–“मला पण.” गाडी चालवताना तिच्याकडे बघत मी म्हणलं. “आपल्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण इथपर्यंत आलो हे खूप आहे. कितीजणांचे डिवोर्स झालेले माहिती आहेत.”-“असंच काही नाही अगदी. डिवोर्सचा इंटर फेथ लग्नाशी फारसा संबंध नाहीये. विक्रम-मधुरा, राहुल-सई च लग्न का तुटल? हे तर पक्के ब्राह्मण न? मग?”-“हम्म! ते ही खरंच आहे म्हणा!”-“हे बघ, आपलं एकमेकांच एकमेकांसाठी असणं हे जास्त महत्वाचं वाटत आलंय मला. पैसा, घर, मुलं-बाळं वगैरे गोष्टी गौण वाटतात मला नेहमीच.”-“हो, पण तुमचा संसार फक्त प्रेमावर नाही न चालत! रोजची लढाई रोजी-रोटी साठी असेल तर प्रेम किती पुरणार सांग?”-“मग या चौघांना काय कमी होतं म्हणून त्यांचा डिवोर्स झाला? सांग की..” तिच्या या वाक्यावर निरुत्तर होत मी म्हणल, “हा सनातन वाद संपेल की नाही माहीत नाही, पण आपण दोघं आहोत एकमेकांसाठी हे मात्र सौ टका सही बोले तुम!” माझ्याकडे बघत शबिना हसली. तिचं हसू मनात घोळवत मी गाडी चालवू लागलो.
-----------------------------x------------------x-------------------x-------------------x----------------------------
प्रतिक्रिया
14 May 2022 - 4:06 pm | कर्नलतपस्वी
लेखन छान आहे.
जवळपास चे नाईलाजास्तव जमवून घेतात पण मनाला पटत नाही. कट्टर नाही पण समाजाभिमुख आहे. लग्न फक्त दोघांत नसते तेव्हा बाकी गोष्टींचा विचार करणे जरूर आहे.आशा कुटुंबातील लोकांची काय फरपट होते ते त्यानांच माहीत.
वादग्रस्त विषय.
18 May 2022 - 11:58 am | चष्मेबद्दूर
प्रतिसादाबद्दल आभार. आणि ज्यांनी कथा वाचली त्यांचे पण अनेक आभार.
विषय वादग्रस्त आहेच. पण तो टाळता न येण्यासारखा पण आहे. आपण अशा लग्नाकडे कसे बघतो किंवा बघायला पाहिजे हा खरा चर्चेचा विषय. पण ते कोणी करत नाही. चर्चा न घडता त्यातून भांडणंच होतात म्हणूनही असेल.
असो.
18 May 2022 - 11:58 am | चष्मेबद्दूर
प्रतिसादाबद्दल आभार. आणि ज्यांनी कथा वाचली त्यांचे पण अनेक आभार.
विषय वादग्रस्त आहेच. पण तो टाळता न येण्यासारखा पण आहे. आपण अशा लग्नाकडे कसे बघतो किंवा बघायला पाहिजे हा खरा चर्चेचा विषय. पण ते कोणी करत नाही. चर्चा न घडता त्यातून भांडणंच होतात म्हणूनही असेल.
असो.
18 May 2022 - 12:49 pm | तर्कवादी
लग्न वगैरे नंतरची गोष्ट पण आधी भिन्न धर्माच्या , समाजाच्या, जातीच्या लोकांनी आपापसात मिसळलं पाहिजे नाहीतर भीड चेपणार नाही, ऐकीव गोष्टीवरुन आलेलं अर्धवट ज्ञान (खरंतर अज्ञान) दूर होणार नाही, "ते" आणि "आपण" हे अंतर कमी होणार नाही... एकदा हे अंतर कमी होवू लागले की आंतरधर्मीय वा आंतरजातीय लग्न ही तितकीशी मोठी बाब राहणार नाही.
18 May 2022 - 1:07 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलंय.
वातावरण निर्मिती सुंदर जमलीय !
यातच सगळं आलं ! हाच या नव्या युगातील रिलेशनशीपचा पाया आहे.
18 May 2022 - 1:38 pm | श्वेता२४
असं आंतरधर्मिय लग्न झालेलं कुणी संपर्कातील नसल्याने याबाबत फारसा अनुभव नाही. पण जोडप्यासाठी हे निभावणं इतकं सोपं नसेल.
19 May 2022 - 9:05 am | Jayant Naik
उत्तम वातावरण निर्मिती. दोन कुटुंबातील संघर्ष म्हणजेच दोन धर्मातील चांगला रंगवला आहे.
19 May 2022 - 2:06 pm | चष्मेबद्दूर
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. माझ्या जवळच्या नातेवाईकांनी असं लग्न केलं आहे. त्यामुळे मला खूपच जवळून या भावनेचा ( ते आणि आपण) अनुभव आहे. माझ्या मनात पण पहिल्यांदा असेच विचार आले, पण मग नंतर भीड chepalyavar आणि थोडे काही अनुभव आल्यावर माझे मत पूर्ण बदलले. आणि हो चौथा कोनाडा नी लिहिलंय तसं जमाना बदल रहा है, नवीन पिढी वेगळा विचार करते.
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला हायसे वाटले. मी खूप उलट सुलट / चिरफाड करणाऱ्या वाक्यांची अपेक्षा केली होती. पण अजूनही जगात सहिष्णुता आणि समोरच्याचे ऐकून घ्यायची वृत्ती आहे हे समजले.
सगळ्यांना धन्यवाद. !