सिलींडर वाला

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
3 May 2022 - 7:56 am

सिलींडरवाला
(सिलिंडर या कथेचा सिक्वेल)
'वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे ..
त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे...'
    गावातल्या त्या रस्त्यावरून जातायेता या गाण्याच्या
ओळी अचानक मनात तरंगून जायच्या अन मोहरून जायला की काय म्हणतात तसं व्हायचं!
'भावनाओं को समझनेके' लिए एवढं पुरे असावे.त्या काळी म्हणजे सत्तरऐंशीच्य दशकात काय आणि आता काय ,प्रेम आणि जुनी गाणी यांचे नाते अतुट राहिले आहे.'प्रेमळांच्या' प्रेमग्रंथातील कुठल्याही प्रसंगी अनुरूप अशा गाण्याची वाणवा होणार नाही,याची मोठी काळजी भारतीय सिनेसृष्टीने घेतली आहे.
आता गाण्यांतीलल तपशील अणि वस्तुस्थितीत बारीक सारीक फरक असायचे ते सोडा.तसेच इथेही होते . आंब्याऐवजी लिंबाचे झाड अन झोपडी ऐवजी एकमजली बैठे घर होते.घर किंवा झोपडे जे काही होते ते मात्र 'माझिया' प्रियेचे होते.आणि ती माजी नव्हती.
तरुणांच्या ह्रदयातील 'प्रियापद'अढळ,स्थीर कधीच नसते.ते स्थान भुषविणारी 'ती'कालमानानुसार बदलत असते.हा बदल किती काळात वा वेळात व्हावा याचे काही गणित नसते हे वेगळे सांगायला नको.या वेळी,त्या वर्षी तिथे राहायला आलेली एक अष्टादशवर्षीय कॉलेज कन्या ह्रदयसिंहासनाधिष्ठीत होती.ती दिसली की ह्रदयाची धडधड वाढायची.अन अनेक फिल्मी गाणी कानात,आपोआप ऐकू यायची.ते घर असलेल्या  रस्त्यावर,वाकडी वाट न करता,सहज 'चक्कर' मारणे सहज शक्य होते.कारण,भाजीमंडई,बाजार,थिएटर,
मंदिर,न्यायमंदिर,बसस्टॅड'अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी त्याच रस्त्यावरून जावे लागे.'त्या तिथे,
पलीकडे ',असलेल्या त्या घरावरून जाता येता वळणावरचे ते लिंबाचे,'झाड एक वाकडे',परिचयाचे झाले होते.'त्या'घरी जाण्याची संधी कधीतरी मिळेल, या आशेवर दिवसमागून दिवस जात होते
  नुकतीच जिल्ह्याचे ठिकाणी वकीली सुरू केली होती.
शनिवार,रविवारचे सुटीत सत्तर -पंचाहत्तर किलोमीटरवर असलेल्या गावी जात असे.तिथे राहात असलेल्या वडिलांकडूनपुढील आठवड्याची आर्थिक तरतूद,
करून घेणे हा भेटीचा मुख्य उद्देश असे.कांही खवचट मित्र,त्याला ,'पुंडलिकाची हप्ता वसुली',म्हणत.असेच
एके शनिवारी गावी जात होतो. ,
बसमधे एक कृष्णवर्णीय,बुशकोटपॅट,चष्मा घातलेला,
टक्कलवाला,जाडा,मध्यमवयीन,मध्यमवर्गीय,मध्यम उंचीचा इसम चढला.चेहरा ओळखीचा वाटला.स्मरण शक्तीला ताण दिला अन लक्षात आले.'त्या तिथे पलिकडे,
वगैरे'असलेल्या घरातून बाहेर पडताना,त्यांना पाहिलं होतं."त्या घराच्या दारात उभ्या राहिलेल्या चाळीशीतल्या,
शिडशिडीत,नाकीडोळी नीटस असलेल्या बाईने त्यांना
,''अहो तुमचं पाकीट राहिलंय,हे घ्या.संध्याकाळी येताना भाजी आणा.भाजी नीट बघून घ्या.अन भाव करून घ्या.भाजीवाले नेहमी फसवतात तुम्हाला.मापात मारतात.मागच्या वेळी कोथिंबीरीची जुडी म्हणून नुसत्या काड्या मारल्या गळ्यात" वगैरे,वगैरे,सुनावताना,ऐकले
होते.त्या घरात राहणारे जोडपे म्हणजे म्हणजे तिचे मातोश्री आणि,पिताश्री असणार एवढे कळायला फार हुषारीची गरज नव्हती.खुद्द तिचे वडीलच आपल्या बसमधे आपल्या बरोबर.त्यांनी आपल्याला त्यांच्या घरासमोर चकरा मारताना,टेहळणी करताना तर कधी पाहिले तर नसेल नं?काही संशय तर आला नसेल?तसे असेल तर खरं नाही.छातीत धडधड वाढली. नजरानजर झाली तरी त्यांच्या चेह-यावरचे भाव बदललेनाहीत.
म्हणजे वाटले तसे काही नसावे.जीव भांड्यातपडला.ते समोरचे सीटवर बसले. तिकीट पंचीग चिमटा वाजवत आलेल्या, कंडक्टर कडून सावरगाव फाट्याचे तिकीट घेतले.हा तर  माझ्याच गावाचा थांबा!' इकडे कुठे जात असावेत?' तिच्यासाठी स्थळाच्या शोधात तर नाही नं?.
बस सुरू होताच ते डुलक्या घेवू लागले.बस
सावरगाव फाट्यावर पोहचली तेव्हा संध्याकाळ होत आली होती.बसमधून माझ्या पाठोपाठ ते उतरले.
कंडक्टर ने डब्बल बेल दिली.बस निघून गेली.फाट्यावर दोघेच उरलो.गाव चार किलोमीटरअंतरावर.गावात जाणारी मुक्कामी बस  गेल्याचे फाट्यावरच्या टपरीवाल्याने सांगितले.ते काळजीत पडले असावेत.
' कुठे जायचंय ? इथलेच का?गावात जायला वाहन मिळेल का?वगैरे विचारणा मला केली.संध्याकाळी  मालवाहू टेम्पो जातो गावात,त्यातून जाता येईल असे सांगितले.मग  झाडाखाली  दोघेही टेम्पोची वाट पाहात थांबलो.त्यावेळी  झालेल्या बोलण्यातून,कळले की ,ते म्हणजे,गुंडोपंत,या वर्षी नांदेडहून कलेक्टर ऑफीसमधे सप्लाय खात्यात अव्वल कारकून म्हणून,बदलून आले होते.त्यांची मोठी बहीण आमच्या गावी दिलेली  होती.तीला भेटायला ते चालले होते.बहिण म्हणजे आमच्याच गल्लीतल्या नारायणराव म्हणजे नानुकाकाची मंडळी,म्हणजे नानूकाकू.ते दोघेही चिकट म्हणून प्रसिद्ध.
आमचे त्यांच्याकडे फारसे जाणेयेणे नसे.तरीही त्यांच्याशी  गुंडोपंताचे म्हणजेच 'तिचे' नाते निघाल्याने उगीच बरे वाटले.त्यांनी माझी विचारपूस केली. मी वकीली करतो,गावी आईवडील असतात,त्यांना भेटायला जात आहे,नारायणराव माझे काकाच आहेत, वगैरे माहिती मी सांगितली.मग त्यांनी ,'लग्न झाले आहे का?,घरी कोणकोण असते,शेती किती आहे,बागायती कि कोरडवाहू'काय पिके घेतात, वकीली कशी चालते  वगैरे विचारपूस केली.अशी चौकशी वर संशोधनासाठी केली जाते,असे ऐकून होतो.त्यामुळे त्या प्रश्न उपप्रश्नांची उत्तरे,देताना मनात गुदगुल्या होवू लागल्या.'शायद मेरी शादी का ख्याल दिल मे आयाहै,इसीलिये.' हे गाणे मनात रुंजी घालू लागले.
अर्ध्यातासानंतर एक मालवाहू टेम्पो आला .टेम्पोच्या मागचे बाजूस रचलेल्या सामाना वर बसून गावात पोहचलो. ते,नको म्हणत असतानाही त्यांची पिशवी घेऊन त्यांना नानुकाकाच्या घरापर्यंत सोबत केली.'ये कधी घरी 'म्हणाले.खूश झाले असावेत.मी तर नक्कीच झालो होतो.चला वडीलांची तर ओळख झाली.आता पुढचे पुढे.या योगायोगासाठी आजच मारुतरायासमोर नारळ फोडायचे,मनात कबुल केले.सोमवारी गावाहून परतताना  बसमधे ते भेटतील वाटत होते. पण ते बहुधा रवीवारीच परत गेले होते.
गुंडोपंतांनी दिलेल्या,' ये कधी घरी'चे,आमंत्रणावर धडक त्यांच्या घरी जावे,असा विचार नेहमी मनात येई.पण धाडस होत नव्हते.त्यांची ओळख झाल्याने,घरावरच्या चकरा,मात्र कमी कराव्या लागल्या.न जाणो,त्यांनी आपल्याला पाहिले अन काही संशय आला तर ,नसती भानगड व्हायची.हे एकापरीने नुकसानच म्हणायचे!
    दिवसामागून दिवस जात होते.एकदा गावी टेम्पोतून गॅस सिलिंडर घेऊन गेलो.तेव्हा नानुकाकाने,
मला घरी बोलावून,काकूच्या भावाचे घरी असलेली  गॅस शेगडी व सिलिंडर घेवून यायला सांगितले होते. (संदर्भासाठी वाचा :सिलिंडर )त्यांचे गॅस सिलिंडर आणि शेगडी, टेम्पोने गावी आणायचा नसता उद्योग अंगावर घेतल्याबद्दल घरी बोलणी खावी लागली.पण मी मात्र हवेत होतो.या निमित्ताने गुंडोपंताच्या,म्हणजे तिच्या घरी जायची चालून आलेली संधी दवडण्याचा कपाळ करंटेपणा करणार नव्हतो.
.  गावाहून परतल्याचे दिवशी कोर्टात लक्षच नव्हते.
तिच्या घरी गेल्यावर काय बोलायचे,कसे वागायचे,याची मनातल्यामनात तालीम सुरू होती.त्या दिवशी कोर्टातून लवकरच घरीआलो.आरशात वारंवार पाहात,ठेवणीतले चांगले कपडे घालून तयार झालो.
    वळणावरचे लिंबाचे झाड ओलांडून त्या घरासमोर पोहचलो ती वेळ साडेपाच पावणेसहाची  होती.दरवाजा उघडा होता.कडी वाजवली.'कोण आहे पाहा बरं' आतून कुणाला तरी सुचना केली गेली.तिच्या आईचा आवाज असावा.माझे लक्ष घरात.कोण येतंय ,धडधड वाढली.
आणि मोकळे केस कंगव्याने विंचरत ती बाहेर आली.
इच्छा नसताना बाहेर यावे लागले असे चेह-यावर त्रासिक भाव.त्याला अनुरूप,सुरात,"कोण पाहिजे?"
अशी विचारणा झाली.कल्पनेत होतं त्यापेक्षा वेगळेच काही दिसत,घडत होतं.गांगारून गेलो ,त्यामुळे,ते..सिलिंडर ',एवढेच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले. ते ऐकून,'बाबा सिलींडरवाला आलाय',असे म्हणत,कंगव्यात अडकलेला केसाचा गुंता बोटांनी काढून दारासमोरच्या कोप-यात टाकून,झर्रकन वळून ती आत दिशेनासी झाली.
' सिलींडरवाला?'म्हणजे तिने आपल्याला ओळखले नव्हते.आपल्याकडे कधी पाहिले नव्हते काय?अनेकदा नजरानजर होताच ,चेह-यावर ओळखीचे हास्य उमटते असे वारंवार वाटे,ती केवळ आपली कल्पनाच होती काय?आपण तिच्यासाठी अदखलपात्रच होतो तर!या विचारांनी जीव कसानुसा झाला .
   तेवढ्यात गुंडोपंत दरवाजात आले.त्यांनी मात्र पाहाताच ओळखले ."या वकील साहेब .आज वेळ मिळाला वाटतं !अरे सिलिंडर वाला काय?माणसं नीट ओळखत चला.वकील साहेब आहेत हे ताईच्या गावचे.''ते आत पाहात म्हणाले. स्वागताने भारावून आत गेलो. हॉलमधे टेबलवर रिकामा चहाचा कप आणि दिवाणावर स्थानिक पेपर पडलेला होता.ते नुकतेच ऑफीसातून परतले असावेत.'परीस्थितीचे बारीक निरीक्षण हे वकीलीतील यशाची पहिली पायरी आहे,'असा महत्वाचा सल्ला,वकीलीच्या पहिल्याच दिवशी,बाररूम मधे दोनतीन जेष्ठवकीलांनी दिला होता.''यातल्या कुणाकडेही अशील फिरकत नाही. कोर्टात येतात,फक्त बाररूममधे गप्पा मारायला अन झोपा काढायला,'' समवयस्क वकील मित्राने खवचट टिपणी केली.त्याकडे  दुर्लक्ष करत त्यांचा सल्ला मनावर घेतला व निरिक्षण शक्ती वाढवण्यासाठी,डिटेक्टिव्ह कादंब-या वाचायला मी सुरुवात केली होती.त्या वाचनातून  लागलेली निरीक्षणाची सवय इथे कामी आली होती.
हॉलमधे दिवाण व समोर दोन लाकडी खुर्च्या होत्या.मी एका खुर्चीवर बसलो.गुंडोपंतांनी दिवाणावर बसता बसता,आत पाहात ,'सोनू पाणी घेवून ये ',आज्ञा दिली.'सोनू नाव आहे वाटतं!किती गोड नाव आहे,ती पाणी घेवून  येणार .नशीब जोरावर आहे आपलं.-मनातल्या मनात मी.
'कसं काय येणं केलं आज?', त्यांच्या प्रश्नाने भानावर आलो.नानूकाकाचा गॅस सिलिंडर व शेगडी,मी गावी घेवून जाईन असे सांगितल्यावर ,त्यांचा चेहरा खुलला.'बरं झालं,किती दिवसापासून ते  पडलंय इथे,'कोपर्‍यातले सिलिंडर व शेगडी कडे बोट दाखवून ते म्हणाले.मग गॅस मिळवणं सोपं,पण परगावी नेणं किती अवघड आहे वगैरे चर्चा झाली.'तुम्ही काळजी करू नका,टेम्पोवाला माहितीचा आहे,येत्या शनीवारी घेवून जाईन', असे सांगून त्यांना आश्वस्त केले.वरती,इंप्रेशन मारण्यासाठी,गॅस एजंसीवाल्याची पण मैत्री आहे असे सांगून टाकले.आमचे बोलणे चालू असताना,बारा तेरा वर्षाचे ,पाहाताच आगावू वाटावा असा एक दांडगट मुलगा,पाण्याचा ग्लास घेवून आला .'घ्या ' माझ्याकडे रोखून पाहात म्हणाला.घुश्यात होती स्वारी.हा सोनू होता तर! एक दोन वेळेस तिच्यासोबत त्याला पाहिले होते. धाकटा भाऊ असावा.तिच्यावर माझी नजर आहे,याचा सुगावा त्याला लागला होता की काय?आपल्या बहिणीवर तमाम तरुणांची नजर आहे व तीच्या  रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे अशी समजूत असणारे,वाह्यात लहान भाऊ,बहुतेक सुंदर तरुणींना,
परमेश्वराने बहाल केलेले असतात.
दहावीत असताना माझा एका मित्र वर्गातल्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात होता.हे बहुधा तिच्या छोट्या भावाला कळले होते.एकदा होमवर्कची वही देण्याचे निमित्त काढून तो तिच्या घरी गेला.तिच्याशी बोलत असताना  त्या वात्रट कारट्याने ,मित्राच्या शर्टात खाजकुयरी टाकली होती.पुढचे दोन दिवस मित्र स्वतःच्या 'होम' मधेअंग खाजवण्याचे 'वर्क' करत बसला होता.
आपल्या बाबतीत तर तसे काही होणार नाही नं? मनात शंकेची पाल चुकचुकली.त्याची नजर टाळत मी पाण्याचा ग्लास घेवून तोंडाला लावला.तो रीकामा होईपर्यंत हा समोरच उभा.'द्या',म्हणत रीकामा ग्लास  जवळ जवळ हिसकावून घेतला.गुंडोपंतांचे डोके पेपरात होते,ते बाहेर काढून ,'अरे आईला चहा टाक म्हणावं 'असे चिरंजीवाला सांगितले.'हूं$$$ 'म्हणत त्याने एक्झीट घेतली.
  काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.पूर्वी ते तहसीलदाराचे शिरस्तेदार होते,त्यामुळे,वकील,
वकीली व्यवसाय या विषयी त्यांना बरीच माहिती होती.
वकीलांचे,विशेषत;माझ्यासारख्या ज्युनियर वकीलांचे काही खरे नाही,एखादी नोकरी शोधावी नाहीतर धंदा सुरू करावा,हे त्यांचे मत होते.यावर ,"मामा( हे जवळीक साधण्यासाठी)आता परिस्थिती बदलली आहे,आता
ब-यापैकी पैसे मिळतात अन एकदा प्रॅक्टिस मधे जम बसला की मग खो-याने पैसे''असे म्हणत मी ,त्यांचे मत परिवर्तन करायचा प्रयत्न केला.त्यांना ते पटले नसावे,
पण काही बोलले नाहीत.एवढ्यात चहा घेवून तिची आई आली. ते मामा म्हणजे या मामीच की.मामी मामापेक्षा तरुण दिसत होत्या.राहाणीपण नीटनेटकी.पोरगी आईवर गेली होती.मामांनी माझी ओळख करून दिली,माझ्या भेटीचे प्रयोजन सांगितले.मामींनी पण माझी सविस्तर चौकशी केली.मनात आशेला पुन्हा पालवी फुटू लागली.
.बराच वेळ गेला.ती समोर येण्याचे काही चिन्हं दिसत नव्हते.शेवटी सिलिंडर व शेगडी नेण्यासाठी शनिवारी सकाळी येतो असे सांगून,'येतो मामा,बरंय मामी',म्हणत निघालो.वकीलीविषयी मामांचे मत,अन मामीने केलेली चौकशी यातून काय अर्थबोध घ्यावा कळत नव्हते.थोडी खुशी थोडा गम अशी अवस्था झाली होती.
     शनिवारी सकाळीच सायकल रिक्षाने तिकडे गेलो .  मामा वाट पाहातच होते.रीक्षावाल्याच्या मदतीने घरातली  सिलिंडर शेगडी घेतली,व निघालो.मामांनी',पैसे देवूका' विचारले. नको म्हणालो.नेहमीऑअरमाणे टक्केटोणपे खात टेम्पोतून गावी गेलो  आता त्याची सवय झाली होती .नानूकाकाच्या घरी एकदाचे सिलिंडर शेगडी पोहचवले.त्यांनी टेम्पोचे भाडे किती झाले विचारून नेमके पैसे दिले.रीक्षाभाड्याचा भुर्दंड मलाच पडला.यावेळेस नानूकाकूने,भावासाठी लाडू चिवडा दिला होता .तो पोहचवण्यासाठी ,'त्या तिकडे पलीकडे', असलेल्या घरी जाण्याची पुन्हा संधी मिळाली होती.  रिक्षाभाड्याच्या नुकसानीपेक्षा हा लाभ मोठा होता.यावेळेस गेलो तेव्हा ती समोरच होती.आढि विशेष म्हणजे,मला पाहून कुणी अनोळखी इसम आहे असे भावही चेह-यावर नव्हते .बरे वाटले.पिशवी तिच्याकडे देताना काही बोलायचे ठरवले.'मुझे कुछ कहना है',मनात गाण्याच्या ओळी घोळत होत्या.पण तो स्वयंघोषित रक्षक बाजूला होता.हातातली पिशवी पाहून,'आत्याने दिलीय नं,द्या',म्हणत पिशवी माझ्या हातून काढून घेतली.आतला डबा उघडून पाहिला. त्यातला लाडू तोंडात कोंबला.'तायडे हे घे म्हणत',पिशवी तिच्याकडे दिली.आणि मी तोंड उघडायच्या आधीच,लाडूने भरल्या तोंडाने, ''आईबाबा घरीनाहीत ''म्हणत,आता थांबू नका असा इशाराच दिला.पिशवी घेवून ती आत गेली.तो मात्र,'ठीक आहे ,निघा आता,'अशा आविर्भावात एकटक पाहात उभा.थांबण्यात अर्थ नव्हता.परत निघालो.
  पुढील काही महिन्यात,कुठल्याना कुठल्या कारणाने त्या घरी तीनचार वेळेस जाणे झाले.मामा अन मामी दोघेही चांगल्या गप्पा मारत.मी कोर्टातले खरे ,खोटे किश्शे सांगत असे.ते मामीला आवडत.आता 'रक्षक 'पण थोडा निवळला होता.तिच्याशी बोलायचा योग मात्र अजून आला नव्हता.या भेटींचे फलीत एवढेच की तीचे नाव मोनू असल्याचे कळले.आता रस्त्यात दिसली,अन कधी नजरानजर झाली तर डोळ्यात ओळख आणि,
कधी कधी हासू ही दिसे.''कभी तो मिलेगी बहारोंकी मंजील 'गाणे आठवायचे.
   एके दिवशी कोर्टात जाताना.ती अचानक समोरून आली.नजरेस नजर मिळताच,अस्फुट की काय म्हणतात तसे हासल्याचा,अन लाजल्याचा भास झाला.
विरघळूनच गेलो.'लाजून हासणे अन हासून ते पाहाणे',
गाणे गुणगुणतच कोर्टात गेलो.चित्त था-यावर नव्हते.
त्याच दुपारी मामा,मला शोधत कोर्टात आले.आश्चर्य वाटले. सकाळच्या भेटीतले,ते,लाजून हासणे अन पाहाणे,आणि लगेच मामांचे माझ्याकडे येणे,हा निव्वळ योगायोग होता की अजून काही?त्यांना रस्त्या पलीकडच्या हॉटेल मधे घेवून गेलो.चहाची ऑर्डर दिली.'किती वेळ शोधतोय तुला.आनंदाची बातमी द्यायचीय',मामांनी असे म्हणताच,ह्रदयाचे ठोके जोरात पडू लागले.काय बातमी असावी? मामांनी फार वेळ सस्पेन्स ठेवला नाही,"अरे मोनूचं लग्न ठरवतोय.मुलगा नात्यातलाच आहे.तिला पसंत आहे,"माझ्याकडे पाहात हासून म्हणाले.हे ऐकताच आशेचा फुगा फुलू लागला.
पुढचे शब्द ऐकायला जीव आतुर झाला ''ज्युनियर इंजिनिअर आहे,बि एंड सीमधे,औरगाबादला असतो.हीच्या वहीनीचा भाच्चा.फार चांगली माणसं आहेत.''हे ऐकून फुग्याला टाचणी लागल्यागत चेहरा झाला.त्यांचे माझ्याकडे लक्ष नव्हते,''परवाच बोलाचाली झाली.देणंघेणं काही नाही वगैरे वगैरे''ते उत्साहाने भराभर सांगत होते.हातात चहाचा कप तसाच धरून शुन्यात नजर लावून बसलो.''कुठे लक्ष आहे ,
कशाचा विचार चालू आहे? ''या त्यांच्या प्रश्नाने भानावर आलो.'तुला यायचंय बरं साखरपुड्याला,या रवीवारी आहे.तू घरचाच आहेस,बरेच पाहुणे येताहेत.तुझी मदत लागेल''',मामांचे सुरूच होते.माझ्यावर काय परिस्थिती ओढवलीय हे त्यांच्या गावी नव्हते.''बरं मी निघतो.एक छोटं काम आहे.गॅस एजन्सीवाला तुझा मित्र आहे नं?घ सिलिंडर संपलंय.उद्या तेवढं घरी पोहचवशील का?मीच गेलो असतो,पण इतर बरीच कामं आहेत,'म्हणत,माझी संमती गृहीत धरून,सिलिंडरचे पैसे हातात ठेवून,मामा निघून गेले.ते गेल्यावर हातातल्या पैशाकडे पाहात बसलो बराच वेळ.हॉटेलमधल्या रेडिओवर,एकाहून एक दर्दभरी गाणी सुरू होती.मनात विचारचक्र सुरू झाले.या विषयी आधीच का बोललो नाहीत कुणाशी,का पुढाकार घेतला नाही?पण आता काय उपयोग?आपणच कारणीभूत आहोत,यासाठी.स्वतःला दोष देत होतो.
नुकत्याच पाहिलेल्या सिनेमात, प्रेमभंग झालेल्या हीरोच्या चेह-यावर जसे भाव होते तसेच भाव माझ्याही चेह-यावर उमटले असावेत.या मनस्थितीत ,त्या हिरोसारखी सिगारेट ओठी धरून ,धुराची वर्तुळे सोडणे योग्य झाले असते.पण मला सिगारेट ओढताना ठसका लागे.आणि तंबाखूची कीक सिगारेट पेक्षा चांगली वाटे.
त्यामुळे सिच्युएशनला योग्य नसली तरी,चुना मिश्रीत तंबाखूची गोळी दाढेत धरून बसलो.त्या रसनिष्पत्तीने लागलेल्या तंद्रीत बराच वेळ गेला.नुसत्या चहावर मी एवढा वेळ टेबल अडवून ठेवलेले गल्ल्यावरच्या शेठला पसंत नसावे. त्यानेजोराजोरात बेल वाजवली.त्यावरून हींट घेत वेटरने,'और कुछ होना क्या साब',म्हटल्यावर भानावर आलो.गल्ल्यावर बील देवून निघालो.तेव्हा रेडीओवर 'हिम्मत हारना नही'टाईपचा जीवनसंदेश देणारे एक गाणे लागले होते.ऐकून हुरुप आला.तरीही
अधुन मधून 'तू औरोंकी क्यू हो गयी', कानात वाजत राही.गळ्याला दोर बांधलेले जनावर खुटांभोवती फिरत राहाते तसे त्याच विचाराभोवती मन फिरत होते.आता पर्यंत देवापूढे किती नारळ वाढवले होते,हिशोब नव्हता.
तरीही असे का झाले?याचे उत्तर 'तोच 'देईल,काही उपाय सुचवेल,अशा विचारात संध्याकाळी,नारळ घेवून देवळात गेलो.आयुष्यातल्या अशा कठीण प्रसंगी,
'भगवान को जवाब मांगणे की' पध्दत असते हे ,असंख्य सिनेमातून पाहीले होते.
देवळाचे प्रवेशद्वारातून आत शिरताना ती दिसली.पण आता लक्ष मात्र तिच्याऐवजी तिच्या सोबत,तिच्याच वयाच्या,रंगीत फुलांचे डिझाईनची साडी नेसलेल्या अनोळखी तरुणीकडे गेले.त्या गहूवर्णीय अनामिकेचा गोल चेहरा,गालावरची खळी ,दोन्ही गालावर रुळणा-या  केसांच्या बटा,पाठीवर सोडलेली जाड वेणी,ओठावरचे हास्य,खट्याळ डोळे,पाहून ह्रदयात लक्ककन काही हलल्यासारखे झाले.इतका वेळ मृगजळामागे धावत होतो,पण आता शोध संपला.बस्स.'मिल गयी मंजील मुझे',कानात कुणी गाणं गुणगुणतंय असं वाटलं.
.''एखादा दरवाजा बंद होतो,तेव्हा दुसरीकडे छोटी खिडकी उघडलेली असते "हे वाक्य,'यशाचे हजार मार्ग 'किवा 'तुम्हीच व्हा विजयीवीर,'असे काहीसे  शिर्षक असलेल्या पुस्तकात वाचलं होतं.त्याचा जणू प्रत्यय आला.आता देवाला काही विचारायचा,मागायचा प्रश्नच उरला नव्हता. नारळ वाढवला.प्रदक्षिणा घातली.पण ती पूर्ण  होईपर्यंत त्या दोघी दिसेनाशा झाल्या होत्या.
कोण होती ती?सारखा एकच प्रश्न मनात येत होता.
आताही दोर बांधलेल्या गुरासारखे मन खुंटा भोवती फिरत होते.खुंटा वेगळा होता एवढेच.
       दुसरे दिवशी,गॅस एजंसीत जावून मामांसाठी सिलिंडर घेतले .रीक्षात घालून 'त्या तिथे पलीकडे'
असलेल्या घरी गेलो.सिलिंडर ठेवून रीक्षावाला निघून गेला.दारावर खटखट केली. ''कोण आलयं पाहा बरं!",
मामींनी कुणाला तरी सागितले.आणि कालच,
ह्रदयसिंहासनाधिष्ठीत झालेली ती अनामिका,वेणीचा शेपटा हाती धरून समोर आली. तीला पाहून गडबडून गेलो .'कोण हवंय?'या तिच्या प्रश्नावर,'मी सिलिंडर 'एवढेच  शब्द तोंडातून बाहेर पडले.'मावशी सिलिंडरवाला आलाय,'म्हणत,माझी दखलही न घेता ,ती झर्रकन वळून घरात गेली.आणि मी सिलींडर धरून दरवाजात उभा होतो !
                नीलकंठ देशमुख.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

भागो's picture

3 May 2022 - 8:08 am | भागो

छान लिहिलंय. मजा आली वाचताना

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 11:09 am | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल

तुषार काळभोर's picture

3 May 2022 - 8:11 am | तुषार काळभोर

शिलींडरवाले, हे लै भारी लिहिलंय!!
पहिल्या शिलींडरपेक्षा हा शिक्वेल अजून भारी आहे बरं का!!
आता याचा शीक्वेल (शिलिंडरवाली) अनामिकेविषयी असेल का?? :D :D

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 11:11 am | नीलकंठ देशमुख

छान वाटले.प्रतिसाद वाचून.याचे पण शिक्वेलची आयडीया वर विचार करता येईल. थांबा आणि वाट पाहा. हे माझ्यासाठी

विजुभाऊ's picture

3 May 2022 - 9:36 am | विजुभाऊ

वा लैच झकास

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 11:12 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे प्रतिसादाबद्दल

Bhakti's picture

3 May 2022 - 9:57 am | Bhakti

भारीच!
लेखात प्रसंगानुसार गाण्याच्या ओळी मस्त आहे.
रच्याकने सध्याच्या 'तु तेव्हा तशी' मालिकेतील पट्याच्या मनातही अशीच गाणी वाजतात ते आठवलं :)

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 11:14 am | नीलकंठ देशमुख

छान वाटले.धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल.
मी दूरचित्रवाणीवरील मालिका पासून खूप दूर असतो. त्यामुळे त्या विषयी माहित नाही. योगायोग

चौथा कोनाडा's picture

3 May 2022 - 11:42 am | चौथा कोनाडा

व्वा, भारी लिहिलंय!

लेखनशैली ओघवती आहे !
रोमँटिक पंचेस मस्तच !
आमच्याही "होतकरू" पणाचे दिवस आठवले.

सिलेंडरवाला -३ च्या प्रतिक्षेत!

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 4:09 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल आभार. छान वाटले. मला पण सिक्वेलचीत्सुकता आहे. वाट पाहातो केव्हा सुचेल याची..

अनिंद्य's picture

3 May 2022 - 4:46 pm | अनिंद्य

झकास.

दार बंद झाले रे की खिडकी उघडली.. लकी यू ;-)

नीलकंठ देशमुख's picture

3 May 2022 - 5:31 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. खिडकीतून काय मिळेल याची मलाही उत्सुकता आहे.

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 9:04 pm | मुक्त विहारि

आवडला

700 खिडक्या आणि 800 दारं, हे माझ्या एका मित्राचे आवडते गाणे होते

नाथा कामत गृप, मधला तो शिरोमणी होता

नीलकंठ देशमुख's picture

4 May 2022 - 10:40 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासुन

नीलकंठ देशमुख's picture

4 May 2022 - 10:40 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार

कर्नलतपस्वी's picture

4 May 2022 - 6:33 am | कर्नलतपस्वी

थोडी निराशा झाली,वकील साहेबांचे परीश्रम वाया गेले .
आवडली.

नीलकंठ देशमुख's picture

4 May 2022 - 10:41 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. आशा निराशेचा खेळ हेच जीवन आहे. वो सुबह कभीतो आयेगि

सिरुसेरि's picture

7 May 2022 - 11:25 am | सिरुसेरि

छान आठवणी .

नीलकंठ देशमुख's picture

7 May 2022 - 9:40 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. काल्पनिक आहे हो.
खरे वाटले हे माझे यश की अपयश?

नीलकंठ देशमुख's picture

7 May 2022 - 9:40 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. काल्पनिक आहे हो.
खरे वाटले हे माझे यश की अपयश?

सिरुसेरि's picture

7 May 2022 - 11:26 am | सिरुसेरि

छान आठवणी .

सिरुसेरि's picture

7 May 2022 - 11:26 am | सिरुसेरि

छान आठवणी .