नाम बडे और...
'वकीलीचा धंदा आता पयल्या सारखा राह्यला नाही. काही राम उरला नाही',कोर्टाच्या आवारातल्या कॅटिन समोरच्या बाकावर बसून अर्धाकटींग चहा बशीतून पिताना त्र्यंबकराव मान हलवत म्हणाले.समोर बसलेल्या वामनचा चेहरा पडला.एकोणीसशे ऐशी साली मराठवाडय़ातल्या एका तालुक्याचे गावी वकीली सुरू करून त्याला तीन वर्षे झाली होती.अजूनही गोडबोले वकीलांकडे ज्युनियरशीप चालू होती.म्हणजे,कोर्टात मुदतवाढीचे अर्ज लिहिणे आणि कोर्टात देणे,प्रकरणांच्या तारखा घेणे,सिनीयर
उपलब्ध नसतील तेव्हा कोर्टासमोर उभे राहून,'सिनीअरचे दुस-या कोर्टात काम चालू आहे',असे सांगणे;आणि जज्जसाहेबांचे,'एवढेच करा वकीलीत',अशा अर्थाचे कटाक्ष झेलणे,त्याकडे दुर्लक्ष करणे,अशी आणि एवढी कामे तो इमानेइतबारे करत होता.उत्पन्नाचा रकाना मात्र तसा कोराच होता.चहापाणी,कोर्टात येण्याजाण्यासाठी रिक्षा,आणि इतर खर्च सहसा खिशातून आणि वडिलांकडून नाखुषीनेच मिळणा-या अल्पमदतीतून करावा लागे.गोडबोले खूशीत असले की, शे दोनशे रुपये हातावर टेकवत.त्या दिवशी पण पक्षकाराने दिलेले नोटाचे बंडल खिशात घालता,घालता,वीसच्या पाच नोटा वामनच्या हाती दिल्या होत्या.त्यामुळे त्र्यंबकराव सोबत तो कॅटीनमधे चहा घेत होता. त्र्यंबकराव म्हणजे वकीलांचे फ्री लान्स कारकून.जेमतेम पाचफुट उंची,निमगोरा रंग,किडकिडीत शरीरयष्टी असलेले त्र्यंबकराव सदरा पायजमा टोपी अशा वेषात असत.टोपी अन पायजमा पांढरा,पण सद-याचा रंग मात्र फिकट निळा,पिवळसर असे.सद-याचे समोरच्या खिशात हमखास छोटी वही अन पेन असे.कपाळावरील गंध,गळ्यात तुळशीची माळेमुळे अस्सल वारकरी वाटणा-या त्र्यंबकरावाच्याअंगी नाना कळा होत्या .दहावीचा गड सर करायचे पाच सहा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर,शिक्षणात काही राम राहिला नाही,असे त्यांना उमगले व तो नाद सोडून दिला.काही वर्षानी,चांगल्या अक्षराच्या भांडवलावर,ते राहात असलेल्या गल्लीत ऑफीस असलेल्या गोडबोले वकीलाकडे कारकून म्हणून काम करू लागले.गोडबोले सांगतील तीकामे करणे,सांगतील तसे वेगवेगळे अर्ज लिहून देणे,चालणारे प्रकरणांच्या फाईली काढून ठेवणे,कोर्टात घेवून जाणे ;अशी अनेक कामे ते करत. मागील काही वर्षांपासून केवळ गोडबोल्यांकडे अशी कामे करत आपली जिंदगी वाया घालवण्यात शहाणपण नाही असे ज्ञान त्यांना झाले.मग त्यांनी नवनवे पक्षकार/अशील गाठून वकीलापर्यंत पोहचवण्याचा जोडधंदा सुरू केला.तो जास्त फायदेशीर होता .त्यातून,अशीलाकडून मिळणारे फीसचे प्रमाणात काही मोबदला संबंधित वकीलाकडून त्यांना मिळे.त्यामुळे हे काम त्यांच्या जास्त आवडीचे होते.काही निवडक वकीलांशी ही सेवा पुरविण्यासाठी त्यांचे'टायअप' की काय म्हणतात ते होते.त्यामुळे ते हल्ली वकीलांचे फ्रीलान्स कारकून या कॅटॅगिरीत मोडत होते.अंदाजे पंधरा सोळा वर्षे कोर्टात घालवल्यामुळे,वकिली व्यवसायातल्या सगळ्या खाचाखोचा आपल्याला माहित आहेत असे त्यांचे मत होते व ते वेळोवेळी ज्युनीअर वकीलांसमोर ठामपणे मांडत.एवढा अनुभव,अंगचे थोडे चातुर्य,आणि चुरूचुरू चालणारी जीभ या भांडवलावर,कोर्ट,कायदे,वकील, वकीली
पेशा,खटले,ऊलटतपासणी,एवढेच नाहीतर जजेस,त्यांचे खरे खोटे किस्से,अशा अनेकविध विषयावर चौफेर भाष्य करण्यात त्यांचा हात किंवा तोंड धरू शकेल
असा दुसरा कोणी जिल्ह्य़ात तरी नव्हता यावर तमाम वकीलांचे एकमत होते.रीकाम्या वेळात अर्धा कप चहाच्या मोबदल्यात,गप्पा,किस्से,विनोद,नकला अशी
विविधांगी करमणूक करणारे म्हणून, ज्युनियर वकीलांमधे त्यांना भलताच भाव होता.असा रिकामा वेळ त्यांना आणि ज्युनियर वकीलांना भरपूर असे.'वकीलीची डिग्री नाही म्हणून इथे घाशीत बसलोय,
नाहीतर मी मी म्हणणा-या वकीलांना कोर्टात ..'असे म्हणत जळत्या बिडीचे संपत आलेले थोटूक बाकावर चिरडून ,काय केले असते ते त्यानी वामनला साभिनय दाखवले होते.मागे एकदा फौजदारी खटल्यात डिफेन्स काय घ्यावा हे गोडबोले वकीलास, आपण सुचवले होते,असे सांगताना ,'हे कुठे बोलू मात्र नका' असे ही निक्षून बजावले होते .
वकीली व्यवसायातले अनेक खाचखळगे,आणि यशस्वी होण्यासाठीच्या अनेक युक्त्या,क्लृप्त्या;पक्षकार कसे मिळवावेत,इतरांचे कसे पळवावेत आणि आपल्याकडे कसे वळवावेत,मुख्य म्हणजे त्यांच्याकडून फीस कशी काढावी,या विषयी विविध युक्त्या ते सांगत.पण ,'खोटे कधी बोलू नये,चोरी कधी करू नये,'कष्टाची भाकर गोड ,सब्र का फल मीठा होता है ,'अशा संस्कारात वाढलेल्या वामनला,अनेकदा प्रयत्न करुनही ती शिकवण अमलात आणणे,अवघड होते.त्यांची या विषयावरची अनेक प्रवचने वारंवार ऐकूनही त्याचीअवस्था 'पालथ्या घड्यावर पाणी' अशी होती,असे त्र्यंबकरावचे मत होते.कोर्ट सुरू व्हायच्या आधी,इतर वकीलांच्या अगोदर कोर्टात येत जावं,म्हणजे एखादं नवखं अशील गठू शकतं, हा त्र्यंबकरावचा सल्ला ध्यानात घेवून,त्या दिवशी तो जरा लवकरच कोर्टात आला होता.आवारातले कॅटिन,पान टपरी उघडे होते.कॅटिन समोरच्या एका बाकावर बसून तो सगळीकडे नजर ठेवत होता .अधूनमधून एखाद दुसरी सायकल रिक्षा थांबत होती.विविध नमुन्याचे,नवखे,बावरलेले,बुजलेले ,चाणाक्ष ,धुर्त वाटणारे,स्वतःला चाणाक्ष समजणारे,असे विविध प्रकारचे लोक,बहुतांशी खेडवळ, येत होते.नेहमी कोर्टाच्या वा-या करणारे लोक कुठे जायचे ,कुणाकडे जायचे,कुठे थांबायचे माहिती असल्याने सराईतपणे फिरत होते.''कुरकळण्या वकीलाकडं जा,वाटणीच्या दाव्याला त्योच चांगला ",अशा सल्ल्यासोबत कुलकर्णी वकीलाचे नावाची ,गावांतल्या कुण्या परशुरामाने दिलेली चिठ्ठी,घेवून आलेला एखादा हणमू किंवा गोविंदा ,वकीलाची चौकशी कुणाकडे करावी या विवंचनेत उभा होता.
रीक्षातून एकटे,वा जोडीने वकील उतरत होते.काही पायी येत
होते.आलेल्यांपैकी काही बाररुमकडे जात होते.
काही आवारातच थांबत होते.वकील,वकीलांचे कारकून,कारकून कम दलाल;आलेल्या पब्लिक मधे आपाआपले अशील शोधत होते.कुणी नव्या अशीलांचे शोधत फिरत होते.आपला वकील दिसला की अशीलाचे चेहरे उजळून जात होते.
अजून जज्ज साहेब कोर्टात आले नव्हते.कारकून कॅटिन मधे,चहापान आटोपून हळूहळू कोर्टात परतत होते.काही अजून पान टपरीवर होते.अशीला सोबत चर्चेत गढलेले एक वकील साहेब ,त्याला सोडून पानटपरीवर गेले.तिथे हातावर तंबाखू चोळत असलेल्या कारकूनाला बाजूला घेवून काही कानगोष्टी करु लागले.तो नाही नाही अशा अर्थाने मान हलवत होता.ते त्याला काहीतरी पटवून द्यायचा प्रयत्न करत होते.बहुतेक आज आपले प्रकरण लवकर कोर्टासमोर काढ किंवा काढूच नको असे सांगत असावेत.मग वकील साहेब त्याला टपरीच्या मागे घेवून गेले.काही क्षणात दोघेही परत आले.कारकूनाने बाजूला पिचकारी टाकली व तोंडातली तंबाखू बोटांनी बाहेर फेकत कोर्टाकडे निघून गेला.वकीलसाहेबाचे चेह-यावर समाधान दिसत होते.त्यांनी अशीलाला
हसत काही तरी सांगितले.तो खुष झाला.
आता गर्दी जमू लागली होती.पटवापटवी,पळवापळवी असे काही प्रकार करण्याचे धाडस नसलेला वामन साक्षीभावाने सर्वत्र पाहात होता.तेवढ्यात ;खेडवळ, अडाणी दिसणारी एक मध्यमवयीन बाई ,त्याच्या समोर आली.गव्हाळ वर्ण,कपाळावर भले मोठे कुंकु ,उजव्या हातावर काहीतरी गोंदलेले,दोन्ही हातात बांगड्यांसोबत पांढ-या धातूचे मोठे कडे,गळ्यात काळी पोत, रंगीत मण्यांच्या माळा,अंगावर ईरकलचे लुगडे अशा अवतारातील त्या बाईने,'यहां बडे वकील साब कौन है'?असा प्रश्न त्याला केला. बडे वकील?एका वर्षाने ज्युनियर असलेला,बडे आडनावाचा वकील वामनला माहीत होता.तो काही अंतरावर मित्रासोबत चकाट्या पिटत असलेला दिसला.'वो रहे बडे वकील,ऊधरजाव'.असे म्हणत,वामनने त्याच्याकडे हाताने निर्देश केला .आणि बडेला आवाज देवून,'ही बाई तुझ्याकडे आली आहे'असे सागितले.बाई तिकडे गेली.दुरून हा प्रकार पाहात असलेले त्र्यंबकराव लगबगीने त्याच्याकडे आले व काय झाले विचारू लागले.एका गरीब बिचा-या बाईला बडे वकीलाकडे,पाठवल्याची परोपकारी हकीकत वामनने त्यांना सांगितली.त्यांनी कपाळावर हात मारला .'वकीलसाहेब कसं व्हायचं तुमचं?कुठची गरीब बिचारी बाई?एक नंबर जहांबाज अन पैसेवाली दिसतेय.घरातला कुणी बाप्या अडकला असेल जेलमधे.त्याला सोडायला 'बडे,'म्हणजे मोठे नाव असलेले वकील पाहिजे असेल तीला. नवशिक्या बडेकडे कशाला जाईल कुणी?मीच बडा वकील म्हणून सांगायचं नं तुम्ही!हाती येत असलेली लक्ष्मी दवडली तुम्ही''.काही खरं नाही तुमचं, अशा अर्थाच्या नजरेने वामनकडे पाहात ते बोलले.वामनला आपलं काहीतरी चुकल्याची जाणीव झाली.आपण तिची केस घेतली असती तर काय करणार होतो? हा विचार मनात आला आणि तो गप्प बसला.
त्रयंबकराव घाईघाईत त्या बाईकडे गेले.ती बडे वकीलाशी पोहोचण्यापूर्वीच तीला गाठले.तिच्याशी बोलून तीला बडे वकीलाकडे कडे घेवून गेले.मग त्याला बाजूला घेवून काही बोलणं केलं.बडेचे त्या बाईशी बोलणे झाले.त्र्यंबकराव पण मधे मधे बोलत होते.काय बोलणं चाललंय हे ऐकू येत नव्हतं. वामनला त्यात स्वारस्य नव्हतं.तेवढ्यात गोडबोले कोर्टात आल्याचे दिसले आणि तो त्यांच्याकडे गेला.काही वेळानेत्र्यंबकराव आले.चालणारे प्रकरणांच्या फायली वामनच्या हातात देवून घाईघाईत निघून गेले .
दुपारच्या सुटीत,बडेच्या गळाला अचानक मोठा मासा लागला अशी ज्युनियर वकीलात चर्चा होती.ती ऐकून वामन मात्र मनातल्या मनात ओशाळत होता.बडे फार खुशीत होता.त्याने सगळ्या मित्रांना कॅटीनमधे चहा चिवडा, पेढे अशी पार्टी दिली.वामनलाही बोलावले होते.पण तो गेला नाही.दोनतीन दिवस तो विषय ज्युनियर वकीलांना चघळायला पुरला.नंतर सगळे विसरून गेले.वामन ही विसरला.
असेच दहा बारा दिवस गेले.दुपारची वेळ होती., कोर्टासमोरचे रस्त्यावर आरडाओरड ऐकू येवू लागला.गर्दी जमा झाली होती.काय झाले पाहायला,अनेकजण धावले.अशावेळी आधी धावणारे त्र्यंबकराव मात्र तिकडे न जाता घाईघाईत कोर्टातल्या कुठल्यातरी खोलीत गुडूप झाले.या गोष्टीचे आश्चर्य करत वामन ,काय भानगड झालीय हे पाहायला गेला.तिथले दृश्य पाहून तो टरकलाच!चारपाच बायकांनी बडे वकीलालाघेरले होते.त्या त्याला शिवीगाळ,धक्काबुक्की करत होत्या.ती अडाणी गावंढळ बाई सर्वात पुढे होती.बडेचा शर्ट चुरगाळलेला होता, बटणे तुटलेली होती.पैसे वापस करो' ×××××',असे काही शब्द त्यागोंधळात वामनच्या कानावर पडले.बडे काही बोलण्याचा ,त्या बायकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता.पण त्या ऐकायला तयार नव्हत्या.'हा प्रकार पाहून वामनच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागला.काय प्रकरण असावे याचा थोडाफार अंदाज येवू लागला.'वो दुसरा किधर है?इकडे तिकडे शोधक नजरेने पाहात ती बाई म्हणाली.' दुसरा', म्हणजे,आपल्या विषयीच तर बोलत नसावी?आपण तीला बडे कडे पाठवले होते,हे वाटून वामन घाबरला.त्याचे अंग थरथरू लागले.घशाला कोरड पडली.तो झर्रकन परत फिरला आणि कोर्ट हॉलमधे जावून बसला.मधल्या सुट्टीत पण बाहेर पडला नाही.थेट संध्याकाळी कोर्ट संपून,सगळीकडे सामसूम झाल्यावरच बाहेर आला .इकडे तिकडे न पाहाता हळूच घराच्या दिशेने निघाला.दुसरे दिवशी कोर्टात जाताना ती बाई समोर येवुन आडवते की काय भिती वाटत होती.ती भेटू नये म्हणून त्याने मारोतीरायाला शनीवारी नारळ फोडायचे कबुल केले.तो नवस बहुतेक कामी आला असावा.कारण ती पुन्हा दिसली नाही.
दुसरे दिवशी बडे वकीलाला मारहाण झाल्याची चर्चा कोर्टात सुरू होती.त्यातून कळले ते असे की त्या बाईचा नव-याला दरोड्याचे प्रकरणात पोलीसांनी अटक केली होती.'बडे त्र्यंबकराव'जोडीने,बाईला,तीच्या नव-याला एक दोन दिवसांत जामिनावर सोडवतो अशी खात्री दिली होती.त्यावर विश्वास ठेवून बाईने त्यांनी सांगितली तेवढी रक्कम फीस म्हणून दिली .पैसे घेतले,जामिनाची खात्री दिली ;पण स्वतः जामिन अर्ज दाखल करून युक्तिवाद करण्याची बडेची तयारी नव्हती,धाडस नव्हते.. तो तीन चार सिनीयर वकीलाकडे गेला.प्रकरण गंभीर असल्याने जामिन मिळणार नाही असे सर्वाचे मत पडले.काय करावे हे त्याला सुचेना.अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारी सारखी झाली.बाई रोज कोर्टात खेटे घालत होती.काम होत नव्हते. फक्त ,'कल परसो जामीन होगा ' हे ऐकून परत जात होती.कोर्टात अर्जच केला नव्हता.सुनावणी कुठली अन जामिन कुठला? रोज रोज नुसते आश्वासन ऐकून बाईला संशय आला.
कशी कुणास ठावूक तीने कोर्टात चौकशी केली.तेव्हा जामिन अर्ज केला नसल्याचे कळले.झालेल्या फसवणुकीने बाई संतापली .नात्यातल्या बायांना घेवून बडे त्र्यंबकराव जोडीला शोधत कोर्टात आली. बडे मात्र बायकांच्या तावडीत सापडला अन त्याची धुलाई झाली.हातापाया पडू लागला तरी त्या ऐकायला तयार नव्हत्या.शेवटी कुणीतरी मधे पडले.बाईला सगळे पैसे परत करायचे त्याने कबुल केले,तेव्हा कुठे सुटका झाली.
त्या दिवसानंतर बरेच दिवस बडे कोर्टात दिसला नाही. गावी जातोय असे सांगून त्र्यंबकराव पण दोन दिवस गायब होते.दहाबारा दिवसांनी बडे परत कोर्टात आला. गळ्यातले लॉकेट अन हातातली अंगठी गायब होते.त्या अर्थी प्रकरण पूर्णपणे मिटले होते.थोडी चतुराई, थोडी चपळाई,थोडा धुर्तपणा आदीचे बळावर त्या दिवशी योग्य वेळी घटनास्थळावरून पलायन केल्यामुळेआणि नंतर काही दिवस भुमीगत झाल्यामुळे,त्र्यंबकराव या सगळ्यातून सहीसलामत सुटले होते.बडेचे कोर्टात नियमित येणे सुरू झाल्यावर , तर ते एकदम निर्धास्त झाले होते.
'चला वकील साहेब चहा घेवू 'त्र्यंबकराव वामनला म्हणाले. कॅटिन समोरच्या बाकावर बसून दोन हाफ कटींग चहाची ऑर्डर दिली.बशीतून चहा पिता पिता म्हणाले,'वकीलीचा धंदा आता पयल्या सारखा राह्यला नाही.काही राम उरला नाही'.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
13 Apr 2022 - 11:24 pm | सौन्दर्य
कथा, कथेतील परिसर, वातावरण, तेथील लोकांचे हावभाव, वागणे अतिशय छानपणे टिपलंय. असेच लिहीत रहा.
14 Apr 2022 - 1:43 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. प्रयत्न करतोय लिहायचा..प्रतिसाद मिळाला की उत्साह वाढतो
16 Apr 2022 - 12:11 pm | king_of_net
+++ १११
14 Apr 2022 - 1:41 am | nutanm
छान लिहिलीय कथा. अगदि जिवंत कथा!! समोरच सर्व काही घडतय अशी.
14 Apr 2022 - 1:43 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले
14 Apr 2022 - 5:49 am | nutanm
छान आहे कथा, शाळेत असताना साक्षीदार खर्याची खोटी साक्ष करणारा माणूस, दिगूअण्णा व त्यांची खरयाची खोटी साक्ष करण्याचा नेहमीचा उद्योगच होता त्या धड्याची आठवण आली बेमालूम खर्याचे खोटे करणे ,पैसे घेऊन हा उद्योग त्याचा. या धड्याची आठवण आली, काही वेळा कशाने तरी शाळेची एवढी आठवण येते की वाटते परत ते वय ते घर देवाने द्यावे व परत शाळेत जावे असे वाटते पण आठवते ती तेव्हा सोसलेली गरिबी ,मोठी जागा, पण सोयी नसलेली त्यातच लादलेले पाहुणे ,हे पण सहन करणे आता जमेल का? इतक्या सुखसोयी मनासारखे जगण्याची ,रोज भरपूर सुंदर खाणे पिणेची,कपडे यांची सवय झालेली आता . ते तेव्हाच्या गरिबीच्या दिवसांप्रमाणेच भोगावे लागतील ते दिवस याही वाईट गोष्टी बघायला लागतिल, मग नको ते परत जीवन आहे तेच छान. म्हणजे आताच्या चांगल्या परिस्थितिसह ते दिवस, वय मिळाले तर हवे आहे . जे अशक्य आहे म्हणून आहे ते ठीक चाललय म्हणून गप्प बसायचे. व असे होणे शक्यच नाही. तेव्हाच्या शंकर पाटील व शंकर खरात यां लेखकांच्या ग्रामीण जीवनावर अस्सल कथा असत.
14 Apr 2022 - 1:45 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल आभार. धन्यवाद. जे जसे आहे ते स्वीकारून पुढे जावे लागते.सगळेच सगळ्यांना मिळेल असे नाही.
14 Apr 2022 - 11:00 pm | सौन्दर्य
तुमच्या प्रतिसादावरून जगजीत सिंग ह्यांनी गायलेली 'ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो' ही गझल आठवली. आपल्याला बालपण पुन्हा का हवेसे वाटते त्या विषयीची माझी कारणमिमांसा काहीशी अशी आहे - बालपणी आपल्या डोक्यावर कोणतेही (अभ्यास सोडून) टेन्शन नसते, जबाबदारी नसते, आपण एका सुरक्षित छायेत वाढत असतो. अगदी गरिबी असली तरी जेवणाची भ्रांत आपल्याला बाळगायची नसते. घरातील जेष्ठ व्यक्तीवर ही जबाबदारी असते, त्यामुळे लहानपण हे तणावमुक्त असते जे आपल्याला मोठे झाल्यावर हवे असते. मोठेपणीचा आनंद किंवा सुख असले तरी सतत डोक्यावर जबाबदारीचे ओझे असते त्यामुळे लहानपणीचा निर्भेळ आनंद मोठेपणी मिळत नाही व मग त्याची आस लागते.
16 Apr 2022 - 11:32 am | नीलकंठ देशमुख
बरोबर आहे. या शिवाय निरागसता, त्यामुळे असणारे अज्ञान ,जे अनेक दा खूप चांगले असते,अनेक विकारांचा मनात न झालेला शिरकाव यामुळे पण बालपण रम्य असते .हवेहवेसे वाटते असे मला वाटते.
14 Apr 2022 - 8:55 am | कर्नलतपस्वी
कोर्टात जाऊन आल्या सारखे वाटले.छान धन्यवाद.
14 Apr 2022 - 1:46 pm | नीलकंठ देशमुख
छान वाटले तुमची प्रतिक्रिया पाहून. धन्यवाद
14 Apr 2022 - 9:42 am | योगी९००
फार छान कथन... कोर्टाचे वातावरण चांगले उभे केलेत.
वकील, डॉ. व अन्य असे उद्द्योग करणारे यांचे सुरूवातीचे दिवस फार हालाखीत जातात. जर घरूनच त्या व्यवसायात कोणी नसेल तर त्यांना सुरूवातीला साधी कामे पण मिळत नाहीत. पण एकदा नाव झाले की बुलडोझरने उचलावे इतके पैसे येतात.
14 Apr 2022 - 1:48 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. सुरुवातीचा काळ अनेकाना कठीण जातो हे खरे. संयमाची परीक्षा पाहणारा हे खरे आहे.
14 Apr 2022 - 10:04 am | मुक्त विहारि
किस्सा आवडला
14 Apr 2022 - 1:48 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. प्रतिसाद वाचून आनंद झाला
14 Apr 2022 - 9:43 pm | मुक्त विहारि
कोर्टात जाणे, हा एक उत्तम मार्ग आहे ....
दुनियेतील, जास्तीत जास्त, स्वभावविशेष, इथे बघायला मिळतील...
माझ्या एका मित्राने, ठाणे कोर्टात वायरिंगचे कंत्राट घेतले होते .... त्याला मदत म्हणून, (आणि खरं सांगायचं तर, रात्रीच्या पक्षीतीर्थाची सोय म्हणून, पगाराच्या ऐवजी, पक्षीतीर्थ, हाच उभयपक्षी घेतलेला निर्णय होता) तिथे जात होतो ....
पक्षीतीर्थ कधीच पचले, पण, शहाण्या माणसाने, कोर्टाची पायरी चढू नये, हे मात्र पटत गेले ...
1985-86 च्या सुमारास, एखादा कारकून देखील, त्या कोर्टात रोजचे 1000-500 सहज कमवत होता ....(बियर 10-15 रपयांत मिळायची, आमची महागाई, बियरच्या दरावर आधारित आहे)
कुणालाही, सार्या जगाचा अनुभव आणि कोर्टातला अनुभव, असे तोलले तर, कोर्टातल्या अनुभवाचे पारडे नक्कीच जड असणार....
हाॅस्पीटल मध्ये गेलो की, निरोगी असणे किती उत्तम? हे समजते आणि कोर्टात गेलो की, एकांतवासातच रहाणे किती उत्तम आहे? हे समजते ....
त्यामुळे, तुमचे कोर्टातले किस्से अजून येऊ द्यात, ही नम्र विनंती ...
14 Apr 2022 - 10:23 pm | नीलकंठ देशमुख
खूप छान वाटले.तुम्ही म्हणता ते ब-याच अंशी खरे आहे.
अजून काही विषय डोक्यात आहे.जमेल तसे लिहिणार आहे
14 Apr 2022 - 11:50 am | तुषार काळभोर
एकदम नजरेसमोर दृष्य उभं राहिलं.
एक अवांतर शंका : कोर्टाची प्रशासकीय कामे, म्हणजे इमारत, आवाराची देखभाल, दुरुस्ती, वीज, स्टेशनरी ही कामे कोण करतं? त्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय विभाग असतो, की न्यायाधीशांच्या कामाअंतर्गत ही कामे येतात?
14 Apr 2022 - 1:54 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. न्यायाधीशाला प्रशासकीय कामे पण करावी लागतात. मदतीसाठी प्रशासन विभाग असतो. शासनाकडून उच्च न्यायालयास आपण म्हटलेल्या कामासाठी दरवरूषी विशिष्ट निधी दिला जातो . उच्च न्यायालय त्यातून जिल्हानिहाय निधी देते .त्या निधीतून,उच्च न्यायालयाचे मंजूरीनंतर सर्व कामे करावी लागतात. त्याविषयी नियम असतात. त्यांचे पालन करून सर्व कामे करावी लागतात. यावर उच्च न्यायालयाची पूर्ण देखरेख असते.
14 Apr 2022 - 8:49 pm | तुषार काळभोर
शीर्षक एकदम कल्पक आणि खास!!
14 Apr 2022 - 10:20 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल
14 Apr 2022 - 8:17 pm | तर्कवादी
कथानक छान आहे..
एक शंका विचाराविशी वाटते..ही फक्त याच कथेपुरती नाही तर एकंदरीतच मराठीतील कथालेखनाबद्दल मला एक प्रश्न अनेकदा पडतो. लेखक जेव्हा कथा सांगत असतो पण तो स्वतः त्या कथेतील एक पात्र नसतो (म्हणजेच कथा केवळ narrate करतो) तेव्हा तो काही पात्रांचा उल्लेख एकेरीत करतो तर काही पात्रांचा आदरार्थी उल्लेख का करत असावा ?.. उदा. या कथेत पंचविशितल्या , वकीली शिकलेल्या वामनचा उल्लेख एकेरीत येतो तर साधारण चाळिशीतल्या अर्धशिक्षित त्र्यंबकचा उल्लेख आदरार्थी !!
कुणाचा उल्लेख कसा करायचा हे लेखक कसे ठरवत असावा हा प्रश्न मला पडतो.. इथे लेखक स्वतःच्या वयाच्या संदर्भाने हे ठरवत असेल का ? की लेखक आपल्या वाचक वर्गाचे काही एक सरासरी वय गृहीत धरुन त्या आधारे ठरवत असेल असा प्रश्न मला पडतो.
14 Apr 2022 - 10:20 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. खूप छान प्रश्न (हे मुलाखत स्टाईल).
ही कथा वामनच्या नजरेतून लिहायचे ठरले. जो लेखकाचे प्रतिनिधित्व करतो.त्यामुळे वयाने जेष्ठ त्र्यंबकराव चा उल्लेख आदरार्थी आहे. समवयस्क बडेचा एकेरी
15 Apr 2022 - 6:30 pm | तर्कवादी
वामनच्या नजरेतुन कथा लिहिताना वामनचा उल्लेख प्रथमपुरुषी असा होईल ..
म्हणजेच
"समोर बसलेल्या वामनचा माझा चेहरा पडला" असे वाक्य होईल.
15 Apr 2022 - 8:22 pm | श्रीरंग_जोशी
"समोर बसलेल्या वामनचा माझा चेहरा पडला" असे वाक्य होईल.
असे नाहीये कारण वामन या कथेचा निवेदक नाहीये. केवळ त्याच्या नजरेतून लेखकाने कथा लिहिली आहे.
कथा खूप आवडली. न्यायालयीन वातावरणाशी अगदी लहानपणापासून ओळख असल्याने कथा वास्तवाच्या खूप जवळची वाटली.
15 Apr 2022 - 11:29 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. दुहेरी. हे आवडल्याबद्दल आणि माझ्या वतीने, माझ्या मनातील खुलासा तर्कवादी यांचे प्रतिक्रीयेवर दिल्याबद्दल.
15 Apr 2022 - 11:26 pm | नीलकंठ देशमुख
तर्कवादी आहात. त्यामुळे तुमचे नावाप्रमाणेच प्रश्न शंका..असणार.
अशा टिपण्यातून अनेक गोष्टी कळतात. सजग वाचकामुळे लिहीणा-याला ही आपण जबाबदारीने लिहायला हवे याचे भान येते.
आपल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या वतीने श्री.श्रीरंग जोशी यांनी दिले आहे.तुम्हाला व त्यांनाही धन्यवाद
16 Apr 2022 - 6:15 pm | तर्कवादी
आणि आधी म्हंटल्याप्रमाणे ही शंका सामान्यपणे अनेक कथांकरिता आहे.. इतर लेखकांनीही या मुद्द्यावर आपले मत मांडावे ही विनंती.
15 Apr 2022 - 6:45 pm | आलो आलो
त्रिंबकराव लै बेरकी निघाला कि ...
मस्तच !
किस्सा आवडला हेवेसांनलगे
15 Apr 2022 - 11:27 pm | नीलकंठ देशमुख
खूप छान वाटले प्रतिक्रीया वाचून. धन्यवाद
15 Apr 2022 - 10:25 pm | विजुभाऊ
वा छन कथा आहे हो.
वकिलाम्चे उत्पन्न आणि ते त्यांना कसे मिळते ? त्यांच्या सल्ल्याचे दर कोण ठरवते या बद्दल कुतूहल आहे.
बरेचदा कोर्ट तक्रारदाराला नुकसान भरपाई + वकिलांची सल्ला फी असा दावा मंजूर करते. त्या वेळेस वकिलांची सल्ला फी कशी दाखवली जाते?
वकील त्यांचे उत्पन्नासाठी जी एस टी आणि इनकमटॅक्स कसा भरतात हे देखील जाणून घ्यायचे आहे
15 Apr 2022 - 11:37 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वकीलाची फीस कायद्यानुसार किती असावी याचे कोष्टक आहे.
प्रकरणाचे मुल्याक॔ना नुसार ती असते. तेवढीच घेणे अपेक्षित आहे. ती अतिअल्प असते.कोर्टडिक्रीत त्यानुसार नमुद असते.प्रत्यक्षात असे नसते. ती किती कशी असते हे वकील, अशील, प्रकरणाचे स्वरूप, महत्व यावर अवलंबून असते. . काही वकील पारदर्शकता बाळगतात. पण सहसा , किती फीस आकारली हे समोर येत नाही
18 Apr 2022 - 11:17 am | सौंदाळा
मस्तच लिहिली आहे.
त्र्यंबकरावांसारखे बरेच जण असतात. त्यांना दुनियादारीचा खूपच अनुभव असतो. त्यांनी अनेक प्रकारची माणसे पाहिलेली असतात. मात्र ठेविले अनंते तैसेची रहावे या विधानाप्रमाणे किंवा अल्पसंतुष्टीपणा किंवा अंगात काही करण्याची धमक नसणे यामुळे हे लोक आहे तिकडेच राहतात आणि आख्खे आयुष्य रेटतात.
18 Apr 2022 - 3:52 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल आभार. आपले निरीक्षण बरोबर आहे.
18 Apr 2022 - 1:30 pm | सिरुसेरि
छान कथन .
18 Apr 2022 - 3:52 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
19 Apr 2022 - 2:19 pm | स्वराजित
खुप छान लिहिता तुम्ही.
असेच लिहित रहा.
19 Apr 2022 - 9:42 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले
19 Apr 2022 - 9:42 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले
19 Apr 2022 - 5:33 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी रंगवलीय कथा !
कोर्टाचे वातावरण आणि व्यक्तिचित्रण एकदम सही !!
आता पर्यंत आयुष्यात एकदाच कोर्टाची पायरी चढलोय, अॅफिडेव्हिट करण्यासाठी.
मध्यस्त वकील नातेवाईक होता माझा, आख्खा दिवस खाल्ला आमचा ते आठवलं
तेव्हा पासून त्या वकील नातेवाईकापासून दूर रहायला लागलो मी !
19 Apr 2022 - 9:46 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसाद वाचून छान वाटले. सगळ्याच वकीलाचे, अनुभव वाईट येतात असे नाही. तुम्हाला दुर्दैवाने आला. वकील, डॉक्टर आणि हो न्यायाधीश सुध्दा चां गला मिळणे हा नशीबाचाच भाग असतो असे अनुभवाअंती माझे मत झाले आहे.