निषेध व भावनिक स्फोट

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
7 Mar 2022 - 7:44 am

चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे : पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख.

एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो. तिथे उपलब्ध असलेल्या बहुतेक इंग्लीश व भारतीय भाषांमधील मला आवडतील असे चित्रपट पाहून झालेले होते. त्यामुळे बराच वेळ धुंडाळून काही उपयुक्त असे गवसत नव्हते. अचानक एका स्पॅनिश चित्रपटावर नजर खिळली. त्याचे नाव इंग्लिशमध्ये ‘Wild Tales’ असे लिहिलेले होते. त्यातला वाइल्ड शब्द मनापासून आवडला नसला तरी त्याबद्दल कुतूहल वाटले. मग चित्रपटाचा सारांश वाचल्यावर लक्षात आले की त्यात सहा लघुकथा एकत्र केलेल्या आहेत. अलीकडे मला हा प्रकार सलग चित्रपटाऐवजी आवडू लागला आहे. अशा चित्रपटातील 1-2 कथा पाहिल्यावर पुढे पाहायचा की नाही याचा निर्णय सहज घेता येतो.

अखेर तो चित्रपट पाहू लागलो. पहिल्याच कथेने पकड घेतली. मग दोन टप्प्यात मिळून सर्व चित्रपट पाहिला. नंतर त्याचा काही भाग पुन्हा पाहिला. मानसशास्त्रात ‘भावनांचे विरेचन (निचरा)’ अशी एक संकल्पना आहे. त्यावर आधारित या सहा कथा आहेत. अर्थात त्यातील पात्रांचे विरेचन स्फोटक प्रकारे झालेले असल्याने चित्रपट ‘वाईल्ड’ ठरतो.
ok

आधी चित्रपटाचा सारांश लिहितो आणि मग विरेचन या संकल्पनेकडे वळतो. चित्रपट 2014 चा असल्याने त्याबद्दल लिहिताना रहस्यभेद क्षम्य मानतो.
.....
.....

चित्रपटातील सर्व कथा ‘माणूस विरुद्ध समाजयंत्रणा’ या सूत्राभोवती गुंफल्यात. जगात सत्ता व संपत्तीचे मूठभर लोकांकडे केंद्रीकरण झालेले आहे. सामान्य माणूस कायमच भिऊन व दडपून जगत असतो. मग कुठल्यातरी अन्यायाच्या किंवा क्षोभाच्या प्रसंगी असा माणूस ही सर्व लादलेली सामाजिक बंधने झुगारुन आपल्या आतल्या पशुत्वासह व्यक्त होतो. या भावनिक स्फोटातून त्याला तात्पुरते का होईना पण ‘मुक्ती’चे सुख मिळते. ही चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना. यातील काही कथा सत्य घटनेवर आधारित आहेत.

Pasternak ही याच नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याला आयुष्यात अगदी बालपणापासून ते तारुण्यापर्यंत अनेकांनी त्रास दिलेला होता. खुद्द त्याच्या आईवडिलांनी त्याला सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपून ठेवले होते. कथेतील प्रसंगात जे विमान चाललंय त्याचा तो वैमानिक आहे. त्या उड्डाणात प्रवाशांमध्ये त्याला त्रास दिलेल्या बऱ्याच व्यक्तींचा समावेश आहे. किंबहुना त्या सर्वांवर सूड उगवण्यासाठीच त्याने या योगायोगाच्या मोहिमेची जुळणी केली आहे. तो केबिनचे दार आतून लावून घेतो आणि त्याच्या रागाच्या परमोच्च क्षणी ते विमान खुद्द त्याच्या स्वतःच्याच घरावर आदळवतो.

दुसऱ्या कथेत एका दुष्ट सावकाराचा एका पीडित स्त्रीने त्याच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांबद्दल सूड घेतलेला दाखवला आहे. इथे पीडित स्त्रीच्या मनात आधी खूप चलबिचल होते पण तिची मदतनीस तिचे मतपरिवर्तन करून तिला भरीस पाडते. शेवटी इच्छित कार्य पार पडते. इथे सूडाची भावना तीव्र झालेल्या दोन्ही स्त्रिया श्रमजीवी वर्गातील आहेत.
पुढच्या कथेत रस्त्याने कार चालवणाऱ्या दोन पुरुषांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. मागील चालकाला पुढच्याने आपल्या पुढे जाऊ न दिल्यामुळे भांडण होते. पुढे त्याचे मारामारीत पर्यवसान होते. त्या दोघांपैकी एकाचे गलिच्छ व ओंगळवाणे कृत्य यादरम्यान दाखवले जाते. अखेरीस या मारामारीत दोघांचा अंत होतो. गलिच्छ कृत्य करणारा माणूस दबलेला व पीडित आहे. अशा प्रसंगात त्याच्यातील पशुत्व बाहेर आलेले प्रभावीपणे दाखवले आहे.

अन्य एका कथेत एका शहरातील नको इतका सक्रीय वाहतूक नियंत्रण कक्ष आणि त्याचा वाहनचालकांवर होत असलेला अन्याय हा विषय हाताळला आहे. रस्त्यावर योग्य ठिकाणी लावलेली एक कार सुद्धा त्या कक्षाकडून जप्त केली जाते. त्यावर दाद मागायला गेलेल्या वाहनचालकास न्याय देणे तर दूरच, उलट अरेरावीची उत्तरे मिळतात. असे जेव्हा त्याच्या बाबतीत पुन्हा घडते तेव्हा मात्र तो पेटून उठतो. त्याच्यातील सूडभावना जागृत झाल्याने तो कर संकलन कार्यालयच स्फोटाने उडवून देतो. सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना पिडण्याचा अनुभव भारतात तर बर्‍याचदा येतो. किरकोळ गोष्टींवरून पांढरपेशांना सतावणारे वाहतूक पोलीस, टग्या व मस्तवाल मंडळींच्या बाबतीत मात्र सर्रास कानाडोळा करताना दिसतात हे आपण पाहतोच (यासंबंधीची एक प्रातिनिधिक बातमी नंतरच्या विश्लेषणात दाखवतो).

अखेरची कथा सर्वात लांब असून त्यात विवाहपूर्व लैंगिक संबंध हा विषय आक्रस्ताळेपणाने हाताळला आहे. भर लग्नाच्या मंडपात नवरीला लक्षात येते की आपल्या नवऱ्याचे तिथे मांडवात असलेल्याच एका अन्य स्त्री बरोबर संबंध होते. तिने त्याला तसे विचारताच तो कबुली देतो. त्याचा सूड म्हणून ही नवरी आक्रस्ताळेपणा करत तिथल्या गच्चीवर जाते आणि चक्क तिथे एका नोकराशी उघडपणे संभोग करते. अखेर दिलजमाई होऊन मूळ जोडप्याचे लग्न पार पडते. पण तिने त्याच्यावर सूड घेण्याचा हा प्रकार अतिशयोक्त व बटबटीत वाटला.

हा चित्रपट तिकीटबारीवर जोरदार राहिला आणि त्याला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.
अशा प्रकारे या चित्रपटातील प्रत्येक कथेमध्ये त्यातील मुख्य पात्राचा क्षोभ होऊन भावनिक स्फोट झालेला दिसतो. अशा प्रकारच्या विविध घटना कमी-अधिक प्रमाणात आपल्या अवतीभवती सुद्धा घडताना दिसतात. एखाद्या व्यक्तीच्या अशा वागण्यामागे जे मानसशास्त्र आहे त्याचा आता आढावा घेतो.

भावनिक विरेचन
या संकल्पनेचा मानसशास्त्रात खूप अभ्यास झालेला आहे. सामान्य माणूस दैनंदिन जीवनात कामाचे ताणतणाव, काळजी, भीती आणि दडपण यासारख्या गोष्टीनी पिडलेला असतो. त्यातून त्याच्या सुप्त मनात अनेक विचारांचे द्वंद्व चालू असते. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक अप्रिय गोष्टींचा त्याला प्रचंड राग येत असतो. त्यातून सतत चिडचिडेपणा आणि कधीकधी नैराश्यही आलेले असते. अशाच एखाद्या प्रसंगी त्याच्या संयमाचा बांध फुटतो आणि तो लोकांमध्ये स्फोटक प्रकारे व्यक्त होतो. या कृतीतून त्याच्या दीर्घकाळ दबलेल्या भावना मोकळ्या होतात. हा झाला या व्यक्त होण्याचा त्याला झालेला क्षणिक फायदा. नंतर जेव्हा असा माणूस आपल्या त्या कृतीचे आत्मपरीक्षण करतो त्यातून त्याला आणीबाणीच्या प्रसंगात वागण्याचा एक नवा दृष्टिकोनही मिळू शकतो.

कारणमीमांसा
ही स्पष्ट करण्यासाठी उदाहरणार्थ वरील चित्रपटातील वाहतूक कार्यालय उडवून द्यायची घटना आपल्या संदर्भात पाहू. साधारणपणे वाहतूक पोलिसांचे सामान्य पांढरपेशा/पापभीरू लोकांशी कसे अरेरावीचे वर्तन असते ते आपण जाणतो. याउलट, वाहतुकीचे अनेक नियम डावलून चाललेल्या बेफाम वाहनचालकांकडे पोलीस बरेचदा कानाडोळा करतात. बऱ्याच गाड्या अशा असतात की त्यांची क्रमांकाची पाटी नियमाविरुद्ध मराठीत रंगवलेली असते. त्यावरील क्रमांक मुद्दाम लहान आकारात व अस्पष्ट असतात. नियमानुसार पाटीवर गरज नसलेल्या अवांतर गोष्टी मात्र ठळक असतात. जसे की, अमुक-तमुकचा आशीर्वाद असे लिहीलेले आणि वर शेजारी फडकत्या झेंड्याचे चित्र. अशा मंडळींना वाहतूक पोलिसांनी कधी मान धरून पकडल्याचे दिसते का ? अगदी क्वचित.
नमुन्यादाखल ही बातमी पहा :

ok

कोविडकाळात एखाद्या दुचाकीचालकाची नाकावरील मुखपट्टी थोडी जरी खाली सरकली असेल तरी पोलिस त्याला अगदी बकऱ्यासारखे पकडत होते (वास्तविक सिग्नलला गाडी थांबल्यावर संपूर्ण नाकावर पट्टी असेल तर चष्म्याच्या आतील बाजूस धुके साठू लागते आणि दृष्टीला अडथळा होतो. त्यासाठी ती थोडी खाली सारणे आवश्यक असते). पण याच काळात बरीच टगी मंडळी विनाहेल्मेट दुचाकी चालवत होती. त्यांना मात्र पोलिसांनी चक्क माफ केलेले दिसले ! अशा प्रकारच्या पक्षपाती वागण्यातून सामान्य नागरिकांचा सात्विक संताप होत राहतो. पोलिसांना जर नियमांची कठोर अंमलबजावणी करायचीच असेल तर मग ती सर्वांसाठी समान का नाही ? अशा द्वंद्वातूनच मग एखाद्या वेळेस एखाद्याची सटकते अन तो सरळ पोलिसाचीच तिथल्या तिथे धुलाई करतो. हेच ते विरेचन.

अन्य एक स्वानुभव सांगतो. ३० वर्षांपूर्वी माझ्या पहिल्यावहिल्या घरासाठी एका सरकारी संस्थेचे कर्ज घेतले होते. घराची नोंदणी करताना मला फक्त नोंदणी पावती दिलेली होती; मूळ दस्त अजून तयार व्हायचा होता. सदर कर्जसंस्थेने ती मूळ पावती मागितली. मी त्यांना ती दिली. त्यांच्या आवक वहीत त्याची व्यवस्थित नोंद झालेली पाहिली. आता मी त्यांच्या मंजुरीची वाट पाहत होतो. दरम्यान त्यांनी मला एकदा भेटायला बोलावले आणि माझ्यासमोर कागदपत्रांची धारिका चाळून मला सांगितले की तुमची सरकारी नोंदणीची पावतीच यात नाही. मी त्यांना सांगितले की ती तर मी केव्हाच दिली आहे. त्यावर त्या माणसाने खांदे उडवून बेफिकीरी दाखवली. मग मी त्याला म्हटलं, तुम्ही नीट शोधा. बरीच शोधाशोध झाली. त्याने पुन्हा एकदा आवक नोंदवही पाहिली. त्यात माझ्या पावतीची नोंद होती. तरी तो माणूस उडवाउडवीची उत्तरे देत होता. या प्रकारात दोन तास गेले. नंतर तो म्हणाला, अवघड आहे पावती नाही सापडली तर कर्ज कसे देणार ?

आता माझी सटकली. आवाज चढवून म्हटलं, “तुमच्या वहीत नोंद आहे आणि जर पावती सापडत नसेल तर त्याचा अर्थ उघड आहे. ती तुम्ही हरवली आहे”. तरी तो काही सौजन्याने बोलेचना. मग शेवटी मी म्हणालो, “आज तुमच्या इथे ती पावती सापडेपर्यंत तुम्ही आणि मी दोघेही हे कार्यालय सोडायचे नाही. बघू कसे जाताय पाच वाजता निघून !“ हा जो माझ्यात संचार झाला तो माझ्या कल्पनेपलीकडचा होता. त्याचा परिणाम मात्र झालेला दिसला. पुढच्या अर्ध्या तासात अनेक जण शोधकार्याला लागले आणि ती पावती मिळाली. मलाही हुश्श झाले ! माझ्या घराची मालकी प्रस्थापित करणारा तो एकमेव महत्त्वाचा पुरावा होता. अशा वेळेस मी जर गुळमुळीत राहिलो असतो तर या असल्या हलगर्जी लोकांनी माझ्या डोक्यावर मिरे वाटले असते.

असे एक ना अनेक अनुभव आपल्यातील अनेकांना येत असतात. जर का त्यातून अन्यायाची पातळी वाढत गेली तर मग एका बिंदूवर तो विरेचनाचा क्षण येतो. श्रमजीवी वर्गाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही गोष्टी जाणवतात. एकंदरीतच ही माणसे समाजव्यवस्थेपुढे दबलेली असतात. त्यातून त्यांच्या मनात राग खदखदत असतो. त्यांची कामेसुद्धा काहीशी रटाळ स्वरूपाची असतात. मग ती करता करता येता-जाता थुंकणे, शिव्या देणे हे जे काही होत असते ते एक प्रकारे विरेचनच असते.

विरेचनाचे प्रकार
वरील विवेचनात भडक वा स्फोटक पद्धतीने झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. मात्र निव्वळ याच प्रकारे विरेचन होते असा गैरसमज होऊ नये. शांततेने विरेचन होण्याचे देखील काही मार्ग आहेत. त्यांचा आता आढावा घेऊ.
काही लोकांमध्ये, कितीही ताणतणावाचा किंवा अन्यायाचा प्रसंग आला तरी त्याप्रसंगी मानसिक समतोल ठेवून राग काबूत ठेवण्याची प्रवृत्ती असते. अशा लोकांना आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करता येईल :

१. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्याला होत असलेल्या त्रासासंबंधी अगदी मनमोकळेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता बोलणे.

२. आवडते संगीत तल्लीन होऊन ऐकणे. शक्य असल्यास त्याच्या तालावर आपणच मोठ्याने गाणे म्हणणे. यावरून आपल्याला लहानपणापासून सांगितलेली एक युक्ती आठवते. एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असताना आपल्या हातून कुठलीही आततायी कृती होऊन नये, म्हणून मोठ्याने सरळ एक ते दहा अंक म्हणावेत आणि वेळ पुढे न्यावा.

३. जोरकस व्यायाम करणे. अशा वेळी चेव येऊन (आणि वाटल्यास मनात १-२ शिव्या हासडून) काही प्रकारचे व्यायाम करणे हे उपयुक्त.

४. लेखन : वरती बोलून मोकळे होण्याचा मुद्दा आला आहे. ज्या लोकांना लेखनाची थोडीफार सवय आहे अशांनी तणावाच्या प्रसंगी लेखनाचा मार्ग जरुर चोखाळावा. ज्या प्रसंगाने आपल्याला त्रास होत आहे त्याला अनुरूप असे काही लेखन केले तरी भावना मोकळ्या होतात. विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांनी या मुद्द्यावर एक सुंदर परिच्छेद लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्ष मनात साचून राहिलेल्या व खदखदणाऱ्या भावना त्यांनी लेखनाद्वारे मोकळ्या केल्यात.

असा एक माझा अनुभव सांगतो (यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिला असू शकेल). माझ्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीला एका नातेवाईकाच्या वागण्यामुळे बराच मानसिक त्रास झाला होता. या व्यक्तीवर एक दुःखद प्रसंग गुदरला होता. त्या प्रसंगात संबंधित नातेवाईकाने त्यांच्या भेटीत त्याचा साधा उल्लेख करणे सुद्धा टाळले होते. वास्तविक त्या दोघांचे नाते बऱ्यापैकी जवळचे होते. त्या नातेवाईकाच्या अशा वागण्याने ही व्यक्ती खूप दुखावली गेली होती. तीन चार दिवस तिचे कामावरून लक्ष उडाले होते. मग मी यावर एक उपाय केला. त्या व्यक्तीला सांगितले की तुला जे काही दुःख त्या प्रसंगातून होत आहे ते तू मोकळेपणाने लिहून काढ. तिला तशी लेखनाची सवय नव्हती. तरीसुद्धा तिने काही लिहून मला दाखवले. मग मी त्यात थोडे फार बदल केले. त्या दरम्यान एका दैनिकात “मोकळे व्हा” या प्रकारचे सदर चालू होते. तिथे अनेक जण आपापल्या दुःखासंबंधी स्वानुभव लिहित. या व्यक्तीचा अशा प्रकारचा लेख तयार झाल्यावर मी तिला तो दैनिकाकडे पाठवायला सांगितले. योगायोगाने तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला काही जणांनी कळवले. या सगळ्या प्रकारातून तिला एक मानसिक समाधान मिळाले. विरेचनाचा हा अगदी विधायक प्रकार म्हणता येईल.

विरेचन आणि समाजविघातकता
जोपर्यंत एखाद्याचे विरेचन वर लिहिल्याप्रमाणे शांततामय मार्गांनी होत आहे तोपर्यंत इतरांना त्याचा त्रास नाही. परंतु स्फोटक प्रकारे झालेल्या विरेचनातून कित्येकदा संबंधित व्यक्ती समाजविघातक कृत्ये करून बसते (जसे की, या चित्रपटातील कार्यालय जाळण्याची घटना).
ज्या माणसांच्या बाबतीत विरेचन वारंवार स्फोटक पद्धतीने होऊ लागते ती माणसे अर्थातच समाजासाठी त्रासदायक ठरतात. अशा माणसांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला असता काही माहिती मिळते. अशा लोकांची दोन गटांमध्ये वर्गवारी करता येईल :
१.समाजकंटक आणि
२. मनोविकारग्रस्त

त्यांच्यातील काही फरक लक्षणीय आहेत.
समाजकंटकाच्या बाबतीत त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते परंतु ती दुबळी झालेली असते. असा माणूस क्षोभाच्या प्रसंगी एखादे घातक कृत्य करून बसतो खरा, परंतु लवकरच त्याला त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. थोडक्यात, हा माणूस गरम डोक्याचा असतो. क्षणिक उद्रेकानंतर ते डोके व्यवस्थित शांत होते.

मनोविकारग्रस्त ही मात्र अधिक वाईट अवस्था आहे. ही माणसे सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात. त्यांच्या हातून एखादे घातक कृत्य घडले तर त्याचा त्यांना पश्‍चात्ताप होत नाही. उलट, आपण केले ते योग्यच केले अशी त्यांची धारणा असते. एरवी समाजात घडणाऱ्या किंवा दृश्य माध्यमांमधून दाखवल्या जाणाऱ्या हिंसक घटना पाहून अशा व्यक्तींना सुप्त आनंद होत असतो.

अखेर मनुष्य हाही एक प्राणीच आहे. निसर्गानुसार त्याच्यात सुद्धा पशुत्वभावना आहे. परंतु विविध सामाजिक बंधनांमुळे ती दाबलेली असते. किंबहुना माणसाचे सुसंस्कृत आणि असंस्कृत वर्तन यांच्या दरम्यानची सीमारेषा काहीशी धूसर असते. जेव्हा एखाद्या प्रसंगामुळे एखाद्याचा भावनिक स्फोट होतो तेव्हा ती सीमारेषा ओलांडली जाते. त्यातून वेळप्रसंगी माणूस समाजविघातक कृत्य करून बसतो. या सूत्रावर आधारित भावनिक विरेचन ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. तिच्याभोवती गुंफलेला हा चित्रपट पाहून मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचकांना तो रोचक वाटेल अशी आशा आहे.
.................................................................................
चित्र सौजन्य :
१.आंतरजाल
२. दैनिक सकाळ

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Mar 2022 - 8:21 am | मुक्त विहारि

वाखूसा ...

ह्या पृथ्वीवरचा सगळ्यात त्रासदायक प्राणी म्हणजे, "माणूस".... हेच परत एकदा, अधोरेखीत झाले ....

जेम्स वांड's picture

7 Mar 2022 - 9:40 am | जेम्स वांड

भावनिक विरेचनावर आपल्याकडे डोंबिवली फास्ट नावाचा सिनेमा काढला गेला होता.

आजकाल मानसिक विरेचन ह्या विषयाबद्दल सिरीयसनेस नक्कीच वाढले असावे असे वाटते, अगदी आमच्या हापिसात पण "वन मेल्टडाऊन" पर मंथ अलाऊड असण्याचा नियम आहे, इंदोर शहरात तर भडास कॅफे नावाचा कॅफे आहे, तिथे जेवण/ चहा/ नाश्ता तर मिळतेच पण सोबत तिथे स्क्रीम रूम आहे, काही पैसे दिल्यास जुने भंगारातले कॉम्प्युटर, टेबलं इत्यादी वापरून "ऑफिस टाईप" सेटप करून देतात, तुम्ही फक्त हाती बेसबॉल बॅट घेऊन तो सेटप चक्काचूर केलात तरी कोणी काही बोलणार नाही, आरडाओरडा करा, मॉनिटर सीपीयू मोडा तोडा शिव्या घाला पण तासभर झाला की मोकळे होऊन बाहेर जा, अशी कन्सेप्ट आहे. ऑन ऑर्डर ऑफिस सोडून इतर सेटप पण करून देतात. वेगळी संकल्पना आहे एकदम.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Mar 2022 - 12:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना डोंबिवली फास्टचीच आठवण येत होती. त्यातही नायकाचा झालेला उद्रेक फारच प्रभावीपणे दाखवला आहे. संदिप कुलकर्णीचे काम अंगावर येते.

हिंदि चित्रपटांनी विशेषतः अमिताभ बच्चनने अन्यायग्रस्त नायकाच्या भुमिका रंगवुन बर्‍याच जणांच्या छुप्या उद्रेकाला चित्रपट गृहात वाट मोकळी करुन दिली होती.

बरेचसे दाक्षिणात्य सिनेमे सुध्दा अन्याया विरुध्द लढणार्‍या नायकांचेच असतात.

पैजारबुवा,

अनिंद्य's picture

7 Mar 2022 - 3:25 pm | अनिंद्य

@ जेम्स, भडास कॅफेचे फ्रँचाइजी मिळवायला आवडेल, तुफान चालेल ते :-)

कुठल्याश्या मेगा फॅक्टरीमधे कामगारांना पिळुन घ्यायचे, अत्यंत मोनोटनस काम तासन्तास करायला लावायचे, म्हणुन तिथे खुप आत्महत्या व्हायच्या. मेनेजेमेण्टने अक्षरशः जाळ्या लावल्या जेणेकरुन उडी मारुन जीव देणार्‍या कामगारांचे प्राण वाचावे.
तर अशा ठिकाणी त्यांनी हे मानसीक विरेचनाचे पर्याय उपलब्ध करुन दिले म्हणतात. एका खोलीत आपल्या मॅनेजरच्या नावाचा पुतळा लावायचा, त्याचा चेहेरा प्रिण्ट करुन चिपकवायचा, आणि त्या पुतळ्याला यथेच्च लाथा बुक्क्यांनी तुडवायचं, त्यावर थुंकायचं वगैरे वगैरे... आपोआप राग शांत होई कामगारांचा.

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 10:15 am | कुमार१

१.

सगळ्यात त्रासदायक प्राणी म्हणजे, "माणूस"

>>>> +१११
...
२.

इंदोर शहरात तर भडास कॅफे नावाचा कॅफे

>>> भन्नाट कल्पना. आवडली !

Nitin Palkar's picture

7 Mar 2022 - 1:31 pm | Nitin Palkar

थोड्या वेगळ्या विषयावरील खूप चांगला लेख. वैचारिक उद्रेक शमवण्यासाठी आपण काय काय करतो या संबंधी विचारचक्र सुरु झाले. बहुतेक वेळा कुटुंबियांशी मोकळेपणे बोलणे हाच उपाय करतो हे जाणवले (आणि थोडे समाधान देखील वाटले).

अनिंद्य's picture

7 Mar 2022 - 3:24 pm | अनिंद्य

@ कुमार,

'विरेचन' शब्दच फार आवडला. लेख उत्तम, दुःखाचा-तणावाचा-रागाचा निचरा होणे खरेच फार महत्वाचे असते.

बॉक्सिंगचा सराव राग कमी करण्यासाठी अजून एक माध्यम. पूर्वी मला राग आवरता येत नसे (अजूनही शिकतोच आहे), म्हणून हे आणि इतर अंगमेहनतीची कामे यांची खूप मदत झाली.

नवतरुणांना बॉलिवुडी डान्सचा उपाय वापरतांना बघतो, It helps !

तनमयी's picture

7 Mar 2022 - 3:33 pm | तनमयी

होली तिल शिव्या सुधधा ह्यचा प्रकर असवा

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 4:25 pm | कुमार१

१.

'विरेचन' शब्दच फार आवडला.

>>> या विषयाचा अभ्यास करताना मला मूळ इंग्लिश शब्दाचे हे भाषांतर मिळाले. हा शब्द गोड आणि सुंदर असल्याने मलाही आवडला. म्हणून मुद्दामच मूळ इंग्लिश शब्दाचा उल्लेख केला नाही.
...
२.

होळीतील शिव्या

>>> शक्यता आहे. यानिमित्ताने मराठी विश्वकोशात या प्रथेचा शोध घेतला असता ही माहिती मिळाली:

“ह्या सणाच्या संदर्भात भविष्यपुराणा त ढूंढा राक्षसिणीची कथा आलेली आहे. ती अशी : ही राक्षसीण गावात शिरून मुलांना त्रास देत होती. गावकऱ्यांनी तिला घाणेरड्या शिव्या देऊन मोठा अग्नी पेटवला आणि तिला पळवून लावले. होळीच्या उत्सवात बोंबा मारून अश्‍लील शब्द उच्चारतात, ह्याचे मूळ ह्या कथेत सापडते”.

ईट रियली हेल्प्स बीसी ( &#128521 )

मी तरी हे ट्राय केले आहे, खासकरून जर गावी असलो तर हलके वाटते. अनावर झालं काही का सरळ रात्री वस्तीला रानात जायचं अन भडभडून मकार भकार ओरडून ओरडून शिव्या द्यायच्या अन मोकळे व्हायचे, फुल हलके वाटते.

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 5:30 pm | कुमार१

१.

कुटुंबियांशी मोकळेपणे बोलणे हाच उपाय करतो हे जाणवले

>>>
अगदी योग्य ! हा तर विधायक पर्याय.
...
२.

भकार ओरडून ओरडून शिव्या द्यायच्या अन मोकळे व्हायचे, फुल हलके वाटते.

>>
बरोबर आहे. इथे बऱ्याचदा शहरी पांढरपेशे कमी पडतात. त्यामुळे काही वेळेला डोक्यात साठून राहिलेल्या रागाचा आपल्याला त्रास होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये घडलेला एक अनुभव. एका वरिष्ठ व्यक्तीमुळे मला त्रास होत होता. मनात खूप चिडचिड व्हायची. एकदा स्वप्नात मी त्या व्यक्तीला बदडून काढले, परंतु ते करीत असताना मला उजव्या हाताच्या चेतातंतूचा एक जबरदस्त त्रास झाला.

मग मी तातडीने माझ्या सहकारी डॉक्टरकडे गेलो. त्याने योग्य ते व्यायाम मला सांगितलेच. पण तेव्हा विश्लेषण करताना तो म्हणाला,
" हे असे प्रकार बुद्धिजीवी लोकांच्या बाबतीत बरेचदा घडतात; श्रमजीवी नाही, असा माझा अनुभव".

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 10:11 am | कुमार१

एका खोलीत आपल्या मॅनेजरच्या नावाचा पुतळा लावायचा, त्याचा चेहेरा प्रिण्ट करुन चिपकवायचा, आणि त्या पुतळ्याला यथेच्च लाथा बुक्क्यांनी तुडवायचे

>>> चांगला उपाय. आत्महत्या वाचणे महत्त्वाचे.
....
कॅफे भडास >>> चित्रफित छान आहे.

Bhakti's picture

8 Mar 2022 - 10:11 am | Bhakti

जोरकस व्यायाम करणे. अशा वेळी चेव येऊन (आणि वाटल्यास मनात १-२ शिव्या हासडून) काही प्रकारचे व्यायाम करणे हे उपयुक्त.
हा उपाय वापरते
थोड्या फार शिव्या शिकले त्यामुळे :)
बाकी निषेध म्हणाल तर दोन तीन संधी दिल्यावर चौथ्या वेळी नक्कीच नोंदवते ! गांधीगिरी हा पण पर्याय आहे पण तो जास्त व्यावहारिक नाही.

बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे व्यथित होतो, त्यांच्या वागण्याच्या दृश्य परिणामांचा आपल्या परीने एक अर्थ लावतो. कालांतराने आपल्या सहनशक्तीचा स्फोट होतो आणि त्या वेळेला होणाऱ्या भांडणातून आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन समजतो. त्यावेळेला जो पश्र्चाताप होतो तो सहन करणं फार कठीण जाते.

आतापर्यंत मनसोक्त रडणे हा कोणीच भावनांचा निचरा करणारा उपाय म्हणून सुचविला नाही. त्यावरून प्रतिकार करणे, खात्मा करणे, स्वतःला सिद्ध करणे या भावनांचा समाजात किती मोठा पगडा आहे आणि त्यापायी आपल्या भोवतीचं वातावरण कसे हिंसक होत चालले आहे याची फारशी जाणीव अथवा फिकीर कुणाला नसावी असे दिसते.

मुळात आपण भावनिक दृष्ट्या प्रभावित झालो आहोत, आपल्याला शांत होण्याची गरज आहे, ध्यान आणि औषोधपचार यांचा आधार घेतला पाहिजे हा विचार लोक स्वतःशी देखील करीत नसावेत.

मनाची उत्तेजीत अवस्था आणि श्वासोच्छ्वास याचा फार जवळचा संबंध आहे. आपण प्राण्यांसारखे साधे जीवन जगत होतो तेव्हा लढ किंवा पळ काढ या नैसर्गिक प्रवृत्तीला अनुसरून निसर्गाने आपल्याला दिलेली ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आपल्या समाज आणि सभ्यतेच्या चौकटीमध्ये आपण प्रत्येक वेळेला लढू किंवा पळू शकत नाही. म्हणून श्वासोच्छ्वास जाणीवपूर्वक नियंत्रित केला तर भावणांवर चांगले नियंत्रण मिळवू शकतो.

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 12:26 pm | कुमार१

१.

थोड्या फार शिव्या शिकले त्यामुळे :)

>>> हरकत नाही. रच्याकने ....
उद्वेग व्यक्त करणाऱ्या 'फक'वरील हा रोचक लेख !
......

२.

मनसोक्त रडणे हा कोणीच भावनांचा निचरा करणारा उपाय म्हणून

>>>
चांगला व वेगळा विचार आवडला.

अनिंद्य's picture

8 Mar 2022 - 12:48 pm | अनिंद्य

मनसोक्त रडणे

+१

रडता येणे ही एक सुपरपॉवर आहे हे समजून घेण्याची गरज आहे, पुरुषांना विशेषकरून. 'मुलींसारखा का रडतोस' सारख्या वाक्यांनी पुरुषांचे भावनिक जीवन कठीण केले आहे.

कर्नलतपस्वी's picture

8 Mar 2022 - 7:19 pm | कर्नलतपस्वी

भावना आहेत तर कधी कधी उद्रेक होणार. परीस्थीती व्यवस्थित हाताळली नाही तर त्याचे पर्यवसान कशात होईल सागंता येत नाही. भावनाप्रधान लोकांना याचा फार त्रास होतो.
व्यक्त होणे हाच एकमेव उपाय आहे. मिडास राजा व त्याचा नाव्ही ही गोष्ट सर्वाना माहीतीच आहे.
घर आणी ऑफिस किंवा तत्सम जागा या ताण तणावा करता मुख्यत्वेकरून कारणीभूत असतात. दोन्ही नेहमी वेगळ्या ठेवता आल्या तर तणावग्रस्त परीस्थीती हाताळण्यास मदत होते.
तणावग्रस्त परीस्थीतीत मी शांत रहाणे पसंत करतो कारण इतके आयुष्य गेल्यावर एक लक्षात आले आहे की समय सबसे बडा बलवान आहे.
सपने मेरे है मुझेही सवांरने है.तद्वतच तणावग्रस्त परिस्थीती.

नुकताच बेचाळीस इचं टि व्ही माझ्याच हलगर्जी पणा मुळे तुटला. बरेच दिवस त्रास झाला पण गोष्ट हाताबाहेर गेली आसल्याने वेळे जाऊ देणे हाच एकमेव उपाय होता.

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 7:37 pm | कुमार१

१.

रडता येणे ही एक सुपरपॉवर आहे हे समजून घेण्याची गरज आहे, पुरुषांना

>>>>
मुद्दा चांगला आहे. यासंदर्भात काही वाचन केले. रडण्यामुळे प्रत्येक वेळेस विरेचन होतेच का, हा काहीसा वादाचा मुद्दा आहे. या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासही झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष संमिश्र आहेत.
….

2.

घर आणी ऑफिस किंवा तत्सम जागा या ताणतणावा करता मुख्यत्वेकरून कारणीभूत असतात. दोन्ही नेहमी वेगळ्या ठेवता आल्या तर

>>>

योग्य मुद्दा. सहमत.
त्या दोनपैकी कुठल्याही एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणचे विषय टाळलेले बरे असतात.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2022 - 7:49 pm | मुक्त विहारि

टाईम बॅरियर आणि फूड इन्टेक

कामावरून लगेच घरी न जाता, एखाद्या टपरीवर काही तरी खाऊन आणि चहा पिऊन, मग घरी जायचे... मी हाच उपाय करायचो आणि सध्या मोठा मुलगा पण हाच उपाय करत आहे ...

भरलेले पोट असेल तर, मानसिक त्रास कमी होऊ शकतो.

अजून एक उपाय मी करतो... शहाळ्याचे पाणी पिणे...

डिहायड्रेशन किंवा मिनरल्सची कमतरता असेल तर, मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते का?

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 8:10 pm | कुमार१

डिहायड्रेशन किंवा मिनरल्सची कमतरता असेल तर, मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते का?

>>>>

चालत्या फिरत्या व्यक्तीमध्ये असे काही दिसणार नाही. जेव्हा आजारांमध्ये डीहायड्रेशन होते आणि जर त्याचा परिणाम सोडियम व पोटॅशियमच्या रक्तपातळीवर झाला तर मेंदूकार्याशी निगडित काही लक्षणे जाणवतात. जसे की, गोंधळलेली अवस्था, अवधान नसणे, इत्यादी
याला मानसिक त्रास नाही म्हणत.

कुमार१'s picture

8 Mar 2022 - 8:10 pm | कुमार१

डिहायड्रेशन किंवा मिनरल्सची कमतरता असेल तर, मानसिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते का?

>>>>

चालत्या फिरत्या व्यक्तीमध्ये असे काही दिसणार नाही. जेव्हा आजारांमध्ये डीहायड्रेशन होते आणि जर त्याचा परिणाम सोडियम व पोटॅशियमच्या रक्तपातळीवर झाला तर मेंदूकार्याशी निगडित काही लक्षणे जाणवतात. जसे की, गोंधळलेली अवस्था, अवधान नसणे, इत्यादी
याला मानसिक त्रास नाही म्हणत.

चित्रपटाची ओळख आणि मानवी भावनांची घातलेली सांगड आवडली 👍

चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे.

+१०००
निव्वळ मनोरंजक चित्रपट पाहायला आवडत असले तरी काही वेळा चुकून डोक्याला ताप चित्रपटही माझ्या पाहण्यात येतात त्याचे ताजे उदाहरण म्हणजे गेल्या विकएंडला पाहिलेले 'Love Hostel' आणि 'शातीर चोर' (Kazhugu 2) हे दोन भिकार चित्रपट!

अशा द्वंद्वातूनच मग एखाद्या वेळेस एखाद्याची सटकते अन तो सरळ पोलिसाचीच तिथल्या तिथे धुलाई करतो. हेच ते विरेचन.

असा प्रसंग आमच्या डोंबिवलीत पाहिला आहे 😀
फुटपाथवरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला फिट आली म्हणुन रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तात्काळ आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावून त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. अशावेळी लगेच आजूबाजूला बघ्यांची गर्दी गोळा होते तशी तिथेही झाली.
तेवढ्यात वाहतूक पोलिसांची नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या उचलणारी टोईंग व्हॅन आली आणि तिच्यातले कंत्राटी कर्मचारी त्या माणसाची बाईक उचलायला लागले.
बाईकवाला आणि बघे मंडळी त्यांना कारण समजवायचा प्रयत्न करत होते पण वाहतूक पोलीस आणि ती कंत्राटी पोरे काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी एक दोघांनी त्या पोरांची गचांडी धरून त्यांना कानफटावायला सुरुवात केली आणि त्याचे पर्यवसन जमावाने वाहतूक पोलिसासहित सर्व पोरांना बेदम मारहाण करण्यात झाले.
त्या जमवातील एरवी झुरळ मारायला देखील घाबरणाऱ्या कित्येकांनी त्या सगळ्यांना लाथा बुक्क्यानी तुडवून त्यांचे कपडे (वाहतूक पोलिसाचा युनिफॉर्मही) फाडून गाड्या उचलून नेणाऱ्यांबद्दलच्या रागाचे त्या दिवशी 'विरेचन' करून घेतले!

कुमार१'s picture

10 Mar 2022 - 2:16 pm | कुमार१

**असा प्रसंग आमच्या डोंबिवलीत पाहिला आहे
>>> भयानक ... हेच ते विरेचन.

नगरी's picture

10 Mar 2022 - 9:52 pm | नगरी

डॉसा आपण(एक वचनि आदरार्थी, सायकियारिस्ट (दमलो हा शब्द टाईप करताना,जमला नाही)) आहात का?

कुमार१'s picture

11 Mar 2022 - 8:34 am | कुमार१

नाही.
कुतुहल म्हणून काही मानसशास्त्र वाचतो.

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

भारी लेख. असे प्रसंग घडलेले आपण काहीवेळा पाहतो, कधी ऐकतो, कधी वाचतो.

टोकाचा अन्याय झाला की टोकाची भुमिका घेतली जाते. काही वर्षांपुर्वी पंढरपुर येथे रजा नाकारली म्हणून एका पोलिसाने त्याच्या वरिष्ठावर गोळ्या झाडल्या होत्या असे आठवते.
"मुंबई मेरी जान" सिनेमात एक गरिब चहा विक्रेता (इरफान खान) त्याच्यावर पोलिसांची दंडेलशाही आणी एका मॉलमध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे त्या मॉलमध्ये बॉम्ब ठेवला आहे असा फोन करतो. यंत्रणेची घावपळ बघून त्याला सुड उगवल्याचे समाधान मिळते.

वाहतुक पोलिसांच्या दंडेलशाहीला कंटाळुन (विशेषतः वाहने क्रेन ने उचलण्याच्या) एका प्रसिद्ध डॉक्टरने "रस्त्यावरचे बकासुर" अश्या मथळ्याचा उपरोधिक लेख सकाळमध्ये लिहिला होता. तो वाचून मलाही विरेचन झालयाचे समाधान झाले होते. त्याच भावनेत तो लेख मी कित्येकांना फॉरवर्ड केला होता !

कुमार१'s picture

11 Mar 2022 - 8:36 pm | कुमार१

*"वाचून मलाही विरेचन झालयाचे समाधान झाले होते. त्याच भावनेत तो लेख मी कित्येकांना फॉरवर्ड केला होता !>>>
हा विरेचनप्रसार आवडला !

जेम्स वांड's picture

15 Mar 2022 - 12:47 pm | जेम्स वांड

मध्ये मध्ये हिंसकही होतात

लेटेस्ट बातमीनुसार बीएसएफच्या अमृतसर येथील खासा कॅम्प मुख्यालयात एका कॉन्स्टेबलने आपल्या सहकाऱ्यांवर ड्युटी व्हेपनने फायरिंग करून ५ लोकांचा जीव घेतला आणि इतर काही जखमी केले,

मला वाटते लष्करात वगैरे विरेचन अहिंसक पद्धतीने पूर्ण करायला काहीतरी मार्ग किंवा ट्रेनिंग किंवा वर्कशॉप काळानुसार ऑर्गनाईज केले गेले पाहिजेत नाहीतर असे हिंसक प्रसंग रिपीट होत राहतील.

कुमार१'s picture

19 Mar 2022 - 11:27 am | कुमार१

तशीच एक बातमी:

"

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची १०१ वेळा चाकूने भोसकून हत्या; ३० वर्षांपूर्वीचं कारण ठरलं निमित्त"

https://www.loksatta.com/desh-videsh/ex-student-stabs-teacher-101-times-...
>>>>

असे भयानक कृत्य करण्याऐवजी त्या माणसाने आधी अन्य मार्गाने भडास काढली असती तर बरे झाले असते, असे वाटून गेले.

कुमार१'s picture

22 Mar 2022 - 4:36 pm | कुमार१

गेले तीन दिवस मला लॅपटॉपवरून प्रतिसाद देता येतच नव्हता.
संपूर्ण लिहिलेला प्रतिसाद टिचकी मारल्यावर पान गायब व्हायचे.
https हे दुरुस्त केलेले दिसते आहे

धन्यवाद !

कुमार१'s picture

13 May 2022 - 10:09 am | कुमार१

मनोविकारग्रस्त ही मात्र अधिक वाईट अवस्था आहे. ही माणसे सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात.
>>>
या संदर्भातील काही नवे संशोधन वाचनात आले.

अशा लोकांच्या मेंदू मधला striatum हा विशिष्ट भाग सामान्य माणसापेक्षा अधिक मोठा असतो. त्याचा संबंध या लोकांच्या उसळून वागण्याच्या स्वभावाशी असावा असे दिसते.
मेंदूच्या आशा विशिष्ट रचनाबदलांमध्ये अनुवंशिकतेचाही भाग असतो.

कुमार१'s picture

25 Jun 2022 - 5:57 am | कुमार१

पोलिसांनी नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचे अजून एक उदाहरण:

परंतु या घटनेत संबंधित तरुणांनी अतिशय सभ्यपणे आणि नियमाने वागून पोलिसाची बोलती बंद केली.
(भावनिक स्फोट न होऊ देता, हे विशेष)