सामना (३)

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
27 Feb 2022 - 8:10 pm

सामना (३)
(पूर्वसूत्र: वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात सव्वीस जानेवारीला होणारे क्रिकेट सामन्यासाठी,अनेक अडचणींना सामोरे जात न्यायाधीश संघाने तयारी केली आहे.आणि सामन्याचा दिवस .)
    शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला.झेंडावंदनानंतर
साडेदहा वाजता,वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना होणार होता.तालुक्याहून ठोंबरे व आणखी दोन न्यायाधीश
( दि.न्या.क.स्त) हे संघातील खेळाडू वेळेत पोहचले होते.सामन्यासाठी मैदान सज्ज झाले होते.मंडप  उभारलेला होता.तो वकील,न्यायाधीश,त्यांचे कुटुंबीय,
कर्मचारी यांच्या उपस्थितीने भरला होता.पंचगिरी करण्यासाठी दोन स्थानिक क्रिकेट प्रशिक्षक आले होते.
सामना सुरू होण्याआधी अल्पोपाहार झाला.
सामन्यानंतर स्नेहभोजन ही होणार होते.
  कुमठेकराचे नेतृत्वाखालील न्यायाधीश संघ आणि  टेकाडे वकीलांचे नेतृत्वाखालील वकील संघ तयार
होऊन मैदानावर आले.एक दिवसीय सामन्यासाठी रंगीत कपडे वापरायची पध्दत होती.सगळ्यांनी निळ्या रंगाचे टीशर्ट्स पँट घालावेत अशी कुमठेकराची इच्छा होती.
पण ते सोडल्यास इतरांकडे तसे कपडे नव्हते.आणि फक्त दोन चार तासासाठी ते खरेदी करायची कुणाचीच इच्छा नव्हती. ते परवडणारे ही नव्हते.पांढरे शर्ट पँट सगळ्यांकडेच होते त्यामुळे तोच गणवेश ठरला.
वकीलांचाही तो चगणवेष. दोन्हीकडून खेळाडूंची  पादत्राणे मात्र ,स्पोर्ट्स शूज,चप्पल,सॅडलअसे बहुढंगी बहुरंगी होते.न्यायाधीश संघात दोन खेळाडू कमी होते.तर वकील संघात,खेळाडू सरप्लस होते.त्यांचे दोनतीन खेळाडू न्यायाधीश संघाला द्यायला टेकाडे तयार होते.
पण कुमठेकरांनी नकार दिला.आहे तेवढ्यानिशीच लढू असा त्यांचा बाणा होता.शेवटी मामांचा भाच्चा आणि बादाडे शिपाई यांना न्यायाधीश संघातून खेळवण्याची सुचना वकील संघानेच केली .ती कुमठेकरांनी मान्य केली.गंभीरे वकीलांनी यावर नाराजी व्यक्त केली.पण तिकडे  कुणी लक्ष दिले नाही.
   सामना सुरू होण्यापूर्वी,सन्माननीय पाहूणे म्हणून, रोंगे साहेब आणि वकील संघाचे अध्यक्ष काकडे यांनी पिचची पुजा केली.रोंग्यांनी नारळ वाढवला.आणि ते उद्घाटनासाठी बॅट घेऊन सज्ज झाले.काकडेंनी चेंडू टाकला.पण तो अर्ध्या पिचपर्यंतच जाऊन थांबला.
रोंग्यांनी बॅट हवेत फिरवली.चेंडू तिथपर्यंत पोचलाच नाही.त्यामुळे फटका मारायची त्यांची इच्छा तशीच राहिली.त्यांना बॅटींग केल्याचा फील द्यावा म्हणून स्वतः टेकाड्यांनी नेम धरून त्यांचे बॅटवर येईल अशा बेताने चेडू टाकला.त्यांनी बॅट फिरवली.बॉलची बॅटशी ओझरती भेट झाली.सर्वानी टाळ्या वाजवल्या .मग काकड्यांनी बॅट हाती घेतली. रोंग्यांनी चेंडू टाकला. पुन्हा तेच झाले.अर्ध्यावरती चेंडू थांबला. काकडेंची बॅट हवेतच फिरली. मग तांब्यांनी चेंडू टाकला.तो काकड्यांनी तटवला .पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
   खेळाडू आणि पाहूणे सगळेच एकमेकांना चांगलेच 'ओळखून'होते.तरीही उभय संघातील खेळाडूंचा
परीचय करून देण्याचा सोपस्कार पार पडला.अशा रितीने उद्घाटन सोहळा पार पडला. पाहुणे मंडळी मंडपात जाऊन बसली.
  नाणेफेकीसाठी दोन्ही पंच व कर्णधार मैदानावर गेले. पांढरे कपडे,पांढरी कॅप,पांढरे बुट अशा वेषातील कुमठेकरांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.न्यायाधीश संघाचे तांबे व ढवळे मैदानावर फलंदाजीला आले.वकील संघासहीत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.आणि सामन्याला सुरुवात झाली.
खेळताना वकील काय अन न्यायाधीश काय,वास्तविक जीवनातील भुमिकेतून खेळाडूंच्या भुमिकेत शिरले.
रोज,'माय लॉर्ड,युवर ऑनर' म्हणत ,ज्यांच्यासमोर डोके झुकवतो,त्यांच्यावर कुरघोडी करायची संधी वकील कसे सोडणार? गोलंदाजांनी वेगवान मारा सुरू केला .पण तांबे त्यांना पुरून उरले.ढवळे मात्र थोड्याच वेळात स्वस्तात परतले.खेळ रंगू लागला.फलंदाजी करताना,
धावा घेताना,पळताना फलंदाजांची होणारी गडबड धांदल पाहून प्रेक्षकांचे मनोरंजन होत होते.
  देशपांडे वकील मिमिक्री करत.अशोककुमार ते सुनील शेट्टी आणि दादा कोंडके ते अशोक सराफ यांच्या  आवाजाची नक्कल करत,खेळाडूंना,अझरुद्दीन,मनोज प्रभाकर,श्रीनाथ,कुंबळे,असे क्रिकेटपटूंच्या नावे संबोधून,ते धावते समालोचन करत होते.
   जवांदे( दि.न्या.व.स्त.)पण कॉलेजात असताना मिमिक्री करायचे.ते दिवस त्यांना आठवले.आपल्यातले छुपे गुण लोकांना दाखवावे हे त्यांच्या मनी आले व त्यांनी
माईक हाती घेतला.'येरे येरे पावसा तुला देतो पैसा 'हे गाणे वेगवेगळे गायकांचे आवाजात म्हणणे,ही त्यांच्या मते, त्यांची स्पेशालिटी होती.तेच करावे असे त्यांचा  विचार होता.क्रिकेट सामन्याचे वेळी गाणे म्हणणे योग्य  नाही असे शेजारी बसलेले जगनाडे म्हणाले.म्हणून नाईलाजाने तो विचार सोडून द्यावा लागला.मग त्यांनी धावते वर्णन सुरू केले आणि हा कुणाचा आवाज आहे,ते ओळखायला सागितले.त्यांच्या नेहमीचे आवाजाहून हा आवाज वेगळा होता यावर सगळ्याची सहमती होती.पण तो आवाज कुणाचा आहे याविषयी मात्र मतभिन्नता होती.राजेशखन्ना, राजेंद्रनाथ,धर्मेद्र,
अमिताभ,शत्रुघ्न सिन्हा,असराणी आदी अनेक नटांच्या आवाजाशी त्याचे साम्य असल्याचे विविध प्रतिक्रिया वरून वाटले.शेवटी त्यांनीच तो अमरीश पुरीचा आवाज असल्याचे जाहीर केले.मग अनेकांना तसेच वाटू लागले.लोकांनी जोरात टाळ्या वाजवून कौतुक केले.तेव्हा पुरे म्हणून त्यांनी माईक परत देशपांड्यांना दिला. पण खुर्चीवर बसून शेजारचे प्रेक्षकांना 'येरे येरे  पावसा'  वेगवेगळ्या आवाजात म्हणून दाखवले.तेवढेच होते तर ठीक, पण प्रत्येक वेळेस' हा कुणाचा आवाज हे ओळखून दाखवा 'हे  गाणे  ऐकण्यापेक्षा जास्त त्रासदायक होते.काही वेळात ते स्वतःच दमले.आणि आजूबाजूचे लोकांनी हुश्श केले.
इकडे खेळ सुरूच होता.एवढ्यात दोन विकेट पडल्या होत्या. आता कुमठेकर खेळायला आले.ते  येताच,'सचीन तेंडुलकर फलंदाजीला आले,'असे देशपांड्यांनी म्हणताच,टाळ्या,शिट्टया,हशा,आणि सोबत,
'सचीन सचीन 'असा घोष सुरू झाला.कुमठेकराना
कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.त्यांनी स्टांस वगैरे घेतला.पिचवर बॅटने ठाकठोक केली.'चांगली धावसंख्या करायची जबाबदारी आपली आहे' असे समोर असलेल्या तांबे कडे जाऊन बोलले.फलंदाजी करत त्यांनी पूर्ण एक ओवर खेळून काढली.पण प्रत्येक वेळी चेंडू,त्यांना व त्यांच्या बॅटला चुकवून मागे जाई .प्रत्येक वेळेस, तो वाईड बॉल आहे असे त्याचे मत असे.आणि पंचाना तसे सांगत. वाईड बॉल घोषित करावा या त्यांचे विनंतीकडे  पंच दुर्लक्ष करत.प्रत्येक वेळेस त्यांचा पारा चढे. त्या षटकातील शेवटच्या चेंडूचा त्यांचे बॅटला नाही  पण स्टम्पला मात्र स्पर्श झाला,आणि ते उखडून पडले.म्हणजे स्टम्प. अशा वेळी त्यांना बाद देण्याशिवाय दुसरा पर्याय पंचांकडे नव्हता. पंचाने बोट वर केले. कुमठेकर पण उखडले.तो चेंडू नोबॉल होता अशी  कुमठेकरांची खात्री होती.ते त्यांनी पंचाना पटवून देण्याचा निष्फळ प्रयत्न केला.पण उपयोग झाला नाही.नाईलाजाने,नाराजीने,रागात बॅट आपटत ते परतले.चुकीच्या  निर्णयाने आपला कसा बकरा केला असे ते रोंग्यांना आणि इतरांना सांगू लागले.' टेक इट इजी.इट्स ए गेम आफ्टर ऑल',म्हणत  रोंग्यांनी त्यांना शांत केले.काकडे वकील व इतरांनी त्यांना सहानुभुती दाखवली.पहिले चार चेंडू छान डिफेन्सीव खेळून काढले असेही काकडे म्हणाले.कुमठेकरांना बरे वाटले.

   पुढे खेळ सुरू राहिला.विकेट पडत गेल्या.पंचांची कामगिरी वाईट आहे हे कुमठेकरांचे मत आणखी  दृढ होत गेले.या वेळी न्यायाधीश संघाला नाजूक परिस्थितीतून बाहेर काढायला न्यायाधीश नसलेले, भाच्चा,आणि बादाडे धावून आले.त्यांची फटकेबाजी आणि तांबेची खेळी यामुळे संघाने नव्वदी गाठली.शेवटी
सत्त्यान्नव धावात न्यायाधीश संघाचा डाव संपला.
   मग चहापान झाले.आता वकील संघाची फलंदाजी होती.न्यायाधीश संघातील खेळाडू क्षेत्ररक्षणाला सज्ज होण्यासाठी  हलका व्यायाम करू लागले.थोड्या वेळात पुन्हा खेळ सुरू झाला.कुमठेकरानी सर्व खेळाडूंचे गोल रिंगण करून त्यांना युक्तीच्या चार गोष्टी सागत,' वुई हॅव टू विन,वुई क्या विन,'म्हणत त्यांचा उत्साह वाढवला.
वकील संघाचे आघाडीचे फलंदाज चांगले फटकेबाज होते.तांबे आणि  ढवळे गोलंदाज होते.पण दोघांचीही धुलाई होउ लागली.वकील संघाची धावसंख्या वाढू लागली.चेंडू मागे पळताना,चेंडू अडवताना क्षेत्ररक्षकांची दमछाक होऊ लागली.कधी क्षेत्ररक्षकाचे बाजूने तर कधी त्यांचे दोन्ही पायामधून,त्यांना हुलकावणी देत चेंडू पळू लागला.कुमठेकरांची चिडचिड वाढू लागली.अशात उंच उडालेला एक झेल ढवळेच्या हातून सुटला.तेव्हा कुमठेकरांचे चेह-यावरील हावभाव प्रेक्षणीय होते. 'कॅचेस विन मॅचेस, कॉन्संट्रेट,कॉन्संट्रेट 'असे ते ओरडले.नेमका पुढच्याच चेंडूवर एक सोपा झेल त्यांच्या दिशेने आला .'कॅच ,कॅच' असे दोघेतिघे एकदम ओरडले.त्यांनी वर पाहिले.झेल घेण्यासाठी हात वर केले.
पण चेंडू त्यांचे हातात नाही तर पुढ्यात पडला.लगेच त्यांनी आकाशाकडे पाहून डोळ्यावर सूर्य आल्याने झेल सुटल्याचे दाखवून दिले.ते तरी काय करणार? शिवाय इतरांच्या ओरडण्याने त्यांचे लक्ष विचलित झाले होते, ते वेगळेच. आता जमलेली जोडी फोडणे आवश्यक होते. ढवळे,तांबेशी विचार विनिमय करून,कुमठेकर स्वत: गोलंदाजीला आले.पण त्यांचे चेंडू फटकावले जाऊ लागले.चेंडू ज्या दिशेला टोलावला तिथे क्षेत्ररक्षक ठेवला,की क्षेत्ररक्षक काढल्याने रीकाम्या झालेल्या दिशेने पुढचा फटका जाई.खेळपट्टी आपल्या फिरकीला अनुकूल नाही म्हणून असे होतंय,असे त्यांचे मत झाले.तेव्हा  त्यांनी पुन्हा गोलंदाजीत बदल केला.बादाडे आणि भाच्चा यांच्या हाती चेंडू दिला.ही योजना मात्र कामी आली.त्यांचे गोलंदाजीवर तीनचार विकेट लागोपाठ पडल्या.तरीही वकील संघच जिकणार असे चित्र स्पष्ट दिसत होते.कुमठेकरांची वाढलेली चिडचिडही स्पष्ट दिसत होती.ती मैदानावर नाही तर मंडपातील  मंडळीनाही  दिसत होती .नंतर काय जादू झाली कोण जाणे ?गोलंदाजी खेळणे,धावा काढणे अवघड होवू लागले.फलंदाज बाद होत गेले.शेवटी अशी वेळ आली की शेवटची जोडी मैदानात आणि शेवटचे षटक सुरू.
त्या शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी हव्या होत्या फक्त दोन धावा.सगळ्या पडझडीत एक बाजू लावून धरणारे गंभीरे मात्र अजून टिकून होते.समोर फलंदाजीला गोळे वकील होते.शेवटचे षटक टाकायला ठोंबरे सज्ज झाले. कुमठेकरांनी त्यांच्याशी सल्लामसलत केली.ठोंब-यांचे चेंडू चांगले पडले,की गोळेंना खेळता आले नाहीत,
त्यांनाच माहित.पण पहिल्या पाच चेंडूवर एकही धाव निघाली नाही.त्यांनी मारलेले पाचही चेंडू जवळचे क्षेत्ररक्षकाचे हातातच गेले.त्यामुळे अस्वस्थ झालेले गंभीरे,सारखे गोळ्यांवर ओरडत होते.आता शेवटचा चेंडू बाकी होता.आणि सामना रंगतदार स्थितीत आला होता.
सगळ्यांची उत्कंठा वाढली होती. कुमठेकर पुन्हा ठोंब-याकडे गेले. चर्चा झाली. मग ठोंबरेंनी शेवटचा  चेंडू टाकला.तो बॅटला लागून मागे गेला व कुमठेकरांचे दोन्ही पायातून मागे पसार झाला. गंभीरे  जोरात पळाले.
गोळ्यांनाही धावावे लागले.आता दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली.सत्त्यान्नव .विजयासाठी फक्त एक धाव हवी होती. ती धाव घेण्यासाठी गंभीरे वळले,पळू लागले .पण नेमके तेव्हाच गोळ्यांनी पिचवरच बसकन मारली.पाय चोळू लागले. परीणामी दोन्ही फलंदाज एकाच बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली.तेवढ्यात बादाडेने चेंडू पकडला व घेवून धावतच स्टंप जवळ आला.तो स्टंप उडवणार,तेवढ्यात कुमठेकरानी त्याचेकडून चपळाईने चेंडू हातात घेवून स्टम्पला लावला. परीणामी गोळे रन आऊट.वकील संघाला विजयी धाव काढता आली नाही.दोनही संघाची धावसंख्या समान असतानाच सामना संपला.काय झाले कुणालाच कळाले नाही.सामना 'टाय'झाला असे पंचांनी घोषित केले. ते कळताच न्यायाधीश संघातील सगळ्यांनी एकच जल्लोष केला.हरता हरता सामना जिंकला याचा आनंद वेगळाच होता.
गंभीरे हताश होऊन गोळेला शिव्या घालत होते.'काय करू पायात गोळे आले',असे सांगत गोळे परतले.गंभीरे संशयाने त्यांच्याकडे पाहात होते.नेमके शेवटच्या धावेला गोळेच्या पायात गोळे कसे आले ते त्यांना कळत नव्हते.

' निकाल काहीही लागो,सामना मात्र रंगतदार झाला.दोन्ही संघ  विजेते.हे खूपच छान झाले ',असे म्हणत पारितोषिक वितरणाचे वेळेची रोंग्यांनी दोन्ही  संघांच्या खिलाडू वृत्तीचे खूप कौतुक केले.काकड्यांनी कुमठेकरांच्या नेतृत्व गुणाची प्रशंसा केली.सर्व खेळाडूंना सन्मान चिन्हे देण्यात आली.फोटोग्राफर बोलावलेला होता.त्याने फोटो काढले. स्नेहभोजना दरम्यान,आणि नंतरही  कुमठेकर,आपण वेळोवेळी गोलंदाजीत आणि  क्षेत्ररक्षणात कसे बदल केले हे आजूबाजूच्यांना सांगत होते .
चॅम्पियनशीपची ट्रॉफी दोन्ही संघात विभागून होती पण टेकाड्यांनी ती कुमठेकरांचे स्वाधीन केली.ती ट्रॉफी,अन उंचावलेल्या हातात ट्रॉफी घेतलेल्या कुमठेकराचे छायाचित्र,अनेक वर्षे त्यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होते.
    कुमठेकर निवृत्त होवून पंधराहून जास्त वर्षे झाली असावीत.अजूनही सव्वीस जानेवारी आली की त्यांना त्या 'रोमहर्षक 'सामन्याची आठवण होते. ते आपल्या  नातवंडांना त्या सामन्याची ,आणि आपण चपळाईने शेवटच्या चेंडूवर,शेवटचा गडी कसा बाद केला,याची कथा ते सांगत असतात.पण अजूनही त्यांना सामन्या दरम्यान नेमके शेवटच्या धाव घेताना गोळेच्या पायात गोळे कसे आले ते लक्षात येत नाही.
                                   (समाप्त )
                                नीलकंठ देशमुख

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

27 Feb 2022 - 9:37 pm | कुमार१

छान झाली सामन्यांची मालिका.

नीलकंठ देशमुख's picture

1 Mar 2022 - 8:33 am | नीलकंठ देशमुख

सामना आवडला. छान वाटले

विजुभाऊ's picture

27 Feb 2022 - 9:57 pm | विजुभाऊ

मजा आली

नीलकंठ देशमुख's picture

1 Mar 2022 - 8:34 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

श्रीगणेशा's picture

27 Feb 2022 - 11:56 pm | श्रीगणेशा

खूप छान झाला हाही भाग!
कुमठेकरांचं पात्र छान रंगवलं आहे.. उत्साही, थोडंसं चिडखोर, आपल्यावर अन्याय होतोय असं वाटून घेणारं. आवडलं.

नीलकंठ देशमुख's picture

1 Mar 2022 - 8:34 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले

सौंदाळा's picture

28 Feb 2022 - 11:13 am | सौंदाळा

भारी, मज्जा आली वाचताना.

नीलकंठ देशमुख's picture

1 Mar 2022 - 8:35 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे.

नीलकंठ देशमुख's picture

1 Mar 2022 - 8:35 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे.

श्रीरंग_जोशी's picture

1 Mar 2022 - 9:46 am | श्रीरंग_जोशी

या ललित मालिकेतंलं व्यतिचित्रण लाजवाब आहे. अनेक व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या.
क्रिकेट हा खेळ बघायला खूप मजा येत असली तरी गल्ली क्रिकेट सोडल्यास अचानक सीझन बॉलने खेळायचा सराव करणे हे खूप आव्हानात्मक असते असा माझा स्वानुभव आहे. त्याचा प्रत्यय या लेखनातल्या घडामोडींतून येतो.

नीलकंठ देशमुख's picture

2 Mar 2022 - 8:52 pm | नीलकंठ देशमुख

खूप छान वाटले प्रतिक्रीया पाहून.

नीलकंठ देशमुख's picture

2 Mar 2022 - 8:56 pm | नीलकंठ देशमुख

खूप छान वाटले प्रतिक्रीया पाहून.असे प्रतिसाद वाचून हुरूप येतो

बेकार तरुण's picture

1 Mar 2022 - 11:38 am | बेकार तरुण

मजा आली...
काही कार्यालयीन सामन्यात कुमठेकर पाहिले आहेत अन हुषार गोळेही.... त्यामुळे खूप रीलेट झाले

नीलकंठ देशमुख's picture

2 Mar 2022 - 8:54 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
कुमठेकर, गोळे सगळीकडेच असतात.तुम्हीपण अनुभवले आहेत वाचून गम्मत वाटली

चौथा कोनाडा's picture

3 Mar 2022 - 12:22 pm | चौथा कोनाडा

सामना आवडला. मजा आली वाचताना !

|| पुढील सामन्याच्या प्रतिक्षेत ||

नीलकंठ देशमुख's picture

15 Mar 2022 - 10:58 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

मुक्त विहारि's picture

15 Mar 2022 - 3:08 pm | मुक्त विहारि

गोळे वकील, हुषार आहेत

पाण्यात राहून, माशांशी वैर घेऊ नये

नीलकंठ देशमुख's picture

15 Mar 2022 - 4:19 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. असे चातुर्य फार कामी येते. विशेष तः वकिलीत