सामना (२)
( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.)
स्वागत समारंभ असो,निरोप समारंभ असो वा बाररुम मधला कार्यक्रम,कुमठेकरांनी बोलण्याची ठराविक पध्दत विकसित केली होती.न्यायाधीश,त्यांचे समाजातील स्थान,त्यांचे न्यायालयातील आणि न्यायालयाबाहेरील वर्तन कसे असावे यावर श्रोत्यांचे किमान पाच मिनिटे प्रबोधन केल्याशिवाय मुळ विषयाकडे त्यांची गाडी वळत नसे.तो प्रबोधनाचा भाग,त्यातील उदाहरणांसह,बहुतेकांना पाठ होता.
त्यामुळे तो संपेपर्यंत बहुतेक सर्वजण आपण फार लक्षपूर्वक ऐकतो आहोत असे भासवत,आपापल्यातच मग्न होते.काही जण टेबलाखालून एकमेकांना हाताचे स्पर्शाने ,'ये तो होना ही था,'अशा आशयाचा शब्देवीण संवाद साधत होते.शेवटी एकदाचे कुमठेकर मुळ मुद्द्यावर आले .समस्तांनी निश्वास सोडला.
" मागच्या दोन वर्षी जे झाले ते काही योग्य नव्हते.
आपण काहीच सिरियसली घेतले नाही.मागील वर्षीतर फक्त चारच धावांनी हरलो.दोन ओवर मधे सात धावा करू शकलो नाहीत.काय शान राहिली?वकील संघाने आपल्या नाकावर टिच्चून चॅम्पियनशीप जिंकली.यावर्षी तसे होता कामा नये.वुई मस्ट विन!वगैरे वगैरे.
एकंदरीत आजच्या अजेंड्यावर,दरवर्षी सव्वीस जानेवारीला वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ
(बार विरुद्ध बेंच ) मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्याचा विषय आहे हे सर्वांच्या ध्यानात आले.शेरेकरांनी मामांकडे आणि मामांनी शेरेकरांकडे एकाच वेळी पाहून,अर्थपूर्ण कटाक्षांची देवघेव केली .
थोड्याच दिवसावर सामना आला होता.कुमठेकर,
न्यायाधीश संघाचे पदसिद्ध आणि स्वघोषित कर्णधार होते.त्यामुळे संघनिवड,सराव,फलंदाजीचा क्रम,योजना इ.महत्त्वाचे विषय त्यांचे डोक्यात होते.त्या प्रत्येक बाबींवर ते सविस्तर बोलणार होते.तेव्हा न्यायाधीश भगिनींची चुळबुळ सुरू झाली.'आम्ही तर खेळणार नाही, मग आम्ही गेले तर चालेल का?'असे हळूच कुणी तरी विचारले.कुमठेकर त्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. टीम स्पिरीट म्हणून काही असते वगैरे ते बोलणार होते.
पण मामांनी हस्तक्षेप केला व भगीनींची सुटका झाली. "सामन्याचे वेळी पाठींबा द्यायला तरी नक्की या" असे कुमठेकरानी त्यांना सांगितले.भगिनींना परवानगी मिळताच ,काही बंधू पण जाण्याची अनुज्ञा मागू लागले. कुणाला क्रिकेटचा अजिबात अनुभव नव्हता,गोडी नव्हती.कुणाला बिपी,डायबेटिस मुळे खेळणे शक्य नव्हते. कुणाचा खांदा निखळलेला होता.पाच सहा तरुण आणि काही प्रौढ सोडता,बाकी सगळेच घरी जायला उत्सुक होते.शेवटी वैयक्तिक अडचणींचा, स्वतंत्रपणे विचार करून ,सहा सात जणांना घरी जायची परवानगी देण्यात आली.उरलेल्यां पैकी मामा आणि आणखी दोघे खेळणार नव्हते.पण मॉरल सपोर्ट म्हणून ते थांबले.उपस्थितांमधे केवळ आठच खेळाडू होते.पण वेगवेगळ्या तालुक्याचे ठिकाणी असलेले किमान तीन चार न्यायाधीश कधीतरी क्रिकेट खेळले होते.त्यांची सहमती गृहीत धरुन त्यांचाही समावेश संघात करायचे ठरले .आणि पुढे चर्चासुरू झाली.म्हणजे कुमठेकर बोलत होते व बाकीचे ऐकत होते.
कुमठेकरांना अगदी लहानपणापासून क्रिकेटची आवड आणि भरपूर माहिती होती.रेडीओ आणि नंतर टीव्हीवर समालोचन ऐकून ऐकून ,त्यांचे ज्ञानात खूप भर पडली होती.स्विंग,बाऊन्सर,लेगब्रेक,ऑफब्रेक,गुगली चेंडू
कसे टाकायचे,हाताची ॲक्शन कशी हवी,तसेच फलंदाजी करताना बॅटची ग्रीप कशी हवी,पायाची हालचाल कशी असावी,स्टांस कसा हवा,कुठला चेंडू कसा खेळावा,कसा ओळखावा इ.सर्व गोष्टी त्यांना तोंडपाठ होत्या.टीव्हीवर सामने सुरू असताना खेळाडूंच्या चुका शोधून काढणारा त्यांच्यासारखा तज्ञ
शोधून सापडला नसता.
शाळेत असताना ते गल्ली क्रिकेट भरपूर खेळले होते.
पण शाळाच काय वर्गाच्या संघात ही कधी त्यांना घेतले जात नसे.त्यासाठी वशीलेबाजी हे एकमेव कारण होते,
असे त्यांच्या स्पष्ट मत होते.कॉलेजात असताना क्रिकेट सामन्यात त्यांचा सहभाग स्कोअरर म्हणूनच असे.
बालपणी त्यांच्या अष्टपैलू टॅलंटला संधी मिळाली नव्हती.
आता वार्षिक महोत्सवी सामन्यांचे निमित्ताने त्या टॅलेंटला वाट देण्याचा ते भरपूर प्रयत्न करत.मागचे दोन वर्षी झालेल्या सामन्यात त्यांनी अनुक्रमे एक व शुन्य धावा काढल्या होत्या.त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. एकदा समोरच्याने रनआऊट केले.दुस-या वेळेस पंचाने चुकीने आऊट दिले होते.दोन्ही सामन्यात त्यांनी कर्णधार म्हणून उत्तम डावपेच आखले होते.इतरांनी त्यास अनुरूप खेळ केला नाही म्हणून दोन्ही वेळेस पराभव झाला,असे त्यांचे स्पष्ट मत होते व ते त्यांनी विस्ताराने मिटींगमधे मांडले.ते ऐकताना बाकीच्यांची आपसात नेत्रपल्लवी सुरू होती.त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व
प्रतिपादन पुढे चालूच ठेवले.ते ऐकून कंटाळलेल्या काट्यांनी,पुर्वी झाले ते झाले,आता काय करायचे ते सांगा म्हणत चर्चा पुढे नेली.मग आघाडीला फलंदाजी कोण,गोलंदाजी कोण करणार ,हे ठरले.तांबें आणि ढवळेनी कॉलेजातआणि वकीलीत,आंतरजिल्हा
स्पर्धा खेळल्या होत्या.ते दोघे आघाडीचे फलंदाज होते. तांबे मिडीयम फास्ट बोंलीग पण करायचे. त्यांचे साथीला तालुक्याचे ठोंबरेना बॉलीग द्यायची होती.बहुतेक कर्णधार स्वतः, तिस-या,चवथ्या क्रमांकावरच खेळतात,म्हणून कुमठेकर स्वतः मधल्या फळीत (टू डाऊन)येणार होते आणि स्पीन बॉलीग करणार होते.इतरांचे क्रम पण ठरले.विकेट किपिंग कोण करणार हे नंतर ठरणार होते.
घारे वकील,अध्यक्ष असलेल्या संस्थेचे कॉलेज न्यायालया शेजारी होते.त्या कॉलेजचे मैदानावर सरावाची परवानगी होती.क्रिकेटचे कीट पण कॉलेज मधून दरवर्षी मिळत असे.त्यामुळे त्यात अडचण येत नसे.
उद्यापासून सकाळी संध्याकाळी तिथे सरावासाठी जमायचे ठरले.बाहेरगावच्या न्यायाधीशांना उद्या फोनवर निरोप द्यायचा व त्यांना रवीवारी सरावासाठी यायची सुचना द्यायची होती.हे काम ढवळे करणार होते. एक॔दरीत अशी सर्व तयारी झाल्यावर,बैठक एकदाची संपली.तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.
दुस-या दिवशी सकाळी साडेसहा वाजताच कुमठेकरांनी,न्यायाधीश वसाहतीतील अनेकांची दारे ठोठावून,अनेकांची झोपमोड केली.नियमितपणे फिरायला जाणारी मंडळी आधीच उठून घराबाहेर पडली होती.प्रश्न झोपेत असलेल्यांना जागे करायचा होता.
आधीच्या रात्री घरी यायला उशीर झाला होता.त्यामुळे झोपायला ही उशीर झालेला.शिवाय सगळे सूर्यवंशी! अशात इतक्या सकाळी दारावर कुमठेकरांची ठकठक ऐकून,सकाळी सकाळीच ही काय कटकट आहे असे वाटले नसते तरच नवल.मग अचानक कुणाचे डोके तर,कुणाची दाढ दुखू लागली.कुणाला अंगात कणकण वाटू लागली.त्यांना सरावासाठी जाणे शक्य नव्हते. पण या सबबी न सुचलेल्या पाच सहा गाफील भिडूंना घेऊन कुमठेकर मैदानावर पोहचले.कॉलेज मधून क्रिकेटचे कीट मिळणार होते.पण तिथे पोचल्यावर,आपण तो निरोप कॉलेजात दिलेलाच नाही हे ढवळ्यांच्या लक्षात आले.त्यांनी चतुराईने या गफलतीचा दोष कॉलेजचे लोकांचे माथी मारला.कुमठेकरांचा पारा चढला.पण काय करणार?नुसते बसण्यापेक्षा मैदानाला धावत चकरा मारू या,असे त्यांनी सुचवले.ते ऐकून अनेकांच्या पोटात गोळे उठले.कुमठेकरांनी पळायला सुरुवातही केली. लहानपणी पळापळी केली होती.आता मात्र कुणालाच धावायची सवय नव्हती.इतक्या वर्षानंतर एकदम कसे धावणार?पण कुमठेकरांना कोण सांगणार?आणि त्यांनी ऐकून तर घ्यायला हवे नं!
'आलीया भोगासी असावे सादर 'म्हणत,कुरकुरत , दोघातिघांनी आपापले पाय उचलले.इतरांनी,बुटांचे बंद बांधत,सोडत वेळकाढूपणा सुरू केला.त्यांची ही ट्रिक कामी आली.कारण अंदाजे शंभर पावले पळाल्यावर कुमठेकरांचा वेग मंदावला.ते धापा टाकू लागले.
पळण्याचा व्यायाम झेपणार नाही हे त्यांनी जाणले.मागे पाहिले तर दोघे तिघे चालत येत होते.बाकीच्यांची बुटाच्या नाड्यांची बांधाबांध चालूच होती .
'हे काय मी एकटाच धावतोय.तुम्हाला कुणाला इंटरेस्ट नसेल तर राहू द्या.आज साधे व्यायाम करू',असे म्हणत धावाधावीला पूर्ण विराम देवून,हात,पाय,कंबर,
मान इत्यादी अवयवांच्या हालचाली सुरू केल्या.उभ्याने, बसून आणि शेवटी पडून.हे तुलनेने सोपे होते. थोड्याच वेळात मंडळी त्यालाही कंटाळली.व्यायामानंतर
शवासन करणे गरजेचे असते असे कुठेतरी वाचल्याचे कुणालातरी आठवले.मग त्यांनी त्या हिरवळीवर उताणे पडून शवासन सुरू केले.सगळ्यांनाच ही कल्पना भारी आवडली.त्यांनी लगेच अनुकरण केले.शवासनाचे रुपांतर निद्रासनात केव्हा झाले हे कळलेच नाही.ते बराच काळ चालू राहीले असते.पण मैदानात मुलांची क्रिकेट मॅच चालू होती.त्यातल्या फलंदाजाने भिरकावलेला एक टेनीस चेंडू, कुमठेकरांच्या अंगावर येवून आदळला.या अनपेक्षित दणक्याने त्यांचे आसन भंगले आणि ते ओरडले.ते ऐकून बाकीचे ही आपापले आसन सोडून बसते झाले.चेंडू मागोमाग एक मुलगा पळत पळत तिथे आला,आणि काही कळायचे आत चपळाईने चेंडू घेवून पळून गेला.
एव्हाना आठ वाजून गेले होते.क्रिकेट किट मिळण्याची शक्यता दिसत नव्हती.सर्वांना कोर्टात जायचे होते.
त्यामुळे आजचा व्यायाम पुरे,उद्यापासून मात्र कसून
सराव करायचे ठरवून टीम परतली.दिवसभर कामाच्या व्यापात सर्वांनाच क्रिकेटचा विसर पडला होता.
संध्याकाळी पुन्हा एकदा सकाळच्या सरावसत्राची आठवण कुमठेकरांनी सगळ्यांना करून दिली.आणि जे नसतील त्यांना पेनल्टी म्हणून पार्टी द्यावी लागेल ,अशी तंबी दिली.त्यामुळे दुसरे दिवशी सकाळी मैदानावर चांगली उपस्थिती होती.जगनाडे मामांचा,कॉलेजकुमार भाच्चा पण आला होता.कॉलेजात हस्ते परहस्ते क्रिकेट किटचा निरोप पोहचला होता.त्यामुळे नेटसहित सर्व तयारी झालेली होती.ते पाहून मंडळी संतोष पावली.
सरावा दरम्यान कुमठेकर क्षेत्ररक्षकांना सुचना देत होते.
शिवाय गोलंदाजी करताना फलंदाजांना,आणि फलंदाजी करताना गोलंदाजांना,कसे खेळायचे याच्या टिप्स चालू होत्या ते वेगळे.
पॅड ग्लोव्ज घालायचा उत्साह दांडगा होता.पण तो सगळा सरंजाम चढवून खेळणे सोपे नव्हते,हे थोड्याच वेळात सर्वांच्या लक्षात आले.तेव्हा बहुतेक जण एक दोन चेंडू खेळून झाले की तो साज उतरवून खेळू लागले. तरीही एखादी ओवर खेळली की फलंदाज,गोलंदाज,
क्षेत्ररक्षक सगळ्यांनाच दम लागायचा.त्यात मामांच्या भाच्च्याने फलंदाजी करताना गोलंदाजांची धुलाई केली.
मारलेल्या चेंडूमागे पळणे तर सोडाच,चालत जावून चेंडू आणणे ही अवघड झाले.चेडू आणण्यातच सगळा वेळ जाऊ लागला.
रस्त्याने चाललेला दाभाडे शिपाई साहेब लोक
क्रिकेट खेळताहेत पाहून थांबला.नेमका तेव्हा त्याच्या दिशेने आलेला चेंडू अडवून त्याने थेट स्टंपवर फेक केली. ते पाहून सरावासाठी त्याला थांबवून घेतले. कुमठेकर फलंदाजी करत होते.त्यांचे सुचनेवरून तो गोलंदाजी करू लागला.त्याच्या चेंडूची त्यांच्या बॅटशी भेटच झाली नाही.कधी बॅट आधी फिरे तर कधी चेंडू आधी मागे जाई.स्टॅम्पची मात्र तीन वेळेस भेट झाली .
अशा रितीने काही काळ सराव झाला.सगळेच थकले होते.वेळे आधीच सराव थांबवला गेला.
पायात गोळे,दुखरे अंग,अशा स्थितीत, संध्याकाळी,
शारीरिक सरावा ऐवजी मानसिक सराव उत्तम,यावर कुमठेकरा सहित सर्वांचेच एकमत झाले. त्या दिवशी सुटी होती म्हणून बरे.थकलेल्या जीवांना विश्रांती मिळाली.पण ती पुरेशी नसावी.कारण दुसरे दिवशीच नाही तर ,त्या आठवड्यातही ,सरावाचा 'स' देखील कुणी काढला नाही.कुमठेकर अधुन मधून ,ढवळे,तांबे, सारख्या काही महत्वाच्या खेळाडूंसोबत वेळ मिळेल तेव्हा चर्चाकरून,काही योजना आखत,तेवढे सोडल्यास,
इतरांना क्रिकेटचा विसर पडल्यासारखे झाले होते.
मैदानावरचा सराव एकंदरित तीनचार दिवसच झाला.
पण दोघा तिघांनी घरासमोर,रबरी चेंडूने खेळणा-या शाळकरी मुलासोंबत अधुन मधून खेळत, सराव सातत्य टिकवले.
विरोधी संघातील काही वकील मंडळी नियमितपणे क्रिकेट खेळत असल्याने त्यांना विशेष सराव सत्र आयोजनाची गरज नव्हती.शिवाय त्यांच्यासाठी सामन्याचे महत्त्व वर्षातून एक दिवस न्यायाधीश मंडळीसोबत मजेत वेळ घालवणे,एवढ्या पुरतेच मर्यादित होते.त्यामुळे सामन्याकडे फार गांभीर्याने कुणीच पाहात नव्हते.अपवाद फक्त गंभीरे वकील.खेळ म्हणजे खेळ.तो गांभीर्यानेच खेळला पाहिजे हे त्यांचे मत.पण ते कुणीच गांभीर्याने घेत नव्हते.म्हणून गंभीरे,गंभीर होते.
सामन्या आधी दोन दिवस,कुमठेकर पण गंभीर झाले.
तशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.सरावा
दरम्यान,कोरान्नेंची (दि.न्या.क.स्त.) कामगिरी पाहून,
त्यांच्यावर यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी सोपविली होती.
पण त्यांचे मेव्हणीचा साखरपुडा अचानक ठरल्याने त्यांना सामन्याचे दिवशीच सासुरवाडीला जायचे होते.
'आधी लगीन क्रिकेटचे ,मग मेव्हणीचे 'म्हणत, इतिहासाचे दाखले देत,कुमठेकरांनी त्यांना त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला.पण ,'साखरपुड्यास गेलो नाहीतर ,बायको,मेव्हणी दोघीही फाडून खातील',
असे सांगून त्यांनी स्पष्ट नकार दिला.कुमठेकरांसाठी हा दुहेरी धक्का होता.कारण मिसेस कुमठेकराच्या डोक्यात
स्वतःच्या भावासाठी,कोरान्नेच्या या मेव्हणीचे स्थळ होते.
त्या विषयी कोरान्नेशी बोला,असा लकडा त्यांनी कुमठेकरांच्यामागे बरेच दिवस लावला होता.पण त्यांनी ढिलाई केली ,आणि चांगले स्थळ हातचे गेले.आता या कारणावरून त्यांना घरी बोलणी खावी लागणार होती .
हे कमी म्हणून की काय,संघातील महत्वाचे खेळाडू चिटणीस(दि.न्या.व.स्त.)यांचा पाय,सरावादरम्यान मुरगळला होता.तो अजून नीट झाला नव्हता.कोरान्नेव चिटणीस या दोघांच्या जागी संगात कुणाला घ्यावे ही मोठी समस्या कुमठेकरां समोर होती.पणअशा समस्यांना डगमगून न जाता,सामन्यांस सामोरे जायचे कुमठेकरांनी ठरवले.
(क्रमश:)
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
23 Feb 2022 - 2:15 pm | चौथा कोनाडा
क्रिकेट सामना !!!
रोचक विषय !
🍿
धमाल खुसखुषीत वर्णने !
न्या. कुमठेकर भारी आहेत
वाचत आहे.
|| पु भा प्र ||
23 Feb 2022 - 3:54 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
23 Feb 2022 - 4:30 pm | मुक्त विहारि
उत्तम विषय आहे
एक छोटा हलका फुलका सिनेमा तयार होऊ शकतो
जसा की, निशाणी डावा अंगठा
------
23 Feb 2022 - 7:41 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
23 Feb 2022 - 7:08 pm | कर्नलतपस्वी
पहिला भाग वाचताना वाटले की विषय " एक रुका हुआ फैसला " टाइप काहीतरी आसेल पण सरकारी ऑफिस मध्ये कधितरी होणाऱ्या मॅचेस चे वर्णन झक्कास केले आहे.
23 Feb 2022 - 7:41 pm | नीलकंठ देशमुख
आभारी आहे प्रतिसादाबद्दल
23 Feb 2022 - 8:46 pm | सौंदाळा
हा भाग पण मस्तच
आता प्रत्यक्ष सामन्यातील गमतीजमती, फजिती वाचण्यास उत्सुक आहे.
23 Feb 2022 - 8:51 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. आभारी आहे. लवकरच तो भाग येईल
23 Feb 2022 - 11:10 pm | श्रीगणेशा
गुगली टाकलीत एकदम, दुसऱ्या भागात :-)
काहीतरी गंभीर विषय असणार असं वाटलं होतं पहिल्या भागात.
ओघवतं लिहिलं आहे!
तुमच्या लिखाणातून न्यायाधीशांची "चार चौंघा सारखा सामान्य माणूस" ही बाजू नेहमी जाणवते.
पुढील भागाची प्रतीक्षा.
24 Feb 2022 - 12:02 am | मुक्त विहारि
अगदी अगदी ....
24 Feb 2022 - 7:42 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. सगळेच शेवटी माणसंच आहेत.
26 Feb 2022 - 9:34 pm | विजुभाऊ
मस्त लिहीताय .
27 Feb 2022 - 9:40 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल